व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

परिपूर्ण जीवन निव्वळ स्वप्न नव्हे!

परिपूर्ण जीवन निव्वळ स्वप्न नव्हे!

परिपूर्ण जीवन निव्वळ स्वप्न नव्हे!

गुन्हेगारी, अंमली पदार्थांचा दुरूपयोग, दुष्काळ, गरिबी किंवा अन्याय नसलेल्या जगाची कल्पना करा. तेथे राहणारे सर्व लोक निरोगी आहेत. मृत्यू नसल्यामुळे कोणीही दुःखी नाही. स्वप्नांची दुनिया वाटते का? पण हे स्वप्न फार लवकर सत्य होणार आहे.

मानवाने विज्ञान आणि तंत्रज्ञानात खूप प्रगती केली तरी तो सुख आणि शांती नांदत असलेले परिपूर्ण जग आणू शकेल यावर बहुतेक लोकांचा विश्‍वास बसत नाही. मानवाने असे परिपूर्ण जग आणण्याचे पुष्कळ प्रयत्न केले आहेत पण बहुतेकवेळा तो अपयशी ठरला आहे. अर्थात, आपल्याला न जमणाऱ्‍या गोष्टींबद्दल स्वप्न रंगवत राहिल्याने गोरगरिबांना काही मदत होणार नाही किंवा रोगराईने त्रस्त असलेल्यांना सुटका मिळणार नाही. यावरून हेच सिद्ध होते की परिपूर्ण जग आणणे हे मानवाच्या हातात नाही. पण याचा अर्थ असा होतो का, की सुख आणि शांती असलेले परिपूर्ण जग केव्हाच येणार नाही? नाही.

देवाने जेव्हा पृथ्वीची निर्मिती केली होती तेव्हा सर्वकाही परिपूर्ण होते. येशूलाही देवाने परिपूर्ण असे निर्माण केले. परंतु एकटा येशू ख्रिस्तच परिपूर्ण मानव नव्हता. देवाने निर्माण केलेले पहिले मानवी दांपत्य, आदाम आणि हव्वा देखील परिपूर्ण होते. देवाने त्यांना आपल्या प्रतिरूपानुसार बनवले आणि बागेसमान पृथ्वीवर त्यांना परिपूर्ण जीवन बहाल केले होते. पण या दांपत्याने आपल्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेविरुद्ध कार्य करून ही परिपूर्णता गमावली. (उत्पत्ति ३:१-६) परंतु, देवाने त्यांच्या संततीमध्ये चिरकाल जगण्याच्या आशेची ज्योत तेवत ठेवली. याविषयी उपदेशक ३:११ सुद्धा याला पुष्टी देते: “आपआपल्या समयी होणारी हरएक वस्तु त्याने सुंदर बनविली आहे; त्याने मनुष्याच्या मनांत अनंतकालाविषयीची कल्पना उत्पन्‍न केली आहे; तरी देवाचा आदिपासून अंतापर्यंतचा कार्यक्रम मनुष्याला उमगत नाही.”

अपरिपूर्णता आणि पाप यांमुळे मानवजातीचे जीवन ‘व्यर्थतेच्या’ व ‘नश्‍वरतेच्या दास्यत्वाच्या’ बंधनात जखडले गेले. पण प्रेषित पौल आपल्याला सांत्वन देतो की: “सृष्टी देवाच्या पुत्रांच्या प्रगट होण्याची प्रतीक्षा अत्यंत उत्कंठेने करीत आहे. कारण सृष्टी व्यर्थतेच्या स्वाधीन करण्यात आली ती आपखुशीने नव्हे, तर ती स्वाधीन करणाऱ्‍यामुळे. सृष्टीहि स्वतः नश्‍वरतेच्या दास्यातून मुक्‍त होऊन तिला देवाच्या मुलांची गौरवयुक्‍त मुक्‍तता मिळावी ह्‍या आशेने वाट पाहते.” (रोमकर ८:१९-२१) बायबलच्या या वचनात स्पष्टपणे सांगितले आहे की मानवाने गमावलेले परिपूर्ण जीवन त्याला पुन्हा एकदा मिळवून देण्याकरता देवाने येशू ख्रिस्ताद्वारे एक तरतूद केली.—योहान ३:१६; १७:३.

यामुळे आता आपण भवितव्याबद्दल एक उज्ज्वल आशा बाळगू शकतो; शिवाय आध्यात्मिकतेतही प्रगती करू शकतो. आणि आपली ही प्रगती आपण आपल्या कामांद्वारे प्रगटही करू शकतो.

वाजवी असण्याद्वारे

येशूने परिपूर्ण असण्याला खूप महत्त्व दिले. तो म्हणाला: “जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा.” (मत्तय ५:४८) या दुष्ट व्यवस्थीकरणात राहत असताना आपल्यात काहीच खोट नसावी असे त्याला म्हणायचे होते का? नाही. तर त्याला हे म्हणायचे होते, की उदारता, दया, आणि सहमानवांबद्दल प्रेम यांसारखे गुण वाढवण्यासाठी आपण झटले पाहिजे यात शंका नाही. पण तरीही योग्य ते करण्यास आपण पुष्कळ वेळा चुकतो. येशूच्या एका प्रेषितानेसुद्धा असे लिहिले: “जर आपण आपली पापे पदरी घेतली, तर तो विश्‍वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील, व आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करील. आपण पाप केले नाही, असे जर आपण म्हटले, तर आपण त्याला लबाड ठरवितो आणि त्याचे वचन आपल्या ठायी नाही.”—१ योहान १:९, १०.

असे असले तरीही आपण टोकाची भूमिका घेण्याचे टाळून सुधारणा करू शकतो. देवाचे वचन, बायबल आपल्याला संतुलित मनोवृत्ती व वाजवी असण्यास मदत करू शकते. आनंद व सभ्यता यांसारखे गुण विकसित केल्याने, आपण जेथे काम करतो तेथील लोकांशी, आपल्या विवाह सोबत्याशी, आपल्या पालकांशी अथवा आपल्या मुलांशी आपले सूत चांगले जमू शकते. प्रेषित पौल ख्रिश्‍चनांना म्हणाला: “प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा; पुन्हा म्हणेन, आनंद करा. तुमची सहनशीलता [वाजवीपणा] सर्वांना कळून येवो.”—फिलिप्पैकर ४:४, ५.

वाजवी असण्याचे फायदे

तुम्ही तुमच्या अपेक्षांच्या बाबतीत वाजवी असता तेव्हा तुम्हाला स्वतःला आणि इतरांनाही त्याचा फायदा होतो. तुमच्या क्षमता ओळखणे म्हणजे तुम्ही जे काही करणार आहात त्याबाबतीत वाजवी असणे. देवाने आपल्याला या पृथ्वीवर जीवनाचा आनंद घेण्यास व स्वतःचा आणि इतरांचा फायदा होईल अशा अर्थपूर्ण कामाद्वारे संतोष मिळवण्यास निर्माण केले आहे, ही गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे.—उत्पत्ति २:७-९.

याबाबतीत तुम्हाला साहाय्य हवे असल्यास तुम्ही यहोवाला प्रार्थना करू शकता. यहोवाची मर्जी प्राप्त केल्यामुळे तुम्हाला मनाची शांती मिळू शकेल. यहोवाला आपली घडण, आपली अपरिपूर्ण अवस्था माहीत असल्यामुळे तो अवाजवी नाही किंवा त्याला संतुष्ट करणे देखील कठीण नाही. स्तोत्रकर्ता म्हणतो: “जसा बाप आपल्या मुलांवर ममता करितो, तसा परमेश्‍वर आपले भय धरणाऱ्‍यांवर ममता करितो. कारण तो आमची प्रकृति जाणतो; आम्ही केवळ माती आहो हे तो आठवितो.” (स्तोत्र १०३:१३, १४) अशाप्रकारे देव आपल्याबरोबर दयाळूपणे वागतो याबद्दल आपण त्याचे किती आभार मानावेत! त्याला आपले गुण-अवगुण माहीत आहेत आणि तरीदेखील तो आपल्याला लाडक्या मुलांसारखे मोलवान समजतो.

सर्व काही अगदी परफेक्ट झाले पाहिजे असा हटट्‌ धरण्याऐवजी आपण आध्यात्मिक समजुतदारपणा आणि संतुलित दृष्टिकोन बाळगू शकतो. शिवाय, आपल्या राज्यात मानवजातीला परिपूर्ण बनवण्याचा यहोवा देवाचा उद्देश पूर्ण करण्यापासून कोणीही त्याला अडवू शकत नाही याची आपण खात्री बाळगू शकतो. मानवजातीला परिपूर्ण बनवणे म्हणजे काय?

परिपूर्णतेची अपेक्षा करण्यापेक्षा परिपूर्ण जीवन उत्तम

परिपूर्ण असणे आणि परिपूर्णतेची अपेक्षा करण्याची वृत्ती असणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. देवाच्या राज्यातील लोकांची मनोवृत्ती अगदी वेगळी असेल. ते स्वतःकडून किंवा इतरांकडूनही अवाजवी अपेक्षा करणार नाहीत. येणाऱ्‍या मोठ्या संकटातून आपला बचाव करून घ्यायचा असेल तर आपल्याला येशूच्या खंडणी बलिदानाबद्दल मनापासून गुणग्राहकता बाळगली पाहिजे. प्रेषित योहानाने सर्व राष्ट्रांतील लोकांच्या एका मोठ्या समुहाविषयी सांगितले ज्यांनी अशाचप्रकारे गुणग्राहकता व्यक्‍त केली: “राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून व कोकऱ्‍याकडून, तारण आहे.” (प्रकटीकरण ७:९, १०, १४) ख्रिस्ताने आपल्यासाठी आणि त्याच्या बलिदानावर विश्‍वास ठेवणाऱ्‍यांसाठी स्वखुषीने आपला प्राण अर्पण केला म्हणून येणाऱ्‍या महासंकटातून जे लोक वाचतील ते सर्व त्याचे आभार मानतील. त्याने प्रेमामुळे दिलेल्या या बलिदानामुळेच तर आपल्याला, आपल्या अपरिपूर्णता व कमतरता यांतून कायमची मुक्‍ती मिळणार आहे.—योहान ३:१६; रोमकर ८:२१, २२.

पण परिपूर्ण जीवन कसे असेल? तेव्हा लोकांच्या मनात स्पर्धेची भावना नसेल. ते स्वाभिमानी नसतील. तर त्यांच्या मनात प्रेम आणि दया असेल. यामुळे ते चिंतीत किंवा निराश नसतील तर नेहमी आनंदी असतील. परंतु, परिपूर्ण जीवन कंटाळवाणे नसेल. पृथ्वीवर कशी परिस्थिती असेल याची सविस्तर माहिती बायबलमध्ये दिलेली नाही. पण पुढील वचनावरून आपण थोडेफार समजू शकतो की तेव्हा परिस्थिती कशी असेल: “ते घरे बांधून त्यात राहतील. द्राक्षांचे मळे लावून त्यांचे फळ खातील. ते घरे बांधतील आणि त्यात दुसरे राहतील, ते लावणी करितील आणि फळ दुसरे खातील, असे व्हावयाचे नाही; कारण वृक्षाच्या आयुष्याप्रमाणे माझ्या लोकांचे आयुष्य होईल व माझे निवडलेले आपल्या हाताच्या श्रमाचे फळ पूर्णपणे भोगितील. त्यांचे परिश्रम व्यर्थ जाणार नाहीत, संकट तत्काळ गाठील अशा संततीला ते जन्म देणार नाहीत.”—यशया ६५:२१-२३.

देवाच्या राज्यात कोणत्याप्रकारचे मनोरंजन असेल, बाजारहाट करण्यासाठी काय सोयी असतील, कोणत्या प्रकारची वाहतूक असेल यावर विचार करण्याऐवजी, यहोवाच्या या शब्दांवर विचार करा: “लांडगा व कोकरू एकत्र चरतील, सिंह बैलाप्रमाणे कडबा खाईल, सर्पाचे खाणे धूळ होईल; माझ्या सगळ्या पवित्र डोंगरावर ती उपद्रव देणार नाहीत. नासधूस करणार नाहीत.” (यशया ६५:२५) अशाप्रकारचे परिपूर्ण जीवन आजच्या जीवनापेक्षा किती वेगळे असेल! हे जीवन जगण्यासाठी तुम्ही पात्र ठरलात तर हा भरवसा ठेवू शकता की तुमचा प्रेमळ स्वर्गीय पिता तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घेईल! स्तोत्रकर्ता म्हणतो: “परमेश्‍वराच्या ठायी तुला आनंद होईल; तो तुझे मनोरथ पूर्ण करील.”—स्तोत्र ३७:४.

म्हणजे, परिपूर्ण जीवन हे निव्वळ स्वप्न नव्हे. मानवजातीला परिपूर्ण जीवन देण्याचा यहोवाचा प्रेमळ उद्देश फार लवकर पूर्ण होईल. तुम्ही आपल्या कुटुंबासोबत या संधीचा फायदा घेऊ शकता. बायबलमध्ये असे भाकीत केले आहे: “नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करितील.”—स्तोत्र ३७:२९.

[६ पानांवरील चित्र]

स्वतःकडून आणि इतरांकडून जास्त अपेक्षा करण्याऐवजी आपण आपली मनोवृत्ती बदलू शकतो

[७ पानांवरील चित्र]

येणाऱ्‍या परिपूर्ण जगात तुम्ही जीवनाचा आनंद लुटत आहात अशी आतापासूनच कल्पना करायला काय हरकत आहे?