व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आत्म-त्यागी का असावे?

आत्म-त्यागी का असावे?

आत्म-त्यागी का असावे?

पन्‍नाशीत असलेले बिल बांधकाम तंत्रज्ञानाचे शिक्षक आहेत. त्यांना कौटुंबिक जबाबदाऱ्‍या देखील आहेत. वर्षभरात ते यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळ्यांसाठी राज्य सभागृहांच्या बांधकामानिमित्त अनेक आठवड्यांपर्यंत बाहेर असतात, आणि तेही स्वखर्चाने. एमा २२ वर्षांची सुशिक्षित आणि कर्तबगार तरुणी आहे. चांगल्या पगाराची नोकरी करून मौजमजा करण्याऐवजी ती दर महिन्याला लोकांना बायबलचे ज्ञान देण्यात ७० तास खर्च करते. मॉरिस आणि बेटी दोघंही निवृत्त आहेत. आयुष्याच्या उरलेल्या दिवसांमध्ये आराम करण्याऐवजी ते लोकांना देवाच्या उद्देशाविषयी शिकवण्यासाठी दुसऱ्‍या देशात राहायला गेले आहेत.

वर ज्या लोकांचा उल्लेख करण्यात आला आहे ते लोक स्वतःला विशेष किंवा वेगळे समजत नाहीत. ते आपल्यासारखेच साधारण लोक आहेत. त्यांना जे योग्य वाटले त्यानुसार त्यांनी हा निर्णय घेतला आहे. पण इतरांसाठी ते आपला वेळ, आपली शक्‍ती, आपला पैसा का खर्च करतात? यहोवा देवाबद्दल आणि शेजाऱ्‍यांबद्दल त्यांना असलेले प्रेम त्यांना असे करण्यास प्रवृत्त करते. या प्रेमामुळे ते आत्म-त्यागी बनले आहेत.

आत्म-त्याग म्हणजे काय? एखादी व्यक्‍ती आत्म-त्यागी होऊ इच्छित असेल तर तिला साधुंप्रमाणे डोंगरात जाऊन राहण्याची किंवा जीवनातील सर्व सुखांचा त्याग करण्याची गरज नाही. द शॉर्टर ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीनुसार, आत्म-त्याग म्हणजे, “कर्तव्यासाठी किंवा इतरांच्या कल्याणासाठी स्वतःचे हित, आनंद आणि इच्छा आपखुशीने सोडून देणे.”

येशू ख्रिस्त—सर्वोत्कृष्ट उदाहरण

देवाचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आत्म-त्यागाचे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे. पृथ्वीवर येण्याआधी स्वर्गातील त्याचे जीवन पूर्णार्थाने प्रेरणादायक व समाधानकारक होते. आपला पिता आणि स्वर्गातील देवदूत यांच्याबरोबर त्याची जवळीक होती. “कुशल कारागीर” म्हणून त्याने बऱ्‍याच आव्हानात्मक व मनोरंजक कार्यांमध्ये आपल्या क्षमतांचा उपयोग केला. (नीतिसूत्रे ८:३०, ३१) पृथ्वीवरील सर्वात श्रीमंतातील श्रीमंत मनुष्याकडे सुद्धा नाही इतक्या सुखात तो होता. तो यहोवा देवाबरोबर स्वर्गामध्ये राहत होता. यहोवा देवाच्या पाठोपाठ त्याला स्वर्गामध्ये उच्च पद होते, विशेष अधिकार होता.

तरीपण त्याने “स्वतःला रिक्‍त केले म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले.” (फिलिप्पैकर २:७) मानव होण्याद्वारे व सैतानाने मानवजातीला आणलेल्या सर्व दुःखाला काढून टाकण्यासाठी आपल्या जीवनाची खंडणी देण्याद्वारे त्याने स्वखुशीने आपल्या सर्व सुखांचा त्याग केला. (उत्पत्ति ३:१-७; मार्क १०:४५) यासाठी त्याला दियाबल सैतानाच्या अधिकाराखाली असलेल्या जगात येऊन पापी मानवांमध्ये राहावे लागणार होते. (१ योहान ५:१९) आणि पृथ्वीवर आल्यावरही तो काही राजमहालात राहणार नव्हता. तर साध्यासुध्या लोकांप्रमाणे त्याला जीवन कंठावे लागणार होते. पण कोणत्याही परिस्थितीत तो आपल्या पित्याची इच्छा पूर्ण करायला तयार होता. (मत्तय २६:३९; योहान ५:३०; ६:३८) त्याच्या प्रीतीची आणि एकनिष्ठेची ही जणू अग्नीपरीक्षाच होती. तो कोठवर सहन करायला तयार होता? प्रेषित पौलाने लिहिले की, “त्याने मरण, आणि तेहि वधस्तंभावरचे मरण सोसले; येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले.”—फिलिप्पैकर २:८.

‘अशी चित्तवृत्ती तुमच्या ठायीहि असो’

आपल्याला येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करण्याचे उत्तेजन दिले जाते. पौलाने म्हटले: “अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायीहि असो.” (फिलिप्पैकर २:५) आपण अशी चित्तवृत्ती कशी बाळगू शकतो? एक मार्ग म्हणजे, आपण ‘आपलेच हित न पाहता दुसऱ्‍यांचेही पाहिले पाहिजे.’ (फिलिप्पैकर २:४) खरे प्रेम असलेले लोक ‘स्वार्थ पाहत नाहीत.’—१ करिंथकर १३:५.

ज्या लोकांना इतरांबद्दल काळजी असते ते निःस्वार्थ असतात. पण, आजच्या जगात प्रत्येक जण आपापली पोळी भाजण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येकामध्ये ‘माझा पहिला नंबर’ ही मनोवृत्ती आहे. आपल्यामध्ये जगाचा हा आत्मा येऊ नये म्हणून आपण सर्वांनी काळजी घ्यायची गरज आहे. आपल्यामध्ये हा आत्मा आल्यास आपणही नेहमी स्वतःच्या इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न करत राहू. मग आपण आपला वेळ, आपली शक्‍ती, आपला पैसा सर्व काही केवळ स्वतःच्याच इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यात खर्च करू. त्यामुळे खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी अशा प्रभावाचा विरोध केला पाहिजे.

कधीकधी चांगल्या हेतूने दिलेल्या सल्ल्यामुळेही आत्म-त्यागाची आपली भावना कमी होऊ शकते. प्रेषित पेत्राला जेव्हा जाणीव झाली की येशूने निवडलेल्या मार्गाचा शेवट त्याच्या मृत्यूने होईल तेव्हा तो येशूला म्हणाला: “प्रभुजी, आपणावर दया असो.” (मत्तय १६:२२) आपल्या पित्याची सर्वश्रेष्ठता पटवण्यासाठी आणि मानवांच्या तारणासाठी येशू मरायला तयार होता हे त्याला स्वीकारायला कठीण वाटत होते. म्हणून तो येशूला थांबवण्याचा प्रयत्न करत होता.

‘आत्मत्याग करा’

येशूची प्रतिक्रिया काय होती? अहवाल पुढे म्हणतो: “त्याने वळून आपल्या शिष्यांकडे पाहिले व तो पेत्राला दटावून म्हणाला, सैताना, माझ्यापुढून चालता हो; कारण तुझा दृष्टिकोन देवाचा नव्हे तर मनुष्यांचा आहे.” येशूने मग आपल्या शिष्यांना आणि लोकसमुदायाला आपल्या जवळ बोलावून म्हटले: “जर कोणी माझा अनुयायी होऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा, आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व मला अनुसरत राहावे.”—मार्क ८:३३, ३४.

या घटनेला ३० वर्षे पूर्ण झाल्यानंतर पेत्राने दाखवून दिले की येशूने दिलेला आत्मत्यागाचा सल्ला त्याने दरम्यानच्या काळात आत्मसात केला होता. त्याने सहख्रिश्‍चनांना, कसलेही प्रयत्न न करता स्वस्थ बसून राहण्याचे व स्वतःवर दया करण्याचे उत्तेजन दिले नाही. उलट, त्यांना सुवार्तेच्या कार्यासाठी आपले मन तयार करण्यास व जगाच्या पूर्वीच्या रीतीरिवाजांनुसार न चालण्यास त्याने आर्जवले. परीक्षा आल्या तरीसुद्धा त्यांनी देवाच्या इच्छेला आपल्या जीवनात प्रथम स्थान द्यावे असे पेत्राने त्यांना प्रोत्साहन दिले.—१ पेत्र १:६, १३, १४; ४:१, २.

आपल्याजवळ जे काही आहे त्याचा मालकी हक्क यहोवाला देऊन, येशू ख्रिस्ताचे विश्‍वासूपणे अनुकरण करणे व आपल्या सर्व कार्यांमध्ये यहोवाचे मार्गदर्शन स्वीकारणे हाच जीवनाचा सर्वात उत्तम मार्ग आहे. याबाबतीत पौलाने फार चांगले उदाहरण मांडले. राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्याच्या निकडीच्या भावनेमुळे आणि यहोवाला कृतज्ञता व्यक्‍त करण्याच्या भावनेमुळे त्याने जगिक महत्त्वाकांक्षा बाळगली नाही. कारण, यामुळे तो कदाचित देवाची इच्छा पूर्ण करण्यापासून दूर गेला असता. तो म्हणाला, मी इतरांच्या “जिवांसाठी फार आनंदाने खर्च करीन व मी स्वतः सर्वस्वी खर्ची पडेन.” (२ करिंथकर १२:१५) पौलाने स्वतःची नव्हे तर देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या क्षमतांचा उपयोग केला.—प्रेषितांची कृत्ये २०:२४; फिलिप्पैकर ३:८.

प्रेषित पौलासारखी आपली देखील मनोवृत्ती आहे की नाही याचे परीक्षण आपण कसे करू शकतो? आपण पुढील प्रश्‍न स्वतःला विचारू शकतो: मी माझा वेळ, माझी शक्‍ती, माझ्या क्षमता आणि माझ्या मालमत्तेचा कशाप्रकारे वापर करतो? मी, या वरील गोष्टींचा आणि इतर मौल्यवान देणग्यांचा माझ्या इच्छा पूर्ण करण्यात उपयोग करतो की इतरांना मदत करण्यात उपयोग करतो? लोकांचे जीव वाचवू शकणाऱ्‍या सुवार्तेची घोषणा करण्याच्या कार्यात जास्त भाग घेण्याचा, जमल्यास राज्याचा पूर्ण वेळेचा प्रचारक होण्याचा मी विचार करतो का? राज्य सभागृहे बांधणे किंवा त्यांची देखभाल करणे यांसारख्या कामात मी पूर्णपणे भाग घेऊ शकतो का? गरजवंतांना मदत करण्याच्या प्रत्येक संधीचा मी फायदा घेतो का? मी माझ्याकडील सर्वात उत्तम ते यहोवाला देतो का?—नीतिसूत्रे ३:९.

‘देण्यात जास्त धन्यता आहे’

आत्मत्याग करणे खरोखर सुज्ञपणाचे आहे का? निश्‍चितच! पौलाला स्वतःच्या अनुभवावरून ठाऊक होते की आत्मत्यागामुळे पुष्कळ आशीर्वाद मिळतात. आत्मत्यागामुळे त्याला खूप आनंद मिळाला, समाधान मिळाले. याबाबत त्याने मिलेटस येथे भेटलेल्या इफिससमधील वृद्ध पुरुषांना सांगितले. तो त्यांना म्हणाला: “सर्व गोष्टीत मी तुम्हाला कित्ता घालून दाखविले आहे की, तसेच तुम्हीहि श्रम [आत्मत्यागी मार्गाने] करून दुर्बळांना साहाय्य करावे, आणि घेण्यापेक्षा देणे ह्‍यात जास्त धन्यता आहे असे जे वचन प्रभु येशू स्वतः म्हणाला होता त्याची आठवण ठेवावी.” (प्रेषितांची कृत्ये २०:३५) अशा प्रकारचा आत्मत्यागी आत्मा दाखवल्याने आपल्याला किती आनंद मिळतो याची लाखो लोकांना प्रचिती आली आहे. आणि फक्‍त आताच नव्हे तर भवितव्यातही आपल्याला आनंद मिळेल. कारण तेव्हा, जे लोक स्वतःला नव्हे तर यहोवाला प्रथम स्थान देतात व इतरांना मदत करतात अशांना यहोवा प्रतिफळ देईल.—१ तीमथ्य ४:८-१०.

राज्य सभागृह बांधण्यासाठी तुम्ही इतरांना मदत करण्यात इतका वेळ आणि शक्‍ती का खर्च करता असे विचारल्यावर बिल यांनी म्हटले: “लहान लहान मंडळ्यांना मदत केल्यानं मला खूप समाधान मिळतं. इतरांना लाभ होईल अशाप्रकारे माझ्या कलांचा, क्षमतांचा उपयोग करण्यात मी धन्यता मानतो.” एमाने इतरांना शास्त्रवचनीय सत्य शिकवण्यात आपली शक्‍ती, आपला वेळ खर्च करण्यास का निवडले असे तिला विचारले असता, ती म्हणाली: “आणखी काही करण्याचा मी विचारच केला नाही. मी तरुण आहे, माझ्यात शक्‍ती आहे, जोम आहे तोपर्यंत मला होता होईल तितकं यहोवाचं मन आनंदित करायचंय आणि इतरांना मदत करायची आहे. थोड्याफार सुखचैनीचा त्याग करणे काही मोठी गोष्ट नाही. यहोवानं माझ्यासाठी जे काही केलं आहे त्याच्या तुलनेत तर मी जे काही करत आहे ते माझं कर्तव्य आहे असं मला वाटतं.”

आयुष्यभर कौटुंबिक जबाबदाऱ्‍या पार पाडल्यानंतर जेव्हा आराम करायचे दिवस आले तेव्हा आराम करण्याऐवजी दुसऱ्‍या देशात जाऊन लोकांना सत्य शिकवण्याचं काम हाती घेतल्याबद्दल मॉरिस आणि बेटीला कसलाही पस्तावा होत नाही. ते दोघंही निवृत्त झाल्यावर त्यांना काहीतरी फायदेकारक, अर्थपूर्ण करावेसे वाटत होते. ते म्हणतात: “आम्हाला स्वस्थ बसून राहायला आवडत नाही. परदेशात जाऊन लोकांना यहोवाविषयी शिकवण्यामुळे आम्ही काहीतरी अर्थपूर्ण करत आहोत.”

तुम्हीही आत्मत्याग करण्याचा निश्‍चय केला आहे का? आत्मत्यागी होणे इतके सोपे नाही. कारण, आपले एक मन आपल्याला आपल्या इच्छा पूर्ण करायला प्रवृत्त करत असते तर दुसरे मन देवाला संतुष्ट करायला पाहत असते. (रोमकर ७:२१-२३) या दोन्ही मनांचा मेळ घालणे इतके सोपे नसले तरीसुद्धा ते अशक्य नाही. मात्र आपण यहोवाला आपले जीवन मार्गदर्शित करू दिले पाहिजे. (गलतीकर ५:१६, १७) त्याच्या सेवेसाठी आपण केलेले त्याग तो विसरणार नाही. त्यानुसार तो निश्‍चितच आपल्याला आशीर्वाद देईल. तो, ‘आकाशकपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद आपल्यावर वर्षवेल.’—मलाखी ३:१०; इब्री लोकांस ६:१०.

[२३ पानांवरील चित्र]

येशूची आत्मत्यागी वृत्ती होती. तुमची आहे का?

[२४ पानांवरील चित्रे]

पौलाने राज्याच्या प्रचाराच्या कार्यावर आपले लक्ष केंद्रित केले