व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाजवी अपेक्षा का बाळगाव्यात?

वाजवी अपेक्षा का बाळगाव्यात?

वाजवी अपेक्षा का बाळगाव्यात?

आपली स्वप्ने साकारतात आणि आपल्या आकांक्षा पूर्ण होतात तेव्हा आपल्याला खूप समाधान मिळते. अर्थात, नेहमीच आपल्या मनाप्रमाणे होत नसते. जीवनात खूपदा निराशा झाल्यावर मग स्वतःची आणि इतरांचीही चीड येऊ लागते. एका सुज्ञ पुरुषाने असे म्हटले होते: “आशा लांबणीवर पडली असता अंतःकरण कष्टी होते.”—नीतिसूत्रे १३:१२.

कोणकोणत्या कारणांमुळे निराशा होऊ शकते? आपल्या अपेक्षा आपण वाजवी कशा ठेवू शकतो? शिवाय, असे करणे आपल्याच फायद्याचे का आहे?

आशा-निराशा

आजच्या गतिमान जगाच्या बरोबरीने राहायचा आपण जितका प्रयत्न करतो तितकेच मागे पडत जातो. आजकाल वेळ पुरत नाही, श्रम केल्याचाही काही फायदा होत नाही आणि अशा परिस्थितीत हाती घेतलेले काम पूर्ण झाले नाही तर आपण स्वतःलाच दोषी ठरवतो. असेही वाटू लागते की, आपण इतरांची निराशा करत आहोत. सिंथिया एक पत्नी आणि माता आहे. पालकांवर किती दबाव असतो याची तिला चांगली जाणीव आहे. ती म्हणते: “माझ्या मुलांना मी एकसारखी शिस्त लावत नाही किंवा त्यांना योग्य शिक्षण देत नाही असे मला वाटते आणि यामुळे मला स्वतःचाच राग येतो.” स्टेफनी ही किशोरवयीन मुलगी आपल्या शिक्षणाबद्दल म्हणते की, “मला खूप काही करावंसं वाटतं, पण तितका वेळ मिळत नाही. म्हणून कधी कधी असं वाटतं की मला धीरच नाही.”

अवाजवी अपेक्षा बाळगल्यामुळे आपण नकळत स्वतःकडून परिपूर्णतेची अपेक्षा करू लागतो आणि मग हताश होतो. बेन एक विवाहित पुरुष आहे; तो कबूल करतो: “मी माझ्या कार्यांचे, विचारांचे किंवा भावनांचे परीक्षण करतो तेव्हा असं सारखं वाटतं की, यापेक्षाही मी चांगलं करू शकलो असतो. मला कधीच स्वतःच्या गोष्टींबद्दल समाधान वाटत नाही; त्यामुळे मी अधीर, हताश आणि निराश होतो.” गेल ही एक ख्रिस्ती पत्नी आहे, ती म्हणते: “परिपूर्णतेची अपेक्षा करणारे लोक कधीच अपयश स्वीकारत नाहीत. आपणही सारखे उत्तम माता, उत्तम पत्नी होण्याचा प्रयत्न करत असतो. यश मिळाले तरच आपण आनंदी असतो नाहीतर व्यर्थ प्रयत्नांमुळे स्वतःवरच राग काढत राहतो.”

आजारपण आणि उतारवय यामुळेही निराशा होऊ शकते. आपली शक्‍ती नाहीशी होऊ लागते, अंगात बळ उरत नाही तेव्हा आपल्यातले दोष डोळ्यात जास्तच भरू लागतात आणि निराशा होते. “हे आजारपण मागे लागण्याआधी मला सगळं जमत होतं, मी सहज काहीही करू शकत होते. पण आता होत नसल्यामुळे मी स्वतःवरच नाराज होते,” असे एलीझाबेथ म्हणते.

वर दिलेल्या उदाहरणांवरून निराशा कशामुळे होऊ शकते ते दिसून येते. आणि आपल्या विचारसरणीत आपण बदल केला नाही तर या निराशेमुळे इतरांनाही आपली कदर नाही असेच वाटू लागेल. त्यामुळे निराशा कमी करण्यासाठी आणि वाजवी अपेक्षा बाळगण्यासंबंधी आपण काय करू शकतो?

वाजवी अपेक्षा बाळगण्याचे मार्ग

सर्वात आधी, लक्षात ठेवा की यहोवा हा वाजवी आणि आपल्या कमतरता समजून घेणारा देव आहे. स्तोत्र १०३:१४ येथे आपल्याला आठवण करून दिली आहे की, “तो आमची प्रकृति जाणतो; आम्ही केवळ माती आहो हे तो आठवितो.” आपले सामर्थ्य आणि आपल्या मर्यादा यहोवाला ठाऊक असल्यामुळे तो आपल्याकडून जास्त अपेक्षा करत नाही. उलट, आपण “देवासमागमे राहून नम्रभावाने” चालावे अशी तो आपल्याकडून अपेक्षा करतो.—मीखा ६:८.

यहोवाला आपण प्रार्थना करावी असेही तो आपल्याला आर्जवून सांगतो. (रोमकर १२:१२; १ थेस्सलनीकाकर ५:१७) याने काय मदत मिळेल? प्रार्थनेमुळे आपण सरळ विचार करू लागतो. वारंवार प्रार्थना करणे म्हणजे मदतीसाठी याचना करणे—त्यावरून आपली नम्रता दिसून येते. यहोवा आपल्याला त्याचा पवित्र आत्मा देऊन सदोदित मदत करायला तयार असतो. प्रीती, ममता, चांगुलपणा, इंद्रियदमन ही पवित्र आत्म्याची काही फळे आहेत. (लूक ११:१३; गलतीकर ५:२२, २३) प्रार्थनेमुळे चिंता आणि निराशासुद्धा दूर होतात. एलिझाबेथ म्हणते की, प्रार्थनेने “जे सांत्वन मिळते ते इतर कशानेही मिळत नाही.” केव्हनही म्हणतो, “मी समस्येत सापडतो तेव्हा शांत अंतःकरण आणि शांत मन असण्यासाठी प्रार्थना करतो. आणि यहोवा मला नेहमी आधार देतो.” प्रेषित पेत्रालासुद्धा प्रार्थनेचे महत्त्व ठाऊक होते. म्हणूनच तो म्हणाला: “सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा; म्हणजे सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांति तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.” (फिलिप्पैकर ४:६, ७) खरेच, यहोवाशी बोलल्यामुळे स्वतःविषयी आणि इतरांविषयी वाजवी अपेक्षा बाळगायला आपल्याला मदत मिळते.

पण कधी कधी आपल्याला सांत्वनपर शब्दांची फार गरज असते. अशा वेळी योग्य बोल उत्तम ठरतात. आपल्या विश्‍वासातल्या आणि प्रौढ मित्राशी अगर मैत्रिणीशी बोलल्याने आपल्या निराशेचे किंवा चिंतेचे कारण काय आहे याबद्दल आपले मत बदलेल. (नीतिसूत्रे १५:२३; १७:१७; २७:९) निराश होणाऱ्‍या युवकांना दिसून येईल की, पालकांचा सल्ला घेतल्यामुळे त्यांना संतुलित दृष्टिकोन राखायला मदत मिळते. कॅन्डी कबूल करते की, “माझ्या पालकांनी दिलेल्या प्रेमळ सल्ल्यामुळे मी जास्त वाजवी आणि संतुलित बनले आहे; त्याचप्रमाणे, त्यांना मी आवडते असे त्यांनी मला जाणवून दिले आहे.” होय, नीतिसूत्रे १:८, ९ येथे आपल्याला अगदी वेळेवर आठवण करून दिली आहे की, “माझ्या मुला, आपल्या बापाचा बोध ऐक, आपल्या आईची शिस्त सोडू नको; कारण ती तुझ्या शिराला भूषण, व तुझ्या गळ्याला हार अशी आहेत.”

असे म्हटले जाते की, फार मोठ्या आकांक्षा बाळगणाऱ्‍या व्यक्‍तीची नेहमी निराशा होते. हे टाळायचे असेल तर विचारसरणीत सुधार करण्याची आवश्‍यकता आहे. आपण लीन असलो व आपल्या ठायी नम्रता असली अर्थात आपल्या कमतरतांची स्वतःला जाणीव असली तर निश्‍चितच आपल्या अपेक्षा संतुलित आणि वाजवी असतील. रोमकर १२:३ येथे आपल्याला अशी योग्य सूचना दिली आहे की, “आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका.” तसेच, फिलिप्पैकर २:३ मध्येही असे म्हटले आहे की, आपण लीन असावे आणि इतरांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ मानावे.

सुरवातीला उल्लेख केलेली एलिझाबेथ आजारपणामुळे स्वतःवरच फार रागराग करायची. तिला यहोवाप्रमाणे विचार करायला आणि तो आपली सेवा कधीच विसरत नाही हे जाणून सांत्वन प्राप्त करायला वेळ लागला. कॉलिनला आजारपणामुळे चालता फिरता येत नाही. सुरवातीला त्याला असे वाटायचे की, आजारी होण्यापूर्वी तो चांगली सेवा करत होता; आता त्याची सेवा काहीच कामाची नाही. पण त्याने २ करिंथकर ८:१२ यासारख्या वचनांवर मनन केल्यावर त्याला हे विचार डोक्यातून काढून टाकता आले. त्या वचनात असे म्हटले आहे की, “उत्सुकता असली म्हणजे ज्याच्या त्याच्याजवळ जसे असेल तसे ते मान्य होते; नसेल तसे नाही.” (२ करिंथकर ८:१२) कॉलिन म्हणतो, “मला आता जास्त जमत नाही, तरीपण माझ्या परीने मी होता होईल तितके करतो आणि यहोवाला ते स्वीकारणीय आहे.” इब्री लोकांस ६:१० येथे आपल्याला अशी आठवण करून दिली आहे की, “तुमचे कार्य . . . आणि तुम्ही देवावर दाखविलेली प्रीति, ही विसरून जाण्यास तो अन्यायी नाही.”

मग, आपल्या अपेक्षा वाजवी आहेत किंवा नाहीत हे कसे पाहता येईल? स्वतःला विचारा, ‘माझ्या अपेक्षा देवाच्या अपेक्षांसारख्या आहेत का?’ गलतीकर ६:४ म्हणते: “प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या कामाची परीक्षा करावी म्हणजे त्याला दुसऱ्‍यांच्या संबंधाने नव्हे, तर केवळ स्वतःसंबंधाने अभिमान बाळगण्यास जागा मिळेल.” येशू म्हणाला होता: “माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे.” होय, ख्रिस्ती या नात्याने आपल्यावर एक जू आहे, पण ते “सोयीचे” आणि “हलके” आहे. तसेच, आपण हे जू योग्य तऱ्‍हेने उचलायला शिकलो तर त्याने आपल्याला विसावा मिळेल.—मत्तय ११:२८-३०.

वाजवी अपेक्षा फायदेकारक ठरतात

वाजवी अपेक्षा बाळगण्याचा प्रयत्न करून देवाच्या वचनातील सल्ल्याचे आपण पालन करतो तेव्हा आपल्याला त्याचा तत्काळ आणि कायमस्वरूपी फायदा होतो. याचा आपल्या प्रकृतीवर चांगला परिणाम घडतो. यहोवाने दिलेल्या सूचनांपासून फायदा मिळालेली जेनीफर म्हणते की: “आता माझ्यात जास्त बळ आणि आवेश आहे.” उचितपणे, नीतिसूत्रे ४:२१, २२ येथे यहोवाचा सल्ला डोळ्यांपुढे आणि अंतःकरणात ठेवायला सांगितले आहे “कारण ती ज्यांस लाभतात, त्यांस ती जीवन देतात आणि त्यांच्या सबंध देहाला आरोग्य देतात.”

आणखी एक फायदा म्हणजे मानसिक आणि भावनिक शांती. ट्रेसा म्हणते, “देवाच्या वचनाकडे मी माझे मन आणि माझे अंतःकरण लावते तेव्हा मी आनंदी व्यक्‍ती आहे असे मला वाटते.” जीवनात अनेकदा आपली निराशा होणार हे तर ठरलेलेच आहे. पण निदान त्यांचा सामना करायची ताकद आपल्याला मिळेल. “देवाजवळ या म्हणजे तो तुम्हांजवळ येईल,” असे याकोब ४:८ येथे म्हटले आहे. जीवनातल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आपल्याला मजबूत करण्याचे आणि आपल्याला शांती देण्याचे वचनही यहोवाने दिले आहे.—स्तोत्र २९:११.

वाजवी अपेक्षा बाळगल्या तर आध्यात्मिकतेत स्थिर राहायला आपल्याला मदत मिळते. हासुद्धा एक आशीर्वादच आहे. जीवनातल्या अधिक महत्त्वाच्या गोष्टींवर आपण लक्ष केंद्रित करू शकतो. (फिलिप्पैकर १:१०) मग आपली ध्येयेसुद्धा वास्तविक आणि साधण्याजोगी असतात; त्यामुळे आपल्याला आणखी जास्त आनंद आणि समाधान मिळते. आणि यहोवावर जास्त विसंबून राहायला आपण तयार होतो कारण तोच आपले भले करतो हे आपल्याला ठाऊक असते. पेत्र म्हणाला: “देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, ह्‍यासाठी की, त्याने योग्य वेळी तुम्हांस उंच करावे.” (१ पेत्र ५:६) यहोवाने आपल्याला सन्मानित करावे यापेक्षा आणखी चांगली गोष्ट काय असेल?

[३१ पानांवरील चित्रे]

वाजवी अपेक्षा बाळगल्याने आपण हताश किंवा निराश होणार नाही