तायवानमध्ये भाताच्या शेतात सत्याचे बीज पेरणे
आपण विश्वास ठेवणाऱ्यांपैकी आहोत
तायवानमध्ये भाताच्या शेतात सत्याचे बीज पेरणे
तायवानमध्ये सहसा मुसळधार पाऊस पडतो. त्यामुळे तिथले शेतकरी वर्षातून दोन वेळा भाताचे पीक घेतात. पण, कधीकधी पाऊस वेळेवर पडत नाही. अशावेळी पेरलेले बी मरून जाते. मग शेतकरी निराश होऊन हार मानतो का? नाही. कारण अशावेळी चिकाटी किती आवश्यक आहे हे त्याला माहीत असते. तो पुन्हा नवीन बियाणे आणतो आणि पेरणी करतो. यावेळी जर पाऊस पडला तर शेतकरी सोन्याची कापणी करील. प्रचार कार्याच्या बाबतीतही काहीसे असेच आहे.
चिकाटीने काम करणे
तायवानमधील अनेक क्षेत्रांत यहोवाच्या साक्षीदारांनी सत्याचे बीज पेरण्याकरता खूप मेहनत घेतली; पण तेथील लोकांनी सत्यात हवी तितकी आस्था दाखवली नाही. मीएली या प्रदेशाचेच उदाहरण घ्या. साक्षीदार अधूनमधून तिथे प्रचाराला जायचे पण लोकांनी त्यांचा संदेश कान देऊन कधी ऐकला नाही. त्यामुळे १९७३ मध्ये एका स्पेशल पायनियर जोडप्याला तिथे पाठवण्यात आले. सुरवातीला तिथल्या लोकांनी सत्यात गोडी दाखवली, पण काही काळानंतर सत्य त्यांना निरस वाटू लागले. त्यामुळे तिथे असलेल्या स्पेशल पायनियर जोडप्याला दुसरीकडे पाठवण्यात आले.
पुढे १९९१ मध्ये पुन्हा एकदा दोन स्पेशल पायनियर बहिणींना मीएलीला पाठवण्यात आले. यावेळी देखील सत्याचे बीज वाढण्याकरता हवामान अनुकूल नाही असे वाटत होते. त्यामुळे काही वर्षांनंतर या पायनियर बहिणींची देखील दुसऱ्या ठिकाणी बदली करण्यात आली. त्यानंतर कित्येक वर्षे मीएली प्रदेशात प्रचार कार्य करण्यात आले नाही.
पुन्हा प्रयत्न केल्याने मिळणारा आनंद
सप्टेंबर १९९८ मध्ये पुन्हा एकदा तायवानमध्ये सत्याचे बीज पेरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याकरता पुष्कळ काळापासून प्रचार कार्य न झालेली क्षेत्रे निवडण्यात आली. मग जास्त लोकसंख्या असलेल्या क्षेत्रांत ४० टेम्पररी स्पेशल पायनियरांना पाठवण्यात आले.
यांपैकी दोन शहरे मीएली जिल्ह्यात होती. तिथे चांगले पीक येईल की नाही हे जाणण्यासाठी चार पायनियर बहिणींना तिथे पाठवण्यात आले. काही काळानंतर या पायनियरांकडून त्या क्षेत्रातील प्रगतीच्या बातम्या येऊ लागल्या. तेथील बऱ्याच लोकांना सत्य जाणून घेण्याची इच्छा होती. तीन महिन्यांत कित्येक लोकांनी बायबलचा अभ्यास सुरू केला. शिवाय, जवळच्या एका मंडळीतल्या वडिलांच्या मदतीने या पायनियरांनी पुस्तक अभ्यासाचा एक गटही तेथे सुरू केला.
चारपैकी तीन बहिणींनी म्हटले, की लोकांच्या मनात पेरलेल्या बिजांची चांगली वाढ होत आहे. आणि या नाजूक “बीयांची” त्यांना आता काळजी घ्यायची होती. त्यामुळे या तिघींपैकी दोघींना परमनंट स्पेशल पायनियर बनवण्यात आले तर तिसरीला रेग्यूलर पायनियर म्हणून नियुक्त करण्यात आले. या बहिणींची मदत करता यावी म्हणून एक वडील त्या नवीन क्षेत्रात राहायला गेले. तेथे झालेल्या पहिल्या जाहीर भाषणाला ६० हून अधिक लोक आले होते. मग आसपासच्या मंडळ्यांकडून आठवड्याच्या सभा चालवल्या जाऊ लागल्या. लवकरच या ठिकाणी एक नवीन मंडळी स्थापन केली जाईल अशी आशा आहे.
चिकाटीमुळे इतर क्षेत्रांतही आनंद मिळाला
इतर क्षेत्रांतही चांगले परिणाम दिसून आले. तायवानच्या ईशान्येकडील ईलान या जिल्ह्याचे उदाहरण घ्या. तिथे राज्याचा संदेश सांगण्यासाठी टेम्पररी स्पेशल पायनियरांना पाठवले होते. याचा परिणाम काय झाला? आज तिथे पुस्तक अभ्यासाचा एक गट सुरू झाला आहे.
एकदा संध्याकाळच्या वेळी घरोघरचे प्रचार कार्य करत असताना एका टेम्पररी स्पेशल पायनियर बहिणीला एक तरुण भेटला. बहिणीने त्याला एक हस्तपत्रिका दिली. त्यात सभांविषयी सांगतले होते. त्या तरुणाने लगेच बहिणीला विचारले: “मी उद्या संध्याकाळच्या सभेला येऊ शकतो का? आणि मी कोणते कपडे घालू?” आज ही पायनियर बहीण आठ लोकांचा बायबल अभ्यास घेते. आणि यांपैकी काहीजण लवकरच राज्य प्रचारक होऊन बाप्तिस्माही घेतील.
याच शहरात एक स्त्री बऱ्याच वर्षांपासून चर्चला जात होती. पण, बायबल समजावून सांगणारे तिला कोणी भेटले नाही. यहोवाचे साक्षीदार बायबलचा अभ्यास घेतात हे तिला कळल्यानंतर ती त्यांच्यासोबत बायबलचा अभ्यास करू लागली. बायबल अभ्यासाला बसण्याआधी पूर्वतयारी करण्याचा सल्ला पायनियर बहिणीने तिला दिला होता. त्यामुळे पुढच्या वेळी पायनियर बहीण तिचा अभ्यास घेण्यासाठी गेली तेव्हा तिच्या लक्षात आले, की त्या स्त्रीने चक्क तीन अध्यायांची तयारी केली होती. तिने एका वहीत पहिल्या तीन अध्यायांची प्रश्नोत्तरे आणि त्या अध्यायांतील बायबलची वचने देखील लिहून काढली होती.
सेंट्रल तायवानच्या डोंगशी शहरातही पीक चांगले आले होते. येथे टेम्पररी स्पेशल पायनियरांनी तीन महिने प्रचार कार्य केले. त्या दरम्यान त्यांनी जवळजवळ २००० हून अधिक माहितीपत्रके वाटली आणि १६ बायबल अभ्यास सुरू केले. सप्टेंबर २१, १९९९ मध्ये सेंट्रल तायवानमध्ये भूकंप झाला. त्यामुळे डोंगशी शहराची मोठी नासधूस झाली. त्यावेळी सभेला येण्या-जाण्यासाठी जवळजवळ एक तास लागायचा. इतके असूनही काही लोक सत्यात प्रगती करत राहिले. होय, चांगली कापणी करण्यासाठी चिकाटीने काम करणे अत्यंत जरूरीचे आहे. मग, ती भाताची कापणी असो किंवा सत्याची पेरणी असो.
[८ पानांवरील नकाशा]
(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)
चीन
तायवान सामुद्रधुनी
तायवान
[चित्राचे श्रेय]
Mountain High Maps® Copyright © १९९७ Digital Wisdom, Inc.