व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘पुनर्स्थापनेचा काळ’ अत्यंत समीप!

‘पुनर्स्थापनेचा काळ’ अत्यंत समीप!

‘पुनर्स्थापनेचा काळ’ अत्यंत समीप!

येशू ख्रिस्त स्वर्गात जाण्याच्या काही समयापूर्वी त्याच्या काही विश्‍वासू शिष्यांनी त्याला विचारले: “प्रभुजी, ह्‍याच काळात आपण इस्राएलाचे राज्य पुन्हा स्थापित करणार काय?” या प्रश्‍नाचे येशूने जे उत्तर दिले त्यावरून हे लक्षात येते, की त्याचे राज्य येण्यासाठी आणखी बराच अवकाश होता. आणि त्या कालावधीत त्याच्या शिष्यांना बरेच काम उरकायचे होते. त्यांना “सर्व यहूदीयात, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत” येशूबद्दल साक्ष द्यायची होती.—प्रेषितांची कृत्ये १:६-८.

पण हे कार्य काही दिवसांत, काही सप्ताहांत अथवा काही महिन्यांत उरकण्यासारखे नव्हते. त्यासाठी बराच काळ लागणार होता. हे माहीत असूनही शिष्यांनी मागेपुढे न पाहता लगेच हे कार्य हाती घेतले. हे करत असताना राज्याच्या पुनर्स्थापनेची आशा त्यांनी आपल्या मनात प्रज्वलित ठेवली. त्यामुळेच तर पेत्र यरूशलेमेत एक मोठ्या समूहापुढे म्हणू शकला: “तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्‍चात्ताप करा व वळा; अशासाठी की, विश्रांतीचे समय प्रभूजवळून यावे; आणि तुम्हाकरिता पूर्वी नेमलेला ख्रिस्त येशू ह्‍याला त्याने पाठवावे; सर्व गोष्टी पूर्वस्थितीला पोहंचण्याच्या ज्या काळाविषयी देवाने आरंभापासून आपल्या पवित्र संदेष्ट्यांच्या मुखाने सांगितले त्या काळापर्यंत येशूला स्वर्गात राहणे प्राप्त आहे.” (तिरपे वळण आमचे.)—प्रेषितांची कृत्ये ३:१९-२१.

देवाचे राज्य सुरू होईल तेव्हा सर्व गोष्टी “पूर्वस्थितीला पोहंचण्याचा काळ” येईल. आणि त्यावेळी देवाकडून “विश्रांतीचे समय” येतील. हे पूर्वस्थितीला पोहंचणे अथवा पुनर्स्थापना दोन टप्प्यांत होईल. प्रथम आध्यात्मिकरित्या पुनर्स्थापना होईल जी आजही काही प्रमाणात होत आहे. त्यानंतर, सबंध पृथ्वीची पुनर्स्थापना होईल. याचा अर्थ, एका नवीन सुंदर जगाची पुनर्स्थापना होणार.

पुनर्स्थापनेचा काळ केव्हा सुरू होतो?

पेत्राने त्या जनसमूहाला म्हटले त्याप्रमाणे, ‘येशूला स्वर्गात राहणे प्राप्त होते.’ याचा अर्थ, आपले राज्य सुरू होण्याआधी येशूला काही समयापर्यंत थांबून राहावे लागणार होते. त्याला १९१४ पर्यंत थांबावे लागले. त्या वर्षी देवाने त्याला राजा म्हणून नियुक्‍त केले व त्याला सत्ता बहाल केली. याशिवाय, यहोवा देव येशूला ‘पाठवणार’ असेही पेत्राने म्हटले होते. त्याचा अर्थ, यहोवाचा उद्देश पूर्ण करण्यात येशू ख्रिस्त एक महत्त्वाची भूमिका पार पाडतो. या गोष्टीला लाक्षणिक भाषेत, बायबल म्हणते: “सर्व राष्ट्रांवर लोखंडी दंडाने राज्य करील असा पुत्र म्हणजे पुसंतान [अर्थात परमेश्‍वराचे राज्य ज्याचा राजा येशू ख्रिस्त आहे] ती [म्हणजे देवाची स्वर्गीय संघटना] प्रसवली; ते तिचे मूल देवाकडे व त्याच्या राजासनाकडे वर नेण्यात आले.”—प्रकटीकरण १२:५.

पण, राष्ट्रांनी येशूला आपला राजा म्हणून स्वीकारले नाही. त्याऐवजी पृथ्वीवरील त्याच्या प्रजेचा अर्थात यहोवाच्या साक्षीदारांचा त्यांनी छळ केला. परंतु, साक्षीदार घाबरून मागे हटले नाहीत. पहिल्या शतकातल्या प्रेषितांप्रमाणे ते ‘येशूविषयी साक्ष देतच’ राहिले. (प्रकटीकरण १२:१७) त्यामुळे त्यांच्यावरील अत्याचार अधिकाधिक वाढत गेला. एकानंतर एक राष्ट्र त्यांचे शत्रू बनत गेले. आणि १९१८ साली न्यू यॉर्कच्या ब्रुकलीन शहरात, वॉच टावर संस्थेच्या मुख्यालयात काम करणाऱ्‍या काही जबाबदार बांधवांवर खोटे आरोप लावून त्यांना न्यायालयात खेचण्यात आले आणि त्यांना दीर्घ मुदतीची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यावेळी असे वाटले जणू देवाचे काम आता ठप्पच पडते; आणि “पृथ्वीच्या शेवटापर्यंत” साक्ष देण्याच्या कामालाही कायमचा पायबंद बसतो की काय.—प्रकटीकरण ११:७-१०.

पण, १९१९ साली त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली. नंतर त्यांच्यावर लावलेले सगळे आरोप देखील मागे घेण्यात आले. त्यानंतर वेळ न घालवता खऱ्‍या उपासनेला बढावा देण्याच्या कामात ते पुन्हा व्यस्त झाले. अशाप्रकारे आध्यात्मिक पुनर्स्थापनेने जोर धरला. तेव्हापासून यहोवाचे लोक आध्यात्मिकरित्या अविरत प्रगती करत आहेत.

येशू ख्रिस्ताच्या आज्ञेनुसार सर्व राष्ट्रांतील लोकांना आध्यात्मिक शिक्षण देण्याचे काम त्यांनी मोठ्या प्रमाणात हाती घेतले आहे. (मत्तय २८:२०) आणि त्यांचा संदेश ऐकून बऱ्‍याच लोकांनी आपल्या जीवनात मोठे बदल केले हा त्यांच्यासाठी खरोखरच एक सुखद अनुभव आहे. एकेकाळी पाश्‍वी वृत्ती असलेल्या लोकांनी “क्रोध,” “निंदा,” “शिवीगाळ,” आणि यासारख्या इतर वाईट सवयी असलेले आपले जुने व्यक्‍तिमत्त्व काढून टाकले आणि नवीन व्यक्‍तिमत्त्व धारण केले आहे. हे नवीन व्यक्‍तिमत्त्व “आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवे केले जात आहे.” अशाप्रकारे संदेष्ट्यांचे हे शब्द आध्यात्मिकदृष्ट्या पूर्ण झाले आणि आताही पूर्ण होत आहेत: “लांडगा [जो मनुष्य पूर्व लांडग्यासारखा वागायचा] कोकराजवळ [नम्र स्वभावाच्या लोकांजवळ] राहील, चित्ता करडाजवळ बसेल, वासरू, तरुण सिंह व पुष्ट बैल एकत्र राहतील.”—कलस्सैकर ३:८-१०; यशया ११:६,.

लवकरच—आणखी पुनर्स्थापना

आज आध्यात्मिकदृष्ट्या होत असलेली पुनर्स्थापना आपण पाहातच आहोत. पण, सबंध पृथ्वीवर पुन्हा एकदा एका नयनरम्य बागेसारखी परिस्थिती आणली जाईल. तो दिवसही अत्यंत जवळ आहे. आपण ‘पुन्हा एकदा’ असे यासाठी म्हणतो कारण सुरवातीला यहोवाने आदाम आणि हव्वेला बनवले तेव्हा त्यांना याच पृथ्वीवर, एदेन नावाच्या एका नयनरम्य बागेत ठेवले होते. (उत्पत्ति १:२९-३१) अगदी तसेच नयनरम्य वातावरण पुन्हा स्थापन होणार आहे. पण, त्याआधी, देवाचा अपमान करणाऱ्‍या खोट्या धर्मांना नष्ट केले जाईल. प्रथम जगातील राजकीय घटक त्यांचा नाश करतील. (प्रकटीकरण १७:१५-१८) त्यानंतर राजकीय घटकांचा, व्यापारी संघटनांचा आणि त्यांना पाठबळ देणाऱ्‍यांचाही नाश केला जाईल. शेवटी, देवाचा सगळ्यात मोठा शत्रू सैतान आणि त्याच्या पिशाच्चांना अथांग डोहात टाकले जाईल. तेव्हा पृथ्वीच्या पुनर्स्थापनेचे काम सुरू होईल. पुनर्स्थापनेचा हा काळ हजार वर्षांचा असेल. त्यादरम्यान “अरण्य व रुक्ष भूमि ही हर्षतील; वाळवंट उल्लासेल व कमलाप्रमाणे फुलेल.” (यशया ३५:१) सबंध पृथ्वीवर सुख-शांती नांदेल. (यशया १४:७) आजपर्यंत ज्या कोट्यवधी लोकांचा मृत्यू झाला आहे त्यांना पुन्हा जिवंत केले जाईल. त्यावेळी जगातले सर्व लोक येशूच्या खंडणी बलिदानाचा पुरेपूर लाभ घेऊ शकतील. (प्रकटीकरण २०:१२-१५; २२:१, २) त्यावेळी कोणी अंधळा, बहिरा आणि लंगडा नसेल. “‘मी रोगी आहे,’ असे एकहि रहिवासी म्हणणार नाही.” (यशया ३३:२४) एक हजार वर्षांच्या अखेरीस सैतानाला आणि त्याच्या दूतांना काही काळापर्यंत मुक्‍त केले जाईल. तेव्हा, देवाने पृथ्वीसंबंधित आपला उद्देश किती उत्तमरितीने पूर्ण केला हे ते पाहतील! यानंतर सैतान आणि त्याच्या दूतांचा कायम नाश केला जाईल.—प्रकटीकरण २०:१-३.

हजार वर्षे पूर्ण झाल्यानंतर जेव्हा सर्व गोष्टी पूर्वस्थिला पोहंचविल्या जातील तेव्हा “प्रत्येक प्राणी परमेशाचे [“यहोवाचे,” NW] स्तवन” करील आणि सदासर्वकाळ ते यहोवाची स्तुती करत राहतील. (स्तोत्र १५०:६) यांत तुम्ही देखील असाल का?