व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

छळामुळे अंत्युखियात वाढ

छळामुळे अंत्युखियात वाढ

छळामुळे अंत्युखियात वाढ

स्तेफनाला ठार मारल्यानंतर छळ सुरू झाला तेव्हा येशूचे अनेक शिष्य जेरूसलेम सोडून पळून गेले. काही जणांनी सिरिया येथील अंत्युखियामध्ये आसरा घेतला; हे ठिकाण जेरूसलेमच्या उत्तरेला ५५० किलोमीटरच्या अंतरावर वसलेले आहे. (प्रेषितांची कृत्ये ११:१९) तेथे घडणाऱ्‍या घटनांचा सबंध ख्रिस्ती इतिहासावर परिणाम होणार होता. पण तेथे नक्की काय घडले हे समजण्यासाठी अंत्युखियाविषयी आधी थोडे जाणून घेतलेले बरे.

रोमी साम्राज्याच्या शहरांमधील अंत्युखिया हे शहर आकारमान, समृद्धी आणि महत्त्वाच्या बाबतीत रोम आणि ॲलेक्झांड्रिया या शहरांना सोडून इतर शहरांपेक्षा श्रेष्ठ होते. भूमध्य सागराच्या ईशान्येकडील कोपऱ्‍यावर सिरीयाच्या या राजधानीचे शासन होते. अंत्युखिया (आधुनिक काळातील टर्की येथील अन्तक्या) ओरोन्टस नदीवर वसलेले होते; ही नदी ३२ किलोमीटर दूर असलेल्या सेल्युसिया पाइरीए या बंदर गावाला जोडलेली होती. रोम आणि टायग्रिस-युफ्रेटीस खोरे यांच्यामधील सर्वात महत्त्वाचे व्यापारी मार्ग अंत्युखियातूनच जात होते. ते व्यापाराचे केंद्र असल्यामुळे संपूर्ण साम्राज्यातील व्यापार तेथे चालत होता. विविध लोकांची तेथे सतत ये-जा असायची आणि ते रोमच्या वेगवेगळ्या भागांतून धार्मिक कार्यहालचालींबद्दल खबर आणायचे.

अंत्युखियामध्ये ग्रीक धर्म आणि तत्त्वज्ञानाचा फैलाव झाला होता. इतिहासकार ग्लॅनविल डाऊनी यांच्या मते, “ख्रिस्ताच्या काळात, लोक आपल्या समाधानासाठी आपापल्या पसंतीनुसार जुने धार्मिक पंथ आणि तत्त्वज्ञान स्वीकारू लागले होते.” (अ हिस्टरी ऑफ ॲन्टियोक सिरीया) अनेकांना यहुदी धर्मातील एकेश्‍वरवादाची शिकवण, विधी आणि नीतिमूल्ये आवडली होती.

सा.यु.पू. ३०० मध्ये अंत्युखिया शहराची स्थापना झाल्यापासून तेथे यहुद्यांची मोठी वसाहत झाली होती. त्यांची लोकसंख्या २०-६० हजारापर्यंत होती आणि शहरातील १० टक्क्यांपेक्षा जास्त लोक यहुदीच होते असे म्हटले जाते. इतिहासकार जोसीफस म्हणतात की, सेल्युसियाचे राजे यहुद्यांना शहरात राहायला उत्तेजन देत होते आणि त्यांना सगळे नागरी हक्कसुद्धा देण्यात आले होते. त्या वेळेपर्यंत, इब्री शास्त्रवचने देखील ग्रीकमध्ये उपलब्ध झाली होती. त्यामुळे शास्त्रवचनांबद्दल आवड असणाऱ्‍या काही ग्रीक लोकांना मशिहाबद्दल यहुद्यांच्या ज्या अपेक्षा होत्या त्याबाबतीत रस वाटू लागला. मग अनेक ग्रीक लोकांनी मतांतर देखील केले. या सर्व कारणांमुळे अंत्युखिया, हे शिष्य बनवण्याच्या ख्रिस्ती कार्यासाठी साजेसे क्षेत्र बनले होते.

विदेश्‍यांना साक्ष

छळामुळे जेरूसलेम सोडून आलेले येशूचे बहुतेक अनुयायी फक्‍त यहुद्यांनाच आपल्या विश्‍वासाविषयी सांगत होते. परंतु, अंत्युखियामध्ये सायप्रस आणि सायरीन येथून आलेले काही शिष्य ‘हेल्लेणी लोकांनाही’ सुवार्ता सांगत होते. (प्रेषितांची कृत्ये ११:२०) खरे पाहता, सा.यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टपासूनच ग्रीक बोलणाऱ्‍या यहुद्यांना आणि यहुदी धर्म स्वीकारलेल्यांना सुवार्ता ऐकवली जात होती. परंतु अंत्युखिया येथे सुवार्ता ऐकवण्याचे काम नवीनच होते. मग ही सुवार्ता यहुद्यांशिवाय विदेश्‍यांनाही ऐकवली जाऊ लागली. अर्थात, विदेश्‍यांपैकी कर्नेल्य आणि त्याचे कुटुंबीय केव्हाच शिष्य बनले होते. परंतु, विदेश्‍यांना किंवा परराष्ट्रीयांना सुवार्ता सांगण्यात काहीच गैर नाही हे यहोवाने एका दर्शनाद्वारे प्रेषित पेत्राला सांगितल्यावरच त्याबाबतीत त्याची खात्री पटली.—प्रेषितांची कृत्ये १०:१-४८.

वर्षानुवर्षांपासून येथे असंख्य यहुदी राहत होते आणि यहुदी व विदेशी यांच्यामध्ये फारसे वैर देखील नव्हते. गैर-यहुद्यांना साक्ष दिली जात होती आणि ते सुवार्तेला चांगला प्रतिसाद देखील देत होते. या सर्वासाठी अंत्युखियामध्ये अनुकूल परिस्थिती होती आणि म्हणून ‘पुष्कळ लोकांनी विश्‍वास केला.’ (प्रेषितांची कृत्ये ११:२१) नंतर, यहुदी धर्म स्वीकारलेले पूर्वीचे मूर्तिपूजक लोक ख्रिस्ती बनल्यावर मूर्तिपूजा करणाऱ्‍या इतर विदेश्‍यांना साक्ष द्यायला तयार झाले.

अंत्युखियामधील वाढीबद्दल कळताच जेरूसलेममधील मंडळीने बर्णबाला तेथे पाठवले. त्यांचा हा निर्णय अगदी योग्य होता. कारण गैर-यहुद्यांना प्रचार करायला सुरवात केलेल्या काहींप्रमाणे बर्णबा स्वतः सायप्रसचा होता. त्यामुळे अंत्युखियामधील विदेश्‍यांशी बोलायला त्याला कठीण गेले नसते. शिवाय, अंत्युखियामधील लोकांनाही तो आपल्यातलाच वाटला असता. * म्हणून, तेथे पोहोंचल्यावर तो देवाची कृपा पाहून हर्षित झाला; आणि त्याने त्या सर्वांना बोध केला की, दृढनिश्‍चयाने प्रभूला बिलगून राहा.” याचा परिणाम असा झाला की, “प्रभूला पुष्कळ जण मिळाले.”—प्रेषितांची कृत्ये ११:२२-२४.

इतिहासकार डाऊनी म्हणतात की, “अंत्युखियामधील या सुरवातीच्या साक्षकार्याला बराच चांगला प्रतिसाद मिळाला. त्याचे एक कारण म्हणजे, जेरूसलेमप्रमाणे या शहरामध्ये मिशनऱ्‍यांना धर्मवेड्या यहुदी लोकांची भीती बाळगायचे कारण नव्हते. त्याचप्रमाणे, सिरीयाची राजधानी असलेल्या या शहरावर लष्करी हुकूमत असल्यामुळे तेथे सुव्यवस्था होती. जेरूसलेममध्ये तर यहुदीयाच्या रोमन अधिकाऱ्‍यांना (या वेळी तरी) धर्मवेड्या यहुद्यांना आटोक्यात आणणे शक्य नव्हते. परंतु अंत्युखियामध्ये असे नव्हते आणि म्हणून जेरूसलेमप्रमाणे तेथे दंगा होण्याची इतकी शक्यता नव्हती.”

अशी ही अनुकूल परिस्थिती असल्यामुळे आणि पुष्कळ कार्य करायचे असल्यामुळे आपल्याला कोणाची तरी मदत हवी असे बर्णबाला वाटले आणि त्याने शौलाला मदतीला बोलवायचे ठरवले. शौलालाच किंवा पौलालाच का? कारण पौल हा १२ प्रेषितांपैकी एक नसला तरी त्याला राष्ट्रांमध्ये प्रेषितपद मिळाले होते. (प्रेषितांची कृत्ये ९:१५, २७; रोमकर १:५; प्रकटीकरण २१:१४) म्हणून, अंत्युखियाच्या विदेशी शहरात सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी पौल हा योग्य साथीदार होता. (गलतीकर १:१६) त्यामुळे बर्णबा तार्साला गेला, त्याने पौलाला शोधून काढले आणि त्याला अंत्युखियाला आणले.—प्रेषितांची कृत्ये ११:२५, २६; पृष्ठे २६-७ वरील पेटी पाहा.

ईश्‍वराकडून मिळालेले नाव—ख्रिस्ती

एक संपूर्ण वर्षभर बर्णबा आणि शौल यांनी “बऱ्‍याच लोकांना शिकविले; आणि [ईश्‍वराकडून] शिष्यांना ख्रिस्ती हे नाव पहिल्याने अंत्युखियात मिळाले.” येशूच्या शिष्यांना ख्रिस्ती (ग्रीकमध्ये) किंवा मशिही (इब्रीमध्ये) हे नाव सर्वात आधी यहुद्यांनी दिले नसावे कारण येशूच्या अनुयायांना ख्रिस्ती म्हणणे म्हणजे येशूला ख्रिस्त मानण्यासारखे होते. पण त्यांनी येशू हा मशिहा किंवा ख्रिस्त आहे असे मानलेच नाही. म्हणून हे नाव त्यांनी देण्याची शक्यताच नाही. काहींना वाटते की, गैर-ख्रिश्‍चनांनी ख्रिश्‍चनांना उपहासाने किंवा उपेक्षेने ख्रिस्ती नाव दिले असावे. परंतु, हेसुद्धा खरे नाही.—प्रेषितांची कृत्ये ११:२६.

ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांमध्ये, या नवीन नावासोबत वापरलेल्या क्रियापदाचा (ज्याचे भाषांतर सहसा “मिळाले” असे केले जाते) संबंध नेहमी अलौकिक, दैवी किंवा ईश्‍वरी गोष्टींशी असतो. त्यामुळे तज्ज्ञ मंडळी याचा अनुवाद, “देववाणी करणे,” “ईश्‍वराने कळवलेले,” किंवा “आज्ञा अथवा आदेश देणे, स्वर्गातून शिकवणे” असे करतात. म्हणून, यहोवाने ख्रिश्‍चनांना हे नाव शौल आणि बर्णबा यांच्याद्वारे दिले असण्याची शक्यता आहे.

त्यानंतर त्यांना याच नावाने बोलवण्यात येऊ लागले. येशूचे शिष्य यहुदी पंथाचे भाग होते असा त्यांच्याबद्दल गैरसमज होणे शक्य नव्हते कारण ते अगदी वेगळे होते. सा.यु. ५८ पर्यंत, रोमन अधिकाऱ्‍यांना ख्रिश्‍चनांची बऱ्‍यापैकी ओळख पटली होती. (प्रेषितांची कृत्ये २६:२८) इतिहासकार टॅसिटसनुसार, सा.यु. ६४ पर्यंत रोममधील सामान्य लोकही ख्रिश्‍चन किंवा ख्रिस्ती या नावाचा सर्रास वापर करू लागले.

यहोवा आपल्या विश्‍वासू जणांचा वापर करतो

अंत्युखियामध्ये सुवार्ता सांगण्याचे काम जोराने होऊ लागले. यहोवाच्या आशीर्वादाने आणि येशूच्या अनुयायांनी प्रचार करण्याचा निर्धार केल्याने अंत्युखिया शहर पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांचे केंद्रस्थान बनले. दूरच्या देशांपर्यंत सुवार्ता फैलावण्यासाठी देवाने त्या मंडळीचा वापर केला. उदाहरणार्थ, आपल्या प्रत्येक नवीन मिशनरी दौऱ्‍यासाठी प्रेषित पौल अंत्युखियावरूनच जायचा.

आधुनिक काळात, विरोधातही दाखवण्यात येणारा आवेश आणि मनाचा दृढनिश्‍चय यांमुळे खऱ्‍या ख्रिस्ती धर्माचा फैलाव झाला आहे आणि अनेकांना सुवार्ता ऐकायला व तिच्याबद्दल कदर व्यक्‍त करायला संधी मिळाली आहे. * म्हणून, तुम्हालाही खऱ्‍या उपासनेमुळे विरोध सहन करावा लागत असल्यास, यहोवा काही कारणांसाठी याला अनुमती देतो हे विसरू नका. पहिल्या शतकाप्रमाणे, आज लोकांना देवाच्या राज्याविषयी ऐकण्याची आणि त्याची बाजू घेण्याची संधी देणे आवश्‍यक आहे. यहोवाला विश्‍वासूपणे सेवा करण्याचा दृढनिश्‍चय तुम्ही केला तर आणखी कोणाला तरी सत्याचे अचूक ज्ञान मिळू शकेल.

[तळटीपा]

^ परि. 9 ढग किंवा धुके नसताना, अंत्युखियाच्या नैर्‌ऋत्याकडील कासीस पर्वत सायप्रसहून अगदी स्पष्टपणे दिसतो.

^ परि. 18 पाहा टेहळणी बुरूज, ऑगस्ट १, १९९९, पृष्ठ ९; सावध राहा!, मे ८, १९९९, पृष्ठे १३-४; १९९९ इयरबुक ऑफ जेहोवाज विटनेसेस, पृष्ठे २५०-२.

[२६, २७ पानांवरील चौकट/चित्रे]

शौलाची “अज्ञात वर्षे”

जेरूसलेममध्ये शौलाला ठार मारण्यासाठी कट रचला होता आणि सह-उपासकांनी त्याला तार्सास पाठवले हा त्याच्याबद्दलचा उल्लेख, तो अंत्युखियाला जाण्याआधी म्हणजे सा.यु. ४५ च्या सुमारास प्रेषितांची कृत्ये पुस्तकातील शेवटला उल्लेख आहे. (प्रेषितांची कृत्ये ९:२८-३०; ११:२५) पण ही गोष्ट सा.यु. ३६ च्या सुमारास म्हणजे नऊ वर्षांआधी घडली होती. दरम्यान, अर्थात, ज्याला शौलाची अज्ञात वर्षे म्हणतात त्या काळात तो कोठे होता?

पौल जेरूसलेमहून सिरिया आणि किलिकियाच्या प्रांतांमध्ये गेला तेव्हा यहुदीयातील मंडळ्यांच्या असे ऐकण्यात आले की, “पूर्वी आपला छळ करणारा ज्या विश्‍वासाचा मागे नाश करीत असे, त्याची तो आता घोषणा करीत आहे.” (गलतीकर १:२१-२३) कदाचित हा अहवाल अंत्युखियामध्ये बर्णबासोबतच्या कार्याविषयी असावा पण त्याआधी देखील शौल निश्‍चितच स्वस्थ बसून नव्हता. सा.यु. ४९ पर्यंत सिरिया आणि किलिकियामध्ये पुष्कळ मंडळ्या स्थापन झाल्या होत्या. अंत्युखियामध्येही एक मंडळी झाली होती. परंतु काहींना असे वाटते की, शौलाच्या त्या “अज्ञात वर्षांदरम्यान” त्याने केलेल्या कार्यामुळे इतर मंडळ्या स्थापन झाल्या असाव्यात.—प्रेषितांची कृत्ये ११:२६; १५:२३, ४१.

काही विद्वानांचे असे म्हणणे आहे की, शौलाच्या जीवनकाळात घडलेल्या घटना देखील त्याच काळातल्या असाव्यात. नाहीतर, ‘ख्रिस्ताचा सेवक’ या नात्याने मिशनरी कार्य करत असताना त्याने सोसलेली हालअपेष्टा कधीची असावी? (२ करिंथकर ११:२३-२७) त्याने पाच वेळा यहुद्यांच्या हातून ३९ फटके कधी खाल्ले असावेत? तीन वेळा छड्यांचा मार कधी खाल्ला असावा? तो ‘पुष्कळ वेळा’ बंदिशाळेत केव्हा राहिला असावा? रोममध्ये तर त्याला नंतर कैद केले होते. पण एकदा त्याला छड्या मारून कैद केल्याचे एक वृत्त आहे; हे फिलिप्पैमध्ये घडले होते. मग इतर घटनांविषयी काय? (प्रेषितांची कृत्ये १६:२२, २३) एका लेखकानुसार, या काळादरम्यान शौल “पॅलेस्टाईनच्या बाहेरील यहुदी वसाहतींमधील सभास्थानांमध्ये अशा तऱ्‍हेने सुवार्तेची साक्ष देत होता की धार्मिक आणि मुलकी अधिकारी त्याचा विरोध करू लागले.”

करिंथकराच्या पुस्तकात तीन वेळा शौलाने त्याचे जहाज फुटले असे म्हटले आहे. परंतु एकाचेच सविस्तर वर्णन आपल्याला बायबलमध्ये आढळते; खरे तर ही घटना करिंथकरांना शौलाने आपल्या हालअपेष्टेविषयी लिहिल्यानंतर घडली होती. (प्रेषितांची कृत्ये २७:२७-४४) त्यामुळे इतर तीन वेळा जहाज फुटल्याच्या घटना त्याच्या इतर प्रवासांमध्ये घडल्या असाव्यात ज्याविषयी आपल्याला काही माहीत नाही. यांतील एक किंवा सगळ्याच घटना त्या “अज्ञात वर्षांमध्ये” घडल्या असल्यास यहुदीयात त्याची खबर पोचली यात नवल काय!

कदाचित याच काळात घडलेल्या आणखी एका घटनेबद्दल २ करिंथकर १२:२-५ मध्ये सांगितले आहे. शौल म्हणतो: ‘ख्रिस्ताच्या ठायी असलेला एक मनुष्य मला माहीत आहे, त्याला चौदा वर्षांमागे तिसऱ्‍या स्वर्गापर्यंत, सुखलोकात उचलून नेण्यात आले, माणसाने ज्यांचा उच्चारही करणे उचित नाही अशी वाक्ये त्याने ऐकली.’ स्पष्टतः, शौल स्वतःबद्दलच सांगत होता. हे त्याने सा.यु. ५५ मध्ये लिहिले आणि तेथून १४ वर्षे मागे गेल्यावर सा.यु. ४१ चे वर्ष येते—म्हणजे “अज्ञात वर्षांच्या” दरम्यानचा काळ.

त्या दृष्टान्तामुळे शौलाला निश्‍चितच एक खास प्रकारची समज मिळाली असावी. या दृष्टान्ताने त्याला “परराष्ट्रीयांचा प्रेषित” बनण्यास तयार केले असावे. (रोमकर ११:१३) याचा त्याच्या विचार करण्याच्या पद्धतीवर, लिहिण्यावर आणि बोलण्यावर परिणाम झाला का? शौलाचे परिवर्तन झाले आणि अंत्युखियाला जाण्याचे बोलावणे आले त्या दरम्यानच्या वर्षांमध्ये त्याला भावी जबाबदाऱ्‍यांबद्दल प्रशिक्षण मिळण्यास आणि प्रौढ होण्यास मदत मिळाली का? याविषयी आपल्याला काही ठाऊक नाही, पण एवढे मात्र निश्‍चित आहे की, अंत्युखियामध्ये सुवार्ता सांगण्याचे कार्य वाढवण्यासाठी बर्णबाने शौलाकडे मदत मागितली तेव्हा ते कार्य पूर्ण करण्यास आवेशी शौलाने तयारी दाखवली होती.—प्रेषितांची कृत्ये ११:१९-२६.

[२५ पानांवरील नकाशा]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

सिरिया

ओरोन्टस

अंत्युखिया

सेल्युसिया

सायप्रस

भूमध्य सागर

जेरूसलेम

[चित्राचे श्रेय]

Mountain High Maps® Copyright © १९९७ Digital Wisdom, Inc.

[२४ पानांवरील चित्रे]

वर: आधुनिक काळातील अंत्युखिया

मध्ये: सेल्युसियाचा दक्षिण भाग

खाली: सेल्युसियाच्या बंदराची भिंत