व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“नम्र जनांच्या ठायी ज्ञान असते”

“नम्र जनांच्या ठायी ज्ञान असते”

“नम्र जनांच्या ठायी ज्ञान असते”

“नीतीने वागणे, आवडीने दया करणे व आपल्या देवासमागमे राहून नम्रभावाने चालणे यांवाचून परमेश्‍वर तुजजवळ काय मागतो?”—मीखा ६:८.

१, २. नम्रता म्हणजे काय आणि गर्विष्ठपणापासून ती कशी वेगळी आहे?

स्वतःकडे लक्ष न वेधणारा प्रेषित. आपल्या पित्याच्या घरात स्वतःला सर्वात कनिष्ठ म्हणवणारा न्यायाधीश. आणि सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ व्यक्‍ती असून देखील आपल्या अधिकाराला मर्यादा आहेत हे कबूल करणारा एक महापुरुष. या तिघांनीही दाखवलेला एक समान गुण म्हणजे नम्रता.

नम्रता आणि गर्व यात खूप मोठा फरक आहे. नम्र व्यक्‍तीला स्वतःच्या चांगल्या गुणांसोबतच आपल्या कमतरतांचीही जाणीव असते. तिच्या वागण्याबोलण्यात गर्व किंवा अहंकार दिसून येत नाही. स्वतःच्या चांगल्या गुणांची आपल्याच तोंडाने वाहवा करण्याऐवजी नम्र व्यक्‍ती नेहमी आपल्या मर्यादा ओळखून वागते. आणि यामुळे अशी व्यक्‍ती सहसा इतरांच्या भावनांची आणि विचारांची दखल घेते आणि त्यांना मान देते.

३. “नम्र जनांच्या ठायी ज्ञान असते” असे का म्हणता येईल?

बायबल म्हणते, की “नम्र जनांच्या ठायी ज्ञान असते.” (नीतिसूत्रे ११:२) नम्र लोकांना ज्ञानी म्हणण्यात आले आहे कारण ते देवाच्या मार्गानुसार चालतात आणि त्यामुळे त्यांना अप्रतिष्ठा सहन करावी लागत नाही. (नीतिसूत्रे ८:१३; १ पेत्र ५:५) नम्र जनांच्या ठायी ज्ञान असते, या तत्त्वाची सत्यता देवाच्या कित्येक सेवकांच्या उदाहरणांवरून पटते. सुरवातीला उल्लेख केलेल्या तीन उदाहरणांवर आता आपण विचार करू या.

“सेवक” व “कारभारी”—पौल

४. पौलाला कोणते खास हक्क प्राप्त झाले होते?

सुरवातीच्या ख्रिस्ती मंडळीतले लोक पौलाला खूप मान द्यायचे. साहजिकच, कारण त्याने दूर दूरपर्यंत प्रचार कार्य केले होते आणि त्याकरता त्याने कित्येक दिवसांचा समुद्री प्रवास केला होता. कित्येक मंडळ्या त्याने स्थापन केल्या होत्या. शिवाय, यहोवाने पौलाला कित्येक दृष्टान्त दाखवले आणि अनेक भाषांत बोलण्याचे दान दिले होते. (१ करिंथकर १४:१८; २ करिंथकर १२:१-५) त्याने पौलाला १४ पत्रे देखील लिहिण्याची प्रेरणा दिली होती आणि आज ही पत्रे ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत सामील आहेत. पौलाने इतर सर्व प्रेषितांपेक्षा नक्कीच अधिक श्रम केले होते.—१ करिंथकर १५:१०.

५. पौलाने नम्रता कशी दाखवली?

काहींना कदाचित असे वाटले, की पौलाने यहोवाच्या सेवेत इतके काही केल्यामुळे त्याला लोकांकडून स्वतःची वाहवा ऐकण्याची किंवा दुसऱ्‍यांवर अधिकार गाजवण्याची सवय झाली असेल. पण पौल असा मुळीच नव्हता. तो नम्र होता. “प्रेषितांत मी कनिष्ट आहे” असे त्याने म्हटले. तो पुढे म्हणतो: “प्रेषित म्हणावयास मी योग्य नाही, कारण मी देवाच्या मंडळीचा छळ केला.” (१ करिंथकर १५:९) पौलाने ख्रिस्ती मंडळीचा खूप छळ केला होता. देवाच्या सेवेत खास जबाबदाऱ्‍या पार पाडणे तर सोडाच पण देवाची उपासना करण्यासही तो पात्र नव्हता. पण पौल कधीही हे विसरला नाही की देवाची अगाध कृपा मिळवण्यास तो पात्र नसूनही देवाने त्याच्यावर कृपा केली. (योहान ६:४४; इफिसकर २:८) जास्त सेवा केल्यामुळे आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत असा पौलाने कधीही विचार केला नाही.—१ करिंथकर ९:१६.

६. करिंथ येथील बांधवांशी वागताना पौलाने कशाप्रकारे नम्रता दाखवली?

करिंथ येथील बांधवांसोबत व्यवहार करताना पौलाची नम्रता दिसून येते. करिंथ येथील बांधवांना मंडळीत पुढाकार घेणाऱ्‍या काही बांधवांवर, उदाहरणार्थ अपुल्लोस, केफा यांच्यावर आणि पौलावरही खूप प्रेम होते. (१ करिंथकर १:११-१५) पण पौलाने कधीही त्यांच्या प्रेमाचा, आदराचा व प्रशंसेचा गैरफायदा घेतला नाही. त्याने आपल्या ‘वक्‍तृत्वाचा अथवा ज्ञानाचा’ त्यांच्यापुढे दिखावा केला नाही. उलट त्याने स्वतःबद्दल आणि आपल्या साथीदारांबद्दल असे म्हटले: “आम्ही ख्रिस्ताचे सेवक व देवाच्या रहस्यांचे कारभारी आहो असे प्रत्येकाने आम्हाला मानावे.” *१ करिंथकर २:१-५; ४:१.

७. इतरांना त्यांची चूक लक्षात आणून देतानासुद्धा पौलाने कशाप्रकारे नम्रता दाखवली?

कडक सल्ला देताना देखील पौलाने नम्रता दाखवली. त्याने आपल्या ख्रिस्ती बांधवांवर प्रेषितपण गाजवले नाही तर ‘देवाच्या करूणेची’ त्यांना आठवण करून दिली आणि त्यांना “प्रीतीस्तव विनंती” केली. (रोमकर १२:१, २; फिलेमोन ८, ९) त्याने असे का केले? कारण तो स्वतःला आपल्या बांधवांच्या “विश्‍वासावर सत्ता” चालवणारा नव्हे तर त्यांचा ‘साहाय्यकारी’ समजत होता. (२ करिंथकर १:२४) पौलाच्या नम्र स्वभावामुळेच पहिल्या शतकातील ख्रिस्ती लोकांचे पौलावर खूप प्रेम होते.—प्रेषितांची कृत्ये २०:३६-३८.

आपल्या अधिकारांबद्दल नम्रतेचा दृष्टिकोन

८, ९. (अ) आपण स्वतःविषयी नेहमी नम्र दृष्टिकोन का ठेवला पाहिजे? (ब) ज्यांना अधिकार सोपवला जातो ते कशाप्रकारे नम्रतेने वागू शकतात?

पौलाने आजच्या ख्रिस्ती लोकांकरता फार चांगला आदर्श मांडला. आपल्याला कोणतेही अधिकार देण्यात येवोत किंवा कोणत्याही खास जबाबदाऱ्‍या आपल्यावर सोपवल्या जावोत, पण इतरांपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत असे आपण कधीही समजू नये. पौलाने म्हटले होते, की “आपण कोणी नसता कोणी तरी आहो अशी कल्पना करणारा स्वतःला फसवितो.” (गलतीकर ६:३) का? कारण “सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत.” (तिरपे वळण आमचे.) (रोमकर ३:२३; ५:१२) आदामामुळे आपण पापी बनलो आणि मृत्यूचे गुलाम झालो हे आपण कधीही विसरू नये. केवळ काही खास जबाबदाऱ्‍या मिळाल्यामुळे आपली उपजत पापपूर्ण दशा बदलत नाही. (उपदेशक ९:२) पौलाप्रमाणेच आपणही पात्र नसताना देवाने आपल्यावर अगाध कृपा केली. अन्यथा, खास जबाबदाऱ्‍या पार पाडणे तर सोडाच पण यहोवाची उपासना करण्याची देखील आपली पात्रता नव्हती.—रोमकर ३:१२, २४.

नम्र व्यक्‍ती स्वतःला मिळालेल्या अधिकारांमुळे आपण कोणीतरी आहोत असे कधीही समजत नाही किंवा आपण साध्य केलेल्या गोष्टींबद्दल कधीही फुशारकी मारत नाही. (१ करिंथकर ४:७) कोणाला सल्ला देताना ती एखाद्या अधिकाऱ्‍याप्रमाणे नव्हे, तर सहकर्म्याप्रमाणे बोलते. आपल्याला एखादे काम चांगले करता येते म्हणून बांधवांकडून नेहमी प्रशंसेची अपेक्षा करणे किंवा त्यांच्या प्रशंसेचा गैरफायदा घेणे नक्कीच चुकीचे आहे. (नीतिसूत्रे २५:२७; मत्तय ६:२-४) खरी प्रशंसा केवळ तीच असते जी इतरांकडून, आणि तीसुद्धा न मागता केली जाते. बांधवांनी आपली प्रशंसा केली तरीसुद्धा यामुळे आपण कधीही गर्वाने फुगू नये.—नीतिसूत्रे २७:२; रोमकर १२:३.

१०. काहीजण काही न बोलताही आपण “विश्‍वासात धनवान” आहोत हे कसे दाखवून देतात?

१० आपण अनेक जबाबदाऱ्‍या सांभाळत असलो तरी आपण सर्वांशी नम्रपणे वागले पाहिजे. स्वतःकडे इतरांचे लक्ष वेधण्याचा आपण कधीही प्रयत्न करू नये. केवळ आपल्या प्रयत्नांमुळेच किंवा चांगल्या गुणांमुळेच मंडळीचा कारभार चालला आहे असे आपण कधीही भासवू नये. उदाहरणार्थ, मंडळीत अतिशय सुंदर भाषणे देण्याची कला आपल्याजवळ असेल. (इफिसकर ४:११, १२) पण आपल्या या गुणाबद्दल आपण कधीही घमेंड करू नये. कारण मंडळीत केवळ भाषणांतूनच आपल्याला शिकायला मिळते असे नाही. मंडळीतले बरेच जण काही न बोलताही बरेच काही शिकवतात. उदाहरणार्थ, एकट्याने कुटुंब चालवणारा एखादा भाऊ किंवा बहीण नियमितपणे आपल्या मुलांना राज्य सभागृहात घेऊन येताना तुम्ही पाहता तेव्हा तुम्हाला आपोआपच उत्तेजन मिळत नाही का? किंवा खिन्‍नपणाच्या अथवा कमीपणाच्या भावनांशी झुंजणारा एखादा भाऊ किंवा बहीण नियमित सभांना येतो किंवा येते हे पाहून तुम्हाला त्यांचे कौतुक वाटत नाही का? किंवा शाळेत आणि इतर ठिकाणी वाईट मुलांच्या संगतीत राहावे लागत असूनही सातत्याने आध्यात्मिक प्रगती करत असलेल्या तरुणाला पाहून तुम्हाला आनंद होत नाही का? (स्तोत्र ८४:१०) या सर्वांकडे कदाचित मंडळीत कोणाचे लक्षही जात नसेल. त्यांना ज्या कठीण परीक्षांना तोंड द्यावे लागते त्यांविषयी कदाचित कोणाला जाणीवही नसेल. पण तरीही हे लोक मंडळीत प्रमुख जबाबदाऱ्‍या हाताळणाऱ्‍यां इतकेच “विश्‍वासासंबंधाने धनवान” आहेत. (याकोब २:५) शेवटी काही झाले तरी, यहोवाच्या नजरेत व्यक्‍तीचा विश्‍वासूपणाच महत्त्वाचा आहे.—मत्तय १०:२२; १ करिंथकर ४:२.

स्वतःला “अगदी कनिष्ठ” म्हणवणारा गिदोन

११. देवदूताशी बोलताना गिदोनाने कशाप्रकारे नम्रता दाखवली?

११ गिदोन हा मनश्‍शेच्या वंशातील एक उमदा तरुण होता. त्याच्या हयातीत इस्राएल राष्ट्रात बरीच उलथापालथ चालली होती. मिद्यानी लोक देवाच्या लोकांना सात वर्षांपासून छळत होते. पण आता एका देवदूताने येऊन गिदोनाला म्हटले: “हे बलवान वीरा, परमेश्‍वर तुझ्याबरोबर आहे.” गिदोनाला ही प्रशंसा अपेक्षित नव्हती. पण ही प्रशंसा ऐकून तो गर्वाने फुगला नाही. त्याने देवदूताला आदरपूर्वक विचारले: “महाराज, परमेश्‍वर आमच्याबरोबर आहे तर हे सर्व आमच्यावर का यावे?” देवदूताने गिदोनाला समजावून सांगितले की “तू इस्राएलाला मिद्यानाच्या हातून सोडीव.” तेव्हा गिदोनाची प्रतिक्रिया कशी होती? सबंध राष्ट्रासमोर आपले नाव होईल या लालसेने गिदोनाने लगेच हे काम स्वीकारले का? नाही, उलट गिदोनाने उत्तर दिले: “प्रभो, इस्राएललाला मी कसा सोडविणार? माझे कुळ मनश्‍शे वंशात सर्वात दरिद्री आहे; तसाच मी आपल्या वडिलाच्या घराण्यात अगदी कनिष्ठ आहे.” गिदोनाने दाखवलेली नम्रता खरोखर वाखाणण्याजोगी नाही का?—शास्ते ६:११-१५.

१२. आपल्याला नेमलेले कार्य पार पाडताना गिदोनाने कशाप्रकारे विचारशीलता दाखवली?

१२ गिदोनाला युद्धाला पाठवण्याआधी यहोवाने त्याची परीक्षा घेतली. कशी? गिदोनाचा पिता बआल देवताचा उपासक होता. गिदोनाला सांगण्यात आले, की त्याच्या वडिलाने बांधलेली बआलची वेदी त्याने नष्ट करावी आणि वेदीपाशी असलेली मूर्ती पाडावी. हे काम करण्यासाठी धैर्याची आवश्‍यकता होती. पण गिदोनाने हे काम देखील नम्रतेने आणि विचारपूर्वक केले. गाजावाजा करून सर्वांचे लक्ष स्वतःकडे आकर्षित करण्याऐवजी गिदोनाने कोणाला दिसणारही नाही अशा वेळी म्हणजे रात्री, अंधारात हे काम केले. त्याने स्वतःसोबत दहा जणांना घेतले. त्यांपैकी काहींना त्याने पहारा देण्याकरता सांगितले, तर काहींना सोबत घेऊन त्याने वेदी आणि मूर्ती तोडली. * यहोवाच्या आशीर्वादाने गिदोनाने आपले काम यशस्वीपणे पार पाडले. कालांतराने देवाने गिदोनाच्याच हातून इस्राएली लोकांना मिद्यानी लोकांपासून सोडवले.—शास्ते ६:२५-२७.

नम्रता आणि विचारशीलता

१३, १४. (अ) आपल्याला एखादी खास जबाबदारी दिली जाते तेव्हा आपण नम्रता कशी दाखवू शकतो? (ब) बंधू ए. एच. मॅकमिलन यांनी नम्रता दाखवण्याच्या बाबतीत आपल्यापुढे कशाप्रकारे एक चांगला आदर्श मांडला?

१३ गिदोनाकडून आपण बरेच काही शिकू शकतो. उदाहरणार्थ, आपल्याला एखादी विशेष जबाबदारी दिली जाते तेव्हा आपण कशी प्रतिक्रिया दाखवतो? हे काम केल्यामुळे आपल्याला लोक मान देऊ लागतील किंवा आपले महत्त्व वाढेल असा विचार लगेच आपल्या मनात येतो का? की आपण हे कार्य चांगल्याप्रकारे करू शकू किंवा नाही असा आपण विचार करतो? याविषयी आपण यहोवाला प्रार्थना करतो का? बंधू ए. एच. मॅकमिलन ज्यांचे १९६६ साली पृथ्वीवरील जीवन समाप्त झाले त्यांच्या जीवनातील एका घटनेवर विचार करा. वॉचटावर संस्थेचे पहिले अध्यक्ष बंधू सी. टी. रस्सल यांनी त्यांच्या अनुपस्थितीत संस्थेचे कार्य कोणी सांभाळावे यासंबंधी बंधू मॅकमिलन यांचे मत विचारले. बंधू मॅकमिलन सहज स्वतःचे नाव सुचवू शकले असते, पण त्यांनी असे केले नाही. नंतर बंधू रस्सल यांनी स्वतःहूनच त्यांना ही नेमणूक देण्याची आपली इच्छा व्यक्‍त केली आणि त्यांना यावर विचार करण्यास सांगितले. या घटनेबद्दल अनेक वर्षांनंतर बंधू मॅकमिलन यांनी असे लिहिले की “बंधू रस्सल यांनी असे म्हटले तेव्हा मी इतका गोंधळलो की मला काही बोलताच येईना. नंतर मी खूप विचार केला, आपल्याला हे कार्य करता येईल का याबद्दल खूप वेळ मी द्विधा मनःस्थितीत होतो. खूप वेळा मी प्रार्थनाही केली आणि शेवटी बंधू रस्सल यांना सांगितले की त्यांना माझ्याकडून होईल ती मदत द्यायला मी तयार आहे.”

१४ याच्या काही काळानंतर बंधू रस्सल यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर वॉचटावर संस्थेचे अध्यक्षपद नवीन व्यक्‍तीवर सोपवण्याची गरज उद्‌भवली. बंधू रस्सल शेवटच्या प्रचार दौऱ्‍यावर गेले असताना बंधू मॅकमिलनच त्यांचे काम पाहात होते; त्यामुळे रस्सल यांच्या मृत्यूनंतर एक बंधू मॅकमिलन यांना म्हणाले: “मॅक, आता अध्यक्षपद बहुधा तुलाच मिळेल. बंधू रस्सल यांच्या अनुपस्थितीत तूच त्यांचे काम पाहात होतास आणि जाताना बंधू रस्सल आम्हाला सांगून गेले होते की बंधू मॅकमिलन सांगतील त्याप्रमाणे करा. आता तर ते कायमचेच गेले, तेव्हा मला वाटतं त्यांचे काम पुढेही पाहण्याकरता तूच अगदी सुयोग्य व्यक्‍ती आहेस.” बंधू मॅकमिलनने या बंधूंना काय उत्तर दिले? ते म्हणाले: “तुमचा या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन चुकीचा आहे. हे प्रभूचे काम आहे आणि प्रभूच्या संस्थेत तो ज्याला योग्य समजेल त्यालाच तो कोणतेही काम देतो. मी या कामासाठी निश्‍चितच योग्य नाही.” नंतर बंधू मॅकमिलन यांनी या पदावर काम करण्यासाठी दुसऱ्‍या एका बांधवाची शिफारस केली. गिदोनाप्रमाणे त्यांनी नम्रता दाखवली. निश्‍चितच आपण सर्वांनी त्यांचे अनुकरण केले पाहिजे.

१५. प्रचार कार्य करताना आपण कशाप्रकारे विचारशीलता दाखवू शकतो?

१५ आपण देखील गिदोनाप्रमाणे आपल्या कामात नम्र आणि विचारी असले पाहिजे. गिदोन विचारशील होता; म्हणूनच त्याच्या शत्रूंना राग येईल अशाप्रकारे तो वागला नाही. प्रचार कार्य करताना आपणही इतरांशी बोलताना नम्र आणि विचारशील असले पाहिजे. आज आपले युद्ध हे ‘तर्कवितर्क व देवविषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेल्या’ गोष्टीविरुद्ध आहे. (२ करिंथकर १०:४, ५) पण आपला संदेश न ऐकणाऱ्‍यांचा आपण अपमान करावा किंवा त्यांना चीड येईल असे काही बोलावे किंवा करावे असा याचा अर्थ होत नाही. उलट आपण त्यांच्या विचारांना मान दिला पाहिजे, त्यांच्या व आपल्या विचारांत कोणत्या समान गोष्टी आहेत त्यांवर जोर देऊन आपल्या संदेशातील आशादायी गोष्टींकडे त्यांचे लक्ष आकर्षित केले पाहिजे.—प्रेषितांची कृत्ये २२:१-३; १ करिंथकर ९:२२; प्रकटीकरण २१:४.

नम्रतेचा अत्युत्तम आदर्श—येशू

१६. येशूला आपल्या मर्यादांची जाणीव होती हे त्याने कशाप्रकारे दाखवले?

१६ नम्रतेचे सर्वात चांगले उदाहरण कोणाचे असेल तर ते आहे येशू ख्रिस्ताचे. * देवाचा परमप्रिय पुत्र असूनही त्याने हे कबूल केले की काही गोष्टी त्याच्या अधिकारात नव्हत्या. (योहान १:१४) उदाहरणार्थ, याकोब व योहानाच्या आईने येशूकडे तिच्या मुलांना त्याच्या राज्यात त्याच्या उजवी व डावीकडे बसवण्याची विनंती केली तेव्हा त्याने म्हटले: “माझ्या उजवीकडे व माझ्या डावीकडे बसण्याचा अधिकार देणे माझ्याकडे नाही.” (मत्तय २०:२०-२३) दुसऱ्‍या प्रसंगी येशूने सर्वांसमोर असे कबूल केले की: “मला स्वतः होऊन काही करिता येत नाही. . . . मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावयाला पाहतो.”—योहान ५:३०; १४:२८; फिलिप्पैकर २:५, ६.

१७. इतरांशी वागताना येशूने कशाप्रकारे नम्रता दाखवली?

१७ अपरिपूर्ण मानवांच्या तुलनेत येशू प्रत्येक बाबतीत श्रेष्ठ होता. त्याच्या पित्याने त्याला सर्वांपेक्षा जास्त अधिकार व सामर्थ्य दिले होते. पण तरीही येशूने आपल्या अनुयायांशी वागताना, बोलताना नम्रता दाखवली. त्यांना त्याच्यासमोर कमीपणा वाटेल अशाप्रकारे तो कधीही वागला नाही; त्याने आपल्या ज्ञानाचा टेंभा मिरवला नाही. त्याने नेहमी शिष्यांच्या भावनांची दखल घेतली, त्यांना सहानुभूती दाखवली आणि त्यांच्या स्वाभाविक गरजांची नेहमी जाणीव ठेवली. (मत्तय १५:३२; २६:४०, ४१; मार्क ६:३१) येशू परिपूर्ण होता पण इतरांकडून त्याने परिपूर्णतेची अपेक्षा केली नाही. त्याच्या शिष्यांकडून त्याने त्यांच्या कुवतीपेक्षा कधीही जास्त कार्य करण्याची अपेक्षा केली नाही. तसेच त्यांना सहन होणार नाही असा कोणताही बोजा त्याने त्यांच्यावर कधी टाकला नाही. (योहान १६:१२) म्हणूनच तर लोकांना त्याची इतकी ओढ होती!—मत्तय ११:२९.

येशूच्या नम्रतेचे अनुकरण करा

१८, १९. (अ) स्वतःविषयी विचार करताना व (ब) इतरांशी वागताना आपण कशाप्रकारे येशूच्या नम्रतेचे अनुकरण करू शकतो?

१८ इतिहासातील सर्वश्रेष्ठ पुरुष असूनही जर येशूने नम्रता दाखवली तर मग आपण कितीतरी जास्त पटीने नम्रता दाखवली पाहिजे! आपल्या अधिकाराला मर्यादा आहेत हे अपरिपूर्ण असल्यामुळे सहसा मनुष्य लगेच मान्य करत नाही. पण खरे ख्रिस्ती येशूप्रमाणे आपल्या सीमा ओळखतात. सर्व अधिकार स्वतःजवळच ठेवण्याचा गर्विष्ठपणा ते दाखवत नाहीत, तर पात्र असणाऱ्‍यांवर ते अधिकार सोपवतात. तसेच ज्यांना अधिकार सोपवण्यात आला आहे त्यांच्याकडून ते नम्रपणे मार्गदर्शन स्वीकारतात. मंडळीला सहयोग देण्यास ते सदैव तयार असतात आणि त्यामुळे “सर्व काही शिस्तवार व व्यवस्थितपणे” होण्यास ते हातभार लावतात.—१ करिंथकर १४:४०.

१९ आपण नम्र असल्यास इतरांकडून आपण कधीही अवास्तव अपेक्षा करणार नाही, तर त्यांच्या गरजांची जाणीव ठेवून त्यांच्याशी वागू. (फिलिप्पैकर ४:५) कदाचित इतरांजवळ नाहीत असे चांगले गुण आपल्याजवळ असतील. पण जर आपण नम्र असू तर इतरांनी नेहमी आपल्या मनाप्रमाणेच वागावे अशी अपेक्षा आपण करणार नाही. प्रत्येक व्यक्‍तीत काही न काही कमतरता असतात हे ओळखून आपण नम्रपणे त्यांच्या चुकांकडे दुर्लक्ष करू. पेत्राने लिहिले: “मुख्यतः एकमेकांवर एकनिष्ठेने प्रीति करा; कारण प्रीति पापांची रास झाकून टाकते.”—१ पेत्र ४:८.

२०. आपल्या व्यक्‍तिमत्त्वात गर्विष्ठपणाची लक्षणे असल्यास आपण त्यांवर कशी मात करू शकतो?

२० नम्र जनांच्या ठायी ज्ञान असते हे या लेखातून स्पष्ट झाले आहे. कदाचित तुम्हाला अशी जाणीव झाली असेल की तुमचा स्वभाव काहीसा गर्विष्ठ आहे किंवा असावी तितकी नम्रता तुमच्यात नाही. असे असल्यास, तुम्ही काय करू शकता? निराश होऊ नका. त्याऐवजी दाविदाप्रमाणे यहोवाला प्रार्थना करा: “धिटाईने केलेल्या पातकांपासून आपल्या सेवकाला आवर; त्यांची सत्ता माझ्यावर न चालो.” (स्तोत्र १९:१३) पौल, गिदोन आणि सर्वात मुख्य म्हणजे येशू ख्रिस्ताच्या विश्‍वासाचे अनुकरण केल्यास “नम्र जनांच्या ठायी ज्ञान असते” या शब्दांची सत्यता तुम्हाला स्वतःच्या बाबतीत अनुभवता येईल.—नीतिसूत्रे ११:२.

[तळटीपा]

^ परि. 6 या ठिकाणी “सेवक” असे भाषांतर केलेला ग्रीक शब्द मोठमोठ्या जहाजांतील तळघरात वल्ही मारणाऱ्‍या गुलामांच्या संदर्भात वापरला जात असे. पण “कारभारी” म्हणून नेमलेल्यांना बऱ्‍याच जबाबदाऱ्‍या सोपवल्या जायच्या, उदाहरणार्थ एखाद्या श्रीमंत माणसाच्या मालमत्तेची देखरेख करणे. पण बऱ्‍याच मालकांच्या नजरेत हे कारभारी देखील जहाजातल्या गुलामांसारखेच होते.

^ परि. 12 गिदोनाने रात्रीच्या अंधारात कार्य केले आणि दहा जणांना सोबत घेतले यावरून तो भित्रा होता असे समजू नये. गिदोनाच्या धैर्याबद्दल इब्री लोकांस ११:३२-३८ या वचनांत सांगितले आहे. या वचनांत ज्यांना “सबळ” व “पराक्रमी” म्हटले आहे त्यांत गिदोनाचाही समावेश आहे.

^ परि. 16 यहोवा नम्र आहे. पण त्याला त्याच्या मर्यादांची जाणीव आहे असे म्हणता येणार नाही कारण तो सर्वसमर्थ आहे, त्याच्या अधिकारात नाही अशी कोणतीच गोष्ट नाही.—स्तोत्र १८:३५.

तुम्हाला आठवते का?

• नम्रता म्हणजे काय?

• पौलाच्या नम्रतेचे आपण कसे अनुकरण करू शकतो?

• गिदोनाच्या उदाहरणावरून आपण काय शिकू शकतो?

• नम्रतेच्या बाबतीत येशूने सर्वोत्तम उदाहरण कसे मांडले?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१५ पानांवरील चित्र]

पौलाच्या नम्रतेमुळे तो बांधवांना प्रिय होता

[१७ पानांवरील चित्र]

देवाची इच्छा पूर्ण करताना गिदोनाने विचारशीलपणा दाखवला

[१८ पानांवरील चित्र]

देवाचा पुत्र येशू सर्व गोष्टींत नम्रता दाखवतो