व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुमच्यावर अधिकार दिलेल्यांना मान द्या

तुमच्यावर अधिकार दिलेल्यांना मान द्या

तुमच्यावर अधिकार दिलेल्यांना मान द्या

“सर्वांस मान द्या. बंधुवर्गावर प्रीति करा. देवाचे भय धरा. राजाचा मान राखा.”—१ पेत्र २:१७.

१, २. अधिकाराबद्दल आज लोकांचा दृष्टिकोन कसा आहे? आणि का?

“आ जकाल मुलांचंच राज्य आहे. मान देणं तर दूरच, आईवडिलांना कुणी विचारत देखील नाही,” असे एका आईने खेदाने म्हटले. एका मोटारीवर लावलेल्या स्टिकरवर लिहिले आहे, “हम किसीसे कम नही.” कोणाच्याही अधिकाराला न जुमानण्याच्या, किंबहुना आपल्यावर कोणाचा अधिकार आहे ही गोष्टच मान्य न करण्याच्या आजच्या सर्वसमान्य प्रवृत्तीची ही फक्‍त दोन उदाहरणे आहेत. तुम्हालाही याचा अनुभव आलाच असेल. सबंध जगात, आईवडिलांचा, शिक्षकांचा, वरिष्ठ अधिकाऱ्‍यांचा आणि सरकारी अधिकाऱ्‍यांचा अवमान करण्याची प्रवृत्ती वाढत चालली आहे.

‘आजकालचे अधिकारी मान देण्याच्या, आदर करण्याच्या लायकीचे तरी आहेत का?’ असा उलट प्रश्‍न करून काहीजण आपल्या वागणुकीचे समर्थन करतात. आणि काहीवेळा त्यांचे हे म्हणणे खरे देखील असते. कारण आजकाल सरकारी अधिकाऱ्‍यांच्या व वरिष्ठ अधिकाऱ्‍यांच्या भ्रष्टाचाराविषयी बरेच काही ऐकायला मिळत आहे. तसेच शाळाकॉलेजांतले शिक्षक देखील पूर्वीप्रमाणे प्रामाणिकपणे व समर्पितभावाने आपले काम करत नाहीत. कित्येक आईवडील स्वतःच आपल्या मुलांवर अत्याचार करतात. पण याउलट ख्रिस्ती मंडळीतील बंधुभगिनी त्यांच्यावर देखरेख करणाऱ्‍यांचा आदर करतात, त्यांचा मान राखतात ही किती आनंदाची गोष्ट आहे.—मत्तय २४:४५-४७.

३, ४. ख्रिस्ती असणाऱ्‍यांनी अधिकाऱ्‍यांना मान देणे का अगत्याचे आहे?

आपण ख्रिस्ती असल्यामुळे जगिक अधिकाऱ्‍यांच्या अधीन राहणे आपल्याकरता खासकरून “अगत्याचे आहे.” प्रेषित पौलाने ख्रिस्ती बांधवांना आज्ञा दिली की त्यांनी “वरिष्ठ अधिकाऱ्‍यांच्या अधीन असावे, कारण देवापासून नाही असा अधिकार नाही; जे अधिकार आहेत ते देवाने नेमलेले आहेत.” (रोमकर १३:१, २, ५; १ पेत्र २:१३-१५) कुटुंबातही अधिकाराला मान देणे का महत्त्वाचे आहे हे पौलाने स्पष्ट केले: “स्त्रियांनो, जसे प्रभूमध्ये उचित आहे त्याप्रमाणे तुम्ही आपआपल्या पतीच्या अधीन असा. मुलांनो, तुम्ही सर्व गोष्टींत आपल्या आईबापांची आज्ञा पाळा; हे प्रभूला संतोषकारक आहे.” (कलस्सैकर ३:१८, २०) मंडळीतल्या वडिलांनाही आपण मान दिलाच पाहिजे कारण ‘देवाच्या मंडळीचे पालन करावे म्हणून [त्यांना] पवित्र आत्म्याने अध्यक्ष करून ठेवले’ आहे. (प्रेषितांची कृत्ये २०:२८) अधिकारपदावर असलेल्या या सर्वांना आपण मान देतो तेव्हा आपण यहोवाचा आदर करतो. अर्थात, यहोवाचा अधिकार सर्वोच्च असल्यामुळे इतर कोणाहीपेक्षा आपण आधी त्याला मान दिला पाहिजे.—प्रेषितांची कृत्ये ५:२९.

आता आपण काही उदाहरणांचा विचार करू या. यांपैकी काहींनी अधिकार पदांवर असलेल्यांना मान दिला तर काहींनी त्यांचा अवमान केला.

अवमान केल्यामुळे शिक्षा मिळाली

५. मीखलने दाविदाचा कशाप्रकारे अनादर केला आणि यामुळे काय झाले?

यहोवाने ज्यांना अधिकार दिला आहे अशांचा अवमान करण्याविषयी त्याचा कसा दृष्टिकोन आहे हे दावीद राजाचा इतिहास वाचताना आपल्याला कळून येते. दाविदाने कराराचा कोश जेरुसलेममध्ये आणला तेव्हाची एक घटना लक्षात घ्या. दाविदाची पत्नी मीखल हिने “दावीद राजा परमेश्‍वरापुढे नाचतबागडत आहे हे पाहिले, तेव्हा तिच्या मनाला त्याचा वीट आला.” मीखलने खरे तर हे आठवणीत ठेवायला पाहिजे होते की दावीद हा केवळ कुटुंबाचाच प्रमुख नव्हे तर इस्राएल राष्ट्राचा राजा देखील होता. पण त्याच्या अधिकाराला लक्षात न घेता मीखलने त्याला टोमणा मारला: “एखादा हलकट मनुष्य उघडाबोडका होतो तसे आज इस्राएलाच्या महाराजांनी आपले दास व दासी ह्‍यांच्यासमोर आपले शरीर उघडे केले, तेव्हा इस्राएलाचे महाराज आज किती वैभवशाली दिसले!” दाविदाचा असा अनादर केल्यामुळे मीखलला शिक्षा मिळाली. ती अपत्यहीन राहिली.—२ शमुवेल ६:१४-२३.

६. यहोवाने नियुक्‍त केलेल्या पुरुषाचा अवमान करणाऱ्‍या कोरहविषयी यहोवाचा काय दृष्टिकोन होता?

देवाने नियुक्‍त केलेल्या व्यक्‍तीचा अनादर केल्यामुळे कोरहाला देखील भयंकर शिक्षा भोगावी लागली. लेवीय वंशातील कहाथ घराण्यातला असल्यामुळे त्याला निवासमंडपात यहोवाची सेवा करण्याचा विशेष बहुमान मिळाला होता. पण यात समाधान मानण्याऐवजी इस्राएल राष्ट्राचे नेतृत्त्व करण्यासाठी देवाने नियुक्‍त केलेल्या मोशेचे व अहरोनाचे तो दोष दाखवू लागला. इस्राएलच्या इतर सरदारांना आपल्या सोबत घेऊन, कोरहाने मगरूरपणे मोशेला व अहरोनाला म्हटले: “सबंध मंडळी पवित्र आहे तसेच प्रत्येक मनुष्य पवित्र आहे आणि परमेश्‍वर त्यांच्याठायी आहे; तर तुम्ही मग परमेश्‍वराच्या मंडळीवर वर्चस्व का गाजविता?” कोरहाचे व त्याच्या साथीदारांच्या या कृतीकडे यहोवा देवाने कोणत्या दृष्टिकोनातून पाहिले? यहोवाला त्याचा स्वतःचा अपमान झाल्यासारखा वाटला. कोरह व त्याला साथ देणाऱ्‍या २५० सरदारांच्या डोळ्यांदेखत त्यांच्या सर्व साथीदारांना पृथ्वीने तोंड उघडून गिळून टाकले. त्यानंतर कोरह व त्या २५० सरदारांना यहोवाने अग्नीने भस्म केले.—गणना १६:१-३, २८-३५.

७. ‘अतिश्रेष्ठ प्रेषितांनी’ प्रेषित पौलाची केलेली टीका रास्त होती का?

पहिल्या शतकातील ख्रिस्ती मंडळीतही काहीजण देवाने नियुक्‍त केलेल्या पुरुषांचा अवमान करत होते. करिंथकर मंडळीत अशाप्रकारचे काही ‘अतिश्रेष्ठ प्रेषित’ होते; ते पौलाला तुच्छ लेखायचे. त्याला धड भाषणही देता येत नाही असे म्हणून ते त्याची टीका करायचे. “त्याची पत्रे वजनदार व जोरदार आहेत; परंतु त्याची शरीरयष्टी दुर्बळ व त्याचे भाषण टाकाऊ आहे” असे ते त्याच्याविषयी म्हणायचे. (२ करिंथकर १०:१०; ११:५) पौलाची भाषणे कशीही असोत, पण एक प्रेषित असल्यामुळे तो निश्‍चितच आदरास पात्र होता. आणि खरे पाहता, त्याचे भाषण टाकाऊ होते असे म्हणणे योग्य होते का? बायबलमधील त्याची भाषणे वाचल्यावर असे मुळीच वाटत नाही. उलट त्याची ही भाषणे दाखवून देतात की तो अतिशय प्रभावशाली वक्‍ता होता. ‘यहूद्यांच्या वादविषयक बाबी ह्‍यात विशेष जाणता असणाऱ्‍या’ हेरोद अग्रिप्पाशी चर्चा करताना पौलाने काही वेळातच त्याला इतके प्रभावित केले की शेवटी तो म्हणाला: “मी ख्रिस्ती व्हावे म्हणून तू थोडक्यानेच माझे मन वळवितोस!” (प्रेषितांची कृत्ये १३:१५-४३; १७:२२-३४; २६:१-२८) पण तरीसुद्धा करिंथमधील अतिश्रेष्ठ प्रेषितांच्या मते त्याचे भाषण टाकाऊ होते! यहोवाने त्यांच्या या वृत्तीकडे कोणत्या दृष्टीने पाहिले? इफिस मंडळीत नेतृत्त्व करणाऱ्‍या बांधवांना दिलेल्या एका संदेशात, येशू ख्रिस्ताने त्यांची प्रशंसा केली कारण “जे प्रेषित नसताना आपण प्रेषित आहो असे म्हणतात,” अशांना त्यांनी साथ दिली नाही.—प्रकटीकरण २:२.

दोष दिसले तरीही मान द्या

८. यहोवाने शौलाला दिलेल्या अधिकाराविषयी दाविदाने कशाप्रकारे आदर दाखवला?

बायबलमध्ये अशा काही जणांविषयी सांगितले आहे, ज्यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केला व आपल्या अधिकाराखाली असणाऱ्‍या लोकांना विनाकारण वाईट वागणूक दिली; पण अशा अधिकाऱ्‍यांनाही मान देणाऱ्‍यांची कित्येक उदाहरणे बायबलमध्ये आढळतात. यांपैकी एक होता दावीद. तो, शौल राजाचा सेवक होता. पण दाविदाचे पराक्रम पाहून शौल जळफळू लागला आणि त्याने दाविदाला जिवानिशी मारण्याचा एकच ध्यास घेतला. (१ शमुवेल १८:८-१२; १९:९-११; २३:२६) दरम्यान, असे कित्येक प्रसंग आले जेव्हा दावीद सहज शौलाला ठार मारू शकत होता. पण त्याने म्हटले: “मी आपल्या स्वामीवर, परमेश्‍वराच्या अभिषिक्‍तावर, आपला हात टाकावा अशी गोष्ट परमेश्‍वर मजकडून न घडवो, कारण तो परमेश्‍वराचा अभिषिक्‍त आहे.” (१ शमुवेल २४:३-६; २६:७-१३) शौल दोषी आहे याबद्दल दाविदाला शंका नव्हती, पण तरीसुद्धा त्याचा न्याय करण्याचे काम त्याने यहोवावर सोपवले. (१ शमुवेल २४:१२, १५; २६:२२-२४) तो कधीही स्वतः शौलाशी किंवा शौलाबद्दल इतरांशी अपमानास्पद रितीने बोलला नाही.

९. (अ) शौलाने दाविदाला गैरवागणूक दिली तेव्हा त्याला कसे वाटले? (ब) दाविदाने शौलाविषयी दाखवलेला आदर फक्‍त वरवरचा नव्हता हे आपण कसे म्हणू शकतो?

दाविदाला गैरवागणूक दिली जात असताना त्याला वाईट वाटले नसेल का? अर्थातच. व्याकूळ होऊन त्याने यहोवाला म्हटले: “दांडगे लोक माझा जीव घेऊ पाहतात.” (स्तोत्र ५४:३) “हे माझ्या देवा, माझ्या वैऱ्‍यांपासून मला सोडीव. जे माझ्यावर उठतात त्यांच्यापासून मला वाचीव. . . . पाहा, ते माझा जीव घ्यावयाला टपले आहेत; हे परमेश्‍वरा, माझा अपराध किंवा दोष नसता दांडगे लोक माझ्याविरुद्ध एकत्र जमले आहेत. माझा दोष नसता ते धावून सज्ज होत आहेत. मला साहाय्य करावे म्हणून तू जागा होऊन पाहा.” (स्तोत्र ५९:१-४) तुम्हालाही कधीकधी असे वाटते का? अधिकारपदावर असलेली एखादी व्यक्‍ती, तुम्ही तिचे काहीही नुकसान केलेले नसताना उगाचच तुम्हाला वाईट वागणूक देते असे तुम्हाला वाटते का? पण आठवणीत असू द्या, दावीद शेवटपर्यंत शौलाला मान देतच राहिला. शौलाचा मृत्यू झाला तेव्हा आनंदी होण्याऐवजी, दाविदाने एक शोकगीत रचून आपले दुःख व्यक्‍त केले: “शौल व योनाथान प्रेमळ व मनमिळाऊ असत; . . . ते गरुडाहून वेगवान व सिंहाहून बलवान होते. इस्राएली कन्यांनो, शौलासाठी रुदन करा.” (२ शमुवेल १:२३, २४) शौलाने कारण नसताना दाविदाला इतके छळले तरीसुद्धा, तो यहोवाचा नियुक्‍त पुरूष आहे हे लक्षात ठेवून दाविदाने त्याला मनापासून आदर दिला. दाविदाचे उदाहरण खरोखर अनुकरण करण्याजोगे आहे.

१०. नियमन मंडळाला यहोवाने सोपवलेल्या अधिकाराला पौलाने कशाप्रकारे मान दिला आणि यामुळे काय झाले?

१० प्रेषितांच्या काळातही, देवाने नियुक्‍त केलेल्यांचा आदर करणाऱ्‍यांची उत्तम उदाहरणे आपल्यापुढे आहेत. पौलाचेच उदाहरण घ्या. ख्रिस्ती मंडळीचे नेतृत्व करणाऱ्‍या पहिल्या शतकातील नियमन मंडळाच्या निर्णयांना पौलाने नेहमी सहकार्य दिले. पौलाने जेरुसलेमला शेवटच्या वेळी भेट दिली तेव्हा नियमन मंडळाकडून त्याला अशी सूचना देण्यात आली, की मोशेच्या नियमशास्त्राला त्याचा विरोध नाही हे दाखवण्याकरता त्याने मंदिरात जाऊन शुद्ध व्हावे. या प्रसंगी पौलाला असे म्हणता आले असते: ‘माझ्या जिवाला धोका होता तेव्हा यांनीच मला जेरूसलेम सोडून जाण्याचा सल्ला दिला होता. आता मोशेच्या नियमशास्त्राला माझा विरोध नाही हे शाबीत करण्याकरता मला मंदिरात जायला सांगताहेत. गलतीकरांना लिहिलेल्या पत्रात मी त्यांना नियमशास्त्राला धरून न राहण्याचा सल्ला दिला. आणि आता मी स्वतःच मंदिरात गेलो तर लोक माझ्याविषयी काय म्हणतील? मी सुंता झालेल्यांच्या दबावाखाली आलो असेच त्यांना वाटणार नाही का?’ पौलाने असा काहीही विचार केला नाही. नियमन मंडळाच्या बांधवांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे वागल्यामुळे कोणत्याही ख्रिस्ती तत्त्वाचे उल्लंघन होणार नव्हते, त्यामुळे पौल त्यांच्या सल्ल्याप्रमाणे वागला. तो मंदिरात गेला तेव्हा यहुद्यांच्या एका मोठ्या जमावाने त्याच्यावर हल्ला केला; शिपायांनी त्याला कसेबसे वाचवले, पण त्याला दोन वर्षे तुरुंगात राहावे लागले. कालांतराने सर्वकाही देवाच्या इच्छेप्रमाणे घडले. पौलाला कैसरिया येथील वरिष्ठ अधिकाऱ्‍यांना साक्ष देण्याची संधी मिळाली आणि नंतर सरकारी खर्चाने त्याला रोमला नेण्यात आले. तेथे त्याला खुद्द कैसरापुढे साक्ष देता आली.—प्रेषितांची कृत्ये ९:२६-३०; २१:२०-२६; २३:११; २४:२७; गलतीकर २:१२; ४:९, १०.

तुम्ही मान देता का?

११. जगिक अधिकाऱ्‍यांना आपण कशाप्रकारे मान देऊ शकतो?

११ तुम्ही अधिकाऱ्‍यांना मान देता का? ख्रिश्‍चनांना आज्ञा देण्यात आली आहे, की “ज्याला जे द्यावयाचे ते त्याला द्या; . . . ज्याचा सन्मान करावयाचा त्याचा सन्मान करा.” “वरिष्ठ अधिकाऱ्‍यांच्या” अधीन राहणे म्हणजे केवळ कर देणे एवढेच नाही. तर आपल्या वागण्याबोलण्यातूनही आपण अधिकाऱ्‍यांना मान देतो हे दिसून आले पाहिजे. (रोमकर १३:१-७) काही सरकारी अधिकारी कदाचित आपल्याशी कठोरपणे वागत असतील. अशावेळी आपण काय करावे? मेक्सिकोच्या एका गावात, यहोवाच्या साक्षीदारांनी विशिष्ट धार्मिक उत्सवांत भाग न घेतल्यामुळे अधिकाऱ्‍यांनी साक्षीदारांच्या ५७ कुटुंबांच्या मालकीच्या जागा हडप केल्या. हे प्रकरण मिटवण्यासाठी बऱ्‍याच बैठकी बोलावण्यात आल्या. प्रत्येक वेळी साक्षीदार अगदी नीटनेटका पेहराव करून यायचे व अतिशय आदराने अधिकाऱ्‍यांशी बोलायचे. एका वर्षानंतर निकाल साक्षीदारांच्या बाजूने लागला. त्यांच्या वागणुकीचा काही लोकांवर इतका चांगला परिणाम झाला की त्यांनी यहोवाचे साक्षीदार होण्याची इच्छा व्यक्‍त केली!

१२. पती सत्यात नसला तरीसुद्धा पत्नीने त्याला ‘आदर’ देणे का महत्त्वाचे आहे?

१२ कुटुंबात, देवाने ज्यांना अधिकार दिला आहे त्यांचा तुम्ही कसा सन्मान करू शकता? येशूने सहन केलेल्या दुःखाविषयी सांगितल्यानंतर प्रेषित पेत्राने पुढे म्हटले: “तसेच, स्त्रियांनो, तुम्हीहि आपआपल्या पतीच्या अधीन असा; ह्‍यासाठी की, कोणी वचनाला अमान्य असले, तरी तुमचे भीडस्तपणाचे निर्मल वर्तन पाहून ते वचनावाचून आपल्या स्त्रियांच्या वर्तनाने मिळवून घेतले जावे.” (१ पेत्र ३:१, २; इफिसकर ५:२२-२४) पत्नीला आपल्या पतीला आदर द्यावासा वाटेल अशी काही पतींची वागणूक नसते, हे कबूल आहे. पण तरीसुद्धा पत्नीने आपल्या पतीशी आदराने वागले पाहिजे यावर पेत्राने जोर दिला. त्याला आदर दाखवल्यामुळे ती सत्यात नसलेल्या तिच्या पतीचे मन जिंकू शकते.

१३. पत्नी आपल्या पतीला कशाप्रकारे मान देऊ शकते?

१३ पत्नींना अधीन राहण्याचा सल्ला दिल्यानंतर पेत्र याच संदर्भात साराच्या उदाहरणाकडे आपले लक्ष वेधतो. साराचा पती अब्राहाम हा यहोवाचा अतिशय विश्‍वासू सेवक होता. (रोमकर ४:१६, १७; गलतीकर ३:६-९; १ पेत्र ३:६) सत्यात नसणाऱ्‍या पतींचा आदर करणे जर आवश्‍यक आहे तर मग विश्‍वास ठेवणाऱ्‍या पतींचा आदर करणे अधिकच महत्त्वाचे नाही का? पण समजा पत्नी एखाद्या गोष्टीत पतीशी सहमत नसेल तर तिने काय करावे? येशूने दिलेला एक सल्ला अशावेळी उपयोगात आणता येईल: “जो कोणी तुला वेठीस धरून एक कोस नेईल त्याच्याबरोबर दोन कोस जा.” (मत्तय ५:४१) तुम्ही आपल्या पतीच्या इच्छेला मान देऊन त्याला आदर दाखवता का? तुम्हाला हे खूप कठीण जात असेल, तर पतीजवळ आपल्या भावना व्यक्‍त करा. मला काय वाटते हे तो समजून घेईल किंवा त्याला माहीत आहे असे कधीही गृहीत धरू नका. अर्थात, आपल्या भावना व्यक्‍त करताना आदराने बोला. बायबल आपल्याला सांगते, की “तुमचे बोलणे सर्वादा कृपायुक्‍त, मिठाने रूचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसकसे उत्तर द्यावयाचे ते तुम्ही समजावे.”—कलस्सैकर ४:६.

१४. आईवडिलांना मुले कशाप्रकारे मान देऊ शकतात?

१४ मुलांनो, तुमच्याविषयी काय? त्यांना बायबलमध्ये अशी आज्ञा देण्यात आली आहे: “मुलांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आई-बापांच्या आज्ञेत राहा, कारण हे योग्य आहे. ‘आपला बाप व आपली आई ह्‍यांचा मान राख, ह्‍यासाठी की, तुझे कल्याण व्हावे व तू पृथ्वीवर दीर्घायु असावे.’ अभिवचन असलेली हीच पहिली आज्ञा आहे.” (इफिसकर ६:१-३) या वचनात सांगितल्याप्रमाणे मुलांना त्यांच्या आईवडिलांचा मान राखायचा असेल, तर त्यांना त्यांच्या आज्ञा पाळल्या पाहिजे. याठिकाणी “मान राख” असे भाषांतर केलेल्या मूळ ग्रीक शब्दाचा अर्थ, “बहुमोल लेखणे” किंवा “मोल ठरवणे” असा होतो. त्याअर्थी, तुम्हाला अनावश्‍यक वाटणाऱ्‍या नियमांचे केवळ आईवडील म्हणतात म्हणून कुरकूर करत पालन करणे म्हणजे आज्ञेत राहणे नव्हे. आईवडिलांबद्दल तुमच्या मनात आदर असावा, त्यांच्या मार्गदर्शनाला तुम्ही बहुमोल लेखावे अशी यहोवाची इच्छा आहे.—नीतिसूत्रे १५:५.

१५. आईवडिलांचे म्हणणे बरोबर नाही असे वाटत असले तरीसुद्धा मुले त्यांचा आदर कसा करू शकतात?

१५ आईवडिलांच्या एखाद्या कृतीमुळे तुम्हाला त्यांच्याविषयी वाटणारा आदर कमी झाल्यास तुम्ही काय करावे? ती बाब त्यांच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करा. त्यांनी तुम्हाला ‘जन्म दिला’ आहे, तुम्हाला लहानाचे मोठे केले आहे. (नीतिसूत्रे २३:२२) शिवाय, ते जे काही करतात ते तुमच्यावर प्रेम असल्यामुळेच करतात, नाही का? (इब्री लोकांस १२:७-११) तेव्हा, आपल्या आईवडिलांशी नेहमी आदराने बोला, तुम्हाला जे काही वाटते ते त्यांना नम्रपणे सांगा. तुमच्या अपेक्षेनुसार त्यांची प्रतिक्रिया नसली तरीसुद्धा, त्यांचा अपमान करू नका. (नीतिसूत्रे २४:२९) शौलाने देवाच्या मार्गदर्शनाचे उल्लंघन केल्यावरही दावीद कशाप्रकारे शौलाला मान देत राहिला हे तुम्हाला आठवते ना? तुमच्या भावना दुखावल्या गेल्यास यहोवाला प्रार्थना करा. दाविदाने म्हटल्यानुसार, “त्याच्यापुढे आपले मन मोकळे करा; देव आमचा आश्रय आहे.”—स्तोत्र ६२:८; विलापगीत ३:२५-२७.

मंडळीचे नेतृत्त्व करणाऱ्‍यांना मान द्या

१६. खोट्या शिक्षकांच्या व देवदूतांच्या उदाहरणांवरून आपण काय शिकू शकतो?

१६ मंडळीतील वडिलांना पवित्र आत्म्याने नियुक्‍त केले आहे. अर्थात ते वडील असते तरी अपरिपूर्ण आहेत त्यामुळे त्यांच्याकडून चुका होणे साहजिक आहे. (स्तोत्र १३०:३; उपदेशक ७:२०; प्रेषितांची कृत्ये २०:२८; याकोब ३:२) त्यामुळे मंडळीत काहींना वडिलांविरुद्ध तक्रार असू शकते. मंडळीत काही गोष्टी व्यवस्थितपणे केल्या जात नाहीत असे आपल्याला वाटत असेल तर आपण काय करावे? अशा प्रकारच्या परिस्थितीत पहिल्या शतकातील खोट्या शिक्षकांनी काय केले आणि त्याच्याच उलट देवदूतांनी कशी मनोवृत्ती बाळगली याकडे लक्ष द्या: “ते [खोटे शिक्षक] उद्धट, स्वच्छंदी, थोरांची निंदा करण्यास न भिणारे, असे आहेत. बळाने व सामर्थ्याने अधिक मोठे असलेले देवदूतहि प्रभूसमोर [“यहोवाबद्दल आदर असल्यामुळे,” NW] त्यांची निंदा करून त्यास दोषी ठरवीत नाहीत.” (२ पेत्र २:१०-१३) खोटे शिक्षक “थोरांची” म्हणजेच पहिल्या शतकातील ख्रिस्ती मंडळीत अधिकार सोपवलेल्या वडिलांची निंदा करत होते. पण देवदूतांनी मात्र ख्रिस्ती बांधवांत फूट पाडणाऱ्‍या या खोट्या शिक्षकांना कधी दोषी ठरवले नाही. मानवांपेक्षा श्रेष्ठ असलेल्या देवदूतांना निश्‍चितच मानवांपेक्षा चांगल्यावाईटाची जास्त समज आहे; त्यामुळे पहिल्या शतकातील मंडळीत काय घडत होते याची त्यांना पूर्ण जाणीव होती. तरीसुद्धा “यहोवाबद्दल आदर असल्यामुळे” त्यांनी चांगल्यावाईटाचा न्याय देवाच्या हाती सोपवून दिला.—इब्री लोकांस २:६, ७; यहुदा ९.

१७. वडिलांनी योग्य निर्णय दिला नाही असे तुम्हाला वाटते तेव्हा तुम्ही आपला विश्‍वास कसा दाखवू शकता?

१७ मंडळीत कदाचित एखादी गोष्ट योग्यप्रकारे केली जात नसेल; पण ख्रिस्ती मंडळीचे जिवंत मस्तक असलेल्या येशू ख्रिस्तावर आपला पूर्ण विश्‍वास असायला नको का? त्याच्या जगभरातील मंडळ्यांमध्ये काय चालले आहे याची त्याला कल्पना नसेल का? तेव्हा, त्याला योग्य वाटेल त्या पद्धतीने तो जरूर ही समस्या सोडवेल आणि सर्व गोष्टींवर नियंत्रण करण्यास तो समर्थ आहे हे आपण ओळखू नये का? आणि खरे पाहता, ‘आपल्या शेजाऱ्‍यास दोषी ठरविणारे आपण कोण?’ (याकोब ४:१२; १ करिंथकर ११:३; कलस्सैकर १:१८) ज्या गोष्टींबद्दल आपल्याला काळजी वाटते, त्यांविषयी यहोवाजवळ आपल्या भावना व्यक्‍त करणे जास्त चांगले ठरणार नाही का?

१८, १९. वडिलांकडून चूक झाली आहे असे वाटल्यास तुम्ही काय करू शकता?

१८ मनुष्याच्या अपरिपूर्ण स्वभावामुळे समस्या निर्माण होणे साहजिक आहे. कधीकधी वडिलांकडूनही चुका होतील; हे पाहून काही लोकांना कदाचित धक्का बसेल. पण अशा परिस्थितीत, अविचारीपणे किंवा उतावीळपणे वागल्याने समस्या खरोखरच सुटेल का? उलट समस्या आणखीनच बिकट होईल. पण यहोवा योग्य न्याय करेल आणि ज्यांना जी शिक्षा मिळाली पाहिजे ती तो त्याच्या नियुक्‍त वेळी आणि त्याला योग्य वाटेल त्या पद्धतीने अवश्‍य देईल. आणि हे जाणणारे आध्यात्मिक प्रवृत्तीचे लोक सर्वकाही यहोवावर सोपवतील.—२ तीमथ्य ३:१६; इब्री लोकांस १२:७-११.

१९ एखाद्या गोष्टीमुळे तुमच्या भावना दुखावल्यास तुम्ही काय करू शकता? मंडळीतल्या इतरांना याविषयी सांगण्याऐवजी आदरपूर्वक वडिलांकडे मदत मागण्यास काय हरकत आहे? वडिलांजवळ इतरांची टीका करू नका पण तुमच्या भावना कशा दुखावल्या गेल्या हे त्यांना सांगा. त्यांच्याही भावनांचा विचार करा, आणि त्यांच्याजवळ आपल्या मनातले बोलताना त्यांच्यावर पूर्ण विश्‍वास ठेवा. (१ पेत्र ३:८) उपरोधक स्वरात त्यांच्याशी बोलू नका; त्यांच्या अनुभवावर विश्‍वास ठेवा. बायबलमधून ते तुम्हाला जो काही सल्ला देतील त्याविषयी त्यांचे आभार माना. ती विशिष्ट समस्या सोडवण्याकरता आणखी पावले उचलणे आवश्‍यक आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, यहोवावर पूर्ण भरवसा ठेवा; तो वडिलांना चांगला आणि योग्य निर्णय घेण्यास मदत करेल याची खात्री बाळगा.—गलतीकर ६:१०; २ थेस्सलनीकाकर ३:१३.

२०. पुढच्या लेखात आपण काय पाहणार आहोत?

२० अधिकार पदी असणाऱ्‍यांना मान देण्याच्या संदर्भात आणखी एक विषय लक्ष देण्याजोगा आहे. ज्यांच्या हातात अधिकार आहे अशांनी आपल्या हाताखाली काम करणाऱ्‍यांना आदर देऊ नये का? हे आपण पुढच्या लेखात पाहू.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• अधिकाऱ्‍यांना मान देणे अगत्याचे का आहे?

• देवाने नेमलेल्या अधिकाराबद्दल आदर न दाखवणाऱ्‍यांविषयी यहोवाचा आणि येशूचा कसा दृष्टिकोन आहे?

• अधिकाराला मान देणाऱ्‍यांपैकी कोणाची उत्तम उदाहरणे आपल्यापुढे आहेत?

• आपल्यावरती अधिकार असणाऱ्‍यांकडून चूक झाली असे वाटत असल्यास आपण काय करावे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१२ पानांवरील चित्र]

सारा आपल्या पतीचा, अब्राहामाचा मनापासून आदर करत होती आणि ती आनंदी होती

[१३ पानांवरील चित्र]

दावीद मीखलचा पती व संपूर्ण इस्राएल राष्ट्राचा राजा होता तरी देखील तिने त्याला मान दिला नाही

[१५ पानांवरील चित्र]

“मी आपल्या स्वामीवर, परमेश्‍वराच्या अभिषिक्‍तावर, आपला हात टाकावा अशी गोष्ट परमेश्‍वर मजकडून न घडवो!”

[१६ पानांवरील चित्र]

यहोवाजवळ आपल्या भावना व्यक्‍त करणे जास्त चांगले ठरणार नाही का?