आपल्या नावाचे रक्षण कर
आपल्या नावाचे रक्षण कर
सुंदर इमारती बांधणारी व्यक्ती, वाकबगार वास्तुशिल्पकार असे नाव कमावते. अभ्यासात चांगली असलेली मुलगी हुशार विद्यार्थीनी असे नाव कमावते. काडीचे काम न करणारी व्यक्तीसुद्धा रिकामटेकडी असे नाव कमावते. चांगले नाव कमावणे किती महत्त्वाचे आहे याविषयी बायबल म्हणते: “चांगले नाव मिळविणे पुष्कळ धनापेक्षा व बहुमान मिळविणे सोन्याचांदीपेक्षा अधिक श्रेयस्कर आहे.”—नीतिसूत्रे २२:१, सुबोध भाषांतर.
चांगले नाव एका दिवसात नव्हे तर लहानसहान कृत्यांमुळे कालांतराने प्राप्त होते. मात्र मूर्खपणाच्या केवळ एका कृत्यामुळे ते खराब होऊ शकते. उदाहरणार्थ, एकदाच केलेले अनैतिक कृत्य चांगले नाव मातीत मिळवायला पुरेसे असते. बायबलमधील नीतिसूत्रे पुस्तकाच्या सहाव्या अध्यायात प्राचीन इस्राएलचा शलमोन राजा आपल्याला अशा मनोवृत्तींपासून किंवा वर्तनापासून सावध राहायला सांगतो ज्यांमुळे यहोवासोबतचा आपला नातेसंबंध धुळीस मिळू शकतो. पुढचा मागचा विचार न करता दिलेली वचने, आळशीपणा, फसवेगिरी आणि अनैतिक शरीरसंबंध ही याची काही उदाहरणे आहेत. या गोष्टींचा यहोवाला वीट आहे. या गोष्टी टाळल्याने आपल्या चांगल्या नावावर कलंक येणार नाही.
मूर्खपणाच्या वचनांपासून आपल्याला मुक्त कर
नीतिसूत्राच्या सहाव्या अध्यायाची सुरवात या शब्दांनी होते: “माझ्या मुला, जर तू आपल्या शेजाऱ्याला जामीन राहिलास, परक्यासाठी तू हातावर हात दिला, तर तू आपल्या तोंडच्या वचनांना गुंतला आहेस; तू आपल्या तोंडच्या शब्दांनी बद्ध झाला आहेस. ह्याकरिता माझ्या मुला, तू असे कर की आपल्याला मुक्त करून घे, कारण तू आपल्या शेजाऱ्याच्या हाती सापडला आहेस; तर जा, त्वरा कर; आपल्या शेजाऱ्याला अत्याग्रहाने गळ घाल.”—नीतिसूत्रे ६:१-३.
या नीतिसूत्रात इतरांच्या विशेषतः परक्यांच्या व्यवहारात आपण सापडू नये असा सल्ला दिला आहे. इस्राएलांना ‘कंगाल झाल्यामुळे काम होत नसलेल्या भाऊबंदाला आधार’ द्यायला सांगितले होते. (लेवीय २५:३५-३८) परंतु, मागचा पुढचा विचार न करणाऱ्या काही इस्राएलींनी जोखिमीचे व्यवहार हाती घेतले आणि स्वतःसाठी ‘जामीन राहण्यास’ इतरांना पटवले. अशातऱ्हेने त्यांना आर्थिक शाश्वती मिळत असे परंतु जामीन राहणाऱ्या व्यक्तीवर कर्जाची जबाबदारी येत असे. आजही अशीच परिस्थिती निर्माण होऊ शकते. उदाहरणार्थ, कर्ज देणाऱ्या काही संस्थांना कर्ज फेडले जाण्याची शाश्वती नसल्यास, त्या कर्जाला कोणी जामीन राहिल्याशिवाय कर्ज मंजूर केले जात नाही. इतरांसाठी अविचारीपणाने अशी जबाबदारी पत्करणे किती मूर्खपणाचे ठरेल! इतकेच नव्हे तर, यामुळे आपण आर्थिक संकटात सापडू शकतो आणि बँकांमध्ये किंवा कर्ज देणाऱ्या इतर संस्थांमध्ये आपले नावसुद्धा खराब होऊ शकते!
सुरवातीला शहाणपणाचा वाटलेला निर्णय मूर्खपणाचा होता असे आपल्या लक्षात आल्यानंतर आपण काय नीतिसूत्रे ६:४, ५) अविचारीपणाच्या बाध्यतेत जखडले जाण्याऐवजी शक्य असल्यास त्यातून स्वतःला मुक्त करून घेतलेले बरे.
करावे? अशा वेळी आपला अभिमान बाजूला सारून आपण “आपल्या शेजाऱ्याला अत्याग्रहाने गळ” घातली पाहिजे अर्थात वारंवार याचना करून त्याला मनावले पाहिजे. ही समस्या सोडवण्यासाठी आपण होता होईल तितका प्रयत्न केला पाहिजे. एका संदर्भात असे म्हटले आहे की, “ही समस्या सोडवण्यासाठी होता होईल ते करा म्हणजे तुमच्या बाध्यतेमुळे तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबाला नुकसान पोहंचणार नाही.” आणि या कामाला मुळीच उशीर लावता कामा नये कारण शलमोन राजा पुढे म्हणतो: “तू आपल्या डोळ्यांस निद्रा लागू देऊ नको, आपल्या पापण्यास झापड पडू देऊ नको. ज्याप्रमाणे पारध्याच्या हातून हरिणीला, ज्याप्रमाणे फासेपारध्याच्या हातून पक्ष्याला, त्याप्रमाणे आपणाला मुक्त करून घे.” (मुंगीसारखे मेहनती व्हा
“अरे आळशा, मुंगीकडे जा; तिचे वर्तन पाहून शहाणा हो,” असे शलमोन म्हणाला. एक चिमुकली मुंगी आपल्याला काय शहाणपण शिकवेल? शलमोन राजा म्हणतो: “तिला कोणी धनी, देखरेख करणारा किंवा अधिपति नसता ती उन्हाळ्यांत आपले अन्न मिळविते, आणि कापणीच्या दिवसांत आपले भक्ष्य जमा करून ठेविते.”—नीतिसूत्रे ६:६-८.
मुंग्यांचा संघटितपणा आणि सहयोगी वृत्ती वाखाणण्याजोगी असते. त्यांच्या जन्मजात बुद्धीनेच त्या भविष्यासाठी अन्न गोळा करून ठेवतात. त्यांचा कोणी “धनी, देखरेख करणारा किंवा अधिपती” नसतो. त्यांच्यात एक राणी मुंगी असते परंतु ती फक्त अंडी देण्याचे काम करते. सगळ्या मुंग्यांची जननी असल्यामुळे तिला राणी म्हणतात. ती कोणालाही आज्ञा देत नसते. त्यांचा कोणी म्होरक्या नसतो किंवा त्यांच्यावर पाळत ठेवणारा कोणी नसतो तरीही त्या अथकपणे काम करत असतात.
मुंगीप्रमाणे आपणही मेहनती असू नये का? आपल्यावर कोणाचे लक्ष असले किंवा नसले तरीही मेहनती असणे आणि आपल्या कामात सतत सुधारणा करत राहणे हे आपल्याकरता चांगले असते. होय, आपण प्रत्येक वेळी, शाळेत, कामाच्या ठिकाणी आणि आध्यात्मिक कार्यांमध्ये देखील आपल्या परीने होता होईल तितके करण्याचा प्रयत्न करावा. मेहनतीपणामुळे मुंगीला जसा फायदा होतो त्याचप्रमाणे “सर्व उद्योग करून [आपण] सुख मिळवावे” ही देवाची इच्छा आहे. (उपदेशक ३:१३, २२; ५:१८) शुद्ध विवेक आणि आत्म-समाधान यांच्या रूपात आपल्याला आपल्या मेहनतीचे फळ मिळेल.—उपदेशक ५:१२.
आळशी माणसाला शलमोन दोन प्रश्न विचारतो: “अरे आळशा, तू किती वेळ निजशील? आपल्या झोपेतून केव्हा उठशील?” त्याची नक्कल करत तो पुढे म्हणतो: “आणखी थोडीशी झोप घेतो, आणखी थोडीशी डुलकी खातो, आणखी हात उराशी धरून निजतो. असे म्हणत जाशील तर तुला दारिद्र्य दरोडेखोराप्रमाणे, आणि गरिबी तुला सशस्त्र मनुष्याप्रमाणे गांठील.” (नीतिसूत्रे ६:९-११) आळशी व्यक्ती आपल्या आळसात असतानाच दारिद्र्य दरोडेखोराप्रमाणे तिला झपाट्याने गाठते आणि गरिबी तिच्यावर सशस्त्र मनुष्याप्रमाणे हल्ला करते. आळशी व्यक्तीचे शेत काट्याकुसळ्यांनी भरलेले असते. (नीतिसूत्रे २४:३०, ३१) तिचा व्यापार लगेचच ठप्प होतो. अशी आळशी व्यक्ती किती दिवस कामावर टिकेल? अभ्यासाचा कंटाळा करणारा आळशी विद्यार्थी चांगले मार्क कसा मिळवेल?
ईमानदार असा
शलमोन पुढे आणखी एका प्रकारच्या वर्तनाविषयी सांगतो ज्यामुळे समाजातील एखाद्या व्यक्तीचे नावलौकिक खराब होऊ शकते आणि देवासोबतचा नातेसंबंधही बिघडू शकतो. “अधम व दुर्जन मनुष्य उद्दामपणाचे भाषण करीत जातो; डोळे मिचकावतो, पायांनी इशारा करितो, बोटांनी खुणावितो; त्याच्या मनांत उद्दामपणा असतो; तो दुष्कर्माची योजना करीत असतो; तो वैमनस्य पसरितो.”—नीतिसूत्रे ६:१२-१४.
हे फसवेगिरी करणाऱ्या व्यक्तीचे वर्णन आहे. लबाड
मनुष्य सहसा आपली लबाडी लपवण्याचा प्रयत्न करत असतो. ते कसे? फक्त “उद्दामपणाचे भाषण” करून नव्हे तर हावभावांवरूनही तो प्रयत्न करत असतो. एक विद्वान म्हणतो: “आवाजाचा सूर तसेच चेहऱ्यावरील आणि इतर हावभाव देखील फसवेपणाच्या पद्धती असतात; खरे तर प्रामाणिकतेच्या मुखवट्यामागे विकृत मन आणि वादविवादाचा आत्मा असतो.” असा दुष्ट मनुष्य सतत दुष्ट योजना करत असतो आणि वैमनस्य पसरत असतो. त्याचा काय परिणाम होईल?“यामुळे त्याच्यावर विपत्ति अकस्मात येईल,” असे इस्राएलचा राजा म्हणतो. “त्याचा एकाएकी चुराडा होईल, त्याचा निभाव लागणार नाही.” (नीतिसूत्रे ६:१५) तो पकडला जातो तेव्हा या लबाड मनुष्याचे नाव एकाएकी खराब होते. त्याच्यावर कोण विश्वास करील? त्याचा दुर्दैवी शेवटच होईल कारण ‘सर्व लबाड माणसांचा’ सार्वकालिक मृत्यू घडेल असे सांगितले आहे. (प्रकटीकरण २१:८) म्हणूनच आपण ‘सर्व बाबतीत चांगले वागण्याचा’ प्रयत्न केला पाहिजे.—इब्री लोकांस १३:१८.
यहोवाला द्वेष असलेल्या गोष्टींचा द्वेष करा
वाईटाचा द्वेष करण्यामुळे आपले नावलौकिक सुरक्षित राहू शकते. तर मग आपण वाईटाबद्दल तिटकारा बाळगू नये का? पण आपण नेमका कशाचा द्वेष केला पाहिजे? शलमोन म्हणतो: “परमेश्वर ज्यांचा द्वेष करितो अशा सहा गोष्टी आहेत; नव्हे, त्याला अशा सात गोष्टींचा वीट आहे; उन्मत्त दृष्टि, लबाड बोलणारी जिव्हा, निर्दोष रक्त पाडणारे हात, दुष्ट योजना करणारे अंतःकरण, दुष्कर्म करण्यास त्वरेने धावणारे पाय, लबाड बोलणारा खोटा साक्षी, व भावाभावांत वैमनस्य उत्पन्न करणारा मनुष्य, ह्या त्या होत.”—नीतिसूत्रे ६:१६-१९.
त्या नीतिसूत्रात सांगितलेल्या सातही गोष्टी मूलभूत आहेत आणि त्यामध्येच इतर सर्व प्रकारची दुष्कर्मे सामील होतात. “उन्मत्त दृष्टि” आणि “दुष्ट योजना करणारे अंतःकरण” हे पापी विचारांना सूचित करतात. “लबाड बोलणारी जिव्हा” आणि “लबाड बोलणारा खोटा साक्षी” हे पापी शब्दांना सूचित होतात. “निर्दोष रक्त पाडणारे हात” आणि “दुष्कर्म करण्यास त्वरेने धावणारे पाय” दुष्ट कृत्यांना सूचित होतात. शांतीने राहणाऱ्या लोकांमध्ये फूट निर्माण करणाऱ्या व्यक्तींचा तर यहोवाला सर्वात जास्त द्वेष आहे. येथे आधी सहा गोष्टींचा उल्लेख केला, नंतर त्यात आणखी एक भर घालून सात गोष्टींचा उल्लेख केला आहे. त्यावरून ही यादी मर्यादित नाही हे दिसून येते कारण मनुष्यांच्या दुष्कर्मांना अंत नसतो.
देवाला ज्यांचा द्वेष आहे त्या गोष्टींचा आपल्याला तिटकारा वाटला पाहिजे. जसे की, ‘उन्मत्त दृष्टीचा’ किंवा अहंकारी वृत्तीचा आपण तिरस्कार बाळगावा. हानीकारक चहाडीपासून तर दूरच राहावे कारण त्यामुळे सहजगत्या “भावाभावांत वैमनस्य उत्पन्न” होते. चहाडी करणे, टीका करणे किंवा लबाड बोलणे यांमुळे कदाचित “निर्दोष रक्त” सांडले जाणार नाही परंतु दुसऱ्या व्यक्तीचे चांगले नाव निश्चितच खराब होऊ शकते.
‘तिच्या सौंदर्यास पाहून लोलुप होऊ नको’
शलमोन पुढे असा उपदेश देतो की, “माझ्या मुला, तू आपल्या बापाची आज्ञा पाळ, आपल्या आईची शिस्त सोडू नको; ती नेहमी आपल्या उराशी कवटाळून धर, ती आपल्या गळ्यांत बांधून ठेव. का? कारण, “तू चालशील तेव्हा ज्ञान तुला मार्ग दाखवील; तू निजशील तेव्हा ते तुझे रक्षण करील; तू जागा होशील तेव्हा ते तुजशी बोलेल.”—नीतिसूत्रे ६:२०-२२.
लहानपणापासून बायबलचे शिक्षण मिळाल्याने लैंगिक अनैतिकतेच्या मोहापासून आपले संरक्षण होईल का? होय, निश्चितच. आपल्याला अशी शाश्वती मिळते की, “ती आज्ञा . . . दिवा आहे व ती शिस्त . . . प्रकाश आहे. बोधाचा वाग्दंड जीवनाचा मार्ग आहे; दुष्ट स्त्रीपासून, परस्त्रीच्या गोडबोल्या जिव्हेपासून, ती तुझी रक्षण करणारी आहेत.” (नीतिसूत्रे ६:२३, २४) देवाच्या वचनातील उपदेश मनात बाळगून त्याचा ‘आपल्या पावलांकरता दिवा आणि मार्गाकरता प्रकाश’ म्हणून उपयोग केला तर वाईट चालीच्या बाईच्या किंवा पुरुषाच्या गोड बोलण्याचा आपण प्रतिकार करू शकू.—स्तोत्र ११९:१०५.
“तू आपले चित्त तिच्या सौंदर्यास पाहून लोलुप होऊ देऊ नको; तिच्या नेत्रकटाक्षाला वश होऊ नको,” असा सल्ला शलमोन राजा देतो. का? “कारण व्यभिचारिणीच्या संगतीने मनुष्य भाकरीच्या तुकड्याला मोताद होतो; स्वैरिणी स्त्री पुरुषाच्या अमोल जिवाची शिकार करिते.”—नीतिसूत्रे ६:२५, २६.
जारकर्मी पत्नी वेश्येसारखी आहे असे शलमोन येथे सुचवत असावा का? कदाचित असेल. नाहीतर, वेश्येसोबत अनैतिक शरीरसंबंध ठेवल्याने होणारे परिणाम आणि दुसऱ्या पुरुषाच्या पत्नीसोबत व्यभिचार केल्याने होणारे परिणाम यांच्यामध्ये तो भेद करीत असावा. वेश्येसोबत संबंध ठेवणारा माणूस “भाकरीच्या तुकड्याला मोताद” होऊ शकतो अर्थात अगदी रस्त्यावर येऊ शकतो. त्याला एड्ससारखे लैंगिकरित्या संक्रमित होणारे घातक आणि वेदनामय रोगही होऊ शकतात. पण, दुसऱ्या व्यक्तीच्या पत्नीसोबत जवळीक ठेवणाऱ्या व्यक्तीला मोशेच्या नियमशास्त्रानुसार मृत्यूदंड होत असे. व्यभिचारिणी स्त्री आपल्या प्रियकराचा ‘अमोल जीव’ धोक्यात घालते. एका संदर्भानुसार, “फक्त पैसा उडवून त्या व्यक्तीला कंगाल करणे . . . एवढाच उद्देश नसतो. या अपराधासाठी एखाद्याला मृत्यूदंडाची शिक्षा देखील होऊ शकते.” (लेवीय २०:१०; अनुवाद २२:२२) अशी स्त्री कितीही सुंदर असली तरी आपण तिच्या मागे लागू नये.
‘आपल्या उराशी विस्तव धरू नका’
व्यभिचाराचा धोका किती आहे हे ठासून सांगण्यासाठी शलमोन विचारतो: “मनुष्याने आपल्या उराशी विस्तव धरिला तर त्याची वस्त्रे जळणार नाहीत काय? कोणी निखाऱ्यावर चालला तर त्याचे पाय पोळणार नाहीत काय?” त्या दृष्टान्ताचे स्पष्टीकरण करत तो म्हणतो: “जो कोणी आपल्या शेजाऱ्याच्या स्त्रीशी गमन करितो तो असा आहे; जो कोणी तिला स्पर्श करितो तो निर्दोष असणार नाही.” (नीतिसूत्रे ६:२७-२९) अशा अपराध्याला निश्चितच शिक्षा मिळेल.
“चोर भुकेला असल्यामुळे त्याने आपला जीव शांत करण्याकरिता चोरी केली. तर त्याला लोक तुच्छ मानीत नाहीत” अशी आपल्याला आठवण करून दिली जाते. पण तरीही, “तो सापडला तर सातपट परत देईल; तो आपल्या घरची सर्व मत्ता देईल.” (नीतिसूत्रे ६:३०, ३१) प्राचीन इस्राएलमध्ये, चोराला अगदी आपली सर्व संपत्ती द्यावी लागली तरीही भरपाई करावी लागायची. * मग, व्यभिचार करणाऱ्याला शिक्षा मिळणे किती आवश्यक आहे कारण तो तर आपल्या कर्मासाठी सबबही देऊ शकत नाही!
शलमोन म्हणतो, “स्त्रीशी जारकर्म करणारा अक्कलशून्य आहे.” अक्कलशून्य असलेल्या व्यक्तीकडे योग्य समजशक्ती नसते म्हणून तो “आपल्या जिवाचा नाश करून” घेतो. (नीतिसूत्रे ६:३२) तो वरवरून चांगल्या ख्यातीचा वाटेल परंतु त्याच्या आंतरिक व्यक्तिमत्त्वाचा चांगला विकास झालेला नसतो.
व्यभिचारी व्यक्तीच्या वाट्याला त्याहीपेक्षा जास्त येते. “त्याला घाय व अपकीर्ति ही प्राप्त होतील; त्याची निंदा कधी पुसून जाणार नाही. कारण ईर्ष्या पुरुषास संतप्त करिते; सूड उगवण्याच्या दिवशी [यहोवा] गय करणार नाही. तो कसल्याही खंडणीची पर्वा करणार नाही; त्याला तू बहुत देणग्या दिल्या तरी त्याचे समाधान होणार नाही.”—नीतिसूत्रे ६:३३-३५.
एखादा चोर चोरलेल्या गोष्टींची भरपाई करू शकतो परंतु ज्याने परस्त्रीशी व्यभिचार केला आहे तो कसल्याही प्रकारची भरपाई करू शकत नाही. संतप्त झालेल्या पतीला तो कशाची भरपाई करील? अपराध्याने कितीही याचना केली तरीही त्याला दया दाखवली जाणे कठीण आहे. व्यभिचारी मनुष्य आपल्या पापाची भरपाई करूच शकत नाही. त्याच्या नावाला लागलेला कलंक आणि त्याची झालेली अपकीर्ती तशीच राहते. तो स्वतःला मुक्तही करू शकत नाही किंवा त्याला मिळणाऱ्या शिक्षेतून तो सुटकाही मिळवू शकत नाही.
त्यामुळे, व्यभिचारापासून किंवा आपले चांगले नाव ज्यामुळे खराब होईल आणि देवाची निंदा होईल अशा वर्तनापासून अथवा मनोवृत्तींपासून दूर राहणे किती शहाणपणाचे ठरेल! म्हणून पुढचा मागचा विचार न करता कोणतेही वचन देण्याबद्दल आपण सावधान असावे. आपण मेहनतीपणा आणि सत्याने आपले नावलौकिक शोभवू या. यहोवा ज्या गोष्टींचा द्वेष करतो त्यांचा द्वेष करण्याचा प्रयत्न करून आपण त्याच्यासमोर आणि सहमानवांसमोर चांगले नावलौकिक राखू या.
[तळटीप]
^ परि. 28 मोशेच्या नियमशास्त्रानुसार, एखाद्या चोराला दुप्पट, चौपट किंवा पाचपट भरपाई करावी लागायची. (निर्गम २२:१-४) “सातपट” या संज्ञेवरून पूर्ण दंड सूचित होतो; आणि ही शिक्षा त्याने केलेल्या अपराधाच्या बदल्यात कितीतरी पट जास्त असावी.
[२५ पानांवरील चित्र]
कर्जाला जामीन राहताना सावध राहा
[२६ पानांवरील चित्र]
मुंगीसारखे मेहनती असा
[२७ पानांवरील चित्र]
चहाडीपासून दूर राहा