व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

राज्याच्या सत्याचे बी पेरणे

राज्याच्या सत्याचे बी पेरणे

राज्याच्या सत्याचे बी पेरणे

“सकाळी आपले बी पेर, संध्याकाळीहि आपला हात आवरू नको.”—उपदेशक ११:६.

१. ख्रिस्ती लोक आज कोणत्या अर्थाने बी पेरण्याचे काम करत आहेत?

प्राचीन काळातील यहुदी लोकांचा शेती हा प्रमुख व्यवसाय होता. त्यामुळे येशू बहुतेकवेळा शेतकामाची उदाहरणे देऊन त्यांना शिकवत असे. उदाहरणार्थ, देवाच्या राज्याच्या सुवार्तेच्या प्रचार कार्याची तुलना त्याने पेरणी करण्यासोबत केली. (मत्तय १३:१-९, १८-२३; लूक ८:५-१५) आज आपल्यांपैकी सगळेच जण शेतकरी नाहीत. पण लोकांच्या हृदयांत देवाच्या वचनाची पेरणी करणे हे ख्रिस्ती लोकांसाठी सर्वात महत्त्वाचे काम आहे.

२. आपले प्रचार कार्य किती महत्त्वाचे आहे आणि हे कार्य साध्य करण्यासाठी आज काय काय केले जात आहे?

या शेवटल्या काळात देवाच्या राज्याचा प्रचार करणे हा एक बहुमान आहे. रोमकर १०:१४, १५ या वचनांतून या कार्याचे महत्त्व आपल्याला कळून येते. तेथे असे म्हटले आहे: “घोषणा करणाऱ्‍यांवाचून ते कसे ऐकतील? आणि त्यांना जर पाठविले नाही तर ते घोषणा तरी कशी करितील? चांगल्या गोष्टींची सुवार्ता सांगणाऱ्‍याचे चरण किती मनोरम आहेत!’ असा शास्त्रलेख आहे.” देवाने आपल्यावर सोपवलेले हे कार्य उत्सुकतेने आणि उत्साहाने करणे आजच्या काळात तर आणखीनच महत्त्वाचे आहे. म्हणूनच यहोवाच्या साक्षीदारांनी स्वतःला या कार्यात संपूर्णतः वाहून घेतले आहे. आज ते ३४० भाषांत बायबल व बायबल आधारित असलेली पुस्तके छापतात. ही पुस्तके छापण्याकरता साक्षीदारांच्या मुख्यालयात व इतर शाखा दफ्तरांत १८,००० पेक्षा जास्त स्वयंसेवक काम करत आहेत. आणि सुमारे साठ लाख साक्षीदार संपूर्ण जगात या पुस्तकांचे वाटप करण्यात गुंतलेले आहेत.

३. राज्याच्या सत्याचे बी पेरल्यामुळे काय निष्पन्‍न होत आहे?

या सर्व प्रचार कार्याचा काय परिणाम झाला आहे? पहिल्या शतकाप्रमाणे आजही अनेक लोक देवाच्या वचनाचा स्वीकार करून ख्रिस्ती बनत आहेत. (प्रेषितांची कृत्ये २:४१, ४६, ४७) या प्रचार कार्याद्वारे ही साक्ष दिली जात आहे, की यहोवाच खरा देव आहे आणि तोच एकमेव गौरवाच्या पात्र आहे. (मत्तय ६:९) शिवाय, बायबलचे ज्ञान मिळाल्यामुळे लोकांच्या जीवनात सुधारणा होत आहे आणि त्यांना सार्वकालिक जीवनाची आशा मिळत आहे.—प्रेषितांची कृत्ये १३:४७.

४. प्रेषितांना लोकांबद्दल कशाप्रकारे कळकळ होती?

पहिल्या शतकातील येशूच्या शिष्यांच्या मनात लोकांविषयी प्रेम आणि कळकळ होती. पौलाच्या पुढील शब्दांवरून हे अगदी स्पष्ट होते: “आम्हास तुमच्याविषयी कळकळ वाटत असल्यामुळे आम्ही तुम्हाला केवळ देवाच्या सुवार्तेचे दानच देण्यास नव्हे, तर तुम्हावरील आमच्या अत्यंत प्रीतीमुळे तुम्हाकरिता आपला जीवहि देण्यास राजी होतो.” (१ थेस्सलनीकाकर २:८) लोकांना प्रेम दाखवताना प्रेषित पौल व इतर प्रेषित येशूने आणि देवदूतांनी मांडलेल्या चांगल्या उदाहरणाचे अनुकरण करत होते. कारण ते देखील प्रचाराच्या जीवनदायक कार्यात मोठ्या आवडीने सहभाग घेत आहेत. येशू आणि देवदूत प्रचाराच्या कामात कशाप्रकारे सहभाग घेतात आणि त्यांच्या उदाहरणावरून आपल्याला काय शिकता येईल हे आपण आता पाहू या.

येशू—राज्याचे बी पेरणारा

५. पृथ्वीवर असताना येशूने कोणत्या कार्याला प्राधान्य दिले?

येशू परिपूर्ण होता. लोकांना संपत्ती देणे, विज्ञान जगात नवनवीन शोध लावणे त्याला सहज शक्य होते. पण हे सर्व करण्याकरता नव्हे तर प्रचार करण्याकरता तो पृथ्वीवर आला होता. (लूक ४:१७-२१) या कामाविषयी त्याने असे म्हटले: “मी ह्‍यासाठी जन्मलो आहे व ह्‍यासाठी जगात आलो आहे की, मी सत्याविषयी साक्ष द्यावी.” (योहान १८:३७) आपला जास्तीत जास्त वेळ त्याने राज्य सत्याचे बी पेरण्यात आणि लोकांना देवाच्या राज्याविषयी सांगण्यात खर्च केला.—रोमकर ११:३३-३६.

६, ७. (अ) स्वर्गात जाण्याआधी येशूने कोणते अभिवचन दिले आणि आज तो हे अभिवचन कशाप्रकारे पूर्ण करत आहे? (ब) प्रचार कार्याबद्दल येशूच्या मनोवृत्तीवरून तुम्हाला कोणता वैयक्‍तिक लाभ झाला आहे?

येशूने स्वतःला राज्याचे बी पेरणारा म्हटले. (योहान ४:३५-३८) सुवार्तेचे बी पेरण्याकरता तो मिळणाऱ्‍या प्रत्येक संधीचा उपयोग करत असे. वधस्तंभावर असताना देखील त्याने शेजारच्या चोराला येणाऱ्‍या नव्या जगाची सुवार्ता सांगितली. (लूक २३:४३) प्रचार कार्यात त्याला विलक्षण उत्साह आणि आवेश होता. त्याच्या मृत्यूनंतरही हा आवेश कमी झाला नाही. कारण पुन्हा जीवंत झाल्यानंतर त्याने त्याच्या शिष्यांना राज्याचे बी पेरण्याचे काम सुरू ठेवण्याची व शिष्य बनवण्याची आज्ञा दिली. यानंतर येशूने त्यांना अभिवचन दिले: “पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.”—मत्तय २८:१९, २०.

या अभिवचनाचा हाच अर्थ होता, की येशू ‘युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस’ सुवार्तेच्या प्रचार कार्याला पाठिंबा, मार्गदर्शन व संरक्षण देईल. आणि तेव्हापासून येशू हे अभिवचन पाळत आहे; प्रचार कार्यात आपले नेतृत्व करत आहे. (मत्तय २३:१०) तो ख्रिस्ती मंडळीचा प्रमुख आहे आणि त्यामुळे यहोवाने जगभरातील प्रचार कार्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली आहे.—इफिसकर १:२२, २३; कलस्सैकर १:१८.

देवदूत सुवार्ता सांगतात

८, ९. (अ) देवदूतांनी मानवांच्या कार्यांत कशाप्रकारे आवेशाने सहभाग घेतला आहे? (ब) देवदूत कशाप्रकारे आपल्या कार्याचे निरीक्षण करत आहेत?

यहोवाने या पृथ्वीची सृष्टी केली तेव्हा सर्व देवदूतांनी “मिळून गायन केले व . . . जयजयकार केला.” (ईयोब ३८:४-७) तेव्हापासून देवदूतांनी मनुष्यांच्या कार्यांत मोठी आवड दाखवली आहे. मनुष्यांना आपले संदेश सांगण्याकरता यहोवाने या देवदूतांचा उपयोग केला आहे. (स्तोत्र १०३:२०) आज सबंध जगातील लोकांना सुवार्ता सांगण्याकरता देवदूत हातभार लावत आहेत. प्रेषित योहानाला देण्यात आलेल्या प्रकटीकरणात त्याला “एक देवदूत अंतराळाच्या मध्यभागी उडताना” दिसला. “त्याच्याजवळ पृथ्वीवर राहणाऱ्‍यांस म्हणजे प्रत्येक राष्ट्र, वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे आणि लोक ह्‍यांस सांगावयास सार्वकालिक सुवार्ता होती. तो मोठ्याने म्हणाला: देवाची भीती बाळगा व त्याचे गौरव करा, कारण न्यायनिवाडा करावयाची त्याची घटिका आली आहे.”—प्रकटीकरण १४:६, ७.

‘तारण प्राप्त करणाऱ्‍यांकरता’ पाठवण्यात आलेले ‘परिचारक आत्मे’ असे देवदूतांना बायबलमध्ये संबोधण्यात आले आहे. (इब्री १:१४) हे देवदूत त्यांना नेमून दिलेली कामे मोठ्या आवेशाने पार पाडतातच; शिवाय त्यांचे लक्ष आपल्यावर व आपल्या कामावरही असते. जणू पृथ्वीच्या व्यासपीठावर स्वर्गातील प्रेक्षकांपुढे आपण आपले प्रचार कार्य करत आहोत. (१ करिंथकर ४:९) आणि देवदूत आपल्यासोबत आहेत हे जाणल्यामुळे आपल्याला उत्तेजन मिळत नाही का?

उत्साहाने काम पार पाडणे

१०. उपदेशक ११:६ येथे दिलेला व्यावहारिक सल्ला प्रचार कार्याला कशाप्रकारे लागू करता येईल?

१० प्रचार कार्यात येशू व देवदूत इतक्या आवेशाने भाग का घेत आहेत? याचे एक कारण येशूने सांगितले: “पश्‍चात्ताप करणाऱ्‍या एका पापी माणसाबद्दल देवाच्या दूतांसमोर आनंद होतो, हे मी तुम्हाला सांगतो.” (लूक १५:१०) लोकांनी पश्‍चात्ताप करावा असे आपल्याला देखील वाटते. म्हणूनच आपण जेथे कोठे शक्य आहे तेथे राज्याच्या सत्याचे बी पेरण्याचा प्रयत्न करतो. उपदेशक ११:६ येथे दिलेले शब्द आपल्या कार्याशी जुळतात. या वचनात आपल्याला असा बोध देण्यात आला आहे, की “सकाळी आपले बी पेर, संध्याकाळीहि आपला हात आवरू नको; कारण त्यांतून कोणते फळास येईल, हे किंवा ते, अथवा दोन्ही मिळून चांगली होतील, हे तुला ठाऊक नसते.” कदाचित हजारो लोकांपैकी एखादाच आपल्या संदेशावर विश्‍वास ठेवतो; पण असा मनुष्य पश्‍चात्ताप करतो, स्वतःच्या मनाचे परिवर्तन करतो तेव्हा देवदूतांप्रमाणे आपल्यालाही आनंद होतो.

११. बायबल आधारित साहित्यामुळे कोणते चांगले परिणाम घडून येतात?

११ आपल्या प्रकाशनांद्वारे आपण सत्याचे बीज पेरत असतो. ही पुस्तके आपण वेगवेगळ्या लोकांना देत असतो, पण कोणते पुस्तक वाचून एखादी व्यक्‍ती सत्यात येईल हे आपण काही सांगू शकत नाही. कधीकधी आपण एखाद्या व्यक्‍तीला एखादे पुस्तक देतो आणि दुसरीच धार्मिक व्यक्‍ती ते पुस्तक वाचते. यावरून हेच दिसून येते, की यहोवा, येशू आणि देवदूत या कार्याच्या मागे आहेत. खालील काही अनुभवांवरून आपल्याला हेच दिसून येते.

खऱ्‍या देवाचे कार्य

१२. एका जुन्या मासिकामुळे एका कुटुंबाला यहोवाविषयी जाणून घ्यायला कशाप्रकारे मदत मिळाली?

१२ रॉबर्ट व लॉयला १९५३ साली एका मोठ्या शहरातून, अमेरिकेत पेन्सिल्वेनिया राज्यातील एका लहानशा गावातल्या जुन्या फार्महाऊसमध्ये राहायला गेले. येथे राहायला आल्यानंतर रॉबर्टने जिन्याच्या खाली असलेल्या रिकाम्या जागेत बाथरूम बांधण्याचे ठरवले. काम सुरू असताना त्याला भिंतीमागे उंदरांनी कुरतडलेली कागदे, अक्रोडाची कवचे आणि इतर बऱ्‍याच वस्तू सापडल्या. तेथे त्याला द गोल्डन एज नावाचे एक मासिक सापडले. यात एक लेख लहान मुलांचे संगोपन करण्याविषयी होता. या लेखात बायबलवर आधारित असलेल्या स्पष्ट माहितीमुळे रॉबर्ट इतका प्रभावित झाला की “द गोल्डन एज प्रकाशित करणाऱ्‍या लोकांचा धर्म” आपण स्वीकारायचा असे त्याने त्याच्या पत्नीला सांगितले. यानंतर काही आठवड्यांतच यहोवाचे साक्षीदार त्यांच्या घरी आले. पण रॉबर्टने त्यांना सांगितले की त्याला ‘द गोल्डन एज प्रकाशित करणाऱ्‍या लोकांच्या धर्मातच’ गोडी आहे. साक्षीदारांनी त्याला समजावून सांगितले की द गोल्डन एजचे नाव आता अवेक! झाले आहे. तेव्हा कोठे रॉबर्ट व लॉयलाने साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास सुरू केला आणि काही काळानंतर त्यांचा बाप्तिस्मा झाला. त्यांनी आपल्या मुलांच्या मनातही सत्याचे बी पेरले आणि त्यांचाही बाप्तिस्मा झाला. आज त्याच्या घरातील २० पेक्षा जास्त सदस्य यहोवाची सेवा करत आहेत.

१३. प्वेर्त रिको येथे राहणाऱ्‍या एका दांपत्याच्या मनात बायबलचा अभ्यास करण्याची इच्छा कशी निर्माण झाली?

१३ चाळीस वर्षांपूर्वी, प्वेर्त रिको येथे राहणाऱ्‍या विल्यम व ॲडा या दांपत्याला बायबलचा अभ्यास करण्याची मुळीच इच्छा नव्हती. यहोवाचे साक्षीदार त्यांच्या घरी यायचे तेव्हा ते कधीही दार उघडायचे नाही. एकदा विल्यम घरातल्या दुरुस्ती कामासाठी काहीतरी सामान आणायला बाजारात गेला. जाता जाता त्याला एका मोठ्या कचऱ्‍याच्या पेटीजवळ पोपटी रंगाचे एक पुस्तक दिसले. यहोवाच्या साक्षीदारांनी १९४० साली प्रकाशित केलेले हे रिलिजन नावाचे पुस्तक होते. विल्यमने ते पुस्तक घरी आणले. खऱ्‍या व खोट्या धर्मात किती फरक आहे याविषयी वाचून त्याला खूप आनंद झाला. पुढच्या वेळी यहोवाचे साक्षीदार त्याच्या घरी आले तेव्हा त्याने व त्याची पत्नी ॲडा हिने त्यांचा संदेश ऐकून घेतला आणि त्यांच्यासोबत बायबलचा अभ्यासही करू लागले. काही महिन्यांनंतर, १९५८ साली ‘देवाची इच्छा’ या आंतरराष्ट्रीय संमेलनात त्यांचा बाप्तिस्मा झाला. तेव्हापासून त्यांनी ५० पेक्षा जास्त लोकांना ख्रिस्ती बांधवांत सामील होण्यास मदत केली आहे.

१४. आपण लोकांना जे साहित्य देतो त्यात काय करण्याचे सामर्थ्य आहे हे एका अनुभवाच्या आधारे सांगा.

१४ कार्ल हा अवघ्या ११ वर्षांचा खोडकर मुलगा होता. तो नेहमी काही ना काही उपद्‌व्याप करून ठेवायचा. त्याचे वडील जर्मन मेथॉडिस्ट चर्चचे पाळक होते. त्यांनी त्याला शिकवले होते की वाईट लोक मेल्यानंतर नरकात यातना भोगत राहतात. साहजिकच कार्लला नरकाची खूपच भीती वाटू लागली. १९१७ साली, एके दिवशी कार्लला रस्त्यावर एक कागद पडलेला दिसला तो त्याने उचलला आणि वाचू लागला. त्यावर लिहिले होते: “नरक म्हणजे काय?” नरक या विषयावर यहोवाच्या साक्षीदारांनी आयोजित केलेल्या एका जाहीर भाषणाचे निमंत्रण या कागदावर देण्यात आले होते. जवळजवळ एक वर्ष बायबलचा अभ्यास केल्यानंतर कार्लचा बाप्तिस्मा झाला व तो देखील एक बायबल विद्यार्थी बनला. १९२५ साली त्याला यहोवाच्या साक्षीदारांच्या मुख्यालयात कार्य करण्याचे आमंत्रण देण्यात आले. आजही कार्ल तेथेच सेवा करत आहे. जवळजवळ ८० वर्षांची ही ख्रिस्ती सेवा रस्त्यावर सापडलेल्या एका चिटोऱ्‍यामुळे शक्य झाली.

१५. यहोवाला योग्य वाटल्यास तो काय घडवून आणू शकतो?

१५ या लोकांना सत्यात आणण्यात देवदूतांचा कितपत हात होता हे आपल्याला माहीत नाही. पण या गोष्टीत तीळमात्र शंका नाही, की येशू आणि देवदूत प्रचार कार्यात आवेशाने भाग घेत आहेत आणि स्वतः यहोवा या कार्याचे मार्गदर्शन करत आहे. या आणि अशा कित्येक अनुभवांतून हेच दिसून येते की आपली पुस्तके फार प्रभावी आहेत.

देण्यात आलेली संपत्ती

१६. २ करिंथकर ४:७ येथे दिलेल्या शब्दांतून आपण काय शिकू शकतो?

१६ प्रेषित पौलाने म्हटले, की देवाने ‘मातीच्या भांड्यांत संपत्ती’ ठेवली आहे. हे ‘मातीचे भांडे आपण मानव असून आपल्याला दिलेली संपत्ती म्हणजे आपल्यावर सोपवलेले प्रचार कार्य होय. मानव मुळात अपरिपूर्ण व कमकुवत असल्यामुळे आपण हे काम आपल्या सामर्थ्याने करू शकत नाही. त्यामुळे यहोवा आपल्याला ‘पराकोटीचे सामर्थ्य’ देतो. (२ करिंथकर ४:७) होय, आपल्याला दिलेले कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी लागणारे सामर्थ्य यहोवा आपल्याला पुरवेल याची आपण खात्री बाळगू शकतो.

१७. राज्याच्या सत्याचे बी पेरताना आपल्याला कशाप्रकारचे अनुभव येऊ शकतात आणि तरीसुद्धा आपण आपला उत्साह का टिकवून ठेवला पाहिजे?

१७ प्रचार कार्य करताना आपल्याला बहुतेक वेळा समस्यांना तोंड द्यावे लागते. काही क्षेत्रांत काम करणे गैरसोयीचे किंवा कठीण असू शकते. काही क्षेत्रांत लोक अगदीच थंड प्रतिसाद देतात, कधीकधी तर विरोध देखील करतात. बराच प्रयत्न करूनही या क्षेत्रांत काहीही फळ मिळत नाही. पण लक्षात असू द्या लोकांच्या जीवनाचा प्रश्‍न असल्यामुळे आपण केलेले प्रयत्न कधीही व्यर्थ ठरणार नाही. आपण बी पेरल्यामुळे एखाद्या व्यक्‍तीला सध्याच नव्हे तर भविष्यात सर्वकाळ आनंद मिळू शकतो. स्तोत्र १२६:६ या वचनातील शब्द कित्येकदा खरे ठरले आहेत: “जो पेरणीसाठी बी घेऊन रडत बाहेर पडतो. तो खात्रीने आनंद करीत आपल्या पेंढ्या घेऊन येईल.”

१८. आपण आपल्या सेवेकडे कशाप्रकारे सतत लक्ष दिले पाहिजे आणि का?

१८ तर मग, आपण प्रत्येक संधीचा फायदा घेऊ या आणि राज्याच्या बीजाची मोठ्या आवेशाने पेरणी करू या. आपण कधीही हे विसरू नये की बी पेरणारे आणि त्यांना पाणी घालणारे आपण असलो तरीही त्यांना वाढवणारा यहोवा देव आहे. (१ करिंथकर ३:६, ७) येशू व देवदूत यांच्याप्रमाणे आपणही आपल्याला नेमलेले कार्य पूर्ण करावे अशी यहोवा आपल्याकडून अपेक्षा करतो. (२ तीमथ्य ४:५) आपण शिकवण्याच्या कलेत पारंगत होत राहू या, प्रचाराविषयी योग्य दृष्टिकोन बाळगू या आणि मोठ्या उत्साहाने प्रचार कार्य करत राहू या. का? कारण पौलाच्या शब्दांत, ‘असे केल्याने आपण स्वतःचे व आपले ऐकणाऱ्‍यांचेही तारण साधू.’—१ तीमथ्य ४:१६.

आपण काय शिकलो?

• बी पेरण्याच्या आपल्या कार्यामुळे कोणते चांगले परिणाम घडून येत आहेत?

• सुवार्ता प्रसाराच्या कार्यात येशू ख्रिस्त व देवदूत कशाप्रकारे सहभाग घेत आहेत?

• राज्याच्या सत्याचे बी आपण जेथे कोठे शक्य होईल तेथे सढळ हाताने का पेरले पाहिजे?

• साक्षकार्य करताना लोक थंड प्रतिसाद देतात किंवा विरोध करतात, तेव्हा आपण आपला उत्साह कशाप्रकारे टिकवून ठेवू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१५ पानांवरील चित्र]

प्राचीन इस्राएलातील शेतकऱ्‍यांप्रमाणे आज खरे ख्रिस्ती जेथे शक्य होईल तेथे सढळ हाताने राज्याच्या सत्याचे बीज पेरत आहेत

[१६ पानांवरील चित्र]

यहोवाचे साक्षीदार ३४० भाषांत बायबलवर आधारित असलेले असंख्य साहित्य प्रकाशित व वितरित करत आहेत