अधिकाऱ्यांचा हक्क—स्वीकारला का जात नाही?
अधिकाऱ्यांचा हक्क—स्वीकारला का जात नाही?
“गेल्या शतकातील सर्वात उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे, संपूर्ण जगभरातील लोकांनी धार्मिक, सरकारी, सामाजिक किंवा राजकीय अधिकाऱ्यांविरुद्ध बंड केले.”
असे इतिहासकार आणि तत्त्वज्ञानी हॅना आरंट यांनी १९६० च्या दशकाबद्दल म्हटले होते. या गोष्टीला आज बरीच वर्ष झाली आहेत, आणि आज तर अधिकाऱ्यांविरुद्ध बंड करण्याच्या प्रवृत्तीमध्ये पहिल्यापेक्षा खूपच वाढ झाल्याचे दिसून येते.
उदाहरणार्थ, लंडनच्या द टाईम्स या वर्तमानपत्रात अलीकडेच अशी बातमी आली होती: “शिक्षकांचा त्यांच्या विद्यार्थ्यांवरील अधिकार काही पालकांना मान्य नाही. शिक्षक जेव्हा विद्यार्थ्यांना त्यांच्या सुधारणेकरता शिक्षा देतात तेव्हा पालक त्यांचा विरोध करतात.” बरेच पालक शाळेत जातात आणि शिक्षकांना धमकी देतात; त्यांच्यावर हल्ला देखील करतात.
याविषयी ब्रिटनच्या नॅशनल असोसिएशन ऑफ हेड टीचर्सच्या एका प्रवक्त्याने असे म्हटले: “आजच्या समाजात माणूस सहसा आपल्या हक्कांबद्दल बोलतो, जबाबदाऱ्यांबद्दल तो क्वचितच उल्लेख करतो.” मोठ्यांना मान देण्याची प्रवृत्ती आपल्या मुलांमध्ये विकसित करण्याची जबाबदारी आईवडिलांची असते. पण काही आईवडील त्यांची ही जबाबदारी पार पाडत नाहीत. आणि त्यांच्या मुलांकडून चुक झाल्यानंतर ते त्यांना रागावत नाहीत. ते स्वतः त्यांना शिक्षा करत नाहीत आणि दुसऱ्यांना शिक्षा करू देत नाहीत. याचा परिणाम कोणालाही सांगता येण्यासारखा आहे. स्तंभलेखिका मार्ग्रेट ड्रिस्कॉल म्हणतात, “अधिकाराबद्दल थोडा देखील मान नसलेली आणि बरोबर किंवा चूक यात काय फरक आहे, हे न समजणारी नवीन पिढी तयार होत आहे.”
टाईम मासिकात “लॉस्ट जनरेशन” नावाचा एक लेख आला होता. त्यात, अनेक रशियन युवकांचा सामाजिक व्यवस्थेवरील विश्वास उडाला आहे असे सांगण्यात आले होते. आणि एका प्रसिद्ध रॅप संगीत कलाकाराचा देखील उल्लेख केला होता. त्याने असे म्हटले: “या जगात जास्त काळ काहीही टिकत नाही. सर्वत्र अन्याय आहे. अशा जगात जन्मास आलेला कोणी इतक्या सहजासहजी समाजावर भरवसा ठेवेल का?” समाजशास्त्रज्ञ मायकेल टोपोलोव याने देखील काहीसे असेच म्हटले, “ही मुलं काही वेडी नाहीत. सरकारने त्यांच्या आईवडिलांना फसवल्याचं त्यांनी पाहिलं आहे. त्यांच्या आईवडिलांनी साठवलेले पैसे, त्यांच्या नोकऱ्या देखील त्यांच्याकडून हिरावून घेताना त्यांनी पाहिलं आहे. मग अशी मुलं अधिकाऱ्यांना मान देतील अशी आपण अपेक्षा तरी कशी करायची?”
फक्त तरुणांचाच अधिकाऱ्यांवरचा भरवसा उडाला आहे असे म्हणणे योग्य ठरणार नाही. कोणत्याही वयाच्या लोकांना अधिकाऱ्यांवर भरवसा राहिलेला नाही. ते त्यांचा द्वेष करतात. पण मग याचा अर्थ असा होतो का, की सर्व अधिकारी भ्रष्ट आहेत? नाही. अधिकार या शब्दाचा अर्थ होतो, “दुसऱ्यांच्या कार्यावर ताबा ठेवण्याची, न्याय करण्याची किंवा बंदी घालण्याची शक्ती किंवा हक्क.” अधिकार पदावर असलेल्यांनी आपल्या अधिकाराचा योग्य वापर केल्यास इतरांचे नेहमी भले होईल. अशा अधिकारामुळे समाजाचा आणि प्रत्येक व्यक्तीचा फायदा होतो. तो कसा हे आपण पुढील लेखात सविस्तर पाहणार आहोत.