व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्ही थांबायला शिकला आहात का?

तुम्ही थांबायला शिकला आहात का?

तुम्ही थांबायला शिकला आहात का?

फक्‍त प्रतीक्षा करण्यातच आपला किती वेळ जातो याचा कधी तुम्ही विचार केलात का? रेशनची लाइन असो अथवा पेट्रोलची, आपला नंबर येईपर्यंत तर थांबावेच लागते. हॉटेलमध्ये बसलेले असताना देखील वेटरने आपली ऑडर देईपर्यंत धीर धरावाच लागतो. बसने जायचे असो किंवा ट्रेनने, प्रतीक्षा ही ठरलेलीच; इतकेच नव्हे तर डॉक्टर आणि डेंटिस्टकडेसुद्धा थांबणे भागच असते. होय, प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला प्रतीक्षा करावी लागते. इतकी की लोकांचे अर्धे आयुष्य केवळ प्रतीक्षा करण्यातच जाते. एका सर्वेक्षणानुसार, केवळ ट्रॅफिक जॅममध्येच जर्मनीतील लोकांचे दर वर्षी ४.७ अब्ज तास खर्च होतात. ही केवळ एकाच देशाची गोष्ट झाली. किंबहुना, प्रतीक्षा करण्यात घालवलेले ४.७ अब्ज तास वास्तवात ७,००० लोकांच्या अपेक्षित आयुर्मर्यादेइतके आहेत असा अंदाज आहे.

प्रतीक्षा करणे ही अगदी जिवावर येणारी गोष्ट आहे हे मान्य आहे. कारण एक तर आधीच आपल्याकडे कमी वेळ असतो आणि त्यात असंख्य विचार मनात असतात. अशात प्रतीक्षा करण्यात वेळ घालवणे म्हणजे आपल्या सहनशीलतेची परीक्षाच म्हणावी लागेल. या विषयी लेखक ॲलेक्सझॅन्डर रोस यांनी म्हटले: “अर्धे आयुष्य तर प्रतीक्षा करण्यातच जाते आणि त्यामुळे फार दुःख होते.”

अमेरिकेतील बेन्जमिन फ्रँकलीन या नेत्याचे असे म्हणणे आहे, की प्रतीक्षा करण्यात आपला बहुमोल वेळ खर्च होतो. सुमारे २५० वर्षांआधी त्यांनी असे म्हटले होते की, “वेळ फार मौल्यवान आहे.” म्हणूनच तर व्यापारी आपल्या धंद्यात वेळ घालवत बसणे पसंत करत नाहीत. कारण कमीत कमी वेळात जास्तीत जास्त माल उत्पन्‍न झाला तर साहजिकच त्यांना जास्त नफा मिळेल. ज्या व्यापाऱ्‍यांना जनतेशी प्रत्यक्षपणे व्यवहार करावा लागतो ते ग्राहकांना जास्त वेळ थांबून ठेवत नाहीत. उदाहरणार्थ, फास्ट फूड सेंटर, आपल्या गाडीतून न उतरताच व्यवहार करण्याच्या सुविधा, वगैरे. आपल्या ग्राहकांना खुश ठेवण्याचा मार्ग व्यापाऱ्‍यांना माहीत असतो; तो म्हणजे, लवकरात लवकर त्यांची सेवा करणे.

प्रतीक्षा करण्यातच उभे आयुष्य जाते

एकोणिसाव्या शतकात अमेरिकेतील रॅल्फ वॅल्डो एमरसन या कवीने एकदा म्हटले: “असे वाटते की जणू जीवनाचे दुसरे नाव प्रतीक्षा आहे!” याला दुजोरा देत लेखक लॅन्स मॉरो यांनी प्रतीक्षा करताना किती कंटाळा येतो आणि त्रास होतो याविषयी सांगितले. पण, यासोबत त्यांनी आणखी एका त्रासाविषयी सांगितले. तो कोणता? “ही एक जाणीव असते की तुम्ही तुमचा बहुमोल वेळ, तुमची बहुमोल साधने आणि आयुष्यातले बहुमोल क्षण जे पुन्हा कधीच परत येणार नाहीत वाया घालवत आहात.” हे एक कटू सत्य आहे! जो वेळ केवळ वाट पाहण्यात, प्रतीक्षा करण्यात जातो तो कधीच परत येत नाही.

आपले जीवन अल्पावधीचे नसते तर प्रतीक्षा करण्याविषयी आपल्याला काहीच वाटले नसते. पण, वास्तविकता ही आहे, की आपले जीवन खरोखर क्षणभंगुर आहे! हजारो वर्षांपूर्वी बायबलमधील स्तोत्रकर्त्याने म्हटले होते: “आमचे आयुष्य सत्तर वर्षे—आणि शक्‍ति असल्यास फार तर ऐंशी वर्षे असले, तरी त्याचा डामडौल केवळ कष्टमय व दु:खमय आहे, कारण ते लवकर सरते आणि आम्ही निघून जातो.” (स्तोत्र ९०:१०) जगाच्या पाठीवर आपण कोठेही राहात असलो आणि आपण कोणीही असलो तरी आपले जीवन अर्थात जन्म व मृत्यूपर्यंतचा काळ जणू क्षणाभराचा आहे. पण, तरीसुद्धा बऱ्‍याचदा आपला बहुमोल वेळ लोकांची वाट पाहण्यात किंवा कुठले तरी काम पूर्ण होण्याच्या प्रतिक्षेत वाया जातो.

प्रतीक्षा करण्यास शिका

कित्येक वेळा तुम्ही अशा ड्रायव्हरसोबत प्रवास केला असेल जो नेहमी इतर गाड्यांना ओव्हरटेक करून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो. बऱ्‍याचदा असे दिसून येते की ड्रायव्हरांना मुळीच घाई नसते; तरीसुद्धा ते ओव्हरटेक करून जातात. कारण आपल्यापुढे कमी स्पीडने गाडी चालवणारा ड्रायव्हर आपला स्पीड कमी करतो आहे ही गोष्ट त्यांना अजिबात सहन होत नाही. यातून त्यांचा अधीरपणा तर दिसून येतोच, शिवाय, ते प्रतीक्षा करण्यास शिकले नाहीत हे देखील सिद्ध होते. शिकले नाहीत? म्हणजे? होय, प्रतीक्षा करायलाही शिकले पाहिजे कारण प्रतीक्षा करण्याचा गुण अनुवांशिकपणे आपल्याला मिळत नाही. तर तो शिकावा लागतो. लहान मुलांना भूक लागते किंवा काही त्रास होतो तेव्हा ते धीर धरत नाही; लगेच रडायला लागतात. पण, जसजसे ते मोठे होतात तसतसे काही गोष्टी मिळवण्यासाठी आपल्याला धीरही धरावा लागेल याची जाणीव त्यांना होऊ लागते. आपणा सर्वांना माहितच आहे, की धीर धरणे हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. तेव्हा धीर धरून प्रतीक्षा कशी करावी हे जाणून घेणे शहाणपणाचे ठरेल. त्यावरून आपण प्रौढ आहोत हे देखील दिसून येईल.

अर्थात, कधी कधी परिस्थितीमुळे आपण अधीर अथवा उतावीळ होतो हे समजण्याजोगे आहे. उदाहरणार्थ, एक तरुण पती आपल्या पत्नीला मोठ्या घाईगडबडीने हॉस्पिटलला घेऊन जात आहे कारण लवकरच ती बाळंत होणार आहे. अशा वेळी जास्त उशीर होऊ नये म्हणून साहजिकच तो थांबून राहणार नाही; तो अगदी अधीर होतो. आणखीन एक उदाहरण लक्षात घ्या. लोट आणि त्याच्या कुटुंबाचे जीवन धोक्यात होते. त्यामुळे स्वर्गदूताने लोटाला लवकरात लवकर सदोम देश सोडून जाण्याची घाई केली. लोट मात्र उशीर करत होता. पण, कोणत्याही क्षणी नाश येण्याची शक्यता असल्यामुळे देवदूत त्याच्यासाठी थांबू शकत नव्हते. (उत्पत्ति १९:१५, १६) पण अनेक प्रसंगी, लोकांना कुठल्यातरी गोष्टीसाठी प्रतीक्षा करणे भाग असते तेव्हा त्यांचे जीवन धोक्यात नसते. अशा वेळी प्रत्येक व्यक्‍ती सबुराईने काम करण्यास शिकली तर कुठलीही समस्या मग ती कोणत्या तरी चुकीमुळे उद्‌भवलेली असो अथवा हलगर्जीपणामुळे उद्‌भवलेली असो वातावरण अगदी शांत राहते. त्यातल्या त्यात प्रत्येक व्यक्‍तीने प्रतीक्षा करताना आपल्या वेळेचा चांगल्याप्रकारे उपयोग केला तर थांबून राहणे सोपे जाते. त्यासाठी पृष्ठ ५ वरील चौकटीत काही मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. प्रतीक्षा करताना वेळेचा सदुपयोग करण्यास आणि धीर धरण्यास या सूचना आपली मदत करतील.

एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवण्यास हवी. ती म्हणजे अधीर अथवा उतावळे लोक सहसा फार घमंडी असतात आणि ते स्वतःला फार मोठे समजतात. त्यांना प्रतीक्षा करताच येत नाही. अशा लोकांनी बायबलच्या या वचनावर लक्ष देण्यास हवे: “एखाद्या गोष्टीच्या आरंभापेक्षा तिचा शेवट बरा; उन्मत्त मनाच्या इसमापेक्षा सहनशील मनाचा इसम बरा.” (उपदेशक ७:८) उन्मत्त मनाचा अथवा गर्विष्ठ मनाचा मनुष्य दाखवून देतो, की त्याचा स्वभाव चांगला नाही आणि अशांविषयी बायबलमध्ये म्हटले आहे: “प्रत्येक गर्विष्ठ मनाच्या मनुष्याचा परमेश्‍वराला वीट येतो.” (नीतिसूत्रे १६:५) धीर धरण्यास अथवा प्रतीक्षा करण्यास शिकायचे असल्यास स्वतःच्या आणि इतरांसोबतच्या आपल्या नातेसंबंधाचे चांगले परीक्षण करणे आवश्‍यक आहे.

धीराचे प्रतिफळ

आपण जी गोष्टी प्राप्त करण्यासाठी थांबलो आहोत ती आपल्या फायद्यासाठी असून आपल्याला ती जरूर मिळेल याची खात्री आपल्याला पटते तेव्हा प्रतीक्षा करणे सहजसोपे असते. देवाचे सर्व उपासक देखील बायबलमधील अभिवचने जरूर पूर्ण होतील याची खात्री बाळगतात. उदाहरणार्थ, एका स्तोत्रात असे म्हटले आहे: “नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करितील.” आणि याच अभिवचनाला दुजोरा देत प्रेषित योहानाने म्हटले: “देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.” (स्तोत्र ३७:२९; १ योहान २:१७) आपल्याला अनंतकाळचे जीवन मिळाले तर प्रतीक्षा करणे मुळीच जिवावर येणार नाही. पण, सध्याचे आपले जीवन तर अनंतकाळाचे नाही. मग, अनंतकाळच्या जीवनाविषयी बोलण्यात काही तथ्य आहे का?

याचे उत्तर मिळवण्याआधी हे लक्षात घ्या की देवाने आपल्या पहिल्या आई-वडिलांना अनंतकालिक जीवन जगण्यासाठीच बनवले होते. परंतु, त्यांनी पाप केल्यामुळे अनंतकालिक जीवन त्यांच्या हातून निसटून गेले. आणि त्यामुळे त्यांची मुले अर्थात आपण सर्वजणही अनंतकालिक जीवनाच्या आशेला पारखे झालो. आदाम आणि हव्वेने पाप केल्यानंतर लगेच, पापाचे परिणाम नष्ट करण्याचा आपला उद्देश देवाने प्रकट केला. देवाने एका ‘संततीचे’ अभिवचन दिले; ही संतती म्हणजे येशू ख्रिस्त.—उत्पत्ति ३:१५; रोमकर ५:१८.

आपण देवाच्या अभिवचनांचा फायदा घेऊ इच्छितो की नाही हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे. फायदा घेण्यासाठी धीर धरण्याची गरज आहे. धीर धरण्याचा धडा शिकवण्यासाठी बायबल आपल्याला एका शेतकऱ्‍याचे उदाहरण देते. शेतात पेरणी केल्यानंतर शेतकरी केवळ धीराने वाट पाहू शकतो. आणि कापणी करण्याची वेळ येईपर्यंत तो शेताची केवळ राखण करू शकतो. त्याची मेहनत यशस्वी ठरते तेव्हा कुठे त्याला आपल्या धीराचे प्रतिफळ मिळते. (याकोब ५:७) धीराविषयी प्रेषित पौल आणखी एक उदाहरण देतो. तो आपल्याला प्राचीन काळातल्या विश्‍वासू स्त्रीपुरुषांची आठवण करून देतो. हे विश्‍वासू लोक देवाच्या अभिवचनांच्या पूर्तीची वाट पाहत होते. पण, त्यांना देवाच्या नियुक्‍त समयापर्यंत प्रतीक्षा करावी लागली. “विश्‍वासाच्या व धीराच्या योगे जे अभिवचनांचा वारसा उपभोगणारे होतात त्यांचे तुम्ही अनुकारी व्हावे” असे उत्तेजन पौलही आपल्याला देतो.—इब्री लोकांस ६:११, १२.

होय, या जगात कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी आपल्या सर्वांनाच थांबून राहावे लागते. पण, त्यामुळे निराश होण्याची गरज नाही. जे लोक देवाची अभिवचने पूर्ण होण्याची प्रतीक्षा करत आहेत त्यांच्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे. आणि प्रतीक्षा करत असताना ते देवासोबत आपला नातेसंबंध आणखीन मजबूत करू शकतात व आपल्या विश्‍वासानुसार ते कार्यही करतात. इतकेच नाही तर प्रार्थना, अभ्यास आणि मनन करण्याद्वारे देखील ते या गोष्टीवर पूर्ण विश्‍वास ठेवू शकतात की देवाने जे काही भाकीत केले आहे ते सर्व तो जरूर पूर्ण करील.

[५ पानांवरील चौकट/चित्रे]

प्रतीक्षा सुखावह होऊ शकते!

त्यासाठी आधीपासूनच योजना करा! तुम्हाला बराच वेळ थांबून राहावे लागेल हे आधीच माहीत असल्यास लिहिण्या-वाचण्यासाठी काही पुस्तके, विणकामाचे साहित्य किंवा मग वेळेचा सदुपयोग करण्यासाठी इतर काही वस्तू तुम्ही सोबत घेऊ शकता.

आपले जीवन अतिशय धावपळीचे असल्यामुळे मनन-चिंतन करण्यासाठी वेळ काढणे फार कठीण होते. तेव्हा, प्रतीक्षा करत असताना मनन करण्यासाठी तुम्ही त्या वेळेचा उपयोग करू शकता.

फोनजवळ काही मासिके-पुस्तके तुम्ही ठेवू शकता. म्हणजे फोनवर बोलत असताना तुम्हाला थांबावे लागले तर तुम्ही वाचन करू शकता. त्यामुळे तुमचा वेळही वाया जाणार नाही. पाच-दहा मिनिटांतही तुमचे बरेच वाचन होऊ शकते.

एखाद्या गटामध्ये असताना तुम्हाला प्रतीक्षा करावी लागली तर योग्य वाटल्यास गटातील इतरांसोबत तुम्ही संभाषण सुरू करू शकता आणि चांगल्या विचारांचे आदानप्रदान करण्यात तुम्ही वेळ घालवू शकता. त्यामुळे सगळ्यांनाच फायदा होईल.

तुम्ही तुमच्या गाडीत लिहिण्या-वाचण्यासाठी एखादे नोट-पॅड अथवा मासिके-पुस्तके ठेवल्यास प्रतीक्षा करत असताना तुमचा वेळ वायफळ खर्च होणार नाही.

प्रतीक्षा करत असताना आपले डोळे बंद करून तुम्ही थोडी विश्रांती घेऊ शकता किंवा मग प्रार्थना करू शकता.

आधीपासूनच योजना केल्यास आणि योग्य मनोवृत्ती राखल्यास प्रतीक्षा करणे सुखावह होऊ शकते!