तुम्ही इतरांकडून परिपूर्णतेची अपेक्षा करता का?
तुम्ही इतरांकडून परिपूर्णतेची अपेक्षा करता का?
तुम्हाला एखादे काम दिले जाते तेव्हा तुम्ही अगदी जीव ओतून ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करता का? असे केल्यामुळे तुम्हाला आणि इतरांनाही तुमच्या कामाचा फायदा होईल. पण जगात असेही काही लोक आहेत ज्यांना वाटते, की आपण जे काही करू ते अगदी परिपूर्ण असावे; आपल्या कामात कोणतीही खोट नसावी. ही मनोवृत्ती बरोबर आहे का?
“पूर्णतावाद” (अर्थात, प्रत्येक कामात परिपूर्णतेची अपेक्षा करणे) याचा एक अर्थ म्हणजे, “परिपूर्ण नसलेली कोणतीही गोष्ट न स्वीकारण्याची मनोवृत्ती.” वरील परिच्छेदात वर्णन केलेले लोक कदाचित तुम्हीही पाहिले असतील. इतरांकडून परिपूर्णतेची अपेक्षा केल्यामुळे कोणाचेच भले होत नाही. उलट, त्यामुळे असमाधान आणि निराशाच पदरी पडते. म्हणून समतोल बाळगणाऱ्या लोकांना अशाप्रकारचा अवाजवीपणा आवडत नाही व ते इतरांकडून परिपूर्णतेची अपेक्षा करीत नाहीत. त्यामुळे, इतरांकडून परिपूर्णतेची अपेक्षा बाळगणाऱ्या लोकांनी आपली मनोवृत्ती बदलली पाहिजे. पण सर्वात मोठी समस्या म्हणजे, आपण स्वतः इतरांकडून परिपूर्णतेची अपेक्षा करतो तेव्हा आपल्याला ते सहजासहजी जाणवत नाही.
नेल्सनचे उदाहरण घ्या. तो एका कंपनीत कामाला आहे. कोणत्या कंपनीच्या प्रोडक्टला बाजारात जास्त मागणी आहे यावर त्याचे सतत लक्ष असते आणि म्हणून तो प्रोडक्शनला जास्त महत्त्व देतो. कडी स्पर्धा असलेल्या मार्केटिंगच्या विश्वात यशस्वी होण्यासाठी परिपूर्णतेची अपेक्षा करणे हे अत्यंत गरजेचे मानले जाते. नेल्सनही अशाचप्रकारे परिपूर्णतेची अपेक्षा करतो. लोक त्याची खूप प्रशंसाही करतात. पण यामुळे त्याला सतत डोकेदुखी आणि मानसिक ताण सहन करावा लागतो. तुमची मनोवृत्ती देखील नेल्सनप्रमाणेच आहे का?
अशी मनोवृत्ती फक्त मोठ्यांमध्येच नव्हे तर लहान मुलांमध्येही पाहायला मिळते. रीउ दे झानेइरुमधील रिटाला शाळेची, अभ्यासाची खूप आवड होती. ती नेहमी जास्त मार्क मिळवण्याचा प्रयत्न करायची. कधी कमी मार्क मिळाले तर तिला खूप वाईट वाटायचे. पण ती कोणाला दाखवून देत नसे. ती म्हणते: “लहानपणी इतरांच्या तुलनेत मलाच नेहमी सतत टेन्शन असायचं. बाकी सर्वांजवळ भरपूर वेळ असायचा. माझ्याकडे नेहमीच इतकं काम असायचं की सवड मिळतच नव्हती.”
मारिया पण काहीशी अशीच होती. तिचे चित्र दुसऱ्यासारखे
सुंदर नाही हे पाहिल्यावर तिला रडू आवरत नसे. पुढे, संगीत शिकतानासुद्धा, आपल्याला इतरांसारखे चांगले गाता येत नाही किंवा वाजवता येत नाही, या विचाराने ती वेडीपिसी व्हायची. संगीतामुळे आनंदी होण्याऐवजी ती दुःखी व्हायची. ब्राझीलमधील आणखी एका मुलीचे उदाहरण घ्या. तिचे नाव आहे तान्या. ती इतरांबरोबर स्वतःची तुलना करायची नाही खरी पण स्वतःच कबूल करते की प्रत्येक कामात (मग ते शाळेतले असो किंवा घरातले) काहीच खोट नसावी अशी अपेक्षा करायची. तिला वाटायचे की आपले काम परफेक्ट नसेल तर लोक आपल्याला पसंत करणार नाहीत. तान्याच्या देखील इतरांकडून खूप अपेक्षा होत्या. यामुळे तिच्या मनासारखे जेव्हा व्हायचे नाही तेव्हा ती खूप निराश आणि दुःखी व्हायची.मेहनत करणे, आपल्या कामात निपुण होणे व याद्वारे समाधानी होणे हे महत्त्वाचे असले तरी, आपल्याला साध्य करता येणार नाहीत अशी ध्येये ठेवणे चुकीचे आहे. आणि आपले काम कधीच चांगले होणार नाही अशी नेहमीच भीती मनात बाळगली तर आपण स्वतःकडून अशीच अवाजवी अपेक्षा करत राहू. कधीकधी पालक त्यांच्या मुलांकडून शाळेच्या बाबतीत म्हणा किंवा खेळाच्या बाबतीत म्हणा फारच जास्त अपेक्षा करतात. रिकार्डूच्या आईची गोष्ट पाहा. तिला वाटत होते की आपल्या मुलाने डॉक्टर व्हावे, त्याला पियानो वाजवता यावा आणि वेगवेगळ्या भाषा बोलता याव्यात. पालक आपल्या मुलांपुढे, त्यांच्या क्षमतेपलीकडे असणारी मोठमोठी ध्येये ठेवतात तेव्हा मुले पालकांच्या अशा अपेक्षा पूर्ण करू शकत नाहीत. यामुळे आनंदाऐवजी निराशाच त्यांच्या पदरी पडते.
अशी मनोवृत्ती का बाळगू नये?
आजच्या जगात प्रत्येक काम अव्वल दर्जाचे असावे अशी अपेक्षा केली जाते. त्यामुळे जॉब मार्केटमध्ये सतत स्पर्धा चाललेली असते. आणि पुष्कळ लोकांना नोकरी जाण्याची भीती असल्यामुळे ते होता होईल तितक्या परिश्रमाने काम करण्याचा प्रयत्न करतात. एखादा खेळाडू जसा पूर्वीचे रेकॉर्ड तोडण्यासाठी खूप मेहनत करतो आणि तरीही यश मिळाले नाही तर औषधे घेऊन आपली कार्यक्षमता वाढवण्याचा प्रयत्न करतो आणि जिंकण्याची आशा करतो तसेच काही कामगारसुद्धा प्रमाणापेक्षा जास्त त्याग करतात. अशा लोकांना आपली कामगिरी चांगली असावी असे फक्त वाटत नसते तर त्यांना “अपयशी होण्याची भीती” असते किंवा मग “नंबरवन होण्याचे खूळ त्यांच्या डोक्यात बसलेले असते.”—द फीलींग गुड हॅन्डबुक.
कला आणि क्रिडा या क्षेत्रांत निरंतर प्रगती करायला पुष्कळ वाव आहे, असे काहींना वाटते. पण डॉ. रॉबर्ट एस. एलियॉट यांचे म्हणणे आहे, की “परिपूर्णतेची अपेक्षा करणे ही अवाक्याबाहेरील अपेक्षा असून ती केव्हाही पूर्ण करता येत नाही. अशी अपेक्षा करणाऱ्या लोकांच्या मनात नेहमी दोषी भावना असते, ते नेहमी इतरांच्या पुढे असण्याचा प्रयत्न करतात आणि लोक आपली थट्टा करतील ही भीती त्यांना सारखी सतावत असते.” म्हणूनच, सुज्ञ राजा शलमोनाचे शब्द किती खरे आहेत: “मी सर्व उद्योग व कारागिरी ही पाहिली; ही सर्व चढाओढीमुळे होतात. हाहि व्यर्थ व वायफळ उद्योग होय.”—उपदेशक ४:४.
लोकांकडून परिपूर्णतेची अपेक्षा करण्याची तुमचीही वृत्ती असल्यास तुम्ही काय करू शकता? एखादे काम जितके जीव ओतून केले तितकीच निराशा पदरी पडत असते हे खरे आहे का? अवाजवी अपेक्षा न बाळगता तुम्हाला थोडीशी सूट देता येईल का? परिपूर्ण असण्याचा काय अर्थ होतो? अगदीच परिपूर्णतेची अपेक्षा नाही पण आपल्या क्षमतेचा पूर्णपणे उपयोग करावासा तुम्हाला वाटत नाही का? जर अपरिपूर्ण मानव इतरांच्या भल्यासाठी देवाने दिलेल्या आपल्या क्षमतांचा उपयोग करू शकतो, तर परिपूर्ण परिस्थितीत व देवाच्या मार्गदर्शनाखाली परिपूर्ण मानव काय काय साध्य करू शकेल याची कल्पना करा!
[४ पानांवरील चित्र]
पालक किंवा इतर लोक तरुणांकडून त्यांच्या क्षमतेपलीकडे असलेल्या गोष्टींची अपेक्षा करतील