व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुमचे जीवन अधिक सुखकर होऊ शकते

तुमचे जीवन अधिक सुखकर होऊ शकते

तुमचे जीवन अधिक सुखकर होऊ शकते

बायबलमध्ये म्हटले आहे: “धनवान होण्यासाठी धडपड करू नको; आपले चातुर्य एकीकडे ठेव. जे पाहता पाहता नाहीसे होते त्याकडे तू नजर लावावी काय? कारण गगनांत उडणाऱ्‍या गरुडासारखे पंख धन आपणास लाविते.” (नीतिसूत्रे २३:४, ५) पैशाच्या मागे धावणे हा निव्वळ मुर्खपणा आहे हाच याचा अर्थ होतो. कारण पैसा पंख लावून एखाद्या गरूडाप्रमाणे उडून जाऊ शकतो.

हे किती खरे आहे! नैसर्गिक आपत्ती, आर्थिक मंदी किंवा इतर कोणत्या अपघाती प्रसंगात पैसा चुटकीसरशी नाहीसा होऊ शकतो. समजा असे काही झाले नाही तरी गर्भश्रींमत लोकांना कधी ना कधी लक्षात येतेच की पैसाच सर्वकाही नाही. कारण एवढी सगळी सुखे पायापाशी लोळण घेत असताना ते निराश होतात. जॉनचेच उदाहरण घ्या. कामाच्या संदर्भात तो नेहमी पुढाऱ्‍यांसोबत, प्रसिद्ध खेळाडूंसोबत आणि इतर मोठ्या लोकांसोबत उठबस करायचा.

जॉन म्हणतो: “नोकरीच माझ्यासाठी सर्वकाही होती. दिवस-रात्र एक करून मी बक्कळ पैसा कमवला. फाईव्ह स्टार हॉटेलांमध्ये मजा केली. कधी कधी तर कामाच्या निमित्ताने मी प्रायव्हेट जेट विमानाने प्रवास करायचो. सुरवातीला हे सगळं करण्यात मला फार मजा यायची. पण, काही काळानंतर या सगळ्या गोष्टींनी माझं मन भरलं. ज्या मोठमोठ्या लोकांसाठी मी काम करत होतो ते श्रीमंत तर होते पण त्यांच्या जीवनाला काही अर्थ नव्हता. त्या लोकांसारखं आपलंही जीवन अगदी निरर्थक आहे असं मला वाटू लागलं.”

जॉनला त्याच्या समस्येची जाणीव झाली. आध्यात्मिक गोष्टींकडे दुर्लक्ष करून जीवनात आनंद येऊच शकत नाही याची खात्री त्याला पटली. जीवनात खरे सुख-समाधान मिळवण्यासाठी कशाची गरज आहे हे येशूने डोंगरावरील त्याच्या प्रवचनात सांगितले होते. त्याने म्हटले: “आपल्या आध्यात्मिक गरजेची जाणीव राखणारे आनंदी आहेत कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.” (मत्तय ५:३, NW) तेव्हा, जीवनात आध्यात्मिक गोष्टींना प्राधान्य देणे जरूरीचे आहे. अर्थात, आणखीनही काही गोष्टी आहेत ज्यांमुळे आपले जीवन अधिक सुखी-समाधानी होऊ शकते. त्या कोणत्या गोष्टी आहेत?

कुटुंब आणि मित्र

इतरांनी आपल्यावर प्रेम करावे आणि आपणही इतरांवर प्रेम करावे असे आपल्यांपैकी प्रत्येकाला वाटते कारण देवाने आपल्याला तसे निर्माण केले आहे. त्यासाठी त्याने कुटुंबासारखी एक उत्तम व्यवस्था बनवली आहे ज्यात आपण एकमेकांवर निःस्वार्थपणे प्रेम करू शकतो. (इफिसकर ३:१४) ‘शेजाऱ्‍यांवर प्रीती करा,’ असे येशूने आपल्याला आवर्जून सांगितले. (मत्तय २२:३९) घरचे सदस्य तर आपले सर्वात जवळचे शेजारी आहेत. विचार करा, तुम्ही जर आपल्या कुटुंबापासून दूर गेलात आणि तुम्हाला जवळचा कोणी मित्रही नाही. अशा परिस्थितीत तुम्ही खरोखर आनंदी राहू शकाल का? मुळीच नाही.

कुटुंबात आपल्याला सुख-समाधान कसे लाभू शकते? त्यासाठी कुटुंबाची तुलना आपण एखाद्या बागेशी करू या. ज्या प्रकारे बागेत फेरफटका मारल्यानंतर रोजच्या तणावातून आपण मुक्‍त होतो तसेच कुटुंबात एकमेकांच्या सहवासामुळे आपल्याला आनंद तर मिळतोच शिवाय एकाकीपणाही जाणवत नाही. पण, कुटुंबाच्या सहवासातला हा आनंद काही आपोआप येत नाही. त्यासाठी मेहनत करावी लागते. कुटुंबातील सदस्यांमधील संबंध मजबूत असले पाहिजेत. आणि त्यासाठी एकमेकांकरता वेळ काढणे व एकमेकांची चिंता करणे अत्यंत जरूरीचे आहे. संबंध जितके मजबूत असतील तितकाच आपला आनंदही वाढेल. कुटुंबात पति-पत्नी एकमेकांकरता वेळ देतात तेव्हा त्यांच्यातले प्रेम आणि आदर आणखीन वाढतो.—इफिसकर ५:३३.

तुम्हाला मुलेबाळे असतील तर त्यांच्यामुळे देखील तुमच्या आनंदात भर पडू शकते. पण, त्यासाठी त्यांच्यावर चांगले संस्कार करणे आवश्‍यक आहे. मुलांसोबत वेळ घालवा, त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोला आणि परमेश्‍वराविषयीचे शिक्षण त्यांना द्या. हे खरे आहे, की या सर्व गोष्टी करण्यासाठी तुम्हाला बराच वेळ द्यावा लागेल, सोबत मेहनतही करावी लागेल. पण असे केल्याने तुमचे घर आनंदाने भरून जाईल. ज्या आईवडिलांनी आपल्या मुलांवर उत्तम संस्कार केले त्यांचे म्हणणे असे आहे, की मुले ही परमेश्‍वराची देणगी आहे त्यामुळे त्यांचे पालनपोषण योग्य पद्धतीने केले पाहिजे.—स्तोत्र १२७:३.

खऱ्‍या मित्रांमुळे देखील जीवन आनंदी होऊ शकते. (नीतिसूत्रे २७:९) पण त्यासाठी इतरांच्या भावना, त्यांचे सुखदुःख समजून घेण्याचा आणि त्यांच्याशी प्रेमाने वागण्याचा प्रयत्न करणे जरूरीचे आहे. असे केल्यास आपण अनेक मित्र जोडू. (पेत्र ३:८) खरे मित्र संकटप्रसंगी आपल्याला मदतीचा हात देतात. (उपदेशक ४:९, १०) ‘खरा मित्र विपत्कालासाठी बंधू म्हणून निर्माण झालेला असतो.’—नीतिसूत्रे १७:१७.

होय, खऱ्‍या मित्रांमुळे जीवनात गोडी निर्माण होते. मित्र सोबत असतो तेव्हा विसावणाऱ्‍या सूर्याचे दृश्‍य अधिक नयनरम्य वाटते, अन्‍नाची गोडी वाढते, संगीत मधूर वाटते. भरवशालायक दोस्त आणि कुटुंब यांमुळे आपले जीवन आनंदी आणि अर्थपूर्ण होऊ शकते. पण, यांशिवाय आणखी कोणत्या गोष्टीमुळे जीवन अधिक सुखी-समाधानी होऊ शकते?

आध्यात्मिक भूक शमवा

बायबलमध्ये ‘आध्यात्मिक मनुष्याचा’ आणि ‘अंतःकरणातील गुप्त मनुष्यपणाचा’ उल्लेख करण्यात आला आहे. (१ करिंथकर २:१५; १ पेत्र ३:३, ४.) हे नेमके काय आहे?

डब्ल्यू. ई. वाइनच्या बायबल शब्दकोशानुसार वर उल्लेख केलेल्या लाक्षणिक अंतःकरणाचा अर्थ “आपले आंतरिक व्यक्‍तिमत्त्व,” “आपली विचारसरणी, बऱ्‍या-वाईटाचा बोध आणि आपल्या भावना” असा होतो. यावरून स्पष्ट होते, की आपल्यामध्ये आध्यात्मिक भूक आणि बऱ्‍या-वाईटातला फरक जाणण्याची क्षमता आहे. परमेश्‍वराने आपल्याला या गुणांसह बनवले आहे. तेव्हा येशूने म्हटले त्याप्रमाणे आपण आपली आध्यात्मिक भूक शमवली तरच आपण जीवनात सुखी-समाधानी होऊ.

पण, प्रश्‍न आहे की ‘आंतरिक मनुष्याची’ भूक आपल्याला कशी शमवता येईल? एका स्तोत्रकर्त्याने म्हटले: “परमेश्‍वर हाच देव आहे हे जाणा; त्यानेच आम्हाला उत्पन्‍न केले; आम्ही त्याचेच आहो, आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुरणातील कळप आहो.” (स्तोत्र १००:३) तर मग सर्वात प्रथम आपण हे स्वीकारले पाहिजे की यहोवा हाच परमेश्‍वर आहे. आणि आपल्यापैकी प्रत्येकाला त्याला हिशेब द्यायचा असल्यामुळे आपल्याला त्याचे वचन, बायबल यानुसार चालायला हवे. असे केल्यास आपण “त्याची प्रजा, त्याच्या कुरणातील कळप” होऊ.

पण, परमेश्‍वराला हिशेब देणे आपल्याकरता नुकसानकारक आहे का? मुळीच नाही. कारण परमेश्‍वराला हिशेब द्यायचा आहे याची जाणीव आपल्याला असते तेव्हा देव आनंदी होईल अशाप्रकारे जगण्याचा आपण प्रयत्न करतो. यामुळे आणखीन चांगल्याप्रकारे जीवन जगण्यास आपल्याला प्रेरणा मिळत राहील. त्यासोबतच आपले जीवन अधिक उद्देशपूर्ण देखील होईल. स्तोत्र ११२:१ मध्ये जे म्हटले आहे ते किती उचित आहे! तिथे म्हटले आहे: “परमेशाचे स्तवन करा. जो मनुष्य परमेश्‍वराचे भय धरितो आणि ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञांमध्ये आहे तो धन्य!” (स्तोत्र ११२:१) होय, जेव्हा आपल्या मनात परमेश्‍वराविषयी श्रद्धा असेल आणि आपण त्याच्या आज्ञांचे मनःपूर्वक पालन करू तेव्हा आपल्याला खरे सुख, खरे समाधान मिळेल.

पण परमेश्‍वराच्या आज्ञांचे पालन केल्यामुळे आपल्याला आनंद कसा मिळतो? परमेश्‍वराने प्रत्येक मनुष्याला विवेक दिला आहे. आणि बऱ्‍यावाईटातील फरक दाखवण्यासाठी आपला विवेक एखाद्या मिटरप्रमाणे काम करतो. आपण जर एखादे वाईट काम केले तर आपला विवेक आपल्याला बोचतो. (रोमकर २:१५) पण, हाच विवेक आपले मन आनंदितही करतो. आपण मनापासून देवाची सेवा करतो आणि कोणताही भेदभाव न करता सर्वांसोबत चांगल्याप्रकारे वागतो किंवा दुसऱ्‍यांचे भले करतो तेव्हा आपल्याला आनंद आणि समाधान मिळते. आणि बायबल देखील हेच म्हणते की, “घेण्यापेक्षा देणे ह्‍यात जास्त धन्यता आहे.” (प्रेषितांची कृत्ये २०:३५) पण, दुसऱ्‍यांना दिल्याने आनंद कसा मिळतो?

परमेश्‍वराने आपल्याला अशाप्रकारे बनवले आहे, की आपण एकमेकांचे सुखदुःख, एकमेकांच्या इच्छाआकांक्षा समजू शकतो. त्यामुळे जेव्हा दुसऱ्‍यांच्या गरजा जाणून आपण त्यांना मदत करतो तेव्हा आपले मन आनंदित होते. बायबल असेही म्हणते, की कुणा गरजवंताची मदत करणे परमेश्‍वरावर उपकार करण्यासारखे आहे. परमेश्‍वराला वाटते, की आपण जणू त्याचीच मदत करत आहोत.—नीतिसूत्रे १९:१७.

आपली आध्यात्मिक भूक भागवल्यामुळे आपल्याला आनंद तर मिळतोच शिवाय आणखी एक फायदा होतो. रेमंड नावाच्या एका बिझनेसमॅनचे उदाहरण घ्या. तो म्हणतो: “पैसा आणि पैसा कमवायचा हाच माझ्या जीवनाचा पूर्वी उद्देश होता. पण, ज्या दिवशी मी देवावर विश्‍वास ठेवू लागलो आणि बायबल हे देवाचे वचन आहे असं मानलं त्या दिवसापासून माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली. बाबांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी मी द्वेषाने अक्षरशः पेटून उठायचो. पण, आता सूड घेण्याची भावना नष्ट झाली आहे.”

रेमंडप्रमाणे आपणही आपल्यातील ‘आध्यात्मिक मनुष्याची’ गरज ओळखून त्याची भूक तृप्त करतो तेव्हा मनातील सगळ्यात खोल जखमा देखील भरून येतात. पण, जीवनातला प्रत्येक दिवस कोणती ना कोणती समस्या घेऊन उजाडतो. पण आनंदी राहण्यासाठी या सर्व समस्यांना तोंड द्यायला आपण शिकले पाहिजे.

आपल्याला “देवाने दिलेली शांति” मिळू शकते

जीवनात सुख आणि दुःख लपाछपी खेळत असतात. जीवनात चार दिवस सुखाचे असतात, नाही तर कधी दुर्घटनाच घडते तर कुठे आपल्या सर्व योजना फोल ठरतात किंवा मग कधी कोणत्या ना कोणत्या कारणाने आपली निराशा होते. पण, बायबल असे म्हणते की जो यहोवा परमेश्‍वराची उपासना करतो त्याला या धावपळीच्या जगातसुद्धा ‘देवाची शांती’ मिळू शकते. ती कशी?

प्रेषित पौलाने लिहिले: “कशाविषयीहि चिंताक्रांत होऊ नका तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा; म्हणजे सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांति तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.” (फिलिप्पैकर ४:६, ७) दररोजच्या समस्या एकट्यानेच झेलण्याऐवजी आपण परमेश्‍वराकडे मदत मागितली पाहिजे आणि आपला सर्व भार त्याच्यावर टाकला पाहिजे. (स्तोत्र ५५:२२) आपण येशू ख्रिस्ताच्या नावाने त्याला प्रार्थना केली तर आपण याची पूर्ण खात्री बाळगू शकतो की परमेश्‍वर जरूर आपल्या प्रार्थनांचे उत्तर देईल. आणि तो कशाप्रकारे आपली मदत करतो हे काही काळानंतर आपल्या लक्षात येते तेव्हा त्याच्यावरील आपला विश्‍वास अधिक मजबूत होईल.—योहान १४:६, १४; २ थेस्सलनीकर १:३.

‘प्रार्थना ऐकणाऱ्‍या’ यहोवावरील आपला विश्‍वास आपण आणखीन मजबूत केला तर डोंगरासमान वाटणाऱ्‍या समस्यांना देखील आपल्याला यशस्वीरित्या तोंड देता येईल. उदाहरणार्थ, एखादा असाध्य आजार, म्हातारपण किंवा कुणा जवळच्या व्यक्‍तीच्या मृत्यूचे दुःख. (स्तोत्र ६५:२) पण, जीवनात खरे सुख-समाधान आणि खरा उद्देश मिळवण्यासाठी आपल्या भविष्याचा विचार करणे महत्त्वाचे आहे.

उज्ज्वल भविष्य

“नवे आकाश आणि नवी पृथ्वी” लवकरच येईल असे बायबलमध्ये आश्‍वासन देण्यात आले आहे. हे “नवे आकाश” नीतिमान स्वर्गीय सरकार असून नव्या जगात राहणाऱ्‍या प्रत्येक व्यक्‍तीच्या गरजा त्या सरकाराद्वारे पूर्ण केल्या जातील. (२ पेत्र ३:१३) परमेश्‍वराच्या त्या नवीन जगात कुणी अन्यायाला बळी पडणार नाही, तिथे कायम सुख-शांती राहील. हे केवळ स्वप्न नाही, तर आपल्याला या गोष्टीची पक्की खात्री आहे. खरोखरच एक आनंदाची बातमी!—रोमकर १२:१२; तीत १:२.

सुरवातीला ज्या जॉनविषयी आपण बोललो होतो तो आता असे म्हणतो: “देवाला मी मानत असलो तरी धर्मावर माझा मुळीच विश्‍वास नव्हता. त्याला जाणून घेण्याचा मी कधीच प्रयत्न केला नव्हता. एकदा यहोवाचे साक्षीदार माझ्या घरी आले आणि मी त्यांना बरेच प्रश्‍न विचारले. जसे की ‘आपण या जगात का आहोत? भविष्यात आपल्यासाठी काय राखून ठेवले आहे?’ त्या साक्षीदारांनी माझ्या सर्व प्रश्‍नांची बायबलमधून उत्तरं दिली तेव्हा मला फार आनंद झाला. आपल्या जगण्याला काही अर्थ आहे, असं मला पहिल्यांदाच वाटलं. पण, ही तर फक्‍त सुरवात होती. सत्य जाणून घेण्यासाठी मी अक्षरशः आसूसलो होतो. सत्याविषयीचं माझं ज्ञान वाढत गेलं आणि जीवनाबद्दलचा माझा दृष्टिकोनही बदलत गेला. आज मी श्रीमंत नाही, माझ्याकडे फार मोठा बँक बॅलेन्स नाही. पण, आध्यात्मिकरित्या मी श्रीमंत आहे.

जॉनप्रमाणेच तुम्ही देखील अनेक वर्षे आध्यात्मिक गरजांकडे दुर्लक्ष केले असेल? पण, आता तुम्ही तुमच्या आध्यात्मिक गरजा लक्षात घेऊन त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर ती एक “सुज्ञ” गोष्ट ठरेल. (स्तोत्र ९०:१२) यामुळे तुम्हाला केवळ खरी शांती आणि आनंदच मिळणार नाही तर एका उज्ज्वल भविष्याची आशा देखील मिळेल.—रोमकर १५:१३.

[६ पानांवरील चित्र]

प्रार्थना केल्याने आपल्याला ‘देवाची शांती’ मिळू शकते

[७ पानांवरील चित्रे]

कुटुंबात खरे सुख कसे मिळवता येईल हे तुम्हाला माहीत आहे का?