व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

उपेक्षा करणाऱ्‍यांचा प्रभाव तुमच्यावर होत आहे का?

उपेक्षा करणाऱ्‍यांचा प्रभाव तुमच्यावर होत आहे का?

उपेक्षा करणाऱ्‍यांचा प्रभाव तुमच्यावर होत आहे का?

“उपेक्षा करणाऱ्‍याला दुसऱ्‍यामध्ये कधीही चांगले गुण दिसत नाहीत आणि वाईट गुण त्याच्या नजरेतून कधी निसटत नाहीत. तो अंधारात घुबडासारखा सतर्क तर प्रकाशात अंधळा असतो; तो सतत दोष शोधत असतो पण चांगले गुण त्याला कधीच दिसत नाहीत.” १९ व्या शतकातील अमेरिकन पाळक हेन्री वॉर्ड बीचर यांनी असे म्हटले होते. हे आधुनिक काळातल्या उपेक्षावादी व्यक्‍तीच्या वृत्तीचे अगदी हुबेहूब वर्णन आहे असे अनेकांना वाटेल. पण “उपेक्षावादी” या शब्दाचा उगम प्राचीन ग्रीसमध्ये झाला आहे; तेथे या शब्दाचा अर्थ, फक्‍त अशी मनोवृत्ती दाखवणारी व्यक्‍ती एवढाच नव्हता. तर कित्येक शतकांपर्यंत तो तत्त्वज्ञांसाठी वापरला जात होता.

उपेक्षावाद्यांच्या तत्त्वज्ञानाला कोठून सुरवात झाली? त्यांची शिकवण काय होती? एखाद्या ख्रिश्‍चनाला उपेक्षावाद्यासारखे वागणे शोभेल का?

प्राचीन उपेक्षावादी—त्यांचा उगम आणि विश्‍वास

प्राचीन ग्रीस हे वादविवादांचे उगमस्थान होते असे म्हणता येईल. सामान्य युगापर्यंत सोक्रेटीझ, प्लेटो आणि ॲरिस्टोटलसारख्या लोकांनी तत्त्वज्ञानाचा पुरस्कार केला आणि अशातऱ्‍हेने ते प्रसिद्ध झाले. त्यांच्या शिकवणींचा लोकांवर प्रचंड प्रभाव पडला. एवढेच नव्हे तर, पाश्‍चात्त्य संस्कृतीत या कल्पना आजही आढळतात.

सोक्रेटीझचे (सा.य.पू. ४७०-३९९) मत होते की, सुखचैनीच्या वस्तूंच्या मागे लागून किंवा देहवासना तृप्त करून कायमस्वरूपी सुखसमाधान मिळू शकत नाही. आयुष्यभर धर्माचरणाचा शोध केल्यानेच खरा आनंद मिळतो असा त्याचा दावा होता. धर्माचरण सर्वोत्कृष्ट आहे असे सोक्रेटीझचे म्हणणे होते. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्याने स्वतः सुखचैनीच्या वस्तूंचा आणि अनावश्‍यक प्रयासांचा त्याग केला कारण यामुळे मन विकर्षित होते असे त्याचे मत होते. आणि मग चैन, उधळपट्टी किंवा ऐषाराम नसलेली साधीसुधी, आत्म-त्यागी जीवनशैली तो जगू लागला.

सोक्रेटीझने शिकवण्याची एक पद्धत शोधून काढली; तिला सोक्रेटिक पद्धत असे नाव पडले. बहुतेक विचारवंत लोक आपली एक कल्पना मांडून तिला आधारभूत कारणमीमांसा देतात. पण सोक्रेटीझ याच्या उलट करायचा. तो इतर तत्त्वज्ञांचे सिद्धान्त ऐकून त्यांच्या कल्पनांमधील दोष दाखवायचा. यामुळे इतरांची टीका करण्याची किंवा इतरांना तुच्छ लेखण्याची वृत्ती पसरू लागली.

अँटिसथेनीस (सुमारे सा.यु.पू. ४४५-३६५) नामक एक तत्त्वज्ञ सोक्रेटीझचा अनुयायी होता. त्याने आणि इतर काही जणांनी तर सोक्रेटीझच्या मूलभूत शिकवणीत आणखी भर घातली; ते म्हणू लागले की, धर्माचरण हीच एक पवित्र गोष्ट आहे. त्यांच्या मते सुखचैन केवळ विकर्षण नव्हे तर अमंगळ होते. अशाप्रकारे ते माणूसघाणी बनले आणि इतरांकडे तुच्छतेने पाहू लागले. मग त्यांना उपेक्षावादी (सिनिक) हे नाव पडले. उपेक्षावादी हे नाव कदाचित त्यांच्या दुःखी आणि मगरूरी वृत्तीचे वर्णन करणाऱ्‍या ग्रीक शब्दातून (कीनीकोस) आले असावे. त्याचा अर्थ “कुत्र्यासमान” असा होतो. *

त्यांच्या जीवनावर याचा परिणाम

चैनीच्या वस्तूंचा आणि स्वतःचा त्याग करणे या उपेक्षावादाच्या तत्त्वज्ञानाच्या काही शिकवणी चांगल्या आहेत असे काहींचे मत होते; पण उपेक्षावाद्यांनी त्यांच्या कल्पनांचा कहर केला. याचे सर्वात प्रसिद्ध उदाहरण आहे उपेक्षावादी आणि तत्त्वज्ञ डायोजिनीस.

डायोजिनीसचा जन्म काळ्या समुद्राच्या किनाऱ्‍यावर वसलेल्या सिनोपी या शहरात सा.यु.पू. ४१२ मध्ये झाला. आपल्या वडिलांसह तो अथेन्सला राहायला गेला. तेथे तो उपेक्षावाद्यांच्या शिकवणींच्या संपर्कात आला. त्याने अँटिसथेनीसकडून शिक्षा प्राप्त केली आणि तो उपेक्षावादी शिकवणीचा भक्‍त बनला. सोक्रेटीझचे राहणीमान साधेसुधे होते; अँटिसथेनीससुद्धा काटेकोर होता. पण डायोजिनीस तर संन्याशासारखा राहायचा. आपण भौतिक सुखांचा केवढा त्याग केला आहे हे दाखवण्यासाठी अधूनमधून तर तो अल्पकाळासाठी चक्क टबमध्ये राहायचा!

परम कल्याणाच्या शोधात डायोजिनीस म्हणे भर उन्हात सद्‌गुणी व्यक्‍तीला कंदील घेऊन शोधायचा! लोकांचे लक्ष वेधण्याचा हा एक मार्ग होता आणि अशाप्रकारे डायोजिनीस आणि इतर उपेक्षावादी शिक्षण देत असत. असे म्हणतात की, एकदा थोर सिकंदरने डायोजिनीसला काय हवे असे विचारले. तेव्हा डायोजिनीस सिकंदरला म्हणाला: ‘तुम्ही जरा बाजूला व्हा कारण सूर्यप्रकाश अडवला जात आहे!’

डायोजिनीस आणि इतर उपेक्षावादी भिकाऱ्‍यांसारखे राहायचे. लोकांसोबत ते मिळूनमिसळून राहत नव्हते. सामाजिक कर्तव्ये करायला देखील ते तयार नसत. सोक्रेटीसच्या तत्त्वाचा त्यांच्यावर इतका प्रभाव पडला होता, की इतरांचा ते मुळीच आदर करत नव्हते. डायोजिनीस तर खोचकपणे टीका करायचा. अशाप्रकारे, हे उपेक्षावादी खरोखर “कुत्र्यासमान” बनले; पण डायोजिनीसला तर कुत्रा असेच नाव पडले. सा.यु.पू. ३२० मध्ये तो मरण पावला; त्या वेळी तो ९० वर्षांचा होता. त्याच्या थडग्यावर कुत्र्याच्या आकाराचे संगमरवरी दगडात एक स्मारक बांधण्यात आले.

इतर कल्पनांमध्ये उपेक्षावादी तत्त्वज्ञानाच्या काही शिकवणी घेण्यात आल्या. परंतु, कालांतराने डायोजिनीस आणि नंतरच्या अनुयायांच्या विचित्र वागण्यामुळे उपेक्षावाद्यांबद्दल लोकांचे चांगले मत राहिले नाही. नंतर उपेक्षावाद हाच नाहीसा झाला.

आधुनिक उपेक्षावादी—तुम्ही त्यांच्याप्रमाणे वागावे का?

दि ऑक्सफोर्ड इंग्लिश डिक्शनरी यात आधुनिक काळातील उपेक्षावाद्याचे वर्णन, “अपशब्द बोलणारा किंवा सतत दोष दाखवणारा माणूस. . . . कोणीही माणूस जे काही करतो त्यामागे चांगले किंवा प्रामाणिक उद्देश आहेत यावर विश्‍वास न ठेवणारा माणूस आणि तुच्छ शेरे मारून किंवा खोचक बोलून हे प्रकट करणारा माणूस; टोमणे मारून दोष दाखवणारा माणूस,” असे केले आहे. आपल्या अवतीभोवती असलेल्या लोकांमध्ये हे गुण आज पाहायला मिळतात पण ख्रिस्ती व्यक्‍तीला ही वागणूक शोभत नाही. आता बायबलच्या शिकवणी आणि तत्त्वे काय आहेत ते आपण पाहू या.

“परमेश्‍वर दयाळू व कृपाळू आहे, तो मंदक्रोध व दयामय आहे. तो सर्वदाच दोष देत राहणार नाही; तो आपला क्रोध सर्वकाळ राहू देणार नाही.” (स्तोत्र १०३:८, ९) ख्रिश्‍चनांनी ‘देवाचे अनुकरण करणारे व्हावे’ असे त्यांना सांगण्यात आले आहे. (इफिसकर ५:१) जर सर्वशक्‍तिमान देव ‘अपशब्द बोलत नाही आणि सतत दोष दाखवत नाही’ पण दयाळू आणि दयामय आहे तर ख्रिश्‍चनांनी देखील त्याच्याप्रमाणेच असले पाहिजे.

यहोवाचे हुबेहूब प्रतिरूप असलेल्या येशू ख्रिस्ताने “त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालावे म्हणून . . . आपल्याकरता कित्ता घालून दिला आहे.” (१ पेत्र २:२१; इब्री लोकांस १:३) काही वेळा, येशूने धार्मिक असत्य उघड केले आणि जगातील दुष्ट कार्यांविषयीही तो बोलला. (योहान ७:७) पण, प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांची तो प्रशंसा करत असे. उदाहरणार्थ, नथनेलाविषयी तो म्हणाला: “पाहा हा खराखुरा इस्राएली आहे; ह्‍याच्याठायी कपट नाही!” (योहान १:४७) चमत्कार करताना त्याने संबंधित व्यक्‍तीच्या विश्‍वासाची प्रशंसा केली. (मत्तय ९:२२) एकदा, एका स्त्रीने येशूला दिलेले बक्षीस फारच महाग आहे असे काहीजण म्हणू लागले तेव्हा येशूने तिची टीका केली नाही तर म्हटले की, “सर्व जगात जेथे ही सुवार्ता गाजवितील तेथे तेथे हिने जे केले तेहि हिच्या स्मरणार्थ सांगतील.” (मत्तय २६:६-१३) येशूच्या अनुयायांचा त्याच्यावर खूप भरवसा होता आणि त्यांच्याकरता तो मित्रासारखा होता; त्याने त्यांच्यावर ‘शेवटपर्यंत प्रेम केले.’—योहान १३:१.

येशू परिपूर्ण असल्यामुळे अपरिपूर्ण लोकांचे दोष त्याला सहजासहजी दाखवता आले असते. परंतु, तो लोकांवर भरवसा ठेवायचा व त्यांचे दोष दाखवत राहण्याऐवजी तो त्यांना विसावा द्यायचा.—मत्तय ११:२९, ३०.

[प्रेम] सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते.” (१ करिंथकर १३:७) ही वृत्ती उपेक्षावादी व्यक्‍तीच्या अगदी उलट आहे कारण उपेक्षावादी व्यक्‍ती इतरांवर कधीच विश्‍वास ठेवत नाही उलट नेहमी संशय घेत राहते. अर्थात, या जगात दुष्ट हेतू असलेले पुष्कळ लोक आहेत म्हणून जरा जपून राहणे चांगले आहे. (नीतिसूत्रे १४:१५) परंतु, इतरांबद्दल आपल्याला प्रेम असले तर आपण त्यांच्यावर विश्‍वास ठेवतो व विनाकारण त्यांच्यावर संशय घेत नाही.

देव आपल्या सेवकांवर प्रेम करतो, त्यांच्यावर विश्‍वास ठेवतो. फक्‍त त्यालाच त्यांच्या मर्यादा चांगल्या ठाऊक आहेत. तरीही, तो त्यांच्यावर कधी संशय घेत नाही किंवा त्यांच्याकडून अवाजवी अपेक्षा देखील करत नाही. (स्तोत्र १०३:१३, १४) इतकेच नव्हे तर, देव लोकांमधील चांगले गुण पाहतो आणि त्यांच्यावर विश्‍वास ठेवून त्याच्या अपरिपूर्ण परंतु निष्ठावान सेवकांना काही खास हक्क आणि अधिकार देतो.—१ राजे १४:१३; स्तोत्र ८२:६.

“प्रत्येकास ज्याच्या त्याच्या वर्तनाप्रमाणे, ज्याच्या त्याच्या करणीप्रमाणे प्रतिफळ देण्यास मी परमेश्‍वर हृदय चाळून पाहतो; अंतर्याम पारखितो.” (यिर्मया १७:१०) एखाद्या व्यक्‍तीच्या हृदयात काय आहे हे यहोवाला स्पष्टपणे कळते. आपल्याला हे शक्य नाही. म्हणून, अमुक अमुक व्यक्‍ती अशी आहे किंवा तशी आहे असे आपण पटकन ठरवून टाकू नये.

आपणही टीकात्मक बनलो आणि सगळ्यांना दोषी नजरेतून पाहू लागलो तर आपल्यामध्ये फूट पडू शकते. अशाने ख्रिस्ती मंडळीतील शांतीचा भंग होऊ शकतो. म्हणून आपणही येशूसारखे होऊ या. तो आपल्या शिष्यांमध्ये चांगले गुण पाहायचा. तो त्यांचा जिवलग मित्र बनला.—योहान १५:११-१५.

“लोकांनी तुम्हाशी जसे वर्तन करावे म्हणून तुमची इच्छा असेल तसेच तुम्हीहि त्यांच्याशी वर्तन करा.” (लूक ६:३१) येशू ख्रिस्ताच्या या सल्ल्याचे अनुकरण करण्याचे अनेक मार्ग आहेत. उदाहरणार्थ, सर्वांना वाटते की लोकांनी आपल्याशी चांगल्यारीतीने आणि आदराने बोलावे. म्हणून, आपणही अशाचतऱ्‍हेने लोकांशी बोलावे. खोट्या शिकवणी देणाऱ्‍या धार्मिक पुढाऱ्‍यांचे पितळ उघडे करताना देखील येशू कधीही खोचकपणे बोलला नाही.—मत्तय २३:१३-३६.

टीकात्मक मनोवृत्ती बदलण्याचे मार्ग

आपल्याला कोणाचा वाईट अनुभव आला असेल तर आपण त्यांची सतत टीका करत राहतो किंवा त्यांचे दोष दाखवत राहतो. पण यहोवा आपल्या अपरिपूर्ण लोकांवर भरवसा ठेवतो याचा विचार केल्यावर आपल्याला ही मनोवृत्ती बदलता येईल. अशाने आपण इतरांकडून जास्त अपेक्षा करणार नाही तर तेसुद्धा अपरिपूर्ण आहेत आणि योग्य करण्याचा प्रयत्न करत आहेत हे समजून घेऊ.

काही वाईट अनुभवांमुळे लोकांवर आपला विश्‍वास राहत नाही. अपरिपूर्ण मानवांवर संपूर्ण विश्‍वास करणेसुद्धा योग्य नाही. (स्तोत्र १४६:३, ४) परंतु, ख्रिस्ती मंडळीत अनेकजण इतरांना उत्तेजन देण्याचा खरोखर प्रयत्न करतात. विचार करा, ज्या लोकांचे कोणीच नाही अशांसोबत आपले कितीतरी बंधू-भगिनी माता, पिता, बहिणी, भाऊ किंवा मुलांसमान वागतात. (मार्क १०:३०) संकटकाळी कितीतरी लोक मदतीला धावून येतात. *नीतिसूत्रे १८:२४.

येशूच्या अनुयायांचे ओळखचिन्ह टीकात्मक मनोवृत्ती नव्हे तर बंधुप्रेम आहे. कारण तो म्हणाला: “तुमची एकमेकांवर प्रीति असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा.” (योहान १३:३५) म्हणून आपण प्रेम दाखवू या आणि सह-ख्रिश्‍चनांमधील चांगले गुण पाहू या. असे केल्याने आपण उपेक्षावाद्यांसारखे टीका करत राहणार नाही.

[तळटीपा]

^ परि. 8 उपेक्षावादी हे नाव कदाचित कीनोसारीस या ग्रीक शब्दातून आले असण्याची आणखी एक शक्यता आहे; कीनोसारीस ही अथेन्स येथील एक दुय्यम शाळा आहे जेथे अँटिसथेनीस शिकवत असे.

^ परि. 27 मे १५, १९९९ अंकातील “साहाय्य आणि आधार देणारी—ख्रिस्ती मंडळी” हा लेख पाहा.

[२१ पानांवरील चित्र]

सुप्रसिद्ध उपेक्षावादी, डायोजिनीस

[चित्राचे श्रेय]

ग्रेट मेन ॲण्ड फेमस वुमन या पुस्तकातून