व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“ख्रिस्ती” धर्माचे बदललेले रूप देवाला मान्य आहे का?

“ख्रिस्ती” धर्माचे बदललेले रूप देवाला मान्य आहे का?

“ख्रिस्ती” धर्माचे बदललेले रूप देवाला मान्य आहे का?

समजा तुम्ही एका चित्रकाराकडून तुमचे चित्र काढून घेतले आहे. त्याने तुमचे सुरेख व हुबेहुब चित्र काढल्याचे पाहून तुम्हाला खूपच आनंद होतो. तुमच्या मनात विचार येतो, की माझ्या मुलांना, नातवंडांना, आणि त्यांच्या नातवंडांना माझे हे चित्र पाहून किती आनंद होईल.

परंतु काही वर्षांनंतर तुमच्या एखाद्या नातवाला वाटते, की चित्रातील तुमचे केस बरोबर दिसत नाहीत म्हणून मग तो त्याच्या मर्जीनुसार त्या चित्रात काही फेरबदल करतो. तुमच्या एखाद्या पतवंडाला वाटते की चित्रातील तुमचे नाक सरळ नाही म्हणून मग तो त्याला जसे वाटते त्याप्रमाणे ते सरळ करतो. अशाप्रकारे, प्रत्येक जण त्याच्या मर्जीनुसार त्यात “सुधारणा” करत राहतो. इतके, की आता ते चित्र तुमचे नसून दुसऱ्‍याच कोणाचे आहे असे वाटते. तुमच्या चित्राचे असे हाल होणार आहेत हे तुम्हाला आधीच माहीत असल्यास तुम्हाला कसे वाटले असते? तुम्हाला नक्कीच राग आला असता.

ख्रिस्ती धर्माच्या बाबतीतही काहीसे असेच घडले आहे. इतिहास दाखवून देतो, की प्रेषितांच्या मृत्यूनंतर लगेच ‘ख्रिस्ती धर्माचे’ रूप बदलू लागले. याविषयी बायबलमध्ये आधीच भाकीत केले होते.—मत्तय १३:२४-३०, ३७-४३; प्रेषितांची कृत्ये २०:३०. *

बायबलची तत्त्वे कोणत्याही काळाला आणि कोणत्याही संस्कृतीला लागू करण्यात काही गैर नाही. परंतु, जगातल्या लोकांच्या आवडीनुसार व सोयीनुसार बायबलच्या शिकवणी बदलणे चुकीचे आहे. पण हेच घडले आहे. ते कसे? आपण काही उदाहरणांचा विचार करू या.

चर्चची राजकारणाशी मैत्री

येशूने शिकवले, की त्याचे राज्य पृथ्वीवरील सरकारांप्रमाणे नसून एक स्वर्गीय सरकार असेल व येणाऱ्‍या दिवसांत जगातील सर्व राज्यांचा नाश केल्यानंतर त्याचे राज्य अनंतकाळ पृथ्वीवर टिकून राहील. (दानीएल २:४४; मत्तय ६:९, १०) “माझे राज्य ह्‍या जगाचे नाही,” असेही त्याने म्हटले होते. (योहान १७:१६; १८:३६) याचा अर्थ असा होतो, की त्याच्या राज्याचा जगातील राजकारणाशी काहीएक संबंध नाही. म्हणूनच पहिल्या शतकातील त्याचे अनुयायी, कायद्यांचे पालन करीत असले तरी राजकारणापासून मात्र अतिशय दूर होते.

पण, चौथ्या शतकाची सुरवात झाली तेव्हा काही ख्रिश्‍चन अधीर होऊ लागले; येशू ख्रिस्त पुन्हा कधी येईल आणि देवाचे राज्य स्थापन करील असे त्यांना वाटू लागले. त्यांची अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे हळूहळू राजकारणाबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन बदलू लागला. युरोप—अ हिस्ट्री नावाचे पुस्तक म्हणते, “सम्राट कॉन्स्टंटाईनच्या आधीच्या ख्रिश्‍चनांच्या मनाला, राजकारणाचा आधार घेऊन आपल्या धर्माचा प्रसार करण्याचा विचार देखील शिवला नव्हता. कॉन्स्टंटाईननंतर मात्र चर्चचे राजकारणाशी संबंध वाढतच गेले.” अशारितीने एक वेगळा ख्रिस्ती धर्म उदयास आला. आणि हा नवा ख्रिस्ती धर्म “सर्वव्यापक” असल्यामुळे त्याला “कॅथलिक” (इंग्रजीत कॅथलिक या शब्दाचा अर्थ सर्वव्यापक असा होतो) धर्म असे नाव देण्यात आले. हा रोमी साम्राज्याचा अधिकृत धर्म बनला.

ख्रिस्ती धर्मजगत आणि राजकारण यांच्या मैत्रीचा परिणाम काय झाला त्याबद्दल ग्रेट एजेस ऑफ मॅन नावाचा विश्‍वकोश म्हणतो: “ख्रिश्‍चनांविरूद्ध भयंकर छळाची लाट येऊन ८० वर्ष होतात न होतात तोच इ. स. ३८५ पासून चर्चच्या पाळकांनीच, त्यांच्या धर्माचा विरोध करणाऱ्‍यांचा वध करण्यास सुरू केले. सम्राटाजवळ जितका अधिकार होता तितका अधिकार आता या पाळकांकडे आला होता.” अशाप्रकारे ख्रिस्ती धर्मजगताच्या जुलूमांची सुरवात झाली. शास्त्रवचनांचा उपयोग करून लोकांचे मन वळवण्याऐवजी ते तलवारीचा धाक दाखवून लोकांना कॅथलिक बनवू लागले. प्रेषितांच्या काळातील प्रांजळ व नम्र सुवार्ता प्रचारकांऐवजी सत्तेसाठी हपापलेले पाळक दिसू लागले. (मत्तय २३:९, १०; २८:१९, २०) इतिहासकार एच. जी. वेल्स यांनी असे लिहिले, की चौथ्या शतकातील ‘ख्रिस्ती धर्मजगताच्या’ शिकवणींमध्ये आणि “नासरेथकर येशूच्या शिकवणींमध्ये जमीन-आस्मानाचा फरक” आहे. ख्रिस्ती धर्मजगताने तर देव आणि ख्रिस्त यांच्याबद्दल बायबलमध्ये असलेली मूळ शिकवण देखील बदलून टाकली.

देवाविषयीच्या शिकवणीत फेरबदल

येशू ख्रिस्ताने आणि त्याच्या अनुयायांनी असे शिकवले, की “एकच देव म्हणजे पिता आहे,” व त्याचे नाव यहोवा आहे. हे नाव बायबलच्या प्राचीन हस्तलिपींमध्ये जवळजवळ ७,००० वेळा आले आहे. (१ करिंथकर ८:६; स्तोत्र ८३:१८) येशूला तर देवाने निर्माण केले. ईझी टू रीड या मराठी भाषांतरातील कलस्सैकर १:१५ वचन म्हणते, की “निर्माण केलेल्या सर्व गोष्टींत तो प्रथम आहे.” देवाद्वारे निर्माण केलेला असल्यामुळेच येशूने असे म्हटले होते की “माझा पिता माझ्यापेक्षा थोर आहे.”—योहान १४:२८.

पण तिसऱ्‍या शतकाची सुरवात झाली तेव्हा काही मान्यवर पाळक त्रैक्याची शिकवण देऊ लागले. कारण ग्रीक तत्त्ववेत्ता प्लेटोच्या त्रिदेवाच्या शिकवणीने ते प्रभावित झाले होते. याचा परिणाम असा झाला, की येशूला यहोवा देवाबरोबरचा दर्जा देण्यात येऊ लागला आणि देवाच्या पवित्र आत्म्याला अर्थात कार्यकारी शक्‍तीला त्रैक्यातील तिसरी व्यक्‍ती मानले जाऊ लागले.

ख्रिस्ती धर्मजगताने दुसऱ्‍या धर्मांतून त्रैक्याची शिकवण आपल्यात घेतल्याबद्दल न्यू कॅथलिक एन्सायक्लोपिडिआ म्हणतो: “चौथ्या शतकाच्या शेवटापर्यंत तरी, ‘तीन व्यक्‍ती मिळून एक देव’ अशी शिकवण ख्रिस्ती लोकांनी पूर्णपणे मान्य केली नव्हती. पण याच शिकवणीवर आज त्रैक्याचा सिद्धान्त आधारलेला आहे. प्रेषितांच्या काळात ही शिकवण अस्तित्वातच नव्हती.”

तसेच, द एन्साक्लोपिडिआ अमेरिकाना म्हणतो: “चौथ्या शतकात ख्रिस्ती धर्मजगतात जी त्रैक्याची शिकवण दिली जात होती ती पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांनी दिली नाही. खरे तर ही शिकवण बायबलच्या अगदी विरुद्ध आहे.” द ऑक्सफर्ड कंपॅनियन टू द बायबल नावाचे पुस्तक म्हणते की त्रैक्याची शिकवण “ख्रिस्ती धर्मात नंतर जोडण्यात आलेल्या शिकवणींपैकी” एक आहे. परंतु ख्रिस्ती धर्मजगतात फक्‍त त्रैक्याची शिकवण जोडण्यात आलेली नाही तर इतरही अनेक शिकवणी जोडण्यात आल्या.

अमर आत्म्याची शिकवण

आज संपूर्ण जगभरात असे मानले जाते की माणूस मेल्यावर त्याचा आत्मा जिवंत राहतो. चर्चमध्ये शिकवली जाणारी ही शिकवणसुद्धा जोडण्यात आलेल्या शिकवणींपैकी आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? बायबलमध्ये म्हटले आहे की “मृतांस तर काहीच कळत नाही,” ते अचेतन आहेत, ते मृत्यूच्या गाढ झोपेत आहेत. स्वतः येशूही असेच मानत होता. (उपदेशक ९:५; योहान ११:११-१३) एक मृत व्यक्‍ती केवळ पुनरुत्थानाद्वारेच पुन्हा जिवंत होऊ शकते. हे जणू मृत्यूच्या निद्रेतून ‘जागे होण्यासारखे’ आहे. (योहान ५: २८, २९) मनुष्याचा आत्मा अमर असता तर बायबलने पुनरुत्थानाविषयी काहीही सांगितले नसते कारण जे अमर आहे त्याला पुनरुत्थानाची गरजच नाही.

बायबलमधील पुनरुत्थानाची शिकवण खरी आहे हे दाखवण्यासाठी येशूने मेलेल्या लोकांचे पुनरुत्थानही करून दाखवले. लाजराची गोष्ट घ्या. त्याला मरून चार दिवस झाले होते. येशूने त्याचे पुनरुत्थान केले तेव्हा तो जिवंत झाला व कबरेबाहेर चालत आला. त्याचा आत्मा स्वर्गातील परमसुख सोडून परत त्याच्या शरीरात आला आणि मग लाजर जिवंत झाला असे सांगितलेले नाही. असे असते, तर त्याचे पुनरुत्थान करण्याची गरजच नव्हती.—योहान ११:३९, ४३, ४४.

मग ही आत्म्याच्या अमरत्वाची शिकवण कोठून आली? द वेस्टमिनिस्टर डिक्शनरी ऑफ ख्रिश्‍चन थिऑलॉजी म्हणते, की ही शिकवण “बायबलमधून नव्हे तर ग्रीक तत्त्वज्ञानातून आली आहे.” द ज्यूईश एन्सायक्लोपिडिआ म्हणतो: “शरीर मरते पण आत्मा जिवंत राहतो ही शिकवण बायबलवर नव्हे तर तत्त्वज्ञानावर आधारित आहे. बायबलमधील शास्त्रवचनांत कोठेही ही शिकवण आढळत नाही.”

बहुतेकदा असे होते, की एक खोटी गोष्ट खरी आहे हे शाबीत करण्यासाठी दुसऱ्‍या खोट्या गोष्टी बोलाव्या लागतात. अमर आत्म्याची शिकवण खरी शाबीत करण्यासाठी पुढे नरकाग्नीत यातना दिल्या जातात ही शिकवण देण्यात आली. * पण बायबलमध्ये तर स्पष्टपणे सांगण्यात आले आहे, की “पापाचे वेतन मरण आहे,”—नरक यातना नव्हे! (रोमकर ६:२३) पुनरुत्थानाविषयी किंग जेम्स व्हर्शन म्हणते: “समुद्राने आपल्यामधील मृत मनुष्यांस बाहेर सोडले; मृत्यू व अधोलोक ह्‍यांनी आपल्यातील मृतांस बाहेर सोडले.” तसेच डुए व्हर्शन म्हणते: “सागराने . . . तसेच मरण आणि नरक यांनी आपल्यामधील मेलेले लोक सोडून दिले.” सोप्या शब्दांत सांगायचे तर, ते नरकात आहेत असे म्हणण्याचा अर्थ मेलेले आहेत असाच होतो; किंवा येशूच्या शब्दांत ते ‘झोपलेले’ आहेत.—प्रकटीकरण २०:१३.

तुम्हाला काय वाटते, नरकाग्नीत यातना देणाऱ्‍या देवाची कोणाला उपासना करावीशी वाटेल का? मुळीच नाही. न्यायप्रिय लोकांना नरकातील यातनांचा विचारही क्रूरपणाचा वाटतो! उलट बायबल तर म्हणते की “देव प्रीति आहे.” त्याला क्रूरतेचा वीट आहे, मग ती मानवांच्याबाबतीत असो किंवा प्राण्यांच्या बाबतीत.—१ योहान ४:८; नीतिसूत्रे १२:१०; यिर्मया ७:३१; योना ४:११.

आपल्या दिवसांत “चित्र” आणखीन बिघडवले जात आहे

देव आणि खऱ्‍या ख्रिस्ती धर्माचे चित्र बिघडवणे आजही चालले आहे. धर्माच्या एका प्राध्यापकाने त्याच्या प्रोटेस्टंट चर्चमध्ये होणाऱ्‍या संघर्षाविषयी अलीकडेच असे म्हटले: “बायबलच्या शिकवणी मानायच्या की जगाचे विचार मानायचे, ख्रिस्ताची शिकवण स्वीकारायची की जगाला खूष करण्याकरता ख्रिस्ताच्या शिकवणीच बदलून टाकायच्या, अशी चढाओढ आज चर्चमध्ये चालली आहे. महत्त्वाचा मुद्दा हा आहे, की: चर्चने कोणाचे ऐकले पाहिजे, बायबलचे की जगाचे?”

दुःखाची गोष्ट म्हणजे, बायबलच्या तत्त्वांचा आदर करण्याऐवजी आज ‘जगाचे’ अनैतिक वर्तन खपवून घेतले जात आहे. आपण प्रगतिशील आहोत आणि नव्या युगाच्या नव्या विचारांचे स्वागत करतो हे दाखवण्यासाठी अनेक चर्चेसनी, आपलेच स्तर बदलले आहेत हे काही वेगळे सांगायला नको. एखाद्याचे वर्तन कितीही वाईट असले तरी त्याला चर्चचे सदस्य होता येते ही गोष्ट आपण आधीच्या लेखाच्या सुरवातीला पाहिली होती. पण बायबल मात्र अगदी स्पष्ट शब्दांत सांगते, की जारकर्म, व्यभिचार, समलैंगिकता ही देवाच्या नजरेत घोर पातके आहेत व अशी पातके करणाऱ्‍यांना “देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही.”—१ करिंथकर ६:९, १०; मत्तय ५:२७-३२; रोमकर १:२६, २७.

प्रेषित पौल जेव्हा रोमकरांस पत्र लिहीत होता तेव्हा ग्रीक-रोमी समाजात सर्व प्रकारची दुष्टाई व अनैतिकता चालली होती. तेव्हा पौलाने असा विचार केला का, की ‘देवाने सदोम आणि गमोराचा नाश घोर अनैतिकतेसाठी केला होता हे खरे आहे. पण ही गोष्ट तर २,००० वर्षांपूर्वीची आहे. ती आजच्या सुशिक्षित समाजाला लागू होत नाही’? पौलाने असा मुळीच विचार केला नाही. लोकांना खूष करण्याकरता त्याने बायबलच्या शिकवणी बदलल्या नाहीत.—गलतीकर ५:१९-२३.

ख्रिस्ती धर्माचे खरे “चित्र”

येशूने त्याच्या काळातील यहुदी धार्मिक नेत्यांना म्हटले, की त्यांची उपासना व्यर्थ होती कारण ते ‘शास्त्र म्हणून मनुष्याचे नियम शिकवत’ होते. (मत्तय १५:९) आजच्या पाळकांनी जशा बायबलच्या शिकवणी बदलून टाकल्या तसेच त्या धार्मिक नेत्यांनी सुद्धा यहोवाचे नियमशास्त्र बदलून टाकले होते. ते खरे तर मनुष्याची शिकवण देवाची शिकवण म्हणून शिकवत होते. पण येशूने त्यांचे पितळ उघडे केले जेणेकरून प्रांजळ लोकांना खरा धर्म ओळखता यावा. (मार्क ७:७-१३) येशूने फक्‍त सत्य शिकवले, मग ते लोकांना आवडो अगर न आवडो. त्याने नेहमी देवाच्या वचनातून शिकवले.—योहान १७:१७.

आजच्या बहुतेक ख्रिश्‍चनांपेक्षा येशू किती वेगळा होता! अशा लोकांविषयी बायबलने भाकीत केले होते: “लोकांना नवीन नवीन गोष्टी ऐकावयास आवडतील, . . . एवढेच नव्हे तर हवे ते ऐकण्याची चटक भागवण्यासाठी आपल्याभोवती मन मानेल तसा शिक्षकांचा गोतावळा उभा करतील. ते सत्यापासून आपला कान वळवतील व भाकड कथांकडे करतील.” (२ तीमथ्य ४:३, ४, द जेरुसलेम बायबल) त्रैक्याची, नरकाग्नीची व अमर आत्म्याची शिकवण निव्वळ ‘कथा’ आहेत; या शिकवणी पाळणारे नाशाच्या मार्गावर जातात. परंतु बायबलच्या सत्य शिकवणीनुसार चालणाऱ्‍यांना केवळ आताच लाभ होत नाही तर अनंतकाळचे जीवन देखील मिळणार आहे. हेच सत्य यहोवाचे साक्षीदार तुम्हाला सांगू इच्छितात. तेव्हा, त्यांना हे सत्य तुम्हाला सांगू देण्याची एक संधी द्यायला काय हरकत आहे?—योहान ४:२४; ८:३२; १७:३.

[तळटीपा]

^ परि. 4 हे समजण्यासाठी येशूने, गहू व निदण आणि अरुंद व रुंद मार्ग, असे दोन दृष्टान्त दिले होते. (मत्तय ७:१३, १४) या दृष्टान्तांद्वारे येशूने दाखवून दिले की येणाऱ्‍या दिवसांत खऱ्‍या ख्रिस्ती धर्माचे अनुसरण करणारे फार कमी लोक उरतील. पण निदणासारखे असणारे बहुतेक लोक स्वतःच्या शिकवणींनी ख्रिस्ती धर्माला एक वेगळेच रूप देतील आणि असा दावा करतील की हाच खरा ख्रिस्ती धर्म आहे. ख्रिस्ती धर्माला कशाप्रकारे एक वेगळेच रूप देण्यात आले हे या लेखातून दाखवले जाईल.

^ परि. 19 इब्री शब्द शिओल आणि ग्रीक शब्द हेडीज यांचे भाषांतर “नरक” असे करण्यात आले आहे. या दोन्ही शब्दांचा अर्थ “कबर” असा होतो. त्यामुळे, किंग जेम्स व्हर्शनच्या इंग्रजी भाषांतरकारांनी शिओलचे ३१ वेळा “नरक” असे भाषांतर केले आहे. शिवाय, ३१ वेळा त्यांनी शिओलचे भाषांतर “कबर” आणि ३ वेळा “खड्डा” असेही केले आहे. यावरून त्यांना हेच सांगायचे आहे, की या तिन्ही शब्दांचा एकच अर्थ होतो.

[७ पानांवरील चौकट/चित्र]

ख्रिश्‍चन नावाचा उगम

येशूने म्हटले होते: “मार्ग, सत्य व जीवन मीच आहे.” (योहान १४:६) येशूचा मृत्यू होऊन दहा वर्ष झाली होती तरीदेखील त्याच्या अनुयायांना येशूचा “मार्ग” अनुसरणारे म्हणूनच ओळखले जायचे. (प्रेषितांची कृत्ये ९:२; १९:९, २३; २२:४) का बरे? कारण येशूविषयी आणि त्याच्या शिकवणींविषयीची शिकवण देणे हाच त्यांच्या जीवनाचा उद्देश होता. सा.यु. ४४ नंतर, सिरियाच्या अंत्युखियात देवाच्या मार्गदर्शनाद्वारे पहिल्यांदा येशूच्या अनुयायांना “ख्रिस्ती” हे नाव मिळाले. (प्रेषितांची कृत्ये ११:२६) तेव्हापासून हे नाव इतके लोकप्रिय झाले की मोठेमोठे अधिकारीसुद्धा येशूच्या अनुयायांना ख्रिस्ती म्हणू लागले. (प्रेषितांची कृत्ये २६:२८) पण येशूच्या अनुयायांनी हे नवीन नाव धारण केल्यानंतर आपल्या शिकवणी बदलल्या नाहीत. ते ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल ठेवूनच चालत होते.—१ पेत्र २:२१.

[७ पानांवरील चित्रे]

यहोवाचे साक्षीदार लोकांना नेहमी देवाच्या वचनातूनच शिकवतात

[४ पानांवरील चित्राचे श्रेय]

डावीकडून तिसरे: United Nations/Photo by Saw Lwin