व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गर्व झाला की अप्रतिष्ठा आलीच

गर्व झाला की अप्रतिष्ठा आलीच

गर्व झाला की अप्रतिष्ठा आलीच

“गर्व झाला की अप्रतिष्ठा आलीच, पण नम्र जनांच्या ठायी ज्ञान असते.”—नीतिसूत्रे ११:२.

१, २. गर्व म्हणजे काय आणि गर्वामुळे कोणत्याप्रकारचे नुकसान झाले आहे?

यहोवाने नियुक्‍त केलेल्या माणसांचा द्वेष करून त्यांच्याविरुद्ध लोकांना भडकवून बंड करणारा लेवी; आपल्या पित्याचे सिंहासन बळकावण्यासाठी कट रचणारा महत्त्वाकांक्षी राजकुमार; देवाच्या संदेष्ट्याच्या स्पष्ट सूचनांविरुद्ध उतावीळपणे वागणारा उद्दाम राजा. बायबलमध्ये या तिन्ही लोकांबद्दल आपल्याला वाचायला मिळते. या तिघांचाही अवगुण कोणता? गर्व.

गर्विष्ठपणा, उन्मतपणा किंवा धिटाई या अवगुणांमुळे फार गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. (स्तोत्र १९:१३) गर्विष्ठ व्यक्‍ती आपल्या अधिकारात नसलेल्या गोष्टी करण्याची धिटाई करते. सहसा यामुळे वाईट परिणाम होतात. गर्वामुळे शक्‍तिशाली राजांचा व मोठमोठ्या साम्राज्यांचा सर्वनाश झाला आहे. (यिर्मया ५०:२९, ३१, ३२; दानीएल ५:२०) यहोवाच्या सेवकांपैकीही काहीजणांनी गर्वामुळे स्वतःवर नाश ओढवून घेतला.

३. गर्विष्ठपणाच्या धोक्याबद्दल आपल्याला कोठे माहिती मिळते?

म्हणूनच बायबल सांगते की, “गर्व झाला की अप्रतिष्ठा आलीच, पण नम्र जनांच्या ठायी ज्ञान असते.” (नीतिसूत्रे ११:२) बायबलमध्ये या विधानाची सत्यता पटवून देणारी कित्येक उदाहरणे आहेत. आपल्या मर्यादा ओलांडण्याची धिटाई करणे किती धोकेदायक आहे हे समजून घेण्यासाठी यांपैकी काही उदाहरणांवर आता आपण विचार करू. हेवा, महत्त्वाकांक्षा आणि उतावीळपणा या गुणांमुळे कशाप्रकारे तीन व्यक्‍तींनी आपल्या मर्यादा ओलांडल्या आणि यामुळे कशी त्यांची अप्रतिष्ठा झाली हे या लेखात सांगितले जाईल.

हेव्यामुळे बंड करणारा—कोरह

४. (अ) कोरह कोण होता, आणि कोणत्या ऐतिहासिक घटनांत तो सामील होता? (ब) कालांतराने कोरहाने काय केले?

कोरह हा लेवीय वंशातील कहाथी कुळाचा होता. तो मोशे व अहरोनचा चुलत भाऊ होता. कित्येक दशकांपासून त्याने यहोवाची निष्ठावानपणे सेवा केली होती. यहोवाने इस्राएली लोकांना तांबड्या समुद्रातून चमत्कारिकपणे वाचवले तेव्हा तो देखील त्यांत होता; नंतर सीनाय पर्वताजवळ सोन्याच्या वासराची उपासना करणाऱ्‍या इस्राएलीयांना नाश करण्याची यहोवाने आज्ञा दिली, तेव्हा त्या खोट्या उपासकांचा नाश करणाऱ्‍यांत कोरह देखील असावा अशी शक्यता आहे. (निर्गम ३२:२६) पण कालांतराने कोरह बदलला. शेवटी तर त्याने रूबेन वंशाचे दाथान, अबीराम व ओन, आणि इस्राएलाचे २५० सरदार यांच्यासोबत मिळून मोशे व अहरोन यांच्याविरुद्ध बंड केले. * या सर्वांनी मिळून मोशे व अहरोन यांना म्हटले: “तुमचे आता फारच झाले. सबंध मंडळी पवित्र आहे तसेच प्रत्येक मनुष्य पवित्र आहे आणि परमेश्‍वर त्यांच्याठायी आहे. तर तुम्ही मग परमेश्‍वराच्या मंडळीवर वर्चस्व का गाजविता?”—गणना १६:१-३.

५, ६. (अ) कोरहाने मोशे व अहरोन यांच्याविरुद्ध बंड का केले? (ब) कोरहाला देवाने दिलेल्या जबाबदाऱ्‍यांची कदर नव्हती असे का म्हणता येईल?

इतकी वर्षे विश्‍वासू राहिल्यानंतर अचानक कोरहाने बंड का केले? मोशे काही लोकांवर जुलूम करत नव्हता. बायबल तर म्हणते, की मोशे “भूतलावरील सर्व मनुष्यांपेक्षा नम्र होता.” (गणना १२:३) कोरहाला मोशे व अहरोन यांना मिळणाऱ्‍या मान-सन्मानाचा हेवा वाटत होता, हेच यावरून सिद्ध झाले. आणि म्हणूनच, मोशे व अहरोन आपल्या अधिकाराचा गैरफायदा घेतात, मनाप्रमाणे कारभार चालवतात व मंडळीवर अधिकार चालवतात असा खोटा आरोप कोरहाने त्यांच्यावर लावला.—स्तोत्र १०६:१६.

कहाथी कुळाचे लेवीय, याजकांचे काम करत नव्हते हे जरी खरे असले तरीसुद्धा, त्यांना देवाचे नियमशास्त्र लोकांना शिकवण्याचा बहुमान मिळाला होता. याशिवाय, निवासमंडप एका ठिकाणाहून दुसऱ्‍या ठिकाणी नेताना त्यातील वस्तू व पात्रे वाहून नेण्याची जबाबदारी देखील त्यांना मिळाली होती. हे काही साधेसुधे काम नव्हते कारण निवासमंडपातील पवित्र वस्तू हाताळण्याची जबाबदारी धार्मिक आणि नैतिक दृष्ट्या शुद्ध असलेल्यांनाच देण्यात आली होती. (यशया ५२:११) तेव्हा, कोरहच्या समस्येचे एक कारण हे असावे की त्याला स्वतःला यहोवाकडून मिळालेल्या जबाबदाऱ्‍यांबद्दल कदर नव्हती. मोशेने त्याच्या हेच लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला. एका अर्थाने तो कोरहाला विचारत होता, की तू याजकपदासाठी का हपापला आहेस, तुझ्यावर सोपवलेली जबाबदारी तुला क्षुल्लक वाटते का? (गणना १६:९, १०) कोरहाने एक महत्त्वाची गोष्ट ओळखली नव्हती. ती म्हणजे, यहोवाच्या संस्थेत त्याने नेमून दिलेल्या जागी विश्‍वासूपणे सेवा करणे हाच आपल्याकरता सर्वात मोठा बहुमान आहे. खास महत्त्वाचे स्थान किंवा पदवी मिळवण्याचा प्रयत्न करण्यात अर्थ नाही.—स्तोत्र ८४:१०.

७. (अ) कोरह व त्याच्या साथीदारांनी निर्माण केलेली समस्या मोशेने कशी हाताळली? (ब) कोरहाने बंड केल्यामुळे शेवटी कोणता भयंकर परिणाम घडून आला?

मोशेने कोरह व त्याच्या साथीदारांना दुसऱ्‍या दिवशी सकाळी दर्शनमंडपासमोर धूपपात्र व धूप घेऊन येण्यास सांगितले. खरे तर धूप जाळण्याचा अधिकार केवळ याजकांनाच असल्यामुळे कोरह व त्याच्या माणसांना हा अधिकार नव्हता. त्यांनी दुसऱ्‍या दिवशी धूपपात्रात धूप आणल्यास हेच सिद्ध होणार होते, की ते अद्यापही स्वतःला याजकांची कामे करण्यास पात्र समजत होते. मोशेने सांगितलेल्या गोष्टीवर विचार करायला त्यांच्याकडे संपूर्ण रात्र होती. पण त्यांनी योग्य निर्णय घेतला नाही. दुसऱ्‍या दिवशी सकाळी दर्शनमंडपासमोर धूपपात्र व धूप घेऊन ते हजर होते. त्यांच्या अशा गर्विष्ठ वागण्यामुळे यहोवाचा क्रोध त्यांच्यावर भडकला. कोरहाला साथ देणाऱ्‍या रऊबेन वंशाच्या पुरुषांना ‘पृथ्वीने आपले तोंड उघडून गिळून टाकले.’ तसेच कोरहसहित बाकीच्या सर्व लोकांना देवाने अग्नीने भस्म केले. (अनुवाद ११:६; गणना १६:१६-३५; २६:१०, NW) कोरहाच्या गर्विष्ठपणामुळे शेवटी त्याच्यावर कायमची अप्रतिष्ठा आली. तो देवाच्या शिक्षेस पात्र ठरला!

‘ईर्ष्या करण्याच्या प्रवृत्तीपासून’ सांभाळा

८. “ईर्ष्या” करण्याची स्वाभाविक प्रवृत्ती ख्रिस्ती मंडळीतही कशाप्रकारे दिसू शकते?

कोरहाच्या अनुभवातून एक महत्त्वाचा धडा शिकायला मिळतो. “ईर्ष्या” हा गुण अपरिपूर्ण मानवांत स्वभावतःच असतो. त्यामुळे ख्रिस्ती मंडळीतही त्याचा शिरकाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (याकोब ४:५) उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्‍तीच्या पदवीवरून तिचे महत्त्व ठरवण्याची कदाचित आपल्याला सवय असेल. आपल्याला हव्या असलेल्या जबाबदाऱ्‍या दुसऱ्‍यांकडे आहेत हे पाहून कदाचित कोरहाप्रमाणे आपल्याला त्यांचा हेवाही वाटत असेल. पहिल्या शतकातील ख्रिस्ती मंडळीत दियत्रफेस नावाच्या एकाला प्रेषितांची टीका करण्याची सवय होती. त्याच्याप्रमाणे कदाचित आपल्यालाही जबाबदारीच्या पदांवर असलेल्या बांधवांची एकसारखी टीका करण्याची सवय असेल. साहजिकच, मनातल्यामनात दियत्रफेस प्रेषितांची जागा घेऊ इच्छित होता. म्हणूनच योहानाने त्याच्याविषयी असे लिहिले की त्याला “अग्रगण्य होण्याची लालसा” होती.—३ योहान ९.

९. (अ) मंडळीतील जबाबदाऱ्‍यांबद्दल आपण कशाप्रकारे विचार करण्याचे टाळले पाहिजे? (ब) देवाच्या संस्थेत आपल्या स्थानाविषयी आपण कशी मनोवृत्ती बाळगावी?

बांधवांनी मंडळीमध्ये जबाबदाऱ्‍या मिळाव्यात अशी इच्छा बाळगणे मुळीच चुकीचे नाही. उलट पौलाने त्यांना अशी इच्छा बाळगण्याचे प्रोत्साहन दिले आहे. (१ तीमथ्य ३:१) पण जबाबदाऱ्‍या मिळाल्या म्हणजे आपली बढती झाली असे कोणीही समजू नये. येशूने म्हटले होते: “जो कोणी तुम्हामध्ये श्रेष्ठ होऊ पाहतो तो तुमचा सेवक होईल, आणि जो कोणी तुम्हामध्ये पहिला होऊ पाहतो तो तुमचा दास होईल.” (मत्तय २०:२६, २७) मंडळीत ज्यांच्यावर जास्त जबाबदाऱ्‍या सोपवल्या आहेत त्यांचा हेवा करणे निश्‍चितच चुकीचे आहे. देव प्रत्येक व्यक्‍तीची किंमत ती व्यक्‍ती त्याच्या संस्थेत कोणत्या ‘पदावर’ आहे यावरून ठरवतो असे समजण्यासारखे हे ठरेल. येशूने म्हटले: “तुम्ही सर्व भाऊभाऊ आहा.” (मत्तय २३:८) यहोवाची मनापासून सेवा करणाऱ्‍या प्रत्येक जणाला त्याच्या संस्थेत महत्त्वाचे स्थान आहे, मग तो प्रचारक असो वा पायनियर, नुकताच बाप्तिस्मा घेतलेला असो वा बऱ्‍याच वर्षांपासून विश्‍वासू राहिलेला असो. (लूक १०:२७; १२:६, ७; गलतीकर ३:२८; इब्री लोकांस ६:१०) बायबल आपल्याला ‘नम्रतारुपी कमरबंद बांधण्याचा’ सल्ला देते. या सल्ल्यानुसार वागणाऱ्‍या लाखो जणांसोबत खांद्याला खांदा लावून यहोवाची सेवा करणे अत्यंत आनंददायक आहे.—१ पेत्र ५:५.

संधीसाधू व महत्त्वाकांक्षी अबशालोम

१०. अबशालोम कोण होता आणि राजाकडे न्याय मागण्यास येणाऱ्‍यांची मर्जी संपादन करण्याचा त्याने कसा प्रयत्न केला?

१० महत्त्वाकांक्षेमुळे किती नुकसान होऊ शकते हे अबशालोमाच्या जीवनातील घटनांकडे पाहिल्यावर आपल्याला कळते. त्याला राजा व्हायचे होते. त्यामुळे दावीदाकडे न्याय मागण्याकरता येणाऱ्‍या लोकांना आपल्या बाजूला करण्यासाठी त्याने प्रयत्न सुरू केला. दाविदाला आपल्या प्रजेची काही काळजी नाही असे लोकांना तो पटवून देऊ लागला. मग तो सरळ मुद्द्‌यावर आला आणि म्हणाला: “मला या देशात न्यायाधीश केले असते तर किती बरे झाले असते? एखाद्याने आपला कज्जा किंवा प्रकरण मजकडे आणले असते तर मी त्यास न्याय दिला असता.” अबशालोम अत्यंत कुटील व कपटी होता. बायबल सांगते: “कोणी त्यास मुजरा करावयास जवळ येई तेव्हा तो आपला हात पुढे करून त्याला धरून त्याचे चुंबन घेई. इस्राएलातले जे जे लोक राजाकडे न्याय मागण्यासाठी येत त्या सर्वांशी तो असाच वागे.” याचा काय परिणाम झाला? त्याने “इस्राएल लोकांची मने हरण केली.”—२ शमुवेल १५:१-६.

११. अबशालोमाने दाविदाचे सिंहासन बळकावण्याचा कशाप्रकारे प्रयत्न केला?

११ अबशालोमाला कसेही करून आपल्या पित्याच्या सिंहासनावर बसायचे होते. पाच वर्षांआधी त्याने दाविदाचा सर्वात मोठा मुलगा अम्नोन यास जिवे मारले होते. अम्नोनाने अबशालोमची बहीण तामार हिच्यावर बलात्कार केला होता. याचाच सूड उगवण्यासाठी अबशालोमाने त्याला मारले असे सर्वांना भासले असेल. (२ शमुवेल १३:२८, २९) पण तेव्हा देखील अबशालोमाची नजर त्याच्या पित्याच्या सिंहासनावर होती. आणि म्हणूनच अम्नोनाला जिवे मारल्यावर आपोआपच आपला मार्ग मोकळा होईल हे ओळखून अबशालोमाने त्याला ठार मारले असावे. * नंतर योग्य वेळ आल्यावर अबशालोमाने डाव साधला. त्याने सबंध राष्ट्रात आपण राजा झालो आहोत अशी घोषणा केली.—२ शमुवेल १५:१०.

१२. अबशालोमाने उन्मतपणे आपल्या मर्यादा ओलांडल्यामुळे कशाप्रकारे त्याची अप्रतिष्ठा झाली ते समजावून सांगा.

१२ अबशालोमाच्या प्रयत्नांना काही प्रमाणात यश मिळाले. त्याचे “बंड वाढत गेले व अबशालोमाकडे एकसारखे लोक जमत गेले.” एकवेळ तर अशी आली, की दाविदाला आपला जीव वाचवण्यासाठी पलायन करावे लागले. (२ शमुवेल १५:१२-१७) पण लवकरच अबशालोमाची सगळी स्वप्ने धुळीस मिळाली कारण यवाबाने त्यालाच मारून टाकले आणि त्याला एका मोठ्या खड्ड्यात टाकून त्याच्यावर धोंड्यांची मोठी रास केली. कल्पना करा, राजा व्हायला निघालेल्या महत्त्वाकांक्षी अबशालोमाचा रीतसर अंत्यविधी देखील करण्यात आला नाही. * अशारितीने उन्मतपणे आपल्या मर्यादा ओलांडल्यामुळे अबशालोमालाही अप्रतिष्ठा सहन करावी लागली.—२ शमुवेल १८:९-१७.

महत्त्वाकांक्षा व स्वार्थबुद्धी टाळा

१३. महत्त्वाकांक्षा बाळगण्याची प्रवृत्ती ख्रिस्ती व्यक्‍तीच्या मनातही कशाप्रकारे निर्माण होऊ शकते?

१३ अबशालोमाच्या उदाहरणावरून आपण बरेच काही शिकू शकतो. आजच्या जगात सगळीकडे गळेकापू स्पर्धा चालली आहे. वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यासाठी हांजी हांजी करत त्यांच्या मागेपुढे करणारे बरेच लोक पाहायला मिळतात. आपली चांगली छाप पडावी किंवा आपल्याला काही खास अधिकार मिळावेत किंवा बढती मिळावी या उद्देशाने ते असे करतात. तर दुसरीकडे आपल्या हाताखाली काम करणाऱ्‍या लोकांनी आपल्याला पाठिंबा द्यावा या स्वार्थी इच्छेने काही लोक त्यांच्यापुढे स्वतःची बढाई मारताना दिसतात. अशाप्रकारची महत्त्वाकांक्षी वृत्ती सहज आपल्या मनात निर्माण होऊ शकते. असे होऊ नये म्हणून आपण नेहमी सतर्क राहिले पाहिजे. पहिल्या शतकातही काही लोकांमध्ये अशी प्रवृत्ती निर्माण झाली होती. म्हणूनच प्रेषितांनी अशा लोकांना सक्‍त ताकीद दिली असे आपण वाचतो.—गलतीकर ४:१७; ३ योहान ९, १०.

१४. महत्त्वाकांक्षा बाळगण्याची किंवा स्वतःची बढाई मारण्याची प्रवृत्ती आपण का टाळली पाहिजे?

१४ कुटील उद्देश साध्य करू पाहणाऱ्‍यांना, स्वतःचा मोठेपणा मिरवणाऱ्‍यांना, अर्थात ‘आपल्याच गौरवाच्या पाठीस’ लागणाऱ्‍यांना यहोवा त्याच्या संस्थेत थारा देत नाही. (नीतिसूत्रे २५:२७) बायबल तर असा इशारा देते: “खुशामत करणारे सर्व ओठ, फुशारकी मारणारी जीभ परमेश्‍वर कापून टाको.” (स्तोत्र १२:३) अबशालोम खुशामत करण्यात तरबेज होता. आपल्या फायद्यासाठी, कसेही करून अधिकाराचे पद मिळवण्यासाठी लोकांसमोर मोठ्या मोठ्या गोष्टी करण्याची त्याची सवय होती. आपण किती आनंदी लोक आहोत की आपले ख्रिस्ती बांधव नेहमी पौलाच्या या सल्ल्याचे पालन करतात: “तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरविण्याच्या बुद्धीने काहीहि करू नका, तर लीनतेने एकमेकांना आपणापेक्षा श्रेष्ठ माना.”—फिलिप्पैकर २:३.

असंयमी राजा शौल

१५. शौलाने एकेकाळी नम्रपणा कसा दाखवला होता?

१५ इस्राएलचा राजा झालेला शौल एकेकाळी नम्र होता. उदाहरणार्थ तो तरुण असताना काय झाले होते तुम्हाला आठवत असेल. देवाचा संदेष्टा शमुवेल याने त्याची प्रशंसा केली तेव्हा तो नम्रपणे म्हणाला: “इस्राएल वंशातले सर्वांहून कनिष्ठ जे बन्यामिनी त्यातला मी ना? आणि बन्यामिनाच्या वंशातील सगळ्या कुळात माझे घराणे कनिष्ठ ना? तर मग तुम्ही मजशी असले भाषण का करिता?”—१ शमुवेल ९:२१.

१६. शौलाने उतावीळपणे कोणते कार्य केले?

१६ पण कालांतराने शौलाचा हा नम्रपणा नाहीसा झाला. पलिष्टी लोकांसोबत युद्ध सुरू असताना तो गिलगालला गेला. या ठिकाणी त्याला शमुवेलाकरता थांबायचे होते कारण तो शौलाच्या वतीने यहोवाला होमार्पण करणार होता. ठरवलेल्या मुदतीच्या आत शमुवेल आला नाही तेव्हा शौलाने स्वतःच होम अर्पण करण्याची धिटाई केली. अर्पण समाप्त होत आले इतक्यात शमुवेल तेथे आला. त्याने शौलाला विचारले: “तू हे काय केले? शौलाने म्हटले, जेव्हा मी पाहिले की लोक मजकडून पांगत आहेत, ठरलेल्या मुदतीच्या आत आपण आला नाही तेव्हा . . . माझ्या मनाविरुद्ध वागणे भाग पडून मी होम केला.”—१ शमुवेल १३:८-१२.

१७. (अ) शौलाने काही चूक केली नाही असे आपल्याला सुरवातीला का वाटू शकते? (ब) शौलाने उतावीळपणे केलेल्या कृतीबद्दल यहोवाने त्याला शिक्षा का दिली?

१७ हा उतारा वाचताना, शौलाची काही चूक नव्हती असे कदाचित आपल्याला वाटेल. कारण देवाचे लोक ‘पेचात सापडले’ होते, त्यांच्यावर “संकट” आले होते व त्यांना मदत करणे आवश्‍यक होते. (१ शमुवेल १३:६, ७) अर्थात, कोणाला मदत करण्यासाठी पुढाकार घेणे चुकीचे नाही. * पण यहोवा आपले अंतःकरण जाणतो हे लक्षात ठेवा; आपल्या अगदी आतल्या भावना, आपल्या मनातले हेतू तो जाणतो. (१ शमुवेल १६:७) बायबलमध्ये याविषयी स्पष्टपणे सांगण्यात आलेले नाही, पण शौलाच्या मनातल्या भावना यहोवाने ओळखल्या असतील. उदाहरणार्थ, शौलाने असंयमीपणे केलेली ही कृती गर्वामुळे होती हे कदाचित यहोवाने ओळखले असेल. इस्राएल राष्ट्राचा मी राजा असून हा म्हातारा संदेष्टा मला इतके दिवस थांबायला लावतो काय? या विचाराने शौलाला राग आला असेल. शमुवेलाने उशीर लावल्यामुळे आता आपल्याला होमार्पण करण्याचा हक्क आहे असा शौलाने विचार केला. आणि म्हणून त्याला देण्यात आलेल्या स्पष्ट सूचनांचे त्याने उल्लंघन केले. याचा परिणाम काय झाला? शमुवेलाने शौलाच्या कृतीची प्रशंसा केली नाही. उलट त्याने शौलाला शिक्षा सुनावली: “तुझे राज्य कायम राहावयाचे नाही . . . कारण परमेश्‍वराने तुला केलेली आज्ञा तू पाळिली नाही.” (१ शमुवेल १३:१३, १४) अशारितीने पुन्हा एकदा, गर्विष्ठपणे मर्यादा ओलांडल्यामुळे अप्रतिष्ठा पदरी पडली.

असंयमापासून सांभाळा

१८, १९. (अ) असंयमी वृत्तीमुळे आजच्या काळातही देवाचा सेवक कशाप्रकारे आपल्या मर्यादा ओलांडण्याची चूक करू शकतो? (ब) ख्रिस्ती मंडळीच्या कारभाराबद्दल कोणती गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे?

१८ शौलाने केलेल्या चुकांपासून आपण धडा घ्यावा म्हणूनच हा वृत्तान्त बायबलमध्ये नमूद करून ठेवण्यात आला आहे. (१ करिंथकर १०:११) आपल्या बांधवांकडून काही चूक होते तेव्हा लगेच आपण त्यांच्यावर चिडतो. शौलाप्रमाणे कदाचित आपण कधीकधी उतावीळही होत असू; एखादे काम इतरांपेक्षा आपण स्वतः केले तरच चांगले होईल असेही आपल्याला वाटेल. उदाहरणार्थ, मंडळीत एखाद्या बांधवाजवळ मंडळीची कामे सुरळीत चालवण्याचे कौशल्य असेल. तो अतिशय वक्‍तशीर, मंडळीच्या सर्व कामात निपुण तसेच भाषणे देण्यात आणि शिकवण्याच्या कलेतही पारंगत असेल. कदाचित इतर जण त्याच्या इतके चांगले काम करू शकत नाहीत, त्याच्या इतके निपुण ते नाहीत हे त्याला जाणवत असेल. हे खरे असले तरीही यामुळे त्याने संयम सोडून वागावे का? आपल्या बांधवांना त्याने पाण्यात पाहावे का? माझ्याशिवाय मंडळीचे पान हालत नाही, मी नसलो तर मंडळीचे कोणतेच काम होणार नाही असे त्याने आपल्या वागण्यातून सुचवणे योग्य ठरेल का? नाही, असे करणे गर्विष्ठपणाचे ठरेल!

१९ ख्रिस्ती मंडळी कशाच्या आधारावर उभी आहे? कोणाच्या कौशल्याच्या, निपुणतेच्या किंवा ज्ञानाच्या आधारावर ती उभी आहे का? या गोष्टींमुळे मंडळीचा कारभार सुरळीत चालण्यास मदत होते हे खरे आहे. (१ करिंथकर १४:४०; फिलिप्पैकर ३:१६; २ पेत्र ३:१८) पण येशूने सांगितल्याप्रमाणे खऱ्‍या ख्रिस्ती मंडळीची ओळख म्हणजे बांधवांचे एकमेकांबद्दलचे प्रेम. (योहान १३:३५) कळपाची काळजी वाहणारे वडील सुव्यवस्थितपणे कार्य करण्याचा प्रयत्न करतात; पण त्यांना याचीही जाणीव असते की मंडळी ही एखाद्या कंपनीसारखी नाही ज्यात नियमांचे काटेकोर पालन करावे लागते. उलट कळपातील मेंढरांना प्रेमाची, सहानुभूतीची आवश्‍यकता आहे. (यशया ३२:१, २; ४०:११) या तत्त्वांकडे दुर्लक्ष केल्यास साहजिकच मंडळीची शांती भंग पावते. पण यहोवाच्या तत्त्वांनुसार वागल्यामुळे मंडळीमध्ये शांती राहते.—१ करिंथकर १४:३३; गलतीकर ६:१६.

२०. पुढच्या लेखात कशाचा विचार केला जाईल?

२० कोरह, अबशालोम व शौल यांच्या बाबतीत जे काही घडले त्यावरून “गर्व आला की अप्रतिष्ठा आलीच” या नीतिसूत्रे ११:२ येथे दिलेल्या तत्त्वाची सत्यता पटते. पण याच वचनात पुढे असेही म्हटले आहे की “नम्र जनांच्या ठायी ज्ञान असते.” नम्रता म्हणजे काय? बायबलमधील कोणत्या उदाहरणावरून आपल्याला या गुणाबद्दल शिकायला मिळते आणि आज आपण नम्रता कशी दाखवू शकतो? पुढील लेखात याच प्रश्‍नांची उत्तरे देण्यात येतील.

[तळटीपा]

^ परि. 4 रऊबेन हा याकोबाचा ज्येष्ठ पुत्र असल्यामुळे त्याचे वंशज कदाचित मोशेचा द्वेष करत असतील. मोशे लेवी वंशाचा असून त्याला आमच्यावर कसा काय अधिकार देण्यात आला असा कदाचित ते विचार करत असावेत.

^ परि. 11 किलाब या दाविदाच्या दुसऱ्‍या मुलाचा त्याच्या जन्मानंतर उल्लेख आढळत नाही. कदाचित अबशालोमाने बंड करण्याआधीच त्याचा मृत्यू झाला असावा.

^ परि. 12 इस्राएल लोकांमध्ये अंत्यविधीला बरेच महत्त्व दिले जायचे. रीतीभातीनुसार एखाद्याचा अंत्यविधी न करणे हे वाईट समजले जायचे आणि त्या व्यक्‍तीला ही देवाची शिक्षा आहे असे समजले जायचे.—यिर्मया २५:३२, ३३.

^ परि. 17 उदाहरणार्थ, इस्राएल लोकांमध्ये पसरलेल्या मरीमुळे हजारो लोक मृत्युमुखी पडत होते, तेव्हा ती मरी थांबवण्यासाठी फीनहासने त्वरित पावले उचलली. तसेच दाविदाने भुकेने व्याकूळ झालेल्या माणसांसोबत ‘देवाच्या मंदिरातली’ पवित्र भाकरी खाल्ली. फीनहास व दावीद यांपैकी कोणालाही देवाने मर्यादा ओलांडल्याबद्दल शिक्षा दिली नाही.—मत्तय १२:२-४; गणना २५:७-९; १ शमुवेल २१:१-६.

तुम्हाला आठवते का?

• गर्विष्ठपणा म्हणजे काय?

• ईर्ष्या करण्याच्या प्रवृत्तीमुळे कोरहाने कशाप्रकारे गर्विष्ठपणे कार्य केले?

• महत्त्वाकांक्षी अबशालोमापासून आपण कोणता धडा शिकतो?

• शौलाने दाखवलेली असंयमी वृत्ती आपण कशी टाळू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१० पानांवरील चित्र]

शौलाने असंयमीपणे आपल्या अधिकारात नसलेले कार्य केले