व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रशांत महासागरातील द्वीपांवर एक खास मोहीम!

प्रशांत महासागरातील द्वीपांवर एक खास मोहीम!

प्रशांत महासागरातील द्वीपांवर एक खास मोहीम!

ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन व सिडनी शहरातील विमानतळांवर उत्साहाचे वातावरण होते. ४६ जणांचा एक गट सामोआ द्वीपावर जाण्याच्या तयारीत होता. न्यूझीलंड, हवाई आणि अमेरिका या देशांतील आणखी ३९ जण त्यांना तेथे भेटणार होते. या लोकांजवळचे सामानसुमान पाहून तुम्हाला आश्‍चर्य वाटले असते. हातोडे, करवती, ड्रिलींग मशीन व इतर साहित्य घेऊन सामोआच्या निसर्गरम्य बेटावर हे लोक करणार तरी काय असा प्रश्‍न मनात आला. हे लोक कोणत्या खास मोहिमेवर निघाले होते?

यहोवाच्या साक्षीदारांच्या ऑस्ट्रेलिया शाखा दफ्तरातील रीजनल इंजिनियरिंग ऑफिसतर्फे चालवल्या जाणाऱ्‍या बांधकाम कार्यक्रमांतर्गत, दोन आठवड्यांच्या एका खास प्रकल्पाकरता हे सर्वजण स्वखर्चाने सामोआ बेटावर जायला निघाले होते. प्रशांत महासागरातील द्वीपांवर यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. नवीन मंडळ्यांची गरज लक्षात घेऊन, या बांधकाम कार्यक्रमात नवी राज्य सभागृहे, संमेलनगृहे, मिशनरी गृहे आणि शाखा दफ्तरे किंवा भाषांतर केंद्रे उभारण्यासारख्या प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पात सहभागी झालेल्या बऱ्‍याचजणांनी आधी स्वतःच्या देशात राज्य सभागृहांच्या बांधकामात साहाय्य केले होते. त्यांच्यापैकी काहींची ओळख करून घेऊया.

मॅक्स, यांना पत्रे बसवण्याच्या कामाचा अनुभव आहे. ते ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स राज्यातील काओरा शहरात राहतात. ते विवाहित असून त्यांना पाच मुले आहेत. रॉय, हे पेंटिंग आणि प्लास्टरिंगचे काम करतात. ते न्यूझीलंडच्या माउंट मॉनगनुई येथे राहतात. ते देखील विवाहित आहेत व त्यांना चार मुले आहेत. आरनाल्ड, हे आपली पत्नी व दोन मुलांसोबत हवाई येथे राहतात. ते पायनियर आहेत. मॅक्स, रॉय व आरनाल्ड हे तिघेही मंडळीत वडील आहेत. या बांधकामाच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या बहुतेकजणांची परिस्थिती काहीशी यांच्यासारखीच आहे. कुटुंबाच्या व मंडळीच्या जबाबदाऱ्‍या असूनही त्यांनी या कार्यक्रमात भाग घेण्याचे स्वेच्छेने ठरवले आहे. या कामाचे महत्त्व त्यांनी व त्यांच्या कुटुंबाने ओळखले आहे आणि म्हणूनच या कार्याला हातभार लावण्यासाठी आपल्यापरीने होईल तितके करण्यास ते इच्छुक आहेत.

देशोदेशींच्या लोकांचा सहभाग

सामोआच्या वायव्याकडे विषुववृत्ताच्या जवळ असलेल्या नऊ पोवळ्याच्या बेटांनी मिळून बनलेला प्रशांत महासागरीय देश म्हणजे टुवालू. या देशाची लोकसंख्या जवळजवळ १०,५०० इतकी आहे. प्रत्येक बेटाचे क्षेत्रफळ जवळजवळ २.५ चौरस किलोमीटर आहे. १९९४ सालापर्यंत येथील साक्षीदारांची संख्या ६१ झाली होती. त्यांना राज्य सभागृहाची व मोठ्या भाषांतर कार्यालयाची नितान्त गरज होती.

प्रशांत महासागरातील या उष्णकटिबंधीय प्रदेशात सहसा मोठी वादळे येतात. हे लक्षात घेऊनच इमारतींची बांधणी करावी लागते. पण या बेटांवर चांगल्या प्रतीचे बांधकाम साहित्य उपलब्ध नाही. त्यामुळे छताकरता पत्रे, लोखंडी सामान, फर्निचर, पडदे, टॉयलेट बोल्स (शौचकूपे), शॉवरचे पाईप, अगदी स्क्रू व खिळे देखील ऑस्ट्रेलियाहून आणावे लागले.

हे सर्व सामान येण्याआधीच प्रकल्पाच्या साईटवर कामाची तयारी करण्यासाठी व पाया घालण्यासाठी एक टीम नेमण्यात आली होती. यानंतर अनेक देशांतून आलेल्या स्वयंसेवकांनी इमारतींचे बांधकाम, पेंटिंग तसेच आतील सजावट इत्यादी कामे पूर्ण केली.

टुवालू येथे सुरू असलेल्या या प्रकल्पामुळे तेथील चर्चच्या पाळकांना मात्र खूपच राग आला. त्यांनी रेडिओवर अशी घोषणा केली की साक्षीदार “बाबेलचा बुरूज” बांधत आहेत. पण त्यांच्या म्हणण्यात तथ्य होते का? ग्रेमी नावाच्या एका स्वयंसेवकाने म्हटले, की बायबलमध्ये उल्लेख करण्यात आलेल्या ‘बाबेलच्या बुरूजाचे’ बांधकाम सुरू असताना देवाने त्या लोकांच्या भाषेत गोंधळ निर्माण केला व त्यामुळे त्यांना एकमेकांचे बोलणे समजेनासे झाले. शेवटी त्यांना आपले काम अर्धवट सोडावे लागले. (उत्पत्ति ११:१-९) पण हे तर यहोवा देवाचे काम आहे त्यामुळे इथे परिस्थिती अगदीच वेगळी आहे. या ठिकाणी निरनिराळ्या भाषा व संस्कृतीचे लोक खांद्याला खांदा लावून काम करतात आणि प्रत्येक प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण करतात.” टुवालू येथील प्रकल्प देखील अवघ्या दोन आठवड्यांत यशस्वीरित्या पूर्ण झाला. इमारतींच्या समर्पणप्रसंगी येथील पंतप्रधानांच्या पत्नींसहित १६३ लोक हजर होते.

प्रकल्पाचे सुपरव्हायजर डग यांनी आपल्या या प्रकल्पाचा अनुभव या शब्दांत सांगितला: “निरनिराळ्या देशांच्या स्वयंसेवकांसोबत काम करण्याचा अनुभव फारच आनंददायक होता. आमची सर्वांची काम करण्याची पद्धत वेगळी होती, वस्तूंची नावे निरनिराळी होती आणि मोजमाप करण्याच्या पद्धती देखील वेगळ्या होत्या. पण तरीसुद्धा आमच्या कामात कोणताही अडथळा आला नाही.” डग यांनी पूर्वी अनेक प्रकल्पांत काम केले आहे. ते म्हणतात: “यहोवाच्या साहाय्याने त्याचे लोक या जगाच्या पाठीवर कोठेही इमारत उभारू शकतात याची मला वारंवार खातरी पटली आहे. ठिकाण कितीही दूरच्या निर्जन प्रदेशात असो, किंवा तेथील परिस्थिती कितीही कठीण असो, त्यामुळे काहीही फरक पडत नाही. तशी आमच्याकडे कुशल कारागीरांची कमी नाही पण हे काम त्यांच्यामुळे नव्हे, तर केवळ यहोवाच्या आत्म्यामुळेच पूर्ण होते.”

देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेनेच या बेटांवरील साक्षीदारांच्या कुटुंबांनी परदेशातून आलेल्या स्वयंसेवकांच्या खाण्यापिण्याची आणि राहण्याची व्यवस्था केली. काहींची परिस्थिती तशी बेताचीच आहे तरीसुद्धा त्यांनी आनंदाने ही व्यवस्था केली होती. त्यांच्या या आदरातिथ्याची स्वयंसेवकांनी खूप कदर केली. ऑस्ट्रेलिया येथील मेलबर्न शहरात राहणाऱ्‍या केन यांनी फ्रेंच पॉलिनेसिया येथे अशाचप्रकारच्या एका प्रकल्पावर काम केले होते. ते म्हणतात: “आम्ही येथे काम करण्यासाठी आलो होतो पण बांधवांनी आम्हाला राजाच्या थाटात ठेवले.” स्थानिक साक्षीदार देखील शक्य होईल तसे या प्रकल्पांना हातभार लावतात. सॉलोमन आयलंड्‌सवर स्त्रियांनी चक्क हातांनी काँक्रीटचे मिश्रण तयार केले. आणि एकदा तर भर पावसात जवळजवळ शंभर स्त्रीपुरुष डोंगरांवर चढून गेले व तेथून त्यांनी ४० टन लाकूड आणले. लहान मुलांनी देखील या कामात सहभाग घेतला. याआधी उल्लेख करण्यात आलेले रॉय म्हणतात: “या द्वीपावर राहणारा एक भाऊ मला अजूनही आठवतो; तो तसा लहानच होता. पण एका वेळी तो सिमेंटची दोन-तीन पोती उचलून न्यायचा. ऊन असो वा पाऊस, तो दिवसभर कष्ट करायचा.”

या प्रकल्पांत मदत केल्यामुळे स्थानिक साक्षीदारांना काही कलाकौशल्य शिकायला मिळते. सामोआ येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तराच्या एका वृत्तात असे म्हटले होते: “बेटांवर राहणाऱ्‍या बांधवांना प्रकल्प सुरू असताना बरीच कामे शिकून घेता आली. पुढे त्यांना राज्य सभागृहे बांधताना व वादळानंतर इमारतींची दुरुस्ती करताना या शिकलेल्या गोष्टी खूप कामी पडतील. शिवाय या भागात उदरनिर्वाह चालवणे तितके सोपे नाही; त्यामुळे शिकलेल्या कौशल्यामुळे त्यांना रोजगार देखील मिळवता येईल.”

बांधकामाचा प्रकल्प—एक प्रभावी साक्ष

होनिआरा येथे असताना कॉलन नावाच्या एका मनुष्याने असेंब्ली हॉलचे बांधकाम होताना पाहिले. ते काम पाहून तो इतका प्रभावित झाला की त्याने तेथील शाखा दफ्तराला असे लिहिले: “इथे सगळे जण अगदी एकोप्याने काम करताना मला दिसले, कोणीही चिडचिड करताना दिसले नाही; एक मोठे कुटुंबच मिळून काम करत असल्याचे वाटत होते.” काही काळानंतर कॉलन आरूलीगो या आपल्या गावी परतला, आणि तेथे त्याने व त्याच्या कुटुंबाने आपणहूनच एक राज्य सभागृह बांधले. मग त्यांनी संस्थेला पुन्हा एक पत्र पाठवले. त्यात त्यांनी असे म्हटले: “आमचे राज्य सभागृह तयार आहे, पोडियम सुद्धा तयार आहे. तेव्हा आमच्याकडे अधूनमधून सभांची व्यवस्था कराल का?” लवकरच ही व्यवस्था करण्यात आली आणि तेव्हापासून ६० पेक्षा जास्त जण नियमित सभांना येऊ लागले आहेत.

युरोपियन युनियनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्‍याने टुवालू येथे सुरू असलेल्या प्रकल्पाला भेट दिली. तेथे काम करणाऱ्‍या एका बांधवाला ते म्हणाले: “मला तर हा एक चमत्कारच वाटतो! अर्थात, मला खातरी आहे की येथे येणाऱ्‍या प्रत्येकाला असेच वाटत असेल.” टेलिफोन एक्सचेंजमध्ये काम करणाऱ्‍या एका स्त्रीने असे म्हटले: “इतके उष्ण हवामान असूनही तुमचे सर्वांचे चेहरे इतके प्रसन्‍न कसे काय दिसतात!” ख्रिस्ती तत्त्वांनुसार इतक्या लोकांना मिळून मिसळून, निःस्वार्थपणे काम करताना त्यांनी पहिल्यांदाच पाहिले होते.

आनंदाने केलेले त्याग

बायबल म्हणते: “जो सढळ हाताने पेरतो तो त्याच मानाने कापणी करील.” (२ करिंथकर ९:६) खरोखरच बांधकामाच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या बांधवांनी, त्यांच्या कुटुंबांनी व त्यांच्या मंडळ्यांनी देखील प्रशांत महासागरातील द्वीपांवर राहणाऱ्‍या आपल्या इतर बांधवांना मदत करण्यासाठी सढळ हाताने पेरणी केली असे म्हणता येईल. सिडनीजवळ असलेल्या किनकम्बर नावाच्या गावातील एक वडील सांगतात: “माझ्या विमानाच्या तिकिटाचे निम्म्यापेक्षा जास्त पैसे माझ्या मंडळीच्या बांधवांनी दिले; शिवाय माझ्यासोबत प्रकल्पात काम करण्यासाठी आलेल्या माझ्या मेव्हण्याने आणखी ५०० डॉलर दिले.” एका बांधवाने या प्रकल्पाच्या प्रवास खर्चाकरता आपली कार विकली. इतर काहींनी आपल्या जमिनी विकल्या. केविन नावाच्या एका बांधवाला ९०० डॉलर कमी पडत होते. तेव्हा त्याने त्याच्याजवळ असलेली दोन दोन वर्षांची १६ कबुतरे विकली. एका ओळखीच्या माणसाने एका ग्राहकाशी त्याची ओळख करून दिली आणि त्याने ती कबुतरे ९०० डॉलरला विकत घेतली!

“कोणत्याही प्रकारचा आर्थिक मोबदला न घेता, विमानाचा खर्च देखील स्वतःच भरून, या प्रकल्पांवर काम करायला जाणे म्हणजे तुम्हाला जवळजवळ ६,००० डॉलर्सचा तोटा झाला असे तुम्हाला वाटत नाही का?” असे विचारण्यात आले तेव्हा डॅनी व शेरिल म्हणाले: “मुळीच नाही! दुप्पट खर्च झाला असता तरीही आमचाच फायदा झाला असता.” न्यूझीलंडच्या नेल्सन या गावात राहणाऱ्‍या ॲलनने सांगितले: “टुवालू येथे जाण्यासाठी जो खर्च आला त्यापेक्षा कमी पैशात मी युरोपला जाऊन येऊ शकत होतो; पण टुवालू येथे गेल्यामुळे मला मिळालेले आशीर्वाद, इतक्या निरनिराळ्या भाषा व संस्कृतींचे मित्रमैत्रीणी आणि दुसऱ्‍यांसाठी काहीतरी करण्याची बहुमोल संधी मला मिळाली असती का? या द्वीपांवर राहणाऱ्‍या बांधवांसाठी मी जो थोडाबहुत त्याग केला त्याच्या बदल्यात मला कितीतरी जास्त प्रतिफळ मिळाले!”

बांधकामाचा हा कार्यक्रम यशस्वी होण्याचे आणखी एक कारण म्हणजे प्रकल्पांत काम करायला आलेल्यांच्या कुटुंबांचा आधार व पाठिंबा. काही बांधवांच्या पत्नी त्यांच्यासोबत आल्या होत्या. पण काहींची मुले अजून शाळेला जाणारी असल्यामुळे, शिवाय दुसरी कामे व कुटुंबांचा व्यवसाय असल्यामुळे काही जणांच्या पत्नींना येथे काम करण्यासाठी येता आले नाही. क्ले नावाचे एक बंधू म्हणतात: “माझ्या पत्नीने मुलांची आणि घरच्या सगळ्या व्यवहारांची काळजी घेण्याची तयारी दाखवल्यामुळेच मी जाऊ शकलो. तिने केलेला त्याग माझ्यापेक्षा मोठा आहे.” प्रकल्पात सामील झालेले बरेचजण क्ले यांच्या म्हणण्याशी सहमत आहेत यात शंका नाही.

टुवालू येथील प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर फिजी, टांगा, पापुआ न्यू गिनी, न्यू कॅलेडोनिया आणि इतर ठिकाणीही राज्य सभागृहे, संमेलन गृहे, मिशनरी गृहे आणि भाषांतर कार्यालयांचे बांधकाम हाती घेण्यात आले. तसेच आग्नेय आशिया व इतर ठिकाणी आणखी बऱ्‍याच प्रकल्पांची तयारी सुरू आहे. या सर्व प्रकल्पांसाठी पुरेसे कामगार मिळतील का?

अगदी सहज. कारण हवाई शाखा दफ्तराच्या एका वृत्तानुसार “याआधीच्या प्रकल्पांत भाग घेतलेल्या सर्वांनी पुढे गरज पडल्यास आम्हाला बोलवा असे सांगून ठेवले आहे. घरी पोचताच पुढच्या प्रकल्पासाठी पैसे साठवायला सुरवात करू असेही त्यांनी सांगितले.” बांधवांची अशी ही निःस्वार्थ समर्पणाची वृत्ती आणि जोडीला यहोवा देवाचा विपुल आशीर्वाद असल्यानंतर प्रत्येक प्रकल्प यशस्वीच ठरेल यात काही शंका आहे का?

[९ पानांवरील चित्र]

बांधकामाचे साहित्य

[९ पानांवरील चित्रे]

बांधकामाच्या ठिकाणी कामात गढलेले कामगार

[१० पानांवरील चित्रे]

यहोवाच्या आत्म्यामुळे प्रकल्प पूर्ण झाल्याचे पाहून सर्वांना खूप आनंद झाला