व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

उत्तम आदर्शांचे तुम्ही अनुकरण करत आहात का?

उत्तम आदर्शांचे तुम्ही अनुकरण करत आहात का?

उत्तम आदर्शांचे तुम्ही अनुकरण करत आहात का?

“मासेदोनिया व अखया ह्‍यातील सर्व विश्‍वास ठेवणारे ह्‍यांना तुम्ही आदर्श झाला.” प्रेषित पौलाने थेस्सलनीका येथे राहणाऱ्‍या ख्रिस्ती बांधवांना उद्देशून वरील शब्द लिहिले. कारण या बांधवांनी आपल्या वागणुकीने खरोखरच इतर बांधवांपुढे एक उत्तम आदर्श मांडला होता. थेस्सलनीका येथील बांधव देखील प्रेषित पौल व त्याच्या साथीदारांच्या आदर्शाचे अनुकरण करत होते. पौलाने त्यांना म्हटले: “आमची सुवार्ता केवळ शब्दाने नव्हे, तर सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने व पूर्ण निर्धाराने तुम्हाला कळविण्यात आली; तसेच तुमच्याकरिता आम्ही तुमच्याबरोबर असताना कसे वागलो हे तुम्हास ठाऊक आहे. तुम्ही . . . आमचे . . . अनुकरण करणारे झाला.”—१ थेस्सलनीकाकर १:५-७.

थेस्सलनीका येथील बांधवांवर पौलाची इतकी चांगली छाप का पडली? कारण पौलाने बांधवांना केवळ उपदेश केला नाही. पौलाचे जीवन त्याच्या उपदेशांपेक्षाही बोलके होते. प्रचार कार्याखेरीज, विश्‍वास, सहनशीलता आणि आत्मत्याग यांसारख्या गुणांच्या बाबतीतही पौलाने एक उत्तम आदर्श मांडला. त्याच्या आदर्शाचे अनुकरण केल्यामुळेच थेस्सलनीका येथील बांधवांनी त्यांच्यावर पुष्कळ ‘संकटे’ आली तरी सत्य स्वीकारले. पण थेस्सलनीकामधील ख्रिश्‍चनांना केवळ पौल व त्याच्यासोबत कार्य करणाऱ्‍या बांधवांकडूनच नव्हे, तर परीक्षेत अढळ राहणाऱ्‍या इतर भाऊबहिणींकडून देखील उत्तेजन मिळाले होते. म्हणूनच पौलाने थेस्सलनीकाकरांना लिहिले: “बंधूनो, यहूदीयातील देवाच्या ज्या मंडळ्या ख्रिस्त येशूच्या ठायी आहेत त्यांचे तुम्ही अनुकरण करणारे झाला, म्हणजे त्यांनी यहूद्यांच्या हातून जी दुःखे सोसली तीच तुम्हीहि आपल्या देशबांधवांच्या हातून सोसली.”—१ थेस्सलनीकाकर २:१४.

ख्रिस्त येशू—सर्वोत्तम आदर्श

पौलाने स्वतः दुसऱ्‍यांकरता एक उत्तम आदर्श मांडला होता, पण त्याने म्हटले, की आपल्या सर्वांकरता येशू ख्रिस्त सर्वोत्तम आदर्श आहे. (१ थेस्सलनीकाकर १:६) आपला प्रमुख आदर्श येशूच होता आणि आहे. प्रेषित पेत्राने लिहिले: “ह्‍याचकरिता तुम्हास पाचारण करण्यात आले आहे; कारण ख्रिस्तानेहि तुम्हांसाठी दुःख भोगले आणि तेणेकरून तुम्ही त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालावे म्हणून त्याने तुम्हांकरिता कित्ता घालून दिला आहे.”—१ पेत्र २:२१.

येशूचा मृत्यू होऊन सुमारे २००० वर्षे उलटली आहेत. तेव्हापासून तो स्वर्गात असल्यामुळे त्याला “कोणी पाहू शकत नाही.” (१ तीमथ्य ६:१६) मग आपण त्याचे अनुकरण कसे करू शकतो? एक मार्ग म्हणजे, येशूच्या जीवनाबद्दल सांगणाऱ्‍या बायबलमधील चार पुस्तकांचा सखोल अभ्यास करून. मत्तय, मार्क, लूक व योहान ही चार पुस्तके आपल्याला त्याच्या गुणांबद्दल, जीवनातील घटनांबद्दल आणि त्याच्या ‘चित्तवृत्तीबद्दल’ बरीच माहिती देतात. (फिलिप्पैकर २:५-८) याशिवाय, सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य या पुस्तकाचाही काळजीपूर्वक अभ्यास केल्यास आपल्याला येशूबद्दल बरीच माहिती मिळते; या पुस्तकात येशूच्या जीवनातील घटनांचे सविस्तर व क्रमानुसार वर्णन केलेले आहे. *

येशूच्या आत्मत्यागी वृत्तीचा प्रेषित पौलावर फार प्रभाव पडला होता. त्यामुळेच त्याने करिंथ येथील ख्रिस्ती बांधवांना म्हटले: “मी तुमच्या जिवांसाठी फार आनंदाने खर्च करीन व मी स्वतः सर्वस्वी खर्ची पडेन.” (२ करिंथकर १२:१५) त्याने खरोखरच येशूचा आदर्श समोर ठेवला. आपणही ख्रिस्ताच्या महान आदर्शाचा विचार केल्यास, आपल्याला देखील त्याच्याप्रमाणेच वागण्याची व विचार करण्याची प्रेरणा मिळत राहील.

उदाहरणार्थ, भौतिक गरजांच्या बाबतीत आपण देवावर विसंबून राहावे असे येशूने शिकवले. पण त्याने असे केवळ शिकवलेच नाही, तर यहोवावर आपला पूर्ण विश्‍वास आहे व तो आपली काळजी घेईल या त्याच्या प्रतिज्ञेवर आपला पूर्ण भरवसा आहे हे त्याने दैनंदिन जीवनातून दाखवून दिले. एकदा त्याने म्हटले: “खोकडांस बिळे व आकाशातील पांखरास कोटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकावयास ठिकाण नाही.” (मत्तय ६:२५; ८:२०) तुमच्या बाबतीत काय? तुम्ही सतत भौतिक गरजांचीच काळजी करत असता का, किंवा त्या पूर्ण करण्यासाठीच सतत धडपड करत असता का? की जीवनात तुम्ही देवाच्या राज्याला प्राधान्य देता? यहोवाच्या सेवेविषयी तुमचा दृष्टिकोन कसा आहे? येशूसारखाच तुमचा दृष्टिकोन आहे का? बायबल आपल्याला सांगते की येशूने केवळ आवेशी असण्याचा उपदेशच दिला नाही, तर त्याने स्वतः मोठ्या आवेशाने देवाचे सेवाकार्य पूर्ण केले. (योहान २:१४-१७) प्रेमाच्या बाबतीतही येशूने किती अप्रतिम उदाहरण आपल्यासमोर ठेवले! आपल्या शिष्यांकरता त्याने स्वतःचा जीव देखील दिला! (योहान १५:१३) तुम्ही आपल्या ख्रिस्ती बांधवांबद्दल प्रेम दाखवून येशूचे अनुकरण करत आहात का? की केवळ त्यांच्याकडे बोट दाखवण्याची तुमची वृत्ती आहे?

हे खरे आहे, की आपल्याला येशूचे हुबेहूब अनुकरण करता येणार नाही. पण आपण ‘प्रभु येशू ख्रिस्ताला परिधान करण्याचा’ अर्थात त्याच्या उदाहरणाचे अनुकरण करण्याचा जो प्रयत्न करतो तो पाहून यहोवाला निश्‍चितच आनंद होतो.—रोमकर १३:१४.

“कळपाला कित्ते”

आपल्याकरता मंडळीत कोणी आदर्श आहे का? हो निश्‍चितच आहे! मंडळीत जबाबदारीच्या पदांवर काम करणाऱ्‍यांकडून ही अपेक्षा केली जाते, की ते मंडळीकरता आदर्श असावेत. पौलाने तीताला सांगितले की “अदूष्य” व्यक्‍तीलाच वडील म्हणून नियुक्‍त केले जावे. तीत हा क्रेत येथील मंडळ्यांची सेवा करीत होता व मंडळ्यांवर वडील नियुक्‍त करण्याचे काम त्याचे होते. (तीत १:५, ६) प्रेषित पेत्रानेही “वडिलांना” असे सांगितले की त्यांनी ‘कळपाला कित्ते व्हावे.’ (१ पेत्र ५:१-३) सेवा सेवकांविषयी काय? त्यांना देखील ‘चांगली सेवा करण्याचा’ सल्ला दिला आहे.—१ तीमथ्य ३:१३, इजी टू रीड व्हर्शन.

अर्थात ख्रिस्ती सेवेकरता आवश्‍यक असणारे सगळेच गुण प्रत्येक वडिलात किंवा सेवा सेवकात असावेत किंवा यांपैकी प्रत्येकानेच सर्व बाबतीत निपुण असावे अशी अपेक्षा करणे बरोबर ठरणार नाही. पौलाने रोम येथील ख्रिस्ती बांधवांना असे लिहिले: “आपल्याला प्राप्त झालेल्या कृपादानांप्रमाणे आपल्याला निरनिराळी कृपादाने आहेत.” (रोमकर १२:६) प्रत्येकात कोणता न कोणता चांगला गुण असतो; कोणी एका बाबतीत निपुण असतो तर दुसरा दुसऱ्‍या बाबतीत. त्यामुळे वडिलांच्या बोलण्यात आणि वागण्यात कधीच चूक होता कामा नये अशी अपेक्षा करणे शहाणपणाचे ठरणार नाही. “आपण सगळेच पुष्कळ चुका करितो,” असे याकोब ३:२ या वचनात बायबल आपल्याला स्पष्टपणे सांगते. “कोणी जर बोलण्यांत चुकत नाही तर तो मनुष्य पूर्ण होय. तो सर्व शरीरहि कह्‍यांत ठेवण्यास समर्थ आहे.” पण अपरिपूर्ण असूनही वडील तीमथ्याप्रमाणे “भाषण, वर्तन, प्रीति, विश्‍वास व शुद्धता ह्‍यांविषयी विश्‍वास ठेवणाऱ्‍यांचा कित्ता” होऊ शकतात. (१ तीमथ्य ४:१२) अशाप्रकारचा आदर्श मंडळीच्या वडिलांनी इतर बांधवांपुढे ठेवल्यास त्यांना इब्री लोकांस १३:७ येथील सल्ल्याचे पालन करणे सोपे जाईल; या वचनात त्यांना असा सल्ला देण्यात आला आहे: “जे तुमचे अधिकारी होते . . . त्यांची आठवण करा; . . . त्यांच्या विश्‍वासाचे अनुकरण करा.”

इतर आदर्श

वडिलांप्रमाणे इतर भाऊबहिणींचे आदर्श देखील आपल्यासमोर आहेत. त्यांमध्ये हजारो मिशनरी भाऊबहिणी आहेत ज्यांनी परदेशात प्रचार करण्याकरता ‘घरे, भाऊ, बहिणी, बाप, आई, मुले किंवा शेते’ व अशा कित्येक गोष्टींचा त्याग केला आहे. (मत्तय १९:२९) तसेच प्रवासी कार्य करणारे ओव्हरसीयर व त्यांच्या पत्नी, वॉचटावर संस्थेच्या दफ्तरांत कार्य करणारे स्वयंसेवक, आणि मंडळीच्या वाढीकरता परिश्रम करणारे पायनियर यांचाही आपल्यासमोर आदर्श आहे. यांच्या आदर्शांचा खरोखरच बांधवांवर काही प्रभाव पडतो का? आशियातील एक बांधव आपला अनुभव सांगतो. वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेच्या आठव्या वर्गातील एका मिशनरी बांधवाच्या उदाहरणामुळे तो खूपच प्रभावित झाला. हे मिशनरी बंधू “मूळचे इंग्लंडचे होते, पण इथल्या त्रासदायक हवामानाबद्दल, डासांमुळे होणाऱ्‍या त्रासाबद्दल त्यांनी कधीही तक्रार केली नाही. . . . सर्वात विशेष म्हणजे इंग्रज असून देखील इतरांना सुवार्ता सांगता यावी म्हणून त्यांनी चिनी व माले या भाषा शिकून घेतल्या होत्या.” या उत्तम उदाहरणाचा या बांधवावर कसा परिणाम झाला? तो बांधव सांगतो: “त्यांची सहनशीलता आणि त्यांचा आत्मविश्‍वास पाहून मला त्यांचा खूप आदर वाटायचा. त्यांना पाहून मी मोठं झाल्यावर त्यांच्यासारखं मिशनरी व्हायचं ठरवलं.”

वॉचटावर पब्लिकेशन्स इंडेक्स यात टेहळणी बुरूज सावध राहा! नियतकालिकांत प्रकाशित झालेल्या कित्येक जीवन कथांची यादी आहे. या जीवनकथा अशा कित्येक बांधवांबद्दल आहेत ज्यांनी यहोवाच्या सेवेसाठी जगिक प्रतिष्ठेचा त्याग केला, वाईट गुणांवर व प्रवृत्तींवर मात केली, आपल्या स्वभावात अनेक बदल केले, संकटातही यहोवावर विश्‍वास ठेवला, यहोवाच्या सेवेत अनेक परिश्रम केले, अन्याय व इतर समस्या सहन केल्या, नम्रता दाखवली आणि बरेच त्याग केले. या जीवनकथा आवडीने वाचणाऱ्‍या एकीने असे म्हटले: “या कथा मी वाचते तेव्हा मला माझ्या दोषांची जाणीव होते; इतके दोष माझ्यात असूनही यहोवाने मला किती आशीर्वाद दिले आहेत याचा विचार करून माझं मन कृतज्ञतेनं भरून येतं. या कथा नियमित वाचल्यामुळे मला एक शिकायला मिळालं आहे की कधीही स्वतःला आहे त्यापेक्षा जास्त समजू नये आणि कधी स्वार्थी वृत्ती बाळगू नये.”

शिवाय तुमच्या स्वतःच्या मंडळीत देखील अनेक उत्तम उदाहरणे नाहीत का? आपल्या कुटुंबांच्या भौतिक आणि आध्यात्मिक गरजा पुरवण्यासाठी सतत धडपडणारे बांधव; आपल्या मुलांची काळजी घेऊन, घरकाम करून सेवेतही उत्साहाने सहभाग घेणाऱ्‍या आणि काही तर एकट्यानेच कुटुंब चालवणाऱ्‍या बहिणी; शारीरिक दुर्बलता असूनही विश्‍वासूपणे यहोवाची सेवा करणारे वयोवृद्ध किंवा अपंग भाऊ बहिणी. या विश्‍वासू भाऊ बहिणींना पाहून तुम्हाला त्यांचे कौतुक वाटत नाही का?

या जगात अनुकरण करण्यालायक आदर्श क्वचितच आढळतात. (२ तीमथ्य ३:१३) तरीसुद्धा, यहुदिया येथे राहणाऱ्‍या ख्रिस्ती बांधवांना पौलाने दिलेल्या सल्ल्यावर विचार करा. प्राचीन काळातील अनेक विश्‍वासू स्त्री पुरुषांच्या अनुकरणीय उदाहरणांबद्दल सांगितल्यानंतर पौलाने या बांधवांना असे म्हटले: “तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहो म्हणून आपणहि . . . आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे; आपण आपल्या विश्‍वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्‍याच्याकडे पाहत असावे.” (इब्री लोकांस १२:१, २) आज यहोवाच्या साक्षीदारांसमोर देखील असंख्य उत्तम उदाहरणे आहेत. यात काही प्राचीन काळातील उदाहरणे आहेत तर काही आधुनिक. या उदाहरणांचा तुम्ही फायदा करून घेत आहात का? “वाईटाचे अनुकरण करु नको, तर चांगल्याचे कर” या बायबलमधील सल्ल्याचे पालन करण्याची तुमची इच्छा असेल तर या सर्व चांगल्या उदाहरणांचा तुम्ही अवश्‍य फायदा करून घेतला पाहिजे.—३ योहान ११.

[तळटीपा]

^ परि. 6 वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी यांच्याद्वारे प्रकाशित.

[२० पानांवरील संक्षिप्त आशय]

ख्रिस्ती सेवेकरता आवश्‍यक असणारे सगळेच गुण प्रत्येक वडिलात किंवा सेवा सेवकात असावेत अशी अपेक्षा करणे रास्त ठरणार नाही

[२१ पानांवरील चित्रे]

वडिलांना “कळपाला कित्ते व्हा” असे सांगण्यात आले आहे