व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्ही मतभेद कसे हाताळता?

तुम्ही मतभेद कसे हाताळता?

तुम्ही मतभेद कसे हाताळता?

दररोज आपण वेगवेगळ्या लोकांना भेटतो. यामुळे आपल्याला आनंद होतो, लोकांचे वेगवेगळे दृष्टिकोन आपल्याला पाहायला मिळतात. पण कधीकधी लोकांबरोबर आपले खटकेही उडतात. काही क्षुल्लक असतात तर काही अगदीच टोकाला पोहंचतात. कोणत्याही प्रकारच्या मतभेदांचा आपल्या मनावर, भावनांवर आणि आध्यात्मिकतेवर परिणाम हा होतोच.

मतभेद सोडवण्याचा आपल्या परीने प्रयत्न केल्यास आपले आरोग्य चांगले राहील आणि लोकांबरोबर आपले संबंध देखील चांगले राहतील. एक जुनी म्हण अशी आहे: “शांत अंतःकरण देहाचे जीवन आहे.”—नीतिसूत्रे १४:३०.

आणखी एक म्हण अशी आहे: “ज्या मनुष्याचे चित्त स्वाधीन नाही, तो गावकुसू नसलेल्या पडक्या गावासारखा आहे.” (नीतिसूत्रे २५:२८) आपण वाईट गोष्टींचा विचार करावा, वाईट कामे करावीत, स्वतःला आणि इतरांना दुःख द्यावे असे कोणालाच वाटत नाही. आपण स्वतःवर ताबा ठेवला नाही, रागराग केला तर आपल्याकडून ही चूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. येशूने डोंगरावरील आपल्या प्रवचनात म्हटले, की आपण नेहमी आपल्या मनोवृत्तीचे परीक्षण केले पाहिजे. कारण त्यावरच इतरांबरोबरचे आपले मतभेद आपण कसे सोडवतो हे अवलंबून असते. (मत्तय ७:३-५) इतरांची टीका करण्याऐवजी आपण विविध दृष्टिकोन असलेल्या, विविध पार्श्‍वभूमीच्या लोकांबरोबर मैत्री करून ती कायम कशी टिकवू शकतो याचा नेहमी विचार करू शकतो.

आपली मनोवृत्ती

गैरसमज किंवा मतभेद मिटवायचे असल्यास आपण हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे, की आपल्या सर्वांच्या मनात चुकीचे विचार किंवा चुकीच्या मनोवृत्ती उद्‌भवण्याची शक्यता आहे. शास्त्रवचने आपल्याला आठवण करून देतात, की आपण सर्व पापी व ‘देवाच्या गौरवाला उणे पडलो’ आहोत. (रोमकर ३:२३) आणि आपल्याठायी समजबुद्धी असेल तर आपण दुसऱ्‍या व्यक्‍तीला आपल्या समस्येबद्दल जबाबदार ठरवणार नाही. याच बाबतीत आपण योनाच्या उदाहरणाचा विचार करू या.

यहोवाच्या येणाऱ्‍या न्यायदंडाची घोषणा करावयास योना निनवे शहरात गेला. याचा चांगला परिणाम असा झाला, की संपूर्ण निनवे शहराने पश्‍चात्ताप करून खऱ्‍या देवावर विश्‍वास ठेवला. (योना ३:५-१०) लोकांनी पश्‍चात्तापी मनोवृत्ती दाखवल्यामुळे यहोवाला त्यांची दया आली आणि त्यांचा त्याने नाश केला नाही. पण, “योनाला ह्‍यावरून फार वाईट वाटले व त्याला राग आला.” (योना ४:१) योनाला राग आला हे आश्‍चर्यच म्हणावे लागेल. तो यहोवावर का रागावला? योना केवळ स्वतःच्या भावनांचा विचार करीत होता. त्याला वाटले, की समाजामध्ये आता त्याला तोंड दाखवता येणार नाही. पण तो यहोवाची दया पाहू शकला नाही. यहोवाने अगदी प्रेमळपणे त्याला एका धड्याद्वारे त्याची मनोवृत्ती बदलण्यास व आपल्या कार्यामागील दया पाहण्यास त्याची मदत केली. (योना ४:७-११) या घटनेवरून हेच स्पष्ट होते, की यहोवाला नव्हे तर योनाला आपली मनोवृत्ती बदलण्याची आवश्‍यकता होती.

योनाप्रमाणे आपल्यालाही कधीकधी काही गोष्टींबाबत आपली मनोवृत्ती बदलावी लागते का? प्रेषित पौल म्हणतो: “तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्‍याला आदराने आपणापेक्षा थोर माना.” (रोमकर १२:१०) म्हणजे काय? म्हणजे, आपण इतरांसोबत समंजसपणे, आदराने वागले पाहिजे. याशिवाय आपण हे देखील लक्षात ठेवले पाहिजे, की प्रत्येक व्यक्‍तीला निवड करण्याचा अधिकार आहे. पौल म्हणतो: “प्रत्येकाने आपला स्वतःचा भार वाहिलाच पाहिजे.” (गलतीकर ६:५) म्हणून, दोघांमधील मतभेद वाढून दरी निर्माण होण्याआधीच प्रत्येकाने, आपली मनोवृत्ती बदलावी लागणार आहे का, याचा विचार करणे किती सुज्ञपणाचे आहे! आपण यहोवाप्रमाणे विचार करण्यासाठी व आपल्या भाऊबहिणींसोबत चांगले नातेसंबंध ठेवण्यासाठी खूप प्रयत्न केले पाहिजेत.—यशया ५५:८, ९.

आपला व्यवहार

तुम्ही कदाचित दोन लहान मुलांना एकाच खेळण्यासाठी भांडताना पाहिले असेल. प्रत्येक जण जोर लावून ते खेळणे मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. अशावेळी दोघे ओरडत देखील असतात. पण शेवटी मग त्यांतील कोणीतरी एक जण ते खेळणे सोडून देतो किंवा मग कोणा मोठ्या व्यक्‍तीला मध्ये पडून त्यांची भांडणे सोडवावी लागतात.

उत्पत्तीच्या पुस्तकात एक असाच अहवाल आहे. अब्राहामाच्या कानावर अशी बातमी आली, की त्याच्या गुराख्यांमध्ये आणि लोट नामक त्याच्या पुतण्याच्या गुराख्यांमध्ये भांडणे होत आहेत. तेव्हा अब्राहामाने पुढाकार घेऊन लोटाला म्हटले: “माझ्यातुझ्यामध्ये, आणि माझे गुराखी व तुझे गुराखी यांच्यामध्ये तंटा नसावा, कारण आपण भाऊबंद आहो.” कोणत्याही कारणामुळे आपले नातेसंबंध बिघडू नयेत अशी अब्राहामाची इच्छा होती. त्यासाठी तो काय करायला तयार झाला? तो सर्वांमध्ये वडील होता, त्याला निवड करण्याची पहिली संधी होती, तरीदेखील त्या अधिकाराचा त्याग करण्यास तो तयार होता. अब्राहामाने लोटाला आपल्या घराण्याला आणि कळपाला जेथे घेऊन जायचे तेथे जाऊ दिले. लोटाने सदोम आणि गमोराचा हिरवागार प्रदेश निवडला. अब्राहाम आणि लोट कोणत्याही भांडणाविना अगदी शांतीत एकमेकांपासून वेगळे झाले.—उत्पत्ति १३:५-१२.

इतरांबरोबर शांतीने राहण्याकरता आपणही अब्राहामाप्रमाणे त्याग करण्यास तयार असतो का? एखादा मतभेद मिटवताना अब्राहामाचे उदाहरण आपण नेहमी लक्षात ठेवू शकतो. अब्राहामाने लोटाला विनंती केली: ‘आपल्यामध्ये तंटा नसावा.’ भांडणे शांतीने मिटावी अशी अब्राहामाची मनापासून इच्छा होती. शांतिमय नातेसंबंध ठेवण्याची इच्छा असल्यास कोणताही गैरसमज राहणार नाही. अब्राहामाने शेवटी म्हटले, “आपण भाऊबंद आहो.” व्यक्‍तिगत आवडीनिवडीसाठी किंवा गर्वासाठी इतका मौल्यवान नातेसंबंध तोडण्यात शहाणपण आहे का? अब्राहामाने आपले लक्ष महत्त्वाच्या गोष्टींवर केंद्रित ठेवले. हे सर्व त्याने मोठ्या मनाने केले आणि त्याच्या पुतण्याचा आदरही त्याने राखला.

दोघांमधील मतभेद सोडवण्यासाठी कदाचित आपल्याला तिसऱ्‍या व्यक्‍तीची मदत घ्यावी लागले. पण पहिले पाऊल उचलून स्वतःच समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणे किती शहाणपणाचे आहे! आपल्या भाऊबहिणींसोबत शांती टिकून ठेवण्यासाठी पहिले पाऊल उचलण्याचे आणि आवश्‍यकता भासल्यास क्षमा मागण्याचे उत्तेजन येशूने दिले. * (मत्तय ५:२३, २४) यासाठी नम्रतेची किंवा लीनतेची गरज आहे. पेत्राने लिहिले: “तुम्ही सर्व जण एकमेकांची सेवा करण्यासाठी नम्रतारुपी कमरबंद बांधा; कारण देव गर्विष्ठांना विरोध करितो, आणि लीनांवर कृपा करितो.” (१ पेत्र ५:५) आपण आपल्या भाऊबहिणींसोबत कशाप्रकारे वागतो त्याचा थेट परिणाम देवासोबतच्या आपल्या नातेसंबंधावर होतो.—१ योहान ४:२०.

ख्रिस्ती मंडळीत शांती कायम टिकवण्यासाठी आपल्याला कदाचित अनेक गोष्टींचा त्याग करावा लागेल. गेल्या पाचएक वर्षांत पुष्कळ नवीन लोक यहोवाचे साक्षीदार झाले आहेत; आणि त्यांना पाहून आपल्याला खूप आनंदही होतो. मग, आपण ज्याप्रकारे वागू त्याचा या नवीन लोकांवर आणि मंडळीतील इतर बंधुभगिनींवर परिणाम होतो. म्हणून, मनोरंजन, छंद, लोकांबरोबरचे आपले व्यवहार, नोकरी याबाबतीत आपण दक्ष असले पाहिजे. नाहीतर, आपल्यामुळे इतरांना अडखळण होऊ शकते.

प्रेषित पौल आपल्याला आठवण करून देतो: ‘सर्व गोष्टींची मोकळीक आहे तरी सर्व गोष्टी हितकारक असतातच असे नाही. सर्व गोष्टींची मोकळीक आहे तरी सर्व गोष्टी उन्‍नति करितातच असे नाही. कोणीहि आपलेच हित पाहू नये तर दुसऱ्‍याचे पाहावे.’ (१ करिंथकर १०:२३, २४) ख्रिस्ती या नात्याने बंधुभगिनींमधील प्रेम आणि ऐक्य वाढवण्याची आपली मनापासून इच्छा असली पाहिजे.—स्तोत्र १३३:१; योहान १३:३४, ३५.

आनंद देणारे शब्द

आपल्या शब्दांचा देखील लोकांवर चांगला प्रभाव पडू शकतो. “ममतेची वचने मधाच्या पोळ्यासारखी मनाला गोड व हाडांस आरोग्य देणारी आहेत.” (नीतिसूत्रे १६:२४) एफ्राइमी लोकांबरोबर होणारे युद्ध गिदोनने कसे टाळले या घटनेवरून या म्हणीची सत्यता पटते.

मिद्यानी लोकांबरोबर युद्ध चालू असताना गिदोनाने मदतीकरता एफ्राइमी लोकांना बोलावले. पण युद्ध संपल्यानंतर एफ्राइमी लोक गिदोनावर रागावले आणि अशी तक्रार करू लागले, की गिदोनाने त्यांना युद्ध सुरू होण्याआधीच का बोलावले नाही. अहवाल म्हणतो, की “ते त्याच्याशी हुजत घालू लागले.” मग गिदोन त्यांना म्हणाला “आता तुम्ही केले त्या मानाने मी काय केले? एफ्राइमाच्या द्राक्षांचा सरवा हा अबियेजेराच्या द्राक्षांच्या सबंध पिकापेक्षा चांगला नाही काय? मिद्यानाचे सरदार ओरेब व जेब ह्‍यांना देवाने तुमच्या हाती दिले; तुम्ही केले त्या मानाने मला काय करिता आले?” (शास्ते ८:१-३) गिदोनाच्या या शांत, चतुर शब्दांमुळे एक मोठे संकट टळले. असे दिसते, की एफ्राइमी लोक गर्विष्ठ, आपलाच जास्त विचार करणारे लोक होते. पण गिदोनाचे त्यांच्यासोबत शांतीने राहण्याचे प्रयत्न यशस्वी ठरले. आपल्यालाही त्याच्याप्रमाणे करता येईल का?

कधी कधी लोकांना आपला खूप राग येतो. आपल्याबरोबर ते तुसडेपणाने वागतील. पण आपल्याला त्यांच्या भावना समजून घेण्याची गरज आहे. कदाचित आपल्याच कोणत्यातरी वागण्यामुळे त्यांना आपला राग येत तर नसावा? असल्यास, आपली चूक कबूल करून दिलगिरी व्यक्‍त करायला काय हरकत आहे. आपल्या गोड, रूचकर शब्दांमुळे, तुटलेले नातेसंबंध पुन्हा नीट होऊ शकतात. (याकोब ३:४) काही लोक चिडचीड करतात तेव्हा त्यांना आपल्याकडून सांत्वनाची गरज असते. बायबल काय म्हणते ते पाहा. “सरपण नसल्यामुळे विस्तव विझतो.” (नीतिसूत्रे २६:२०) काळजीपूर्वक बोललेल्या उचित शब्दांमुळे “कोपाचे निवारण होते” आणि शांती मिळते.—नीतिसूत्रे १५:१.

प्रेषित पौल म्हणतो: “शक्य तर सर्व माणसांबरोबर तुम्हाकडून होईल तितके शांतीने राहा.” (रोमकर १२:१८) हे खरे आहे, की आपण इतरांच्या भावनांवर ताबा ठेवू शकत नाही पण शांती राखण्याकरता आपण आपल्या परीने प्रयत्न मात्र करू शकतो. जास्त वेळ न दवडता आपण बायबलच्या नियमांप्रमाणे जगण्यास सुरवात केली पाहिजे. दुसऱ्‍यांसोबतचे मदभेद मिटवण्याकरता प्रयत्न केला पाहिजे. यहोवाच्या मार्गदर्शनानुसार आपण मदभेद दूर केल्यास आपल्याला खरी शांती आणि सुख मिळेल.—यशया ४८:१७.

[तळटीपा]

^ परि. 13 टेहळणी बुरूज ऑक्टोबर १५, १९९९ मधील “मनापासून क्षमा करा,” आणि “तुम्हाला तुमच्या भावाला मिळवता येईल” हे लेख पाहा.

[२४ पानांवरील चित्र]

आपण नेहमी आपलाच हेका चालू ठेवत असतो का?

[२५ पानांवरील चित्र]

मतभेद सोडवण्याच्याबाबतीत अब्राहामाने नम्रतेचे छान उदाहरण मांडले