व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

त्यांना मुले का नाहीत?

त्यांना मुले का नाहीत?

त्यांना मुले का नाहीत?

डेले आणि फोला * हे विवाहित दांपत्य नायजेरियातील वॉच टावर संस्थेच्या शाखा दफ्तरात काम करत होते. तेथे येऊन त्यांना जास्त वर्षे झालीही नव्हती की एकदा फोलाची आई तिला भेटायला आली. अनेक दिवसांपासून तिला एक चिंता लागून राहिली होती. त्या विचारामुळे तिची झोप उडाली होती. म्हणून आपल्या मुलीशी त्याबद्दल बोलायला ती फार दूरहून प्रवास करून आली होती.

ती त्यांना म्हणाली, “तुम्ही माझी किती काळजी घेता. मला नेहमी काही न काही देत असता. मला भेटायला येता. तुम्ही कितीतरी प्रेम करता माझ्यावर. पण मला कधी कधी तुमची खूप काळजी वाटते. तुम्ही माझ्या वयाचे झाल्यावर तुम्हाला असं प्रेम कोण देणार? तुमच्या लग्नाला दोन वर्षं झालीत; पण अजून तुम्हाला मुलबाळ नाही. ही बेथेल सेवा आता पुरे नाही का? तुम्ही ही सेवा सोडून मुलंबाळं का होऊ देत नाहीत?”

तिच्या आईचे म्हणणे होते की: डेले आणि फोलाने पुष्कळ बेथेल सेवा केली होती. आता त्यांनी त्यांच्या भविष्याविषयी विचार केला पाहिजे. त्यांचे बेथेलमधील काम दुसरे कोणीही करतील. डेले आणि फोलाने पूर्ण वेळेची सेवा सोडून द्यावी असे तिचे म्हणणे नव्हते; पण मुले असण्याचा व पालक होण्याचा आनंद मिळू शकेल अशा इतर पूर्ण वेळेच्या सेवेच्या क्षेत्रात त्यांनी असावे असे तिला म्हणायचे होते.

आईला वाटणारी काळजी

त्या आईला असे वाटणे साहजिक आहे. मुले असावीत असे प्रत्येकालाच वाटते आणि प्रत्येक संस्कृतीत आणि काळात ही भावना दिसून आली आहे. मुले होतात तेव्हा कोणालाही आनंद होतो; शिवाय आपल्या मुलांबद्दल त्यांच्या काही आशा असतात. बायबलसुद्धा म्हणते की, “पोटचे फळ [एक] देणगी आहे.” मुलांना जन्मास घालण्याची क्षमता हे देवाकडील एक अनमोल दान आहे.—स्तोत्र १२७:३.

अनेक समाजांमध्ये, मुले व्हावीत म्हणून दांपत्यांवर बराच दबाव आणला जातो. उदाहरणार्थ, नायजेरियात, सर्वसाधारणपणे एका स्त्रीला सहा मुले होतात. तेथे लग्न समारंभात नव-विवाहित दांपत्याला अशी सदिच्छा दिली जाते की, “नऊ महिन्यानंतर घरात पाळणा हालायला हवा बरं का.” काही वेळा तर लग्नात भेटवस्तू म्हणून पाळणासुद्धा दिला जातो. सासवा तर दिवस मोजत असतात. वर्षाच्या आत सून गरोदर राहिली नाही की त्या लगेच विचारपूस करतात.

मुलांना जन्म देण्यासाठी आणि वंश पुढे चालवण्यासाठीच लग्न केले जाते असे पुष्कळ मातांना वाटते. फोलाची आई तिला म्हणाली: “तुला मुलं नको होती तर लग्न कशाला केलंस? तुला कोणीतरी जन्म दिलाय तर तूसुद्धा आपल्या बाळांना जन्म दिला पाहिजे.”

पण, अशा विचाराला इतरही कारणे आहेत. आफ्रिकेतल्या अनेक देशांमध्ये, वृद्ध लोकांची काळजी घेण्यासाठी सरकाराकडून फारशी सुविधा नाही. पालक आपल्या मुलांना सांभाळतात तसेच आईवडील म्हातारे झाल्यावर मुले त्यांची काळजी घेतात. म्हणून, फोलाच्या आईचे म्हणणे असे होते की, तिला मुले झाली नाहीत तर म्हातारपणात त्यांची काळजी कोण घेणार? ते एकटे पडतील, कोणीही त्यांची काळजी घेणार नाही आणि नंतर भिकेला लागतील. शेवटच्या क्षणी देखील त्यांच्याजवळ कोणी नसेल.

आफ्रिकेत जवळजवळ सगळीकडेच, मुले नसणे म्हणजे शाप आहे असे मानले जाते. काही ठिकाणी तर, स्त्रियांना मुले होतील हे त्यांना लग्नाआधीच सिद्ध करून दाखवावे लागते. ज्या स्त्रिया गरोदर राहत नाहीत त्या वेगवेगळे औषधोपचार करून आपला वांझपणा घालवण्याचा प्रयत्न करतात.

त्यामुळे जी दांपत्ये स्वतःला मुले होऊ देत नाहीत ती एक प्रकारचा आनंद गमावत आहेत असे लोकांना वाटते. अशी दांपत्ये विचित्र आहेत, त्यांना भविष्याचा विचार नाही असे लोक म्हणतात. त्यांच्याविषयी लोकांना कीव वाटते.

आनंद आणि जबाबदारी

मुलांमुळे आनंद मिळतो परंतु त्यांचे पालनपोषण करणे ही एक जबाबदारी आहे याची यहोवाच्या लोकांना जाणीव आहे. १ तीमथ्य ५:८ येथे बायबल म्हणते: “जर कोणी स्वकीयांची व विशेषकरून आपल्या घरच्यांची तरतूद करीत नाही, तर त्याने विश्‍वास नाकारला आहे; तो माणूस विश्‍वास न ठेवणाऱ्‍या माणसापेक्षा वाईट आहे.”

आपल्या कुटुंबाची भौतिक आणि आध्यात्मिक गरज भागवणे ही पालकांची जबाबदारी आहे; त्यासाठी बराच वेळ द्यावा लागतो, परिश्रम करावे लागतात. देवाने आपल्याला मुले दिली आहेत तर देवच त्यांची काळजी घेईल असा विचार ते करत नाहीत. परंतु, बायबलच्या तत्त्वांनुसार, मुलांचे संगोपन करणे ही देवाने पूर्णतः पालकांना दिलेली जबाबदारी आहे; ही जबाबदारी त्यांनी इतर कोणावरही लादू नये.—अनुवाद ६:६, ७.

‘शेवटल्या काळच्या कठीण दिवसांमध्ये’ मुलांचे संगोपन करणे ही तारेवरची कसरतच आहे. (२ तीमथ्य ३:१-५) आर्थिक तंगी आहेच परंतु समाजातल्या वाढत्या दुष्टाईमुळेही मुलांचे संगोपन करणे कठीण बनले आहे. तरीपण, संपूर्ण जगभरात असंख्य ख्रिस्ती दांपत्यांनी हे आव्हान स्वीकारले आहे आणि देवाचे भय बाळगणाऱ्‍या आपल्या मुलांचे “प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात” पालनपोषण करत आहेत. (इफिसकर ६:४) असे पालक यहोवाला प्रिय आहेत आणि त्यांच्या परिश्रमाचे तो त्यांना प्रतिफळ देतो.

काहीजण मुले का होऊ देत नाहीत

अनेक ख्रिस्ती दांपत्यांना मुले नाहीत. काहींना वंध्यत्वामुळे मुले होत नसले, तरीही ते दत्तक घेत नाहीत. इतरांना अशी कोणतीही समस्या नसतानाही त्यांनी मुले न होऊ देण्याचा निर्णय घेतलेला आहे. याचा अर्थ, त्यांना जबाबदारी नको आहे किंवा पालक होण्याची आव्हाने स्वीकारण्याची भीती वाटते अशातली गोष्ट नाही. तर, पूर्ण-वेळेच्या सेवेच्या वेगवेगळ्या विशेषाधिकारांचा लाभ घेता यावा म्हणून त्यांनी असा निर्णय घेतलेला असतो. कारण मुले झाल्यावर त्यांना हे शक्य नसते. म्हणून काहीजण मिशनरी बनतात तर काही प्रवासी कार्यासाठी जातात नाहीतर बेथेलमध्ये सेवा करतात.

सगळ्या ख्रिश्‍चनांप्रमाणे यांनाही जाणीव आहे की, एक महत्त्वाचे कार्य करण्याची आज गरज आहे. येशू त्याविषयी म्हणाला: “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल.” आज हे कार्य केले जात आहे. हे कार्य महत्त्वाचे आहे कारण सुवार्तेचा स्वीकार न करणाऱ्‍यांकरता “शेवट” म्हणजे विनाशच ठरेल.—मत्तय २४:१४; २ थेस्सलनीकाकर १:७, ८.

आजचा आपला काळ नोहाच्या काळाप्रमाणे आहे. त्या वेळी, नोहा आणि त्याच्या कुटुंबाने एक मोठा तारू बांधला आणि त्याच्याकरवी महाप्रलयातून ते वाचले. (उत्पत्ति ६:१३-१६; मत्तय २४:३७) नोहाच्या तिन्ही मुलांची त्या वेळी लग्ने झालेली होती; तरीही प्रलयापर्यंत त्यांना मुले झाली नव्हती. कदाचित त्या दांपत्यांनी तारू बांधण्याच्या कार्याला पूर्णपणे वाहून घेण्याचे ठरवले असेल. नाहीतर, कदाचित “मानवांची दुष्टाई फार [होती], त्याच्या मनातील येणाऱ्‍या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट” होत्या म्हणून अशा दुष्ट आणि हिणकस जगात मुलांचे संगोपन करणे त्यांना नको होते.—उत्पत्ति ६:५.

याचा अर्थ, आजच्या काळात मुले असणे चुकीचे आहे असे नाही. पण अनेक ख्रिस्ती दांपत्यांनी यहोवाने त्याच्या लोकांना दिलेल्या अति महत्त्वाच्या कार्यात जास्त भाग घेता यावा म्हणून मुले होऊ न देण्याचा निर्णय घेतला आहे. काही दांपत्यांनी थोडा काळ थांबून मग मुले होऊ दिली आहेत तर काहींनी आता नव्हे तर यहोवाच्या नीतिमान नवीन जगात मुले होऊ देण्याचे ठरवले आहे. याचा अर्थ ते स्वतःबद्दल पुढचा विचार करीत नाही का? किंवा जीवनातल्या काही गोष्टींचा आनंद ते गमावत आहेत का? आणि इतरांना त्यांची कीव यावी का?

सुरक्षित आणि आनंदी जीवन

आधी उल्लेखलेले डेले आणि फोला यांच्या लग्नाला दहा वर्षे झाली आहेत; पण अजूनही त्यांना मुले नको आहेत. डेले म्हणतो: “आमचे नातेवाईक अजूनही आमच्यावर दबाव आणतात. पुढं आमचं कसं होईल याची त्यांना जास्त चिंता आहे. त्यांना आमच्याबद्दल चिंता वाटते खरी पण आम्ही त्यांना समजावून सांगतो की आमच्या कार्यात आम्हाला बराच आनंद मिळतोय आणि आमची काळजी यहोवा घेईल कारण विश्‍वासू आणि निष्ठावान राहिलेल्या प्रत्येकाची त्याला चिंता आहे. त्यांना हे देखील सांगितलंय की, म्हातारपणी मुले आईवडिलांची काळजी घेतीलच असं नसतं. काही लोक आपल्या आईवडिलांची मुळीच काळजी घेत नाहीत; काहींना काळजी घेणं जमत नाही तर काहींचा आपल्या आईवडिलांच्या आधीच मृत्यू होतो. पण यहोवाचं तसं नाही, त्याच्यावर आम्ही पूर्ण भरवसा करू शकतो.”

डेले आणि इतर अनेक जणही यहोवाने त्याच्या विश्‍वासू सेवकांना दिलेल्या वचनावर पूर्ण भरवसा करतात. त्याने म्हटले आहे: “मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही.” (इब्री लोकांस १३:५) तसेच त्यांना विश्‍वास आहे की, “उद्धार करवत नाही इतका परमेश्‍वराचा हात तोकडा झाला नाही; ऐकू येत नाही इतका त्याचा कान मंद झाला नाही.”—यशया ५९:१.

यहोवा आपल्या विश्‍वासू सेवकांचे कसे संरक्षण करतो त्यावरूनही आपला भरवसा वाढतो. राजा दावीदाने लिहिले: “मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो, तरी नीतिमान निराश्रित झालेला किंवा त्याची संतति भिकेस लागलेली मी पाहिली नाही.” यहोवाच्या कोणा विश्‍वासू सेवकाला तुम्ही कधी “निराश्रित झालेला” पाहिला आहे का?—स्तोत्र ३७:२५.

ज्यांनी यहोवा आणि त्याच्या सह-ख्रिश्‍चनांची सेवा करण्यात आपले आयुष्य घालवले आहे त्यांना पस्तावा होण्याऐवजी समाधान वाटते. बंधू इरो उमा यांनी ४५ वर्षे पूर्ण-वेळेच्या सेवेत घालवली आहेत आणि सध्या ते नायजेरियात प्रवासी कार्यात आहेत. ते म्हणतात: “आम्हाला मुलं नाहीत, पण यहोवाने आम्हाला आध्यात्मिकरित्या आणि भौतिकरित्या काहीही कमी पडू दिलं नाही हे आम्ही कधीही विसरत नाही. आजपर्यंत आम्हाला कशाचीही उणीव भासली नाहीये. आम्ही म्हातारे झाल्यावर तो आम्हाला मुळीच सोडणार नाही. या पूर्ण-वेळेच्या सेवेत घालवलेला काळ सर्वात सुखाचा ठरलाय. आपल्या बांधवांची आम्हाला सेवा करायला मिळाली तीच किती मोठी गोष्ट आहे. बांधवांनीसुद्धा आमच्या सेवेची खूप कदर केली आणि आम्हाला खूप मदत दिलीय.”

पुष्कळ दांपत्यांना मुले झाली नाहीत तरीही त्यांना दुसरी मुले आहेत, अर्थात यहोवाची उपासना करणारे ख्रिस्ती शिष्य. प्रेषित योहानाने वयाच्या १०० व्या वर्षी असे लिहिले: “माझी मुले सत्यात चालतात, हे ऐकून मला आनंद होतो तितका दुसऱ्‍या कशानेहि होत नाही.” (३ योहान ४) योहानाची मुले म्हणजेच त्याने ज्यांना सत्य शिकवले, ते विश्‍वासू राहिले याचा त्याला फार आनंद वाटायचा.

आजही असाच आनंद मिळतो. नायजेरियातल्या बर्निसचे लग्न होऊन १९ वर्षे झाली आहेत; तिच्या पतीने आणि तिनेसुद्धा मुले होऊ दिली नाहीत. गेल्या १४ वर्षांपासून तिने पायनियरींग केली आहे. आता म्हातारपण येऊ लागल्यामुळे तिला कधीच मुले होणार नाहीत; पण त्याचा किंवा आपले संपूर्ण आयुष्य शिष्य बनवण्याच्या कार्यात घालवल्याचा तिला मुळीच पस्तावा होत नाही. उलट ती म्हणते: “माझ्या आध्यात्मिक मुलांची प्रगती पाहून मला फार आनंद होतो. माझी स्वतःची मुले असती तरीसुद्धा माझ्या सत्यातल्या मुलांवर माझं तेवढंच प्रेम असतं. ते मला आईच मानतात. मला सगळं येऊन सांगतात. माझा सल्ला घेतात. मला पत्रं लिहितात. आम्ही एकमेकांना भेटायलाही जात असतो.

“काहींना वाटतं की, स्वतःची मुलं नाहीत म्हणजे शापच आहे. म्हातारपणात धक्के खावे लागतील असं ते म्हणतात. पण मला तसं वाटत नाही. मी जोपर्यंत यहोवाची जिवाभावाने सेवा करीन तोपर्यंत तो मला आशीर्वाद देत राहील आणि माझा सांभाळ करील हे मला पक्कं ठाऊक आहे. म्हतारपणातही तो मला सोडणार नाही.”

देवाला प्रिय आणि बहुमोल

ज्यांनी मुलांना जन्म देऊन त्यांना मोठे केले आहे आणि ती मुले “सत्यात चालतात” ते धन्य आहेत. म्हणूनच तर बायबल म्हणते की, “धार्मिकाचा बाप फार उल्लासतो; सुज्ञ मुलास जन्म देतो तो त्याजविषयी आनंद पावतो. तुझी मातापितरे आनंद पावोत, तुझी जन्मदात्री हर्ष पावो.”—नीतिसूत्रे २३:२४, २५.

परंतु ज्या ख्रिश्‍चनांना मुलांचे संगोपन करण्याचा आशीर्वाद मिळालेला नाही त्यांना इतर अनेक मार्गांनी आशीर्वाद प्राप्त झाला आहे. यांपैकी पुष्कळांनी राज्याच्या वाढीकरता मोठ्या प्रमाणात हातभार लावला आहे. त्यांना इतक्या वर्षांमध्ये मिळालेला अनुभव, बुद्धी आणि कौशल्ये राज्याच्या कार्यासाठी फार बहुमोल ठरली आहेत. आणि म्हणून पुष्कळजण या कार्यात पुढाकार घेत आहेत.

राज्याकरता त्यांनी स्वतःला मुले होऊ दिली नाहीत; तरीसुद्धा यहोवाने त्यांना आशीर्वादित करून आध्यात्मिक कुटुंब दिले आहे. आणि त्यांनी केलेल्या त्यागांबद्दल या आध्यात्मिक कुटुंबातील लोकांना मनापासून कदर वाटते. येशूने म्हटल्याप्रमाणे “ज्याने ज्याने माझ्याकरिता व सुवार्तेकरिता घरदार, बहीणभाऊ, आईबाप, मुलेबाळे किंवा शेतवाडी सोडली आहे, अशा प्रत्येकाला सांप्रतकाळी छळणुकीबरोबर शंभरपटीने घरे, भाऊ, बहिणी, आया, मुले, शेते आणि येणाऱ्‍या युगात सार्वकालिक जीवनही मिळाल्याशिवाय राहणार नाही.”—मार्क १०:२९, ३०.

यहोवाला विश्‍वासू राहिलेले लोक त्याला किती मोलाचे आहेत! मुले असलेल्या आणि नसलेल्या निष्ठावान लोकांना प्रेषित पौल अशी शाश्‍वती देतो: “तुमचे कार्य व तुम्ही पवित्र जनांची केलेली व करीत असलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखविलेली प्रीति, ही विसरून जाण्यास तो अन्यायी नाही.”—इब्री लोकांस ६:१०.

[तळटीपा]

^ परि. 2 नावे बदलण्यात आली आहेत.

[२३ पानांवरील चित्रे]

ज्यांना मुले नाहीत त्यांना प्रेमळ आध्यात्मिक कुटुंब लाभले आहे