व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मनःशांती तुम्हाला मिळू शकते का?

मनःशांती तुम्हाला मिळू शकते का?

मनःशांती तुम्हाला मिळू शकते का?

अमेरिकन लेखक हेन्री थरो यांनी १८५४ साली असे लिहिले: “अधिकांश लोक निराश आहेत, आतल्या आत कुढत आहेत.”

यावरून दिसून येते की, त्या लेखकाच्या दिवसात लोक आनंदी नव्हते. ही गोष्ट १५० वर्षांआधीची आहे. आजही आपल्याला हीच परिस्थिती पाहायला मिळत नाही का? तुमच्याविषयी काय? तुम्ही समाधानी, आनंदी आहात का? तुम्हालाही भवितव्याबद्दल चिंता वाटते का? थरोच्या शब्दात सांगायचे झाल्यास तुम्ही देखील “आतल्या आत कुढत” आहात का?

आज जगातल्या अनेक समस्यांमुळे, दुःखामुळे लोक शांतीकरता अक्षरशः आसुसलेले आहेत. याची काही उदाहरणे आता आपण पाहू या. अनेक देशांमध्ये, बेरोजगारी आणि कमी पगारामुळे दारिद्र्‌य आणि आर्थिक तंगी निर्माण झाली आहे. तर काही देशांतील लोक धनसंपत्ती आणि भौतिक वस्तूंच्या मागे लागतात आणि समाधान, सुख-शांती गमावून बसतात. आजारपण, युद्ध, गुन्हेगारी, अन्याय आणि जुलूम या कारणांमुळेही लोकांची शांती भंग पावली आहे.

त्यांना मनःशांती लाभली

आज बहुतेक लोक अन्याय निमूटपणे सहन करत नाहीत. आन्टोन्यूचीच * गोष्ट पाहा. साऊ पाऊलु, ब्राझील येथील एका मोठ्या कंपनीत तो युनियन लीडर होता. कामगारांच्या हिताकरता त्याने अनेक निदर्शने केली पण त्यांचा काही फायदा झाला नाही.

लग्नामुळे थोडाफार आनंद मिळेल असे काहींना वाटते; पण असा विचार करणाऱ्‍यांचीही निराशा झाली आहे. मार्कोस मोठा बिझनसमॅन होता. तो राजकारणात भाग घेऊ लागला आणि नंतर एका मोठ्या शहराचा नगराध्यक्ष बनला. पण त्याच्या घरात मात्र अशांततेचे वातावरण होते. त्याची मुले मोठी होऊन घर सोडून गेल्यावर त्याचे आणि त्याच्या पत्नीचे पटत नसल्यामुळे ते वेगवेगळे राहू लागले.

गरझोन हा साल्व्हादोर, ब्राझील येथे राहतो; तो मवाली होता; त्याला बाहेर फिरायला, मजा करायला आवडायचे. तो ट्रक चालकांबरोबर वेगवेगळ्या शहरांमध्ये फिरायचा. काही काळानंतर त्याला मादक औषधांचे व्यसन लागले. मग या सवयीपोटी तो चोऱ्‍या करू लागला. कित्येकदा पोलिसांनी त्याला अटक केली. तो दमदाटी, दादागिरी करणारा गुंड बनला. त्याला मनाची शांती हवी होती. त्याला शांती मिळाली का?

व्हानिया लहान असतानाच तिची आई वारली. त्यामुळे घरची सगळी जबाबदारी तिच्यावर येऊन पडली. तिच्या आजारी बहिणीची देखील तिला देखभाल करावी लागे. व्हानिया चर्चला जायची पण देव आपल्यावर रागावला आहे असे तिला वाटायचे. तिला मानसिक शांती मुळीच नव्हती.

मार्सेलुला फक्‍त पार्ट्या आणि मौजमजा हवी होती. मुलामुलींबरोबर पार्ट्या करणे, नाचणे, पिणे, मादक औषधे घेणे हेच त्याचे जीवन होते. एकदा कोणाशी त्याचे भांडण झाले आणि त्याने त्या मुलाला खूप बदडले. नंतर मात्र त्याला या गोष्टीचा पस्तावा झाला. त्याने देवाला मनाच्या शांतीकरता प्रार्थना केली.

कोणकोणत्या गोष्टींमुळे आपण मनाची शांती हरवून बसतो हे वरील उदाहरणांवरून दिसून येते. युनियन लीडर, पुढारी, मवाली पोरगा, जबाबदाऱ्‍यांच्या ओझ्याखाली दबलेली मुलगी आणि पार्ट्या करण्यात दंग असलेला तरुण या सर्वांना मनाची शांती मिळणे शक्य होते का? त्यांच्या उदाहरणावरून आपल्याला काही धडा शिकायला मिळतो का? या दोन्ही प्रश्‍नांची उत्तरे होय अशीच आहेत; पुढील लेखात आपण याविषयी सविस्तर पाहू या.

[तळटीप]

^ परि. 6 काही नावे बदलण्यात आली आहेत.

[३ पानांवरील चित्र]

तुम्ही देखील मनःशांतीच्या शोधात आहात का?