व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“तारणाची आशा” क्षणभरही नजरेआड होऊ देऊ नका

“तारणाची आशा” क्षणभरही नजरेआड होऊ देऊ नका

“तारणाची आशा” क्षणभरही नजरेआड होऊ देऊ नका

“तारणाची आशा हे शिरस्त्राण घालावे.”—१ थेस्सलनीकाकर ५:८.

१. “तारणाची आशा” आपल्याला धीर धरायला कशाप्रकारे मदत करते?

अतिशय भयंकर संकटात सापडल्यावरही एखाद्याला वाचण्याची आशा असल्यास तो शेवटपर्यंत प्रयत्न, संघर्ष करत राहतो. बुडालेल्या जहाजातून जिवंत बचावलेल्या व्यक्‍तीला, मदत करायला दुसरे जहाज येत आहे हे माहीत झाले तर ती व्यक्‍ती बराच वेळपर्यंत एखाद्या तराफ्याला धरून वाट पाहते. तशाचप्रकारे, ‘यहोवा आपले तारण करील’ या आशेच्या बळावर हजारो वर्षांपासून कित्येक विश्‍वासू स्त्रीपुरुषांनी अत्यंत कठीण परीक्षांना तोंड दिले; आणि त्यांची आशा व्यर्थ ठरली नाही. (निर्गम १४:१३; स्तोत्र ३:८; रोमकर ५:५; ९:३३) ख्रिस्ती व्यक्‍तीच्या आत्मिक शस्त्रसामग्रीविषयी सांगताना प्रेषित पौलाने ‘तारणाची आशा’ ‘शिरस्त्राणासारखी’ आहे असे म्हटले. (१ थेस्सलनीकाकर ५:८; इफिसकर ६:१७) देव आपल्याला नक्की वाचवेल हे आपल्याला पक्के माहीत असल्यास कोणतेही संकट, परीक्षा किंवा कोणताही मोहपाश आपल्यासमोर आला तरीसुद्धा आपण नेहमी यहोवाच्याच तत्त्वांनुसार वागू.

२. “तारणाची आशा” ही खऱ्‍या उपासनेतील एक मूलभूत शिकवण आहे असे का म्हणता येईल?

दी इंटरनॅशनल स्टॅन्डर्ड बायबल एन्सायक्लोपिडियानुसार “पहिल्या शतकातील ख्रिस्ती लोकांव्यतिरिक्‍त त्या काळातील कोणत्याही धर्माच्या लोकांना भविष्याची आशा नव्हती.” (इफिसकर २:१२; १ थेस्सलनीकाकर ४:१३) पण “तारणाची आशा” ही खऱ्‍या उपासनेची एक मूलभूत शिकवण आहे. कशाप्रकारे? पहिली गोष्ट म्हणजे यहोवाच्या सेवकांच्या तारणाचा त्याच्या नावाशी संबंध आहे. स्तोत्र लिहिणाऱ्‍या आसाफने अशी प्रार्थना केली: “हे आमच्या उद्धारक देवा, तू आपल्या नावाच्या महिम्याकरिता आम्हाला साहाय्य कर; आपल्या नावाकरिता आम्हास सोडीव.” (स्तोत्र ७९:९; यहेज्केल २०:९) शिवाय, आपला यहोवाच्या वचनांवर भरवसा असेल तरच आपल्याला त्याच्यासोबत एक चांगला नातेसंबंध राखता येईल. पौलाने याविषयी असे म्हटले: “विश्‍वासावाचून [देवाला] ‘संतोषविणे’ अशक्य आहे; कारण देवाजवळ जाणाऱ्‍याने असा विश्‍वास ठेवला पाहिजे की, तो आहे, आणि त्याचा शोध झटून करणाऱ्‍यांना तो प्रतिफळ देणारा आहे.” (इब्री लोकांस ११:६) पौलाने हेही सांगितले, की पश्‍चातापी लोकांच्या तारणासाठीच येशू पृथ्वीवर आला होता. पौल म्हणतो: “ख्रिस्त येशू पापी लोकांना तारावयास जगात आला, हे वचन विश्‍वसनीय व पूर्णपणे स्वीकारावयास योग्य आहे.” (१ तीमथ्य १:१५) प्रेषित पेत्रानेही तारण हे “विश्‍वासाचे पर्यवसान [किंवा, प्रतिफळ]” आहे असे म्हटले. (१ पेत्र १:९) तेव्हा आपणही तारणाची आशा बाळगू शकतो. पण तारण म्हणजे नेमके काय? आणि आपले तारण व्हावे म्हणून आपण काय केले पाहिजे?

तारण म्हणजे काय?

३. यहोवाने प्राचीन काळातील आपल्या सेवकांचे तारण कशाप्रकारे केले?

इब्री शास्त्रवचनांत “तारण” या शब्दाचा उपयोग सहसा जुलूमापासून, एखाद्या दुर्घटनेतून, किंवा एखाद्या कठीण परिस्थितीतून सुटका किंवा अकाली मृत्यूपासून बचाव हे दाखवण्यासाठी केला गेला आहे. उदाहरणार्थ, दाविदाने यहोवाला “सोडवणारा” असे उद्देशून म्हटले: ‘माझा देव जो माझा दुर्ग, तो माझे शरणस्थान आहे; माझ्या उद्धारकर्त्या, घातापासून तू मला रक्षितोस. स्तुतिपात्र परमेश्‍वराचा मी धावा करितो, तेव्हा शत्रूंपासून माझा बचाव होतो.’ (२ शमुवेल २२:२-४) यहोवाचे विश्‍वासू सेवक त्याच्याकडे मदतीची याचना करतात तेव्हा तो त्यांची प्रार्थना ऐकतो हे दाविदाला माहीत होते.—स्तोत्र ३१:२२, २३; १४५:१९.

४. येशूच्या आधी होऊन गेलेल्या यहोवाच्या सेवकांना भविष्याकरता कोणती आशा होती?

येशू ख्रिस्ताच्या आधीच्या काळातही यहोवाचे सेवक भविष्यातील जीवनाची आशा बाळगून होते. (ईयोब १४:१३-१५; यशया २५:८; दानियेल १२:१३) किंबहुना, इब्री शास्त्रवचनांत देवाच्या लोकांना सोडवण्याविषयीची बरीचशी अभिवचने भविष्यातील तारणाकडे संकेत करीत होती. या तारणामुळेच सार्वकालिक जीवनाची आशा त्यांना होती. (यशया ४९:६, ८; प्रेषितांची कृत्ये १३:४७; २ करिंथकर ६:२) येशूच्या काळात बरेच यहुदी सार्वकालिक जीवनाची आशा बाळगत होते; पण, ही आशा येशूच्याद्वारे पूर्ण होईल हे स्वीकारण्यास मात्र ते तयार नव्हते. म्हणूनच त्या काळातल्या धार्मिक पुढाऱ्‍यांना येशूने स्पष्ट सांगितले: “तुम्ही शास्त्रलेख शोधून पाहता; कारण त्याच्याद्वारे तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल असे तुम्हाला वाटते; आणि तेच माझ्याविषयी साक्ष देणारे आहेत.”—योहान ५:३९.

५. तारणाचा खरा अर्थ काय?

येशू ख्रिस्ताच्या माध्यमाने देवाने तारणाचा खरा अर्थ आपल्याला प्रकट केला. देव कोणत्या गोष्टींपासून आपले तारण किंवा सुटका करतो? पापाच्या गुलामीतून, खोट्या धर्मांच्या जंजाळातून, सैतानाच्या अधिकाराखाली असलेल्या या जगापासून, मनुष्याच्या भयापासून आणि इतकेच नव्हे तर मृत्यूच्या भयापासून देखील देव आपल्याला मुक्‍त करतो. (योहान १७:१६; रोमकर ८:२; कलस्सैकर १:१३; प्रकटीकरण १८:२, ४) भविष्यात देव दुःख व अन्यायापासून तर आपली सुटका करेलच पण त्यासोबतच तो आपल्याला सार्वकालिक जीवन देखील बहाल करेल. (योहान ६:४०; १७:३) येशूने एका ‘लहान कळपाविषयी’ सांगितले होते; या लहान कळपातील लोकांचे तारण कोणत्या अर्थाने होईल? मृत्यू झाल्यानंतर त्यांना स्वर्गात आत्मिक शरिरात जिवंत केले जाईल व त्यानंतर ते ख्रिस्तासोबत राज्य करतील. (लूक १२:३२) बाकीच्या लोकांचे तारण कसे होईल? आदाम व हवेने पाप करून गमावलेले एदेन बागेतले परिपूर्ण जीवन त्यांना पुन्हा प्राप्त होईल व देवासोबतचा त्यांचा तुटलेला नातेसंबंध पुन्हा जोडला जाईल. (प्रेषितांची कृत्ये ३:२१; इफिसकर १:१०) सर्व लोकांनी या पृथ्वीवर एदेन बागेसारख्या रम्य परिस्थितीत सार्वकालिक जीवनाचा उपभोग घ्यावा हाच देवाचा मानवजातीकरता मूळ उद्देश होता. (उत्पत्ति १:२८; मार्क १०:३०) पण हा देवाचा मूळ उद्देश कसा पूर्ण होईल?

खंडणी बलिदानामुळे तारण शक्य झाले

६, ७. आपल्या तारणात येशूची कोणती भूमिका आहे?

ख्रिस्ताने दिलेल्या खंडणी बलिदानाशिवाय कोणाचे सार्वकालिक तारण झाले नसते. का? बायबलमध्ये याचा खुलासा केला आहे. आदामाने पाप केले तेव्हा त्याने स्वतःला आणि भविष्यात त्याच्याद्वारे उत्पन्‍न होणाऱ्‍या सर्व मानवांना, म्हणजेच आपल्यालाही, पापाच्या गुलामगिरीत ‘विकले.’ खंडणी देऊन आपल्याला पुन्हा विकत घेणे गरजेचे होते कारण त्याशिवाय मानवाला कोणतीच आशा नव्हती. (रोमकर ५:१४, १५; ७:१४) मोशेच्या नियमशास्त्रानुसार दिली जाणारी प्राण्यांची बलिदाने, या गोष्टीचा संकेत होती की भविष्यात देव सर्व मानवांकरता एक खंडणीची तरतूद करेल. (इब्री लोकांस १०:१-१०; १ योहान २:२) येशूच्या बलिदानामुळे ते सर्व भविष्यसूचक संकेत खरे ठरले. येशूच्या जन्माआधी यहोवाच्या देवदूताने त्याच्याविषयी असे घोषित केले की “तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारील.”—मत्तय १:२१; इब्री लोकांस २:१०.

येशूचा एका कुमारिकेच्या पोटी चमत्कारिकरित्या जन्म झाला होता; शिवाय देवाचा पुत्र असल्यामुळे, आदामापासून सर्व मानवांना मिळालेल्या मृत्यूच्या शापातून तो मुक्‍त होता. शेवटपर्यंत विश्‍वासू राहून त्याने आपले परिपूर्ण जीवन, मानवांना पाप व मृत्यूच्या दास्यत्वातून सोडवण्याकरता खंडणी म्हणून दिले. (योहान ८:३६; १ करिंथकर १५:२२) इतर सर्व मनुष्यांना आदामापासून मिळालेला पापाचा अंश येशूमध्ये नव्हता. त्यामुळे तो अमर होता. पण तो या पृथ्वीवर ‘पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यासाठीच’ आला होता. (मत्तय २०:२८) आणि म्हणूनच तो पुनरुत्थित होऊन आज स्वर्गात राज्य करत आहे; देवाच्या इच्छेनुसार चालणाऱ्‍या सर्वांचे तारण करण्याचा अधिकार येशूला देण्यात आला आहे.—प्रकटीकरण १२:१०.

तारण प्राप्त करण्यासाठी काय केले पाहिजे?

८, ९. (अ) एका श्रीमंत तरुणाने तारणाविषयी विचारलेल्या प्रश्‍नाला येशूने कसे उत्तर दिले? (ब) या प्रसंगी येशूने आपल्या शिष्यांना आणखी कोणत्या गोष्टी सांगितल्या?

एकदा एका श्रीमंत यहुद्याने येशूला विचारले: “सार्वकालिक जीवन हे वतन मिळण्यास मी काय केले पाहिजे?” (मार्क १०:१७) त्याच्या या प्रश्‍नातून त्याकाळच्या यहुद्यांची विचारसरणी दिसून येते. यहुद्यांचा असा समज होता की देव आपल्याकडून चांगली कामे करण्याची अपेक्षा करतो आणि पुरेशी चांगली कामे केल्याने त्यांच्या बळावर आपण देवाकडून तारण मिळवू शकतो. पण अशी उपासना ही स्वार्थी उद्देशाने केलेली उपासना ठरेल. आणि, अपरिपूर्ण मनुष्याने कितीही चांगली कामे केली तरी तो खरोखरच देवाच्या अत्युच्च दर्जांपर्यंत पोचू शकेल का? तेव्हा केवळ चांगली कामे केल्याने आपल्याला तारण मिळेलच असे नाही.

त्या श्रीमंत मनुष्याच्या प्रश्‍नाला उत्तर देताना येशूने फक्‍त इतकेच म्हटले की त्याने देवाच्या आज्ञा पाळाव्यात. तेव्हा, त्या माणसाने लगेच उत्तर दिले की तो तर तरुणपणापासूनच देवाच्या सर्व आज्ञा पाळत आला आहे. त्याचे हे उत्तर ऐकून येशूला त्याच्याबद्दल प्रेम वाटू लागले. येशूने त्याला म्हटले: “तुझ्यात एका गोष्टीची उणीव आहे; जा, तुझे असेल नसेल ते विकून गोरगरिबांना देऊन टाक म्हणजे तुला स्वर्गात संपत्ति मिळेल आणि चल, माझ्यामागे ये.” पण हे ऐकून त्या मनुष्याचे तोंड उतरले, आणि तो तेथून निघून गेला कारण “तो फार श्रीमंत होता.” तेव्हा येशूने आपल्या शिष्यांना स्पष्टपणे सांगितले की संपत्तीचा मोह असणाऱ्‍याला तारण मिळणे कठीण आहे. पुढे त्याने हेही स्पष्ट केले की कोणालाही त्याच्या स्वतःच्या प्रयत्नांच्या जोरावर तारण मिळत नाही. पण यामुळे निराश होण्याचे कारण नाही कारण येशूने म्हटले, “मनुष्यांना हे अशक्य आहे, परंतु देवाला नाही; देवाला सर्व काही शक्य आहे.” (मार्क १०:१८-२७; लूक १८:१८-२३) मग एखाद्या व्यक्‍तीला तारण कसे प्राप्त होते?

१०. तारण प्राप्त होण्याकरता आपण कोणत्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत?

१० तारण हे देवाचे कृपादान आहे, पण ते सर्वांनाच मिळत नाही. (रोमकर ६:२३) देवाचे हे कृपादान प्राप्त करू इच्छिणाऱ्‍या व्यक्‍तीला काही मूलभूत अपेक्षा पूर्ण कराव्या लागतात. येशूने म्हटले: “देवाने जगावर एवढी प्रीति केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्‍वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” प्रेषित योहानानेही म्हटले: “जो पुत्रावर विश्‍वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे; परंतु जो पुत्राचे ऐकत नाही त्याच्या दृष्टीस जीवन पडणार नाही.” (योहान ३:१६, ३६) यावरून स्पष्ट होते, की सार्वकालिक तारण प्राप्त करू इच्छिणाऱ्‍या प्रत्येकाने येशूच्या बलिदानावर विश्‍वास ठेवला पाहिजे आणि देवाच्या आज्ञा पाळल्या पाहिजे. येशूने आपल्याकरता खंडणी दिली हे कबूल करून त्याचे अनुकरण करण्याचा प्रत्येकाने निश्‍चय केला पाहिजे.

११. एक अपरिपूर्ण व्यक्‍ती यहोवाला कशाप्रकारे संतुष्ट करू शकते?

११ मुळातच अपरिपूर्ण असल्यामुळे आपण सर्वजण कधी न कधी देवाच्या आज्ञा मोडतोच; देवाच्या सर्व आज्ञांचे तंतोतंत पालन करणे मानवांना अशक्य आहे. म्हणूनच यहोवाने आपली पापे झाकून टाकण्याकरता खंडणीची तरतूद केली आहे. पण आपण नेहमी देवाच्या मार्गांनी चालण्याचा होईल तितका प्रयत्न केलाच पाहिजे. त्या श्रीमंत माणसाला येशूने सांगितल्याप्रमाणे आपण देवाच्या आज्ञा पाळल्या पाहिजे. यामुळे देवाला तर आनंद होईलच पण आपल्यालाही खरा आनंद मिळेल कारण “त्याच्या आज्ञा कठीण नाहीत;” उलट बायबल म्हणते की त्या “देहाला आरोग्य व हाडांना सत्व” अशा आहेत. (१ योहान ५:३; नीतिसूत्रे ३:१, ८) पण आपण सतत दक्ष न राहिल्यास तारणाची आशा सहज आपल्या नजरेआड होऊ शकते.

‘विश्‍वास टिकवण्यासाठी लढत राहा’

१२. तारणाची आशा एका ख्रिस्ती व्यक्‍तीला अनैतिक काम करण्याच्या मोहाला प्रतिकार करण्यासाठी कशी मदत करते?

१२ शिष्य यहूदाला आरंभीच्या ख्रिस्ती बांधवांना “आपल्या समाईक तारणाविषयी” लिहिण्याची इच्छा होती. पण तेव्हाच्या ख्रिस्ती मंडळीत काही अनैतिक गोष्टी होत असल्याचे त्याला कळल्यानंतर त्याने त्यांना पत्र लिहून ‘विश्‍वास टिकवण्यासाठी लढत राहण्याचा’ सल्ला दिला. यहूदाने त्या बांधवांना सांगितल्याप्रमाणे तारण प्राप्त करण्यासाठी, केवळ सर्वकाही ठीक चालले असतानाच विश्‍वास बाळगणे, ख्रिस्ती तत्त्वांना जडून राहणे आणि देवाच्या आज्ञा पाळणे पुरेसे नाही. तर ज्यावेळी आपल्यावर परीक्षा येतात, अनैतिक गोष्टी करण्याचा मोह होतो तेव्हा देखील यहोवावर आपले प्रेम तितकेच प्रबळ राहिले पाहिजे. पण पहिल्या शतकातील मंडळीत लैंगिक अनैतिकता, विकृतपणा, अधीन न राहण्याची वृत्ती, मतभेद, ख्रिस्ती विश्‍वासांविषयी शंकाकुशंका यांसारख्या वाईट प्रभावांचा शिरकाव होऊ लागला होता. म्हणूनच, या वाईट प्रभावांपासून दूर राहण्याकरता आपले ध्येय सदैव डोळ्यापुढे ठेवण्याचा सल्ला यहूदाने दिला; त्याने म्हटले: “प्रियजनहो, तुम्ही तर आपल्या परमपवित्र विश्‍वासावर स्वतःची रचना करा; पवित्र आत्म्याने प्रार्थना करा, सार्वकालिक जीवनासाठी आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या दयेची वाट पाहा, आणि आपणांस देवाच्या प्रीतिमध्ये राखा.” (यहूदा ३ इजी टू रीड व्हर्शन; ४, ८, १९-२१) तारणाची आशाच त्या बांधवांना नैतिकरित्या निष्कलंक राहण्यासाठी मदत करू शकत होती.

१३. देवाची कृपा आपण व्यर्थ होऊ दिली नाही हे आपण कसे दाखवू शकतो?

१३ नैतिकरित्या शुद्ध व निष्कलंक राहणाऱ्‍यांचेच देव तारण करील. (१ करिंथकर ६:९, १०) पण देवाच्या नैतिक नियमांना जडून राहताना आपण इतरांची टिका करू नये. कोण चांगले व कोण वाईट किंवा कोणाचे तारण होईल आणि कोणाचे होणार नाही हे ठरवणे आपले काम नाही. हा न्याय देवच करेल. पौलाने अथेन्समधील ग्रीक लोकांना म्हटले: “त्याने असा एक दिवस नेमला आहे की, ज्या दिवशी तो आपण नेमलेल्या मनुष्याच्याद्वारे [येशू ख्रिस्ताच्याद्वारे] जगाचा न्यायनिवाडा नीतिमत्त्वाने करणार आहे.” (प्रेषितांची कृत्ये १७:३१; योहान ५:२२) आपण येशूच्या खंडणी बलिदानावर विश्‍वास ठेवून त्यानुसार जगत असू तर येणाऱ्‍या न्यायाच्या दिवसाची आपल्याला भीती वाटण्याचे कारण नाही. (इब्री लोकांस १०:३८, ३९) अयोग्य विचार व कृती करण्याच्या मोहाला बळी पडून आपण कधीही “देवाच्या कृपेचा [पापी मानवजातीसोबत समेट करण्याकरता देवाने केलेल्या खंडणीच्या तरतुदीचा] स्वीकार व्यर्थ होऊ देऊ नये.” (२ करिंथकर ६:१) तसेच, देवाने दाखवलेल्या कृपेचा उद्देश आपल्याला समजला असेल तर साहजिकच आपण इतरांनाही तारण प्राप्त करण्यासाठी मदत करू. कशाप्रकारे आपण इतरांना मदत करू शकतो?

तारणाच्या आशेविषयी इतरांनाही सांगा

१४, १५. तारणाची सुवार्ता लोकांना सांगण्याचे काम येशूने कोणावर सोपवले?

१४ पौलाने रोमकरांना लिहिलेल्या पत्रात योएल संदेष्ट्याच्या शब्दांचा उल्लेख केला: “जो कोणी प्रभुचे नाव घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल.” पुढे त्याने म्हटले: “तर ज्याच्यावर त्यांनी विश्‍वास ठेवला नाही त्याचा धावा ते कसा करितील? आणि ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते विश्‍वास कसा ठेवतील? आणि घोषणा करणाऱ्‍यांवाचून ते कसे ऐकतील?” दोनतीन वचनांनंतर पौल स्पष्ट सांगतो की विश्‍वास हा आपोआप निर्माण होत नाही तर “विश्‍वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे होते.”—रोमकर १०:१३, १४, १७; योएल २:३२.

१५ ‘ख्रिस्ताच्या वचनाविषयी’ लोकांना कोण सांगेल? येशूने आधी हे ‘वचन’ आपल्या शिष्यांना शिकवले आणि मग ते इतरांनाही शिकवण्याचे काम त्याने त्यांच्यावर सोपवले. (मत्तय २४:१४; २८:१९, २०; योहान १७:२०) पौलाने म्हटले: ‘चांगल्या गोष्टींची सुवार्ता सांगणाऱ्‍याचे चरण किती मनोरम आहेत!’ यशयाच्या भविष्यवाणीतून पौलाने हे शब्द लिहिले होते. आपण जेव्हा राज्य प्रचाराच्या आणि शिष्य बनवण्याच्या कामात सहभागी होतो तेव्हा सर्वच जण आपले ऐकतात असे नाही. पण बहुतेक लोकांनी आपले ऐकले नाही तरीसुद्धा आपले चरण यहोवाला “मनोरम” वाटतात.—रोमकर १०:१५; यशया ५२:७.

१६, १७. आपल्या प्रचार कार्यामुळे कोणते दोन उद्देश साध्य होतात?

१६ प्रचाराच्या कामामुळे दोन महत्त्वाचे उद्देश साध्य होतात. पहिला म्हणजे, यामुळे देवाच्या नावाचा गौरव होतो आणि तारण प्राप्त करण्याची इच्छा असणाऱ्‍यांना खऱ्‍या देवाची ओळख पटते. पौलाने हे ओळखले होते. म्हणूनच त्याने म्हटले: “प्रभूने आम्हाला आज्ञा दिली आहे की, ‘मी तुला परराष्ट्रीयांचा प्रकाश करून ठेवले आहे, ह्‍यासाठी की पृथ्वीच्या दिगंतापर्यंत तू तारण व्हावेस.’” आपण येशूचे खरे शिष्य असू, तर तारणाचा संदेश लोकांपर्यंत पोचवण्याच्या कार्यात आपण सहभाग घेतलाच पाहिजे.—प्रेषितांची कृत्ये १३:४७; यशया ४९:६.

१७ प्रचार कार्यामुळे आणखी एक उद्देश साध्य होतो. हे कार्य देवाचा नीतिमान न्यायदंड बजावण्याची पूर्वतयारी आहे. देवाच्या न्यायाबद्दल येशूने असे म्हटले: “जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने सर्व देवदूतांसह येईल, तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजासनावर बसेल; त्याच्यापुढे सर्व राष्ट्रे जमविली जातील; आणि जसे मेंढपाळ शेरडांपासून मेंढरे वेगळी करितो तसे तो त्यांस एकमेकांपासून वेगळे करील.” शेरड्यामेंढरांच्या न्यायाचे आणि त्यांना एकमेकांपासून वेगळे करण्याचे काम भविष्यात “मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने . . . येईल” तेव्हाच होईल. पण आज प्रचार कार्याद्वारे ख्रिस्ताच्या आत्मिक बांधवांना ओळखण्याची आणि त्यांच्या सोबत कार्य करण्याची लोकांना संधी दिली जात आहे. यामुळेच त्यांना सार्वकालिक तारण मिळेल.—मत्तय २५:३१-४६.

“आशेविषयीची पूर्ण खातरी” शेवटपर्यंत बाळगा

१८. “तारणाची आशा” सदैव डोळ्यापुढे ठेवण्यासाठी आपण काय केले पाहिजे?

१८ प्रचार कार्यात उत्साहाने सहभाग घेतल्यामुळे तारणाची आशा आपल्या नजरेआड होत नाही. पौलाने लिहिले: “आमची अशी इच्छा आहे की, तुम्हापैकी प्रत्येकाने आशेविषयीची पूर्ण खातरी करून घेण्याच्या हेतूने तशीच आस्था शेवटपर्यंत व्यक्‍त करावी.” (इब्री लोकांस ६:११) तेव्हा, आपण सर्वांनी “तारणाची आशा हे शिरस्त्राण घालावे” आणि नेहमी आठवणीत ठेवावे की “आपल्यावर क्रोध व्हावा म्हणून नव्हे, तर आपला प्रभु येशू ख्रिस्त ह्‍याच्या द्वारे आपले तारण व्हावे म्हणून देवाने आपल्याला नेमले आहे.” (१ थेस्सलनीकाकर ५:८, ९) तसेच पेत्राचे हे शब्द देखील आपण नेहमी आठवणीत ठेवले पाहिजे: “तुम्ही आपली मनरूपी कंबर बांधा व सावध राहून . . . तुम्हांस प्राप्त होणाऱ्‍या कृपेवर पूर्ण आशा ठेवा.” (१ पेत्र १:१३) असे करणाऱ्‍या सर्वांची “तारणाची आशा” अवश्‍य पूर्ण होईल!

१९. पुढच्या लेखात आपण कशावर विचार करणार आहोत?

१९ पण तोपर्यंत, म्हणजे या दुष्ट जगाचा नाश होईपर्यंत आपण कशी मनोवृत्ती बाळगावी? स्वतःसोबत इतरांचेही तारण व्हावे म्हणून आपण या उरलेल्या वेळेचा कसा सदुपयोग करू शकतो? या प्रश्‍नांवर पुढच्या लेखात विचार केला जाईल.

तुम्हाला सांगता येईल का?

• “तारणाची आशा” आपण सदैव डोळ्यापुढे का ठेवली पाहिजे?

• तारणात काय काय समाविष्ट आहे?

• तारणाचे कृपादान मिळावे म्हणून आपण काय केले पाहिजे?

• प्रचार कार्यातून कोणते उद्देश साध्य होतात?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१० पानांवरील चित्रे]

केवळ नाशातून बचाव म्हणजे तारण नव्हे