व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

उत्साहाने सुवार्तेचा प्रचार करा

उत्साहाने सुवार्तेचा प्रचार करा

उत्साहाने सुवार्तेचा प्रचार करा

“आत्म्यात उत्सुक असा; प्रभुची सेवा करा.”—रोमकर १२:११.

१, २. सुवार्तेचे प्रचारक या नात्याने ख्रिस्ती लोक कोणती मनोवृत्ती राखण्याचा विशेष प्रयत्न करतात?

नवी नोकरी मिळालेल्या तरुणाला तुम्ही पाहिले असेल. तो अत्यंत उत्साही असतो. कामाच्या पहिल्या दिवशी मालक आपल्याला कोणते काम देईल याची त्याला मोठी उत्सुकता असते. दिलेले पहिले काम तो अगदी उत्साहाने, मन लावून करतो.

त्या तरुणाप्रमाणे आपल्याला देखील पहिले काम मिळाले आहे. सार्वकालिक जीवनाचा विचार करता यहोवाने आपल्याला आज दिलेले काम पहिलेच म्हणावे लागेल. सार्वकालिक जीवनासोबत यहोवा देव निश्‍चितच आणखीन बरीच कामे आपल्याला देईल. त्यामुळे त्याच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करणे हे आपल्याकरता पहिले काम आहे. (१ थेस्सलनीकाकर २:४) देवाने आपल्याला दिलेल्या या पहिल्या कामाबद्दल आपली मनोवृत्ती कशी आहे? निश्‍चितच त्या उत्साही तरुणाप्रमाणे आपण देखील हे काम मोठ्या आवेशाने, उत्साहाने मन लावून पार पाडले पाहिजे.

३. सुवार्तेचा प्रचारक बनण्यात यशस्वी व्हायचे असल्यास कशाची आवश्‍यकता आहे?

पण हा उत्साह टिकवून ठेवणे वाटते तितके सोपे नाही. कारण आपल्याला इतरही जबाबदाऱ्‍या पार पाडाव्या लागतात. त्या पूर्ण करताना आपण थकतो. असे असूनही आपण प्रचार कार्यात भाग घेतो. त्यामुळे जबाबदाऱ्‍या पूर्ण करून प्रचार कार्यात भाग घेणे म्हणजे तारेवरची कसरतच म्हणावी लागेल. (मार्क ८:३४) येशूने देखील हेच सांगितले की ख्रिस्ती जीवन जगण्याकरता खूप प्रयत्न करावा लागेल.—लूक १३:२४.

४. दररोजच्या चिंतांमुळे आपल्या आध्यात्मिक दृष्टिकोनावर कोणता परिणाम होऊ शकतो?

दररोजच्या कामाचा व्याप आणि “संसाराच्या चिंता” यांमुळे आपण देवाच्या सेवेत थंड पडू शकतो, आपला उत्साह मावळू शकतो. (लूक २१:३४, ३५; मार्क ४:१८, १९) अपरिपूर्ण असल्यामुळे कदाचित आपण सत्याविषयीची ‘पहिली प्रीती सोडून’ देऊ. (प्रकटीकरण २:१-४) केवळ करायची म्हणून आपण यहोवाची सेवा करत राहू. तर मग, देवाच्या सेवेतील आपला उत्साह टिकून राहावा म्हणून बायबल आपल्याला कोणता प्रोत्साहनदायक सल्ला देते?

‘हृदयात कोंडलेल्या अग्नीप्रमाणे’

५, ६. प्रचाराच्या बहुमानाविषयी प्रेषित पौलाची मनोवृत्ती कशी होती?

यहोवाने आपल्यावर सोपवलेले काम अत्यंत महत्त्वाचे आहे. हे काम आपण कधीही हलके समजू नये. प्रेषित पौलाच्या दृष्टीने हे काम सन्मानाचे होते. पण आपण या कामास अपात्र आहोत असे त्याला वाटत होते. म्हणूनच त्याने म्हटले: “मी जो सर्व पवित्र जनातील लहानाहून लहान त्या माझ्यावर ही कृपा अशी झाली की, मी ख्रिस्ताच्या अगाध समृद्धीची सुवार्ता परराष्ट्रीयांना सांगावी; आणि ज्याने सर्व काही निर्माण केले त्या देवाच्या ठायी युगादिकालापासून गुप्त राहिलेल्या रहस्याची व्यवस्था काय, हे सर्वांना प्रकाशित करून दाखवावे.”—इफिसकर ३:८, ९.

प्रचार कार्याविषयी पौलाच्या या दृष्टिकोनाचे आपण अनुकरण करू शकतो. प्रचार कार्याविषयी रोमकरांना पत्र लिहिताना त्याने म्हटले: “सुवार्ता सांगण्यास मी अगदी उत्सुक आहे.” त्याला सुवार्तेची कधीही लाज वाटली नाही. (रोमकर १:१५, १६) प्रचार कार्याविषयी योग्य मनोवृत्ती बाळगून त्याने सुवार्ता मोठ्या उत्साहाने सांगितली.

७. पौलाने रोमकरांना लिहिलेल्या पत्रात कशाबद्दल इशारा दिला?

देवाच्या सेवेतील आपला आवेश टिकवून ठेवणे किती महत्त्वाचे आहे हे पौलाला माहीत होते आणि म्हणूनच त्याने रोममधील ख्रिश्‍चनांना असा सल्ला दिला: “आस्थेविषयी मंद असू नका; आत्म्यात उत्सुक असा; प्रभुची सेवा करा.” (रोमकर १२:११) या वचनात, ज्या मूळ ग्रीक शब्दाचे “मंद” असे भाषांतर केले आहे त्याचा अर्थ, “आळशी, सुस्त” असा होतो. तर मग, आपल्या सेवाकार्यात आपण मंद किंवा आळशी होणार नाही याची आपण खबरदारी घेतली पाहिजे. आध्यात्मिक आळसाची अगदी सुरवातीची लक्षणे दिसताच आपण आपल्या मनोवृत्तीत लगेच सुधारणा केली पाहिजे.—नीतिसूत्रे २२:३.

८. (अ) यिर्मयाला कोणती गोष्ट त्याच्या हृदयात ‘कोंडलेल्या अग्निप्रमाणे’ वाटू लागली आणि का? (ब) यिर्मयाच्या अनुभवावरून आपण कोणता धडा शिकू शकतो?

आपण निरुत्साहित होतो तेव्हा देवाचा आत्मा त्याची सेवा उत्साहाने करण्याकरता आपल्याला साहाय्य करू शकतो. उदाहरणार्थ, एकदा यिर्मया संदेष्टा देखील अतिशय निरुत्साहित झाला होता. प्रचार कार्य कधी न करण्याचाही त्याने विचार केला होता. त्याने असेही म्हटले: “मी त्याचे [यहोवाचे] नाव काढणार नाही, यापुढे मी त्याच्या नावाने बोलणार नाही.” याचा अर्थ, यिर्मयाचा देवावरील विश्‍वास उडाला होता का? नाही. उलट यिर्मयाचा देवावर पूर्ण विश्‍वास होता आणि त्याचे यहोवावर इतके नितान्त प्रेम होते, की प्रचार कार्य त्याला थांबवता आले नाही. त्याने म्हटले: “[यहोवाचे वचन] माझ्या हाडात कोंडलेला अग्नि जळत आहे असे माझ्या हृदयाला झाले; मी स्वतःला आवरिता आवरिता थकलो, पण मला ते साधेना.” (यिर्मया २०:९) यहोवाच्या विश्‍वासू सेवकांनाही वेळोवेळी निरुत्साहित झाल्यासारखे वाटू शकते. पण जेव्हा ते यहोवाकडे साहाय्य मागतात, तेव्हा त्यांच्या हृदयाची खरी स्थिती जाणून तो त्यांना आपला पवित्र आत्मा देईल. यिर्मयाप्रमाणेच यहोवाचे वचन त्यांच्या हृदयात असेल तर यहोवाच्या आत्म्यामुळे त्यांच्या प्रचार कार्यात त्यांना पुन्हा उत्साह प्राप्त होईल.—लूक ११:९-१३; प्रेषितांची कृत्ये १५:८.

“आत्म्याला विझवू नका”

९. आपण काय केल्यास पवित्र आत्मा आपल्यावर येणार नाही?

प्रेषित पौलाने थेस्सलनीकाकरांना आवर्जून सांगितले की “आत्म्याला विझवू नका.” (१ थेस्सलनीकाकर ५:१९) देवाच्या तत्त्वांच्या विरोधात वागल्यास किंवा विचार केल्यास यहोवाच्या आत्म्याच्या कार्यात अडथळा आणल्यासारखे होईल. (इफिसकर ४:३०) आज ख्रिस्ती लोकांना सुवार्ता घोषित करण्याचा सुहक्क देण्यात आला आहे. हा आपल्याकरता एक बहुमान आहे. पण जगाचे लोक आपल्या प्रचार कार्याची टीका करतात हे आपल्याला माहीत आहे. आपण जाणूनबुजून प्रचार कार्याकडे दुर्लक्ष करतो तेव्हा आपण स्वतः देवाच्या आत्म्याला विझवून टाकतो.

१०. (अ) आपल्या कार्याविषयी लोकांच्या दृष्टिकोनाचा आपल्यावर कसा परिणाम होऊ शकतो? (ब) २ करिंथकर २:१७ येथे आपल्या सेवाकार्याबद्दल कोणत्या उच्च दर्जाच्या दृष्टिकोनाचा उल्लेख केला आहे?

१० काही लोक आपल्या प्रचार कार्याला कदाचित निव्वळ पुस्तके वाटण्याचे किंवा वर्गण्या गोळा करण्याचे काम समजतील. लोकांच्या अशा गोष्टींकडे आपण लक्ष दिल्यास प्रचार कार्यातील आपला उत्साह मावळेल. त्यामुळे आपण आपल्या प्रचार कार्याकडे यहोवाच्या आणि येशूच्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. प्रेषित पौलाने प्रचार कार्याविषयी म्हटले: “इतरांसारखे आम्ही फायद्यासाठी देवाच्या वचनाचे काम करत नाही. याउलट ख्रिस्तामध्ये देवासमोर आम्ही देवाने पाठविलेल्या माणसांसारखे प्रामाणिकपणे बोलतो.”—२ करिंथकर २:१७, इजी टू रीड व्हर्शन.

११. पहिल्या ख्रिश्‍चनांना छळातही कशामुळे आवेशी राहता आले आणि त्यांच्या उदाहरणाचा आपल्यावर कसा परिणाम झाला पाहिजे?

११ येशूच्या मृत्यूनंतर त्याच्या शिष्यांचा भयंकर छळ करण्यात आला. प्रचारकार्य करू नये म्हणून त्यांना धाक दाखवण्यात आला. पण ते घाबरले नाहीत. बायबल त्यांच्याविषयी असे सांगते: “ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने बोलू लागले.” (प्रेषितांची कृत्ये ४:१७, २१, ३१) यानंतर काही वर्षांनी पौलाने तीमथ्याला एक सल्ला दिला जो आज आपल्याकरताही उपयोगी आहे. पौलाने म्हटले: “देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे, तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमनाचा आत्मा दिला आहे; म्हणून आपल्या प्रभूविषयीच्या साक्षीची आणि मी जो त्याचा बंदिवान त्या माझी तू लाज धरू नये; तर देवाच्या सामर्थ्याच्या परिमाणाने सुवार्तेसाठी माझ्याबरोबर दुःख सोसावे.”—२ तीमथ्य १:७, ८.

आपल्या शेजाऱ्‍याच्या प्रती आपले कोणते कर्तव्य आहे?

१२. कोणत्या एका मुख्य कारणासाठी आपण सुवार्तेचा प्रचार केला पाहिजे?

१२ योग्य उद्देश मनी बाळगून आपण प्रचार केल्यास, प्रचार कार्याविषयी आपला दृष्टिकोन देखील बरोबर असेल. आपण प्रचार का करतो? याचे उत्तर स्तोत्रकर्त्याच्या शब्दांतून आपल्याला मिळते: “तुझे भक्‍त तुझा धन्यवाद करितात. ते तुझ्या राज्याचा महिमा वर्णितात, आणि तुझा पराक्रम कथन करितात; ह्‍यासाठी की, तुझे पराक्रम व तुझ्या राज्याचे वैभवयुक्‍त ऐश्‍वर्य ही मानवजातीस कळावी.” (स्तोत्र १४५:१०-१२) होय, सर्वांसमोर यहोवाची स्तुती करणे आणि त्याचे नाव पवित्र करणे या उद्देशाने आपण प्रचार करतो. लोकांनी प्रचार कार्याला कशीही प्रतिक्रिया दाखवली तरी आपल्या या कार्याद्वारे आपण यहोवाचे गौरव करतो.

१३. इतरांना उद्धाराची आशा देण्यासाठी आपल्याला कशामुळे प्रेरणा मिळते?

१३ प्रचार करण्याचे आणखी एक कारण म्हणजे आपले लोकांवर प्रेम आहे आणि त्यांच्या जिवांचा रक्‍तदोष आपल्यावर यावा अशी आपली इच्छा नाही. (यहेज्केल ३३:८; मार्क ६:३४) पौलाची देखील अशीच मनोवृत्ती होती. त्याने म्हटले: “हेल्लेणी व बर्बर, ज्ञानी व अज्ञानी, ह्‍यांचा मी ऋणी आहे.” (रोमकर १:१४) लोकांना सुवार्ता सांगणे हे आपले कर्तव्य आहे असे पौल मानत होता. त्याला याची जाणीव होती की “सर्व माणसांचे तारण व्हावे,” अशी देवाची इच्छा आहे. (१ तीमथ्य २:४) आज आपण देखील आपल्या शेजाऱ्‍यांवर प्रेम करतो आणि त्यांना सुवार्ता सांगणे हे आपले कर्तव्य आहे असे मानतो. मानवजातीवरील प्रेमामुळे यहोवाने त्यांच्याकरता आपल्या पुत्राला अर्पण केले. (योहान ३:१६) यहोवाने आपल्याकरता किती मोठा त्याग केला! आज आपणही लोकांना येशूच्या बलिदानाच्या आधारावर तारण मिळवण्याची सुवार्ता सांगण्यासाठी आपला वेळ व शक्‍ती खर्च करण्याद्वारे यहोवाच्या प्रेमाचे अनुकरण करतो.

१४. या जगाचे बायबलमध्ये कशाप्रकारे वर्णन करण्यात आले आहे?

१४ जगातील लोक आपले भाऊबहीण होतील अशा मनोवृत्तीने आपण प्रचार केला पाहिजे. आपण निर्भयतेने प्रचार केला पाहिजे हे खरे आहे, पण याचा अर्थ आपण त्यांची टीका करावी असा होत नाही. बायबलमध्ये जगातल्या लोकांबद्दल सांगताना काही ठिकाणी नकारात्मक भाषा वापरण्यात आली आहे. ‘जग’ हा शब्दच मुळात नकारार्थी दृष्टीने वापरण्यात आला आहे; उदाहरणार्थ, पौलाने ‘ह्‍या जगाच्या ज्ञानापासून’ आणि ‘ऐहिक (म्हणजेच, जगिक) वासनांपासून’ दूर राहण्याचा इशारा दिला. (१ करिंथकर ३:१९; तीत २:१२, १३) पौलाने इफिस येथील ख्रिश्‍चनांना देखील आठवण करून दिली होती की जेव्हा ते “ह्‍या जगाच्या रहाटीप्रमाणे” चालत होते तेव्हा ते आध्यात्मिकरित्या “मृत” होते. (इफिसकर २:१-३) प्रेषित योहानाने म्हटले: “सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.”—१ योहान ५:१९.

१५. ख्रिस्ती मंडळीबाहेरील व्यक्‍तींविषयी आपण काय करू नये आणि का?

१५ देवापासून दूरावलेल्या ‘जगाची’ बायबलमध्ये टीका करण्यात आली आहे. जगात राहणाऱ्‍या प्रत्येक व्यक्‍तीची बायबलमध्ये टीका करण्यात आलेली नाही. एखादी व्यक्‍ती सुवार्ता ऐकणार नाही, असे आपण आधीच मत बनवू नये. अमुक व्यक्‍ती शेरडांपैकी आहे असे आपण म्हणू शकत नाही. येशू “शेरडांपासून मेंढरे” वेगळी करण्यास येईल तेव्हा तो हे काम करील. (मत्तय २५:३१-४६) यहोवाने येशूला न्याय करण्यास नेमले आहे, आपल्याला नाही. शिवाय आजपर्यंतच्या आपल्या अनुभवावरून हेच दिसून आले आहे की अतिशय वाईट आचरण करणाऱ्‍या लोकांनी सुवार्ता ऐकली; आपल्या जीवनात बदल केले आणि सत्याच्या मार्गाने चालू लागले. अर्थात आपण वाईट लोकांशी मैत्री करणार नाही हे खरे आहे, पण त्यांना सुवार्ता सांगण्याची संधी आपण दवडू नये. बायबलमध्ये अशा काही जणांविषयी सांगण्यात आले आहे जे सुरवातीला सत्य मानत नव्हते, पण ‘त्यांची सार्वकालिक जीवनाकरता योग्य मनोवृत्ती’ होती आणि त्यांनी नंतर सत्य स्वीकारलेही. (प्रेषितांची कृत्ये १३:४८, NW) एखादी व्यक्‍ती सत्याचा केव्हा स्वीकार करील हे आपण ठरवू शकत नाही. त्यामुळे आपल्याला लोकांना वारंवार प्रचार करावा लागेल. म्हणूनच ज्यांनी अद्याप तारणाचा संदेश स्वीकारलेला नाही अशांच्यासोबतही आपण नेहमी “सौम्यतेने” व “भीडस्तपणाने” वागले पाहिजे, या आशेने की कधी न कधी ते जीवनाचा संदेश स्वीकारतील.—२ तीमथ्य २:२५; १ पेत्र ३:१५.

१६. ‘शिकवण्याची कला’ विकसित करण्याचे एक कारण काय आहे?

१६ शिकवण्याच्या कलेत आणखी निपुण होण्याचा आपण प्रयत्न केला तर आपोआपच सुवार्ता सांगण्यातील आपला उत्साह वाढेल. एक उदाहरण विचारात घ्या. एखादा खेळ जोपर्यंत खेळता येत नाही तोपर्यंत आपल्याला तो खेळ खेळण्यात गोडी नसते. पण जो त्या खेळात तरबेज असतो तो मोठ्या उत्साहाने, आवेशाने तो खेळ खेळतो. त्याचप्रकारे जे ख्रिस्ती ‘शिकवण्याच्या कलेत’ निपुण होण्याचा प्रयत्न करतात त्यांचा उत्साह देखील दिवसेंदिवस वाढत जातो. (२ तीमथ्य ४:२; तीत १:९) पौलाने तीमथ्याला असा सल्ला दिला: “तू सत्याचे वचन नीट सांगणारा, लाज वाटण्यास कसलेहि कारण नसलेला, देवाच्या पसंतीस उतरलेला कामकरी, असा स्वतःला सादर करण्यास होईल तितके कर.” (२ तीमथ्य २:१५) शिकवण्याच्या कलेत निपुण होण्याकरता आपण काय करू शकतो?

१७. बायबलमधील ज्ञानाबद्दल आपण ‘इच्छा’ कशी निर्माण करू शकतो आणि अशा ज्ञानाचा आपल्या सेवाकार्यासाठी कसा फायदा होईल?

१७ एक मार्ग म्हणजे बायबलचे अचूक आणि सखोल ज्ञान घेणे. प्रेषित पेत्र आपल्याला असे प्रोत्साहन देतो: “तारणासाठी तुमची आध्यात्मिक वृद्धि व्हावी म्हणून नूतन जन्मलेल्या बालकांसारखे निऱ्‍या दुधाची इच्छा धरा.” (१ पेत्र २:२, ३) कोणतेही निरोगी बाळ दूध प्यायला उत्सुक असते. पण एखाद्या ख्रिस्ती व्यक्‍तीला मात्र बायबलच्या ज्ञानाची ‘इच्छा’ निर्माण करण्याचा प्रयत्न करावा लागेल. यासाठी नियमित अभ्यासाची व वाचनाची सवय लावणे गरजेचे आहे. (नीतिसूत्रे २:१-६) देवाचे वचन निपुणतेने शिकवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांची आणि आत्मसंयमाची गरज आहे. त्यानंतरच आपण शिकवण्याच्या कलेत निपुण होऊ. देवाच्या वचनाचा सखोल अभ्यास केल्यामुळे आपल्याला केवळ आनंदच मिळत नाही तर यामुळे आपोआपच देवाची सेवा आवेशाने करण्याकरता आपल्याला प्रेरणा मिळेल.

१८. ख्रिस्ती सभांमध्ये आपल्याला बायबलचा परिणामकारक वापर करण्याचे शिक्षण कसे मिळू शकते?

१८ देवाच्या वचनाचा निपुणतेने वापर करण्यासाठी ख्रिस्ती सभा आपल्याला मदत करतात. जाहीर भाषणांत आणि बायबलवर आधारित असलेल्या इतर चर्चांदरम्यान बायबलची वचने वाचली जातात. ही वचने आपण आपल्या बायबलमध्ये उघडून वाचली पाहिजेत. तसेच प्रचार कार्याबद्दल मार्गदर्शन दिले जाते तेव्हा आपण लक्ष देऊन ऐकले पाहिजे. सभांमध्ये दाखवण्यात येणाऱ्‍या प्रात्यक्षिकांना आपण कधीही कमी महत्त्वाचे समजू नये व त्यांकडे कधीही दुर्लक्ष करू नये. यासाठी स्वतःला शिस्त लावण्याची व लक्ष एकाग्र करण्याची गरज आहे. (१ तीमथ्य ४:१६) ख्रिस्ती सभा आपला विश्‍वास मजबूत करतात; तसेच, त्यांना उपस्थित राहिल्यामुळे देवाच्या वचनाचा अभ्यास करण्याची इच्छा विकसित होते आणि सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी आपल्यामध्ये उत्साह निर्माण होतो.

यहोवा सदैव आपल्या पाठीशी आहे

१९. प्रचार कार्यात नियमितपणे सहभाग घेणे का महत्त्वाचे आहे?

१९ ‘आत्म्यात उत्सुक’ असलेल्या ख्रिस्ती लोकांना प्रचार कार्यात आवेश असतो त्यामुळे ते नियमितपणे प्रचार कार्यात भाग घेण्याचा प्रयत्न करतात. (इफिसकर ५:१५, १६) आपल्या सर्वांची परिस्थिती वेगवेगळी असते; त्यामुळे आपल्याला प्रचार कार्याकरता हवा तितका वेळ देता येत नाही. (गलतीकर ६:४, ५) पण प्रचार कार्यात आपण किती तास घालवतो हे महत्त्वाचे नाही, तर प्रचार करण्याच्या प्रत्येक संधीचा आपण फायदा घेतो का आणि नेहमी प्रचार कार्यात भाग घेतो का हे महत्त्वाचे आहे. (२ तीमथ्य ४:१, २) आपण जितका अधिक प्रचार करू तितकेच आपल्याला त्याचे महत्त्व पटेल. (रोमकर १०:१४, १५) प्रचार कार्य करताना आपल्याला आजच्या वाईट परिस्थितीबद्दल हळहळ व्यक्‍त करणारे, हताश झालेले प्रामाणिक अंतःकरणाचे लोक भेटतात. वेळोवेळी अशा लोकांना भेटल्यामुळे आपोआपच आपल्या मनात दया, करुणा व सहानुभूती यांसारखे गुण निर्माण होतात.—यहेज्केल ९:४; रोमकर ८:२२.

२०, २१. (अ) आपल्यापुढे आणखी कोणते काम बाकी आहे? (ब) यहोवा आपल्या प्रयत्नांना पाठिंबा कसा देत आहे?

२० यहोवाने आपल्यावर सुवार्तेचा प्रचार करण्याचे काम सोपवले आहे. आपण देवाचे “सहकारी” आहोत आणि देवाने आपल्यावर सोपवलेले हे पहिले काम आहे. (१ करिंथकर ३:६-९) देवाने दिलेली ही जबाबदारी मन लावून, आपल्याने होईल तितक्या चांगल्याप्रकारे आणि आवेशाने करण्याची आपली इच्छा आहे. (मार्क १२:३०; रोमकर १२:१) अद्याप या जगात योग्य मनोवृत्ती असणारे आणि सत्यासाठी भुकेलेले कित्येक लोक आहेत. अद्याप बरेच काम करायचे आहे, पण यहोवा या कामात आपली मदत करेल व सदैव आपल्या पाठीशी राहील याची आपण खात्री बाळगू शकतो.—२ तीमथ्य ४:५.

२१ यहोवा आपल्याला त्याच्या आत्म्याचे साहाय्य पुरवण्याचे आश्‍वासन देतो, तसेच “आत्म्याची तरवार” म्हणजेच त्याचे वचनही त्याने आपल्याला दिले आहे. यहोवाच्या मदतीने आपण “[सुवार्तेचे] रहस्य उघडपणे” प्रकट करू शकतो. (इफिसकर ६:१७-२०) थेस्सलनीकाकरांना लिहिलेले पौलाचे शब्द आपल्याबाबतीतही खरे ठरावेत: “आमची सुवार्ता केवळ शब्दाने नव्हे, तर सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने व पूर्ण निर्धाराने तुम्हाला कळविण्यात आली.” (१ थेस्सलनीकाकर १:५) होय, आपण उत्साहाने आणि आवेशाने प्रचार करत राहू या!

थोडक्यात उजळणी

• जीवनाच्या चिंतांमुळे सेवाकार्यातील आपल्या आवेशाला काय होऊ शकते?

• सुवार्ता सांगण्याची इच्छा आपल्या हृदयात ‘कोंडलेल्या अग्नीप्रमाणे’ कशी असली पाहिजे?

• सेवाकार्याविषयी आपण कोणते नकारात्मक दृष्टिकोन टाळावेत?

• आपल्यासारखा विश्‍वास नसलेल्यांविषयी आपला दृष्टिकोन कसा असावा?

• प्रचार कार्यातील आपला आवेश टिकवून ठेवण्यासाठी यहोवा आपली मदत कशी करतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[९ पानांवरील चित्रे]

ख्रिस्ती पौल आणि यिर्मया यांच्या आवेशी उदाहरणाचे अनुकरण करतात

[१० पानांवरील चित्रे]

देवाविषयी आणि शेजारपाजाऱ्‍यांविषयी प्रेम असल्यामुळे आपण आवेशाने प्रचाराला जातो