येशूची जीवनकथा—खरी आहे की खोटी?
येशूची जीवनकथा—खरी आहे की खोटी?
सबंध जगभरात, नासरेथकर येशूची कहाणी मानवी इतिहासाला कलाटणी देणाऱ्या तरुणाची कहाणी आहे. या कहाणीचा एक एक धागा समाजात इतका गुंफला आहे की तो समाजाचा एक अविभाज्य घटकच बनून गेला आहे. शाळेच्या पुस्तकांमध्ये आणि लोकांच्या तोंडून येशूबद्दलच्या गोष्टींचा उल्लेख केला जातो. अनेकांच्या मते, येशूच्या जीवनकथेत सर्वकाळासाठी उपयुक्त असलेली सत्ये आणि म्हणी आहेत; जसे की, “तुमचे बोलणे, होय तर होय, नाही तर नाही, एवढेच असावे” ही म्हण कोणत्याही युगातल्या लोकांसाठी उपयुक्त आहे. (तिरपे वळण आमचे) (मत्तय ५:३७) तुमच्या पालकांनीही (मग ते ख्रिस्ती असोत अगर नसोत) कळत नकळत येशूच्या जीवनाविषयीच्या अहवालांमधून तुम्हाला काही शिकवले असेल.
येशूची जीवनकथा असलेली बायबलमधील पुस्तके ख्रिस्ताचे वर्णन करणारी व त्याच्याविषयी माहिती देणारी पुस्तके आहेत असे ख्रिस्ताचे खरे अनुयायी मानतात. या ख्रिस्तासाठी ते काहीही करायला, अगदी प्राण द्यायला देखील तयार असतात. या पुस्तकांत धैर्य, सहनशीलता, विश्वास आणि आशा या गुणांबद्दल सांगितले आहे. काहींच्या मते, हे गुण दाखवायला त्यांना याच पुस्तकांमधून प्रेरणा मिळाली आहे. या सर्व गोष्टींचा विचार केल्यावर तुम्हाला असे वाटत नाही का, की या पुस्तकांमधले अहवाल कल्पित आहेत हे सिद्ध करायला ठोस पुरावा असला पाहिजे? येशूच्या जीवनकथांचा मानवाच्या विचारांवर आणि वागणुकीवर प्रचंड प्रभाव पडला आहे. त्यामुळे या पुस्तकांच्या खरेपणाबद्दल कोणी शंका व्यक्त केलीच तर तुम्ही त्याच्याकडे ठोस पुरावा मागणार नाही का?
तुम्ही आमच्यासोबत येशूची जीवनकथा असलेल्या पुस्तकांवरील काही विचारप्रवर्तक प्रश्न पडताळून पाहू शकता. या पुस्तकांचा अभ्यास केलेल्या काहींना या प्रश्नांविषयी काय वाटते ते तुम्हीच पाहा. आणि लक्षात असू द्या की, यांच्यातले काहीजण तर ख्रिस्तीसुद्धा नाहीत. ही सगळी माहिती मिळाल्यावर तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा असेल तो तुम्ही घेऊ शकता.
पडताळून पाहायची प्रश्ने
◆ येशूच्या जीवनकथांचे हे अहवाल कौशल्याने बनवलेले काल्पनिक अहवाल असावेत का?
जिजस सेमीनारचे संस्थापक, रॉबर्ट फंक म्हणतात: “खरे तर, ख्रिस्ती शिकवणूक येशूच्या मृत्यूनंतर निर्माण झाली आणि मत्तय, मार्क, लूक आणि योहान यांनी त्या शिकवणुकीला जुळणारा ‘मशिहा निर्माण’ केला.” परंतु, येशूची जीवनकथा लिहिली जात असताना येशूचे संदेश ऐकलेले, त्याचे कार्य पाहिलेले आणि मृतातून तो पुन्हा जिवंत झाल्यानंतर त्याला प्रत्यक्ष पाहिलेले पुष्कळ जण तेव्हा हयात होते. निदान त्यांनी तरी, येशूची जीवनकथा लिहिणाऱ्या लेखकांवर कसल्याही प्रकारच्या खोटेपणाचा आरोप केला नाही.
ख्रिस्ताचा मृत्यू आणि त्याचे मृतातून पुन्हा जिवंत होणे याचाच विचार करा. याविषयीची विश्वसनीय माहिती फक्त बायबलमधील येशूच्या जीवनकथांमध्येच आढळत नाही, तर प्राचीन करिंथमधल्या ख्रिश्चनांना उद्देशून प्रेषित पौलाने लिहिलेल्या पहिल्या पत्रातही (जे ख्रिस्ती नियमानुसार आहे) आढळते. त्यात त्याने लिहिले: “मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हास सांगून टाकले, त्यापैकी मुख्य हे की, शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्याआमच्या पापांबद्दल मरण पावला; तो पुरला गेला; शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठविण्यात आले; आणि तो केफाला, मग बारा जणांना दिसला; त्यानंतर तो एकदम पाचशेपेक्षा अधिक बंधूंना दिसला; त्यातील बहुतेक आजपर्यंत हयात आहेत, आणि कित्येक महानिद्रा घेत आहेत; त्यानंतर तो याकोबाला, मग सर्व प्रेषितांना दिसला; आणि जणू काय अकाली जन्मलेला जो मी, त्या मलाहि सर्वांच्या शेवटी दिसला.” (१ करिंथकर १५:३-८) अशा प्रत्यक्ष साक्षीदारांना येशूच्या जीवनासंबंधीचे ऐतिहासिक अहवाल ठाऊक होते.
आधुनिक टीकाकारांनी ज्या काल्पनिकतेचा आरोप केला आहे ती काल्पनिकता ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांमध्ये तरी दिसून येत नाही. मात्र, सा.यु. दुसऱ्या शतकातल्या लिखाणांमध्ये ती दिसून येते. प्रेषितांच्या मंडळ्यांमधून निघून गेलेल्या काही लोकांमध्ये धर्मत्याग (खऱ्या ख्रिस्ती धर्माला त्यागल्यामुळे) सुरू झाला त्या वेळी ख्रिस्ताविषयी खोटे कथन केले जाऊ लागले.—◆ येशूची जीवनकथा खोटी असावी का?
लेखक आणि टीकाकार, सी. एस. लुईस यांना येशूची जीवनकथा दंतकथा आहे असे म्हणणे पटत नाही. त्यांनी लिहिले: “वाङ्मयीन इतिहासकार असल्यामुळे मला पक्की खात्री आहे की, येशूची जीवनकथा ही काही दंतकथा नाही. दंतकथांमध्ये ज्या काल्पनिक गोष्टी असतात त्या या जीवनकथेत दिसून येत नाहीत. . . . येशूच्या जीवनाविषयी पुष्कळशा गोष्टी आपल्याला ठाऊक नाहीत; पण [हे अहवाल कल्पित असते तर] कथाकादंबऱ्या लिहिणारे लेखक अशी अधुरी माहिती कधीच देणार नाहीत.” एच. जी. वेल्स हे नामवंत इतिहासकार ख्रिस्ती नाहीत तरी देखील ते कबूल करतात: “एका खऱ्या व्यक्तीचे चित्र रेखाटण्यात चारही लेखकांनी [येशूची जीवनकथा लिहिणाऱ्या लेखकांनी] सुसंगतता दाखवली आहे; त्यांच्या लिखाणांमधून वस्तुस्थितीची खात्री . . . पटते.”
येशू त्याच्या मृत्यूनंतर पुन्हा जिवंत झाला व आपल्या शिष्यांना दिसला त्या घटनेचा आपण विचार करू या. दंतकथेच्या लेखकाने या घटनेचे वर्णन नाट्यमय रूपात केले असते. जसे की, येशू थाटामाटात प्रकट होतो, एक जबरदस्त भाषण देतो किंवा प्रकाशमय आणि तेजोमय दिसतो वगैरे वगैरे. पण तसे वर्णन केलेले नाही. फक्त तो आपल्या शिष्यांसमोर उभा राहतो असेच केवळ म्हटले आहे. त्याने आपल्या शिष्यांना त्याला हात लावून पाहू दिले आणि मग विचारले: “मुलांनो, तुमच्याजवळ काही खावयाला आहे काय?” (योहान २१:५) विद्वान ग्रेग इस्टरब्रुक म्हणतात: “या तपशीलांवरून दिसून येते की, हे कल्पनेवर आधारलेले अहवाल नाहीत तर खरे आहेत.”
येशूची जीवनकथा लिहिण्यात आली त्या वेळी रब्बींच्या शिकवण्याची एक विशिष्ट पद्धत रूढ होती. त्या पद्धतीप्रमाणेच लोकांना शिकावे लागत होते. आणि त्या पद्धतीमुळे, येशूची जीवनकथा खोटी आहे म्हणून केलेला आरोप सिद्ध होत नाही. त्या पद्धतीप्रमाणे वारंवार उच्चार करून पाठांतर करावे लागत होते. यामुळे उलट हेच सिद्ध होते की, येशूने जे काही म्हटले व केले ते अचूकपणे आणि जसेच्या तसे नमूद केले आहे. त्यात काहीही फुगवून सांगितलेले नाही.
◆ येशूची जीवनकथा दंतकथा असती तर, येशूच्या मृत्यूनंतर इतक्या लवकर कशी लिहिण्यात आली?
उपलब्ध पुराव्यानुसार, येशूविषयीचे अहवाल सा.यु. ४१ ते ९८ सालांदरम्यान लिहिले गेले होते. आणि येशूचा मृत्यू सा.यु. ३३ साली झाला होता. याचा अर्थ, त्याची सेवा संपल्यावर अल्पावधीतच त्याच्या जीवनासंबंधी सर्व अहवाल तयार करण्यात आले. असे असले तर, येशूची जीवनकथा काल्पनिक आहे असा वाद मांडताच येत नाही. दंतकथा इतक्या अल्पावधीत लिहून होत नसते तिला वेळ लागत असतो. उदाहरणार्थ, प्राचीन ग्रीक कवी, होमर यांनी लिहिलेली इलियाड आणि ओडिस्सी ही महाकाव्ये पाहा. काहीजण असे मानतात की, या दोन कल्पित महाकाव्यांची निर्मिती करायला आणि ती पूर्ण व्हायला शेकडो वर्षे लागली. तर मग, येशूच्या जीवनकथेविषयी काय म्हणता येईल?
सीझर ॲण्ड ख्राइस्ट या आपल्या पुस्तकात इतिहासकार विल ड्यूरंट लिहितात: “दोनचार सामान्य माणसांनी मिळून . . . आपल्या कल्पनांच्या आधारे प्रभावी आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व असलेली व्यक्ती, उच्च दर्जाची नीतिमूल्ये आणि मानवांना प्रेमाने जगायला शिकवले हाच इतका मोठा चमत्कार म्हणावा लागेल की येशूच्या जीवनकथेतला कोणताही चमत्कार त्याच्या तोडीचा नसेल. दोन शतके बायबलची समीक्षा केल्यावर, ख्रिस्ताचे जीवन, त्याचे व्यक्तिमत्त्व आणि त्याची शिकवण यांच्या एकंदर कथनात फारसा फरक पडलेला नाही; पाश्चात्त्य माणसाला तो अजूनही सर्वात आकर्षक अहवाल वाटतो.”
◆ प्रारंभिक ख्रिस्ती समाजाने नंतर येशूच्या जीवनकथेत हवे तसे बदल केले का?
काही टीकाकारांचे म्हणणे आहे की, प्रारंभिक ख्रिश्चनांमधील राजकारणामुळे येशूची जीवनकथा लिहिणाऱ्या लेखकांनी येशूच्या कहाणीत फेरबदल केले किंवा त्यात आणखी भर टाकली. परंतु, या अहवालाचे जवळून परीक्षण केल्यावर दिसून येते की असे काहीही घडले नाही. जर येशूबद्दलची माहिती देणाऱ्या या पुस्तकांमध्ये पहिल्या शतकातल्या ख्रिस्ती कारस्थानामुळे फेरबदल करण्यात आले तर मग यहुदी आणि विदेशी यांच्याविषयी केलेल्या नकारात्मक गोष्टी अजूनही त्यात का आहेत?
मत्तय ६:५-७ येथे एक उदाहरण आपल्याला पाहायला मिळते; तेथे येशू असे म्हणतो: “जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करिता तेव्हा तेव्हा ढोंग्यांसारखे असू नका; कारण लोकांनी आपणास पाहावे म्हणून सभास्थानात व चवाठ्यावर उभे राहून प्रार्थना करणे त्यास आवडते. मी तुम्हास खचित सांगतो की, ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत.” येथे तर येशूने यहुदी धार्मिक नेत्यांना साफ साफ धिक्कारले होते. येशू पुढे म्हणाला: “तुम्ही प्रार्थना करिता तेव्हा परराष्ट्रीयांसारखी [विदेश्यांसारखी] व्यर्थ बडबड करू नका, आपण पुष्कळ बोललो म्हणजे आपले मागणे मान्य होईल असे त्यांना वाटते.” येशूचे हे शब्द आपल्या लिखाणात सामील करून येशूची जीवनकथा लिहिणारे लेखक, लोकांना आपल्या बाजूला खेचण्याचा प्रयत्न करत नव्हते. ते तर फक्त येशू ख्रिस्ताने शिकवलेल्या गोष्टी लिहून ठेवत होते.
आणखी एक अहवाल पाहू या. तो अहवाल, काही स्त्रिया येशूच्या कबरेजवळ जाऊन ती मोकळी असल्याचे पाहतात तेव्हाचा आहे. (मार्क १६:१-८) ग्रेग इस्टरब्रुक यांच्या मते, “प्राचीन मध्ययुगीन समाजात, स्त्रियांनी दिलेली जबानी विश्वासयोग्य न मानण्याची प्रथाच होती: उदाहरणार्थ, एका स्त्रीने व्यभिचार केला अशी दोन पुरुषांनी साक्ष दिली की तो आरोप सिद्ध होत होता पण पुरुषावरील व्यभिचाराचा आरोप स्त्रीच्या जबानीने कधीच सिद्ध होऊ शकत नव्हता.” आणि म्हणून येशू त्याच्या कबरेत नसल्याचे जेव्हा स्रियांनी येऊन सांगितले, तेव्हाही अगदी असेच घडले कारण येशूच्या स्वतःच्या शिष्यांनी देखील स्रियांवर विश्वास ठेवला नाही! (लूक २४:११) म्हणूनच, हा एक कल्पित अहवाल आहे असे म्हणणे चुकीचे ठरेल.
प्रेषितांनी लिहिलेल्या पत्रांमध्ये आणि प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातही येशूचे दृष्टान्त आढळत नाहीत. यामुळे, हे दृष्टान्त, पहिल्या शतकातील ख्रिश्चनांनी येशूच्या जीवनकथेत सामील केले नाहीत तर ते खरोखर येशूनेच दिले होते असे समजण्यास ठोस कारण मिळते. शिवाय, येशूच्या जीवनाविषयीचा अहवाल आणि प्रेषितांनी लिहिलेली पत्रे यांची नीट तुलना करून पाहिली तर हे स्पष्टपणे दिसून येते की, पौलाच्या शब्दांमध्ये किंवा ग्रीक शास्त्रवचनाच्या इतर लेखकांच्या शब्दांमध्येही फेरबदल करून ते येशूचे आहेत असे भासवण्याचा प्रयत्न केलेला नाही. प्रारंभिक ख्रिश्चनांनी असे काही केले असते, तर प्रेषितांनी लिहिलेल्या पत्रांमधली थोडीफार माहिती तरी येशूच्या जीवनाविषयीच्या अहवालांमध्ये आढळली असती. पण ती आढळत नाही म्हणून आपण निश्चितपणे असे म्हणू शकतो की येशूच्या जीवनकथांमधील माहिती जशीच्या तशी आणि खरी आहे, त्यात फेरबदल केलेला नाही.
◆ येशूच्या जीवनकथेमध्ये विसंगती असल्याचे वाटते त्याबद्दल काय?
टीकाकारांनी आधीपासूनच असा दावा केला आहे की, येशूच्या जीवनाविषयीच्या अहवालांमध्ये अनेक विसंगती आहेत. इतिहासकार ड्यूरंट यांनी त्या अहवालांचे निःपक्षपाती दृष्टिकोनातून, ते केवळ ऐतिहासिक दस्ताऐवज आहेत असे समजून परीक्षण केले. या पुस्तकांमध्ये त्यांना विसंगती वाटली असे ते मान्य करतात, पण ते म्हणतात की, “ही विसंगती महत्त्वाच्या भागांमध्ये नाही तर लहानसहान गोष्टींमध्ये [क्षुल्लक तपशीलांमध्ये] आढळते; पण मुख्य गोष्टींच्या बाबतीत, येशूच्या जीवनाविषयीचा अहवाल देणाऱ्या पहिल्या तीन पुस्तकांमध्ये विलक्षण एकमत आहे आणि ख्रिस्ताविषयी सांगितलेल्या गोष्टींतही साम्य आहे.”
येशूच्या जीवनकथांमध्ये भासणाऱ्या क्षुल्लक विसंगतीचे स्पष्टीकरण अगदी सहजपणे दिले जाऊ शकते. उदाहरणार्थ: मत्तय ८:५ येथे म्हटले आहे की, आपल्या चाकराला बरे करावे अशी विनंती करण्यासाठी “एक शताधिपति [येशूकडे] आला.” लूक ७:३ येथे म्हटले आहे की, त्या शताधिपतीने “यहूद्यांच्या वडील मंडळीस [येशूकडे] पाठविले व विनंती केली की, आपण येऊन माझ्या दासाला वाचवावे.” म्हणजेच येथे म्हटले आहे की, त्या शताधिपतीने वडील मंडळीला आपले प्रतिनिधित्व करायला पाठवून दिले. पण मत्तयाने म्हटले आहे की, स्वतः शताधिपती येशूकडे विनंती करण्यासाठी आला होता. याचे स्पष्टीकरण असे करता येते की, ती वडील मंडळी त्या शताधिपतीच्या वतीने बोलणारी होती आणि म्हणून त्यांच्याकरवी त्याने ही विनंती केली होती. तर अशाप्रकारे येशूच्या जीवनकथांमध्ये भासणारी विसंगती दूर करता येण्यासारखी आहे याचे हे केवळ एक उदाहरण आहे.
बायबल समीक्षकांचा असाही दावा आहे की शुभवर्तमानांची पुस्तके खऱ्या इतिहासाच्या प्रमाणानुसार नाहीत. त्याबद्दल काय म्हणता येईल? ड्यूरंट पुढे म्हणतात: “बायबलची समीक्षा करणाऱ्यांनी आपल्या संशोधनाच्या आवेशात येऊन नव्या कराराच्या खरेपणाची इतकी कडक परीक्षा घेतली आहे की, असल्या परीक्षेत हमुरबी, डेव्हिड, सोक्रटीझ यांच्यासारखे शेकडो प्राचीन काळातले नामवंत लोकही काल्पनिक व्यक्ती ठरतील. या सुवार्तिकांमध्ये कमतरता होत्या पण त्यांनी त्या लपवल्या नाहीत तर उघडपणे नमूद केल्या. कथाकादंबऱ्यांच्या लेखकांनी कधीच असे केले नसते. जसे की, देवाच्या राज्यात श्रेष्ठ स्थान मिळवण्यासाठी प्रेषितांमध्ये झालेली चढाओढ, येशूला अटक केल्यानंतर त्यांचे पळून जाणे, पेत्राचे [येशूला] नाकारणे. . . . [म्हणून,] हे अहवाल वाचल्यावर, त्यांच्यामध्ये वर्णन केलेली व्यक्ती खरी आहे याबद्दल कोणीही शंका घेऊ शकत नाही.”
◆ आधुनिक काळातला ख्रिस्ती धर्म येशूच्या जीवनाविषयीच्या अहवालांमधील त्याच्या शिकवणींचे अनुकरण करतो का?
जिजस सेमीनारने हे घोषित केले की, येशूच्या जीवनकथांवरील त्यांचे संशोधन “चर्च मंडळाच्या हुकुमांनी बाध्य नाही.” पण इतिहासकार वेल्स यांना केव्हाच कळून चुकले की, येशूच्या जीवनकथांमध्ये सादर केलेल्या येशूच्या शिकवणी आणि ख्रिस्ती धर्म जगतातील शिकवणी यांच्यात जमीन अस्मानाचे अंतर आहे. त्यांनी लिहिले: “येशूच्या प्रेषितांना येशूकडून त्रैक्याविषयी ऐकायला मिळाले याचा मुळीच पुरावा नाही. . . . त्याचप्रमाणे, [येशूने] आपली आई मरीया हिची उपासना प्राचीन काळातील स्वर्गाची राणी आयसिस हिच्या रूपात करण्याविषयी देखील काहीच म्हटले नाही. आज ख्रिस्ती धर्म जगतात जे काही केले जाते आणि शिकवले जाते ते सगळे त्याने नाकारले होते.” म्हणून, ख्रिस्ती धर्मजगताच्या शिकवणींच्या आधारे येशूच्या जीवनाविषयीच्या अहवालांचा खरेपणा ठरवणे चुकीचे ठरेल.
तुमचा निष्कर्ष काय आहे?
या सर्व मुद्यांचे परिक्षण केल्यावर, तुम्हाला काय वाटते? येशूची जीवनकथा खरी आहे याला ठोस, खात्रीशीर पुरावा आहे का? येशूच्या जीवनकथांच्या खरेपणाविषयी उभे केलेले प्रश्न बिनबुडाचे असल्याचे अनेकांना वाटते. तुम्हाला याबद्दल काही ठरवायचे असेल तर बायबलमधील येशूच्या जीवनकथांबद्दल मनात पूर्वग्रह न बाळगता तुम्ही त्यांचे वाचन केले पाहिजे. (प्रेषितांची कृत्ये १७:११) त्या अहवालांमध्ये, येशूच्या व्यक्तिमत्त्वाचे सुसंगत, प्रामाणिक आणि अचूक वर्णन केल्याचे तुम्हाला आढळेल तेव्हा तुम्हाला खात्री पटेल की हे अहवाल म्हणजे दंतकथांचा संग्रह नाहीत. *
बायबलचे काळजीपूर्वक परीक्षण केल्याने आणि त्यातील सल्ला लागू केल्याने तुमच्या जीवनात फायदा होतो हे तुम्ही पाहू शकाल. (योहान ६:६८) बायबलमधील येशूच्या जीवनकथांमध्ये त्याने जे काही म्हटले आहे ते विशेषकरून फायद्याचे ठरेल. एवढेच नाही तर, आज्ञाधारक मानवजातीकरता राखून ठेवलेल्या अद्भुत भविष्याबद्दलही तुम्हाला त्यामध्ये शिकायला मिळेल.—योहान ३:१६; १७:३, १७.
[तळटीप]
^ परि. 29 बायबल—देवाचे वचन की मानवाचे? (इंग्रजी) या पुस्तकातील ५ ते ७ अध्याय आणि सर्व लोकांसाठी असलेले पुस्तक हे माहितीपत्रक पाहा. ही दोन्ही प्रकाशने वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ इंडियाने प्रकाशित केली आहेत.
[७ पानांवरील चौकट]
खऱ्या अहवालाचा पुरावा
पूर्वी बायबलचा समीक्षक असलेल्या एका ऑस्ट्रेलियन लेखकाने काही वर्षांआधी असे कबूल केले: “एका वार्ताहराची सर्वात पहिली जबाबदारी असते वस्तुस्थितींचे परीक्षण करून पाहणे. माझ्या जीवनात मी पहिल्यांदा तसं केलं. . . . आणि मला धक्काच बसला. कारण [बायबलमधील येशूच्या जीवनकथांमध्ये] मी जे वाचत होतो त्या कल्पित गोष्टी नव्हत्या किंवा फक्त वरवरून खऱ्या वाटणाऱ्या कथा नव्हत्या तर तो घडलेल्या घटनांचा अहवाल होता. ज्या विलक्षण घटना घडल्या त्यांचा प्रत्यक्ष पाहिलेला किंवा प्रत्यक्ष पाहिलेल्या दुसऱ्या व्यक्तीकडून घेतलेला तो अहवाल होता . . . बातम्या सांगण्याची एक विशिष्ट पद्धत असते आणि तीच पद्धत या अहवालांमध्ये आढळते.”
त्याचप्रमाणे, ऑक्लंड विद्यापीठात प्राचीन ग्रीक आणि रोमन वाङ्मयाचे प्राध्यापक, इ. एम. ब्लेकलॉक म्हणतात: “मी एक इतिहासकार आहे. प्राचीन ग्रीक आणि रोमन वाङ्मयाकडे मी निखळ ऐतिहासिक दृष्टीने पाहतो. आणि मी तुम्हाला सांगतो की, ख्रिस्ताचे जीवन, मृत्यू आणि मृतातून पुन्हा उठणे यांसंबंधीचा पुरावा जितका सिद्ध झाला आहे तितका प्राचीन इतिहासातल्या बहुतांश घटनांच्या बाबतीत सिद्ध झालेला नाही.”
[८, ९ पानांवरील नकाशा/चित्रे]
(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)
फुनिके
गालील
यार्देन नदी
यहूदीया
[चित्रे]
“ख्रिस्ताचे जीवन, मृत्यू आणि मृतातून पुन्हा उठणे यांसंबंधीचा पुरावा जितका सिद्ध झाला आहे तितका प्राचीन इतिहासातल्या बहुतांश घटनांच्या बाबतीत सिद्ध झालेला नाही”—प्राध्यापक इ. एम. ब्लेकलॉक
[चित्राचे श्रेय]
पार्श्वभागातील नकाशे: Based on a map copyrighted by Pictorial Archive (Near Eastern History) Est. and Survey of Israel.