व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘स्वतःचे व ऐकणाऱ्‍यांचेही तारण’

‘स्वतःचे व ऐकणाऱ्‍यांचेही तारण’

‘स्वतःचे व ऐकणाऱ्‍यांचेही तारण’

“आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे नीट लक्ष ठेव; . . . कारण असे केल्याने तू स्वतःचे व तुझे ऐकणाऱ्‍यांचेहि तारण साधिशील.”—१ तीमथ्य ४:१६.

१, २. खऱ्‍या ख्रिश्‍चनांना त्यांच्या जीवदायक प्रचार कार्यात टिकून राहायला कशामुळे प्रेरणा मिळते?

थायलंडच्या उत्तरेकडे दूरवरच्या डोंगरांत एक लहानसे खेडे वसलेले आहे. या खेड्यात राहणाऱ्‍या जमातीच्या लोकांना यहोवाचे साक्षीदार देवाच्या राज्याविषयीचे ज्ञान देत आहेत. त्यांना देवाच्या राज्याची सुवार्ता सांगता यावी म्हणून एका साक्षीदार जोडप्याने या जमातीची लाहू भाषा शिकून घेतली आहे.

आपल्या या अनुभवाबद्दल पती सांगतो: “या आगळ्यावेगळ्या जमातीच्या लोकांना देवाच्या राज्याची सुवार्ता सांगताना आम्हाला मिळणारा आनंद, मिळणारं समाधान शब्दांत व्यक्‍त करणं कठीण आहे. प्रकटीकरण १४:६, ७ या वचनांत ‘प्रत्येक राष्ट्र, वंश, व निरनिराळ्या भाषा बोलणाऱ्‍यांना’ राज्याची सुवार्ता सांगितली जाईल अशी भविष्यवाणी आहे, तिच्या पूर्णतेत आमचा देखील सहभाग आहे याचा आम्हाला आनंद वाटतो. सुवार्ता सांगण्यासाठी साक्षीदारांनी अनेक अडथळ्यांवर मात केली आहे; आम्ही देखील एका अडथळ्यावर मात केली आहे असं आम्हाला वाटतं. आता आमच्याकडे इतके बायबल अभ्यास आहेत की आम्हाला वेळ कमी पडतो.” हे जोडपे स्वतःसोबत त्यांचे ऐकणाऱ्‍यांचेही तारण साधावे म्हणून प्रयत्नांची पराकाष्टा करत आहे. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्‍तीचा हाच प्रयत्न असू नये का?

“आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे नीट लक्ष ठेव”

३. दुसऱ्‍यांचेही तारण व्हावे म्हणून त्यांना मदत करण्यासाठी आपण अगोदर काय केले पाहिजे?

प्रेषित पौलाने तीमथ्याला सल्ला दिला, “आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे नीट लक्ष ठेव.” (१ तीमथ्य ४:१६) हा सल्ला प्रत्येक ख्रिस्ती व्यक्‍तीकरता आहे. पण इतरांना मदत करण्याअगोदर आपण स्वतःकडे लक्ष दिले पाहिजे. हे आपल्याला कसे करता येईल? पहिली गोष्ट म्हणजे, आज आपण कोणत्या काळात जगत आहोत याची आपण सतत जाणीव ठेवली पाहिजे. येशूने त्याच्या शिष्यांना ‘युगाच्या समाप्तीची’ काही चिन्हे दिली होती. ही सर्व चिन्हे पाहून अंतसमय निकट आला आहे असे त्यांनी ओळखायचे होते. पण, अंत येण्याची नेमकी वेळ मात्र त्यांना कळणार नाही हेही येशूने सांगितले होते. (मत्तय २४:३, ३६) हे लक्षात घेऊन आपण काय केले पाहिजे?

४. (अ) नाश यायला अगदी थोडा वेळ उरला असताना आपण कशी मनोवृत्ती बाळगली पाहिजे? (ब) कोणती मनोवृत्ती आपण टाळली पाहिजे?

प्रत्येकाने स्वतःला विचारले पाहिजे, ‘येणाऱ्‍या नाशातून माझा आणि माझे ऐकणाऱ्‍यांचाही बचाव व्हावा म्हणून मी या उरलेल्या वेळात माझ्याने होईल तितका प्रयत्न करत आहे का? की, “नाश नेमका केव्हा येईल हे तर कोणालाच माहीत नाही, मग कशाला उगाच काळजी करायची” असा मी विचार करतो?’ असा विचार करणे अतिशय धोकेदायक आणि येशूने दिलेल्या सल्ल्याच्या अगदी विरोधात आहे. येशूने म्हटले होते: “सिद्ध असा, कारण तुम्हास कल्पना नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल.” (मत्तय २४:४४) ही वेळ यहोवाच्या सेवेत थंड होण्याची किंवा जगिक गोष्टींत शांतिसमाधान आणि सुरक्षितता शोधण्याची मुळीच नाही.—लूक २१:३४-३६.

५. यहोवाच्या प्राचीन काळातल्या साक्षीदारांनी कोणता आदर्श ठेवला आहे?

स्वतःकडे लक्ष देण्यात आणखी एका गोष्टीचा समावेश आहे, आणि ती म्हणजे ख्रिस्ती कार्यांत विश्‍वासूपणे टिकून राहणे. प्राचीन काळातही देवाचे सेवक विश्‍वासूपणे टिकून राहिले. त्यांनाही कठीण परीक्षांना तोंड द्यावे लागले आणि त्यांची समस्यांमधून लगेच सुटका झाली नाही. हाबेल, हनोख, नोहा, अब्राहाम आणि सारा यांची उदाहरणे देऊन पौलाने म्हटले: “त्यांना वचनानुसार फलप्राप्ति झाली नव्हती, तर त्यांनी ती दुरून पाहिली व तिला वंदन केले आणि आपण ‘पृथ्वीवर परके व प्रवासी’ आहो असे पत्करले.” त्यांनी आरामशीर जीवन जगण्याच्या किंवा त्याकाळातील बहुतेक लोकांप्रमाणे अनैतिक गोष्टींत रमण्याचा प्रयत्न केला नाही; उलट ते मोठ्या धीराने ‘फलप्राप्तीची’ वाट पाहात राहिले.—इब्री लोकांस ११:१३; १२:१.

६. तारणाविषयी पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांच्या दृष्टिकोनामुळे त्यांच्या जीवनावर कसा प्रभाव पडला?

पहिल्या शतकातले ख्रिस्ती लोक देखील स्वतःला या जगात “परदेशवासी” समजत होते. (१ पेत्र २:११) सा.यु. ७० साली जेरूसलेमच्या नाशातून बचाव झाल्यानंतरही त्यांनी सुवार्तेचा प्रचार करण्याचे थांबवले नाही किंवा जगिक, प्रापंचिक गोष्टींत ते रमले नाहीत. त्यांना माहीत होते की विश्‍वासू राहणाऱ्‍यांसाठी भविष्यात एक महान प्रतिफळ राखून ठेवले आहे. जेरुसलेमचा नाश झाल्यानंतर जवळजवळ ३० वर्षांनंतर म्हणजे सा.यु. ९८ मध्ये योहानाने असे लिहिले: “जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत; पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.”—१ योहान २:१७, २८.

७. आपल्या या काळात यहोवाचे साक्षीदार कशाप्रकारे यहोवाच्या सेवेत टिकून राहिले आहेत?

आजही यहोवाचे साक्षीदार सर्व परीक्षांना व भयंकर छळाला तोंड देत ख्रिस्ती कार्यात टिकून आहेत. त्यांचे धीर धरणे व्यर्थ ठरले आहे का? निश्‍चितच नाही. येशूने आपल्याला आश्‍वासन दिले आहे: “जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल.” या दुष्ट जगाच्या शेवटापर्यंत असो, नाहीतर आपल्या स्वतःच्या जीवनाच्या शेवटापर्यंत असो, टिकून राहणे महत्त्वाचे आहे. देवाचे राज्य येण्याआधी आपला मृत्यू झाला तरीसुद्धा आपल्याला आशा आहे कारण यहोवा त्याच्या सर्व विश्‍वासू सेवकांना आठवणीत ठेवतो आणि त्यांना तो पुन्हा जिवंत करून अनेक अद्‌भुत आशीर्वाद देईल.—मत्तय २४:१३; इब्री लोकांस ६:१०.

८. पहिल्या शतकातले आणि त्याआधीचे ख्रिश्‍चन यहोवाच्या सेवेत टिकून राहिले याबद्दल आपण कृतज्ञ असल्याचे कसे दाखवू शकतो?

पहिल्या शतकातल्या विश्‍वासू ख्रिश्‍चनांनी फक्‍त स्वतःच्याच तारणाचा विचार केला नाही. म्हणूनच आज आपल्याला देवाच्या राज्याबद्दल शिकायला मिळाले आहे. ‘तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; व जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा,’ ही येशूची आज्ञा त्यांनी विश्‍वासूपणे पाळली. त्यांच्या परिश्रमामुळे आपल्याला सत्य समजले याबद्दल आपण कृतज्ञ असू नये का? (मत्तय २८:१९, २०) पण आपण ही कृतज्ञता कशी दाखवू शकतो? अद्याप ज्यांना सुवार्ता ऐकायला मिळालेली नाही अशांना, संधी आहे तोवर सुवार्तेचा प्रचार करत राहिल्याने आपण कृतज्ञ आहोत हे दाखवतो. पण केवळ प्रचार केल्याने शिष्य बनत नाहीत. प्रचार हे तर केवळ पहिले पाऊल आहे.

‘आपल्या शिक्षणाकडे नीट लक्ष ठेव’

९. आशावादी दृष्टिकोन बाळगल्यामुळे बायबल अभ्यास सुरू करायला आपल्याला कशी मदत होऊ शकते?

आपल्याला येशूने केवळ प्रचार करण्याचीच नव्हे तर शिकवण्याचीही आज्ञा दिली. त्याने सांगितलेल्या सर्व गोष्टी इतरांना शिकवण्याची त्याने आज्ञा दिली. काही क्षेत्रात लोकांना यहोवाबद्दल शिकून घेण्याची इतकी इच्छा नसते. पण एखाद्या क्षेत्राबद्दल आपण नकारात्मक दृष्टिकोन बाळगला तर साहजिकच आपण बायबल अभ्यास सुरू करण्याचा जितका प्रयत्न केला पाहिजे तितका करणार नाही. इवेट नावाची एक पायनियर बहीण ज्या क्षेत्रात कार्य करत होती त्या क्षेत्रात प्रचार करणे व्यर्थ आहे असे काही बांधवांचे मत होते. पण त्या बहिणीच्या लक्षात आले, की अधूनमधून दुसऱ्‍या ठिकाणाहून येणाऱ्‍या बांधवांना याच परिसरात प्रचार काम करताना हमखास बायबल अभ्यास मिळायचे. का? कारण त्यांच्या मनात या क्षेत्रातील लोकांविषयी कोणताही पूर्वग्रह, निराशावादी दृष्टिकोन नव्हता. मग इवेटने देखील आशावादी राहायचे ठरवले. आणि तेव्हापासून तिला देखील बायबल अभ्यास मिळू लागले.

१०. लोकांना बायबलचे शिक्षण देण्यात आपली कोणती भूमिका आहे?

१० काही बांधव संदेशाबद्दल आस्था दाखवणाऱ्‍या लोकांना बायबल अभ्यासाबद्दल सांगायला मागेपुढे पाहतात. आपल्याला बायबल अभ्यास नीट घेता येईल का अशी त्यांना भिती वाटते. सर्वांजवळ सारखेच कौशल्य नसते हे खरे आहे, पण देवाचे वचन परिणामकारक पद्धतीने शिकवण्याकरता आपण फार निपुण असणे आवश्‍यक नाही. बायबलचा संदेशच मुळात शक्‍तिशाली आहे. शिवाय येशूने आधीच सांगितले होते, की जी खरोखर येशूची मेंढरे आहेत ती आपोआप खऱ्‍या मेंढपाळाची वाणी ओळखतील. आपले काम केवळ त्या उत्तम मेंढपाळाचा, म्हणजेच येशूचा संदेश आपल्याला जमेल तितक्या चांगल्याप्रकारे त्यांना सांगायचे आहे.—योहान १०:४, १४.

११. तुमच्या बायबल विद्यार्थ्याला तुम्ही आणखी परिणामकारक पद्धतीने मदत कशी करू शकता?

११ येशूचा संदेश अधिक चांगल्याप्रकारे सांगता यावा म्हणून तुम्ही काय करू शकता? पहिली गोष्ट म्हणजे, ज्या विषयावर तुम्ही चर्चा करणार आहात त्याविषयी बायबलमध्ये काय सांगितले आहे हे नीट समजून घ्या. दुसऱ्‍यांना समजावून सांगण्याआधी तुम्हाला तो विषय नीट समजणे महत्त्वाचे आहे. अभ्यास घेताना आदरणीय रितीने बोला आणि मनमोकळे वातावरण असू द्या. कारण शिक्षकाने तणावरहित वातावरणात शिकवल्यास, तसेच विद्यार्थ्याला त्याने आदराने आणि प्रेमाने वागवल्यास सहसा कोणताही विद्यार्थी, अगदी लहान मुले सुद्धा चांगली प्रगती करतात.—नीतिसूत्रे १६:२१.

१२. शिकवलेला विषय तुमच्या विद्यार्थ्याला नीट समजला की नाही हे तुम्ही कसे जाणून घेऊ शकता?

१२ शिकणाऱ्‍या व्यक्‍तीकडून उत्तरे तोंडपाठ करून घेऊ नका. जो विषय तुम्ही पाहात आहात तो नीट समजला की नाही याची खात्री करा. शिकणाऱ्‍या व्यक्‍तीचे शिक्षण किती झाले आहे, तिची पार्श्‍वभूमी काय आहे आणि तिला बायबलचे किती ज्ञान आहे हे विचारात घ्या. कारण तुम्ही जे शिकवत आहात ते त्या व्यक्‍तीला कितपत समजते हे या गोष्टींवरच अवलंबून आहे. म्हणून स्वतःला विचारा, ‘परिच्छेदात दिलेल्या वचनांचा विषयाशी काय संबंध आहे हे समोरच्या व्यक्‍तीला नीट समजले का?’ आणि हे जाणून घेण्याकरता त्या व्यक्‍तीला असे प्रश्‍न विचारा की ज्यांची केवळ हो किंवा नाही अशी उत्तरे देता येणार नाहीत, तर समजावून सांगावे लागेल. (लूक ९:१८-२०) काही विद्यार्थी बुजरे असतात. विषय नीट समजला नाही तरी ते गप्प राहतात; शिकवणाऱ्‍याला प्रश्‍न विचारत नाहीत. तेव्हा तुम्ही ज्याचा अभ्यास घेत आहात त्याला मोकळेपणाने प्रश्‍न विचारायला सांगा. एखादा मुद्दा समजला नाही तर तिथेच थांबवून त्याविषयी विचारण्याचा त्याला सल्ला द्या.—मार्क ४:१०; ९:३२, ३३.

१३. तुमच्या विद्यार्थ्यालाही पुढे इतरांना चांगल्याप्रकारे शिकवता यावे म्हणून तुम्ही त्याला कशाप्रकारे मदत करू शकता?

१३ बायबल अभ्यास घेण्याचा एक मुख्य उद्देश म्हणजे शिकणाऱ्‍या व्यक्‍तीलाही पुढे इतरांना चांगल्याप्रकारे शिकवण्याइतपत तयार करणे. (गलतीकर ६:६) यासाठी अभ्यासाची उजळणी घेताना विद्यार्थ्याला एखादा मुद्दा दुसऱ्‍या कोणाला आपण समजावत आहोत अशी कल्पना करून स्वतःच्या शब्दांत समजावून सांगण्याचे उत्तेजन द्या. काही काळानंतर, तो प्रचारसेवेत भाग घ्यायला तयार झाला आहे असे वाटल्यास, त्याला तुमच्यासोबत प्रचाराला येण्याचे तुम्ही सुचवू शकता. कारण निदान सुरवातीला, त्याला तुमच्याचबरोबर कार्य करायला जास्त सोपे जाईल. या अनुभवातून त्याला बरेच शिकायला मिळेल आणि लवकरच त्याला स्वतःहून प्रचार करण्याचा आत्मविश्‍वास येईल.

अभ्यास करणाऱ्‍याला यहोवाचा मित्र बनायला मदत करा

१४. एखाद्या व्यक्‍तीचा अभ्यास घेताना तुमचा मुख्य उद्देश काय असावा व हा उद्देश तुम्हाला कसा साध्य करता येईल?

१४ अभ्यास घेणाऱ्‍या प्रत्येकाने आपल्या विद्यार्थ्याला यहोवासोबत घनिष्ट मैत्री जोडण्यासाठी मदत केली पाहिजे. हाच अभ्यासाचा मूळ उद्देश असला पाहिजे. पण, हे साध्य करण्यासाठी केवळ याविषयी बोलून चालणार नाही. तुमचे उदाहरण पाहून त्या विद्यार्थ्याला प्रेरणा झाली पाहिजे. कोणत्याही शिक्षकाच्या उत्तम आदर्शामुळे विद्यार्थ्यावर फार मोठी छाप पडते कारण शब्दांपेक्षा कृती जास्त बोलक्या असतात. तेव्हा विद्यार्थ्याने चांगले गुण आणि देवाच्या कार्याकरता उत्साह उत्पन्‍न करावा असे वाटत असेल तर तुमचा स्वतःचा आदर्श त्याच्यापुढे ठेवा. तुम्ही जे काही बोलता व करता त्यातून यहोवासोबत तुमचा किती घनिष्ट नातेसंबंध आहे हे त्याला दिसून आले तर त्यालाही यहोवासोबत असे नाते जोडण्याची नक्कीच प्रेरणा मिळेल.

१५. (अ) अभ्यास करणाऱ्‍या व्यक्‍तीने योग्य हेतूने, निःस्वार्थपणे यहोवाची सेवा करणे का महत्त्वाचे आहे? (ब) पुढेही आध्यात्मिक प्रगती करत राहण्यासाठी तुम्ही तुमच्या विद्यार्थ्याला कशी मदत करू शकता?

१५ तुमच्या बायबल विद्यार्थ्याने यहोवाची सेवा केवळ हर्मगिदोनातून बचावण्यासाठी नव्हे तर यहोवावरील त्याच्या प्रेमामुळे केली पाहिजे. म्हणूनच, त्याच्या मनात यहोवाबद्दल निःस्वार्थ प्रेम उत्पन्‍न करा. असे केल्यास तुमचे बांधकाम जणू अग्निरोधक साहित्याने उभारलेल्या इमारतीप्रमाणे मजबूत राहील; म्हणजेच, पुढे कोणतीही परीक्षा आली तरी तुमच्यासोबत अभ्यास केलेली ती व्यक्‍ती यहोवावर निःस्वार्थ प्रेम असल्यामुळे त्या परीक्षेला तोंड देईल. (१ करिंथकर ३:१०-१५) पण तेच जर त्या व्यक्‍तीने केवळ तुमच्यासारखे किंवा मंडळीतल्या इतर कोणत्या बांधवासारखे व्हायचे आहे, हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवला तर तिचा हा मूळ उद्देशच चुकीचा ठरेल; कारण वाईट गोष्टींचा प्रतिकार करण्यासाठी लागणारी ताकद किंवा स्वतःहून योग्य निर्णय घेऊन त्यानुसार वागण्याचे धैर्य ती व्यक्‍ती उत्पन्‍न करू शकणार नाही. तुम्ही त्या व्यक्‍तीचा कायम अभ्यास घेत राहणार नाही, हे नेहमी आठवणीत असू द्या. आणि म्हणून आतापासूनच तुमच्या विद्यार्थ्याला दररोज बायबल वाचून त्यावर विचार करण्याची सवय लावण्याचे व अशारितीने दिवसेंदिवस यहोवाच्या आणखी जवळ येण्याचे प्रोत्साहन द्या. म्हणजे, तुमचा अभ्यास पूर्ण झाल्यावरही तो स्वतःहून बायबल आणि बायबल आधारित प्रकाशनांतून ‘सुवचने’ शिकत राहील.—२ तीमथ्य १:१३.

१६. अभ्यास करणाऱ्‍या व्यक्‍तीला मनापासून प्रार्थना करायला तुम्ही कसे शिकवू शकता?

१६ यहोवाच्या जवळ यायला मदत करण्याचा आणखी एक मार्ग आहे. अभ्यास करणाऱ्‍या व्यक्‍तीला मनापासून प्रार्थना करायला शिकवा. हे तुम्हाला कसे करता येईल? येशूने शिकवलेल्या प्रार्थनेवरून किंवा बायबलमध्ये दिलेल्या इतर प्रार्थनांवरून तुम्ही प्रार्थना कशी करावी हे त्या व्यक्‍तीला समजावून सांगू शकता. स्तोत्रसंहितेत अशा अनेक कळकळीच्या प्रार्थना आपल्याला वाचायला मिळतात. (स्तोत्र १७, ८६, १४३; मत्तय ६:९, १०) शिवाय, अभ्यासाच्या सुरवातीला आणि शेवटी तुम्ही प्रार्थना करत असताना अभ्यास करणारी व्यक्‍ती तुमची प्रार्थना ऐकेल, तेव्हा यहोवाशी तुमचा किती जवळचा संबंध आहे हे तुमच्या प्रार्थनेवरून तिला जाणवेल. म्हणूनच प्रार्थनेत आपल्या भावना अगदी मोकळेपणाने व्यक्‍त करा. भावनावश होऊन प्रार्थना करू नका, पण जे काही बोलता ते मनापासून बोला. तसेच, आध्यात्मिक गोष्टींना प्रार्थनेत प्राधान्य द्या.

आपल्या मुलांचेही तारण व्हावे म्हणून झटा

१७. तारणाच्या मार्गावर चालत राहण्यासाठी आईवडील आपल्या मुलांना कसे साहाय्य करू शकतात?

१७ आणखी कोणाहीपेक्षा आपल्या कुटुंबातल्या लोकांचे तारण व्हावे असे आपल्याला वाटत नाही का? बऱ्‍याच ख्रिस्ती पालकांची मुले “विश्‍वासात दृढ” आहेत आणि यहोवाची मनःपूर्वक सेवा करत आहेत. पण काही मुलांच्या मनात मात्र सत्याची मुळे रुजली नाहीत. (१ पेत्र ५:९; इफिसकर ३:१७; कलस्सैकर २:७) अशा कित्येक मुलांनी मोठे झाल्यावर सत्याचा मार्ग सोडून दिला. आपल्या मुलांच्या बाबतीत असे घडू नये म्हणून आईवडील काय करू शकतात? सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे घरात आनंदाचे, खेळीमेळीचे वातावरण निर्माण करा. घरात आनंद असेल तर अधिकाराचा मान राखणे, चांगले वागणे आणि इतरांशीही चांगले संबंध ठेवणे यांसारख्या गोष्टी मुलांना शिकवणे सोपे जाईल. (इब्री लोकांस १२:९) घरातील सर्वांचे एकमेकांशी घनिष्ट संबंध असतील तर मुलांना यहोवाच्या जवळ यायला मदत होईल. (स्तोत्र २२:१०) आनंदी कुटुंबांत आईवडील वेळातवेळ काढून, गरज पडली तर आपली इतर कामे बाजूला ठेवून आपल्या मुलांना वेळ देतात; जमेल तितका वेळ आपल्या मुलांच्या सोबत घालवतात. अशाप्रकारे आईवडील आपल्या आदर्शातून मुलांना जीवनात योग्य निर्णय घ्यायला शिकवतात. पालकांनो, तुमच्या मुलांना सर्वात जास्त गरज आहे ती तुमच्या पैशांची नव्हे किंवा नवनवीन वस्तूंची नव्हे—त्यांना गरज आहे तुमची, तुमच्या वेळेची, तुमच्या सहवासाची आणि तुमच्या वात्सल्याची. हे सर्व तुम्ही आपल्या मुलांना देत आहात का?

१८. कोणत्या प्रकारच्या प्रश्‍नांची उत्तरे शोधायला आईवडिलांनी मुलांना मदत केली पाहिजे?

१८ आपली मुले कधीच सत्य सोडून जाणार नाहीत असा खऱ्‍या ख्रिस्ती आईवडिलांनी कधी ग्रह बाळगू नये. डॅन्यल एका मंडळीत वडील म्हणून सेवा करतात; त्यांना पाच मुले आहेत. ते म्हणतात: “शाळेत किंवा इतर ठिकाणी मुले सतत जात-येत असतात, तेव्हा कधीकधी त्यांच्या मनात ख्रिस्ती विश्‍वासांविषयी शंका येणे साहजिक आहे. आईवडिलांनी या शंका लगेच दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ‘आपण खरच शेवटल्या दिवसांत जगत आहोत का? खरा धर्म एकच आहे कशावरून? शाळेतल्या एखाद्या विशिष्ट मित्राशी संगत करणे का योग्य नाही? लग्नाआधी शारीरिक जवळीक करण्यात काय हरकत आहे?’” यांसारखे प्रश्‍न मुले विचारतात, तेव्हा आईवडिलांनी सहनशीलतेने त्यांना यांची उत्तरे शोधायला मदत केली पाहिजे. पालकांनो, यहोवावर पूर्ण भरवसा ठेवा; तुमच्या प्रयत्नांना तो जरूर यश देईल, कारण तुमच्याप्रमाणे त्याला देखील तुमच्या मुलांची काळजी आहे.

१९. मुलांचा अभ्यास त्यांच्या आईवडिलांनीच घेणे सर्वात उत्तम का आहे?

१९ काहीजण आपल्या मुलांचा अभ्यास घ्यायला कचरतात, दुसऱ्‍या कोणत्या बांधवाने किंवा बहिणीने आपल्या मुलांचा अभ्यास घ्यावा असे त्यांना वाटते. पण इतर कोणापेक्षा तुमच्या मुलांना तुम्हीच शिकवणे सर्वात उत्तम आहे. (इफिसकर ६:४) मुलांचा बायबल अभ्यास तुम्ही स्वतः घेता तेव्हा आपल्या मुलांच्या मनात काय आहे, ते कसा विचार करतात हे तुम्हाला कळून येईल. मुले मनापासून उत्तरे देतात का, की फक्‍त द्यायची म्हणून देतात? शिकत असलेल्या गोष्टींवर त्यांचा विश्‍वास आहे का? यहोवा त्यांना खरा, वास्तविक वाटतो का? तुम्ही स्वतः तुमच्या मुलांचा अभ्यास घेतला तरच हे सर्व तुम्हाला जाणून घेता येईल.—२ तीमथ्य १:५.

२०. कौटुंबिक अभ्यास कंटाळवाणा होऊ नये आणि त्यातून बरेच शिकायला मिळावे म्हणून काय करता येण्यासारखे आहे?

२० बरीच कुटुंबे कौटुंबिक अभ्यास सुरू तर करतात, पण काही आठवड्यांनंतर तो बंद पडतो. हे कसे टाळता येईल? मंडळीत वडील म्हणून काम पाहणारे जोसेफ यांना दोन मुले आहेत; ते म्हणतात, “कोणताही अभ्यास असो, तो कंटाळवाणा वाटायला नको; कौटुंबिक बायबल अभ्यासाबद्दही हेच आहे. मुलांनी अभ्यासाच्या दिवसाची वाट पाहिली पाहिजे. आमच्या कुटुंबात, कौटुंबिक अभ्यास एक तास चाललाच पाहिजे असा काही नियम आम्ही केलेला नाही. एखाद्यावेळी दहा मिनिटंच का होईना पण आम्ही अभ्यास करतो. आमच्या मुलांनी अभ्यासाची उत्सुकतेनं वाट पाहावी म्हणून आम्ही दर आठवडी बायबल कथांचं माझं पुस्तक * यातून एकेका गोष्टीचं छोटंसं नाटक करतो. अभ्यासात किती परिच्छेद पूर्ण केले हे महत्त्वाचं नाही. तर शिकवलेल्या गोष्टी मुलांच्या मनात उतरल्या का, त्यांना त्या नीट समजल्या का याचा विचार करणं जास्त महत्त्वाचं आहे.”

२१. आईवडील आपल्या मुलांना इतर कोणत्या वेळी आध्यात्मिक गोष्टी शिकवू शकतात?

२१ अर्थात, बायबल अभ्यासाला बसल्यावरच तुम्ही आपल्या मुलांना आध्यात्मिक गोष्टी शिकवू शकता असे नाही. या लेखाच्या सुरवातीला थायलंडच्या ज्या बांधवाचा उल्लेख केला होता ते सांगतात: “मला आठवतं डॅडी मला प्रिचिंगला प्रचार क्षेत्राच्या अगदी शेवटापर्यंत, दूरदूरच्या भागात सायकलीने न्यायचे. आमच्या आईवडिलांच्या चांगल्या आदर्शामुळे आणि सर्व परिस्थितींत त्यांनी आम्हाला आध्यात्मिक गोष्टी शिकवल्यामुळेच आम्ही पूर्ण वेळची सेवा करण्याचा निर्णय घेऊ शकलो. त्यांनी शिकवलेल्या गोष्टी मी विसरलो नाही, म्हणूनच तर आजही मी अशा दूरच्या क्षेत्रात कार्य करत आहे!”

२२. ‘आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे नीट लक्ष दिल्यामुळे’ परिणाम काय घडेल?

२२ लवकरच तो दिवस येईल जेव्हा देवाच्या नियुक्‍त वेळी येशू या दुष्ट जगावर देवाचा न्यायदंड बजावेल. नंतर तो महान दिवस या विश्‍वाच्या इतिहासात लोप पावेल, पण यहोवाचे विश्‍वासू सेवक मात्र सर्वकाळ त्याची सेवा करतच राहतील. त्या विश्‍वासू सेवकांमध्ये आपल्या मुलांसोबत आणि बायबल अभ्यास करणाऱ्‍यांसोबत सामील असण्याची तुम्हाला इच्छा नाही का? मग पौलाचे हे शब्द सदैव आठवणीत असू द्या: “आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे नीट लक्ष ठेव; त्यातच टिकून राहा; कारण असे केल्याने तू स्वतःचे व तुझे ऐकणाऱ्‍यांचेहि तारण साधिशील.”—१ तीमथ्य ४:१६.

[तळटीप]

^ परि. 20 वॉचटावर बायबल ॲन्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित

तुम्हाला समजावून सांगता येईल का?

• देवाचा दिवस नेमक्या कोणत्या वेळी येईल हे माहीत नसल्यामुळे आपण कशी मनोवृत्ती बाळगावी?

• ‘आपल्या शिक्षणाकडे नीट लक्ष देण्याकरता’ आपण काय करू शकतो?

• अभ्यास करणाऱ्‍या व्यक्‍तीला तुम्ही यहोवाशी मैत्री करण्यासाठी कसे साहाय्य करू शकता?

• आईवडिलांनी आपल्या मुलांना शिकवण्यासाठी वेळ काढणे का महत्त्वाचे आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१५ पानांवरील चित्र]

बायबल विद्यार्थ्याशी आदराने आणि मनमोकळेपणाने वागल्याने तो लवकर प्रगती करतो

[१८ पानांवरील चित्र]

कौटुंबिक अभ्यास मजेदार होण्यासाठी हे कुटुंब, बायबलमधील शलमोन राजाच्या गोष्टीवर छोटेसे नाटक करत आहेत