व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवा नेहमी त्याच्या निष्ठावान लोकांना प्रतिफळ देतो

यहोवा नेहमी त्याच्या निष्ठावान लोकांना प्रतिफळ देतो

जीवन कथा

यहोवा नेहमी त्याच्या निष्ठावान लोकांना प्रतिफळ देतो

व्हर्नन डन्कम यांच्याद्वारे कथित

रात्र होत आली होती; मी थोडंसं काही तरी खाल्लं आणि नेहमीप्रमाणे सिगारेट पेटवली. मग माझ्या पत्नीला, आयलीनला विचारलं: “आज सभा कशी होती?”

तीथोडा वेळ शांत राहिली आणि मग म्हणाली: “आज, काही लोकांना नवीन नियुक्‍त्‌या दिल्या. त्यांची नावे वाचून दाखवलीत. तुमचंही नाव होतं. तुम्हाला साऊंड सांभाळायचं काम दिलंय. पण त्या पत्रात शेवटी असं म्हटलं होतं की: ‘नवीन नियुक्‍त्‌या मिळालेल्या या बांधवांपैकी कोणाला तंबाखूची सवय असेल तर ही नियुक्‍ती ते करू शकत नाहीत असे त्यांनी संस्थेला लिहून पाठवणे आवश्‍यक आहे.’” * मी म्हणालो, “अच्छा! असं सांगितलं का?”

मी मोठ्या मुश्‍किलीनं जवळच असलेल्या ॲशट्रेमध्ये सिगारेट विझवली आणि म्हणालो, “मला कशाला निवडलं कोण जाणे. पण मी कोणत्याही कामाला नाही म्हटलं नाही—आणि म्हणणारही नाही.” त्यापुढे कधीच धूम्रपान करायचं नाही असा मी पक्का निर्धार केला. त्या निर्णयामुळे माझ्या ख्रिस्ती जीवनशैलीवर तसंच माझ्या संगीताच्या कारकीर्दीवर बराच परिणाम झाला. हा निर्धार मी का केला त्याची कहाणी तुम्हाला ऐकवतो.

माझं कुटुंब

माझा जन्म सप्टेंबर २१, १९१४ साली कॅनडातल्या टोरोंटो शहरात झाला. घरामध्ये मी सर्वात मोठा मुलगा होतो. माझ्याशिवाय आणखी तीन भाऊ आणि दोन बहिणी होत्या. माझ्या आईवडिलांचं नाव व्हर्नन आणि लैला होतं. ते फार प्रेमळ आणि मेहनती होते. माझ्या पाठोपाठ योर्क, मग ओर्लांडो, मग डग्लस, नंतर आयलीन आणि कोरल. मी नऊ वर्षांचा असतानाच माझ्या आईने मला व्हायोलीन आणून दिलं आणि हॅरिस संगीत शाळेत माझं नाव टाकलं. तेव्हा आमची आर्थिक स्थिती फारशी चांगली नव्हती तरीही आईबाबा कसंही करून माझ्या येण्याजाण्याचा आणि शाळेच्या ट्युशनचा खर्च भागवायचे. त्यानंतर, मी संगीताची थियरी आणि हार्मनी हे दोन विषय टोरोंटोच्या रॉयल कॉन्सर्व्हेटरी ऑफ म्युझिक इथं पूर्ण केले. मग, १२ वर्षांचा असताना टोरोंटोच्या मुख्य शहरातील मॅसी हॉल या सुप्रसिद्ध संगीतगृहात एक संगीत स्पर्धा झाली; त्यामध्ये संपूर्ण शहरातील स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्या स्पर्धेत मी जिंकलो आणि मला सुसरीच्या कातडीच्या केसमध्ये असलेलं एक उत्कृष्ट व्हायोलिन भेट म्हणून देण्यात आलं.

नंतर, मी पियानो आणि बेस व्हायोलिनसुद्धा वाजवायला शिकलो. आम्ही सहसा शुक्रवारी आणि शनिवारी संध्याकाळी आयोजित केलेल्या लहानसहान पार्ट्यांमध्ये किंवा विद्यार्थ्यांनीच आयोजित केलेल्या डान्सेसमध्ये संगीत वाजवायचो. अशाच एका डान्स पार्टीत माझी भेट आयलीनशी झाली. कॉलेजातल्या शेवटच्या वर्षात असताना मी शहराच्या बाहेरही विविध ऑर्केस्ट्रांमध्ये जात होतो. डिग्री घेतल्यावर मी फर्डी माऊरी ऑर्केस्ट्रात सामील झालो; १९४३ पर्यंत हा ऑर्केस्ट्रा चांगला चालला होता. मला चांगला पगारही मिळत होता.

यहोवाची ओळख होणे

पहिलं महायुद्ध सुरू होण्याच्या काही काळाआधीच माझ्या आईवडिलांना प्रथम बायबल सत्य मिळालं; त्या वेळी माझे बाबा टोरोंटोच्या मुख्य शहरातील एका डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये नोकरी करत होते. जेवणाच्या खोलीत दोन बायबल विद्यार्थी (यहोवाच्या साक्षीदारांना आधी हे नाव होतं) दररोज काही ना काही चर्चा करायचे. बाबा त्यांची चर्चा ऐकायचे आणि घरी येऊन आईला त्याविषयी सांगायचे. काही वर्षांनंतर, १९२७ मध्ये, टोरोंटो येथील कॅनेडियन नॅशनल एक्झीबिशन ग्राऊंड्‌स येथील स्टेडियममध्ये बायबल विद्यार्थ्यांचं एक मोठं अधिवेशन भरवलं गेलं. त्या स्टेडियमच्या पश्‍चिमेकडील गेटपासून आमचं घर फक्‍त दोन ब्लॉक दूर होतं. आमच्या घरात अमेरिकेतील ओहायो येथून आलेल्या २५ लोकांच्या राहण्याची सोय केली होती.

त्या अधिवेशनानंतर, एडा ब्लेटसो नामक एक बायबल विद्यार्थीनी माझ्या आईला नियमितपणे भेटू लागली; ती आईला नवनवीन साहित्य देऊन जात असे. एकदा ती म्हणाली: “मिसेस डन्कम मी गेल्या कित्येक दिवसांपासून तुम्हाला साहित्य देत आलेय. पण तुम्ही कधी ते वाचलंय का?” आईला सहा मुलांचं काम उरकावं लागायचं तरीही तेव्हापासून सगळीच मासिकं-पुस्तकं वाचायचं असं आईने ठरवलं. आणि खरोखरंच ती नियमितपणे वाचू लागली. पण, मी कधी ते पाहायची तसदीही घेतली नाही. मी आपली डिग्री पूर्ण करायचा प्रयत्न करत होतो. शिवाय, मी संगीतात फारच बुडालो होतो.

जून १९३५ साली आयलीन आणि माझा विवाह एका अँग्लीकन चर्चमध्ये झाला. १३ वर्षांचा असताना मी युनायटेड चर्च सोडून दिलं होतं म्हणून दुसऱ्‍या कोणत्याही चर्चशी माझा संबंध नव्हता. म्हणून मी विवाहाच्या रजिस्टरमध्ये यहोवाचा साक्षीदार असं नमूद केलं. खरं तर, मी त्या वेळी साक्षीदारसुद्धा नव्हतो.

काही वर्षांनी आम्ही आमचं कुटुंब वाढवण्याचा विचार केला. आम्हाला चांगले पालक बनायचे होते. म्हणून आम्ही दोघे मिळून नवा करार वाचू लागलो. पण आमचं वाचन काही नियमित नव्हतं; कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळं ते तसंच राहून जायचं. काही दिवसांनी आम्ही पुन्हा आमचं वाचन नियमित ठेवण्याचा प्रयत्न केला; तरीही काही फरक पडला नाही. मग, १९३५ साली, आम्हाला नाताळासाठी द हार्प ऑफ गॉड नावाचं एक पुस्तक भेटवस्तू म्हणून मिळालं. तेव्हा माझी पत्नी म्हणाली: “काय हो, तुमच्या आईने विचित्रच भेटवस्तू पाठवली आहे.” पण मी कामावर गेल्यावर ती ते पुस्तक वाचू लागली आणि तिला ते फार आवडलं. ती ते पुस्तक वाचत होती हे मला ठाऊकच नव्हतं. फेब्रुवारी १, १९३७ रोजी आम्हाला एक मुलगी झाली पण ती जगली नाही. त्यामुळे आमच्या कुटुंबाचं स्वप्न अधुरंच राहिलं. ते दुःख फारच असह्‍य होतं!

या दरम्यान माझ्या घरातले इतरजण सुवार्ता सांगण्याच्या कार्यात फार आवेशाने सहभाग घेत होते; त्या महिन्यात प्रत्येकाने कॉन्सोलेशन (सावध राहा!) पत्रिकेची वर्गणी मिळवावी असं ध्येय ठेवलं होतं. फक्‍त बाबांनाच वर्गणी मिळालेली नव्हती. मला हे कळाल्यावर मला त्यांची दया आली म्हणून मी त्यांना म्हणालो: “बरं बाबा, मी वर्गणी भरतो म्हणजे तुम्हालासुद्धा एक वर्गणी मिळेल.” तोपर्यंत संस्थेचं एकही प्रकाशन मी वाचलं नव्हतं. उन्हाळा आल्यावर आमचा ऑर्केस्ट्रा शहराच्या बाहेर एका रिसोर्टमध्ये शो करायला गेला. तिथं मला कॉन्सोलेशन पत्रिका पोस्टानं मिळू लागली. हिवाळ्याच्या दिवसात आमचा ऑर्केस्ट्रा पुन्हा टोरोंटोत आला. तर त्या पत्रिकेच्या प्रती मला आमच्या नवीन पत्त्यावरसुद्धा मिळू लागल्या. पण त्यातल्या एकाही पत्रिकेचं वेष्टन काढून मी पत्रिका कशी आहे ते पाहिलं नव्हतं—वाचणं तर दूरच राहिलं.

एकदा नाताळच्या एका सुटीत माझं लक्ष त्या पत्रिकांच्या ढिगाऱ्‍याकडे गेलं; मी विचार केला की, या पत्रिकांसाठी मी पैसे दिलेत तर निदान एक दोन तरी वाचून काढली पाहिजेत. पाहू या तरी त्यात काय म्हटलं आहे. पहिली पत्रिका मी वाचली तर मला आश्‍चर्यच वाटलं. कारण त्यात त्या वेळेचं राजकारणी कपट कारस्थान उघड करण्यात आलं होतं. मी त्याविषयी माझ्या सोबतीच्या संगीतकारांना सांगू लागलो. पण ते म्हणायचे की हे तर सगळं खोटं आहे. मग त्यांना उत्तर देण्यासाठी मला पुढं वाचत राहावं लागायचं. नकळत मी यहोवाविषयी लोकांना साक्ष देऊ लागलो होतो. आणि तेव्हापासून, मी ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाकडून’ मिळणारं एकही बायबल आधारित प्रकाशन वाचायचं सोडलं नाही.—मत्तय २४:४५.

माझ्या कामामुळे मी संपूर्ण आठवडाभर व्यस्त राहायचो; पण तरीही रविवारच्या दिवशी मी आयलीनसोबत सभांना जायला सुरवात केली. एकदा १९३८ साली, अशाच एका रविवारच्या सभेमध्ये, दोन वृद्ध बहिणी आमच्याकडे आल्या आणि म्हणाल्या: “ब्रदर, तुम्ही सत्य स्वीकारण्याचा निर्णय घेतलाय का? तुम्हाला ठाऊक आहे, हर्मगिद्दोन किती जवळ आहे ते?” यहोवा हाच एक खरा देव आहे आणि हीच त्याची संघटना आहे याची मला पक्की खात्री पटली होती. मलाही त्या संघटनेचा भाग बनायचं होतं म्हणून ऑक्टोबर १५, १९३८ साली मी बाप्तिस्मा घेतला. माझ्यानंतर सहा महिन्यांनी आयलीनचा बाप्तिस्मा झाला. मला हे सांगायला आनंद होतो की, माझ्या कुटुंबातले सर्वजण यहोवाचे समर्पित सेवक बनले.

देवाच्या लोकांशी सहवास ठेवण्यात मला केवढा आनंद मिळत असे! मला त्यांचा सहवास आवडू लागला. सभेला जाता आलं नाही तर तिथं काय घडलं असावं याची मला फार उत्सुकता लागून राहायची. या लेखाच्या सुरवातीला ज्या घटनेचा उल्लेख केला आहे ती माझ्या सेवेतील महत्त्वाची घटना ठरली.

आमच्याकरता मोठ्या बदलाचा काळ

मे १, १९४३ रोजी आणखी एक महत्त्वाचा बदल घडला. ओहायो येथील क्लीव्हलंड येथे आम्ही सप्टेंबर १९४२ मध्ये प्रथमच एका मोठ्या अधिवेशनाला उपस्थित राहिलो. त्या अधिवेशनाचं नाव होतं नवे जग ईश्‍वरशासित संमेलन. त्या वेळी, दुसरं महायुद्ध चालू होतं; ते युद्ध कधीच संपणार नाही असं वाटत होतं. तेव्हा बंधू नॉर (वॉचटावर संस्थेचे तेव्हाचे अध्यक्ष) यांनी एक जबरदस्त भाषण दिलं; त्या भाषणाचं शीर्षक होतं, “शांती—ती कधी टिकेल का?” आम्हाला अजूनही आठवतं की, त्यांनी प्रकटीकरण १७ व्या अध्यायातून प्रेक्षकांना दाखवलं की युद्धानंतर शांतीचा काळ येईल आणि तेव्हा सुवार्ता सांगण्याचं फार मोठं कार्य केलं जाईल.

बंधू नॉर यांचं “इफ्ताह आणि त्याची शपथ” हे आधीचं भाषण फारच प्रभावशाली होतं. त्यानंतर आणखी पायनियर हवेत म्हणून कोण पुढं येणार असं विचारण्यात आलं. पटकन आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि (इतर अनेकांसोबत) आम्हीसुद्धा म्हणालो: “आम्ही तयार आहोत!” आम्ही लगेच आमच्या महत्त्वाच्या कार्याच्या तयारीला लागलो.

जुलै ४, १९४० पासून कॅनडातील यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यावर बंदी होती. मे १, १९४३ साली आम्ही पायनियरींग सुरू केली तेव्हा यहोवा देवाविषयी लोकांना जाऊन सांगणे किंवा क्षेत्र सेवेत संस्थेचे साहित्य देणे बेकायदेशीर होतं. आम्ही आमच्यासोबत फक्‍त किंग जेम्स व्हर्शनचं आमचं व्यक्‍तिगत बायबल जवळ ठेवत होतो. ओन्टारियोमध्ये पारी साऊंड येथे आम्हाला पहिलीच पायनियर नियुक्‍ती मिळून जास्त दिवस झाले नव्हते तोच आमच्यासोबत क्षेत्र सेवा करण्यासाठी शाखा दफ्तरानं स्टुवर्ट मॅन या अनुभवी बांधवाला पाठवलं. शाखेने खरंच आमचा किती विचार केला होता! बंधू मॅन आनंदी आणि हसऱ्‍या स्वभावाचे होते. आम्ही त्यांच्याकडून पुष्कळ काही शिकलो आणि त्यांच्याबरोबर काम करायलाही आम्हाला फार आनंद वाटला. आमच्याकडे पुष्कळ बायबल अभ्यासही होते. पण संस्थेने आम्हाला हॅमिल्टन शहरात कार्य करायला पाठवलं. त्यानंतर काही काळातच मला लष्करात भरती होण्यासाठी बोलावणं आलं. तसं पाहिलं तर लष्करात भरती होण्याचं माझं वय नव्हतं. मी त्यासाठी नकार दिल्यावर डिसेंबर ३१, १९४३ रोजी मला अटक झाली. कोर्ट-कचेरीच्या सगळ्या बाबी पूर्ण झाल्यावर मला पर्यायी सर्व्हिस कॅम्पमध्ये पाठवण्यात आलं. तेथे मी ऑगस्ट १९४५ पर्यंत राहिलो.

माझी सुटका झाल्यावर, आयलीन आणि मला ओन्टारियो येथील कॉर्नवॉल येथे लगेचच पायनियर म्हणून नियुक्‍ती मिळाली. त्यानंतर, संस्थेच्या कायदा विभागाकडून आम्हाला खास पोलिस कोर्ट नियुक्‍ती मिळाल्यामुळे आम्ही क्युबेकला निघून गेलो. त्या वेळी क्युबेकमध्ये ड्यूप्लेसीचं शासन होतं आणि यहोवाच्या साक्षीदारांना खूप छळ सहन करावा लागत होता. पुष्कळदा मला चार-चार कोर्टांमध्ये जाऊन बांधवांची मदत करावी लागत होती. पण तो समय खरोखर चित्तथरारक आणि विश्‍वास मजबूत करणारा होता.

एकोणीसशे शेचाळीसच्या क्लीव्हलंड येथील अधिवेशनानंतर मला विभागीय आणि प्रांतीय कार्याच्या नियुक्‍त्‌या मिळाल्या; त्यामुळे आयलीन आणि मी कॅनडातल्या किनारपट्टीवरील सर्व ठिकाणांना भेटी देत होतो. वेळ कसा निघून जात होता काही कळतच नव्हतं. १९४८ मध्ये आम्हाला वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेच्या ११ व्या वर्गासाठी बोलावणं आलं. बंधू अल्बर्ट श्रोडर आणि मॅक्सवेल फ्रेंड हे आमचे दोन प्रशिक्षक होते आणि आमच्या वर्गातल्या १०८ विद्यार्थ्यांपैकी ४० जण अभिषिक्‍त होते. कित्येक वर्षांपासून यहोवाची सेवा करणारे इतके सर्व बांधव असल्यामुळे आमच्या गिलियड प्रशालेचा अनुभव फारच उद्‌बोधक आणि फलदायी ठरला!

एकदा बंधू नॉर ब्रुकलिनहून आम्हाला भेट द्यायला आले होते. त्यांच्या भाषणात त्यांनी जपानी भाषा शिकण्यासाठी २५ स्वयंसेवक हवेत अशी विनंती केली. तर सगळेच १०८ लोक तयार झाले! मग काय, बंधू नॉर यांनाच निवड करावी लागली. मला वाटतं त्यात यहोवाचाच हात होता कारण त्याचे परिणाम खरोखर चांगले ठरले. जपानमध्ये कार्य सुरू करण्यासाठी पाठवलेल्या त्या २५ जणांपैकी पुष्कळजण अजूनही त्यांच्या नियुक्‍तीत आहेत. आता ते वृद्ध झाले आहेत खरे, पण ते शेवटपर्यंत टिकून राहिले. काहींना दुसऱ्‍या नियुक्‍त्‌या देण्यात आल्या; जसं की, लॉईड आणि मेल्बा बॅरी यांना वेगळी नियुक्‍ती मिळाली. गेल्या वर्षी लॉईड यांचं निधन होईपर्यंत ते नियमन मंडळाचे सदस्य म्हणून काम करत होते. यहोवाने प्रत्येकाला जे दान दिलं आहे त्याबद्दल आम्ही त्यांच्यासोबत आनंद मानतो.

पदवीधर झाल्यावर आम्हाला जमेका येथे कार्य करण्याची नियुक्‍ती मिळाली. परंतु, क्युबेकमधील कोर्टाचे काम न संपल्यामुळे आम्हाला कॅनडाला परतण्यास सांगण्यात आलं.

पुन्हा एकदा संगीत!

पायनियर कार्यासाठी मी संगीत सोडलं होतं पण संगीतानं जणू माझी पाठ सोडली नव्हती. एका वर्षानंतर, संस्थेचे अध्यक्ष, नेथन नॉर आणि त्यांचे सचिव मिल्टन हेन्शल हे दोघे टोरोंटो येथील मेपल लीफ गार्डन्स येथे आले. तेथे बंधू नॉर यांनी “तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त उशीर लागला आहे का!” असं शीर्षक असलेलं एक जबरदस्त भाषण दिलं. पहिल्याच वेळी, मला अधिवेशनातला ऑर्केस्ट्रा निर्देशित करायला सांगण्यात आलं. किंग्डम सर्व्हिस साँग बुक (१९४४) यातले सर्वांना आवडणारे काही गीत आम्ही त्रितालात तयार केले. बांधवांना ते आवडलेसुद्धा. शनिवारी दुपारी कार्यक्रम संपल्यावर आम्ही रविवारच्या कार्यक्रमाचा सराव करत होतो. तेवढ्यात मला बंधू हेन्शल आमच्या दिशेने येताना दिसले. मी ऑर्केस्ट्रा थांबवला आणि त्यांना भेटायला गेलो. त्यांनी विचारलं, “तुझ्या ऑर्केस्ट्रात किती वादक आहेत?” मी म्हणालो, “सगळे येतात तेव्हा ३५ असतात.” ते म्हणाले, “पुढच्या उन्हाळ्यात तू न्यूयॉर्कला येशील तेव्हा यापेक्षा दुप्पट वादक असतील.”

पण उन्हाळा येण्याआधीच मला न्यूयॉर्कला येण्याचं आमंत्रण मिळालं. काही कारणास्तव, सुरवातीला आयलीन माझ्यासोबत येऊ शकली नाही. १२४ कोलंबिया हाईट्‌स या नव्या इमारतीचं बांधकाम अद्याप पूर्ण झालं नव्हतं म्हणून जुन्या इमारतीतच एका लहानशा खोलीत माझ्या राहण्याची सोय केली होती. त्या खोलीत आणखी दोन अभिषिक्‍त बांधव राहत होते—पेन नावाचे एक वृद्ध बांधव आणि बंधू कार्ल क्लाईन (त्यांच्याशी माझी ही पहिलीच भेट होती.) अर्थात, त्या खोलीत आम्ही फारच दाटीवाटीनं राहत होतो. पण तरीही आमचं चांगलं जमत होतं. माझ्यापेक्षा मोठे असलेले ते बांधव फार सहनशील आणि धीरजवंत होते. माझ्यामुळे त्यांना काही त्रास होणार नाही याची मी काळजी घ्यायचो. देवाच्या आत्म्याने किती काही साध्य होऊ शकतं ते मला पाहायला मिळालं. बंधू क्लाईन यांच्याशी भेट झाल्यामुळे आणि त्यांच्यासोबत काम करायची संधी मिळाल्यामुळे मला कृतार्थ वाटलं! ते फार प्रेमळ आणि मदत करणारे होते. आम्ही एकत्र काम केलं आणि ५० हून अधिक वर्षांपासून आम्ही चांगले मित्र राहिलो आहोत.

यँकी स्टेडियममधील १९५०, १९५३, १९५५ आणि १९५८ साली झालेल्या अधिवेशनांतील संगीताचं काम सांभाळायची मला सुसंधी मिळाली होती. त्याचप्रमाणे, १९६३ साली कॅलिफोर्नियाच्या पसाडेनामध्ये रोझ बोल येथे भरवलेल्या अधिवेशनातही मला एल कॅव्हलन यांच्यासोबत ऑर्केस्ट्राची नियुक्‍ती सांभाळण्याची संधी मिळाली. यँकी स्टेडियममध्ये १९५३ साली भरलेल्या अधिवेशनात रविवारच्या दिवशी जाहीर भाषणाआधी एक संगीत कार्यक्रम सादर करण्यात आला. एरीक फ्रॉस्ट यांनी उच्च स्वरात गाणाऱ्‍या एडीथ शिमयोनिक (नंतर वायगॉन्ट) यांना प्रेक्षकांसमोर प्रस्तुत केलं; एडीथ यांनी आमच्या ऑर्केस्ट्राच्या संगीतावर एरीक फ्रॉस्ट यांचं “फॉर्व्हर्ड यू विटनेसेस!” हे गीत गायिलं. त्यानंतर, आमच्या आफ्रिकन बंधू आणि बहिणींचं मधुर गायन ऐकून आम्ही सगळे खूष झालो. मिशनरी हॅरी ऑर्नट यांनी उत्तर ऱ्‍होडेशिया (सध्याचं झांबिया) येथून आम्हाला ऐकवण्याकरता एक टेप रेकॉर्ड करून आणली होती. संपूर्ण स्टेडियममध्ये तो आवाज घुमत होता.

गीतपुस्तक (१९६६) रेकॉर्ड करताना

“सिंगिंग ॲण्ड अकंपनींग युवरसेल्व्स वीथ म्युझिक इन युवर हाट्‌र्स” हे गुलाबी रंगाचं गीतपुस्तक तुम्हाला आठवतं का? त्यासाठी शेवटची तयारी चालली असताना, बंधू नॉर म्हणाले होते: “आपण रेकॉर्डिंग करणार आहोत. तुम्ही एक लहान ऑर्केस्ट्रा बनवा; त्यासाठी फक्‍त काही व्हायोलिन वादक आणि बासरी वादक हवेत. मला ‘भोंगा वाजवणारं’ कोणी नकोय!” बेथेलच्या राज्य सभागृहाचा उपयोग स्टुडिओ म्हणून केला जाणार होता; पण एक समस्या होती. भिंतींना पडदे नव्हते शिवाय टाईलची फरशी आणि धातुच्या फोल्डिंगच्या खुर्च्या असल्यामुळे आवाज दुमदुमणार होता. मग काय? यासाठी कोण मदत करील? तेवढ्यात कोणीतरी म्हणालं: “टॉमी मिशेल! ते एबीसी नेटवर्क स्टुडिओत काम करतात.” आम्ही तत्काळ बंधू मिशेल यांना भेटलो आणि ते मदत करायला लगेच तयार झाले.

मग, एके शनिवारी सकाळी रेकॉर्डिंगचा पहिला दिवस उजाडला; सगळ्या वादकांची ओळख करून दिली जात होती. एका बांधवाकडे ट्रोमबोन होतं. मला पटकन बंधू नॉरचे शब्द आठवले: “मला ‘भोंगा वाजवणारं’ कोणी नकोय!” आता माझी पंचाईत झाली. त्या बांधवाने ट्रोमबोन बाहेर काढला; त्याची बाजू नीट बसवली आणि वाजवून पाहू लागले. मी त्यांच्याकडे पाहतच राहिलो. ते बांधव होते टॉम मिशेल. पण त्यांनी वाजवलेलं संगीत फारच मधुर वाटलं. त्यांचा ट्रोमबोन ते व्हायोलिनसारखंच वाजवत होते! मी विचार केला, ‘या बांधवांना ठेवलंच पाहिजे!’ बंधू नॉर यांनी देखील काहीही आक्षेप घेतला नाही.

आमच्या त्या ऑर्केस्ट्रात सगळे वादक अगदी उत्कृष्ट होते; पण त्याचसोबत ते प्रेमळ बंधू-बहिणीसुद्धा होते. त्यांच्यात कोणीच लहरी नव्हतं! रेकॉर्डिंग फार मेहनतीचं काम होतं तरी कोणीही तक्रार केली नाही. आमचं काम संपल्यावर, जायची वेळ आली तेव्हा कोणालाही रडू आवरलं नाही; आजपर्यंत आमच्या सर्वांमध्ये मैत्री आहे. आम्हा सर्वांना हे काम करण्यात फार आनंद झाला आणि यहोवाच्या कृपेने ते काम आम्ही पूर्ण करू शकलो.

आणखी प्रतिफलदायी विशेषहक्क

आजही मला पूर्ण-वेळेची सेवा करण्यात आनंद वाटतो. विभागीय आणि प्रांतीय कार्यात मी २८ वर्षे घालवली—त्यातली प्रत्येक नियुक्‍ती मला आवडली होती. यानंतर, पाच वर्षं ओन्टारियो येथील नॉर्व्हल संमेलनगृह सांभाळण्याचं काम मला मिळालं. दर आठवडी विभागीय संमेलन असायचं, शिवाय विदेशी भाषेत प्रांतीय अधिवेशने देखील भरत होती. त्यामुळे आयलीन आणि मला तर मुळीच सवड नव्हती. १९७९/८० सालांमध्ये, हॅल्टन हिल्स येथील संस्थेच्या भावी शाखा दफ्तराची योजना करण्यासाठी वास्तुशिल्पकार आणि अभियांत्रिकींनी संमेलनगृहाचा वापर केला. संमेलनगृहामधील काम संपल्यावर १९८२ ते १९८४ या दरम्यान ब्रुकलिनमध्ये संगीताची आणखी एक नियुक्‍ती मला मिळाली.

माझी प्रिय पत्नी जून १७, १९९४ रोजी आमच्या लग्नाचा ५९ वा वाढदिवस संपून फक्‍त सात दिवसांनी मरण पावली. आम्ही दोघांनी मिळून ५१ वर्षं पायनियर सेवा केली होती.

माझ्या जीवनातील अनेक अनुभवांचा विचार केल्यावर, बायबल हे फार मोलवान मार्गदर्शक ठरलं आहे असं मला वाटतं. काही वेळा मी आयलीनचं बायबल वापरतो; तिने काही वचनं, वाक्यांश किंवा शब्द अधोरेखित केले आहेत. तिला स्पर्शून गेलेली ही वचनं वाचून मला फार आनंद होतो. आयलीनसारखंच माझ्यासाठीही काही वचनं खास अर्थ राखून आहेत. स्तोत्र १३७ मधला असाच एक उतारा आहे; त्यात यहोवाला अत्यंत सुरेख शब्दांत प्रार्थना केली आहे. “हे यरुशलेमे, मी तुला विसरलो, तर माझा उजवा हात वीणेवरील त्याचे कौशल्य विसरो; मी माझ्या सर्वोच्च आनंदापेक्षा यरुशलेमेवर अधिक प्रीती करण्यात कसूर केली, तर माझी वाचा बंद होवो.” (स्तोत्र १३७:५, ६, सुबोध भाषांतर) मला संगीत प्रिय आहे, परंतु यहोवाची निष्ठेने सेवा केल्यानेच मला सर्वाधिक आनंद प्राप्त होतो; यहोवामुळेच मी अतिशय समाधानकारक जीवन जगलो आहे.

[तळटीप]

^ परि. 5 जून १, १९७३ च्या टेहळणी बुरूज (इंग्रजी) पत्रिकेत, त्या वर्षानंतर बाप्तिस्मा घेऊन यहोवाचा साक्षीदार बनण्याआधी प्रत्येकाने धूम्रपान का सोडून द्यावं याचं कारण दिलं होतं.

[२८ पानांवरील चित्र]

आयलीनसोबत १९४७ साली

[३० पानांवरील चित्र]

आधी एके वेळी रेकॉर्डिंग करताना