गिलियडच्या १०८ व्या वर्गाला पवित्र सेवा करण्याचे प्रोत्साहन मिळाले
गिलियडच्या १०८ व्या वर्गाला पवित्र सेवा करण्याचे प्रोत्साहन मिळाले
बायबलमध्ये जेव्हा देवाची “उपासना” करण्याचा उल्लेख येतो तेव्हा बहुतेकवेळा त्याची पवित्र सेवा करण्याचे उत्तेजन आपल्याला दिले जाते. (रोमकर ९:४) वॉच टावर बायबल स्कूल ऑफ गिलियडच्या १०८ व्या वर्गाचा पदवीदान कार्यक्रम देवाची पवित्र सेवा कशी करावी, या विषयावर आधारित होता. या वर्गातील बंधुभगिनींना अनेक व्यवहारिक सल्ले देण्यात आले. कार्यक्रमाला एकूण ५,५६२ जण उपस्थित होते. *
नियमन मंडळाचे सदस्य, थिओडोर जॅरस या कार्यक्रमाचे संचालक होते. ५२ क्रमांकाच्या गीताने कार्यक्रमाची सुरवात झाली; या गीताचे शीर्षक होते, “आपल्या पित्याचे नाम.” या गीताच्या दुसऱ्या कडव्याचे बोल असे होते: “हाच प्रयत्न करतो आम्ही, नाम तुझे व्हावे पवित्र नेहमी.” या कडव्यातून गिलियड विद्यार्थ्यांची इच्छा प्रकट झाली, की ते देखील या स्कूलमध्ये मिळालेल्या प्रशिक्षणाद्वारे यहोवाच्या नावाला पवित्र करू इच्छितात. हे विद्यार्थी (१० देशांतून) आले होते आणि त्यांना प्रशिक्षणानंतर १७ निरनिराळ्या देशांत मिशनरी म्हणून पाठवण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला बंधू जॅरस यांनी सांगितले, की या विद्यार्थ्यांनी पाच महिने अगदी मनापासून बायबलचा खोल अभ्यास केला. यामुळे परदेशात जाऊन सेवा करण्यास ते तयार झाले आहेत. तसेच या स्कूलच्या दरम्यान त्यांना देवाच्या वचनातून “सर्व गोष्टींची पारख” करायला मदत मिळाली ज्यामुळे त्यांना ‘चांगले ते बळकट धरता येईल.’ (१ थेस्सलनीकाकर ५:२१) बंधू जॅरस यांनी विद्यार्थ्यांना उत्तेजन दिले. ते म्हणाले, ‘नेहमी यहोवाला एकनिष्ठ राहा, त्याच्या वचनानुसार चालत राहा आणि ज्या कामाकरता तुम्हाला इतके उत्तम प्रशिक्षण मिळाले आहे त्या कामात शेवटपर्यंत टिकून राहा.’ हे सर्व करण्यासाठी त्यांना कशी मदत मिळेल?
पवित्र सेवेकरता उत्तम सल्ला
बेथेल संचालक कमिटीचे सदस्य, लॉन शिलिंग यांनी एक भाषण दिले; त्याचा विषय होता, “तुम्ही एक समजदार व्यक्ती शाबीत व्हाल का?” बंधूंनी सांगितले, की एका समजदार व्यक्तीकडेच देवाची बुद्धी असते, त्यामुळे समजदार होणे फार महत्त्वाचे आहे. (याकोब ३:१७) समजदार मनुष्य आपलीच गोष्ट खरी करू पाहत नाही, भेदभाव करत नाही; तर तो आपली सीमा ओळखतो, दुसऱ्यांचा आदर करतो, संयम राखतो. बंधू शिलिंग यांनी म्हटले, “समजदार लोक दुसऱ्यांसोबत नेहमी अदबीने वागतात.” असे समजदारपणे वागण्याकरता एखाद्या मिशनरीला कोणत्या गोष्टीमुळे मदत मिळेल? स्वतःबद्दलचा योग्य दृष्टिकोन, इतरांचे ऐकून त्यांच्यापासून शिकण्याची तसेच ख्रिस्ती तत्त्वानुरूप असणारा सल्ला स्वीकारण्याची तयारी या गोष्टींमुळे मदत मिळेल.—१ करिंथकर ९:१९-२३.
“भोजन करायला विसरू नका!” या आगळ्यावेगळ्या विषयावर नियमन मंडळाचे सदस्य, बंधू सॅम्युएल हर्ड यांनी भाषण दिले. त्यांनी सांगितले, की यहोवाच्या पवित्र सेवेत टिकून राहण्यासाठी आपण आध्यात्मिक आहार वेळोवेळी घेतला पाहिजे. बंधू हर्ड यांनी म्हटले: “मिशनरी सेवेसोबत तुमच्या जबाबदाऱ्या देखील वाढतील. या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याकरता भरपूर आध्यात्मिक आहार घेतला पाहिजे, नाहीतर तुम्ही कमजोर व्हाल.” जो मिशनरी भरपूर आध्यात्मिक आहार घेईल तो सेवाकार्यात आवेशी राहील आणि कधी हिंमत हारणार नाही तसेच त्याला घरची देखील आठवण सतावणार नाही. यामुळे तो सेवेत टिकून राहील आणि देवाच्या सेवेतील आनंद मिळवत राहील.—गिलियडचे एक शिक्षक, बंधू लॉरन्स बवन यांच्या भाषणाचा विषय होता, “आरंभाकडे परत जा.” याचा काय अर्थ होतो? या बांधवांनी सर्वांचे लक्ष नीतिसूत्रे १:७ या वचनाकडे वेधले. हे वचन म्हणते: “परमेश्वराचे भय हे ज्ञानाचा प्रारंभ होय.” हे वचन समजावताना त्यांनी म्हटले: “जोपर्यंत एखादा मनुष्य यहोवाचे भय मानत नाही, तोपर्यंत तो योग्य बुद्धी आणि समज प्राप्त करू शकत नाही.” बंधू बवन यांनी पुढे म्हटले, की अशी बुद्धी प्राप्त करण्याकरता आपल्याला बायबलच्या वचनांतून संशोधन केले पाहिजे. आपण बायबलच्या एखाद्या विषयावर संशोधन करतो तेव्हा आपण त्याच्या वेगवेगळ्या संदर्भांना विचारात घेऊन अभ्यास केला पाहिजे. तेव्हा आपल्यासमोर त्या विषयाचे संपूर्ण चित्र उभे राहील. जितके जास्त आपण संशोधन करू, तितकी स्पष्ट समज आपल्याला प्राप्त होईल. यामुळे आपल्याला यहोवाची पवित्र सेवा करायला आणखीन मदत मिळेल.
कार्यक्रमाचे अखेरचे भाषण, गिलियड स्कूलचे रजिस्ट्रार, बंधू वॉलेस लिव्हरन्स यांनी दिले. त्यांचा विषय होता, “यहोवाला स्तुतिरूपी बलिदान द्या.” येशूने बरे केलेल्या दहा कुष्ठरोग्यांविषयी त्यांनी सांगितले; त्यांपैकी फक्त एकाने देवाची स्तुती केली आणि येशूचे आभार मानले. (लूक १७:११-१९) बंधूंनी म्हटले: “यामध्ये कोणतीही शंका नाही, की बरे झाल्यामुळे बाकीच्या नऊ कुष्ठरोग्यांना देखील खूप आनंद झाला होता. पण त्यांना याजकांकडे जाऊन शुद्ध होण्याची घाई लागली होती; आपण येशूचे आभार मानावे असा विचार त्यांच्या मनात देखील आला नाही.” आज आपण देखील सत्य शिकल्यामुळे आध्यात्मिकरित्या बरे झालो आहोत त्यासाठी आपण यहोवाचे आभार मानले पाहिजे. गिलियडच्या १०८ व्या वर्गाला सांगण्यात आले, की त्यांनी देवाच्या सर्व चांगल्या कामांवर मनन करावे. त्यामुळे त्यांना देवाचे आभार मानण्यास आणि निरंतर त्याची पवित्र सेवा करण्यास प्रेरणा मिळेल.—स्तोत्र ५०:१४, २३; ११६:१२, १७.
पवित्र सेवा कशी करावी—अनुभव आणि मुलाखती
कार्यक्रमाचा पुढील भाग आणखी एक गिलियड शिक्षक, मार्क नूमर यांनी सादर केला. यामध्ये विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणाच्या काळात प्रचारकार्य करताना त्यांना आलेले अनुभव सांगितले. गिलियड स्कूलमध्ये येण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी सुमारे १२ वर्षे पूर्ण-वेळेची सेवा केली होती. प्रशिक्षणाच्या दरम्यान त्यांनी वेगवेगळ्या लोकांसोबत बायबल अभ्यास सुरू केला. अशाप्रकारे त्यांनी शाबीत केले, की त्यांना ‘सर्वांना सर्व काही’ होता येते.—१ करिंथकर ९:२२.
विद्यार्थ्यांच्या अनुभवानंतर, चार्ल्स मॉलहन आणि विल्यम सॅम्युएलसन यांनी अशा बांधवांच्या मुलाखती घेतल्या ज्यांनी गिलियड स्कूलमधून प्रशिक्षण घेतले होते आणि जे आता बेथेलमध्ये सेवा करत आहेत किंवा सर्किट ओव्हरसियर आहेत. त्यांच्यापैकी एक बंधू होते, रॉबर्ट पेवी जे गिलियडच्या ५१ व्या वर्गाचे विद्यार्थी होते. या बंधूंनी फिलिप्पाईन्समध्ये सेवा केली होती. त्यांनी मुलाखतीच्या वेळी म्हटले: “कोणतीही समस्या सोडवण्यासाठी प्रत्येकाकडे कोणता ना कोणता उपाय असतो. प्रत्येक जण दुसऱ्यापेक्षा सरस सल्ला देतो. पण तुम्ही बायबलमधून देवाचा सल्ला घेतल्यास त्याची बरोबरी कोणालाच करता येणार नाही. बायबलमध्ये देण्यात आलेला सल्ला नेहमी बरोबर असतो.”
कार्यक्रमाच्या समाप्तीला, नियमन मंडळाचे सदस्य बंधू जॉन बार यांनी एक भाषण दिले. त्यांच्या भाषणाचा विषय होता, “यहोवाला आवडणारी पवित्र सेवा करा.” बंधूंनी सांगितले, यहोवा कशाप्रकारच्या उपासनेची अपेक्षा करतो हे सत्याचा शोध करणाऱ्या प्रत्येकाला आपण शिकवले पाहिजे. हीच ती पवित्र सेवा आहे जी यहोवाला आवडते. त्यानंतर त्यांनी मत्तय ४:१० च्या उल्लेख करून म्हटले: “आपल्याला केवळ यहोवाची उपासना करायची असल्यास कोणत्याही प्रकारच्या मूर्तिपूजेपासून आपण दूर असले पाहिजे, अर्थात आपण मूर्तिपूजा करता कामा नये. कोणत्याही गोष्टीचा लोभ, श्रीमंती किंवा दुसऱ्यांसोबत स्पर्धा करण्याची वृत्ती, वगैरे गोष्टी एक प्रकारची मूर्तिपूजाच आहे त्यामुळे अशा गोष्टी फार धोकेदायक आहेत. या बाबतीत सुरवातीपासूनच म्हणजे १९४० नंतर आपल्या मिशनरी भाऊबहिणींनी खूप चांगले उदाहरण मांडले आहे आणि ते खरोखरच स्तुतीस योग्य आहे! आम्हाला पूर्ण विश्वास आहे, की त्यांच्या उदाहरणाचे १०८ व्या वर्गाचे तुम्ही सर्वजण अनुकरण कराल. हे लक्षात ठेवा, की केवळ यहोवाला आपण पवित्र सेवा सादर केली पाहिजे.”
अशाप्रकारे कार्यक्रमाच्या अखेरीस सर्व मिशनऱ्यांना उत्तेजन देण्यात आले. त्यानंतर, विद्यार्थ्यांना संपूर्ण जगभरातून आलेल्या शुभेच्छा वाचून दाखवण्यात आल्या आणि त्यांना ग्रॅज्युएशनचे सर्टिफिकेट देण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या वतीने लिहिलेले एक पत्र वाचून दाखवण्यात आले; मिळालेल्या प्रशिक्षणाची कदर या पत्रातील शब्दाशब्दांतून व्यक्त होत होती. विद्यार्थ्यांना सांगण्यात आले, की यहोवाच्या सेवेत त्यांना मिळालेल्या जबाबदारीला त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडावे. या कार्यक्रमाकरता २५ देशांतून बंधुभगिनी आले होते. अखेरीस तेथे उपस्थित असलेल्या सर्वांनी गीत गायले आणि प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली.
[तळटीप]
^ परि. 2 हा कार्यक्रम मार्च ११, २००० रोजी पॅटरसन, न्यू यॉर्कच्या वॉच टावर एज्युकेशनल सेंटरमध्ये पार पडला.
[२३ पानांवरील चौकट]
वर्गाची आकडेवारी
विद्यार्थ्यांनी प्रतिनिधीत्व केलेले एकूण देश: १०
नेमलेले देश: १७
एकूण विद्यार्थी: ४६
सरासरी वय: ३४
सत्यात सरासरी वर्षे: १६
पूर्ण वेळेच्या सेवेत सरासरी वर्षे: १२
[२४ पानांवरील चित्र]
वॉच टावर बायबल स्कूल ऑफ गिलियडचा १०८ वा वर्ग
खालील यादीत, पुढून मागे याप्रकारे ओळींची संख्या देण्यात आली आहे आणि प्रत्येक ओळीत नावे डावीकडून उजवीकडे या क्रमाने देण्यात आलेली आहेत.
(१) अमॅडोरी, ई.; कूक, ओ.; बर्न, एम.; ली, ए. (२) न्यूसम, डी.; पेडर्टसॉली, ए.; बीग्रा, एच.; काटो, टी.; गेटवुड, डी. (३) ईड, डी.; ईड, जे.; वेल्स, एस.; जेमिसन, जे.; गोन्जाल्स, एम.; गोन्जाल्स, जे. (४) काटो, टी.; लोन, डी.; निकलॉस, वाइ.; प्राइस, एस.; फॉस्टर, पी.; ईबारा, जे. (५) अमॅडोरी, एम.; मॅर्न्निग, एम.; जेम्स, एम.; बोसट्रोम, ए.; गेटवुड, बी.; न्यूसम, डी. (६) फॉस्टर, बी.; जॅमिसन, आर.; हाइफिंगर, ए.; कोफल, सी.; कोफल, टी; बर्न, जी. (७) हाइफिंगर, के.; मॅर्न्निग, सी.; कूक, जे.; बोसट्रोम, जे.; लोन, ई.; पेडर्टसॉली, ए. (८) जेम्स, ए.; वेल्स, एल.; प्राइस, डी.; निकलॉस, ई.; ली, एम.; ईबारा, पी.; बीग्रा, वाइ.