व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पुनरुत्थानाची आशा आपल्याला शक्‍ती देते

पुनरुत्थानाची आशा आपल्याला शक्‍ती देते

पुनरुत्थानाची आशा आपल्याला शक्‍ती देते

‘त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो ह्‍यासाठी की तो [येशू ख्रिस्त] व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य ह्‍यांची मी ओळख करून घ्यावी.’—फिलिप्पैकर ३:८-१०.

१, २. (अ) बऱ्‍याच वर्षांआधी, एका पाळकाने पुनरुत्थानाचे कशाप्रकारे वर्णन केले? (ब) पुनरुत्थान कसे घडेल?

अमेरिकेतील एका वृत्तपत्रात १८९० च्या दशकात ब्रुकलिन शहरातील एका पाळकाच्या उपदेशाचा सारांश प्रकाशित करण्यात आला होता. त्याने असे सांगितले की मृतांचे पुनरुत्थान होईल तेव्हा त्यांच्या शरीराचे भाग म्हणजे अस्थी, मांस इत्यादी गोळा करण्यात येईल. आगीत जळून भस्म झालेल्या, दुर्घटनेत छिन्‍नविछिन्‍न झालेल्या किंवा एखाद्या हिंस्र पशूने फाडून खाल्लेल्या सर्व लोकांचे अवशेष हवेत तरंगत असतील. यामुळे सगळीकडे काळोख पसरेल. मग हे शरीरांचे भाग एकमेकांना जुळतील आणि स्वर्गातून व नरकातून त्यांचे आत्मे येऊन त्या त्या शरीरात प्रवेश करतील. अशाप्रकारे लाखो लोक पुन्हा जिवंत होतील.

या पाळकाचे म्हणणे बुद्धीला पटत नाही. याचे कारण म्हणजे माणसाच्या शरीरात वेगळे अस्तित्त्व असलेला अमर आत्मा मुळात नसतोच. (उपदेशक ९:५, १०; यहेज्केल १८:४) शिवाय, पुनरुत्थानाची प्रतिज्ञा करणारा यहोवा देव सर्वशक्‍तिमान असल्यामुळे माणसाच्या शरीरातील मूळ भाग एकत्र करण्याची त्याला गरज नाही. पुन्हा जिवंत होणाऱ्‍यांना तो सहज नवी शरीरे देऊ शकतो. यहोवाने आपल्या पुत्राला, अर्थात येशू ख्रिस्ताला मृत लोकांना जिवंत करण्याचा व त्यांना सार्वकालिक जीवन देण्याचा अधिकार दिला आहे. (योहान ५:२६) म्हणूनच येशूने म्हटले: “पुनरुत्थान व जीवन मीच आहे; जो माझ्यावर विश्‍वास ठेवितो तो मेला असला तरी जगेल.” (योहान ११:२५, २६) हे जाणून आपल्याला दिलासा मिळत नाही का? कोणतीही परीक्षा आली, किंवा मरणालाही सामोरे जावे लागले तरीसुद्धा यहोवाला विश्‍वासू राहण्याची प्रेरणा यामुळे आपल्याला मिळत नाही का?

३. पुनरुत्थानाची शिकवण खरी आहे हे शाबीत करण्याची गरज पौलाला का भासली?

पुनरुत्थानाची शिकवण ही अमर आत्म्याच्या शिकवणीशी सुसंगत नाही. अमर आत्म्याची शिकवण ग्रीक तत्त्वज्ञानी प्लेटो याने सुरू केली होती. म्हणूनच पौलाने अथेन्स शहरात ग्रीक लोकांना पुनरुत्थानाच्या आशेविषयी सांगितले तेव्हा त्यांच्यापैकी कित्येक जण त्याची “थट्टा करू लागले.” (प्रेषितांची कृत्ये १७:२९-३४) त्यावेळी येशूचे अनेक शिष्य हयात होते ज्यांनी येशूला जिवंत झाल्यानंतर पाहिले होते आणि या गोष्टीची ते साक्ष देखील देत होते. पण करिंथ मंडळीतील खोटे शिक्षक मात्र पुनरुत्थानाची शिकवण मानायला तयार नव्हते. म्हणूनच पौलाने १ करिंथकर १५ व्या अध्यायात पुनरुत्थानाची शिकवण खरी आहे हे शाबीत करणारे अनेक जोरदार मुद्दे मांडले आहेत. या मुद्द्‌यांचा लक्षपूर्वक अभ्यास केल्याने पुनरुत्थानाची प्रतिज्ञा पूर्ण होण्याविषयी आपल्या मनात कोणतीही शंका उरणार नाही.

येशूच्या पुनरुत्थानाचा ठोस पुरावा

४. येशूच्या पुनरुत्थानाच्या कोणकोणत्या प्रत्यक्ष साक्षीदारांचा पौलाने उल्लेख केला?

पौलाने कशी सुरवात केली याकडे लक्ष द्या. (१ करिंथकर १५:१-११) त्याने म्हटले की करिंथ येथील बांधवांनी तारणाच्या सुवार्तेला दृढ धरले पाहिजे, नाही तर त्यांचा विश्‍वास निरर्थक ठरेल. कारण ख्रिस्त आपल्या पापांकरता मरण पावला, दफन केला गेला आणि मग त्याला पुन्हा जिवंत करण्यात आले. पुनरुत्थान झाल्यानंतर केफा (पेत्र) याने येशूला पाहिले; नंतर तो “बारा जणांना दिसला.” (योहान २०:१९-२३) शिवाय तो स्वर्गात जाण्याआधी ५०० जणांना दिसला. कदाचित याच प्रसंगी त्याने ‘जाऊन शिष्य करा’ अशी आज्ञा दिली असावी. (मत्तय २८:१९, २०) बाकीच्या प्रेषितांप्रमाणे याकोब या विश्‍वासू प्रेषिताने देखील त्याला पाहिले. (प्रेषितांची कृत्ये १:६-११) दिमिष्काजवळ येशूने ‘जणू काय अकाली जन्मलेल्या’ शौलाला दर्शन दिले. याठिकाणी पौलाला अकाली जन्मलेला असे म्हटले आहे कारण नियुक्‍त वेळेच्या आधीच त्याला जणू काय आत्मिकरित्या पुनरुत्थित होऊन येशूचे आत्मिक गौरव पाहण्याची संधी मिळाली होती. (प्रेषितांची कृत्ये ९:१-९) यानंतर पौलाने करिंथकरांना आठवण करून दिली की त्याने त्यांना सुवार्ता घोषित केल्यामुळेच त्यांनी ती स्वीकारली होती.

५. पौलाने १ करिंथकर १५:१२-१९ या वचनांत आपला मुद्दा कशाप्रकारे पटवून सांगितला?

पौलाने आपला मुद्दा कशाप्रकारे पटवून सांगितला ते पाहा. (१ करिंथकर १५:१२-१९) इतक्या लोकांनी येशूला जिवंत झाल्यानंतर पाहिले आणि त्याविषयी त्यांनी साक्ष देखील दिली, तर मग मेलेल्या लोकांना पुन्हा जिवंत करता येणार नाही असे कसे म्हणता येईल? पुढे पौल म्हणतो की जर येशूचे पुनरुत्थान झालेले नाही तर मग आपले प्रचार कार्य आणि आपला विश्‍वासही व्यर्थच म्हणावा लागेल. शिवाय, देवाने ख्रिस्ताला पुनरुत्थित केले असे म्हणणे म्हणजे खोटी साक्ष देण्यासारखे ठरेल. मृतांचे पुनरुत्थान होणार नसेल तर मग आपण ‘अजून आपल्या पापांतच आहोत,’ आणि ज्या विश्‍वासू बांधवांचा मृत्यू झाला आहे त्यांचा कायमचा नाश झाला आहे असे समजावे लागेल. “आपण ह्‍या आयुष्यात ख्रिस्तावर केवळ आशा ठेवणारे असलो तर मग सर्व माणसांपेक्षा आपण लाचार आहो.”

६. (अ) येशूच्या पुनरुत्थानाविषयी पौलाने काय म्हटले? (ब) “शेवटला शत्रु” कोणाला म्हटले आहे आणि तो कशाप्रकारे नाहीसा केला जाईल?

पौल पुन्हा एकदा येशूचे पुनरुत्थान झाले आहे असे खात्रीने सांगतो. (१ करिंथकर १५:२०-२८) ज्याअर्थी ख्रिस्ताला मृत्यू पावलेल्यांपैकी “प्रथमफळ” म्हणण्यात आले आहे त्याअर्थी पुढे आणखी लोकांचे पुनरुत्थान होणार हे स्पष्टच आहे. एका मनुष्याने अर्थात आदामाने आज्ञा मोडल्यामुळे ज्याप्रकारे मृत्यू आला त्याचप्रकारे एका मनुष्याद्वारे अर्थात येशूच्याद्वारे लोकांचे पुनरुत्थान करण्यात येईल. जे ख्रिस्ताचे आहेत त्यांचे त्याच्या उपस्थिती दरम्यान पुनरुत्थान होईल असे पौलाने सांगितले. तेव्हा येशू ख्रिस्त देवाच्या विरोधात असणारे ‘सर्व अधिपत्य, सर्व अधिकार व सामर्थ्य नष्ट’ करील. त्याच्या सर्व शत्रूंना यहोवा त्याच्या पायाखाली तुडवेपर्यंत तो राज्य करेल. येशूच्या बलिदानाच्या आधारावर, आदामामुळे मानवजातीवर आलेला मृत्यू हा “शेवटला शत्रु” देखील नाहीसा केला जाईल. यानंतर ख्रिस्त “ज्याने सर्व त्याच्या अंकीत करून दिले” त्या देव पित्याला आपले राज्य सोपून देईल व स्वतःही त्याच्या स्वाधीन होईल. अशासाठी की “देव सर्वांना सर्वकाही व्हावा.”

मेलेल्यांखातर बाप्तिस्मा घेणारे?

७. “मरण्याच्या उद्देशाने” कोण बाप्तिस्मा घेतात आणि त्यांच्याकरता याचा काय अर्थ होतो?

पुनरुत्थानाची शिकवण नाकारणाऱ्‍यांना पौल प्रश्‍न करतो: “मेलेल्यांखातर [“मरण्याच्या उद्देशाने,” NW] जे बाप्तिस्मा घेतात ते काय करितील?” (१ करिंथकर १५:२९) मेलेल्या लोकांकरता एखादी व्यक्‍ती बाप्तिस्मा घेते असे पौलाला येथे सुचवायचे नव्हते. कारण ज्याला येशूचा शिष्य व्हायचे आहे त्याने स्वतः सत्याचे ज्ञान घेतले पाहिजे व शिकलेल्या गोष्टींवर विश्‍वास ठेवला पाहिजे व बाप्तिस्मा घेतला पाहिजे. (मत्तय २८:१९, २०; प्रेषितांची कृत्ये २:४१) ‘मरण्याच्या उद्देशाने बाप्तिस्मा घेणारे’ हे अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या बाबतीत म्हटलेले आहे. कारण पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा झाल्यानंतर आत्मिक पुनरुत्थान होण्याकरता या अभिषिक्‍त जनांना मरणे आवश्‍यक आहे. देवाचा आत्मा जेव्हा एखाद्या व्यक्‍तीच्या मनात स्वर्गीय जीवनाची आशा निर्माण करतो तेव्हा हा बाप्तिस्मा सुरू होतो. जेव्हा ती व्यक्‍ती मरते व तिचे आत्मिक पुनरुत्थान होऊन स्वर्गात तिला अमर जीवन मिळते तेव्हा हा बाप्तिस्मा संपुष्टात येतो.—रोमकर ६:३-५; ८:१६, १७; १ करिंथकर ६:१४.

८. सैतानाने किंवा त्याच्या सेवकांनी जिवे मारले तरीसुद्धा ख्रिस्ती लोक कशाची खात्री बाळगू शकतात?

पौल म्हणतो, की पुनरुत्थानाच्या आशेमुळे ख्रिश्‍चनांना प्रचार कार्याकरता धोक्यांना इतकेच नव्हे तर मृत्यूला देखील सामोरे जाण्याची हिम्मत मिळते. (१ करिंथकर १५:३०, ३१) आपल्याला याची पूर्ण जाणीव आहे की सैतानाने किंवा त्याच्या समर्थकांनी आपल्याला जिवे मारले तरीसुद्धा यहोवा आपले पुनरुत्थान करेल. केवळ यहोवाच मनुष्याला जीवन देऊ शकतो किंवा गेहेन्‍नात टाकून त्याचा सर्वनाश करू शकतो.—लूक १२:५.

सतर्क राहण्याची गरज

९. पुनरुत्थानाच्या आशेमुळे आपल्याला बळ मिळण्याकरता आपण काय काय टाळले पाहिजे?

पुनरुत्थानाच्या आशेमुळे पौलाला शक्‍ती मिळाली होती. इफिसस येथे असताना त्याच्या शत्रूंनी त्याला ठार मारण्याकरता कदाचित आखाड्यात हिंस्र पशूंपुढे टाकले होते. (१ करिंथकर १५:३२) असे खरेच घडले असेल तर यहोवाने दानीएलाला ज्याप्रमाणे सिंहांच्या गुहेत वाचवले त्याचप्रमाणे तो आपलाही बचाव करील अशी पौलाची खात्री होती. (दानीएल ६:१६-२२; इब्री लोकांस ११:३२, ३३) पौलाला पुनरुत्थानाच्या आशेवर पूर्ण विश्‍वास होता. यशयाच्या काळात यहोवाच्या उपासनेचा त्याग करणाऱ्‍या व “उद्या मरावयाचे आहे म्हणून खाऊन-पिऊन घेऊ या” असे म्हणणाऱ्‍यांप्रमाणे तो नव्हता. (यशया २२:१३) अशा चुकीच्या प्रवृत्तींपासून आपण दूर राहिलो, तर पौलाप्रमाणे आपणही पुनरुत्थानाच्या आशेमुळे विश्‍वासात खंबीर राहू. म्हणूनच पौलाने ताकीद दिली, की “फसू नका, कुसंगतीने नीति बिघडते.” (१ करिंथकर १५:३३) अर्थात हे तत्त्व बऱ्‍याच बाबतीत लागू करता येते.

१०. आपण पुनरुत्थानाची उज्ज्वल आशा सदैव डोळ्यांपुढे कशी ठेवू शकतो?

१० पुनरुत्थानाविषयी शंका घेणाऱ्‍यांना पौलाने म्हटले: “नीतिमत्वासंबधाने शुद्धीवर या आणि पाप करू नका; कारण कित्येकांना देवासंबंधीचे ज्ञान नाही; हे मी तुम्हास लाजविण्यासाठी बोलतो.” (१ करिंथकर १५:३४) या ‘अंतसमयात’ आपण देवाच्या व ख्रिस्ताच्या अचूक ज्ञानानुसार सतत वागले पाहिजे. (दानीएल १२:४; योहान १७:३) असे केल्यास पुनरुत्थानाची आशा आपल्या मनात नेहमी जागृत राहील.

कोणत्या शरीरात पुनरुत्थान होईल?

११. अभिषिक्‍त जनांचे पुनरुत्थान कसे होते हे स्पष्ट करण्यासाठी पौलाने कोणते उदाहरण दिले?

११ पौलाने यानंतर काही प्रश्‍न विचारात घेतले. (१ करिंथकर १५:३५-४१) पुनरुत्थानाविषयी शंका निर्माण करण्यासाठी कदाचित एखादा असा प्रश्‍न उभा करेल: “मेलेले कसे उठविले जातात व ते कोणत्या प्रकारच्या शरीराने येतात?” पौल याचा खुलासा करतो. तो पुन्हा जिवंत होणाऱ्‍या व्यक्‍तीची तुलना जमिनीत पेरलेल्या दाण्याशी करतो. जमिनीत पेरलेला दाणा पहिल्यांदा मरतो आणि त्यानंतरच त्याला अंकूर फुटतो ज्याचे पुढे रोपटे तयार होते. त्याचप्रकारे, स्वर्गात राहण्याकरता नवीन आत्मिक शरीर प्राप्त करण्याकरता अभिषिक्‍त व्यक्‍तीचे मरणे आवश्‍यक आहे. तसेच जमिनीत पेरलेला दाणा ज्याप्रकारे त्यातून निघणाऱ्‍या रोपट्यापासून वेगळा असतो त्याप्रमाणे अभिषिक्‍त ख्रिश्‍चनाचे पुनरुत्थित शरीर मानवी शरीरापासून वेगळे असते. अर्थात पुनरुत्थानानंतर त्या व्यक्‍तीचे व्यक्‍तित्व आणि स्वभाव बदलत नाही, केवळ तिचे शरीर वेगळ्या प्रकारचे, स्वर्गात राहण्यास योग्य असणारे एक आत्मिक शरीर असते. पृथ्वीवर ज्यांचे पुनरुत्थान होते त्यांना मानवी शरीर दिले जाते.

१२. “स्वर्गीय देह” आणि “पार्थिव देह” यांचा काय अर्थ होतो?

१२ पौलाने पुढे म्हटल्याप्रमाणे मानवांचे व पशूंचे देह वेगवेगळे असतात. वेगवेगळ्या पशूंचे शरीर देखील वेगवेगळ्या प्रकारचे असते. (उत्पत्ति १:२०-२५) आत्मिक प्राण्यांची “स्वर्गीय शरीरे” हाडामांसाच्या ‘पार्थिव शरीरांपासून’ वेगळी आहेत. सूर्य, चंद्र व तारे यांचे तेजही वेगवेगळे असते. पण पुनरुत्थित अभिषिक्‍त जनांचे गौरव या सर्वांहून अधिक आहे.

१३. पौलाने १ करिंथकर १५:४२-४४ यात सांगितल्याप्रमाणे काय पेरले जाते व उठवले जाते?

१३ वेगवेगळ्या प्रकारच्या शरीरांबद्दल सांगितल्यानंतर पौल असे म्हणतो: “तसे मेलेल्यांचे पुनरुत्थान आहे.” (१ करिंथकर १५:४२-४४) तो म्हणतो, “जे विनाशीपणात पेरले जाते, ते अविनाशीपणात उठविले जाते.” येथे पौल अभिषिक्‍त जनांच्या गटाविषयी बोलत असावा. पृथ्वीवर असताना अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचे शरीर नाशमान असते, पण स्वर्गात ते अविनाशी आणि पापमुक्‍त असतात. जगात त्यांचा अपमान केला जातो पण स्वर्गीय जीवनात पुनरुत्थित झाल्यानंतर ते ख्रिस्ताच्या गौरवात उठवले जातात. (प्रेषितांची कृत्ये ५:४१; कलस्सैकर ३:४) देव अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना स्वर्गात आत्मिक शरीर देऊन जिवंत करू शकतो, तर मग आपण असा पूर्ण विश्‍वास ठेवू शकतो, की बाकीच्या सर्व मेलेल्या लोकांना या पृथ्वीवर राहण्याकरता तो त्यांचे नक्की पुनरुत्थान करील.

१४. पौलाने ख्रिस्त व आदाम यांच्यातला फरक कसा दाखवला?

१४ यानंतर पौलाने ख्रिस्त व आदाम यांच्यातील फरक स्पष्ट केला. (१ करिंथकर १५:४५-४९) पहिला मनुष्य आदाम “जीवधारी प्राणी झाला.” (उत्पत्ति २:७) “शेवटला आदाम” म्हणजेच येशू “जिवंत करणारा आत्मा असा झाला.” त्याने आपले जीवन खंडणी बलिदानाच्या रूपात अर्पण केले. या बलिदानाचा लाभ पहिल्याने त्याच्या अभिषिक्‍त अनुयायांना होतो. (मार्क १०:४५) हे अभिषिक्‍त ख्रिश्‍चन पृथ्वीवर असतात तेव्हा ते ‘मातीपासून बनवलेल्या आदामाप्रमाणे असतात’, पण पुनरुत्थान झाल्यानंतर ते शेवटल्या आदामाप्रमाणे अर्थात येशूप्रमाणे होतात. येशूच्या बलिदानाचा कालांतराने सबंध मानवजातीला लाभ होईल. जे मेले आहेत अशा लोकांचे पृथ्वीवर पुनरुत्थान होईल.—१ योहान २:१, २.

१५. अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना पुनरुत्थानानंतर हाडामांसाचे शरीर का मिळत नाही आणि येशूच्या उपस्थितीदरम्यान त्यांचे उठणे कशाप्रकारे होते?

१५ अभिषिक्‍त ख्रिस्ती मरतात तेव्हा त्यांचे पुन्हा शारीरिक पुनरुत्थान होत नाही. (१ करिंथकर १५:५०-५३) हाडामांसाच्या नाशवंत शरीराने स्वर्गात प्रवेश करता येत नाही. पण अभिषिक्‍तांपैकी काहींना त्यांच्या मृत्यूनंतर स्वर्गात प्रवेश करण्यासाठी फार काळ थांबावे लागत नाही. येशूच्या उपस्थितीदरम्यान जे अभिषिक्‍त जन पृथ्वीवरील जीवन संपेपर्यंत विश्‍वासू राहतात ते ‘क्षणात, निमिषात बदलून जातील.’ मृत्यू होताच त्यांचे क्षणार्धात आत्मिक शरीरात पुनरुत्थान होईल आणि त्यांना अविनाशीपण व गौरव बहाल केले जाईल. अशारितीने हळूहळू ख्रिस्ताच्या स्वर्गीय ‘वधूची’ १,४४,००० ही संख्या पूर्ण होईल.—प्रकटीकरण १४:१; १९:७-९; २१:९; १ थेस्सलनीकाकर ४:१५-१७.

मृत्यूवर विजय!

१६. पौल व पूर्वीच्या संदेष्ट्यांप्रमाणे आदामाच्या पापामुळे आलेल्या मृत्यूचे शेवटी काय होईल?

१६ यानंतर पौल म्हणतो, की मृत्यू कायमचा नाहीसा होईल. (१ करिंथकर १५:५४-५७) विनाशी आणि मर्त्य शरीर बदलून अविनाशी व अमर होईल तेव्हा हे शब्द पूर्ण होतील: “मरण विजयात गिळले गेले आहे.” “अरे मरणा, तुझा विजय कोठे? अरे मरणा, तुझी नांगी कोठे?” (यशया २५:८; होशेय १३:१४) मरणाची नांगी म्हणजे पाप आणि पापाला बळ नियमशास्त्रामुळे मिळते आणि नियमशास्त्रानुसार सर्व पापी लोकांची शिक्षा म्हणजे मृत्यू. पण येशूच्या बलिदानामुळे व पुनरुत्थानामुळे आदामाच्या पापामुळे आलेला मृत्यू कायमचा नाहीसा केला जाईल.—रोमकर ५:१२; ६:२३.

१७. पहिले करिंथकर १५:५८ यातील शब्दांचा आज आपल्याकरता काय अर्थ होतो?

१७ म्हणूनच पौल म्हणतो, “माझ्या प्रिय बंधुनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहा; म्हणून तुम्ही स्थिर व अढळ व्हा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा.” (१ करिंथकर १५:५८) हे शब्द आजच्या काळातील अभिषिक्‍त शेषजनांना आणि येशूच्या ‘दुसऱ्‍या मेंढरांनाही’ लागू होतात. (योहान १०:१६) या शेवटल्या दिवसांत त्यांचा मृत्यू झाला तरीसुद्धा त्यांच्या श्रमांचे प्रतिफळ त्यांना मिळेल कारण परमेश्‍वर त्यांचे पुनरुत्थान करेल. यहोवाच्या सर्व सेवकांनी प्रभूच्या कामात सदैव परिश्रम करत राहावे कारण आपण सर्व त्या दिवसाची वाट पाहात आहोत जेव्हा आपण आनंदाने असे म्हणू शकू की “अरे मरणा, तुझा विजय कोठे?”

पुनरुत्थानाची आशा पूर्ण झाली आहे!

१८. पौलाला पुनरुत्थानाबद्दल कितपत खात्री होती?

१८ पहिले करिंथकर १५ व्या अध्यायावरून दिसून येते, की पुनरुत्थानाच्या आशेचा पौलाच्या जीवनावर किती प्रभाव पडला होता. येशूचे पुनरुत्थान झाले आहे आणि पुढेही कबरेतील असंख्य मृतजनांचे पुनरुत्थान होईल याविषयी त्याला पूर्ण खात्री होती. तुम्हालाही अशी खात्री आहे का? पौलाने ‘ख्रिस्त व त्याच्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्यापुढे’ इतर सर्व गोष्टींना “केरकचरा” असे लेखले आणि स्वतःच्या लाभाच्या अशा कित्येक गोष्टींना ‘तो मुकला.’ ‘पहिले पुनरुत्थान’ अनुभवण्याकरता तो ख्रिस्ताप्रमाणेच मृत्यूला सामोरे जाण्यासही तयार होता. हे “पहिले पुनरुत्थान” येशूच्या १,४४,००० अभिषिक्‍त अनुयायांना अनुभवायला मिळते. त्यांचे स्वर्गातील आत्मिक जीवनात पुनरुत्थान होते, तर “मृतांपैकी बाकीचे लोक” या पृथ्वीवर पुनरुत्थित होतील.—फिलिप्पैकर ३:८-११; प्रकटीकरण ७:४; २०:५, ६.

१९, २०. (अ) बायबल इतिहासातील कोणाकोणाचे पुनरुत्थान होईल? (ब) पुनरुत्थान झालेल्यांपैकी तुम्हाला कोणाला भेटण्याची सर्वात जास्त इच्छा आहे?

१९ मृत्यूपर्यंत विश्‍वासू राहिलेल्या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचे पुनरुत्थान झाले आहे. (रोमकर ८:१८; १ थेस्सलनीकाकर ४:१५-१८; प्रकटीकरण २:१०) “मोठ्या संकटातून” जिवंत बचावणारे लोकांचे पुनरुत्थान होताना पाहतील. तेव्हा ‘समुद्र आपल्यामधील मृत मनुष्यांस बाहेर सोडेल; मृत्यू व अधोलोक हे आपल्यातील मृतांस बाहेर सोडतील.” (प्रकटीकरण ७:९, १३, १४; २०:१३) पृथ्वीवर पुनरुत्थित होणाऱ्‍यांमध्ये ईयोब असेल. आणि त्याने गमावलेले त्याचे सात मुलगे व तीन मुली देखील पुनरुत्थित होतील. त्यांचे स्वागत करण्यास ईयोबाला किती आनंद होईल! आणि त्यांना देखील आपल्या आणखी सात भावांना आणि तीन सुंदर बहिणींना पाहून किती आनंद होईल!—ईयोब १:१, २, १८, १९; ४२:१२-१५.

२० अब्राहाम व सारा, इसहाक व रिबेका आणि सर्व धार्मिक लोक, तसेच “सर्व संदेष्टे” जेव्हा या पृथ्वीवर पुन्हा जिवंत होतील तो खरोखर किती आनंदाचा काळ असेल! (लूक १३:२८) या संदेष्ट्यांपैकी एक असेल दानीएल. दानीएल आता सुमारे २,५०० वर्षांपासून कबरेत मृतावस्थेत आहे. पण मशीही राज्यात त्याला पुनरुत्थित केले जाण्याची प्रतिज्ञा देण्यात आली होती. त्याप्रमाणे लवकरच त्याला ‘उठवण्यात’ येईल आणि त्याला देखील एक ‘अधिपती’ म्हणून नेमण्यात येईल. (दानीएल १२:१३; स्तोत्र ४५:१६) प्राचीन काळातील या सर्व विश्‍वासू जनांसोबतच मृत्यूमुळे विलग झालेल्या तुमच्या स्वतःच्या प्रिय लोकांना, तुमच्या वडिलांना, आईला, मुलाला, मुलीला किंवा इतर जवळच्या प्रिय माणसांना परत भेटणे, त्यांचे स्वागत करणे किती आनंददायक असेल!

२१. इतरांना साहाय्य करण्यास आपण मागेपुढे का पाहू नये?

२१ आपल्या मित्रांपैकी आणि प्रियजनांपैकी काही जणांनी कित्येक दशकांपासून यहोवाची विश्‍वासूपणे सेवा केली असेल. आता कदाचित ते खूप वृद्ध झाले असतील. वृद्धत्वामुळे कदाचित त्यांना बऱ्‍याच समस्यांना तोंड द्यावे लागत असेल. अशा बांधवांना व बहिणींना आपण शक्य होईल ती मदत करणे किती महत्त्वाचे आहे. अशाने, यदाकदाचित त्यांना मृत्यू झाला तरी आपल्याला त्यांना मदत न केल्याचा पस्तावा होणार नाही. (उपदेशक ९:११; १२:१-७; १ तीमथ्य ५:३,) फक्‍त वृद्धांनाच नव्हे, तर सर्वांना आपण मदत केली पाहिजे. यहोवा आपल्या चांगल्या कामांना कधीही विसरणार नाही याची आपण खात्री बाळगू शकतो. म्हणूनच पौलाने लिहिले: “आपणाला प्रसंग मिळेल त्याप्रमाणे आपण सर्वांचे व विशेषतः विश्‍वासाने एका घरचे झालेल्यांचे बरे करावे.”—गलतीकर ६:१०; इब्री लोकांस ६:१०.

२२. पुनरुत्थानाची आशा पूर्ण होईपर्यंत आपण काय करण्याचा निर्धार केला पाहिजे?

२२ यहोवा “करुणाकर पिता व सर्व सांत्वनदाता देव” आहे. (२ करिंथकर १:३, ४) त्याचे वचन आपल्याला सांत्वन देते आणि आपण इतरांनाही पुनरुत्थानाच्या आशेच्या आधारावर सांत्वन द्यावे म्हणून ते आपल्याला साहाय्य करते. आपली आशा पूर्ण होईपर्यंत आपण पौलाप्रमाणे असा पूर्ण विश्‍वास बाळगू या, की मेलेल्या लोकांचे पुनरुत्थान नक्की होईल. खासकरून येशूचे अनुकरण करण्याचा आपण प्रयत्न करू. देवाजवळ आपल्याला पुनरुत्थित करण्याचे सामर्थ्य आहे याची त्याला पूर्ण खात्री होती आणि त्याची ही आशा पूर्ण झाली. लवकर तो दिवस येईल जेव्हा कबरेतील सर्व मृतजन ख्रिस्ताचा आवाज ऐकून बाहेर येतील. या आशेमुळे आपल्याला सांत्वन मिळते, आनंद मिळतो. आपण यहोवाचे आभार मानूया कारण तो येशू ख्रिस्ताद्वारे मृत्यू कायमचा नाहीसा करेल!

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• येशूच्या पुनरुत्थानाच्या कोणकोणत्या प्रत्यक्ष साक्षीदारांचा पौलाने उल्लेख केला?

• “शेवटला शत्रु” कोण आहे आणि तो कशाप्रकारे नाहीसा केला जाईल?

• अभिषिक्‍त जनांच्या बाबतीत काय पेरले जाते व उठवले जाते?

• बायबल इतिहासातील कोणत्या व्यक्‍तींना त्यांचे पुनरुत्थान झाल्यावर तुम्हाला भेटायला आवडेल?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१६ पानांवरील चित्र]

प्रेषित पौलाने पुनरुत्थानाची शिकवण खरी शाबीत करण्याकरता जोरदार मुद्दे मांडले

[२० पानांवरील चित्रे]

ईयोब व त्याचे कुटुंब तसेच आणखी असंख्य लोक पुनरुत्थित झाल्याचे पाहणे किती आनंददायक असेल!