व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पुनरुत्थानाची आशा निश्‍चित पूर्ण होईल!

पुनरुत्थानाची आशा निश्‍चित पूर्ण होईल!

पुनरुत्थानाची आशा निश्‍चित पूर्ण होईल!

‘पुनरुत्थान होईल अशी आशा मी देवाकडे पाहून धरितो.’प्रेषितांची कृत्ये २४:१५.

१. पुनरुत्थानाच्या आशेवर आपण का विश्‍वास ठेवू शकतो?

पुनरुत्थानाची आशा पूर्ण होईल यात काहीच शंका नाही. कारण यहोवाचे हे अभिवचन आहे आणि ते तो नक्की पूर्ण करील. (यशया ५५:११; लूक १८:२७) त्याने याआधीच हे दाखवून दिले आहे, की मेलेल्या लोकांना जिवंत करण्याचे सामर्थ्य त्याच्याकडे आहे.

२. पुनरुत्थानाच्या आशेमुळे आपल्याला कशाप्रकारे लाभ होतो?

आपला पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे मृतांना जिवंत करण्याच्या देवाच्या तरतुदीवर विश्‍वास ठेवल्यामुळे आपल्याला अतिशय कठीण परिस्थितीत टिकून राहण्यास आणि देवाला एकनिष्ठ राहताना गरज पडल्यास मृत्यूलाही सामोरे जाण्याचे सामर्थ्य मिळते. आणि म्हणूनच आता आपण देवाने प्राचीन काळात मेलेल्या लोकांना जिवंत केल्याची काही उदाहरणे पाहू. या उदाहरणांमुळे पुनरुत्थानावरील आपला विश्‍वास आणखीन मजबूत होईल.

पुन्हा जिवंत झालेले लोक

३. सारफथ नगरातील एका विधवेचा मुलगा मरण पावला तेव्हा एलियाने काय केले?

येशूच्या आधीच्या साक्षीदारांच्या विश्‍वासाबद्दल सविस्तर सांगितल्यानंतर प्रेषित पौलाने लिहिले: “स्त्रियांना त्यांची मृत माणसे पुनरुत्थान झालेली अशी मिळाली.” (इब्री लोकांस ११:३५; १२:१) या स्त्रियांपैकी एक होती फुनीके येथील सारफथ नगरातील एक गरीब विधवा. तिने एलिया या देवाच्या संदेष्ट्याला मदत केल्यामुळे यहोवाने तिला आशीर्वाद दिला. देवाने चमत्कार केला आणि त्यामुळे ती दुष्काळात कधी उपाशी पोटी राहिली नाही. पण काही काळानंतर तिच्या मुलाचा मृत्यू झाला तेव्हा एलियाने त्याला बिछान्यावर निजवले आणि त्यावर तीन वेळा पाखर घालून देवाला अशी प्रार्थना केली: “परमेश्‍वरा, हे माझ्या देवा या बालकाचा प्राण त्याच्या ठायी पूर्ववत येऊ दे.” यहोवाने त्याची प्रार्थना ऐकली आणि तो मुलगा जिवंत झाला. (१ राजे १७:८-२४) या विधवेला तिच्या विश्‍वासाचे किती अद्‌भुत प्रतिफळ मिळाले! तिच्या मुलाचे पुनरुत्थान हे बायबलमध्ये उल्लेख केलेले पहिले पुनरुत्थान आहे.

४. अलीशाने शुनेम गावात कोणता चमत्कार केला?

दुसरी स्त्री शुनेम नगरात राहणारी होती; तिचा पती वृद्ध होता. या स्त्रीने अलीशा संदेष्ट्याचा आणि त्याच्या सेवकाचा पाहुणचार केला होता, त्यांची मदत केली होती. त्यामुळे यहोवाने प्रसन्‍न होऊन तिला मुलगा दिला. पण काही काळानंतर तो मरण पावला. त्यामुळे तिने अलीशाला बोलावले. त्याने प्रार्थना करून काही विधी पार पाडल्यानंतर त्या “मुलाच्या देहास ऊब आली.” मुलाने “सात वेळा शिंकून डोळे उघडले.” साहजिकच त्या मुलाला व त्याच्या आईला किती आनंद झाला असेल याची आपण कल्पना करू शकतो. (२ राजे ४:८-३७; ८:१-६) आणि नवीन पृथ्वीवर या सर्वांचे “अधिक चांगले पुनरुत्थान” होईल तेव्हा त्यांना किती आनंद होईल! तेव्हा त्यांना परत कधी मरावे लागणार नाही. पुनरुत्थानाची ही अद्‌भुत आशा आपल्याला देणाऱ्‍या प्रेमळ देवाचे आपण किती ऋणी आहोत!—इब्री लोकांस ११:३५.

५. अलीशाचा मृत्यू झाल्यानंतरही त्याच्याद्वारे कोणता चमत्कार घडून आला?

अलीशाच्या मृत्यूनंतरही चमत्कार झाला. कसे ते पाहू या. काही इस्राएली “लोक एका मनुष्यास मूठमाती देत असता त्यांच्या नजरेस एक टोळी पडली; आणि त्यांनी ते प्रेत अलीशाच्या कबरेत टाकिले, तेव्हा अलीशाच्या अस्थीस स्पर्श झाल्याबरोबर तो मनुष्य जिवंत होऊन पायांवर उभा राहिला.” (२ राजे १३:२०, २१) त्या माणसाला किती आश्‍चर्य व आनंद झाला असेल याचा आपण विचार करू शकतो! कल्पना करा, यहोवा आपले अभिवचन पूर्ण करेल आणि आपल्या मृत प्रियजनांना पुन्हा जिवंत करेल तेव्हा आपला आनंद गगनात मावणार नाही!

येशूने त्यांना पुन्हा जिवंत केले

६. नाईन गावाजवळ येशूने कोणता चमत्कार केला आणि हा वृत्तान्त वाचल्यानंतर आपल्यावर कसा प्रभाव होतो?

देवाच्या पुत्राने अर्थात, येशू ख्रिस्तानेही दाखवून दिले की देवाच्या सामर्थ्याने मृत लोकांचे सार्वकालिक जीवनासाठी पुनरुत्थान होणे शक्य आहे व ही आशा विश्‍वासार्ह आहे. एकदा तो नाईन गावात जात होता, तेव्हा त्याने पाहिले की काही लोक एक मृतदेह दफन करण्याकरता घेऊन जात आहेत. तो एका विधवेचा एकुलता एक मुलगा होता. येशूने त्या विधवेला म्हटले: “रडू नको.” मग जवळ जाऊन त्याने तिरडीला स्पर्श केला आणि म्हटले: “मुला, मी तुला सांगतो, ऊठ!” तेव्हा तो मुलगा उठून बसला व बोलू लागला. (लूक ७:११-१५) येशूच्या या चमत्कारावरून आपल्याला या गोष्टीची पक्की खात्री पटते, की देव मेलेल्या लोकांना नक्की जिवंत करील.

७. याईराच्या मुलीच्या संबंधाने कोणती घटना घडली?

सभास्थानात अधिकारी असलेल्या याईरच्या मुलीला देखील येशूने जिवंत केले. ती १२ वर्षांची होती आणि मरायला टेकली होती त्यामुळे त्याने येशूला मदतीकरता बोलावले. पण तेथे पोहंचण्याआधीच मुलगी वारल्याची बातमी येते. ही बातमी ऐकताच याईरला दुःख अनावर होते. पण येशू त्याला विश्‍वास ठेवायला सांगतो आणि त्याच्यासोबत त्याच्या घरी जातो. तेथे अनेक लोक शोक करत आहेत. तेव्हा येशू असे म्हणतो: “मूल मेले नाही झोपेत आहे.” हे ऐकून सर्वजण येशूची टिंगल करू लागतात. खरे तर ती मुलगी मेली आहे, पण येशूला हे दाखवायचे आहे, की झोपलेल्या व्यक्‍तीला जागे करण्यासारखेच मेलेल्या व्यक्‍तीलाही जिवंत करणे शक्य आहे. त्याने त्या मुलीचा हात धरून म्हटले: “मुली, ऊठ!” लागलीच ती मुलगी उठली. हे पाहून तिचे आईवडील अक्षरशः “थक्क झाले.” (मार्क ५:३५-४३; लूक ८:४९-५६) आपले आईवडील, आपले भाऊबहीण, आपले नातेवाईक नव्या जगात पुन्हा जिवंत होतील तेव्हा आपणही किती “थक्क” होऊ!

८. लाजराच्या कबरेजवळ जाऊन येशूने काय केले?

मरून चार दिवस झालेल्या लाजरालाही येशूने जिवंत केले. त्याने कबरेवरचा धोंडा काढायला सांगितला. मरीया आणि मार्था या लाजराच्या बहिणी देखील त्यावेळी कबरेजवळ होत्या आणि काही लोक त्यांचे सांत्वन करण्यासाठी तेथे आले होते. त्यानंतर त्याने मोठ्याने प्रार्थना केली कारण तो देवाच्या शक्‍तीने चमत्कार करतो हे सर्वांना कळावे अशी त्याची इच्छा होती. मग त्याने मोठ्याने हाक मारली: “लाजरा, बाहेर ये.” लागलीच लाजर बाहेर आला! त्याचे हातपाय अजूनही कापडाने बांधलेले आणि त्याचे तोंड रूमालाने गुंडाळलेले होते. तेव्हा येशूने म्हटले: “ह्‍याला मोकळे करून जाऊ द्या.” हा चमत्कार पाहिल्यावर, तेथे उभे असलेल्या लोकांनी येशूवर विश्‍वास ठेवला. (योहान ११:१-४५) मेलेल्या आपल्या आप्तेष्टांना नव्या जगात पुन्हा पाहता येईल ही आशा आपल्याला यामुळे मिळत नाही का?

९. येशूजवळ मृतांना पुनरुत्थित करण्याचे सामर्थ्य आहे याची आपण खात्री का बाळगू शकतो?

बाप्तिस्मा देणारा योहान तुरुंगात होता तेव्हा येशूने त्याला दिलासा देण्यासाठी असा निरोप पाठवला: “आंधळे पाहतात, . . . मेलेले उठविले जातात.” (मत्तय ११:४-६) या पृथ्वीवर मनुष्य रूपात असताना येशूने मेलेल्या लोकांना जिवंत केले. पण जरा विचार करा, तो तर आता स्वर्गात देवाच्या सोबत आहे आणि एक शक्‍तिशाली राजा बनला आहे. तर मग, मेलेल्या लोकांना जिवंत करण्याचे त्याच्याकडे सामर्थ्य नाही का? होय, येशूच आपल्याकरता “पुनरुत्थान व जीवन” आहे. येणाऱ्‍या भविष्यात “कबरेतील सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील आणि . . . बाहेर येतील.” हा विचार देखील किती सांत्वनदायक आहे!—योहान ५:२८, २९; ११:२५.

विश्‍वास दृढ करणारी इतर पुनरुत्थाने

१०. प्रेषितांपैकी एकाने केलेल्या पहिल्या पुनरुत्थानाचे आपल्या शब्दांत वर्णन करा.

१० राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी येशूने आपल्या प्रेषितांना पाठवले तेव्हा त्याने त्यांना “मेलेल्यांस उठवा” असेही सांगितले. (मत्तय १०:५-८) पण याकरता त्यांना देवाच्या शक्‍तीची आवश्‍यकता होती. सा.यु. ३६ साली यापो नावाच्या गावात दुर्कस (टबीथा) नावाची एक धार्मिक स्त्री मरण पावली. गरजू विधवांसाठी कपडे तयार करणे अशी अनेक कामे ती करत असे. म्हणूनच तिचा मृत्यू झाल्यानंतर अनेक लोकांना फार वाईट वाटले. शिष्यांनी तिच्या दफनविधीची तयारी केली आणि सर्वांचे सांत्वन करण्यासाठी त्यांनी प्रेषित पेत्राला येण्याची विनंती केली. (प्रेषितांची कृत्ये ९:३२-३८) पेत्र आला तेव्हा त्याने सर्वांना खोलीच्या बाहेर काढले आणि एकान्तात प्रार्थना केली व असे म्हटले: “टबीथे, ऊठ!” तेव्हा लगेच टबीथाने डोळे उघडले आणि ती उठून बसली. पेत्राने तिला हात दिला आणि ती उभी राहिली. पहिल्यांदाच येशूच्या प्रेषिताने मेलेल्या व्यक्‍तीला जिवंत केले होते. हा चमत्कार पाहून अनेक लोक ख्रिस्ती बनले. (प्रेषितांची कृत्ये ९:३९-४२) या वृत्तान्तामुळे पुनरुत्थानावरील आपलाही विश्‍वास आणखी दृढ होतो.

११. बायबलमध्ये उल्लेखलेले शेवटले पुनरुत्थान कोणाचे होते?

११ मेलेल्या व्यक्‍तीला जिवंत करण्याची शेवटची घटना त्रोवस नगरात घडली. पौल येथे त्याच्या तिसऱ्‍या मिशनरी दौऱ्‍यावर आला होता. तेथे तो एका इमारतीच्या तिसऱ्‍या मजल्यावर भाषण देत होता; मध्यरात्रीपर्यंत त्याचे भाषण चालले होते. तेथे युतुख नावाचा एक तरुण खिडकीत बसून भाषण ऐकत होता. पण कदाचित थकव्यामुळे आणि तेथे बरेच दिवे लावलेले असल्यामुळे निर्माण झालेली उष्णता आणि प्रचंड गर्दीमुळे त्याला झोप लागली आणि तो तिसऱ्‍या मजल्याच्या खिडकीतून खाली पडला. तो “मेलेला हाती लागला.” पौलाने युतुखवर पाखर घातली आणि त्याला कवटाळून जमलेल्या लोकांना म्हटले: “घाबरू नका, कारण हा अजून जिवंत आहे.” हे ऐकून जमलेल्या लोकांना “फार समाधान वाटले.” (प्रेषितांची कृत्ये २०:७-१२) आज देवाच्या सेवकांना याचे फार समाधान वाटते की त्यांच्यासोबत यहोवाची सेवा करताना मरण पावलेल्या बांधवांचेही लवकरच पुनरुत्थान होईल.

पुनरुत्थान—पूर्व काळची आशा

१२. रोमी सुभेदार फेलिक्स याच्यापुढे साक्ष देताना पौलाने कोणता विश्‍वास व्यक्‍त केला?

१२ रोमी सुभेदार फेलिक्स याच्यापुढे साक्ष देताना, पौलाने म्हटले: “जे जे नियमशास्त्रानुसार आहे व जे जे संदेष्ट्यांच्या लेखात आहे त्या सर्वांवर विश्‍वास ठेवून मी आमच्या पूर्वजांच्या देवाची सेवा करितो; . . . नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल.” (प्रेषितांची कृत्ये २४:१४, १५) बायबलमध्ये आणि खासकरून मोशेच्या ‘नियमशास्त्रांत’ पुनरुत्थानाविषयी सांगण्यात आले होते का?

१३. देवाने पहिली भविष्यवाणी केली तेव्हा त्याने पुनरुत्थानाबद्दल उल्लेख केला असे आपण का म्हणू शकतो?

१३ एदेन बागेत देवाने पहिली भविष्यवाणी केली तेव्हा त्याने सांगितले, की मेलेल्या लोकांना पुन्हा जिवंत केले जाईल. “जुनाट साप” अर्थात दियाबल सैतानाला शिक्षा देताना देवाने म्हटले: “तू व स्त्री, तुझी संतति व तिची संतति यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन; ती तुझे डोके फोडील, व तू तिची टाच फोडिशील.” (प्रकटीकरण १२:९; उत्पत्ति ३:१४, १५) स्त्रीच्या संततीची टाच फोडण्याचा अर्थ येशू ख्रिस्ताला मारून टाकणे असा होता. पण स्त्रीची संतती नंतर सापाचे डोके फोडणार होती. अर्थात त्यासाठी येशूचे पुनरुत्थान होणे आवश्‍यक होते.

१४. यहोवा हा “मृतांचा देव नव्हे, तर जिवंतांचा देव आहे” असे आपण का म्हणू शकतो?

१४ येशूने म्हटले: “मोशेनेहि झुडपाच्या वृत्तांतात, परमेश्‍वराला अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव असे म्हणून मेलेले उठविले जातात हे दर्शविले आहे; तो मृतांचा देव नव्हे, तर जिवंतांचा आहे; कारण त्याला सर्वच जिवंत आहेत.” (लूक २०:२७, ३७, ३८; निर्गम ३:६) होय, यहोवा मृतांचा नाही, तो जिवंतांचा देव आहे. याचा हाच अर्थ होतो, की अब्राहाम, इसहाक, आणि याकोब हे त्याचे एकनिष्ठ सेवक त्याच्या दृष्टीने अद्यापही जिवंत आहेत आणि तो त्यांचे पुनरुत्थान नक्की करील.

१५. अब्राहामाचा पुनरुत्थानावर का विश्‍वास होता?

१५ अब्राहामाचा पुनरुत्थानाच्या आशेवर पूर्ण विश्‍वास होता. कारण त्याची बायको सारा व तो अगदी वृद्ध असताना देवाने त्यांच्या जीवनात एक चमत्कार घडवून आणला होता. मुले उत्पन्‍न करण्याच्या दृष्टीने ते दोघेही मृतवत झाले होते असे म्हणता येईल. पण यहोवाने त्यांची मृतवत झालेली प्रजनन शक्‍ती पुन्हा जिवंत केली. हे एका अर्थाने पुनरुत्थानच होते. (उत्पत्ति १८:९-११; २१:१-३; इब्री लोकांस ११:११, १२) अब्राहाम व सारा यांचा मुलगा इसहाक जवळजवळ २५ वर्षांचा होता तेव्हा देवाने इसहाकाचे बलिदान करण्यास अब्राहामाला सांगितले. अब्राहाम इसहाकाला मारणार होता इतक्यात यहोवाच्या देवदूताने त्याला थांबवले. “मेलेल्यातून देखील उठवावयास देव समर्थ आहे, हे [अब्राहामाने] मानले आणि त्या स्थितीतून लाक्षणिक अर्थाने तो त्याला परत मिळाला.”—इब्री लोकांस ११:१७-१९; उत्पत्ति २२:१-१८.

१६. अब्राहाम सध्या मेलेला आहे पण लवकरच काय होईल?

१६ अब्राहामाचा विश्‍वास होता, की स्त्रीच्या संततीच्या अर्थात ख्रिस्ताच्या राज्यात त्याचे पुनरुत्थान होईल. येशूने स्वर्गातून अब्राहामाचा विश्‍वास पाहिला होता. त्यामुळे येशू पृथ्वीवर होता तेव्हा त्याने यहूद्यांना असे म्हटले: “तुमचा बाप अब्राहाम माझा दिवस पाहण्यासाठी उल्लसित झाला.” (योहान ८:५६-५८; नीतिसूत्रे ८:३०, ३१) आज अब्राहाम जिवंत नाही, पण लवकरच देवाच्या मशीही राज्यात या पृथ्वीवर जीवन जगण्यासाठी त्याचे पुनरुत्थान होईल.—इब्री लोकांस ११:८-१०, १३.

नियमशास्त्र आणि स्तोत्रांतील साक्ष

१७. मोशेच्या ‘नियमशास्त्रात’ कशाप्रकारे येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा संकेत होता?

१७ मोशेच्या ‘नियमशास्त्रात’ पुनरुत्थानाविषयी सांगण्यात आले होते आणि पौलाचा त्यावर विश्‍वास होता. देवाने इस्राएली लोकांना सांगितले होते: “आपल्या पिकाच्या पहिल्या उपजाची पेंढी तुम्ही याजकाकडे आणावी; ती पेंढी तुमच्यासाठी स्वीकारण्यात यावी म्हणून त्याने [निसान १६ तारखेला] परमेश्‍वरासमोर ती ओवाळावी.” (लेवीय २३:९-१४) कदाचित याच नियमाच्या संदर्भात पौलाने लिहिले: “ख्रिस्त मेलेल्यातून उठविला गेला आहेच; तो महानिद्रा घेणाऱ्‍यातले प्रथम फळ [पहिली उपज] असा आहे.” सा.यु. ३३ साली निसान १६ तारखेला येशूचे पुनरुत्थान झाले व अशारितीने तो “प्रथम फळ” झाला. नंतर त्याच्या उपस्थिती दरम्यान, आत्म्याने अभिषिक्‍त झालेल्या त्याच्या अनुयायांचे पुनरुत्थान होणार होते. ही ‘नंतरची फळे’ होती.—१ करिंथकर १५:२०-२३; २ करिंथकर १:२१; १ योहान २:२०, २७.

१८. येशूच्या पुनरुत्थानाविषयी स्तोत्रांत भाकीत करण्यात आले होते याचा पेत्राने कशाप्रकारे खुलासा केला?

१८ स्तोत्रांत देखील पुनरुत्थानाचा उल्लेख आढळतो. सा.यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी प्रेषित पेत्राने स्तोत्र १६:८-११ या वचनांचा काही भाग उद्धृत केला. तो म्हणाला: “दावीद [ख्रिस्ताविषयी] असे म्हणतो; ‘मी परमेश्‍वराला आपणापुढे नित्य पाहिले आहे; मी ढळू नये म्हणून तो माझ्या उजवीकडे आहे; म्हणून माझे हृदय आनंदित, व माझी जीभ उल्हसित झाली; आणखी माझा देहही आशेवर राहील, कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस, व आपल्या पवित्र पुरुषाला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस.’” पेत्राने पुढे म्हटले: “ह्‍याचे पूर्वज्ञान असल्यामुळे [दावीद] ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाविषयी असे बोलला की, ‘त्याला अधोलोकात सोडून दिले नाही’ व त्याच्या देहाला ‘कुजण्याचा अनुभव आला नाही.’ त्या येशूला देवाने उठविले.”—प्रेषितांची कृत्ये २:२५-३२.

१९, २०. पेत्राने स्तोत्र ११८:२२ येथील शब्द केव्हा उद्धृत केले आणि या शब्दांचा येशूच्या मृत्यूशी व पुनरुत्थानाशी कशाप्रकारे संबंध होता?

१९ या घटनेच्या काही दिवसांनंतर, पेत्राने एका लंगड्या भिकाऱ्‍याला बरे केले. तेव्हा त्याला सभास्थानापुढे अनेक प्रश्‍न विचारण्यात आले. त्यावेळी देखील त्याने लोकांच्या प्रश्‍नांची उत्तरे स्तोत्रांतून दिली: “तुम्हा सर्वांना व सर्व इस्राएल लोकांना हे कळावे की, ज्याला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले, ज्याला देवाने मेलेल्यांमधून उठविले, त्या नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने हा मनुष्य बरा होऊन तुमच्यापुढे उभा राहिला आहे. तुम्ही ‘बांधकाम करणाऱ्‍यांनी तुच्छ मानिलेला जो दगड कोनशिला झाला’ तो [येशू] हाच आहे; आणि तारण दुसऱ्‍या कोणाकडून नाही; कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेहि नाव आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेले नाही.”—प्रेषितांची कृत्ये ४:१०-१२.

२० स्तोत्र ११८:२२ येथील शब्दांच्या आधारावर पेत्र असे बोलला आणि हे शब्द येशूला लागू होतात. धार्मिक पुढाऱ्‍यांच्या चिथावणीमुळे यहुद्यांनी येशूला नाकारले. (योहान १९:१४-१८; प्रेषितांची कृत्ये ३:१४, १५) ‘बांधकाम करणाऱ्‍यांनी तुच्छ मानिल्यामुळे’ ख्रिस्ताला ठार मारण्यात आले. पण ‘तो दगड कोनशिला झाला’ याचा अर्थ असा होतो की येशूचे पुनरुत्थान झाले व त्याला गौरवशाली आत्मिक जीवन मिळाले. स्तोत्रकर्त्याने भाकीत केल्याप्रमाणे, “ही परमेश्‍वराची करणी आहे.” (स्तोत्र ११८:२३) “दगड” कोनशिला झाला यात येशूला राजा नियुक्‍त केले जाणे देखील येते.—इफिसकर १:१९, २०.

पुनरुत्थानाच्या आशेमुळे मिळणारी शक्‍ती

२१, २२. ईयोब १४:१३-१५ येथे सांगितल्याप्रमाणे ईयोबाने कोणती आशा व्यक्‍त केली आणि मृत व्यक्‍तीच्या प्रियजनांना यातून कशाप्रकारे सांत्वन मिळू शकते?

२१ कोणाचे पुनरुत्थान होताना आपण स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले नसले तरीसुद्धा आता आपण विचारात घेतलेले बायबलमधील वृत्तान्त आपल्याला खात्री पटवतात की मृतांचे पुनरुत्थान जरूर होईल. ईयोब या नीतिमान मनुष्याचा देखील पुनरुत्थानावर विश्‍वास होता. अत्यंत दुःखात असताना त्याने यहोवाला विनवणी केली: “तू मला अधोलोकात लपविशील, . . . माझी मुदत नियमित करून मग माझी आठवण करिशील. तर किती बरे होईल! मनुष्य मृत झाल्यावर पुनः जिवंत होईल काय? . . . तू मला हाक मारिशील व मी तुला उत्तर देईन; मी जो तुझ्या हातची कृति त्या मजविषयी तुला उत्कंठा लागेल.” (ईयोब १४:१३-१५) ईयोबाने काय म्हटले याकडे लक्ष द्या, त्याला पुन्हा जिवंत करण्याची देवाला अक्षरशः उत्कंठा लागेल. खरोखर पुनरुत्थानाची ही किती अद्‌भुत आशा आपल्याला लाभली आहे!

२२ कदाचित आपल्या घरातही ईयोबाप्रमाणे कोणी आजारी पडेल, किंवा कोणाचा मृत्यू होईल. असे काही झाल्यास आपल्याला मोठा धक्का बसतो. लाजार मरण पावला तेव्हा येशू देखील रडला; आपल्या प्रिय जनाच्या मृत्यूमुळे आपल्यालाही दुःख अनावर होईल. (योहान ११:३५) पण यहोवा देव त्याच्या स्मरणात असलेल्या सर्व मृतांना लवकरच हाक मारेल व ते पुन्हा जिवंत होतील हे जाणून आपल्याला किती सांत्वन मिळते! दूरच्या प्रवासावरून परत आल्याप्रमाणे ते आपल्याला पुन्हा भेटतील आणि तेव्हा त्यांपैकी कोणी आजारी नसेल.

२३. काहींनी पुनरुत्थानाच्या आशेवर आपला विश्‍वास कशाप्रकारे व्यक्‍त केला?

२३ एका विश्‍वासू वृद्ध बहिणीचा मृत्यू झाला तेव्हा बांधवांनी त्यांच्या कुटुंबियांना हा सांत्वनाचा संदेश पाठवला: “तुमच्या प्रिय आईच्या मृत्यूमुळे झालेल्या दुःखात आम्हीही सहभागी आहोत. पण आपण पुन्हा त्यांचे स्वागत करू तो दिवस आता दूर नाही; तेव्हा त्या अगदी पूर्वीसारख्याच तरुण आणि निरोगी असतील!” आपल्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर एका दांपत्याने असे म्हटले: “आमचा जेसन पुन्हा आम्हाला भेटेल तो दिवस पाहण्यासाठी आम्ही किती आसूसलो आहोत! देवाचं राज्य पृथ्वीवर आलेलं त्याला पाहायचं होतं, हे त्याचं स्वप्न होतं. ते स्वप्न पूर्ण झालेलं तो पाहील तेव्हा त्याला किती आनंद होईल. . . . त्याच्यावर प्रेम करणाऱ्‍या आम्हा सर्वांना त्याच्या स्मृतीमुळे हेच उत्तेजन मिळतं की त्या नव्या जगात जाण्यासाठी आम्ही होतील तितके प्रयत्न केले पाहिजे.” होय, पुनरुत्थानाची आशा अवश्‍य पूर्ण होईल आणि याबद्दल आपण यहोवा देवाचे खूप खूप ऋणी आहोत!

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• मृतांना पुनरुत्थित करण्याच्या देवाच्या तरतुदीवर विश्‍वास ठेवल्यामुळे आपल्याला कोणता फायदा होऊ शकतो?

• बायबलमध्ये दिलेल्या कोणत्या वृत्तान्तांमुळे आपला पुनरुत्थानावरील विश्‍वास दृढ होतो?

• देवाच्या सेवकांना पूर्वीच्या काळापासून पुनरुत्थानाची आशा होती असे आपण का म्हणू शकतो?

• मृतांविषयी आपण कोणती आशा बाळगू शकतो आणि यामुळे आपल्याला कशाप्रकारे साहाय्य मिळते?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१० पानांवरील चित्र]

यहोवाच्या सामर्थ्याने एलियाने एका विधवेच्या मुलाला पुन्हा जिवंत केले

[१२ पानांवरील चित्र]

येशूने याईराच्या मुलीला जिवंत केले तेव्हा तिचे आईवडील अत्यंत आनंदित आणि थक्क झाले

[१५ पानांवरील चित्र]

सा.यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी, प्रेषित पेत्राने येशूच्या पुनरुत्थानाविषयी सर्वांसमक्ष निर्भयपणे साक्ष दिली