व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“ख्रिश्‍चन” म्हणजे काय?—समज व गैरसमज

“ख्रिश्‍चन” म्हणजे काय?—समज व गैरसमज

ख्रिश्‍चन” म्हणजे काय?—समज व गैरसमज

ख्रिश्‍चन असण्याचा काय अर्थ होतो? तुम्ही या प्रश्‍नाचे उत्तर कसे द्याल? हा प्रश्‍न अनेक देशांतील वेगवेगळ्या लोकांना विचारण्यात आला तेव्हा बहुतेक लोकांनी खालीलप्रमाणे उत्तरे दिली:

“येशूला मानून त्याच्याप्रमाणे होण्याचा प्रयत्न करणं.”

“सज्जन व्यक्‍ती बनणं, दानधर्म करणं.”

“ख्रिस्ताला प्रभू व उद्धारकर्ता मानणं.”

“चर्चला जाणं, रोजरी म्हणणं, होली कम्युनियन घेणं.”

“ख्रिश्‍चन असण्याकरता चर्चला गेलंच पाहिजे असं मला वाटत नाही.”

हे झाले लोकांचे विचार. आता, डिक्शनरीत काय म्हटले आहे ते पाहू या. अनेक डिक्शनरींमध्ये “ख्रिश्‍चन” या शब्दाखाली वेगवेगळे अर्थ दिलेले आहेत. एका डिक्शनरीत तर “ख्रिश्‍चन” शब्दाचे दहा अर्थ दिले आहेत. एक अर्थ होतो, “येशू ख्रिस्ताच्या धर्मावर विश्‍वास करणारा किंवा त्या धर्माचे पालन करणारा” तर या शब्दाचा दुसरा अर्थ होतो “एक सभ्य व्यक्‍ती.” अशी विविध उत्तरे व स्पष्टीकरणे ऐकल्यावर आपल्याला एक गोष्ट मात्र स्पष्टपणे समजते, की लोकांना ख्रिश्‍चन या शब्दाचा खरा अर्थ माहीतच नाही.

ख्रिश्‍चन धर्माचे बदलते रूप

स्वतःला ख्रिश्‍चन म्हणवणाऱ्‍या लोकांमध्ये,—एकाच चर्चला जाणाऱ्‍या लोकांमध्ये देखील आपल्याला वेगवेगळे दृष्टिकोन पाहायला मिळतात. जसे की, बायबल हे देवाच्या प्रेरणेने लिहिले आहे का, उत्क्रांतीची शिकवण, चर्चने राजकारणात भाग घ्यावा का, आपण देवाच्या राज्याचा प्रचार इतरांना करावा का यासारख्या विषयांवरही एकमत दिसत नाही. इतकेच नव्हे तर गर्भपात, समलैंगिकता किंवा विवाह न करता एकत्र राहणे यांसारखे विषयही वादाच्या भोवऱ्‍यात आहेत. दुसऱ्‍या शब्दांत, आजच्या काळाला अनुसरून ख्रिस्ती धर्माचेही रूप बदलत चालले आहे, धार्मिक नीतिनियम पूर्वीइतके कडक राहिलेले नाहीत.

उदाहरणार्थ, ख्रिश्‍चन सेंच्युरी नावाच्या एका मासिकात असे वृत्त होते, की एका प्रोटेस्टंट चर्चने “एका समलिंगी पाळकाला, आपल्या व्यवस्थापन बोर्डाचा सदस्य बनवले” व इतरांनी या निर्णयाला संमती दिली. काही ख्रिस्ती धर्मविद्वान तर असे सुचवत आहेत की तारण मिळवण्यासाठी येशूवर विश्‍वास ठेवण्याची गरज नाही. द न्यू यॉर्क टाईम्समधील एका वृत्तानुसार त्यांचे म्हणणे आहे, की “स्वर्गात फक्‍त ख्रिश्‍चन लोकच जाणार नाहीत” तर यहुदी, मुस्लिम आणि इतर पंथीय देखील जाणार आहेत.

विचार करा: एखादा मार्क्सवादी भांडवलशाहीचे समर्थन करत असेल तर तो खरोखरचा मार्क्सवादी ठरेल का? किंवा, एखादा लोकशाहीवादी जर हुकूमशाहीचे समर्थन करत असेल तर तो खरोखरचा लोकशाहीवादी ठरेल का? किंवा, एखादा पर्यावरणवादीच जर जंगलतोडीला समर्थन देत असेल तर तो खरोखरच पर्यावरणवादी ठरेल का? तुम्ही म्हणाल, “मुळीच नाही.” तुमचे उत्तर अगदी बरोबर आहे. तसेच मग, स्वतःला ख्रिश्‍चन म्हणवणाऱ्‍या लोकांमध्ये आपण इतके वेगवेगळे दृष्टिकोन पाहतो तेव्हा आपल्याला दिसून येते की त्यांच्या धार्मिक विश्‍वासांमध्ये जमीनआस्मानाचा फरक आहे. त्यांचे काही विश्‍वास तर ख्रिस्ती धर्माचा संस्थापक, येशू ख्रिस्त याच्या शिकवणुकींच्या अगदी विरुद्ध आहेत. या मतभेदांवरून आपण कोणता निष्कर्ष काढू शकतो?—१ करिंथकर १:१०.

जगाच्या बदलत्या विचारांप्रमाणे बायबलच्या शिकवणी बदलण्याचा प्रकार काही नवीन नाही, त्याविषयी आपण पुढे पाहणारच आहोत. बायबलच्या शिकवणुकीत असे फेरबदल करणे देवाच्या आणि येशू ख्रिस्ताच्या नजरेत बरोबर आहे का? ख्रिस्ताने ज्या शिकवणी दिल्या होत्या त्याच्या उलट शिकवणी देणारे लोक स्वतःला ख्रिश्‍चन म्हणू शकतात का? यांसारख्या प्रश्‍नांवर पुढील लेखात चर्चा केली आहे.