व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

रॉबिनसन क्रूसो द्वीपावर मदत

रॉबिनसन क्रूसो द्वीपावर मदत

रॉबिनसन क्रूसो द्वीपावर मदत

रॉबिनसन क्रूसो द्वीप, पॅसिफिक महासागराच्या तीन द्वीपांपैकी एक आहे. या द्वीपसमूहाला हुआन फर्नांडेझ असे म्हटले जाते. हा द्वीपसमूह चिलीच्या किनाऱ्‍यापासून ६४० किलोमीटर दूर आहे. * केवळ ९३ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या या द्वीपाला १८ व्या शतकात प्रसिद्ध झालेल्या एका कादंबरीवरून नाव पडले. या कादंबरीचे नाव होते, रॉबिनसन क्रूसो आणि तिचा लेखक होता डॅनिएल डिफो. ही कादंबरी, अलेक्झॅन्डर सेलकर्क नावाच्या एका स्कॉटिश माणसाच्या साहसी प्रवासावर आधारित होती. (अर्थात, सेलकर्कचा साहसी प्रवास आणि या कादंबरीतली कथा अगदीच मिळतीजुळती नव्हती.) सेलकर्क या द्वीपावर जवळजवळ चार वर्षे एकटाच राहिला होता.

या बेटावर एक लाकडी पाटी लावली आहे. त्यावर असे लिहिले आहे: “एक एक दिवस मोजत तब्बल चार वर्षे स्कॉटिश नाविक अलेक्झॅन्डर सेलकर्क, अगदी याच ठिकाणी उभा राहून आपल्या एकांतवासातून आपल्याला कोणीतरी सोडवायला येईल या आशेने समुद्राकडे एकटक पाहत राहायचा.” चार वर्षांनंतर सेलकर्कची एकदाची सुटका झाली. तो पुन्हा आपल्या मायदेशी परतला. पण त्या छोट्याशा नयनरम्य द्वीपावर राहून आलेल्या सेलकर्कचे आता मन रमेना. “ते मनोहर ठिकाण मी सोडून यायला नको होतं!” असे त्याने त्या द्वीपाविषयी म्हटल्याचे सांगितले जाते.

कालांतराने, या द्वीपावर कैद्यांना पाठवण्यात येऊ लागले. कॅथलिक चर्चच्या “शिकवणींविरुद्ध बंड” करणाऱ्‍या गुन्हेगारांना काळ्या पाण्याची शिक्षा म्हणून येथे पाठवण्यात येऊ लागले. सेलकर्कने पहिल्यांदा पाहिलेला द्वीप बदलला. पण जगातील इतर भागांच्या तुलनेत या द्वीपावर सध्या पुष्कळ शांतता आहे. इतर द्वीपांसारखेच या द्वीपावरील लोकही निवांत वाटतात. त्यामुळे आपण कोणाबरोबरही सहजपणे बोलणे सुरू करू शकतो.

सरकारी आकडेवारीनुसार या द्वीपावर राहणाऱ्‍या लोकांची संख्या ५०० आहे. पण संपूर्ण वर्षादरम्यान फक्‍त ४०० लोकच या द्वीपावर राहतात. उरलेले लोक कोठे असतात मग? मुलांच्या शाळा असतात तेव्हा मुले आपल्या आईबरोबर चिली देशात जाऊन राहतात आणि फक्‍त सुटीला या द्वीपावर येतात.

या नयनरम्य परिसरातील लोकांना निसर्गाकडून सर्वकाही मिळालेले असतानाही एका गोष्टीची मात्र त्यांना उणीव भासते. ती गोष्ट म्हणजे आध्यात्मिक ज्ञान. सेलकर्कला जसे वाटत होते की कोणीतरी येऊन आपल्याला वाचवावे तसेच येथील लोकांना देखील वाटते की कोणीतरी येऊन त्यांना आध्यात्मिक अर्थाने वाचवावे.

आध्यात्मिक बचावकार्य

सन १९७९ मध्ये असे आध्यात्मिक बचाव कार्य येथे सुरू झाले. चिली, संत्यागो येथील यहोवाच्या साक्षीदारांबरोबर बायबलचा अभ्यास करणारी एक स्त्री या द्वीपावर राहायला आली. स्वतःच्या अभ्यासातून शिकलेल्या गोष्टी ती येथील लोकांना सांगू लागली. काही काळानंतर, एक ख्रिस्ती वडील कामानिमित्ताने या द्वीपावर आले. त्यांना जेव्हा समजले की येथे, बायबल विद्यार्थ्यांचा एक लहानसा गट त्या स्त्रीच्या साहाय्याने आध्यात्मिक प्रगती करत आहे तेव्हा त्यांना खूप आश्‍चर्य वाटले. तीन महिन्यांनंतर हे वडील पुन्हा या द्वीपावर आले तेव्हा ही स्त्री आणि तिने ज्यांना सत्य शिकवले होते त्या दोन स्त्रिया बाप्तिस्मा घेण्यासाठी तयार होत्या. म्हणून मग या वडिलांनीच त्यांना बाप्तिस्मा दिला. काही दिवसांनंतर, बाप्तिस्मा घेतलेल्या या तीन भगिनींपैकी एकीचे लग्न झाले. ती आपल्या पतीबरोबर आध्यात्मिक बचावाची अपेक्षा करणाऱ्‍या लोकांना शोधू लागली. या भगिनीच्या पतीने एक छानपैकी राज्य सभागृह बांधले व आजही याच राज्य सभागृहात सभा होतात. कालांतराने, काही आर्थिक अडचणींमुळे या जोडप्याला हे द्वीप सोडून मध्य चिलीत राहायला जावे लागले. तेव्हापासून आजपर्यंत ते चिलीतील मंडळीत यहोवाची सेवा करत आहेत.

खोट्या धर्मातून इतरांना जसजसे वाचवण्यात येऊ लागले तसतसा या द्वीपावरील लहानसा गट वाढू लागला. पण शाळेला जाणाऱ्‍या मुलांना शिक्षणासाठी मेनलँडला जावे लागत असल्यामुळे तेथे फक्‍त दोन बाप्तिस्मा झालेल्या भगिनी व एक तरुण मुलगी इतकेच लोक उरले. सुटीच्या दिवसांत मात्र मुले आपल्या आईबरोबर घरी येतात तेव्हा हा गट पुन्हा मोठा होतो. यामुळे वर्षभर एकट्याच असलेल्या या तीन ख्रिस्ती भगिनींना चांगले प्रोत्साहन मिळते. या भगिनींच्या आवेशी कार्यामुळे द्वीपावरील सर्व लोक आता यहोवाच्या साक्षीदारांना ओळखतात. काही लोकांनी त्यांच्या कार्याचा विरोध केला व इतरांवरही राज्य संदेश न ऐकण्याचा दबाव आणला. पण बायबलमधील सत्याचे बीज ज्या प्रांजळ लोकांच्या मनात पेरण्यात आले ते मात्र आता उगवू लागले आहे.

बचावलेल्यांना बळकट करणे

दर वर्षी सर्किट ओव्हरसियर या द्वीपावरील बांधवांना भेट देतात. इतक्या दूरच्या या द्वीपावरील हातावर मोजण्या इतक्या बांधवांना भेटणे हा एक वेगळाच अनुभव आहे. एका सर्किट ओव्हरसियरने आपला असा अनुभव सांगितला:

“मला असं वाटत होतं की मी स्वप्नच पाहात आहे. आम्ही सकाळी सात वाजता वालपेराईझोहून निघालो व सँटिआगो सेरियोस विमानतळावर पोंहचलो. तेथून आम्ही एका सात आसनी विमानात बसलो. पावणेतीन तासांच्या प्रवासानंतर आम्हाला पर्वताचे एक शिखर पार ढगात गेल्यासारखं दिसू लागलं. आम्ही जसजसं जवळ येऊ लागलो तसतसं आम्हाला महासागराच्या मध्यभागी सागरातून डोकावणारा एक मोठा खडक दिसला. हा खडक म्हणजे रॉबिनसन क्रूसो द्वीप. हा द्वीप जणू समुद्रात हरवलेल्या एखाद्या जहाजाप्रमाणे पाण्यावर तरंगत आहे असं वाटत होतं.

“विमानातून उतरल्यावर आम्ही एका लहानशा बोटीनं गावात गेलो. वाटेत आम्ही समुद्रातून डोकावणारे काही खडकही पाहिले ज्यावर सहसा हुआन फर्नांडेझ फर सील ऊन खात पहुडलेले असतात. त्यांच्या कातडीसाठी या प्राण्यांची मोठ्या प्रमाणात हत्या करण्यात आली असल्यामुळे त्यांची संख्या कमी झाली होती. म्हणून आता त्यांचे विशेष संरक्षण केले जाते. अचानक आम्ही पाहिले, की आमच्या बोटीच्या शेजारून काहीतरी उडून पाण्यात एकदम गडप झाले. आम्हाला नंतर कळले की तो उडणारा मासा होता. त्याचे पर पंखांसारखे वाटतात. ते किडे खायला पाण्याबाहेर येतात. पण कधीकधी असे होते, की भक्ष्याचा पाठलाग करणारा हा मासा स्वतःच भक्ष्य बनतो.

“शेवटी आम्ही सॅन व्हान बाऊटिस्टा (सेंट. जॉन द बॅप्टिस्ट) या गावी पोहंचलो. या बंदरावर पुष्कळ स्थानिक लोक आले होते. काही त्यांच्या नातेवाईकांना घेण्यासाठी तर काही जण कोण आलंय हे पाहायला म्हणून आले होते. समोरचे नयनरम्य दृश्‍य पाहून आमचे नेत्र सुखावले. गडद हिरवी शाल पांघरलेला विशाल, ओबडधोबड एल युनका (द ॲनव्हील) पर्वत आणि त्याच्या वरती निळ्याभोर आकाशात पांढऱ्‍या ढगांचे पुंजके.

“बंदरावर आम्ही आमच्या ख्रिस्ती भगिनींना व त्यांच्या मुलांना भेटलो. मुलांना सुट्टी असल्यामुळे पुष्कळजण दिसत होते. सर्वांना भेटून झाल्यावर आम्हाला राहायला दिलेल्या केबिनमध्ये आम्ही गेलो. या सुंदरशा केबिनमध्ये आम्ही आठवडाभर राहणार होतो.

“आमचा हा आठवडा एक खास आठवडा होता. या एका आठवड्यात आम्हाला पुष्कळ कामं करायची होती. आम्ही ज्या दिवशी पोहंचलो त्याच दिवशी दुपारच्या जेवणानंतर आम्ही एका बायबल विद्यार्थीनीला भेटलो जी आपली आध्यात्मिक बहीण व देवाच्या आध्यात्मिक परादीसची एक सदस्य होणार होती. तिला खरं तर खूप आनंदही वाटत होता आणि भीतीही वाटत होती. पुष्कळ दिवसांपासून ती ज्या दिवसाची वाट पाहत होती तो दिवस, म्हणजे तिच्या बाप्तिस्म्याचा दिवस जवळ आला होता. सुवार्तेची प्रचारक होण्याआधी तिच्याशी आम्ही काही आवश्‍यक गोष्टींची चर्चा केली. दुसऱ्‍या दिवशी ती पहिल्यांदाच क्षेत्र सेवेला देखील आली. तिसऱ्‍या दिवशी आम्ही तिच्याशी बाप्तिस्म्याच्या प्रश्‍नांची चर्चा केली. आणि एका आठवड्याच्या आतच तिचा बाप्तिस्मा देखील झाला.

“आठवडाभरात झालेल्या सर्व सभांना सर्वांनी चांगली साथ दिली. एकूण १४ लोक उपस्थित होते. दर दिवशी, क्षेत्र सेवा, पुनर्भेटी, बायबल अभ्यास आणि शेफर्डींग कॉल्सची व्यवस्था करण्यात आली होती. संपूर्ण वर्षभर स्वतःहून सर्वकाही करणाऱ्‍या भगिनींना खूपच प्रोत्साहन मिळाले.”

द्वीपावरील पुरुषांना त्यांच्या कामामुळे बायबल सत्य शिकण्याकडे जास्त लक्ष देता येत नाही. तेथे लॉबस्टर्स पकडण्याचे काम सर्रास चालत असल्यामुळे या कामात पुरुषांचा बराच वेळ जातो. आणि दुसरे कारण म्हणजे, काही लोकांना दुसऱ्‍या धर्माबद्दल ऐकायला आवडत नाही. तरीपण, भविष्यात आणखी पुष्कळ स्त्रीपुरूष सत्याला प्रतिसाद देतील अशी अपेक्षा केली जाते.

आतापर्यंत, द्वीपावरील दहा लोकांना, सत्याचे ज्ञान व यहोवाच्या उद्देशांची माहिती देऊन आध्यात्मिकरित्या वाचवण्यात आले आहे. यांच्यातील काही जण वेगवेगळ्या कारणांसाठी द्वीप सोडून दुसरीकडे राहायला गेले आहेत. काहीही असले तरी, अलेक्झॅन्डर सेलकर्कच्या बचावापेक्षा या लोकांचा आध्यात्मिक बचाव जास्त महत्त्वाचा ठरला आहे. ते कोठेही राहत असले तरी, आता ते आध्यात्मिक परादीसचा आनंद लुटत आहेत. येथील भगिनी आणि त्यांची मुले तर निसर्गाच्या सानिध्यात राहतात, पण याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे सार्वकालिक जीवनाची आशा आहे; आणि ती म्हणजे याच पृथ्वीवर सदासर्वकाळ राहण्याची. तेव्हा संपूर्ण पृथ्वी बागेसमान बनवली जाईल.

बचावकार्य आजही चालू

तसे पाहायला गेले तर रॉबिनसन क्रूसो द्वीपावरील यहोवाच्या साक्षीदारांचा लहानसा गट जगातील त्यांच्या इतर आध्यात्मिक बंधूभगिनींपासून खूप दुरावलेला आहे. पण सेलकर्कला जसे एकटे वाटत होते तसे या बंधूभगिनींना वाटत नाही. चिलीमधील वॉच टावर संस्थेच्या शाखेकडून त्यांना ईश्‍वरशासित प्रकाशनांचा सतत पुरवठा केला जातो. वर्षातून तीनदा त्यांना संमेलनांचे आणि अधिवेशनांचे व्हिडिओ टेप्स पाठवले जातात. वर्षातून एकदा सर्किट ओव्हरसियरची भेट होते. या सर्वांमुळे यहोवाच्या संघटनेशी त्यांचा निकटचा संपर्क असतो. म्हणूनच ते ‘जगातील आपल्या बंधुवर्गाचा’ भाग आहेत.—१ पेत्र ५:९.

[तळटीप]

^ परि. 2 या द्वीपाचे अधिकृत नाव मास आ टायरा आहे.

[९ पानांवरील नकाशे/चित्र]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

चिली

सँटिआगो

रॉबिनसन क्रूसो द्वीप

सॅन व्हान बाऊटिस्टा

एल युनका

पॅसिफिक महासागर

सांता क्लारा द्वीप

[चित्र]

द्वीप नजरेस पडतो तेव्हा सागरातून अगदी मधोमध डोकावणारा एक विशाल खडकाळ प्रदेश दिसतो

[चित्राचे श्रेय]

चिलीचा नकाशा: Mountain High Maps® Copyright © १९९७ Digital Wisdom, Inc.

[८, ९ पानांवरील चित्र]

विशाल, ओबडधोबड एल युनका पर्वत (द ॲनव्हील)

[९ पानांवरील चित्र]

सॅन व्हान बाऊटिस्टा (सेंट जॉन द बाप्टिस्ट) गाव

[९ पानांवरील चित्र]

छोटे छोटे द्वीप फर सील आणि सी लायन्सला आराम करायला चांगले

[१० पानांवरील चित्र]

चिली, सँटिआगोहून आम्ही एका लहान विमानानं गेलो

[१० पानांवरील चित्र]

रॉबिनसन क्रूसो द्वीपाचा खडकाळ किनारा

[१० पानांवरील चित्र]

द्वीपावरील साधेसुधे राज्य सभागृह