व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्ही “प्रौढ” ख्रिस्ती आहात का?

तुम्ही “प्रौढ” ख्रिस्ती आहात का?

तुम्ही “प्रौढ” ख्रिस्ती आहात का?

“मी मूल होतो तेव्हा मुलासारखा बोलत असे, मुलासारखी माझी बुद्धि असे, मुलासारखे माझे विचार असत.” असे प्रेषित पौलाने लिहिले. एकेकाळी आपण सर्वजण लहान बाळांप्रमाणे होतो. पण आपण तसेच राहिलो नाही. पौल पुढे म्हणाला: “आता प्रौढ झाल्यावर मी पोरपणाच्या गोष्टी सोडून दिल्या आहेत.”—१ करिंथकर १३:११.

आपण जेव्हा सत्यात नवीनच आलो तेव्हा जणू आपण लहान मूलच होतो. कालांतराने, “देवाच्या पुत्रावरील विश्‍वासाच्या व तत्संबंधी परिपूर्ण ज्ञानाच्या एकत्वाप्रत, प्रौढ मनुष्यपणाप्रत, ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल अशा बुद्धीच्या मर्यादेप्रत आपण सर्व येऊन पोहंचू” शकतो. (इफिसकर ४:१३) १ करिंथकर १४:२० मध्ये आपल्याला सांगण्यात आले आहे: “बंधुजनहो, बालबुद्धीचे होऊ नका; पण . . . समजुतदारपणाबाबत प्रौढांसारखे व्हा.”

आज, देवाच्या लोकांच्या मंडळीत पुष्कळ नवनवीन लोक येत असल्यामुळे प्रौढ ख्रिश्‍चन हे मंडळीला एक आशीर्वाद ठरतात. त्यांच्यामुळे मंडळी स्थिर राहते. मंडळीतील सर्वांवर त्यांचा चांगला प्रभाव पडतो.

तसे पाहायला गेल्यास, शारीरिक वाढ होण्यासाठी आपल्याला जास्त काही करावे लागत नाही. पण आध्यात्मिक वाढ होण्यासाठी प्रयत्न लागतात. पौलाच्या दिवसांतील काही ख्रिस्ती लोक कित्येक वर्षांपासून देवाची सेवा करत होते तरीपण ते “प्रौढतेप्रत” जाऊ शकले नाहीत. (इब्री लोकांस ५:१२; ६:२) तुमच्याबद्दल काय? तुम्ही खूप वर्षांपासून देवाची सेवा करत असला तरी किंवा नव्यानेच सुरवात केली असली तरी, स्वतःचे प्रामाणिकपणे परीक्षण करणे उचित आहे. (२ करिंथकर १३:५) तुम्ही प्रौढ ख्रिश्‍चन आहात का? नसल्यास, कसे होऊ शकाल?

“समजुतदारपणाबाबत प्रौढांसारखे”

आध्यात्मिक अर्थाने बाळ असलेले ‘माणसांच्या धुर्तपणाने, भ्रांतीच्या मार्गास नेणाऱ्‍या युक्‍तीने, प्रत्येक शिकवणरुपी वाऱ्‍याने हेलकावे खातात व फिरतात.’ म्हणूनच पौलाने आर्जवले: “आपण प्रीतीने सत्याला धरुन मस्तक असा जो ख्रिस्त त्याच्याप्रत सर्व प्रकारे वाढावे.” (इफिसकर ४:१४, १५) हे आपण कसे करू शकतो? इब्री लोकांस ५:१४ म्हणते: “ज्यांच्या ज्ञानेंद्रियांना वहिवाटीने चांगले आणि वाईट समजण्याचा सराव झाला आहे अशा प्रौढांसाठी जड अन्‍न आहे.”

प्रौढ लोक आपल्या समजशक्‍तींचा नेहमी उपयोग करत असल्यामुळे त्यांची समजशक्‍ती प्रशिक्षित होते आणि बायबलमधील तत्त्वे लागू करण्याचा त्यांच्याकडे अनुभवही असतो. म्हणजेच, एका रात्रीत कोणीही प्रौढ होत नाही; आध्यात्मिकरीत्या वाढण्यासाठी वेळ लागतो. तुम्ही व्यक्‍तिगत अभ्यासाद्वारे खासकरून देवाच्या वचनातील गहन गोष्टींच्या अभ्यासाद्वारे तुमची आध्यात्मिक वाढ होऊ शकते. अलीकडील काळात टेहळणी बुरूज नियतकालिकात अनेक गहन विषयांवर चर्चा करण्यात आली होती. हे गहन विषय “समजावयास कठीण” असतात म्हणून प्रौढ लोक ते वाचायचे टाळत नाहीत. (२ पेत्र ३:१६) तर अशाप्रकारचे जडान्‍न जणू फस्त करायला ते उत्सुक असतात!

आवेशी प्रचारक आणि शिक्षक

“तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या; जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा,” अशी येशूने आपल्या शिष्यांना आज्ञा दिली. (मत्तय २८:१९, २०) प्रचार कार्यात आवेशाने भाग घेतल्यानेही तुमची आध्यात्मिक वाढ होऊ शकते. तेव्हा, तुमच्या परिस्थितीप्रमाणे प्रचार कार्यात भाग घ्यायला काय हरकत आहे?—मत्तय १३:२३.

कधीकधी जीवनातील दबावांमुळे प्रचार कार्यासाठी वेळ काढणे महाकठीण होऊन जाते. तरीपण प्रचारात “नेटाने यत्न” करण्याद्वारे तुम्ही ‘सुवार्ता’ सांगण्याचे कार्य किती महत्त्वाचे आहे ते दाखवून देता. (लूक १३:२४; रोमकर १:१६) यामुळे तुम्ही “विश्‍वास ठेवणाऱ्‍यांचा कित्ता” होता.—१ तीमथ्य ४:१२.

सचोटी राखणारे

प्रौढ होण्यात सचोटी राखण्यासाठी झटणे समाविष्ट आहे. स्तोत्र २६:१ मध्ये दावीदाने म्हटले: “हे परमेश्‍वरा, माझा न्याय कर, कारण मी सात्विकपणे [सचोटीने] वागलो आहे.” सचोटी म्हणजे नैतिकता, पूर्णता. पण त्याचा अर्थ परिपूर्णता असा होत नाही. स्वतः दावीदाने कित्येकवेळा गंभीर पातके केली. पण त्याने शिक्षा स्वीकारून आपला मार्ग सुधारण्याद्वारे दाखवून दिले, की त्याचे यहोवावर खरे प्रेम होते. (स्तोत्र २६:२, ३, ६, ८, ११) सचोटी राखण्यामध्ये, पूर्ण मनाने यहोवाची भक्‍ती करणे समाविष्ट आहे. दावीदाने आपला पुत्र शलमोन याला सांगितले: “आपल्या बापाच्या देवाला ओळख आणि . . . मनोभावे त्याची सेवा कर.”—१ इतिहास २८:९.

सचोटी राखण्यामध्ये, ‘जगाचा भाग न होणे,’ अर्थात राष्ट्रांच्या राजकारणापासून आणि युद्धांपासून दूर राहणे देखील गोवलेले आहे. (योहान १७:१६) आपण जारकर्म, व्यभिचार, मादक पदार्थांचा दुरुपयोग यांसारख्या भ्रष्ट गोष्टींपासूनही दूर राहिले पाहिजे. (गलतीकर ५:१९-२१) पण सचोटी राखण्यामध्ये इतकेच गोवलेले नाही. आणखी पुष्कळ गोष्टी त्यात समाविष्ट आहेत. शलमोनाने म्हटले: “गंध्याच्या तेलास, मरून पडलेल्या माश्‍यांमुळे दुर्गंधि येते व ते नासून जाते, तसा अल्पमात्र मूर्खपणाचा पगडा अक्कल व प्रतिष्ठा यांवर बसतो.” (उपदेशक १०:१) विरुद्ध लिंगी व्यक्‍तीबरोबर अनुचित थट्टामस्करी किंवा अयोग्य प्रणयचेष्टा यासांरख्या ‘अल्पमात्र मूर्खपणामुळेही’ एखाद्या ‘प्रतिष्ठित’ व्यक्‍तीचे नाव खराब होऊ शकते. (ईयोब ३१:१) यास्तव, “वाईट भासणाऱ्‍या प्रत्येक प्रकारापासून दूर” राहून तुमच्या चालचलणुकीद्वारे तुमची प्रौढता दाखवा.—१ थेस्सलनीकाकर ५:२२, किंग जेम्स व्हर्शन.

एकनिष्ठ जन

प्रौढ ख्रिस्ती एकनिष्ठ देखील असतात. इफिसकर ४:२४ मध्ये पौल ख्रिश्‍चनांना म्हणतो: “सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व व पवित्रता ह्‍यांनी युक्‍त असा देवसदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा.” ग्रीक शास्त्रवचनांमध्ये, “एकनिष्ठा” यासाठी असलेल्या मूळ शब्दाचा अर्थ पवित्रता, धार्मिकता, श्रद्धा असा होतो. एकनिष्ठ व्यक्‍ती श्रद्धाळू, धार्मिक असते; देवाने दिलेली सर्व कर्तव्ये ती काटेकोरपणे पार पाडायचा प्रयत्न करते.

तुम्हीही अशाप्रकारची एकनिष्ठा कशी विकसित करू शकता? एक मार्ग म्हणजे, तुमच्या मंडळीतील वडिलांना सहकार्य देण्याद्वारे. (इब्री लोकांस १३:१७) येशू हा ख्रिस्ती मंडळीचा मस्तक आहे, ही गोष्ट ओळखून प्रौढ ख्रिस्ती ‘देवाच्या मंडळीचे पालन’ करण्यास नियुक्‍त केलेल्यांशी एकनिष्ठ राहतात. (प्रेषितांची कृत्ये २०:२८) नियुक्‍त केलेल्या वडिलांच्या अधिकाराबद्दल शंका घेणे किंवा त्यांना कमी लेखणे किती अनुचित आहे! तुम्हाला ‘विश्‍वासू व बुद्धिमान दास’ आणि ‘यथाकाळी आध्यात्मिक अन्‍न’ देण्याकरता ज्यांचा उपयोग केला जातो त्यांच्याबरोबरही एकनिष्ठ राहण्याची जाणीव असली पाहिजे. (मत्तय २४:४५) टेहळणी बुरूज आणि त्याच्याबरोबरीच्या इतर प्रकाशनांतील माहिती वाचून ती लागू करण्यास दिरंगाई करू नका.

कार्याद्वारे प्रेम प्रकट करणे

थेस्सलनिकामधील ख्रिश्‍चनांना पौलाने असे लिहिले: “तुम्हा सर्वांमधील प्रत्येकाची एकमेकांवरील प्रीति विपुल होत आहे.” (२ थेस्सलनीकाकर १:३) आध्यात्मिकरीत्या वाढ होत असताना इतरांबद्दल आपले प्रेमही वाढणे महत्त्वाचे आहे. योहान १३:३५ मध्ये येशूने म्हटले: “तुमची एकमेकांवर प्रीति असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा.” बांधवांमधील हे प्रेम भावनाविवश होऊन दाखवले जाते नाही. तर “एखादे कार्य करण्यास आपण प्रवृत्त होतो तेव्हा त्यावरून आपले प्रेम दिसून येते,” असे वाईन्स एक्सपोझिटरी डिकश्‍नरी ऑफ द ओल्ड ॲण्ड न्यू टेस्टमेंट म्हणते. कार्याद्वारे प्रेम दाखवल्याने तुम्ही प्रौढतेप्रत जाता!

उदाहरणार्थ, रोमकर १५:७ मध्ये म्हटले आहे: “एकमेकांचा स्वीकार करा.” मंडळीच्या सभांमध्ये आपण आपल्या बांधवांचे, नवीन लोकांचे प्रेमाने स्वागत करू शकतो. त्यांच्याशी मैत्री करा. त्यांच्याबद्दल “व्यक्‍तिगत आवड” दाखवा. (फिलप्पैकर २:४, NW) तुम्ही त्यांना आपल्या घरी बोलवा, त्यांचा पाहुणचार करा. (प्रेषितांची कृत्ये १६:१४, १५) कधी कधी काहींच्या अपरिपूर्णतेवरून आपल्या प्रेमाची परीक्षा होऊ शकते. पण आपण जेव्हा ‘प्रीतीने वागण्यास’ शिकतो तेव्हा आपण दाखवून देतो की आपण प्रौढ होत आहोत.—इफिसकर ४:२.

शुद्ध उपासनेला बढावा देण्यासाठी आपल्या मालमत्तेचा उपयोग करणे

प्राचीन काळांत, यहोवाच्या सर्वच लोकांनी, मंदिराच्याबाबतीत त्यांना असलेल्या जबाबदाऱ्‍या पूर्ण केल्या नाहीत. त्यांना आठवण करून देण्यासाठी यहोवाने हाग्गय, मलाखी यांच्यासारखे संदेष्टे त्यांच्याकडे पाठवले. (हाग्गय १:२-६; मलाखी ३:१०) आज, प्रौढ ख्रिस्ती यहोवाच्या उपासनेला बढावा देण्यासाठी त्यांच्या मालमत्तेचा आनंदाने उपयोग करतात. अशा लोकांचे आपण अनुकरण करू शकतो. यहोवाच्या साक्षीदारांच्या जगव्याप्त कार्यासाठी आणि मंडळीसाठी काही “द्रव्य जमा” करण्याबद्दल १ करिंथकर १६:१, २ मध्ये सांगितले आहे. “जो सढळ हाताने पेरतो तो त्याच मानाने कापणी करील,” असे देवाचे वचन आपल्याला वचन देते.—२ करिंथकर ९:६.

तुमच्याकडे असलेल्या इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. तुमचा वेळ आणि तुमची शक्‍ती देखील तुम्ही यहोवाच्या उपासनेकरता खर्च करू शकता. कमी महत्त्वाच्या गोष्टींमध्ये वेळ घालवण्याऐवजी, अधिक महत्त्वाच्या गोष्टींसाठी “वेळेचा सदुपयोग करा.” (इफिसकर ५:१५, १६; फिलिप्पैकर १:१०) वेळेचा सुज्ञपणे उपयोग करण्यास शिका. यामुळे कदाचित तुम्हाला राज्य सभागृहाच्या मेंटेनेन्सच्या कामांमध्ये आणि यहोवाच्या उपासनेला बढावा देणाऱ्‍या इतर कार्यांमध्ये देखील भाग घेता येईल. याद्वारे तुम्ही हे दाखवून देता की तुम्ही प्रौढ ख्रिस्ती होत आहात.

प्रौढतेप्रत जाणे!

अभ्यासू आणि ज्ञानी, आवेशी, सचोटी राखणारे, एकनिष्ठ आणि प्रेमळ, राज्य कार्यासाठी आपली शक्‍ती आणि आपला पैसा दोन्ही गोष्टी द्यायला तयार असलेले स्त्रीपुरुष मंडळीसाठी आशीर्वाद ठरतात. म्हणूनच तर प्रेषित पौलाने म्हटले: “आपण ख्रिस्ताविषयीच्या प्राथमिक बाबीसंबधी बोलत राहण्याचे सोडून प्रौढतेप्रत जाण्याचा नेटाने प्रयत्न करू या.”—इब्री लोकांस ६:२.

तर मग तुम्ही प्रौढ ख्रिस्ती आहात का? की, आध्यात्मिक अर्थाने काही बाबतीत अजूनही बाळासारखे आहात? (इब्री लोकांस ५:१३) तुम्ही प्रौढ असला किंवा नसला तरी, तुम्ही व्यक्‍तिगत अभ्यास करण्याचा, प्रचार कार्यात आवेशाने भाग घेण्याचा आणि आपल्या बांधवांना प्रेम दाखवण्याचा निश्‍चय केला पाहिजे. प्रौढ बांधव तुम्हाला कोणत्याही प्रकारचा सल्ला देतात तेव्हा तो स्वीकारा. (नीतिसूत्रे ८:३३) तुमच्यावर असलेली सर्व ख्रिस्ती जबाबदारी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. यासाठी तुम्हाला तुमचा वेळ आणि शक्‍ती खर्च करावी लागेल. मग तुम्हीही “देवाच्या पुत्रावरील विश्‍वासाच्या व तत्संबंधी परिपूर्ण ज्ञानाच्या एकत्वाप्रत, प्रौढ मनुष्यपणाप्रत, ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल अशा बुद्धीच्या मर्यादेप्रत” पोहंचाल.—इफिसकर ४:१३.

[२७ पानांवरील संक्षिप्त आशय]

प्रौढ ख्रिश्‍चनांमुळे मंडळी स्थिर राहते. मंडळीतील सर्वांवर त्यांचा चांगला प्रभाव पडतो

[२९ पानांवरील चित्रे]

प्रौढ ख्रिस्ती मंडळीतील सर्व लोकांविषयी आवड बाळगून मंडळीत प्रेमाचे वातावरण टिकवून ठेवतात