व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अनेक राष्ट्रांकरता ज्योतीवाहक

अनेक राष्ट्रांकरता ज्योतीवाहक

जीवन कथा

अनेक राष्ट्रांकरता ज्योतीवाहक

जॉर्ज यंगची कहाणी रुथ यंग निकोलसनद्वारे कथित

“तर मग आपले चर्च असे मूग गिळून गप्प का बसले आहे? . . . सत्य माहीत होऊनही आपण गप्प राहणे बरोबर आहे का? बायबलची योग्य शिकवण मला माहीत झाली आहे आणि ती मी तुम्हांपुढे शाबीत केली आहे. आणि इतरांपुढेही न कचरता आपण ती शाबीत केली पाहिजे!”

चर्चला राजीनामा देण्याकरता बाबांनी १९१३ मध्ये लिहिलेल्या ३३ पानी पत्रात त्यांनी असं म्हटलं होतं. तेव्हापासून बाबांनी त्यांच्या मृत्यूपर्यंत अनेक देशांत देवाच्या वचनाचा प्रकाश नेला. (फिलिप्पैकर २:१५) लहानपणापासूनच मी नातेवाईकांकडून आणि बातमीपत्रकं व मासिकांमधून बाबांची माहिती गोळा करू लागले. बाबांच्या जीवनाकडे पाहिल्यावर “परराष्ट्रीयांचा प्रेषित” ठरलेल्या पौलाची मला आठवण झाल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या दोघांमध्ये मला पुष्कळसं साम्य दिसून येतं. त्याच्याप्रमाणे बाबाही लोकांना यहोवाचा संदेश सांगण्याकरता कोणत्याही देशात किंवा बेटावर जायला नेहमी तयार असत. (रोमकर ११:१३; स्तोत्र १०७:१-३) त्यांच्याबद्दल मी तुम्हाला आणखी सांगू इच्छिते.

सुरवातीची वर्षं

जॉर्ज यंग हे माझ्या बाबांचे नाव. मार्ग्रेट आणि जॉन यंग हे माझे आजीआजोबा होते. ते स्कॉटलंडचे रहिवाशी असून प्रिस्बेटिरियन चर्चचे सदस्य होते. आणि स्कॉटलंडमधील एडिनबर्ग येथून पश्‍चिम कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबियामध्ये राहायला गेल्यानंतर सप्टेंबर ८, १८८६ रोजी बाबांचा जन्म झाला. अलेक्झॅन्डर, जॉन आणि माल्कम हे बाबांचे तीन थोरले भाऊ. या तिघांचा जन्म स्कॉटलंडमध्ये झाला होता. मेरियोन ही बाबांपेक्षा दोन वर्षांनी धाकटी होती. तिला सर्व लाडानं नेली म्हणत.

ब्रिटिश कोलंबिया येथील व्हिक्टोरियाच्या जवळपास असलेल्या सॅनिच या गावातील एका फार्मवर या पाचही भावंडांचं बालपण अगदी आनंदात गेलं. पण त्याचबरोबर प्रत्येकाला स्वतःचं काम स्वतःच करण्याचं शिक्षण त्यांच्या आईवडिलांनी त्यांना दिलं. त्यामुळे, आजीआजोबा कधी व्हिक्टोरियाला गेलेच तर ही सर्व मुलं घरची आणि बाहेरची कामं सांभाळत.

मोठं झाल्यावर बाबा आणि काका इतरही कामं करायला शिकले. ते खाणीत काम करू लागले आणि त्यांनी लाकडाची वखारही घातली. त्यांचा व्यापार चांगला चालू लागला आणि त्यांचं नाव झालं. बाबा फक्‍त पैशाचा व्यवहार सांभाळायचे.

पण बाबांना आध्यात्मिक गोष्टींची ओढ असल्यामुळे त्यांनी फादर व्हायचं ठरवलं. त्याच दरम्यान वॉच टावर सोसायटीचे पहिले अध्यक्ष चार्ल्स टेझ रसल यांचे लेख बातमीपत्रांत छापून यायचे. ते वाचून बाबा खूपच प्रभावित झाले. त्यामुळेच त्यांनी चर्चला एक लांबलचक त्यागपत्रं लिहिलं. या लेखाच्या सुरवातीला त्यातील काही भागाचा उल्लेख करण्यात आला आहे.

अमर आत्मा, नरकाग्नी यांसारख्या चर्चच्या शिकवणी चुकीच्या कशा आहेत हे या पत्रात बाबांनी, बायबलच्या आधारावर दाखवून दिलं होतं. त्यांनी या पत्रात हेही शाबीत करून दाखवलं, की त्रैक्याची शिकवण बायबलची नसून ती दुसऱ्‍या धर्मांतून आली आहे. हे पत्र लिहिल्यानंतर बाबा येशूच्या शिकवणींप्रमाणे चालू लागले आणि मोठ्या आवेशाने प्रचार कार्यात भाग घेऊ लागले. देवाच्या सेवेकरता त्यांनी आपलं संपूर्ण जीवन वेचलं.

सन १९१७ मध्ये, बाबांना प्रवासी पर्यवेक्षकांचं काम सोपवण्यात आलं. कॅनडाच्या बाहेरील सर्व शहरांमध्ये आणि गावांमध्ये जाऊन बाबांनी भाषणं दिली, “फोटो ड्रामा ऑफ क्रिएशन” नावाचा मोशन पिक्चर आणि स्लाईड्‌स त्यांनी दाखवल्या. या कार्यक्रमांना थिएटर गच्च भरायचं. १९२१ सालापर्यंत टेहळणी बुरूज मासिकात त्यांच्या संपूर्ण कार्यक्रमाचं वेळापत्रक छापून यायचं.

एका विनीपेग बातमीपत्रानं अशी माहिती दिली, की यंग यांनी २,५०० श्रोत्यांपुढे भाषण दिलं. आणि हॉल लोकांनी पूर्णपणे भरल्यामुळे पुष्कळ लोकांना आत प्रवेश मिळाला नाही. ओटावा येथे “टू हेल ॲण्ड बॅक” या विषयावर त्यांनी भाषण दिलं. तेथील एका गृहस्थानं म्हटलं, की: “भाषण संपल्यावर जॉर्ज यंग यांनी श्रोत्यांमधील सर्व पाळकांना स्टेजवर येऊन त्यांच्याशी चर्चा करण्याचं आमंत्रण दिलं, पण त्यांच्यापैकी कोणीच वर आलं नाही. तेव्हाच मला कळलं, की हेच सत्य आहे.”

प्रवासी पर्यवेक्षकाच्या भेटी दरम्यान जास्तीत-जास्त कार्य करण्यात बाबा गुंतलेले असायचे. पुढच्या भेटीला जाण्याकरता ट्रेन पकडण्याच्या घाईत ते नेहमी असत. कारनं प्रवास करणार असतील तर ते पहाटेच प्रवासाला निघायचे. उदार, प्रेमळ, आवेशी अशी त्यांची प्रतिमा तयार झाली होती.

१९१८ साली अल्बर्टाच्या एडमन्टन येथे झालेलं अधिवेशन खास म्हणावं लागेल. या अधिवेशनात नेलीचा बाप्तिस्मा होणार असल्यामुळे बाबांच्या घरातील सर्वजण त्या अधिवेशनाला आले होते. शिवाय, हेच शेवटलं अधिवेशन होतं जेव्हा बाबा आणि त्यांचे सर्व भाऊ एकत्र आले होते. दोन वर्षांनंतर माल्कम न्युमोनियामुळे गेला. बाबा आणि त्यांच्या तिन्ही भावांना व वडिलांना येशूसोबत स्वर्गात राज्य करण्याची आशा होती. पृथ्वीवर असताना त्यांनी शेवटपर्यंत विश्‍वासूपणे यहोवाची सेवा केली.—फिलिप्पैकर ३:१४.

परदेशी क्षेत्रात

सप्टेंबर १९२१ मध्ये कॅनडाचा प्रचाराचा दौरा संपल्यानंतर, जोसफ एफ. रदरफोर्ड (तेव्हाचे संस्थेचे अध्यक्ष) यांनी बाबांना कॅरिबियन द्वीपांवर जायला सांगितले. बाबा “फोटो ड्रामा ऑफ क्रिएशन” मोशन पिक्चर दाखवायचे तेव्हा असंख्य लोक तो पाहायला यायचे. एकदा त्यांनी त्रिनिदाद येथून आम्हाला पत्र लिहिलं: “फोटो ड्रामा जिथं दाखवला जात होता तो हॉल गच्च भरला होता. आतमध्ये जागा नसल्यामुळे पुष्कळ लोकांना माघारी पाठवण्यात आलं. दुसऱ्‍या दिवशीही रात्री पुन्हा एकदा हॉल गच्च भरला.”

मग, १९२३ साली बाबांना ब्राझीलला पाठवण्यात आलं. तेथेही पुष्कळ लोक त्यांचं भाषण ऐकायला आले होते. कधीकधी त्यांना भाषांतराकरता बाहेरच्या लोकांची मदत घ्यावी लागली. डिसेंबर १५, १९२३ च्या टेहळणी बुरूजमध्ये अशी बातमी आली: “जून १ ते सप्टेंबर ३० पर्यंत बंधू यंग यांनी २१ जाहीर सभा घेतल्या. त्यांकरता एकूण ३,६०० लोक उपस्थित होते; ४८ वेळा मंडळ्यांच्या सभा घेतल्या गेल्या आणि या सभांना १,१०० लोक उपस्थित होते; पोर्तुगीज भाषेच्या साहित्याच्या ५००० प्रती मोफत वाटण्यात आल्या.” “आता जिवंत असलेले कोट्यवधी लोक कधीही मरणार नाहीत” या बाबांच्या भाषणालाही लोकांनी गर्दी केली होती.

ब्राझीलमध्ये मार्च ८, १९९७ रोजी नवीन शाखा दफ्तराचं समर्पण झालं. समर्पण पत्रिकेवर अशी बातमी होती: “१९२३: जॉर्ज यंग ब्राझीलला आले. रीउ दे झानेइरुच्या मध्यभागी त्यांनी शाखा दफ्तर बांधलं.” स्पॅनिश भाषेत बायबल साहित्य उपलब्ध होतं, पण ब्राझीलची मुख्य भाषा पोर्तुगीज असल्यामुळे या भाषेतही ते उपलब्ध असण्याची गरज होती. म्हणूनच, ऑक्टोबर १, १९२३ पासून टेहळणी बुरूज पोर्तुगीज भाषेत छापण्यात येऊ लागलं.

ब्राझीलमध्ये बाबांच्या अनेक ओळखी होत्या. त्यांतील काहींच्या आठवणी अजूनही आमच्या मनांत ताज्या आहेत. जेसिन्थो काब्रल या पोर्तुगीज गृहस्थाने आम्हाला त्याच्या घरात सभेसाठी जागा दिली. पुढे त्याने बायबल सत्य स्वीकारलं आणि ब्राझील बेथेलमध्ये सेवा करू लागला. मॅनवेल डा सेल्वा झोरडाऊ हा पोर्तुगीज तरुण बाबांचं भाषण ऐकल्यानंतर पूर्ण वेळेच्या सेवेकरता आपल्या मायदेशी परतला.

ब्राझीलमध्ये बाबांनी त्यांचा बहुतेक प्रवास ट्रेननं केला. त्यांना अनेक आस्थेवाईक लोक भेटले. असाच प्रवास करताना एकदा, त्यांची बोनी व कॅटरिना ग्रीन या जोडप्याशी भेट झाली. बाबा त्यांच्या घरी दोन आठवडे राहिले व त्यांनी त्यांना शास्त्रवचनांतून बरीच काही माहिती दिली. या जोडप्याच्या कुटुंबातील सात जणांनी नंतर बाप्तिस्मा घेतला.

सारा बेलोना फर्गीसन नावाच्या एका तरुणीला बाबा १९२३ साली भेटले. सारा तिच्या कुटुंबियांसोबत ब्राझीलला १८६७ मध्ये राहायला आली होती. १८९९ पासून तिला टेहळणी बुरूज मासिकं नियमितरीत्या पोस्टाने येत होतं. सारा, तिची चार मुलं आणि सॅली ही आणखी एक बहीण बाबांच्या भेटीची आतुरतेने वाट पाहायची. सॅलीचा बाप्तिस्मा मार्च ११, १९२४ रोजी झाला, पण बाबा तिला खूप आधीपासूनच ओळखायचे.

त्यानंतर बाबा दक्षिण अमेरिकेत प्रचाराला गेले. नोव्हेंबर ८, १९२४ रोजी त्यांनी पेरूहून पत्र लिहिलं: “लिमा आणि कॅयियो शहरांमध्ये नुकतेच १७,००० ट्रॅक्ट वितरित करून झाले.” तेथून मग ते बोलिव्हियाला ट्रॅक्टचे वितरण करायला गेले. त्या भेटीविषयी त्यांनी लिहिलं: “यहोवा खरोखर माझ्या पाठीशी आहे. ॲमेझोन नदीच्या मुखापाशी राहणाऱ्‍या एका इंडियन मनुष्याची मला खूप मदत मिळाली. तो आपल्यासोबत १,००० ट्रॅक्ट आणि काही पुस्तकं नेत आहे.”

यहोवाच्या आशीर्वादामुळेच बाबांना मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील अनेक देशांतील लोकांच्या मनांत सत्याचं बीज पेरता आलं. डिसेंबर १, १९२४ च्या टेहळणी बुरूज मासिकाने म्हटलं: “जॉर्ज यंग दक्षिण अमेरिकेत दोन वर्षांपासून आहेत. . . . त्यांनी पुंटा अरेनास, स्ट्रेट्‌स ऑफ मॅगलन या ठिकाणी सुवार्ता पोहंचवली.” कोस्टा रिका, पनामा व व्हेनेझुएला सारख्या देशांतही प्रचार करणाऱ्‍यांपैकी बाबा पहिले होते. त्यांना मलेरिया झाला, पण त्यांनी प्रचार कार्य थांबवलं नाही.

युरोपला

मार्च १९२५ साली बाबा जहाजाने युरोपला गेले. स्पेन व पोर्तुगालमध्ये ३,००,००० ट्रॅक्टचे वितरण करण्याचा आणि बंधू रदरफोर्ड यांच्या जाहीर भाषणांची व्यवस्था करण्याचा त्यांचा विचार होता. पण स्पेनला आल्यावर मात्र त्यांनी, तेथील तंग वातावरण पाहून बंधू रदरफोर्ड यांची जाहीर भाषणं रद्द करण्याचा निर्णय घेतला व तो त्यांना कळवला.

उत्तरात बंधू रदरफोर्डनी यशया ५१:१६ या वचनाचा उल्लेख केला. त्यात असं म्हटलं आहे: “मी आकाशाची स्थापना करावी, पृथ्वीचा पाया घालावा व तू माझी प्रजा आहेस असे सीयोनास म्हणावे म्हणून मी आपली वचने तुझ्या मुखात घातली, आपल्या हाताची छाया मी तुजवर केली.” यावर बाबा म्हणाले, “देवाची अशी इच्छा आहे, की मी भाषणाची व्यवस्था करावी आणि सर्व काही त्याच्या हाती सोपवून द्यावं.”

मे १०, १९२५ रोजी बंधू रदरफोर्ड यांनी, बार्सिलोनामध्ये एक भाषण दिलं. २,००० पेक्षा जास्त लोक भाषणाला हजर होते. आणि स्टेजवर एक सरकारी अधिकारी व एक खास रक्षकही उपस्थित होता. मॅडरिडमध्येही त्यांनी भाषण दिलं. तेथे १,२०० लोक उपस्थित होते. या भाषणांमुळे पुष्कळ आस्थेवाईक लोक सत्यात आले. परिणामी स्पेनमध्ये शाखा दफ्तराची गरज भासली. १९७८ च्या यिअरबुकमध्ये म्हटलं आहे: “जॉर्ज यंग यांच्या मार्गदर्शनामुळे हे शाखा दफ्तर खोलण्यात आलं.”

मे १३, १९२५ रोजी, बंधू रदरफोर्ड यांनी पोर्तुगालमधील लिस्बन शहरात भाषण दिलं. त्या भाषणालाही लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. चर्चच्या पाळकांनी गदारोळ करून सभेत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला खरा, पण त्याचा काही फायदा झाला नाही. स्पेन आणि पोर्तुगाल येथे बंधू रदरफोर्ड यांची भाषणं झाल्यानंतर बाबा “फोटो-ड्रामा” दाखवायचे. बायबल साहित्य छापून ते वितरीत करण्याचीही त्यांनी व्यवस्था केली. १९२७ मध्ये त्यांनी असं म्हटलं, की राज्याची सुवार्ता “स्पेनच्या प्रत्येक शहरात आणि गावात” जाऊन पोहंचली आहे.

सोव्हियत युनियन येथे प्रचार

बाबांची पुढील मिशनरी नेमणूक सोव्हियत युनियनमध्ये होती. ऑगस्ट २८, १९२८ रोजी ते तेथे पोहंचले. ऑक्टोबर १०, १९२८ रोजी त्यांनी त्यांच्या पत्रात असं म्हटलं:

“देवाच्या राज्याची आपल्याला किती गरज आहे हे रशियाची स्थिती पाहिल्यावर मला जाणवलं. मी येथील नवीन भाषा हळूहळू शिकत आहे. माझी भाषणं भाषांतर करणारा यहुदी असूनही त्याचा येशूवर आणि बायबलवर विश्‍वास आहे. माझ्याकडे खूप मनोरंजक अनुभव आहेत, पण ते सर्व मी आता लिहू शकत नाही. कारण मला इथं किती दिवस राहू देतील हे मला माहीत नाही. मागच्या आठवडी मला २४ तासांत निघण्याची नोटीस मिळाली होती, पण मग मी कसेतरी करून येथे आणखी काही दिवस राहण्याची परवानगी मिळवली आहे.”

युक्रेनमधील खारकोव या एका प्रमुख शहरातील काही बांधवांना बाबा जाऊन भेटले तेव्हा सर्वांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. दररोज मध्यरात्रीपर्यंत लहानसं अधिवेशन भरवलं जायचं. या सभांबद्दल बाबांनी म्हटलं: “अधिकाऱ्‍यांनी आपल्या बांधवांची सर्व पुस्तकं जप्त केली, त्यांनी त्यांना खूप छळलं, पण आपल्या बांधवांचा सेवाकार्यातील आनंद तीळमात्रही कमी झाला नाही.”

जून २१, १९९७ रोजी रशियाच्या सेंट पिट्‌सबर्ग येथे नवीन शाखा दफ्तराचं समर्पण करण्यात आलं. त्यावेळी उपस्थितांना देण्यात आलेल्या पत्रिकेत सोव्हियत युनियनमध्ये बाबांनी केलेल्या सेवेचा उल्लेख होता. तसेच बाबांना मॉस्कोत पाठवण्यात आलं आणि तेथे त्यांनी “रशियामध्ये वितरित करण्याकरता फ्रीडम फॉर द पिपल्स आणि व्हेअर आर द डेड? या दोन पुस्तिकांच्या १५,००० प्रती छापण्याची” परवानगी मिळवली याबद्दल देखील लिहिलं होतं.

रशियाहून आल्यावर बाबांना अमेरिकेत प्रवासी कार्यासाठी नेमण्यात आलं. दक्षिण डकोटा येथील नलीना आणि वर्डा पूल या सख्ख्या बहिणींच्या घरी त्यांनी भेट दिली. या दोघी जणी काही वर्षांनंतर पेरू येथे मिशनरी कार्य करू लागल्या. बाबांच्या अथक सेवेची त्यांनी प्रशंसा केली. त्या म्हणतात: “पूर्वीच्या बांधवांमध्ये खरोखरच पायनियर आत्मा होता. कोणत्याही देशात जाऊन सेवा करण्याची त्यांची तयारी असायची. त्यांच्याकडे जास्त सामानसुमान नसायचे. पण त्यांचे अंतःकरण मात्र यहोवाबद्दलच्या प्रेमानं ओतप्रोत भरलेलं असायचं. या प्रेमामुळेच ते आवेशाने देवाची सेवा करायचे.”

विवाह आणि दुसरा दौरा

ऑन्टारियोच्या मॅनटुलीन द्वीपावर राहणाऱ्‍या क्लेरा ह्‍युबर्टबरोबर बाबांचा अनेक वर्षांपासून पत्रव्यवहार चालला होता. जुलै २६, १९३१ रोजी ओहायो कोलंबस येथे झालेल्या अधिवेशनाला ते दोघेही उपस्थित होते. याच अधिवेशनात बायबल विद्यार्थ्यांनी यहोवाचे साक्षीदार हे नाव धारण केलं होतं. (यशया ४३:१०-१२) या अधिवेशनाच्या एका आठवड्यानंतर त्यांनी लग्न केलं. बाबा पुन्हा एकदा त्यांच्या दुसऱ्‍या दौऱ्‍यासाठी निघाले. त्यांनी या दौऱ्‍यादरम्यान कॅरिबियन द्वीपावरील बांधवांना सभांची व्यवस्था करण्यास मदत केली व घरोघरच्या सेवेबद्दलचेही त्यांना प्रशिक्षण दिलं.

आईला सुरीनाम, सेंट किट्‌स आणि इतर पुष्कळ ठिकाणांहून बाबा फोटो, कार्ड आणि पत्रं पाठवायचे. पत्रांमध्ये प्रचार कार्याच्या प्रगतीचा उल्लेख असायचा. कधीकधी तर बाबा त्या ठिकाणच्या पक्ष्यांची, प्राण्यांची, वनस्पतींची देखील माहिती पाठवायचे. १९३२ सालच्या जून महिन्यात बाबांची कॅरिबियन द्वीपांवरील नेमणूक बदलली. नेहमीप्रमाणे ते पॅसेंजर जहाजातल्या कमी भाडे असलेल्या विभागातून प्रवास करून कॅनडाला आले. त्यानंतर आईबाबांनी एकत्र मिळून पूर्ण वेळेची सेवा केली. १९३२/३३ सालच्या हिवाळ्यात इतर पूर्ण वेळेच्या सेवकांबरोबर ओटावा येथे त्यांनी सेवा केली.

अल्पावधीचे कौटुंबिक जीवन

डेव्हिड या माझ्या भावाचा १९३४ मध्ये जन्म झाला. लहानपणी पेटीवर उभं राहून तो “भाषणं” द्यायचा. मोठा झाल्यावर त्याने बाबांसारखाच आवेश दाखवला. आईबाबा आणि डेव्हिड कारनं कॅनडाच्या उत्तर किनाऱ्‍यापासून पश्‍चिम किनाऱ्‍यापर्यंत असलेल्या सर्व मंडळ्यांना भेटी द्यायचे. कारच्या छप्परावर लाऊड स्पीकर्स वगैरे बांधलेलं असायचे. १९३८ मध्ये माझा जन्म झाला. बाबा तेव्हा ब्रिटिश कोलंबिया येथे सेवा करत होते. डेव्हिडला अजूनही आठवतं, की माझ्या जन्मानंतर त्या तिघांनी गुडघे टेकून यहोवाचे आभार मानले होते.

आम्ही १९३९ च्या हिवाळ्यात वॅन्कूवर येथे राहत होतो आणि बाबा तेथील मंडळ्यांना भेटी देत होते. आतापर्यंत जमवलेल्या पत्रांमध्ये बाबांनी जानेवारी १४, १९३९ रोजी आम्हा तिघांना लिहिलेलं पत्रंही आहे. बाबा तेव्हा ब्रिटिश कोलंबिया येथील व्हरनॉन येथे सेवा करत होते. त्यात त्यांनी म्हटलं आहे: “तुम्हा सर्वांना माझ्याकडून चुंबन आणि आलिंगन.” आम्हा तिघांना उद्देशून त्यांनी दोन शब्द लिहिले होते. पीक फार आहे, पण कामकरी थोडे आहेत असं त्यांनी या पत्रात म्हटलं होतं.—मत्तय ९:३७, ३८.

वॅन्कूवरहून येऊन त्यांना फक्‍त एक आठवडा झाला होता. अचानक एका सभेच्या दरम्यान बाबा खाली कोसळले. डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना ब्रेन ट्युमर झाल्याचं समजलं. मे १, १९३९ मध्ये त्यांचं पार्थिव जीवन समाप्त झालं. मी तेव्हा नऊ महिन्यांची होते आणि डेव्हिड फक्‍त पाच वर्षांचा होता. जून १९, १९६३ रोजी आई देखील आम्हाला सोडून गेली. तिला देखील स्वर्गीय जीवनाची आशा होती.

अनेक राष्ट्रांमध्ये सुवार्ता सांगण्याच्या विशेषाधिकाराबद्दलच्या भावना बाबांनी आईला लिहिलेल्या एका पत्रात व्यक्‍त केल्या. त्यात त्यांनी असं म्हटलं: “या सर्व देशांमध्ये देवाच्या राज्याचा प्रकाश पोहंचवण्याकरता यहोवानं मला निवडलं आहे. त्याच्या पवित्र नामाची नेहमी स्तुती असो. आपल्यासारख्या क्षुद्र लोकांकडून त्याचा गौरव होणे हा किती मोठा बहुमान!”

आज, आईबाबांची मुलं, नातवंडं आणि पतवंडं देखील यहोवा देवाची सेवा करत आहेत. बाबा नेहमी इब्री लोकांस ६:१० या वचनाचा उल्लेख करायचे. तिथे म्हटलं आहे, “तुमचे कार्य व तुम्ही पवित्र जनांची केलेली व करीत असलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखविलेली प्रीति, ही विसरून जाण्यास तो अन्यायी नाही.” आम्ही देखील बाबांचं काम कधीही विसरणार नाही!

[२३ पानांवरील चित्र]

आपल्या तीन भावांबरोबर बाबा, उजवीकडे

[२५ पानांवरील चित्रे]

बंधू वुडवर्थ, बंधू रदरफोर्ड आणि बंधू मॅकमिलन यांच्या सोबत बाबा (उभे)

खाली: रसल यांच्याबरोबर असलेल्या बांधवांबरोबर बाबा (अगदी डावीकडे)

[२६ पानांवरील चित्रे]

आईबाबा

खाली: त्यांच्या लग्नाच्या दिवशी

[२७ पानांवरील चित्र]

बाबांच्या मृत्यूनंतर काही वर्षांनी डेव्हिड आणि आईबरोबर घेतलेला फोटो