व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

हत्यारांची निर्मिती करण्यापासून जीवनरक्षक बनण्यापर्यंतचा प्रवास

हत्यारांची निर्मिती करण्यापासून जीवनरक्षक बनण्यापर्यंतचा प्रवास

जीवन कथा

हत्यारांची निर्मिती करण्यापासून जीवनरक्षक बनण्यापर्यंतचा प्रवास

इसीदोरस इस्माइलीदीस यांच्याद्वारे कथित

मी गुडघ्यांवर टेकून कळकळीने प्रार्थना केली. डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. देवाला म्हणालो, “देवा, मी हत्यार निर्मितीचे काम करतोय तर माझं मन मला खातंय. मी दुसरी नोकरी शोधायचा खूप प्रयत्न केलाय, पण काही झालं नाही. उद्या मी राजीनामा लिहून देतोय. यहोवा, माझ्या चार मुलांना उपाशी मारू नकोस.” पण ही पाळी माझ्यावर आली कशी?

उत्तर ग्रीसमधील ड्रामा येथे माझा जन्म १९३२ साली झाला. पुढे काय करावे त्याविषयी बाबा नेहमी माझ्याशी बोलायचे. मी अमेरिकेला जाऊन पुढचे शिक्षण घ्यावे अशी त्यांची फार इच्छा होती. दुसऱ्‍या महायुद्धाच्या दरम्यान ग्रीसमध्ये लुटालूट झाल्यावर ग्रीक लोक असे म्हणू लागले की, “आमची संपत्ती तुम्ही लुटू शकता पण आमचे विचार मात्र तुम्हाला लुटता येणार नाही.” मग मीसुद्धा निश्‍चय केला की, असे उच्च शिक्षण आणि उच्च स्थान मिळवेन की ते कोणालाही चोरता येणार नाही.

लहानपणापासूनच, ग्रीक कर्मठवादी चर्चच्या अनेक युथ ग्रुप्सचा (तरुण मंडळ) मी सदस्य होतो. तेथे आम्हाला हानीकारक पंथांपासून सावध राहायला सांगितले जायचे. मला यहोवाच्या साक्षीदारांचा उल्लेख केल्याचे अगदी स्पष्ट आठवते, कारण ते ख्रिस्तविरोधी लोक होते असे सांगितले जायचे.

एथेन्स येथे १९५३ साली एका तांत्रिक प्रशालेतून पदवीधर झाल्यावर मी जर्मनीला गेलो. मला नोकरी करता करता अभ्यासही करायचा होता. पण तेथे काही जमले नाही म्हणून मग मी वेगवेगळ्या देशांमध्ये गेलो. काही आठवड्यांनंतर, मी बेल्जियममधील एका बंदरावर आलो. हातात एक पैसाही नव्हता. त्या वेळी मला आठवतं, मी एका चर्चमध्ये गेलो, तेथे बसून खूप रडलो. इतका रडलो की डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. मी देवाला प्रार्थना करून म्हटले की, मला अमेरिकेला जायला मदत केली तर, मी पैशांच्या मागे लागणार नाही; फक्‍त माझे शिक्षण पूर्ण करीन आणि एक उत्तम ख्रिस्ती आणि उत्तम नागरिक होईन. शेवटी १९५७ मध्ये मला अमेरिकेला जायला मिळाले.

अमेरिकेतील नवीन जीवन

माझ्यासारख्या नवख्या व्यक्‍तीला अमेरिकेत राहणे फार मुश्‍किल होते. कारण एकतर परका देश आणि त्यावर परकी भाषा. शिवाय, हातात एक दमडी नव्हती. मी रात्री दोन नोकऱ्‍या करायचो आणि दिवसा शाळा शिकायचो. फार त्रास काढला. महाविद्यालयातून डिप्लोमा घेतला. नंतर असोसिएट डिग्री मिळवली. त्यानंतर, लॉस एंजेलीस येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात प्रवेश घेतला आणि तेथे एप्लाइड फिजिक्स या विषयात बॅचलर ऑफ सायन्स डिग्री प्राप्त केली. माझ्या वडिलांनी जे म्हटले होते त्यामुळेच मी इतके कष्ट घेऊन खरे तर शिक्षण पूर्ण करू शकलो.

तोपर्यंत, एका सुंदर ग्रीक मुलीशी माझी गाठ पडली होती. तिचे नाव होते एकातरीनी. १९६४ साली आम्ही लग्न केले. तीन वर्षांनी आम्हाला मुलगा झाला. त्यानंतरच्या चार वर्षांमध्ये आम्हाला आणखी दोन मुले आणि एक मुलगी झाली. कुटुंबाची देखभाल, पुन्हा शिक्षण हे सगळे जमवणे फार कठीण होते.

मी कॅलिफोर्नियाच्या सन्‍नीव्हेल येथील क्षेपणास्त्र आणि अंतरिक्ष कंपनीत यु.एस. एअर फोर्ससाठी काम करत होतो. अनेक वायु-अंतरिक्ष प्रकल्पांवर मी काम करत होतो; त्यात एजिना आणि अपोलो या कार्यक्रमांचाही समावेश होता. अपोलो ८ आणि अपोलो ११ कार्यांच्या संदर्भात माझ्या कामगिरीबद्दल मला मेडल देखील मिळाले. त्यानंतर, मी पुढे आणखी शिक्षण घेत राहिलो आणि पुष्कळशा अंतरिक्ष लष्करी प्रकल्पांमध्ये व्यस्त राहिलो. त्या वेळी मला वाटले होते की, माझ्याकडे काय नाही? एक सुंदर बायको आहे, चार गोड मुले आहेत, प्रतिष्ठेची नोकरी आहे, छानसे घर आहे. मला आणखी कशाचीही गरज नाही असे वाटले होते.

प्रयत्नशील व्यक्‍ती

कामाच्या ठिकाणी १९६७ साली, माझी भेट जिम नावाच्या एका व्यक्‍तीशी झाली. जिम फार प्रामाणिक आणि चांगला होता. तो कधीच दुःखी नसायचा, नेहमी आनंदी असायचा. मी त्याला कॉफीसाठी बोलवले तर तो कधीच नाही म्हणायचा नाही. आणि त्या वेळी तो मला बायबलबद्दलची माहिती सांगायचा. यहोवाच्या साक्षीदारांसोबत त्याचा अभ्यास चाललाय असे त्याने मला सांगितले होते.

पण जिम त्या लोकांशी संपर्क ठेवतो हे ऐकून मला धक्काच बसला होता. मी विचार करायचो की, इतका चांगला मनुष्य त्या ख्रिस्तविरोधी गटाशी कसा काय संबंध ठेवू लागलाय? पण जिम मनाचा फार चांगला मनुष्य होता म्हणून मी त्याच्याशी संबंध तोडू शकलो नाही. दररोज तो माझ्यासाठी काही ना काही वाचायला आणायचा. एकदा तो माझ्या ऑफिसात आला आणि म्हणाला: “अरे, इसीदोरस, या वॉचटावरच्या लेखात की नाही, कुटुंबात प्रेम कसं वाढवायचं त्याबद्दल सांगितलंय. घरी घेऊन जा आणि तुझ्या पत्नीसोबत ते वाच.” मी हो म्हणालो, मग शौचालयात जाऊन ते मासिक फाडून तेथेच कचरा पेटीत टाकून आलो.

तीन वर्षांपर्यंत मी असेच करत होतो. जिमने मला काही वाचायला दिले की मी गुपचुप ते फाडून फेकून द्यायचो. यहोवाच्या साक्षीदारांबद्दल माझ्या मनात नफरत होती. पण जिमलाही मला दुखवायचे नव्हते. म्हणून तो सांगेल ते एका कानाने ऐकायचे आणि दुसऱ्‍या कानाने सोडून द्यायचे असे मी ठरवले होते.

पण त्याच्यासोबत चर्चा करून मला असे जाणवू लागले की, मी मानत असलेल्या आणि पाळत असलेल्या अनेक गोष्टी बायबलनुसार नाहीत. त्रैक्य, नरकाग्नी आणि अमर आत्मा या शिकवणी खरे तर बायबल अनुसार नाहीत. (उपदेशक ९:१०; यहेज्केल १८:४; योहान २०:१७) ग्रीक कर्मठवादी असल्याचा मला गर्व होता, म्हणून जिमचे म्हणणे बरोबर आहे असे मला बोलून दाखवायला होईना. पण जिम नेहमी बायबलमधूनच माझ्याशी बोलायचा, त्याने कधीच स्वतःचे मत पुढे केले नाही. त्यामुळे मला असे जाणवले की या व्यक्‍तीकडे खरोखर माझ्याकरता बायबलमधील एक मूल्यवान संदेश आहे.

काही दिवसांनी माझ्या पत्नीला शंका आली. तिने मला शेवटी विचारले की, यहोवाच्या साक्षीदारांशी संबंध ठेवणाऱ्‍या त्या व्यक्‍तीशी तुम्ही बोलता का हो? मी हो म्हटल्यावर, ती म्हणाली, “हे बघा, आपण दुसऱ्‍या कोणत्याही चर्चला जाऊ या, पण यहोवाच्या साक्षीदारांकडे नको.” पण काही काळानंतर, मी, माझी पत्नी आणि आमची मुलेसुद्धा नियमितपणे साक्षीदारांच्या सभांना जाऊ लागलो.

कठीण निर्णय

बायबलचा अभ्यास करतेवेळी यशया संदेष्ट्याचे हे शब्द मी एकदा वाचले: “ते आपल्या तरवारी मोडून त्यांचे फाळ करितील, आपल्या भाल्याच्या कोयत्या करितील; यापुढे एक राष्ट्र दुसऱ्‍या राष्ट्रावर तरवार उचलणार नाही; ते इतःपर युद्धकला शिकणार नाहीत.” (यशया २:४) मी स्वतःलाच प्रश्‍न केला: ‘एका शांतिप्रिय देवाचा भक्‍त विनाशकारक हत्यारांची रचना आणि निर्मिती कशी काय करू शकतो?’ (स्तोत्र ४६:९) मला तेव्हाच लक्षात आले की, ही नोकरी करून चालणार नाही.

पण हे एक आव्हानच होते. माझी ही नोकरी फार प्रतिष्ठेची होती; येथपर्यंत पोहंचायला मी किती त्रास काढला, किती शिक्षण घेतले हे मलाच ठाऊक. इतक्या वरपर्यंत येऊन पोहंचल्यावर आता सगळेकाही सोडायची पाळी आली होती. पण तरीही, यहोवाबद्दल गाढ प्रेम आणि त्याच्या मर्जीनुसार करण्याची मनापासून इच्छा असल्यामुळे शेवटी मी हे करू शकलो.—मत्तय ७:२१.

वॉशिंग्टन येथील सिएटलमधील एका कंपनीत काम करायचे मी ठरवले. पण, ते काम तर यशया २:४ येथील शब्दांच्या आणखीनच विरोधात होते. आपण फक्‍त वेगळे प्रकल्प हाती घ्यायचे आणि बायबलच्या तत्त्वांनुसार नसलेले काम करायचेच नाही असा मी खूप प्रयत्न केला पण काही जमले नाही. मग पुन्हा माझे मन मला बोचत राहिले. मला स्पष्टपणे दिसून आले की, ही नोकरी केली तर माझे मन मला सतत खात राहील.—१ पेत्र ३:२१.

निश्‍चितच मला मोठा बदल करावा लागणार होता. सहा महिन्यांच्या आत आम्ही आमचे राहणीमान बदलले, आमचा खर्च निम्म्यावर आणला. आमचा मोठा, आलिशान बंगला विकून कोलोरॅडोत डेन्व्हर येथे एक लहानसे घर घेतले. आणि शेवटी माझी नोकरी सोडून द्यायला मी तयार झालो. माझा राजीनामा टाईप करून त्यामध्ये माझ्या विवेकानुसार मला हे काम करता येणार नाही असे मी सांगितले. त्याच रात्री आमची मुले झोपी गेल्यावर, माझी पत्नी आणि मी गुडघ्यांवर टेकून यहोवाला कळकळून प्रार्थना केली. याच प्रार्थनेचा उल्लेख या लेखाच्या सुरवातीला केला आहे.

एका महिन्याच्या आत आम्ही डेन्व्हरला राहायला गेलो आणि दोन आठवड्यांनंतर म्हणजे जुलै १९७५ साली आम्ही दोघांनी बाप्तिस्मा घेतला. सहा महिन्यांपर्यंत मला कोठेच नोकरी मिळाली नाही; आमचा जमवलेला पैसा हळूहळू संपत होता. सातव्या महिन्यात तर आमचे बँकेतले पैसे महिन्याला आम्ही घरासाठी देत असलेल्या हफ्त्यापेक्षाही कमी होते. कोणतीही नोकरी मिळाली तरी चालेल असा विचार करून मी नोकरी शोधू लागलो. आणि लगेच मला इंजिनियरचे काम मिळाले. मी आधी कमवायचो त्यापेक्षा मला चक्क निम्मा पगार मिळत होता; तरीपण यहोवाने मला माझ्या अपेक्षेपेक्षा जास्तच दिले होते. आध्यात्मिक गोष्टींना प्राधान्य दिल्याचा मला जास्त आनंद झाला होता.—मत्तय ६:३३.

यहोवावर प्रेम करणाऱ्‍या मुलांचे संगोपन करणे

एकातरीनी आणि मी, देवाच्या तत्त्वांनुसार आमच्या चार मुलांचे संगोपन करायचा प्रयत्न करत होतो. पण आनंदाची गोष्ट म्हणजे, यहोवाच्या आशीर्वादाने आमच्या सर्व मुलांनी राज्य प्रचाराच्या महत्त्वपूर्ण कार्यासाठी आपले जीवन वाहिले; ते प्रौढ ख्रिस्ती बनले आहेत. आमच्या तिन्ही मुलांनी, अर्थात, ख्रिस्टोस, लाकीस आणि ग्रेगरी यांनी सेवा-सेवक प्रशिक्षण प्रशाळा पूर्ण केलीय आणि आज ते वेगवेगळ्या ठिकाणी सेवा करून तेथील मंडळ्यांना भेटी देत आहेत व त्यांना मजबूत करत आहेत. आमची मुलगी त्युला ही न्यूयॉर्कच्या यहोवाच्या साक्षीदारांच्या मुख्यालयांमध्ये स्वयंसेविका म्हणून काम करत आहे. आमच्या सर्व मुलांनी जेव्हा यहोवाची सेवा करण्यासाठी स्वतःचे कॅरिअर आणि मोठ्या पगाराच्या नोकऱ्‍या सोडून दिल्या तेव्हा आम्हाला त्याचे फार कौतुक वाटले.

आमच्या मुलांचे आम्ही इतक्या चांगल्याप्रकारे संगोपन कसे केले असे आम्हाला पुष्कळांनी विचारले आहे. अर्थात, मुलांचे संगोपन करण्याचा कोणताही निश्‍चित फॉर्म्युला नाही, पण एक गोष्ट मात्र आम्ही केली. आम्ही त्यांच्या मनात यहोवाबद्दल आणि शेजाऱ्‍यांबद्दल प्रेम निर्माण केले. (अनुवाद ६:६, ७; मत्तय २२:३७-३९) आमच्या मुलांनी एक गोष्ट शिकली आहे; ती म्हणजे, आपण यहोवावर प्रेम करत असलो तर फक्‍त बोलून दाखवणे पुरेसे नाही तर ते प्रेम आपल्या कार्यातून प्रकट केले पाहिजे.

आठवड्यातल्या एका दिवशी, बहुधा शनिवारच्या दिवशी आम्ही सगळेजण मिळून सेवाकार्याला जायचो. सोमवारच्या दिवशी रात्रीच्या जेवणानंतर आम्ही नियमितपणे सगळे मिळून बायबलचा अभ्यास करायचो. त्याचप्रमाणे, प्रत्येक मुलाबरोबरही आम्ही वेगळा अभ्यास करायचो. आमची मुले लहान होती तेव्हा आम्ही थोड्याच वेळासाठी परंतु आठवड्यातून अनेकदा अभ्यास करायचो. आणि मुले मोठी झाल्यावर आठवड्यातून एकदा जरा जास्त वेळ बसून अभ्यास करायचो. या अभ्यासांच्या वेळी, आमची मुले अगदी मनमोकळेपणाने त्यांच्या सर्व समस्या आम्हाला सांगायचे.

आम्ही सगळे मिळून मनोरंजनही करत असू. आम्हा सगळ्यांना वाद्य वाजवायला फार आवडायचे आणि मग प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या आवडीचे गाणे वाद्यावर वाजवायचा. काही वेळा, शनिवार-रविवारच्या दिवशी आम्ही इतर कुटुंबांना घरी बोलवायचो. आम्ही सगळे मिळून बाहेर सुटीसाठीही जात असू. एकदा असेच सुटीवर असताना आम्ही कोलोरॅडोत डोंगर चढायला गेलो आणि तिथल्या मंडळ्यांसोबत क्षेत्र सेवा केली. आमची मुले लहान असताना प्रांतीय अधिवेशनांमध्ये वेगवेगळ्या विभागांमध्ये काम करायचे आणि त्यांनी निरनिराळ्या ठिकाणी राज्य सभागृहांचे बांधकाम करायला मदत केली होती. हे सगळे त्यांना अजूनही आठवते. ग्रीसला आम्ही सगळेजण आमच्या नातेवाईकांना भेटायला गेलो तेव्हा तेथे विश्‍वासासाठी तुरुंगवास भोगणाऱ्‍या अनेक साक्षीदारांनासुद्धा त्यांना भेटता आले. आणि याचा त्यांच्या मनांवर खोल परिणाम झाला; त्या सगळ्यांनी, सत्यासाठी कोणत्याही परिस्थितीत खंबीर आणि धैर्यवान राहायचा निश्‍चय केला.

आमच्या मुलांनी चुका केल्या नाहीत असे नाही; त्यांनी पुष्कळ चुका केल्या किंवा चुकीच्या लोकांसोबत मैत्री केली. आणि काहीवेळा आमच्या दोघांमुळेही त्यांना त्रास झाला; आम्ही त्यांच्यावर कधी कधी जास्त बंधने घालायचो. पण बायबलमध्ये दिलेले ‘प्रभूचे शिक्षण’ स्वीकारल्याने आम्हाला आमच्या समस्या सोडवता आल्या.—इफिसकर ६:४; २ तीमथ्य ३:१६, १७.

माझ्या जीवनात सर्वात आनंदाचा क्षण

आमची सगळी मुले पूर्ण-वेळेच्या सेवेत गेल्यावर, आम्ही दोघेसुद्धा जीवन वाचवण्याच्या कार्यात जास्त सहभाग कसा घेतला जाऊ शकतो त्याबद्दल विचार करू लागलो. १९९४ साली मी निवृत्त झाल्यावर आम्ही दोघेही सामान्य पायनियर बनलो. आमच्या सेवेत आम्ही कॉलेज आणि विद्यापीठांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना साक्ष देतो. आणि काहींच्यासोबत बायबल अभ्याससुद्धा चालवतो. काही वर्षांआधीच मीसुद्धा त्यांच्यासारखाच होतो. म्हणून मी त्यांची परिस्थिती समजून घेऊ शकतो. त्यामुळे मी पुष्कळांना यहोवाविषयी शिकवू शकलो आहे. इथियोपिया, ईजिप्त, चिली, चीन, टर्की, थायलंड, बोलिव्हिया, ब्राझील आणि मेक्सिको येथून आलेल्या वेगवेगळ्या विद्यार्थ्यांशी अभ्यास करणे हा छान अनुभव आहे. मला टेलिफोनवरून लोकांना साक्ष द्यायलाही फार आवडते. त्यातल्या त्यात माझी भाषा बोलणाऱ्‍या व्यक्‍तीशी बोलायला तर आणखीनच आवडते.

भाषेच्या समस्येमुळे आणि आता म्हातारपण येऊ लागल्यामुळे मी जास्त काही करू शकत नाही. तरीपण, मी होईल तितके करायचा प्रयत्न करतो आणि यशयासारखी मनोवृत्ती बाळगण्याचा प्रयत्न करतो ज्याने म्हटले, “हा मी आहे, मला पाठीव.” (यशया ६:८) आमच्यासोबत अभ्यास करणाऱ्‍या सहापेक्षा अधिक लोकांनी यहोवाला आपले जीवन समर्पित केले आहे; त्यांना अशाप्रकारे मदत करण्याची आम्हाला सुसंधी मिळाली होती. आमच्या आयुष्यातले हे सर्वात आनंदाचे क्षण आहेत.

एके काळी, माझ्या जीवनात मनुष्यांना ठार मारणारी विनाशकारी हत्यारे बनवण्याशिवाय दुसरे ध्येय नव्हते. ही यहोवाची कृपाच म्हणायची की त्याने मला आणि माझ्या कुटुंबाला त्याचे समर्पित सेवक व्हायला अनुमती दिली आणि परादीसमय पृथ्वीवरील सार्वकालिक जीवनाची सुवार्ता इतरांना ऐकवण्याची सुसंधी आम्हाला दिली. माझ्या जीवनात मी घेतलेल्या कठीण निर्णयांविषयी विचार केला की मला मलाखी ३:१० मधील शब्द आठवतात; तेथे म्हटले आहे: “मी आकाशकपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुम्हाकरिता वर्षितो की नाही याविषयी माझी प्रतीति पाहा.” आमच्याबाबतीत त्याने असेच केले आहे—अगदी आमचे मन भरेपर्यंत!

[२७ पानांवरील चौकट/चित्र]

लाकीस: माझ्या वडिलांना ढोंगीपणा बिलकुल आवडत नाही. त्यांनी ढोंग करायचा कधीही प्रयत्न केला नाही; विशेषकरून कुटुंबासमोर चांगले उदाहरण राखण्याचा त्यांनी खरोखर प्रयत्न केला. ते नेहमी म्हणायचे: “यहोवाला जीवन समर्पित करण्यात खरा अर्थ आहे. यहोवासाठी तुम्ही त्याग करायला तयार असले पाहिजे. यालाच खरा ख्रिस्ती म्हणतात.” हे शब्द मी कधीही विसरणार नाही. या शब्दांमुळेच यहोवासाठी कशाचाही त्याग करण्यामध्ये मी त्यांचे अनुकरण करू शकलो आहे.

[२७ पानांवरील चौकट/चित्र]

ख्रिस्टोस: माझे आईवडिल यहोवाला निष्ठावान राहिले आहेत आणि पालक या नात्याने त्यांनी आपली जबाबदारी निभावली आहे याचे मला फार कौतुक वाटते. आम्ही जे काही केले—अगदी सेवाकार्यापासून सुटीवर जाण्यापर्यंत—ते सगळे एकत्र मिळूनच केले. माझे आईवडिल अधिक काही करू शकले असते, पण त्यांनी साधेसुधे राहणीमान ठेवून सेवाकार्यात जास्त लक्ष घातले. आज, यहोवाच्या सेवेत व्यस्त असताना मला सर्वात जास्त आनंद मिळतो.

[२८ पानांवरील चौकट/चित्र]

ग्रेगरी: माझ्या पालकांनी दिलेल्या प्रोत्साहनापेक्षा त्यांचे उदाहरण आणि यहोवाची सेवा करण्यामधील त्यांचा आनंद यांच्यामुळेच मी माझ्या परिस्थितीचा पुन्हा एकदा विचार केला, पूर्ण-वेळेची सेवा सुरू केली तर माझं कसं होईल अशी चिंता करण्याचे सोडून दिले आणि यहोवाच्या कार्यात स्वतःला झोकून दिले. यहोवाच्या सेवेसाठी स्वतःला वाहून दिल्याने आनंद मिळतो हे माझ्या पालकांमुळेच मी जाणू शकलो आणि त्यासाठी मी त्यांचे खूप आभार मानतो.

[२८ पानांवरील चौकट/चित्र]

त्युला: माझे आईवडिल नेहमी ठासून सांगायचे की, यहोवासोबत नातेसंबंध असणे हीच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि यहोवाला आपल्याकडील सर्वोत्तम गोष्ट देण्यातच खरा आनंद आहे. यहोवा एक खरी व्यक्‍ती आहे अशी जाणीव त्यांनी आम्हाला करून दिली. आपण यहोवाला संतोषविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला तर रात्री आपल्याला शांत झोप लागते आणि आपले मन स्वच्छ राहते; असे समाधान आणखी कशातही मिळत नाही असे बाबा सारखे म्हणायचे.

[२५ पानांवरील चित्र]

ग्रीसमध्ये सैनिक असताना, १९५१

[२५ पानांवरील चित्र]

एकातरीनीसोबत, १९६६ साली

[२६ पानांवरील चित्र]

माझा परिवार, १९९६ साली: (डावीकडून उजवीकडे, मागे) ग्रेगरी, ख्रिस्टोस, त्युला; (पुढे) लाकीस, एकातरीनी आणि मी