वाचकांचे प्रश्न
वाचकांचे प्रश्न
रक्तापासून तयार केलेल्या औषधांचा यहोवाचे साक्षीदार वापर करू शकतात का?
यहोवाचे साक्षीदार कोणत्याही प्रकारे रक्त आपल्या शरीरात घेत नाहीत. आमचा या गोष्टीवर पूर्ण विश्वास आहे की रक्तासंबंधी देवाने दिलेल्या नियमाशी कुठल्याही परिस्थितीत आम्हाला तडजोड करता येणार नाही. तरीसुद्धा, या विषयी नव-नवीन प्रश्न उपस्थित होत आहेत कारण रक्तावर विशेष प्रक्रिया करून त्याचे चार मुख्य घटक वेगळे करणे आणि त्या घटकांचे आणखी लहान अंश वेगळे करणे आता शक्य झाले आहे. या घटकांचा आणि त्यांच्या अंशांचा उपचारात उपयोग करण्यापूर्वी ख्रिस्ती व्यक्तीने केवळ आरोग्याचा विचार करू नये. बायबलचा याबद्दल काय दृष्टिकोन आहे आणि अशाप्रकारचे उपचार घेतल्यामुळे सर्वशक्तिमान परमेश्वराशी असलेल्या त्याच्या नातेसंबंधावर कसा परिणाम होईल याचा त्याने सर्वात आधी विचार केला पाहिजे.
रक्तापासून तयार केलेले पदार्थ उपचारात वापरावेत की वापरू नयेत याचा निर्णय घेण्यास मदत करणारे मुद्दे अगदी स्पष्ट आहेत. आपण बायबलमधील काही उदाहरणांवर, ऐतिहासिक आणि वैद्यकीय पार्श्वभूमीवर विचार करू, जेणेकरून हे मुद्दे समजून घेण्यास आपल्याला मदत होईल.
आज पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या सर्व वंशांचा मूळ पूर्वज, नोहा, याला यहोवा देवाने सांगितले की रक्ताला त्याने क्षुल्लक समजू नये. (उत्पत्ति ९:३, ४) देवाच्या नजरेत रक्त किती पवित्र आहे हे यहुदी लोकांना दिलेल्या नियमांवरूनही आपल्याला कळून येते: “इस्राएल घराण्यापैकी अथवा . . . परदेशीय लोकांपैकी कोणी कोणत्याहि प्रकारचे रक्त सेवन केले तर रक्त सेवन करणाऱ्या मनुष्याला मी विन्मुख होऊन त्याचा स्वजनांतून उच्छेद करीन.” या आज्ञेचे पालन न करणाऱ्याचा “स्वजनांतून उच्छेद” केला जाईल असे यहोवाने म्हटले कारण रक्त सेवन करणारा इस्राएली इतरांनाही यामुळे अशुद्ध करू शकत होता. (लेवीय १७:१०) बऱ्याच शतकांनंतर जेरूसलेम येथे भरलेल्या एका सभेत प्रेषितांनी आणि वडीलजनांनी असा निर्णय घेतला की ख्रिस्ती लोकांनी ‘रक्त वर्ज्य’ करावे. असे करणे अनैतिकता व मूर्तिपूजा यांपासून अलिप्त राहण्याइतकेच महत्त्वाचे आहे, असे सांगण्यात आले.—प्रेषितांची कृत्ये १५:२८, २९.
त्या काळी रक्त ‘वर्ज्य करण्यात’ काय सामील होते? त्या काळचे ख्रिस्ती लोक इतर लोकांप्रमाणे ताज्या किंवा साकळलेल्या रक्ताचे सेवन करत नव्हते. तसेच प्राण्याचा वध केल्यानंतर त्याच्यातील रक्त पूर्णपणे काढल्याशिवाय ते मांसही खात नसत. ब्लड सॉसेज यांसारखे रक्ताचा अंश असलेले अन्न पदार्थ देखील वर्ज्य मानले जायचे. यांपैकी कोणत्याही प्रकारे रक्त शरीरात घेणे देवाच्या नियमाचे उल्लंघन होते.—१ शमुवेल १४:३२, ३३.
पूर्वीच्या काळी रक्त सेवन करणे सर्वसामान्य होते. इतिहासकार टर्टुलियन (सा.यु. दुसरे आणि तिसरे शतक) याच्या लिखाणांवरून आपल्याला हे कळून येते. त्याकाळी काही लोकांनी ख्रिस्ती लोकांवर रक्त सेवन करण्याचा खोटा आरोप लावला तेव्हा टर्टुलियनने त्यांना निर्दोष शाबित करण्याचा प्रयत्न केला; यासाठी त्याने विशिष्ट जमातींचा उल्लेख केला, ज्यांत दोन व्यक्तींमधील करार पक्का करण्यासाठी रक्त चाखले जायचे. टर्टुलियनने रोमी लोकांचेही उदाहरण दिले जे “मिरगीचा रोग बरा करण्यासाठी . . . आखाड्यातल्या झुंजीत नुकत्याच मरण पावणाऱ्या गुन्हेगाराचे रक्त आधाशासारखे प्यायचे.”
पण या प्रथा (रोमी लोक जरी त्या आरोग्यविषयक कारणांमुळे पाळत होते तरी) ख्रिस्ती लोकांच्या दृष्टिकोनात चुकीच्या होत्या. टर्टुलियनने असे लिहीले: “आम्ही तर प्राण्यांचे रक्त देखील आपल्या आहारात घेत नाही.” रोमी लोक खऱ्या ख्रिस्ती लोकांच्या विश्वासाची परीक्षा घेण्यासाठी रक्ताचा वापर करू लागले. हे टर्टुलियनच्या पुढील शब्दांवरून स्पष्ट होते: “तर मग, मी तुम्हाला (रोमी लोकांना) विचारतो की तुम्ही असे का करता? ख्रिस्ती लोकांना जर प्राण्यांचे रक्त सेवन करण्याचा विचार घृणास्पद वाटतो, तर मग ते माणसाचे रक्त सेवन करतील असा विचार तुम्ही कोणत्या आधारावर करता?”
प्राचीन काळात ज्याप्रमाणे ख्रिस्ती लोकांना सोडून इतरांना रक्त सेवन करण्यात काहीच गैर वाटत नव्हते त्याचप्रमाणे, आज डॉक्टरांनी कोणाला रक्त द्यावे लागेल असे म्हटल्यास, बहुतेकांना यात काहीच गैर वाटणार नाही; यामुळे सर्वशक्तिमान देवाच्या नियमांचे उल्लंघन होईल, असा ते विचारही करणार नाहीत. अर्थात, यहोवाचे साक्षीदार रक्त घेत नाहीत याचा अर्थ त्यांना जीवनाची किंमत नाही असे मुळीच नाही. पण, आम्ही यहोवाचा नियम कोणत्याही परिस्थितीत पाळतो. यहोवाच्या साक्षीदारांच्या या दृष्टिकोनावर सध्या वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या प्रगतीचा काय परिणाम झाला आहे?
दुसऱ्या महायुद्धानंतर, रुग्णाच्या शरीरात रक्त संक्रमित करणे हा एक सर्वसामान्य उपचार मानला जाऊ लागला. पण हा उपचार देवाच्या आज्ञेच्या विरोधात आहे असा यहोवाच्या साक्षीदारांचा दृष्टिकोन होता; आणि आज देखील त्यांचे हेच मत आहे. पण उपचाराच्या पद्धती काळाच्या ओघात बदलल्या आहेत. १. रक्तरुधिर कोशिका; २. श्वेत कोशिका; ३. बिंबाणू (प्लॅटेलेट्स); ४. रक्तद्रव (प्लास्मा/सीरम) हे रक्ताचे चार मुख्य घटक असून ते आता एकमेकांपासून वेगळे करता येतात. यांपैकी कोणताही आवश्यक घटक डॉक्टर रुग्णाला देतात. यामुळे रक्ताच्या एकाच बाटलीतून जास्त रुग्णांचा त्यांच्या आवश्यकतेनुसार उपचार करता येतो. यहोवाच्या साक्षीदारांचे ठाम मत आहे, की रक्त किंवा त्याच्या या चार मुख्य घटकांपैकी कोणताही घटक शरीरात घेणे देवाच्या आज्ञेच्या विरोधात आहे. देवाची ही आज्ञा काटेकोरपणे पाळल्यामुळे रक्त संक्रमणाने होऊ शकणाऱ्या बऱ्याच हानीकारक आजारांपासून त्यांचा बचाव झाला आहे. उदाहरणार्थ, हेपटायटिस आणि एड्स.
पण या चार मुख्य घटकांचेही विघटन करून त्यांचे अंश वेगळे करता येणे शक्य झाले आहे. त्यामुळे आता प्रश्न येतो की रक्ताच्या
चार मुख्य घटकांपासून वेगळे केलेल्या अंशांचा आपण उपचारात वापर करू शकतो का? या अंशांचा कशाप्रकारे वापर केला जातो आणि ते घ्यावेत किंवा घेऊ नयेत हे ठरवण्याआधी खऱ्या ख्रिस्ती व्यक्तीने काय विचारात घेतले पाहिजे?रक्ताची रचना गुंतागुंतीची आहे, ते बऱ्याच पदार्थांपासून बनलेले आहे. प्लास्मा या रक्ताच्या एका मुख्य घटकात ९० टक्के पाणी असले तरी देखील त्यात कित्येक हॉर्मोन, क्षार, एन्झाईम्स, खनिजे व शर्करा यांसारखे इतर पौष्टिक पदार्थ असतात. याशिवाय ॲल्ब्युमिन यांसारखी प्रथिने, रक्त गोठण्यास सहायक ठरणारे पदार्थ, तसेच रोगांचा प्रतिकार करणाऱ्या ॲन्टीबॉडीज यांसारखे अनेक पदार्थ प्लास्माच्या माध्यमातून शरीरांच्या विविध भागांत पोचवले जातात. प्लास्मा प्रथिने वेगळी करून त्यांचा उपचारात उपयोग केला जातो. उदाहरणार्थ, हेमोफिलिया नावाच्या आजारात रुग्णाचे रक्त साकळत नाही आणि त्यामुळे सहजासहजी रक्तस्राव होऊ शकतो. या रुग्णांना क्लॉटिंग फॅक्टर क्र. ८ नावाचे प्लास्मा प्रोटीन दिले जाते. किंवा एखाद्याचे विशिष्ट रोगांपासून रक्षण करण्यासाठी डॉक्टर त्या रोगांचा प्रतिकार करू शकणाऱ्या व्यक्तीच्या प्लास्मामधून गॅमा ग्लोब्युलिन नावाचे प्रोटीन काढतात आणि ते रुग्णाला देतात. रक्ताच्या चार मुख्य घटकांपैकी असणाऱ्या एका घटकावर (प्लास्मा) प्रक्रिया करून त्यापासून वेगवेगळे अंश तयार केले जातात हे वरील उदाहरणांवरून दिसते. * यांशिवाय, इतरही प्लास्मा प्रथिनांचा उपयोग केला जातो.
रक्तातील प्लास्मापासून जसे कित्येक अंश वेगळे करता येतात त्याचप्रमाणे रक्ताच्या उरलेल्या तीन मुख्य घटकांवरही (रक्तरुधिर कोशिका, श्वेत कोशिका, बिंबाणू) प्रक्रिया करून लहान अंश तयार करता येतात. उदाहरणार्थ, श्वेत कोशिकांपासून इंटरफेरॉन आणि इंटरल्युकिन ही औषधे मिळतात; ही औषधे विशिष्ट संसर्गजन्य रोगांवर व कॅन्सरवर उपचार करण्याकरता वापरली जातात. प्लॅटेलेट्सपासूनही जखम बरी व्हायला मदत करणारा एक पदार्थ वेगळा केला जातो. अलीकडे अनेक अशी औषधे येऊ लागली आहेत जी (सुरवातीला) रक्ताच्या घटकांपासून वेगळे केलेल्या पदार्थांपासून तयार केली जातात. अशा औषधोपचारात रक्ताचे मुख्य घटक रुग्णाला दिले जात नाहीत, तर त्या घटकांचे काही अंश दिले जातात. यहोवाचे साक्षीदार हे अंश असलेली औषधे घेऊ शकतात का? याचे उत्तर आम्ही देऊ शकत नाही. बायबलमध्ये यासंबंधी इतकी सविस्तर माहिती दिलेली नाही. त्यामुळे ख्रिस्ती व्यक्तीने देवाला आठवणीत ठेवून आपल्या विवेकानुसार निर्णय घेतला पाहिजे.
काहीजण रक्तापासून तयार केलेला कोणताही पदार्थ (शरीराला तात्पुरती रोगप्रतिबंधक शक्ती देऊ शकणारे रक्त घटकांचे अंश देखील) घेणार नाहीत. ‘रक्त वर्ज्य करा’ या देवाच्या आज्ञेसंबंधी त्यांचे हे वैयक्तिक मत आहे. प्राण्याचे रक्त “जमिनीवर ओतून द्यावे” अशी इस्राएल लोकांना आज्ञा देण्यात आली होती असा ते कदाचित युक्तिवाद करतील. (अनुवाद १२:२२-२४) ही गोष्ट खरोखर विचार करण्याजोगी आहे. का? कारण गॅमा ग्लोब्युलिन, किंवा रक्त घटकांपासून वेगळे केलेले इतर औषधी पदार्थ तयार करण्यासाठी रक्त साठवून त्यावर प्रक्रिया करणे आवश्यक असते. त्यामुळे काही ख्रिस्ती बांधव ज्याप्रमाणे रक्ताचे किंवा रक्ताच्या चार मुख्य घटकांचे संक्रमण घेत नाहीत त्याचप्रमाणे वरील औषधे देखील शरीरात घेण्यास ते नकार देतात. या बांधवांच्या निर्णयाला आपण मान दिला पाहिजे.
काही ख्रिस्ती बांधव कदाचित या उलट निर्णय घेतील. अर्थात, रक्त किंवा रक्ताचे चार प्रमुख घटक शरीरात घ्यायला ते देखील नकार देतील. पण या मुख्य घटकांपासून वेगळे केलेले अंश घेण्यास कदाचित ते तयार होतील. या बाबतीतही वेगवेगळे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. एखादा ख्रिस्ती कदाचित प्लास्मापासून तयार केलेले गॅमा ग्लोब्युलिन इंजेक्शन घ्यायला तयार होईल पण रक्तातल्या लाल किंवा श्वेत कोशिकांपासून काढलेल्या औषधाचे इंजेक्शन घ्यायला मात्र तो नकार देईल. परंतु, रक्त घटकांपासून काढलेले अंश घेण्यास हरकत नाही असा विचार करण्यामागे कोणती कारणे असू शकतात?
जून १, १९९० टेहळणी बुरूज यात “वाचकांचे प्रश्न” सदरात असे सांगण्यात आले होते, की गर्भवती स्त्रीच्या रक्तातून प्लास्मा प्रथिने तिच्या बाळाच्या रक्तात जातात. बाळाचा व आईचा रक्तगट वेगवेगळा असून देखील ही प्रथिने बाळाच्या शरीरात जातात. या प्रथिनांतून बाळाला इम्युनोग्लोब्युलिन्स म्हणजेच रोगप्रतिबंधक शक्ती वाढवणारे पदार्थ मिळतात. तसेच बाळाच्या रक्तातील रक्तरुधिर कोशिकांचे साधारण आयुष्य संपल्यावर त्यांतील ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या भागात काही बदल घडून येतात. या भागांपासून बायलिरूबिन तयार होते. हे बायलिरूबिन गर्भवेष्टनातून आईच्या शरीरात जाते आणि नैसर्गिकरित्या तिच्या शरीराबाहेर फेकले जाते. काही ख्रिस्ती बांधव कदाचित असा निष्कर्ष काढतील की रक्तगट वेगवेगळे असूनही जर रक्त घटकांतील हे अंश आईच्या शरीरातून बाळाच्या शरीरात आणि बाळाच्या शरीरातून आईच्या शरीरात जाऊ शकतात तर रक्तातील प्लास्मा किंवा कोशिकांपासून वेगळे केलेले हे अंश शरीरात घेण्यास काही हरकत नाही.
या प्रश्नावर दोन ख्रिस्ती व्यक्तींचे वेगवेगळे मत असू शकते हे कबूल आहे. पण याचा अर्थ, या बाबतीत काहीही निर्णय घेतला तरी फरक पडत नाही असा आहे का? नाही. हा एक गंभीर विषय आहे. पण या विषयाचे आधारभूत तत्त्व अगदी स्पष्ट आहे. वरील माहितीवरून हे स्पष्ट आहे की यहोवाचे साक्षीदार रक्त किंवा रक्ताचे चार प्रमुख घटक शरीरात घेत नाहीत. बायबलमध्ये ख्रिस्ती लोकांना “मूर्तीला अर्पिलेले पदार्थ, रक्त, गळा दाबून मारलेले प्राणी व जारकर्म” यांपासून दूर राहण्यास सांगितले आहे. (प्रेषितांची कृत्ये १५:२९) पण रक्ताच्या घटकांपासून वेगळे केलेले अंश घेण्याचा प्रश्न आल्यास प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने विचारपूर्वक व प्रार्थनापूर्वक वैयक्तिक निर्णय घेतला पाहिजे.
एखाद्या औषधाने लगेच फायदा होईल असे सांगितल्यावर बरेच लोक ते औषध घेण्यास लगेच तयार होतील. ही औषधे घेतल्यामुळे काही दुष्परिणाम होण्याची शक्यता असली तरीसुद्धा तात्पुरत्या फायद्याकरता लोक ती स्वीकारतात. रक्त संक्रमण याचेच एक उदाहरण आहे. पण ख्रिस्ती व्यक्तीने तात्पुरत्या फायद्याच्या पलीकडे विचार केला पाहिजे. केवळ शारीरिक फायद्याचा विचार करून चालणार नाही. यहोवाचे साक्षीदार चांगल्यात चांगला औषधोपचार देऊ इच्छिणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा आदर करतात. शिवाय, कोणत्याही औषधोपचारामुळे कोणते फायदे किंवा तोटे होऊ शकतात हे जाणूनच ते निर्णय घेतात. पण रक्ताचा किंवा रक्तापासून तयार केलेल्या पदार्थांचा प्रश्न येतो तेव्हा ते केवळ फायद्या-तोट्याचा विचार करण्याऐवजी देवाचा यासंबंधी काय दृष्टिकोन आहे आणि हा औषधोपचार घेतल्यावर देवासोबतच्या आपल्या नातेसंबंधावर याचा कसा परिणाम होईल यावर ते काळजीपूर्वक मनन करतात.—स्तोत्र ३६:९.
प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने स्तोत्रकर्त्याप्रमाणे हा विश्वास बाळगला पाहिजे की “परमेश्वर देव हा सूर्य व ढाल आहे, परमेश्वर अनुग्रह व गौरव देतो, जे सात्विकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिल्यावाचून तो राहणार नाही. हे . . . परमेश्वरा, जो मनुष्य तुझ्यावर भाव ठेवितो तो कितीतरी धन्य!”—स्तोत्र ८४:११, १२.
[तळटीप]
^ परि. 12 टेहळणी बुरूज जून १५, १९७८ (इंग्रजी) आणि ऑक्टोबर १, १९९४ (इंग्रजी) अंकातील “वाचकांचे प्रश्न” पाहा. फार्मास्युटिकल कंपन्यांनी थेट रक्तापासून तयार न केलेले पण रक्ताच्या घटकांपासून काढलेल्या अंशासारखेच असणारे सिंथेटिक पदार्थ तयार केले आहेत. रुग्णाला पूर्वी देण्यात आलेल्या रक्तघटकांच्या अंशांऐवजी हे पदार्थ देण्याचा सल्ला डॉक्टर देऊ शकतात.
[३० पानांवरील चौकट]
डॉक्टरांना तुम्ही हे प्रश्न विचारू शकता
तुमच्या शस्त्रक्रियेदरम्यान किंवा औषधोपचारादरम्यान रक्तापासून तयार केलेले औषध द्यायची गरज असल्यास डॉक्टरांना विचारा:
मी यहोवाचा साक्षीदार असल्यामुळे मला कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही प्रकारचे रक्त संक्रमण (रक्त किंवा रक्तरुधीर कोशिका, श्वेत कोशिका, प्लॅटेलेट्स किंवा प्लास्मा) देण्यात येऊ नये हे माझ्यावर उपचार करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले आहे का?
डॉक्टरांनी लिहून दिलेले एखादे औषध प्लास्मा, रक्तरुधीर कोशिका, श्वेत कोशिका किंवा प्लॅटेलेट्सपासून तयार केले आहे का याची डॉक्टरांकडे विचारणा करा:
हे औषध रक्ताच्या चार प्रमुख घटकांपैकी एकापासून तयार केलेले आहे का? त्यात नेमके काय आहे हे तुम्हाला सांगता येईल का?
रक्त घटकांपासून तयार केलेले हे औषध किती प्रमाणात आणि कशाप्रकारे दिले जाईल?
माझ्या विवेकानुसार मी हे औषध घ्यायला तयार झालो तर माझ्या आरोग्याला कोणत्याप्रकारचे नुकसान होण्याची शक्यता आहे?
माझ्या विवेकानुसार मी हे औषध घ्यायला नकार दिल्यास इतर कोणते पर्यायी औषधोपचार करता येतील?
या बाबतीत विचार केल्यावर मी माझा निर्णय आपल्याला केव्हा कळवू शकतो?