लाजरी असलेली मी धीट झाले
जीवन कथा
लाजरी असलेली मी धीट झाले
रुथ एल. अलरिक यांच्याद्वारे कथित
एकदा घरोघरच्या कार्यात एक पाळक वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट संस्थेचे पहिले अध्यक्ष चार्ल्स टी. रस्सल यांच्याविरूद्ध काहीबाही बोलू लागला. तेव्हा मला आवरले नाही. मी तिथेच दारात उभी राहून रडू लागले. पण, लहान वयापासूनच मी घरोघरी कशी जाऊ लागले ते मला तुम्हाला सांगायचे आहे; मी सुरवातीपासूनच सांगते.
अमेरिकेच्या नेब्रास्का येथील एका मळ्यात, १९१० साली माझा जन्म झाला. आमच्या कुटुंबात धार्मिक वातावरण होतं. रोज सकाळ संध्याकाळ जेवणाआधी आम्ही बायबल वाचायचो. मळ्यापासून ६ किलोमीटर दूर असलेल्या विनसाइड येथील एका लहानशा गावातील मेथडिस्ट चर्चच्या संडे स्कूलचे बाबा अध्यक्ष होते. आमच्याकडे एक घोडागाडी होती. गाडीला आतून पडदे असल्यामुळे ऊन, वारा, पाऊस काहीही असले तरी आम्ही रविवारी सकाळी चर्चला जायचो.
मी आठ वर्षांची होते तेव्हा माझा लहान भाऊ खूप आजारी पडला. आईने त्याला आयोवाला नेले. त्याची खूप काळजी घेऊनही काही उपयोग झाला नाही. शेवटी तो त्या आजारातच गेला. आयोवात असताना आईची भेट एका बायबल विद्यार्थीनीशी म्हणजेच एका यहोवाच्या साक्षीदार बहिणीशी झाली. तिच्याशी तिने खूपदा चर्चा केली. आई तिच्याबरोबर त्यांच्या काही सभांनाही जाऊन आली.
आयोवाहून घरी येताना आईनं वॉच टावर संस्थेच्या स्टडीज इन द स्क्रिपर्चचे पुष्कळ खंड आणले. ते वाचल्यानंतर हेच सत्य आहे याची आईला खात्री पटली. तसेच आत्मा अमर आहे, दुष्टांना नरकात चिरकाल यातना दिल्या जातात यांसारख्या शिकवणी खोट्या आहेत हे तिला कळाले.—उत्पत्ति २:७; उपदेशक ९:५, १०; यहेज्केल १८:४.
बाबांना मात्र हे पटत नव्हतं. आई सभांना जायची हे देखील त्यांना आवडायचं नाही, म्हणून मग ते तिला विरोध करू लागले. ते मला आणि माझ्या मोठ्या भावाला, क्लेरन्सला चर्चला घेऊन जायचे. पण बाबा घरी नसताना आई आमच्यासोबत बायबल अभ्यास करायची. त्यामुळे
चर्चमधली शिकवण आणि आईची शिकवण याबद्दल आम्ही विचार करायचो.क्लेरन्स आणि मी दर रविवारी न चुकता संडे स्कूलला जायचो. क्लेरन्स संडे स्कूलच्या शिक्षिकेला असे प्रश्न विचारायचा ज्यांची उत्तरं तिला देता यायची नाहीत. घरी आल्यावर आम्ही आईला सर्व सांगायचो. यामुळे बायबलच्या विषयांवर आमच्यात खूप वेळ चर्चा चालायची. हळू हळू मी चर्चला जाणं सोडून दिलं आणि आईबरोबर सभांना जाऊ लागले. माझा भाऊ क्लेरन्सही नंतर मग आमच्याबरोबर येऊ लागला.
मी धीट बनले
सप्टेंबर १९२२ मध्ये, मी आणि आई ओहायोच्या सीडर पॉईंट येथे भरलेल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या अधिवेशनाला गेलो होतो. वॉच टावर संस्थेचे दुसरे अध्यक्ष बंधू जोसफ एफ. रदरफोर्ड यांनी उपस्थित असलेल्या १८,००० लोकांना राजा आणि त्याच्या राज्याची घोषणा करण्यास आर्जवले. तेव्हा एक मोठा बॅनर उघडण्यात आला, त्यावर लिहिले होते: “राजा आणि त्याचे राज्य यांची घोषणा करा.” हे शब्द माझ्या मनात खोलवर बिंबले आणि मला अगदी तीव्रतेने वाटू लागले की मीही देवाच्या राज्याची सुवार्ता लोकांना सांगितली पाहिजे.—मत्तय ६:९, १०; २४:१४.
एकोणीशे बावीसपासून एकोणीशे अठ्ठावीसपर्यंत झालेल्या अधिवेशनांमध्ये पुष्कळ ठराव मंजूर करण्यात आले. या ठरावातील मजकूर ट्रॅक्टमध्ये छापण्यात आला आणि बायबल विद्यार्थ्यांनी हे ट्रॅक्ट संपूर्ण जगभरात लाखो लोकांना वाटले. मी दिसायला किडकिडीत होते. त्यामुळे मला सर्व लकडी पैलवान म्हणायचे. आणि मी ट्रॅक्ट देखील भराभरा वाटत जायचे. मी हे काम आवडीनं करायचे, पण लोकांशी बोलायचं म्हटलं की माझ्या जीवावर यायचं. देवाच्या राज्याबद्दल बोलायला मला खूप कठीण जायचं.
मी तुम्हाला एक घटना सांगते त्यावरून तुम्हाला कळेल, की मी किती लाजाळू होते. आई दर वर्षी आमच्या नातेवाईकांना घरी बोलवायची. असंच एकदा, सगळे नातेवाईक घरी असताना आईला एक फॅमिली फोटो काढायचा होता. मी माझ्या खोलीत लपून बसले. आईनं मला बाहेर यायला सांगितलं. पण मी काही आले नाही. शेवटी तिनं मला अक्षरशः ओढत बाहेर नेलं. मी जोर जोराने किंचाळत होते, कारण मला सर्वांसमोर यायला खूप लाज वाटत होती.
पण, एकदा प्रचाराला जाण्याचा मी ठाम निश्चय केला. बॅग भरत असताना माझं एक मन म्हणत होतं, “तुला जमणार नाही,” पण दुसरं म्हणत होतं, “नाही, तुला गेलंच पाहिजे.” आणि मी प्रचाराला गेले. मी प्रचार कार्य कसं केलं ते विचारू
नका, पण मी प्रचार कार्य केलं याचाच मला जास्त आनंद होत होता. कारण लोकांच्या घरोघरी जाऊन मी बोलू शकेन याच्यावर माझा मलाच विश्वास होत नव्हता. लेखाच्या सुरवातीला मी तुम्हाला त्या पाळकाच्या घरी घडलेली गोष्ट सांगितली ती याच वेळी घडली होती. पण हळूहळू यहोवाच्या मदतीने मी धीट होत गेले, लोकांशी बोलू लागले. मग, १९२५ साली मी यहोवाला माझं जीवन समर्पित करून पाण्याचा बाप्तिस्मा घेतला.पूर्ण वेळेच्या सेवेची सुरवात
मी १८ वर्षांची झाले तेव्हा, माझ्या मावशीनं माझ्या नावावर काही पैसे जमा केले. त्या पैशात मी स्वतःसाठी एक कार विकत घेतली आणि पूर्ण वेळेची सेवा अर्थात पायनियरींग करू लागले. दोन वर्षांनी म्हणजे १९३० मध्ये मी आणि माझी पायनियर पार्टनर, आम्हा दोघींना नेमणूक मिळाली. आमच्यानंतर माझ्या भावाने क्लेरन्सनेही पायनियरींग सुरू केली. मग न्यूयॉर्क ब्रुकलिन येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या मुख्यालयात अर्थात बेथेलमध्ये सेवा करण्यासाठी त्याला बोलावण्यात आले.
याच वेळी आईबाबा एकमेकांपासून वेगळे झाले. मी आणि आईनं राहण्याकरता एक ट्रेलर बनवला आणि आम्ही सोबतच पायनियरींग करू लागलो. अमेरिकेत तेव्हाच महामंदीचे दिवस सुरू झाले होते. या काळात पायनियरींग करणं इतकं सोपं नव्हतं, पण आम्ही हार मानली नाही. आम्ही बायबल साहित्याच्या बदल्यात कोंबड्या, अंडी, भाज्या, जुन्या बॅटऱ्या आणि ॲल्युमिनियम घ्यायचो. मग आम्ही जुन्या बॅटऱ्या आणि ॲल्युमिनियम विकून कारचा आणि घरचा खर्च भागवायचो. कारच्या मेंटेन्सची बहुतेक सर्व कामं मी शिकून घेतली, तेवढेच आमचे पैसे वाचायचे. राज्याला प्रथम स्थान दिल्यावर बाकीच्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळत राहतील या यहोवानं दिलेल्या वचनाचा आम्ही खूपदा अनुभव घेतला.—मत्तय ६:३३.
मिशनरी नेमणूकीत
एकोणीशे सेहेचाळीस साली मला वॉच टावर बायबल स्कूल ऑफ गिलियडच्या सातव्या वर्गाचे आमंत्रण मिळाले. न्यूयॉर्कच्या साऊथ लॅन्सींग येथे हा वर्ग होणार होता. या प्रशालेनंतर कदाचित मिशनरी म्हणून मला दुसरीकडे कोठेही पाठवतील याची माझ्या आईला कल्पना होती. पण तरीही तिने मला गिलियड प्रशालेला जाण्याचे प्रोत्साहन दिले. मी आणि आईनं एकूण १५ वर्षं एकत्र पायनियरींग केली होती. गिलियड पदवीदानानंतर इलिनॉय, पिओरिया येथे राहणारी मार्था हेस माझी पायनियर पार्टनर झाली. आम्हा दोघींना आणि आमच्या बरोबर आणखी दोघा बहिणींना ओहायोच्या क्लीव्हलँड येथे नेमण्यात आले. परदेशाची नेमणूक मिळेपर्यंत एक वर्ष आम्ही तेथेच सेवा केली.
एकोणीशे सत्तेचाळीसमध्ये मार्था आणि मला हवाई येथे नेमणूक मिळाली. या बेटांवर स्थलांतर करणं सोपं असल्यामुळे आईसुद्धा जवळच्या होनालूलू शहरात राहायला आली. दिवसेंदिवस तिची तब्येत ढासळत चालली होती. माझ्या मिशनरी सेवेबरोबरच मी आईची पण काळजी घेत होते. हवाईमध्ये असतानाच मग १९५६ मध्ये वयाच्या ७७ व्या वर्षी तिचा मृत्यू झाला. आम्हाला हवाईमध्ये नेमणूक मिळाली तेव्हा तेथे केवळ १३० साक्षीदार होते. आणि काही वर्षांतच ही संख्या हजारोंवर गेली. आता तेथे मिशनऱ्यांची आवश्यकता नव्हती.
मग मार्था आणि मला वॉच टावर संस्थेकडून जपानला जाण्याचे पत्र आले. तेव्हा मी ४८ वर्षांची होते आणि मार्था माझ्यापेक्षा फक्त चार वर्ष लहान होती. आणि या वयात जपानी भाषा शिकता येईल का याची चिंता आम्हाला लागली होती. आम्ही यहोवाला प्रार्थना केली आणि नेमणूक स्वीकारली.
एकोणीशे अठ्ठावन्न साली न्यूयॉर्क शहरातील याँकी स्टेडियम आणि पोलो ग्राऊन्ड्स येथे भरलेल्या अधिवेशनानंतर लगेच आम्ही टोकियोला जहाजाने निघालो. आमचे जहाज योकोहामा बंदराजवळ पोहंचत होते तोच जोरदार समुद्री वादळ सुरू झाले. आम्ही कसे बसे बंदरावर सुरक्षितपणे पोहंचलो. बंदरावर आम्हाला घ्यायला डॉन आणि मेबल हॅसलेट, लॉईड आणि मेल्बा बॅरी आणि इतर मिशनरी आले होते. आम्ही जपानला आलो तेव्हा तेथे फक्त १,१२४ साक्षीदार होते.
आम्ही दोघी क्षेत्र कार्याला जाऊ लागलो, त्याचबरोबर
आम्ही जपानी भाषाही शिकू लागलो. इंग्रजी भाषेत आम्ही जपानी सरमन लिहिलं आणि मग आम्ही ते घरमालकासमोर वाचून दाखवायचो. वाचून दाखवल्यावर घरमालक म्हणायचा: “योरोशी ई देसू” किंवा “केको देसू.” याचा अर्थ “बरं,” किंवा “छान” पण हे आम्हाला नंतर कळलं. घरमालकाला आमचा संदेश आवडला की नाही हे आम्हाला नेहमीच समजायचे नाही कारण हे शब्द नकार दर्शवण्यासाठी देखील वापरले जायचे. घरमालकाच्या आवाजावरून किंवा चेहऱ्यावरील हावभावावरून आम्ही काय ते समजून घ्यायचो. हे समजण्याची कला शिकून घ्यायला आम्हाला जरा वेळ लागला.प्रेरणा देणारे अनुभव
एकदा मी, मित्सुबिशी नावाच्या कंपनीच्या वसतीगृहात राहणाऱ्या एका २० वर्षीय तरुणीला माझ्या तुटक्याफुटक्या जपानी भाषेत राज्य संदेश सांगितला. मी सांगितलेला संदेश तिला आवडला आणि तिने बायबल अभ्यास स्वीकारला. तिने चांगली प्रगती केली आणि १९६६ मध्ये तिचा बाप्तिस्मा झाला. बाप्तिस्म्यानंतर एक वर्षाने तिने पायनियरींग सुरू केले आणि काही दिवसांतच तिला स्पेशल पायनियर म्हणून नेमण्यात आले. आजपर्यंत ती स्पेशल पायनियर म्हणून सेवा करत आहे. तिच्या तरुणपणाच्या दिवसांपासून तिने सेवेमध्ये तिचा वेळ आणि शक्ती खर्च केल्याचे पाहून मलाही नेहमी प्रेरणा मिळाली.
ख्रिस्ती नसलेल्या लोकांमध्ये राहून बायबल सत्य स्वीकारणं हे एक आव्हानच आहे. पण असं आव्हान स्वीकारलेल्या लोकांबरोबर मी बायबल अभ्यास केला आहे. त्यांनी त्यांच्या घरातील बुद्धाचे महागडे देव्हारे आणि शिंटो ऑल्टर काढून टाकले. यासाठी त्यांना नातेवाईकांकडून बराच त्रास सहन करावा लागला. कारण, तिथं लोकांचा असा विश्वास आहे, की घरातील या सर्व धार्मिक गोष्टी काढून टाकणं म्हणजे मृत पूर्वजांचा अनादर करणं. त्यामुळे बायबल अभ्यास करणाऱ्यांना धैर्याची आवश्यकता होती. या लोकांवरून आपल्याला प्राचीन काळच्या ख्रिश्चनांची आठवण प्रेषितांची कृत्ये १९:१८-२०.
होते ज्यांनी मोठ्या धैर्याने खोट्या उपासनेशी संबंधित असलेल्या सर्व गोष्टी जाळून टाकल्या होत्या.—मला माझी आणखी एक बायबल विद्यार्थीनी आठवते. ती आपल्या परिवाराबरोबर टोकियो येथे एका नव्या घरी राहायला जाणार होती. पण तिला त्या नवीन घरात खोट्या उपासनेशी संबंधित असलेली एकही वस्तू नको होती. ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्याला सांगितली आणि विशेष म्हणजे नवऱ्याने तिला होकार दिला. याबद्दल ती मला सांगत असताना तिला अचानक आठवले, की तिने एक मोठी व महागडी फुलदाणी सामानाबरोबर पॅक केली होती. या फुलदाणीचा खोट्या उपासनेशी संबंध असावा अशी तिला शंका होती. म्हणून घरी गेल्याबरोबर तिनं ती फुलदाणी फोडून टाकून दिली.
या स्त्रीप्रमाणेच यहोवाची उपासना करू इच्छिणारे इतर लोक, खोट्या उपासनेशी संबंधित असलेल्या सर्व वस्तू, मग त्या महाग असल्या तरी फेकायला किंवा फोडायला तयार होतात हे पाहून किती आनंद होतो. मी यहोवाचे नेहमी आभार मानते, की त्याने मला जपानमध्ये ४० पेक्षा अधिक वर्ष मिशनरी सेवेत टिकून राहण्यासाठी मदत केली.
एक ‘चमत्कारच’!
माझ्या ७० पेक्षा अधिक वर्षांच्या पूर्ण वेळेच्या सेवेचा मी विचार करते तेव्हा मला असं वाटतं, माझ्या जीवनात जणू एक ‘चमत्कारच’ झाला आहे. मी तरुण असताना खूप लाजरी होते. तेव्हा मी कल्पनाही केली नव्हती की ज्याच्याकडे बहुतेक लोक दुर्लक्ष करतील अशा देवाच्या राज्याच्या संदेशाचा प्रचार करण्यात मी माझं संपूर्ण आयुष्य खर्च करणार आहे. आणि हे काम फक्त मीच एकटीनं केलेलं नाही तर शेकडो नव्हे हजारो जणांनी केल्याचं मी पाहिलं आहे. या सर्वांनी हे काम इतक्या प्रभावीपणे केले आहे, की मी जपानमध्ये १९५८ साली आले होते तेव्हा तेथे एक हजारापेक्षा फक्त थोडे अधिक साक्षीदार होते पण आज त्यांची संख्या २,२२,००० इतकी आहे!
मार्था आणि मी जपानमध्ये आलो होतो तेव्हा टोकियो येथील शाखा दफ्तरात आमची राहण्याची सोय करण्यात आली होती. १९६३ साली त्याच ठिकाणी एक सहा मजली
इमारत उभारण्यात आली. तेव्हापासून आम्ही येथेच राहत आहोत. १९६३ सालच्या नोव्हेंबर महिन्यात या नवीन इमारतीचे समर्पण झाले त्यावेळी बंधू लॉईड बॅरी यांनी समर्पणाचे भाषण दिले होते आणि उपस्थित असलेल्या १६३ लोकांमध्ये आम्ही दोघीही होतो. तोवर जपानमध्ये ३,००० साक्षीदार होते.जलद गतीनं व नाट्यमयरीत्या वाढत चाललेलं राज्य प्रचाराचं काम पाहून खूप आनंद होतो. १९७२ साली नुमाझु शहरात एका नव्या शाखा दफ्तराचे बांधकाम पूर्ण झाले तेव्हा जपानमध्ये १४,००० साक्षीदार होते. हे शाखा दफ्तरही कमी पडू लागल्यामुळे १९८२ साली, टोकियोपासून ८० किलोमीटरवर असलेल्या एबिना शहरात आणखी एक नवीन कार्यालय बांधण्यात आले. तोपर्यंत राज्य प्रचारकांची संख्या ६८,००० पर्यंत गेली होती.
आम्ही जेथे राहतो त्या टोकियोतील जुन्या शाखा कार्यालयाची डागडुजी केल्यावर त्याला मिशनरी होम बनवण्यात आले. येथे सध्या, जपानमध्ये ४०, ५० किंवा त्याहूनही अधिक वर्षांसाठी मिशनरी म्हणून सेवा केलेले २० बंधू भगिनी राहतात. मी आणि मार्था हेस याच मिशनरी होममध्ये राहतो. आमच्या होममध्ये एक डॉक्टर व त्यांची पत्नी जी नर्स म्हणून काम करते तीही राहते. ते आमच्या सर्वांची खूप चांगली काळजी घेतात. अलिकडेच, आणखी एक नर्स येथे राहायला आली आहे. शिवाय, दिवसा कधीकधी इतर ख्रिस्ती भगिनी नर्सला मदत करायला येतात. एबिना येथील बेथेलहून दोघे जण जेवण बनवायला आणि आमच्या खोल्या स्वच्छ करायला आळीपाळीनं येतात. यहोवा खरोखरच आमची खूप काळजी घेतोय.—स्तोत्र ३४:८, १०.
मिशनरी होमच्या समर्पणानंतर ३६ वर्षांनी, म्हणजे नोव्हेंबर १३, १९९९ रोजी एबीना शाखेत बनवण्यात आलेल्या नवीन इमारतीचे समर्पण करण्यात आले. तो दिवस मी केव्हाही विसरणार नाही. त्या कार्यक्रमाला ३७ देशांतून ४,४८६ बंधू भगिनी उपस्थित होते. या बंधूभगिनींमध्ये, पुष्कळ जण असे होते ज्यांनी खूप वर्षांपासून यहोवाची सेवा विश्वासूपणे केली होती. सध्या एबीना शाखेत ६५० सदस्य आहेत.
आजपासून सुमारे ८० वर्षांआधी मी लाजत लाजत बायबल मधील संदेशाचा प्रचार करायला सुरवात केली होती, हे काम मी अजूनही थांबवलेलं नाही. या ८० वर्षांत यहोवानं मला पावलोपावली मदत केली. त्यानं मला धीट बनवलं. आणि याची मला खातरी आहे की, जो कोणी यहोवावर भरवसा ठेवतो त्याचा तो उपयोग करून घेतो; मग तो माझ्यासारखा लाजऱ्या स्वभावाचा असला तरीसुद्धा. आपल्या यहोवा देवाची अनोळखी लोकांना ओळख करून देण्यात मी माझं संपूर्ण आयुष्य वेचलं याचं मला अत्यंत समाधान वाटतं!
[२१ पानांवरील चित्र]
आई आणि बेथेलहून आम्हाला भेटायला आलेला माझा भाऊ क्लेरन्ससोबत
[२३ पानांवरील चित्र]
न्यूयॉर्कच्या साऊथ लॅन्सिंग जवळ गिलियड प्रशाळेच्या वेळी बाहेर गवतावर बसून अभ्यास करत असलेले विद्यार्थी
[२३ पानांवरील चित्र]
डावीकडे: मी, मार्था हेस आणि आई हवाईमध्ये असताना
[२४ पानांवरील चित्र]
उजवीकडे: आमच्या टोकियो मिशनरी गृहातील सदस्य
[२४ पानांवरील चित्र]
खाली: माझी अनेक वर्षांची पायनियर पार्टनर, मार्था हेस
[२५ पानांवरील चित्र]
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात समर्पण झालेले एबिना येथील नवीन शाखा दफ्तर