व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अनैतिक जगातही निष्कलंक राहणे शक्य आहे

अनैतिक जगातही निष्कलंक राहणे शक्य आहे

अनैतिक जगातही निष्कलंक राहणे शक्य आहे

तोउंचपुरा आणि देखणा. ती हुशार आणि लावण्यवती. दोघेही एकाच कंपनीत कामाला. ती त्याची खूप काळजी घ्यायची. तोसुद्धा तिची स्तुती करायचा. ते एकमेकांना भेटवस्तू द्यायचे. पाहता पाहता त्यांचे प्रेम जमले. तिच्यासाठी त्याने आपल्या पत्नीला सोडून दिले. पण तिने मात्र हे प्रेम प्रकरण थांबवून आपल्या पतीसोबतच राहायचे ठरवले. तिने असे केल्यावर तो पुन्हा आपल्या पत्नीकडे गेला. पण आपल्याबद्दल त्याला खरे प्रेम नाही हे ओळखून तिने त्याला झिडकारले. परिणाम व्हायचा तोच झाला; मने दुरावली, ते फक्‍त दिवस ढकलत राहिले.

आजकालच्या जगात शुद्ध वर्तन किंवा शुद्ध वागणुकीला काहीही किंमत राहिलेली नाही. आपल्याच इच्छांची आणि वासनांची तृप्ती करण्याची वृत्ती लोकांमध्ये सामान्यपणे पाहायला मिळते. द न्यू एन्सायक्लोपिडिया ब्रिटानिका म्हणतो की, “परस्त्री किंवा परपुरुषासोबत संबंध ठेवणे विवाहाइतकेच सामान्य आणि सर्रास बनले आहे.”

परंतु, यहोवा देवाची इच्छा आहे की, “लग्न सर्वस्वी आदरणीय” असावे आणि अंथरूण “निर्दोष असावे.” (इब्री लोकांस १३:४) शास्त्रवचनांत म्हटले आहे, “फसू नका; जारकर्मी, मूर्तिपूजक, व्यभिचारी, स्त्रीसारखा संभोग देणारे, पुरूषसंभोग घेणारे . . . ह्‍यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही.” (१ करिंथकर ६:९, १०) म्हणून जर आपल्याला देवाची कृपापसंती हवी असेल तर आपण या अनैतिक जगात नैतिक शुद्धता राखली पाहिजे.

आपल्या भोवतालच्या दुष्ट प्रभावांपासून आपण स्वतःचे रक्षण कसे करू शकतो? बायबलमधील नीतिसूत्रे पुस्तकाच्या ५ व्या अध्यायात प्राचीन इस्राएलचा राजा शलमोन याचे उत्तर देतो. तो काय म्हणतो हे आपण पडताळून पाहू या.

विवेक तुमचे रक्षण करील

इस्राएलचा राजा म्हणतो, “माझ्या मुला, तू विवेक राखावा व तुझ्या वाणीने ज्ञान जपून ठेवावे, म्हणून तू माझ्या ज्ञानशिक्षणाकडे लक्ष लाव. माझ्या सुज्ञतेच्या बोधाकडे कान दे.”नीतिसूत्रे ५:१, २.

अनैतिक संबंध ठेवण्याचा मोह टाळण्यासाठी आपल्याला ज्ञानशिक्षण (बुद्धी) म्हणजे शास्त्रवचनातील ज्ञान उपयोगात आणण्याची क्षमता हवी आणि सुज्ञता म्हणजे योग्यायोग्य यातील भेद करून योग्य मार्ग निवडण्याचे सामर्थ्य हवे. आपला विवेक राखण्यासाठी ज्ञानशिक्षण आणि सुज्ञता यांच्याकडे लक्ष लावावे असे आपल्याला सांगण्यात आले आहे. हे आपण कसे करू? आपण देवाच्या वचनाचा अर्थात बायबलचा अभ्यास करतो तेव्हा यहोवा कशाप्रकारे कार्य करतो याची आपण दखल घेतली पाहिजे आणि त्याची इच्छा व उद्देश काय आहेत याकडे कान दिला पाहिजे. असे केल्याने आपण योग्य तऱ्‍हेने विचार करत असू. अशाप्रकारे मिळवलेला विवेक, ईश्‍वरी बुद्धी आणि ज्ञानाच्या एकवाक्यतेत असतो. आणि मग या विवेकाचा योग्य वापर केल्यावर अनैतिक मोहपाशांपासून आपले संरक्षण होऊ शकते.

तुळतुळीत तोंडापासून सावधान

आजच्या वाईट जगात राहताना नैतिक चालचलन शुद्ध ठेवण्यासाठी विवेक असण्याची फार आवश्‍यकता आहे कारण वाईट चालीची व्यक्‍ती भुलविणारी असते. शलमोन असा इशारा देतो: “परस्त्रीच्या ओठांतून मध स्रवतो, तिचे तोंड तेलापेक्षा तुळतुळीत असते; तरी ती अखेरीस दवण्यासारखी कडू व दुधारी तरवारीसारखी तीक्ष्ण होते.”नीतिसूत्रे ५:३, ४.

या नीतिसूत्रात, रंगेल व्यक्‍तीचे वर्णन ‘परस्त्री’ अर्थात वेश्‍या असे करण्यात आले आहे. * तिच्या मधासारख्या गोड आणि ऑलिव्ह तेलापेक्षा तुळतुळीत शब्दांवर लोक भाळतात. वाईट चालीच्या लोकांचे बोलणे सुरवातीला असेच नसते का? एमी नावाची २७ वर्षांची एक तरुणी सेक्रेटरीचे काम करते; ती दिसायलाही फार देखणी आहे. तिचा अनुभव आपण पाहू या. ती म्हणते: “माझ्यासोबत काम करणारा एक माणूस नेहमी माझी तारीफ करतो, माझी काळजी घेतो. अशाप्रकारे लोक आपल्याकडे लक्ष देतात तेव्हा आपल्यालाही छान वाटते. पण त्याचा हेतू वाईट आहे हे मला स्पष्टपणे कळतंय. मी त्याला कधीच भाळणार नाही.” अशाप्रकारे, भुलवणाऱ्‍या स्त्री किंवा पुरुषाचे बोलणे कानाला फार छान वाटते; आपल्याला त्यांचा खरा हेतू ठाऊक नसला तर आपण सहजासहजी फसू शकतो. आणि म्हणूनच विवेकाचा उपयोग करण्याची फार गरज आहे.

वाईट चालचलनाचे परिणाम दवण्यासारखे कडू आणि दुधारी तरवारीसारखे तीक्ष्ण म्हणजेच दुःखदायक आणि घातक असतात. सतत बोचणारा विवेक, नको असलेली गर्भधारणा किंवा लैंगिकरित्या संक्रमित आजार हे त्याचे कटू परिणाम असतात. शिवाय, स्वतःच्या वैवाहिक साथीदारानेच फसवणूक केलेल्या व्यक्‍तीची स्थिती कशी असेल याचा विचार करा. आपल्या वैवाहिक साथीदाराला फक्‍त एकदाच धोका दिला तरी ती कायमचीच जखम बनते. अनैतिक चालचालणुकीचे फार दुःखदायक परिणाम असतात.

सुज्ञ राजा पुढे एका रंगेल स्त्रीचे वर्णन असे करतो: “तिचे पाय मृत्यूकडे खाली जातात; तिची पावले अधोलोकांस लागतात; म्हणून तिला जीवनाची नीट वाट सापडत नाही; तिचे मार्ग डळमळीत आहेत, हे तिला कळत नाही.” (नीतिसूत्रे ५:५, ६) वाईट चालीच्या बाईचे पाय तिला मृत्यूकडे नेतात—तिची पावले तिला अधोलोकाकडे अर्थात मानवाच्या सामान्य कबरेकडे घेऊन जातात. लैंगिकरित्या संक्रमित होणाऱ्‍या आजारांनी, विशेषतः एड्‌सनी सगळीकडे धुमाकूळ घातलेला असताना हे शब्द किती खरे ठरले आहेत! तिच्या दुष्ट मार्गांवर चालणाऱ्‍यांचाही तोच परिणाम आहे.

राजा अगदी कळकळून अशी विनंती करतो: “तर आता मुलांनो, माझे ऐका, माझ्या तोंडची वचने सोडू नका. तिच्याकडची वाट सोडून दे, तिच्या घराच्या दाराजवळ जाऊ नको.”नीतिसूत्रे ५:७, ८.

वाईट चालीच्या लोकांपासून आपल्याला होता होईल तितके दूर राहण्याची गरज आहे. हिणकस संगीत ऐकून, भ्रष्ट करणारे मनोरंजन पाहून किंवा अश्‍लील गोष्टी पाहून आपण त्यांच्या मार्गावर का चालावे? (नीतिसूत्रे ६:२७; १ करिंथकर १५:३३; इफिसकर ५:३-५) शिवाय, प्रणयचेष्टा (फ्लर्टिंग) करून किंवा अनुचित साज-शृंगार किंवा पेहराव करून त्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेणे किती मूर्खपणाचे आहे!—१ तीमथ्य ४:८; १ पेत्र ३:३, ४.

फार मोठी किंमत

रंगेल व्यक्‍तीपासून आणखी कोणत्या कारणासाठी दूर राहावे? शलमोन म्हणतो: “गेलास तर तुझी अब्रू दुसऱ्‍यांच्या हाती जाईल; आणि तुझ्या आयुष्याचे दिवस निष्ठुरांच्या हाती जातील; तुझ्या धनाने परके गबर होतील, आणि तुझ्या श्रमाचे फळ दुसऱ्‍याच्या घरात जाईल; आणि परिणामी तुझा देह व तुझी शक्‍ति क्षीण झाल्यावर तू शोक करिशील.”नीतिसूत्रे ५:९-११.

वाईट चालचलनामुळे किती मोठी किंमत द्यावी लागते त्याचे वर्णन शलमोन येथे करतो. विवाहबाह्‍य संबंध ठेवल्याने अब्रू जाते हे तर ठरलेले आहे. विचार करा, फक्‍त स्वतःच्या किंवा दुसऱ्‍याच्या वासना तृप्त करण्यासाठी जगणे ही लज्जेची गोष्ट नाही का? परस्त्री किंवा परपुरुषाबरोबर अनैतिक संबंध ठेवल्याने आपल्याला स्वतःच्या अब्रूची कदर नाही असे दिसून येत नाही का?

आपल्या ‘आयुष्याचे दिवस, आपले धन आणि आपल्या श्रमाचे फळ दुसऱ्‍याच्या हाती देणे’ म्हणजे नेमके काय? एक संदर्भ त्याविषयी म्हणतो: “या वचनांमध्ये दिलेला मुद्दा अगदी स्पष्ट आहे: विवाहबाह्‍य संबंध ठेवण्याची किंमत फार मोठी आहे; कारण एखाद्याने मिळवलेले नाव, धन किंवा समृद्धी हे सर्व एकतर लोभी स्त्रीच्या मागण्यांमध्ये नाहीतर समाजाला झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यात खर्च होईल.” अनैतिक संबंधांसाठी भरावी लागणारी किंमत खरोखरच फार मोठी असू शकते!

सगळी अब्रू गेल्यावर आणि साधनसंपत्ती संपल्यावर मूर्ख व्यक्‍तीला पस्तावा होईल; तो म्हणेल: “मी शिक्षणाचा द्वेष कसा केला? माझ्या अंतःकरणाने शासन कसे तुच्छ मानिले? मी आपल्या शिक्षकांची वाणी ऐकली नाही, मला जे बोध करीत त्यांच्याकडे मी कान दिला नाही. मंडळी व सभा यांच्यादेखत मी बहुतेक दुष्कर्मात गढलेला असे.”नीतिसूत्रे ५:१२-१४.

शेवटी अपराध्याला पस्तावा होतो; “मी माझ्या वडिलांचे ऐकले असते तर; माझ्याच मनाप्रमाणे वागलो नसतो तर; दुसऱ्‍यांचाही सल्ला घेतला असता तर” असा तो पस्तावा करत राहतो. पण तेव्हा फार उशीर झालेला असतो. त्याचे सगळे आयुष्य उद्‌ध्वस्त झालेले असते; नाव खराब झालेले असते. तेव्हा, वाईट चालचालणुकीची फार मोठी किंमत द्यावी लागते याचा आधीच विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे!

“तू आपल्याच टाक्यांतले पाणी पी”

लैंगिक संबंधांच्या बाबतीत बायबल जास्त माहिती देत नाही असे काही आहे का? मुळीच नाही. स्त्री-पुरुषांमधील प्रेमभावना आणि त्यातून मिळणारा आनंद ही देवाकडील दाने आहेत. परंतु, ही जवळीक फक्‍त वैवाहिक सोबत्यांकरताच मर्यादित आहे. म्हणून, विवाहबद्ध पुरुषाला शलमोन म्हणतो: “तू आपल्याच टाक्यांतले पाणी पी. आपल्या विहिरीतले वाहते पाणी पी. तुझे झरे बाहेर वाहून जावे काय? तुझे जलाचे प्रवाह रस्त्यांवरून वाहावे काय? ते केवळ तुझ्यासाठी असोत; तुझ्याबरोबर दुसऱ्‍यांना त्यांचा उपयोग न घडो.”नीतिसूत्रे ५:१५-१७.

‘आपली टाकी’ आणि ‘आपली विहीर’ या काव्यमय अभिव्यक्‍ती एखाद्याच्या प्रिय पत्नीसाठी वापरण्यात आल्या आहेत. तिच्यासोबत प्रणयाचा अनुभव घेणे म्हणजे तजेला देणारे पाणी पिण्यासारखे आहे. पाण्याची टाकी किंवा हौद ही सार्वजनिक ठिकाणी नसते तर खासगी असते. शिवाय, तेथे असेही म्हटले आहे की, एका पुरुषाला आपल्याच पत्नीकडून मुले व्हावीत; त्याने रस्त्यावर अर्थात इतर स्त्रीयांशी संबंध ठेवून मुले उत्पन्‍न करू नयेत. तेव्हा पुरुषांना हा स्पष्ट सल्ला दिला आहे की, त्यांनी आपल्या पत्नीबरोबर विश्‍वासू असावे.

सुज्ञ पुरुष पुढे म्हणतो: “तुझ्या झऱ्‍याला आशीर्वाद प्राप्त होवो; तरुणपणी केलेल्या स्त्रीसह संतुष्ट ऐस. रमणीय हरिणी, सुंदर रानशेळी यांप्रमाणे तिचे स्तन तुला सर्वदा तृप्त राखोत. तिच्या प्रेमाने तुझे चित्त मोहित होवो.”नीतिसूत्रे ५:१८, १९.

येथे ‘झरा,’ लैंगिक इच्छा तृप्त करणाऱ्‍या व्यक्‍तीला सूचित करतो. आपल्या वैवाहिक सोबत्यासोबत लैंगिक सुखाचा आनंद घेणे हा देवाकडील एक “आशीर्वाद” आहे. म्हणून, पुरुषाने तरुणपणी विवाह केलेल्या आपल्या स्त्रीसह संतुष्ट असावे असे सांगितले आहे. त्याच्याकरता ती हरिणीसारखी रमणीय आणि देखणी आहे व तिची सुंदरता आणि तिचे लावण्य रानशेळीसारखे आहे.

त्यानंतर शलमोन असे विचारतो: “माझ्या मुला, परस्त्रीने तुझे चित्त का मोहित व्हावे? परक्या स्त्रीला तू का आलिंगन द्यावे?” (नीतिसूत्रे ५:२०) होय, कामाच्या ठिकाणी, शाळेत किंवा इतर ठिकाणच्या परस्त्रीसोबत अथवा परपुरुषासोबत जवळीक राखण्याची विवाहित व्यक्‍तीला काय गरज आहे?

विवाहित ख्रिश्‍चनांना प्रेषित पौल असा सल्ला देतो की, “बंधुजनहो, मी हेच म्हणतो की, काळाचा सक्षेप करण्यात आला आहे, ह्‍यासाठी की, ज्याला ज्याला पत्नी आहे त्याने त्याने ह्‍यापुढे ती नसल्यासारखे असावे.” (१ करिंथकर ७:२९) याचा काय अर्थ होतो? येशू ख्रिस्ताच्या अनुयायांना ‘पहिल्याने राज्य मिळवण्यास झटण्याची’ गरज आहे. (मत्तय ६:३३) त्यामुळे, विवाहित जोडप्यांनी राज्याच्या हितांना दुय्यम स्थान देऊन एकमेकांबद्दलच जास्त विचार करणे योग्य नाही.

आत्मसंयमाची आवश्‍यकता

लैंगिक वासना नियंत्रणात ठेवणे शक्य आहे. आणि यहोवाची पसंती हवी असणाऱ्‍यांनी तर संयम बाळगलाच पाहिजे. “देवाची इच्छा ही आहे की, तुमचे पवित्रीकरण व्हावे, म्हणजे तुम्ही जारकर्मापासून स्वतःला अलिप्त ठेवावे. . . . [आणि] पवित्रतेने व अब्रूने तुम्हातील प्रत्येकाने आपल्या देहावर ताबा कसा ठेवावा ते समजून घ्यावे.”—१ थेस्सलनीकाकर ४:३, ४, ५.

तरुणांनी लक्षात ठेवावे की, पहिल्यांदा लैंगिक इच्छा मनात जागृत होताच त्यांनी लग्नाची घाई करू नये. लग्न हे एक बंधन आहे आणि ते टिकवण्यासाठी प्रौढ असण्याची गरज आहे. (उत्पत्ति २:२४) ‘तारुण्याचा काळ ओसरेपर्यंत’ थांबणे केव्हाही चांगले. कारण तारुण्याच्या काळात लैंगिक भावना फार तीव्र असतात आणि एखाद्याच्या निर्णयशक्‍तीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते. (१ करिंथकर ७:३६, NW) विवाह सोबत्याच्या शोधात असलेल्या एका व्यक्‍तीला विवाह सोबती मिळत नसल्याने कोणाशीही अनैतिक संबंध ठेवणे मूर्खपणाचे नाही का? ते पाप नाही का?

दुर्जनाला त्याची स्वतःचीच दुष्कर्मे पछाडितात”

अनैतिक संबंध ठेवणे चुकीचे आहे. कारण मूलतः मानवांना लैंगिक क्षमता देणाऱ्‍या व जीवनदाता असलेल्या यहोवाला असे अनैतिक संबंध ठेवणे मुळीच मान्य नाही. म्हणून, नैतिक शुद्धता राखण्यासाठी राजा शलमोन अशी प्रेरणा देतो की, “मनुष्याचे मार्ग परमेश्‍वराच्या दृष्टीसमोर आहेत, आणि तोच त्याच्या सर्व वाटा नीट करितो.” (नीतिसूत्रे ५:२१) “ज्याच्याजवळ आपल्याला हिशोब द्यायचा आहे” त्या देवाच्या नजरेतून काहीही लपलेले नाही. (इब्री लोकांस ४:१३, पं.र.भा.) लैंगिक अनैतिकतेचे कोणतेही कृत्य—मग ते कितीही लपून केले असले किंवा त्याचे शारीरिक आणि सामाजिक परिणाम काहीही असले तरी—यहोवासोबत आपला नातेसंबंध यामुळे बिघडणार हे अगदी निश्‍चित आहे. तेव्हा, दोनचार सुखाच्या क्षणांसाठी देवाबरोबरील शांती गमावून बसणे किती मूर्खतेचे आहे!

काहीजण निर्लज्जपणे अनैतिक कृत्ये करत राहतात आणि आपल्याला काही होऊ शकत नाही असे त्यांना वाटते—पण जास्त काळासाठी ते चालणार नाही. शलमोन म्हणतो: “दुर्जनाला त्याची स्वतःचीच दुष्कर्मे पछाडितात; तो आपल्याच पापाच्या पाशात सापडतो. त्याला शिक्षण मिळाले नाही म्हणून तो मरतो; तो आपल्या अति मूर्खपणामुळे भ्रांत होतो.”नीतिसूत्रे ५:२२, २३.

आपल्यापैकी कोणीही भ्रांत का व्हावे? कारण नीतिसूत्राच्या पुस्तकात भुलवणाऱ्‍या जगिक मार्गांबद्दल पूर्व इशारा देण्यात आला आहे. आणि वाईट चालचलनामुळे आपल्याला पैसा, शक्‍ती, अब्रू या सर्वांची काय किंमत मोजावी लागते याची जाणीव करून दिलेली आहे. इतकी समज दिली असताना, पस्तावा करण्याची पाळी स्वतःवर ओढवून घेण्याची आपल्याला गरज नाही. यहोवाने आपल्याला त्याच्या प्रेरित वचनात दिलेला सल्ला अनुसरून आपण अनैतिक जगामध्येही निष्कलंक राहू शकतो.

[तळटीपा]

^ परि. 11 ‘परका’ हा शब्द देवाच्या नियमशास्त्राच्या विरोधात जाऊन यहोवापासून स्वतःला दूर केलेल्या व्यक्‍तींसाठी वापरला जात होता. म्हणून, येथे वेश्‍येला ‘परस्त्री’ असे म्हटले आहे.

[३० पानांवरील चित्रे]

वाईट चालचलनाचे परिणाम दवण्यासारखे कडू असतात

[३१ पानांवरील चित्रे]

“तरुणपणी केलेल्या स्त्रीसह संतुष्ट ऐस”