व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अधिकाऱ्‍यांचा हक्क स्वीकारणे—का महत्त्वाचे आहे?

अधिकाऱ्‍यांचा हक्क स्वीकारणे—का महत्त्वाचे आहे?

अधिकाऱ्‍यांचा हक्क स्वीकारणे—का महत्त्वाचे आहे?

चोर लुटारूंना किंवा गुन्हेगारांना पकडण्याचा पोलिसांना अधिकार आहे म्हणून आपण त्यांचे आभारी नाही का? गुन्हेगारांना किंवा समाजकंटकांना शिक्षा देण्याचा कोर्टाला अधिकार आहे म्हणून आपण त्याचे आभार मानत नाही का?

या व्यतिरिक्‍त आपण सरकारला जो कर भरतो त्यापासून आपल्याला अनेक सुविधा उपलब्ध होतात. उदाहरणार्थ, चांगले रस्ते, स्वच्छ परिसर, शिक्षणाची व्यवस्था वगैरे वगैरे. या सर्व सुविधांकरता आपण सरकारचे आभारी नाही का? नियुक्‍त अधिकाऱ्‍यांना मान देण्याची आवश्‍यकता आहे हे खरे ख्रिस्ती ओळखतात. पण मग आपण किती प्रमाणापर्यंत आणि कोणकोणत्या बाबतीत त्यांना मान दिला पाहिजे?

समाजामध्ये

केवळ ख्रिस्ती लोकांनाच नव्हे, तर सर्व लोकांना बायबल सांगते की सरकारी अधिकाऱ्‍यांना मान दिला पाहिजे कारण ते समाजाच्या कल्याणासाठी काम करतात. याविषयी ख्रिस्ती प्रेषित पौलाने रोमकर १३:१-७ वचनांत रोममध्ये राहणाऱ्‍या ख्रिश्‍चनांना लिहिले आणि आपणही त्यावर विचार केल्यास आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो.

पौल रोमचा नागरिक होता आणि त्या काळी रोम हे एक जागतिक साम्राज्य होते. सा.यु. ५६ साली त्याने लिहिलेल्या त्याच्या पत्रात ख्रिश्‍चनांना आदर्श नागरिक होण्याचा सल्ला दिला. त्याने लिहिले: “प्रत्येक जणाने वरिष्ठ अधिकाऱ्‍यांच्या अधीन असावे; कारण देवापासून नाही असा अधिकार नाही; जे अधिकार आहेत ते देवाने नेमलेले आहेत.”

पौल येथे हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत होता, की देवाच्या अनुमतीशिवाय कोणतेच मानवी अधिकार अस्तित्वात नसते. याचा अर्थ, देव सर्वश्रेष्ठ अधिकारी आहे आणि जगातील अधिकाऱ्‍यांवर त्याचा अधिकार आहे. म्हणूनच आपण या अधिकाऱ्‍यांच्या अधीन राहिले पाहिजे कारण, “जो अधिकाराला आड येतो तो देवाच्या व्यवस्थेस आड येतो.”

चांगल्या नागरिकांची वरिष्ठ अधिकाऱ्‍यांकडून वाहवा होते, पण अपराध्यांना शिक्षा करण्याचा अधिकारही त्यांच्याकडे आहे. त्यामुळे अपराध्यांना ‘सूड घेणाऱ्‍या’ या अधिकाऱ्‍यांची भीती वाटलीच पाहिजे कारण ते ‘देवाच्या सेवकाप्रमाणे’ काम करतात

पौल शेवटी म्हणतो: “म्हणून क्रोधामुळे केवळ नव्हे, तर सदसद्‌विवेकबुद्धीमुळेहि अधीन राहणे अगत्याचे आहे. ह्‍या कारणास्तव तुम्ही करहि देता; कारण अधिकारी देवाची सेवा करणारे आहेत व ते ह्‍याच सेवेत तत्पर असतात.”

आपण भरत असलेल्या कराचा सरकारकडून कशाप्रकारे उपयोग केला जातो, हे पाहण्याचे काम आपले नव्हे, तर वरिष्ठ अधिकाऱ्‍यांचे आहे. त्यामुळे खरे ख्रिस्ती प्रामाणिकपणे कर भरतात. वरिष्ठ अधिकाऱ्‍यांच्या अधीन राहण्याद्वारे व कर भरण्याद्वारे आपण कायद्याचे पालन करतोच शिवाय देवाच्या वचनानुसार देखील वागतो हे त्यांना माहीत आहे.

कुटुंबात

कुटुंबातील अधिकाराबद्दल काय? एखाद्या लहान मुलाला काही हवे असल्यास ते आदळआपट किंवा आरडाओरडा करते. पण संमजस पालक आपल्या बाळाचे सर्वच लाड पुरवत नाहीत. त्याला खरोखरच कोणत्या गोष्टींची आवश्‍यकता आहे त्यानुसार ते त्यांच्या बाळाच्या गरजा पूर्ण करतात. परंतु काही पालक आपली मुले थोडी मोठी झाल्यावर त्यांना पूर्ण स्वातंत्र्य देतात. अशी मुले स्वछंदी होतात. त्यांना जगाचा अनुभव नसल्यामुळे ते वाईट मार्गाला लागतात किंवा मग असे गुन्हे करतात ज्यामुळे समाजाची आणि त्यांच्या कुटुंबाची शांती भंग पावते.

चिल्ड्रन वी डिसर्व या पुस्तकाच्या लेखिका, रोझलिंड माईल्स म्हणतात, “पालकांनी आपल्या मुलांना त्यांच्या जन्मापासूनच शिक्षण देण्यास सुरवात केली पाहिजे. पण कित्येक पालक फार उशीर लावतात.” सुरवातीपासूनच पालक आपल्या मुलांबरोबर प्रेमाने बोलले आणि मुलांसमोर स्वतःचा आदर्श ठेवला तर मुले त्यांचे ऐकतील, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागतील.

कुटुंबामध्ये मुलांवर कशाप्रकारे अधिकार ठेवावा, याविषयी बायबलमध्ये भरपूर माहिती आहे. मुलांना शिक्षण देताना आईवडिलांच्या विचारात एकता असली पाहिजे. याच एकतेविषयी नीतिसूत्राच्या पुस्तकात सुज्ञ राजा शलमोन असे म्हणतो: “माझ्या मुला, आपल्या बापाचा बोध ऐक, आपल्या आईची शिस्त सोडू नको.” (नीतिसूत्रे १:८) मुलांना शिस्त लावण्याच्या बाबतीत आईचा आणि वडिलांचा दृष्टिकोन एक असतो तेव्हा मुलांना त्यांच्या विचाराच्या विरुद्ध काही करता येत नाही. पण याबाबतीत आईवडिलांमध्येच एकमत नसते तेव्हा काही मुले स्वतःचा स्वार्थ साधण्याकरता आईवडिलांना एकमेकांच्या विरुद्ध करू शकतात. पण, आईवडिलांचा जर एकच दृष्टिकोन असेल तर मुले त्यांच्या आज्ञेत राहतील आणि असे केल्याने मुलांचाच फायदा होईल.

आपल्या मुलांच्या आणि आपल्या पत्नीच्या आध्यात्मिक प्रगतीची प्रमुख जबाबदारी पतीवर आहे, असे बायबल म्हणते. यालाच मस्तकपद म्हटले आहे. पतीने आपले मस्तकपद कसे चालवले पाहिजे? ख्रिस्त जसा मंडळीचा मस्तक आहे तसाच पती आपल्या पत्नीचा मस्तक आहे, असे पौलाने म्हटले. आणि पुढे तो म्हणाला: “पतीनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीति केली तशी तुम्हीहि आपआपल्या पत्नीवर प्रीति करा, ख्रिस्ताने मंडळीवर प्रीति केली आणि स्वतःस तिच्यासाठी समर्पण केले.” (इफिसकर ५:२५) याबाबतीत पती येशूच्या उदाहरणाप्रमाणे चालल्यास आणि प्रेमळपणे मस्तकपण चालवल्यास त्याची पत्नी त्याची “भीड” राखील. (इफिसकर ५:३३) आणि त्यांच्या मुलांनाही देवाने कुटुंबामध्ये दिलेल्या अधिकाराचे मोल समजेल व त्यानुसार वागतील.—इफिसकर ६:१-३.

ज्यांचे विवाह सोबती मरण पावले आहेत, किंवा मग मुलांचे संगोपन फक्‍त आई किंवा वडील करत असतील असे एकटे पालक याबाबतीत काय करू शकतात? त्यांनी आपल्या मुलांना यहोवा देवाच्या आणि येशू ख्रिस्ताच्या अधिकाराला मान देण्यास शिकवले पाहिजे. येशू नेहमी अधिकार वाणीने बोलला. येशू नेहमी त्याच्या पित्याकडून शिकलेल्या गोष्टींच्या आणि शास्त्रवचनांच्या आधारावर बोलत असे.—मत्तय ४:१-१०; ७:२९; योहान ५:१९, ३०; ८:२८.

मुलांच्या समस्या सोडवण्याकरता बायबलमध्ये अनेक तत्त्वे पाहायला मिळतात. ही तत्त्वे समजून घेऊन त्यानुसार वागल्यास पालकांना त्यांच्या मुलांना योग्य सल्ला देता येईल आणि त्यामुळे मुलांना खूप मदत होईल. (उत्पत्ति ६:२२; नीतिसूत्रे १३:२०; मत्तय ६:३३; १ करिंथकर १५:३३; फिलिप्पैकर ४:८, ९) शिवाय, शास्त्रवचनांच्या अधिकाराचा आदर केल्याने मिळणारे फायदे समजून घेण्याकरता आपल्या मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी खास तयार केलेल्या बायबल आधारित पुस्तकांचा देखील पालक उपयोग करू शकतात. *

ख्रिस्ती मंडळीत

“हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे, ह्‍याविषयी मी संतुष्ट आहे; ह्‍याचे तुम्ही ऐका.” (मत्तय १७:५) हे स्वतः यहोवा देवाचे शब्द आहेत. त्याने येशूला लोकांना शिकवण्याचा अधिकार दिला आहे. येशूने लोकांना दिलेल्या शिकवणी चार शुभवर्तमानांमध्ये आपल्याला वाचायला मिळतात.

स्वर्गात जाण्यापूर्वी येशूने त्याच्या शिष्यांना सांगितले: “स्वर्गांत आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे.” (मत्तय २८:१८) मंडळीचा मस्तक असल्यामुळे येशू पृथ्वीवरील त्याच्या अभिषिक्‍त अनुयायांवर फक्‍त लक्षच ठेवत नाही तर, सा.यु. ३३ साली पेन्टेकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा त्यांच्यावर आल्यानंतर त्याने त्यांना ‘विश्‍वासू व बुद्धिमान दास’ म्हणून नियुक्‍त केले आहे. फक्‍त याच दास वर्गाकडून सत्य मिळण्याची त्याने व्यवस्था केली. (मत्तय २४:४५-४७; प्रेषितांची कृत्ये २:१-३६) ख्रिस्ती मंडळीला दृढ करण्यासाठी त्याने आणखी काय केले आहे? “त्याने उच्चस्थानी आरोहण केले तेव्हा . . . मानवांना देणग्या दिल्या.” (इफिसकर ४:८) या “देणग्या” ख्रिस्ती वडील आहेत. त्यांना पवित्र आत्म्याने नियुक्‍त केले जाते व सहविश्‍वासूंची आध्यात्मिकरित्या काळजी घेण्याचा अधिकार त्यांना दिला जातो.—प्रेषितांची कृत्ये २०:२८.

म्हणूनच पौल असा सल्ला देतो: “जे तुमचे अधिकारी होते ज्यांनी तुम्हाला देवाचे वचन सांगितले, त्यांची आठवण करा; त्यांच्या वर्तणुकीचा परिणाम लक्षात आणून त्यांच्या विश्‍वासाचे अनुकरण करा.” हे विश्‍वासू पुरूष येशूच्या उदाहरणाप्रमाणे चालण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांच्या विश्‍वासाचे अनुकरण करणे सुज्ञपणाचे आहे. पौल पुढे म्हणतो: “आपल्या अधिकाऱ्‍यांच्या आज्ञेत राहा व त्यांच्या अधीन असा, [“तुमच्यावरील त्यांचा अधिकार कबूल करत राहा,” द ॲम्प्लिफाईड बायबल] कारण आपणास हिशेब द्यावयाचा आहे हे समजून ते तुमच्या जिवांची राखण करितात; ते त्यांना आनंदाने करता यावे, कण्हत नव्हे; तसे झाल्यास ते तुमच्या हिताचे होणार नाही.”—इब्री लोकांस १३:७, १७.

पण आपण या मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष केल्यास काय होईल? आरंभीच्या ख्रिस्ती मंडळीतील काहींनी तसे केले व ते धर्मत्यागी बनले. हुमनाय व फिलेत या दोन मनुष्यांबद्दल बायबलमध्ये सांगण्यात आले आहे ज्यांनी कित्येकांना विश्‍वासापासून बहकवले आणि त्यांच्या रिकाम्या वटवटीमुळे ‘जे पवित्र ते भ्रष्ट’ केले. या दोघांनी, पुनरुत्थान (आध्यात्मिक अथवा लाक्षणिक) आधीच झाले असल्यामुळे देवाच्या राज्यात कोणतेही पुनरुत्थान नाही, असा दावा केला होता.—२ तीमथ्य २:१६-१८.

पवित्र आत्म्याने नियुक्‍त केलेल्या व अधिकार पदावर असलेल्या ख्रिस्ती वडिलांनी या चुकीच्या शिकवणीचा विरोध केला. ख्रिस्ती वडील या चुकीच्या शिकवणीचा विरोध करू शकले कारण येशू ख्रिस्ताचे प्रतिनिधी या नात्याने त्यांनी शास्त्रवचनांचा उपयोग केला. (२ तीमथ्य ३:१६, १७) ख्रिस्ती मंडळीच्या बाबतीतही हे खरे आहे. ख्रिस्ती मंडळीला “सत्याचा स्तंभ व पाया” असे म्हटले आहे. (१ तीमथ्य ३:१५) खोट्या शिकवणींमुळे बायबलमध्ये असलेल्या ‘सुवचनांचे’ मुल्य केव्हाही कमी होऊ शकणार नाही. एखाद्या अनमोल खजिन्याप्रमाणे ते आज आपल्यासाठी जतन करून ठेवण्यात आले आहे.—२ तीमथ्य १:१३, १४.

जगामध्ये अधिकाऱ्‍यांचा अनादर करण्याची मनोवृत्ती झपाट्याने वाढत चालली आहे. पण ख्रिस्ती या नात्याने, समाजात, कुटुंबात व ख्रिस्ती मंडळीत आपण अधिकाऱ्‍यांचा अधिकार मान्य करतो. ते आपल्याच हिताकरता आहेत हे ओळखून आपण त्यांना आदर देतो. शारीरिकरीत्या, मानसिकरीत्या आणि आध्यात्मिकरीत्या आपण सुदृढ राहू इच्छितो तर आपण अधिकाराचा आदर केला पाहिजे. देवाने अधिकार पदावर नेमलेल्यांचा अधिकार स्वीकार केल्याने व त्यांचा आदर केल्याने, सर्वात महान अधिकारी, यहोवा देव आणि येशू ख्रिस्त आपल्याला चिरकाल आशीर्वाद देतील.—स्तोत्र ११९:१६५; इब्री लोकांस १२:९.

[तळटीपा]

^ परि. 17 तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे आणि कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य ही दोन्ही पुस्तके वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित झाली आहेत.

[५ पानांवरील संक्षिप्त आशय]

कुटुंबातील अधिकाराविषयी बायबलमध्ये भरपूर माहिती आहे

[६ पानांवरील चित्र]

एकट्या पालकांनी आपल्या मुलांना यहोवा देवाच्या आणि येशू ख्रिस्ताच्या अधिकाराला मान देण्यास शिकवले पाहिजे

[७ पानांवरील चित्रे]

कुटुंबात, ख्रिस्ती मंडळीत आणि समाजामध्ये ज्यांना अधिकार देण्यात आला आहे त्यामुळे आपलाच फायदा होतो हे खरे ख्रिस्ती ओळखतात

[४ पानांवरील चित्राचे श्रेय]

Photo by Josh Mathes, Collection of the Supreme Court of the United States