“तुम्ही सर्व भाऊभाऊ आहा”
“तुम्ही सर्व भाऊभाऊ आहा”
“आपणास गुरुजी म्हणवून घेऊ नका; कारण तुमचा गुरु एक आहे व तुम्ही सर्व भाऊभाऊ आहा.”—मत्तय २३:८.
१. आपण कोणत्या प्रश्नावर चर्चा करणार आहोत?
पौर्वात्य देशातल्या एका बहिणीने ऑस्ट्रेलियाहून आलेल्या एका मिशनरी बहिणीला सहज विचारले: “कोणाला जास्त आदर दिला पाहिजे, मिशनऱ्यांना की बेथेलमध्ये राहणाऱ्यांना?” तिला खरोखर जाणून घ्यायचे होते, की यहोवाच्या साक्षीदारांनी कोणाला जास्त मान द्यावा, परदेशातून आलेल्या मिशनरी बांधवांना की वॉचटावर संस्थेच्या शाखा दफ्तरात सेवा करणाऱ्या बांधवांना? हा प्रश्न या बहिणीच्या मनात येणे साहजिक होते कारण त्यांच्या संस्कृतीत पदवी, दर्जा, प्रतिष्ठा या गोष्टींना खूप महत्त्व दिले जाते. पण त्या मिशनरी बहिणीला मात्र तिचा हा प्रश्न ऐकून धक्काच बसला. दोन व्यक्तींपैकी कोण मोठा आहे हा प्रश्न मुळात का विचारला जातो? तर त्या दोघांपैकी कोणाजवळ जास्त अधिकार आहे, समाजात कोणाचे जास्त वजन आहे हे जाणून घेण्यासाठी. या बाबतीत आपण कोणता दृष्टिकोन राखला पाहिजे?
२. आपल्या बांधवांना आपण कोणत्या दृष्टीने पाहिले पाहिजे?
२ मोठेपणाचा हा प्रश्न नवीन नाही. येशूच्या शिष्यांतही याविषयी सतत वाद होत असे. (मत्तय २०:२०-२४; मार्क ९:३३-३७; लूक २२:२४-२७) त्यांच्या संस्कृतीत, म्हणजेच पहिल्या शतकातील यहुदी संस्कृतीत सामाजिक प्रतिष्ठेला खूप महत्त्व दिले जायचे. येशूला त्या विशिष्ट संस्कृतीच्या लोकांची विचारसरणी माहीत होती आणि म्हणूनच त्याने त्याच्या शिष्यांना असा सल्ला दिला: “आपणास गुरुजी म्हणवून घेऊ नका; कारण तुमचा गुरु एक आहे व तुम्ही सर्व भाऊभाऊ आहा.” (मत्तय २३:८) त्याकाळी “गुरूजी” म्हणजेच “रब्बी.” ही एक धार्मिक पदवी होती. बायबल विद्वान ॲल्बर्ट बार्न्स म्हणतात: ‘ही पदवी ज्यांना दिली जायची ते इतरांसमोर तोरा मिरवायचे. आपण कोणीतरी आहोत अशा रूबाबात ते वावरायचे. साहजिकच इतरांना त्यांचा हेवा वाटायचा; ते मोठे लोक, आपण त्यांच्यापुढे काहीच नाही असे त्यांना वाटायचे. ही प्रवृत्ती व हे विचार, ख्रिस्ताच्या नम्र प्रवृत्तीच्या अगदीच विरोधात होते.’ अर्थात यहोवाचे साक्षीदार मंडळीतल्या ओव्हरसियर्सना कधीही “एल्डर अमुक-अमुक” असे म्हणून संबोधत नाहीत. “एल्डर” (वडील) ही काही मानाची पदवी नाही. (ईयोब ३२:२१, २२) उलट, येशूच्या सल्ल्यानुसार वागणारे वडील स्वतःच मंडळीतल्या इतरांचा आदर करतात. यहोवा देव देखील त्याच्या विश्वासू उपासकांचा आदर करतो. तसेच, येशूनेही त्याच्या निष्ठावान शिष्यांना मान दिला.
यहोवा व येशू यांचा आदर्श
३. यहोवाने आपल्या आत्मिक प्राण्यांना कशाप्रकारे मान दिला?
३ यहोवा देव “सर्व पृथ्वीवर परात्पर” असूनही अगदी सुरवातीपासूनच त्याने स्वर्गातील त्याच्या निर्मितीला मान दिला. (स्तोत्र ८३:१८) पहिल्या मनुष्याला निर्माण करताना यहोवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राचा “कुशल कारागीर” म्हणून उपयोग करून घेतला. निर्मितीच्या कार्यात त्याला सामील करून यहोवाने त्याला मान दिला. (नीतिसूत्रे ८:२७-३०; उत्पत्ति १:२६) स्वर्गदूतांना त्यांचे मत व्यक्त करण्याची संधी देण्याद्वारे यहोवाने त्यांनाही मान दिला. त्याने आहाब या दुष्ट राजाचा नाश करण्याचे ठरवले तेव्हा हे कार्य कसे पार पाडावे याबद्दल त्याने स्वर्गदूतांना विचारले.—१ राजे २२:१९-२३.
४, ५. यहोवा मनुष्यांना कशाप्रकारे मान देतो?
४ यहोवा सबंध विश्वात सर्वात शक्तिशाली व श्रेष्ठ आहे. (अनुवाद ३:२४) खरे पाहता मनुष्य त्याच्यापुढे काहीच नाही. तरीसुद्धा तो जणू आपल्या सर्वोच्च स्थानावरून खाली लवून त्यांचे ऐकतो, त्यांची दखल घेतो. स्तोत्र रचणाऱ्या एकाने म्हटले: “परमेश्वर आमचा देव जो उच्च स्थळी राजासनारूढ आहे, जो आकाश व पृथ्वी ह्यांचे अवलोकन करण्यास लवतो, त्याच्यासारखा कोण आहे? तो कंगालांस धुळींतून उठवितो.”—स्तोत्र ११३:५-८.
५ सदोम व गमोरा यांचा नाश करण्याआधी यहोवाने अब्राहामच्या मनात आलेले प्रश्न ऐकून घेतले व त्या प्रश्नांची उत्तरे दिली. अब्राहामाच्या न्यायबुद्धीनुसार त्याला जे वाटले ते यहोवाने ऐकून घेतले. (उत्पत्ति १८:२३-३३) अब्राहामाला काय सांगायचे आहे ते यहोवाला आधीपासूनच माहीत होते, तरीसुद्धा त्याने अब्राहामचे ऐकून घेतले आणि त्याचे म्हणणे मान्य केले.
६. हबक्कूकने विचारलेल्या प्रश्नाची दखल घेऊन यहोवाने त्याला मान दिल्यामुळे काय परिणाम झाला?
६ यहोवाने हबक्कूकचेही ऐकून घेतले. एकदा हबक्कूकने यहोवाला विचारले: “हे परमेश्वरा, मी किती वेळ ओरडू? तू ऐकत नाहीस.” ‘मला प्रश्न करणारा हा कोण’ असे यहोवाने म्हटले का? नाही. हबक्कूकच्या भावना प्रांजळ आहेत हे यहोवाने ओळखले आणि म्हणूनच त्याने हबक्कूकला आपला उद्देश प्रकट केला. इस्राएल राष्ट्रावर न्यायदंड आणण्याकरता आपण खास्द्यांचा उपयोग करणार आहोत हे यहोवाने हबक्कूकला सांगितले. शिवाय त्याने आपल्या या संदेष्ट्याला हमी दिली की ‘भाकीत केलेला हा न्यायदंड येईलच.’ (हबक्कूक १:१, २, ५, ६, १३, १४; २:२, ३) यहोवाने हबक्कूकच्या चिंतांची दखल घेतली आणि त्याला उत्तर दिले. अशाप्रकारे यहोवाने आपल्या या संदेष्ट्याला मान दिला. यामुळे साहजिकच हबक्कूकची चिंता दूर झाली आणि तो आनंदी झाला. तारणकर्त्या यहोवावरील त्याचा विश्वास अधिकच दृढ झाला. हबक्कूकच्या पुस्तकात या सर्व गोष्टी लिहून ठेवण्याची यहोवाने हबक्कूकला प्रेरणा दिली आणि त्यामुळे आज आपलाही विश्वास दृढ होतो.—हबक्कूक ३:१८, १९.
७. सा.यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी पेत्राला देण्यात आलेला बहुमान का विशेष होता?
७ येशूने देखील इतरांना आदर देण्याच्या बाबतीत एक उत्तम उदाहरण मांडले. येशूने आपल्या शिष्यांना एकदा सांगितले होते, की “जो कोणी माणसांसमोर मला नाकारील त्याला मीहि आपल्या स्वर्गांतील पित्यासमोर नाकारीन.” (मत्तय १०:३२, ३३) पण ज्या रात्री त्याला धरून देण्यात आले त्या रात्री नेमके हेच घडले. सर्व शिष्य येशूला सोडून निघून गेले. प्रेषित पेत्राने तर तीन वेळा त्याला नाकारले. (मत्तय २६:३४, ३५, ६९-७५) पण येशूने त्याला नाकारले नाही. त्याने पेत्राचे बाह्य स्वरूप पाहिले नाही तर, त्यांचे अंतःकरण, त्याला झालेला खरा पश्चात्ताप त्याने पाहिला. (लूक २२:६१, ६२) या घटनेनंतर फक्त ५१ दिवसांनंतर ख्रिस्ताने आपल्या या पश्चात्तापी प्रेषिताला एक विशेष बहुमान दिला. त्याने पेत्राला पेन्टेकॉस्टच्या दिवशी १२० शिष्यांच्या वतीने येरुशलेमच्या रहिवाश्यांपुढे साक्ष देण्याची व ‘स्वर्गाच्या राज्याच्या पहिल्या किल्लीचा’ उपयोग करण्याची संधी दिली. (मत्तय १६:१९; प्रेषितांची कृत्ये २:१४-४०) तसेच ‘वळून आपल्या भावांस स्थिर करण्याची’ संधीही येशूने पेत्राला दिली.—लूक २२:३१-३३.
कुटुंबात एकमेकांना आदर देणे
८, ९. आपल्या पत्नीला मान देण्याच्या बाबतीत पती यहोवाचे व येशूचे कशाप्रकारे अनुकरण करू शकतो?
८ देवाने दिलेल्या अधिकाराचा कुटुंबात वापर करताना, यहोवा व येशू ख्रिस्त यांच्या आदर्शाचे अनुकरण करणारे पती व आईवडील प्रशंसेस पात्र आहेत. पेत्राने सांगितले: “पतींनो, तसेच तुम्हीहि आपल्या स्त्रियांबरोबर, त्या अधिक नाजूक व्यक्ति आहेत म्हणून सुज्ञतेने सहवास ठेवा; तुम्ही उभयतां जीवनरूपी कृपादानाचे समाईक वतनदार आहां, म्हणून तुम्ही त्यांना मान द्या; म्हणजे तुमच्या प्रार्थनांत व्यत्यय येणार नाही.” (१ पेत्र ३:७) एखादी नाजुक वस्तू, उदाहरणार्थ काचेचे भांडे आपण कसे हाताळतो? लाकडी वस्तूपेक्षा ते नाजूक असल्यामुळे साहजिकच आपण फार काळजीपूर्वक ते हाताळतो, नाही का? आपल्या पत्नींसोबत पतींनीही असेच वागले पाहिजे. यासाठी त्यांनी कुटुंबात निर्णय घेताना यहोवा देवाचे अनुकरण केले पाहिजे. म्हणजेच, आपल्या पत्नीचे विचार त्यांनी ऐकून घेतले पाहिजे. यहोवाने अब्राहामाचे विचार कशाप्रकारे ऐकून घेतले होते हे आठवणीत ठेवा. अपरिपूर्ण असल्यामुळे कोणताही निर्णय घेताना सर्व बाबी विचारात घेणे पतीला शक्य होणार नाही, काही गोष्टी नकळत त्याच्या ध्यानातून निसटू शकतात. तेव्हा, पत्नीचे विचार ऐकून घेणे व त्यांची प्रामाणिकपणे दखल घेणे योग्य आणि फायद्याचेच ठरणार नाही का?
९ काही समाजांत पुरूष स्त्रियांना मुठीत ठेवतात; त्यांना आपले विचार व्यक्त करण्याचीही मुभा नसते. अशा समाजात, ख्रिस्ती कुटुंबांतही पत्नीला कदाचित पतीला आपले विचार व भावना व्यक्त करायला भीती वाटू शकते. ख्रिस्ती पतींनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. याबाबतीत ते येशू ख्रिस्ताचे अनुकरण करू शकतात. त्याच्या वधुवर्गात सामील असणाऱ्या शिष्यांशी तो अतिशय प्रेमाने वागला; त्याने त्यांच्या शारीरिक व आध्यात्मिक मर्यादा विचारात घेतल्या. त्यांनी आपल्या अडचणी सांगण्याआधीच येशूने त्या ओळखल्या. (मार्क ६:३१; योहान १६:१२, १३; इफिसकर ५:२८-३०) पत्नी आपल्यासाठी व कुटुंबासाठी किती कष्ट करते याबद्दल पतींनी थोडे थांबून विचार केला पाहिजे; आणि याबद्दलची कृतज्ञता व प्रशंसा त्यांनी शब्दांतून व कृतींतून व्यक्त केली पाहिजे. यहोवा व येशू ख्रिस्तानेही असे केले. (१ राजे ३:१०-१४; ईयोब ४२:१२-१५; मार्क १२:४१-४४; योहान १२:३-८) पौर्वात्य देशात राहणाऱ्या एका बहिणीचा पती यहोवाचा साक्षीदार बनल्यानंतर तिने म्हटले: “पूर्वी माझे पती नेहमी माझ्या दोनतीन पावले पुढे चालायचे आणि सगळं ओझं मला वागवावं लागायचं. आता मात्र ते तसं करत नाहीत. ते आता माझ्यासोबत चालतात आणि काही सामान असल्यास ते सुद्धा मला मदत करतात. शिवाय, घरात मी जे काही काम करते त्याची ते प्रशंसा करतात!” प्रामाणिक प्रशंसेचा एक साधासाच शब्द तुमच्या पत्नीला याची जाणीव करून देईल की तुम्ही तिची किंमत करता.—नीतिसूत्रे ३१:२८.
१०, ११. बंडखोर इस्राएल राष्ट्राशी यहोवाने ज्याप्रकारे व्यवहार केला त्यातून आईवडील काय शिकू शकतात?
१० मुलांशी व्यवहार करताना आईवडिलांनी देवाच्या उदाहरणाचे अनुकरण केले पाहिजे. खासकरून, मुलांना शिस्त लावण्याच्या बाबतीत. यहोवाने इस्राएल व यहुदाच्या लोकांना अनेकवेळा बजावून सांगितले होते की तुम्ही आपले वाईट मार्ग सोडून द्या. पण त्यांनी यहोवाचे ऐकले नाही. (२ राजे १७:१३-१५) “त्यांनी आपल्या मुखाने त्याच्याशी कपट केले, आणि आपल्या जिभेने त्याच्याशी लबाडी केली.” बरीच मुले अशीच वागतात अशी त्यांच्या आईवडिलांची तक्रार असते. तेव्हा त्यांना काय करता येण्यासारखे आहे? यहोवाने काय केले ते लक्षात ठेवा. खरे तर इस्राएली लोकांनी पुन्हा पुन्हा “देवाची परीक्षा पाहिली” व त्याला दुःख दिले. पण तरीसुद्धा, यहोवा ‘कनवाळू असल्यामुळे त्याने त्यांच्या अपराधाची क्षमा केली व त्यांचा नाश केला नाही.’—स्तोत्र ७८:३६-४१.
११ यहोवाने तर इस्राएल लोकांना अक्षरशः याचना केली: “चला, या, आपण बुद्धिवाद करू; तुमची पातके लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी पांढरी होतील; ती किरमिजासारखी तांबडी असली तरी लोकरीसारखी निघतील.” (यशया १:१८) दोष यहोवाचा नाही तर इस्राएल लोकांचा होता, तरीसुद्धा त्याने त्या बंडखोर राष्ट्राला स्वतःहून म्हटले की चला आपण विचारविनिमय करू. आपल्या मुलांशी व्यवहार करताना आईवडिलांनी यहोवाचे अनुकरण केले तर किती चांगले होईल! कोणतीही समस्या उद्भवल्यास, आपल्या मुलांना त्यांची बाजू मांडण्याची संधी द्या. असे केल्याने तुम्हालाही त्यांच्याबद्दल आदर आहे हे तुम्ही दाखवता. तसेच, त्यांनी आपल्या वागण्यात बदल करावा असे तुम्हाला वाटते, तर त्यांना असे करण्याची कारणे समजावून सांगा.
१२. (अ) यहोवापेक्षा आपल्या मुलांना जास्त आदर देण्याचे आपण का टाळले पाहिजे? (ब) मुलांना त्यांची चूक लक्षात आणून देताना त्यांच्या स्वाभिमानाला ठेच लागू नये म्हणून काय करणे गरजेचे आहे?
१२ अर्थात, कधीकधी मुलांना कडक शब्दांत ताकीद देणे गरजेचे असते. आईवडिलांनी एली याजकासारखे होऊ नये. एलीने ‘आपल्या पुत्रांचा यहोवाहून अधिक आदर केला.’ (१ शमुवेल २:२९) पण कडक शब्दांत ताकीद देतानाही मुलांना यामागे आईवडिलांचे प्रेम आहे हे दिसून आले पाहिजे. आईवडिलांचे आपल्यावर प्रेम आहे याची त्यांना खात्री वाटली पाहिजे. पौलाने वडिलांना असा सल्ला दिला: “बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा.” (इफिसकर ६:४) वडिलांचा आपल्या मुलांवर अधिकार आहे यात शंका नाही, पण पौल या वचनातून असे सांगतो की अनावश्यक कठोरतेने वागून वडिलांनी आपल्या मुलांना चिडवू नये. मुलांनाही स्वाभिमान असतो व त्याची कदर केलीच पाहिजे. मुलांच्या स्वाभिमानाची आपण कदर करतो हे आईवडील एका रात्रीत दाखवू शकत नाहीत, याला बराच वेळ व प्रयत्न यांची गरज आहे. पण तुमच्या प्रयत्नांचे तुम्हाला निश्चितच प्रतिफळ मिळेल.
१३. कुटुंबातील वयस्कांबद्दल बायबलमध्ये काय सांगितले आहे?
१३ कौटुंबिक सदस्यांना मान देणे हे केवळ आपल्या पत्नीला व मुलांना आदर दाखवण्यापर्यंतच सीमित नाही. जपानी भाषेत एक म्हण आहे की “म्हातारपणी आईवडिलांनी मुलांच्या आज्ञेत राहावे.” या म्हणीचे तात्पर्य हेच आहे की वयस्क आईवडिलांनी त्यांच्या मुलांवर अनावश्यक अधिकार गाजवू नये. बायबल आईवडिलांना आपल्या मुलांचे ऐकून घेण्याचा व अशाप्रकारे त्यांनाही आदर देण्याचा सल्ला देते हे जरी खरे असले तरीसुद्धा मुलांनी आपल्या कुटुंबातल्या वयस्कांचा आदर करणे सोडून द्यावे असा याचा अर्थ होत नाही. नीतिसूत्रे २३:२२ म्हणते: “आपल्या वृद्ध झालेल्या आईला तू तुच्छ मानू नको.” शलमोन राजाने स्वतः या नीतिसूत्राचे पालन केले. त्याची आई, बथशेबा त्याच्याकडे काही विनंती करायला आली तेव्हा त्याने तिला आदर दाखवला. त्याने आपल्या सिंहासनाच्या उजवीकडे तिच्याकरताही एक सिंहासन मांडले, आणि आपल्या वृद्ध आईचे म्हणणे त्याने ऐकून घेतले.—१ राजे २:१९, २०.
१४. मंडळीतील वयस्कांना आपण कशाप्रकारे मान देऊ शकतो?
१४ ख्रिस्ती मंडळी देखील एका अर्थाने आपले कुटुंबच आहे. तेव्हा, मंडळीतील वयस्क भाऊबहिणींना आदर देण्यात आपण पुढाकार घेतला पाहिजे. (रोमकर १२:१०) पूर्वीइतके कार्य करू शकत नसल्यामुळे कधीकधी या वयस्क बांधवांना निराशा वाटते. (उपदेशक १२:१-७) अंथरुणाला खिळलेल्या एका वयस्क अभिषिक्त बहिणीने एकदा म्हटले: “कधी एकदाचं मरण येईल आणि मी पुन्हा काम करू शकेन असं वाटतं.” अशा भाऊबहिणींना आपण आदर आणि सन्मान देतो तेव्हा त्यांचा उत्साह वाढतो. त्यामुळेच इस्राएल लोकांना आज्ञा देण्यात आली होती: “पिकल्या केसासमोर उठून उभा राहा; वृध्दाला मान दे.” (लेवीय १९:३२) आपण त्यांचा आदर कसा करू शकतो? आपल्याला ते किती प्रिय आहेत याची त्यांना जाणीव करून देण्याद्वारे. तसेच आपण त्यांच्यासोबत बसून त्यांचे अनुभव ऐकू शकतो. असे केल्याने आपण त्यांचा मान राखू आणि त्यांच्या अनुभवातून आपली देखील आध्यात्मिक प्रगती होईल.
“दुसऱ्याला आदराने आपणापेक्षा थोर माना”
१५. मंडळीतील सदस्यांना आदर दाखवण्याकरता वडील काय करू शकतात?
१५ वडिलांचा चांगला आदर्श असल्यास मंडळीतील लोकांची चांगली प्रगती होते. (१ पेत्र ५:२, ३) वडिलांना तशी बरीच कामे असतात, पण मंडळीची खरोखर काळजी करणारे वडील स्वतःहून मंडळीतल्या सर्व लोकांजवळ जाऊन त्यांची विचारपूस करतात. तरुण, कुटुंब प्रमुख, एकट्याने कुटुंब चालवणाऱ्या बहिणी, मंडळीतल्या इतर बहिणी, वयस्क भाऊबहिणी या सर्वांची ते जातीने विचारपूस करतात. त्यांना समस्या असोत अगर नसोत त्यांची ते नेहमी आवर्जून चौकशी करतात. ते मंडळीतल्या सदस्यांचे विचार ऐकून घेतात आणि मनःपूर्वक केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा करतात. असे करण्याद्वारे वडील खरे तर यहोवाचेच अनुकरण करत असतात.
१६. वडिलांनाही मंडळीतील इतरांप्रमाणेच आदर का दिला पाहिजे?
१६ यहोवाचे अनुकरण करणारे वडील पौलाच्या या सल्ल्यानुसार वागण्याचा चांगला आदर्श इतरांपुढे ठेवतात: “बंधुप्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा; तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्याला आदराने आपणापेक्षा थोर माना.” (रोमकर १२:१०) ज्या संस्कृतींत सहसा व्यक्तीच्या पदवीला जास्त महत्त्व दिले जाते अशा देशांत राहणाऱ्या वडिलांना स्वतःपेक्षा इतरांना थोर मानणे कदाचित कठीण जाऊ शकते. उदाहरणार्थ, एका पौर्वात्य देशात “भाऊ” या शब्दाचे दोन पर्यायी शब्द आहेत. यांपैकी एक शब्द साधा आहे, कोणासाठीही तो वापरता येतो. दुसरा मात्र कोणाला आदराने संबोधित करताना वापरला जातो. तर या देशात आतापर्यंत मंडळीतील वडिलांना आणि वयाने मोठे असणाऱ्यांना संबोधित करण्यासाठी हा दुसरा शब्द वापरला जायचा तर इतरांकरता पहिला साधा शब्द. पण या बांधवांना सर्वांकरता साधाच शब्द वापरण्याचा सल्ला देण्यात आला कारण येशूने आपल्या शिष्यांना सांगितले होते, “तुम्ही सर्व भाऊभाऊ आहा.” (मत्तय २३:८) इतर देशांमध्ये वरील उदाहरणाप्रमाणे वडिलांकरता काही खास शब्द वापरले जात नसले, तरीसुद्धा माणसामाणसात भेद करण्याच्या स्वाभाविक प्रवृत्तीपासून आपण नेहमी सांभाळून राहिले पाहिजे.—याकोब २:४.
१७. (अ) वडिलांकडे जाऊन आपल्या समस्या सांगण्याची मंडळीतील लोकांना भीती का वाटू नये? (ब) या बाबतीत ते यहोवापासून काय शिकू शकतात?
१७ पौलाने काही विशिष्ट वडिलांना ‘दुप्पट सन्मान’ देण्याचे प्रोत्साहन दिले होते, पण ते देखील आपले भाऊच आहेत. (१ तीमथ्य ५:१७) जर आपण या विश्वाच्या सर्वश्रेष्ठ निर्माणकर्त्याच्या ‘कृपेच्या राजासनाजवळ धैर्याने जाऊ शकतो’ तर मग यहोवाचे अनुकरण करणाऱ्या वडिलांकडे आपण किती मोकळेपणाने गेले पाहिजे! (इब्री लोकांस ४:१६; इफिसकर ५:१) याबाबतीत आपण यहोवाचे अनुकरण करत आहोत किंवा नाही हे पडताळून पाहण्यासाठी वडील स्वतःला प्रश्न विचारू शकतात, की माझ्याजवळ किती लोक सल्ला मागण्यासाठी किंवा काही सुचवण्यासाठी येतात. यहोवाकडून वडिलांना बरेच काही शिकण्यासारखे आहे. यहोवाने इतरांवर विश्वास ठेवला, त्यांच्यावर जबाबदाऱ्या सोपवल्या आणि त्यांच्यासोबत काम केले. अशाप्रकारे त्यांनी इतरांना मान दिला. एखाद्याने सुचवलेली गोष्ट फारशी उपयोगी नसली तरीसुद्धा त्या व्यक्तीने आपले मत व्यक्त करण्याची तसदी घेतली याबद्दल वडिलांनी त्यांची प्रशंसा केली पाहिजे. अब्राहामाने यहोवाला एकापाठोपाठ एक प्रश्न विचारले, आणि हबक्कूकने व्याकूळ होऊन यहोवाचा धावा केला तेव्हा त्याने कशी प्रतिक्रिया दाखवली हे आठवणीत असू द्या.
१८. चूक झालेल्यांना मदत करताना वडील यहोवाचे कशाप्रकारे अनुकरण करू शकतात?
१८ काही ख्रिस्ती बांधवांकडून चूक होते, तेव्हा त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव करून देणे आवश्यक असते हे कबूल आहे. (गलतीकर ६:१) पण यहोवा या बांधवांचीही किंमत जाणतो; त्याच्या दृष्टिकोनातून, या बांधवांशीही आदराने वागणे आवश्यक आहे. एका साक्षीदाराने असे म्हटले, “माझी चूक लक्षात आणून देणारा माझ्याशी आदराने वागला, तर मी पुढेही मोकळेपणाने त्याची मदत मागू शकतो.” आदराने वागल्यास कोणत्याही व्यक्तीला सल्ला स्वीकारणे जास्त सोपे जाते. ज्यांच्याकडून चूक झाली आहे त्यांची बाजूही ऐकून घेणे महत्त्वाचे आहे; कदाचित जास्त वेळ लागेल पण त्या व्यक्तीचे ऐकून घेतल्यामुळे तिला तुमचा सल्ला स्वीकारणे जास्त सोपे जाईल. यहोवाने इस्राएल लोकांना कशी वारंवार संधी दिली व त्यांच्याशी तो किती कनवाळूपणे वागला हे आठवणीत ठेवा. (२ इतिहास ३६:१५; तीत ३:२) बांधवांना सल्ला देताना तुम्ही सहानुभूती दाखवल्यास तुमचा सल्ला त्यांच्या हृदयापर्यंत निश्चित पोहंचेल.—नीतिसूत्रे १७:१७; फिलिप्पैकर २:२, ३; १ पेत्र ३:८.
१९. बाहेरच्या लोकांबद्दल आपला कसा दृष्टिकोन असावा?
१९ बाहेरच्या लोकांना देखील आपण मान दिला पाहिजे कारण ते देखील पुढेमागे आपले भाऊबहीण होऊ शकतात. हे लोक कदाचित आपला संदेश सहजासहजी स्वीकारणार नाहीत पण आपण सहनशीलता दाखवली पाहिजे. त्यांच्या जीवनाविषयी आपण कदर दाखवली पाहिजे, कारण “कोणाचा नाश व्हावा अशी [देवाची] इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चात्ताप करावा अशी आहे.” (२ पेत्र ३:९) आपलाही यहोवासारखाच दृष्टिकोन असायला नको का? सर्व लोकांशी नेहमी मैत्रीपूर्ण रितीने वागल्यास त्यांना साक्ष देणे आपल्याला जास्त सोपे जाईल. अर्थात, ज्यांची संगत आपल्याला आध्यात्मिकरित्या धोकेदायक ठरू शकते अशा लोकांना आपण निश्चितच टाळले पाहिजे. (१ करिंथकर १५:३३) पण लोकांचा, केवळ ते आपल्याप्रमाणे विश्वास करत नाहीत म्हणून तिरस्कार करणे योग्य नाही. उलट त्यांच्याशी आपण “सौजन्याने” वागले पाहिजे.—प्रेषितांची कृत्ये २७:३.
२०. यहोवा व येशू ख्रिस्त यांच्या उदाहरणावरून आपण कोणते धडे घ्यावेत?
२० होय, यहोवा आणि येशू ख्रिस्त आपल्या प्रत्येकाचा मान राखतात, आपला आदर करतात. त्यामुळे आपण देखील इतरांचा आदर करण्यात, त्यांना मान देण्यात पुढाकार घेऊ या. आणि येशू ख्रिस्ताचे शब्द नेहमी लक्षात ठेवू या: “तुम्ही सर्व भाऊभाऊ आहा.”—मत्तय २३:८.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
• आपल्यासोबत यहोवाची उपासना करणाऱ्या सर्वांकडे आपण कोणत्या दृष्टीने पाहिले पाहिजे?
• यहोवा व येशूचे अनुकरण करून तुम्ही इतरांना कशाप्रकारे मान देऊ शकता?
• पती व आईवडील इतरांना कसा मान देऊ शकतात?
• मंडळीतील सदस्य आपले भाऊ आहेत हे वडिलांना कसे दाखवता येईल?
[अभ्यासाचे प्रश्न]
[१८ पानांवरील चित्र]
मनापासून पत्नीची प्रशंसा करून तिला मान द्या
[१८ पानांवरील चित्र]
मुलांचे म्हणणे ऐकून घेण्याद्वारे तुम्हाला त्यांची कदर आहे हे दाखवा
[१८ पानांवरील चित्र]
मंडळीतील सदस्यांशी आदराने वागा