व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अदृश्‍य गोष्टींवर तुम्ही विश्‍वास ठेवता का?

अदृश्‍य गोष्टींवर तुम्ही विश्‍वास ठेवता का?

अदृश्‍य गोष्टींवर तुम्ही विश्‍वास ठेवता का?

‘प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय मी कोणत्याच गोष्टीवर विश्‍वास ठेवत नाही.’ असे कोणी म्हणताना तुम्ही कधी ऐकले आहे का? पण यात किती तथ्य आहे? खरे तर, आपण पाहू शकत नाही अशा कितीतरी गोष्टींवर आपण विश्‍वास ठेवत असतो.

तुम्ही शाळेत असताना चुंबकीय शक्‍ती शाबीत करण्याकरता प्रयोग केले असतील. तुम्ही कागदाच्या तुकड्यावर लोखंडाचा किस टाकला, आणि मग कागदाच्या तुकड्याच्या खालून चुंबक फिरवला. जेथे-जेथे तुम्ही चुंबक फिरवता, तेथे-तेथे लोखंडाचा किस देखील फिरतो. या प्रयोगात कार्य करणारी चुंबकीय शक्‍ती तुमच्या डोळ्यांना दिसली का? नाही, तुम्ही चुंबकीय शक्‍ती पाहिली नाही, पण त्या शक्‍तीचा परिणाम तुम्ही नक्की पाहिला. आणि परीक्षणातून तुम्हाला पूर्ण खात्री पटली, की चुंबकामध्ये खरोखरच शक्‍ती असते.

अशाच कित्येक गोष्टी आहेत ज्या आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत, पण तरीदेखील आपण त्यांवर विश्‍वास ठेवतो. जेव्हा आपण एखादे सुंदर चित्र पाहतो किंवा एखादी कोरीव मूर्ती पाहतो तेव्हा आपण हे मानतो, की या वस्तू नक्कीच कोणा कलाकाराची निर्मिती आहेत. तर मग, जेव्हा आपण नजर खिळवून ठेवणारा सूर्यास्त पाहतो, डोंगरावर पसरलेला हिरवागार गालिचा पाहतो किंवा पिंजलेल्या कापसाप्रमाणे आकाशात विखुरलेले ढग पाहतो, तेव्हा आपल्या मनात हा विचार येत नाही का की नक्कीच यामागे कोणी महान कलाकार असावा, अर्थात कोणी निर्माणकर्ता देव असावा?

काही लोक देवावर विश्‍वास का ठेवत नाहीत

धर्मांत शिकवल्या जाणाऱ्‍या गोष्टींमुळे कित्येक लोकांचा देवावरचा विश्‍वास उडाला आहे, ही आश्‍चर्याचीच गोष्ट नाही का? नॉर्वेमधील एका मनुष्याबद्दलच पाहा; त्याला त्याच्या धर्माने असे शिकवले होते की दुष्ट लोकांना देव नरकात तप्त आगीत यातना देतो. या शिकवणीमुळे त्या मनुष्याला एक प्रश्‍न सारखा भेडसावायचा की जर देव प्रेमळ आहे तर मग तो लोकांना अशा यातना कशा देऊ शकतो. या गोष्टीवर विचार करून करून तो अखेरीस नास्तिक झाला, त्याचा देवावरचा विश्‍वासच उडाला.

नंतर, त्याची यहोवाच्या साक्षीदारांशी भेट झाली, आणि त्यांच्या मदतीने त्याला बायबलमधून त्याच्या प्रश्‍नाचे उत्तर मिळाले. देव वाईट लोकांना नरकात यातना देत नाही हे बायबलमधून समजल्यानंतर त्याला फार आश्‍चर्य वाटले. खरे तर, बायबल सांगते, की मेल्यानंतर माणसाची अवस्था गाढ झोपेत असल्याप्रमाणे असते; मृतांना कोणत्याही गोष्टीची जाण नसते. (उपदेशक ९:५, १०) त्याला हे देखील कळाले, की मेलेल्या धार्मिक लोकांना देव त्याच्या नियुक्‍त वेळी पुन्हा जिवंत करील आणि त्यांना सुंदर पृथ्वीवर सदासर्वदा जगण्याची संधी देईल. (योहान ५:२८, २९; १७:३) पण दुष्ट लोकांना मात्र तो पुन्हा जगण्याची संधी देणार नाही. (मत्तय १२:३१, ३२) ही गोष्ट त्या मनुष्याला पटली. आता त्याला “देव प्रीति आहे,” हे बायबलमधील वाक्य समजले. (१ योहान ४:८) अशाप्रकारे त्याने बायबलचा अभ्यास चालू ठेवला. आणि त्याने फक्‍त देवावर विश्‍वासच ठेवला नाही तर तो देवावर मनापासून प्रेमही करू लागला.

आज काही लोक दुःख, त्रास आणि अन्याय पाहून हे मान्यच करू शकत नाहीत, की एक प्रेमळ निर्माणकर्ता असू शकतो. त्यांचे म्हणणे असे आहे, की तो प्रेमळ असता, तर त्याने अशी परिस्थिती होऊच दिली नसती. असाच विचार करणाऱ्‍या स्वीडनमधील एका मनुष्याने आकाशाकडे बोट दाखवत म्हटले: “जर तेथे वर आकाशात सर्वात शक्‍तिशाली आणि प्रेमळ देव आहे, तर पृथ्वीवरील भ्रष्टाचार, दुष्टाई पाहून तो शांत का राहिला आहे? तो काही करत का नाही?” त्याच्या या प्रश्‍नांचे कोणाला उत्तर देता आले नाही आणि त्यामुळे तो देखील नास्तिक झाला. पण नंतर त्याने यहोवाच्या साक्षीदारांसोबत अभ्यास सुरू केला. यातून त्याला ‘देवाने अजून दुष्टाईला का परवानगी दिली आहे?’ या त्याच्या प्रश्‍नाचे समाधानकारक उत्तर मिळाले. *

काही लोक या जगातील दुष्टाई आणि वाईट परिस्थिती पाहून म्हणतात, की देव नाहीच. आणि ही पृथ्वी बनवणारा देखील कोणी नाही. पण असे म्हणण्यात खरोखरच काही अर्थ आहे का? समजा एका मनुष्याने भाजी कापण्याकरता एक चाकू बनवला. एका ग्राहकाने तो विकत घेतला आणि कांदे-बटाटे कापण्याऐवजी कोणाचा गळाच कापायला त्याने त्या चाकूचा वापर केला. तर मग, त्या चाकूचा योग्य वापर करण्यात आला नाही म्हणून तो चाकू कोणीच बनवला नाही असे म्हणण्यात काही अर्थ आहे का? त्याप्रमाणे, देवाने या पृथ्वीला ज्या उद्देशाने बनवले होते त्याच्यानुसार या पृथ्वीचा योग्य उपयोग करण्यात आलेला नाही. पण याचा असा तर अर्थ होत नाही, की पृथ्वीला बनवणारा कोणीच नाही.

बायबलमध्ये सांगण्यात आले आहे, की देवाच्या कोणत्याही कामात मुळीच खोट नाही. देवाच्या ठायी “अनीति नाही; तो न्यायी व सरळ आहे.” (अनुवाद ३२:४) त्याने मनुष्याला नेहमीच चांगल्या आणि उत्तम गोष्टी दिल्या आहेत, पण मनुष्यांनी त्यांचा चुकीचा उपयोग करून इतरांना दुःख, पीडा आणि त्रास दिला आहे. (याकोब १:१७) पण लवकरच देव वाईट लोकांना आणि दुःखाला काढून टाकील. त्यानंतर “लीन जन पृथ्वीचे वतन पावतील; . . . तिच्यात ते सर्वदा वास करितील.”—स्तोत्र ३७:११, २९.

आधी उल्लेख केलेल्या स्वीडनच्या त्या मनुष्याने लोकांचे दुःख, त्यांचा त्रास पाहिला तेव्हा त्याला त्यांचा कळवळा आला. तसे पाहिल्यास या गोष्टीवरून हे शाबीत होते, की देव जरूर अस्तित्वात आहे. कसे?

उत्क्रांतिवादावर विश्‍वास ठेवणारे मानतात, की मनुष्याला देवाने बनवले नाही, तर प्राण्यांपासून त्यांची उत्पत्ती झाली आहे. त्यांच्या मते दुर्बल मनुष्यांना किंवा प्राण्यांना मारून प्रबळ मनुष्य किंवा प्राणी आपले अस्तित्व टिकवतात. ते म्हणतात, की या जगात कळवळा, दया, करुणा यांसारख्या गुणांना काहीच महत्त्व नाही, हाच निसर्गाचा नियम आहे. पण, प्रबळ लोकांना जगता यावे म्हणून दुर्बळ लोकांनी मरावे हाच जर “निसर्गाचा नियम” आहे तर, काही प्रबळ लोकांना दुसऱ्‍यांचे दुःख पाहून कळवळा का येतो? म्हणजेच, मनुष्यातील करुणा, दया यांसारख्या गुणांवरून हेच स्पष्ट होते की देवाने आपल्याला या गुणांसह बनवले आहे.

देवाला चांगल्याप्रकारे ओळखणे

देवाला आपण पाहू शकत नाही कारण तो आपल्यासारखा हाडामांसाचा नाही. मग, आपण त्याला ओळखू शकत नाही का? नाही, तसे नाही. देवाची इच्छा आहे, की आपण त्याला ओळखावे. पण हे कसे शक्य आहे? या सृष्टीच्या परीक्षणाद्वारे. रोमकर १:२० असे म्हणते: “[देवाच्या] अदृश्‍य गोष्टी म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवपण ही निर्मिलेल्या पदार्थावरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत.” ज्याप्रमाणे एखाद्या चित्राचे किंवा मूर्तीचे बारकाईने परीक्षण केल्यामुळे आपल्याला त्या चित्रकाराच्या किंवा शिल्पकाराच्या व्यक्‍तित्वाची माहिती मिळते त्याचप्रमाणे देवाच्या वैभवी निर्मितीचे बारकाईने परीक्षण केल्यामुळे आपल्याला त्याच्या व्यक्‍तित्वाचे, त्याच्या स्वभावाचे दर्शन घडते.

हे खरे आहे, सृष्टीच्या अभ्यासातून जीवनाच्या सर्वच आवश्‍यक प्रश्‍नांचे उत्तर मिळणार नाही; त्याकरता आपल्याला देवाच्या वचनाचा, बायबलचा अभ्यास करण्याची गरज आहे. आम्ही ज्या दोन मनुष्यांविषयी सुरवातीला सांगितले, त्यांनी कोणताही पूर्वग्रह मनात न बाळगता, अगदी खुल्या मनाने बायबलचा अभ्यास केला आणि हा निष्कर्ष काढला, की देव खरोखरच अस्तित्वात आहे आणि तो आपली खूप काळजी करतो.

[तळटीप]

^ परि. 8 या प्रश्‍नाविषयी जास्त माहिती हवी असल्यास, काळजी वाहणारा कोणी निर्माणकर्ता आहे का? या इंग्रजी पुस्तकाचा १० वा अध्याय वाचा. हे पुस्तक वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीने प्रकाशित केले आहे.

[२८ पानांवरील चित्राचे श्रेय]

J. Hester and P. Scowen (AZ State Univ.), NASA