नम्र योशीयावर यहोवाची कृपा होते
नम्र योशीयावर यहोवाची कृपा होते
पाच वर्षांचा यहुदाचा राजपुत्र योशीया बावरून गेला असावा. त्याचे आजोबा, राजा मनश्शे यांचा मृत्यू झाल्यामुळे योशीयाची आई यदीदा रडत आहे.—२ राजे २१:१८.
मनश्शेनंतर आता योशीयाचा वडील, अम्मोन यहुदाचा राज्यकारभार हाती घेतो. (२ इतिहास ३३:२०) पण अवघ्या दोन वर्षांनंतर (सा.यु.पू. ६५९ साली), त्याचे सेवक त्याचा खून करतात. राजाशी फितुरी करणाऱ्या सर्वांना यहुदातील लोक ठार मारतात आणि लहान योशीयाला राजा बनवतात. (२ राजे २१:२४; २ इतिहास ३३:२५) अम्मोन राज्य करीत असताना जेरूसलेममधील सगळ्या घरांच्या छतांवर असलेल्या वेद्यांमधून धुपेचा वास सगळीकडे दरवळत असे. योशीयाला याची सवय झाली होती. त्या वेद्यांजवळ लोक त्यांच्या खोट्या दैवतांची भक्ती करत असत. तेथे मूर्तिपूजक पुजारी ये-जा करताना दिसायचे, आणि भक्तजन (यहोवाचे उपासक असल्याचाही दावा करणारे काहीजण) मिलकोम दैवताची शपथ वाहायचे.—सफन्या १:१, ५.
खोट्या दैवतांची पूजा करून अम्मोनाने दुष्कर्म केले हे योशीयाला ठाऊक होते. त्याला लहान वयातच देवाचा संदेष्टा सफन्या याने विदीत केलेला संदेश समजला होता. योशीया १५ वर्षांचा झाला तेव्हा (सा.यु.पू. ६५२ मध्ये) त्याला राजा बनून आठ वर्षे झाली होती. तेव्हा, सफन्याने सांगितल्याप्रमाणेच करण्याचा त्याने निर्धार केला. योशीयाने तरुणपणातच यहोवाचा शोध करायला सुरवात केली होती.—२ इतिहास ३३:२१, २२; ३४:३.
योशीया तत्काळ कार्य करतो
चार वर्षे उलटल्यावर, योशीया यहुदा आणि जेरूसलेममधील खोटी उपासना बंद करून त्या शहरांना शुद्ध करू लागतो (सा.यु.पू. ६४८). बआलच्या उपासनेसाठी वापरत असलेल्या मूर्ती, अशेरामूर्ती आणि धूप वेद्या तो नष्ट करतो. खोट्या दैवतांच्या मूर्तींची धूळमाती करून त्या दैवतांना अर्पणे केलेल्या लोकांच्या कबरांवर ती पसरतो. अशुद्ध उपासनेसाठी वापरलेल्या वेद्या भ्रष्ट करून त्या मोडून टाकतो.—२ राजे २३:८-१४.
एका लेवीय याजकाचा पुत्र, यिर्मया जेरूसलेमला येतो तेव्हा (सा.यु.पू. ६४७) योशीयाचे शुद्धीकरणाचे कार्य जोरात चालू असते. यहोवा देवाने तरुण यिर्मयाला संदेष्टा बनवले होते. तो खोट्या धर्माविरुद्ध यहोवाचा संदेश आवेशाने घोषित करतो! त्या वेळी, योशीया देखील यिर्मयाच्याच वयाचा होता. योशीयाने शुद्धीकरण केल्यावर आणि यिर्मयाने निडरतेने संदेश घोषित केल्यावरही तेथील लोक पुन्हा एकदा खोटी उपासना करू लागतात.—यिर्मया १:१-१०.
मौल्यवान शोध!
त्यानंतर पाच वर्षे उलटतात. पंचवीस वर्षांचा योशीया गेल्या १८ वर्षांपासून राज्य करत आहे. तो आपला चिटणीस शाफान, नगराचा कारभारी मासेया आणि अखबारनवीस योवाह यांना बोलावतो. राजा शाफानाला आज्ञा देतो: ‘मुख्य याजक हिल्कीया यास सांग की जो पैसा यहोवाच्या मंदिरी आलेला आहे व द्वारपाळांनी लोकांपासून जमविला आहे तो पैसा घेऊन मंदिराची मोडतोड झाली असेल ती दुरुस्त करण्यासाठी कारागिरास दिला जावा.’—२ राजे २२:३-६; २ इतिहास ३४:८.
पहाटेपासून मंदिराची दुरुस्ती करण्यासाठी कारागीर मेहनत करत असतात. योशीयाच्या काही दुष्ट पूर्वजांनी देवाच्या मंदिराची केलेली मोडतोड आता दुरुस्त केली जात आहे हे पाहून तो यहोवाचे आभार मानतो. मंदिराच्या दुरुस्तीचे काम चालू असताना शाफान एक खबर घेऊन त्याच्याकडे येतो. त्याच्या हातात हे काय आहे? तो कसली २ इतिहास ३४:१२-१८) केवढा अनमोल ठेवा—चक्क नियमशास्त्राची मूळ प्रत त्यांच्या हाती लागते!
गुंडाळी घेऊन आला आहे? तो सांगतो की, महायाजक हिल्कीयाला ‘मोशेच्याद्वारे दिलेला परमेश्वराच्या नियमशास्त्राचा ग्रंथ’ सापडला. (नियमशास्त्रातील प्रत्येक शब्द वाचून पाहायला योशीया आतुर झालेला असतो. मग शाफान त्याला ते पुस्तक वाचून दाखवतो तेव्हा प्रत्येक आज्ञा त्याला आणि त्याच्या लोकांना कशी लागू होते हे तो पाहण्याचा प्रयत्न करतो. त्या पुस्तकात शुद्ध उपासनेवर किती जोर दिला आहे आणि लोक खोटी उपासना करीत राहिले तर त्यांच्यावर पीडा येतील आणि ते बंदिवान केले जातील हे कळाल्यावर त्याच्यावर फार मोठा प्रभाव पडतो. देवाच्या सर्व आज्ञा पाळल्या जात नाहीत हे समजल्यावर तो आपले वस्त्र फाडतो आणि हिल्कीया, शाफान व इतरांना अशी आज्ञा देतो: ‘या ग्रंथातील मजकुरासंबंधाने तुम्ही जाऊन परमेश्वरास प्रश्न करा. या ग्रंथात जे सर्व लिहिले आहे ते करण्याच्या बाबतीत आमच्या वाडवडिलांनी देवाची आज्ञा पाळिली नाही म्हणून परमेश्वराने क्रोधाची वृष्टि आम्हावर केली आहे.’—२ राजे २२:११-१३; २ इतिहास ३४:१९-२१.
यहोवाचा संदेश कळवला जातो
योशीयाचे सेवक जेरूसलेममध्ये संदेष्ट्री हुल्दा हिच्याकडे जातात आणि एक बातमी घेऊन येतात. हुल्दा त्यांना यहोवाचा संदेश कळवते की, अलीकडेच सापडलेल्या पुस्तकात दिल्यानुसार त्या धर्मत्यागी राष्ट्रावर अरिष्ट येईल. परंतु, यहोवा देवासमोर योशीयाने स्वतःला नम्र केल्यामुळे त्याला हे अरिष्ट पाहावे लागणार नाही. त्याला त्याच्या पितरांशी मिळवले जाईल व त्याच्या कबरेत सुरक्षितपणे पोचवले जाईल.—२ राजे २२:१४-२०; २ इतिहास ३४:२२-२८.
परंतु योशीया तर युद्धात मरण पावला; मग हुल्दाची भविष्यवाणी खरी ठरली का? (२ राजे २३:२८-३०) होय, कारण योशीयाला त्याच्या कबरेत “शांतीने” पोहंचवण्यात आले. पण यहुदावर आलेला “गहजब” अर्थात अरिष्ट एकदम वेगळे होते. (२ इतिहास ३४:२८; २ राजे २२:२०) सा.यु.पू. ६०९-६०७ मध्ये आलेल्या अरिष्टाआधीच योशीया मरण पावला. बॅबिलोनी लोकांनी जेरूसलेमला घेरा घालून त्याचा नाश केल्याचे त्याने आपल्या डोळ्यांनी पाहिले नाही. शिवाय, ‘पितरांना मिळणे’ याचा अर्थ हिंसक पद्धतीने मृत्यू न येणे असा होत नाही. अशीच एक संज्ञा हिंसकरितीने आलेल्या मरणासाठी तसेच शांत मरणासाठीही वापरली गेली आहे.—अनुवाद ३१:१६; १ राजे २:१०; २२:३४, ४०.
खऱ्या उपासनेची वृद्धी
योशीयाने जेरूसलेमच्या सर्व लोकांना मंदिरात जमा करून त्यांना यहोवाच्या मंदिरात सापडलेल्या ‘कराराच्या ग्रंथातली सर्व वचने वाचून दाखविली.’ त्यानंतर त्याने असा करार केला की “मी परमेश्वराचे अनुसरण करीन व त्याच्या आज्ञा, निर्बंध व नियम जिवेभावे पाळीन, या ग्रंथात लिहिलेली सर्व वचने पाळीन.” तेव्हा सर्व लोकांनी तो करार मान्य केला.—२ राजे २३:१-३.
यानंतर, राजा योशीया मूर्तिपूजेविरुद्ध आणखी जोरदार मोहीम हाती घेतो. यहुदातील परक्या दैवतांच्या पुजाऱ्यांचे काम बंद केले जाते. अशुद्ध उपासनेत भाग घेणाऱ्या लेवीय याजकांना यहोवाच्या वेदीपाशी सेवा करायला अनुमती दिली जात नाही आणि राजा शलमोनाच्या कारकीर्दीत बांधलेली उच्च स्थाने उपासनेकरता अनुचित ठरवली जातात. हे शुद्धीकरण, इस्राएलच्या भूतपूर्व दहा-वंशांच्या राज्याच्या (ज्यावर सा.यु.पू. ७४० मध्ये अश्शुऱ्यांनी कब्जा केला होता) परिसरातही होते.
तीनशे वर्षांआधी ‘खऱ्या देवाच्या निनावी माणसाने’ केलेल्या भविष्यवाणीच्या पूर्णतेत बेथेल येथे राजा यराबामने बनवलेल्या वेदीवर योशीया बआलच्या पुजाऱ्यांच्या अस्थी जाळतो. तेथून आणि इतर शहरांमधून उच्च स्थाने काढून टाकण्यात येतात आणि ज्या उच्च स्थानी मूर्तिपूजक पुजारी सेवा करत होते त्याच वेद्यांवर तो त्यांना बली देतो.—१ राजे १३:१-४; २ राजे २३:४-२०.
भव्य वल्हांडण सण
देवाच्या पाठबळामुळेच योशीया शुद्ध उपासनेला चालना देऊ शकला. मरेपर्यंत योशीया राजा देवाला अशी विनंती करत राहिला की, लोकांनी त्यांच्या ‘वाडवडिलांचा देव यहोवा यास अनुसरावयाचे सोडू नये.’ (२ इतिहास ३४:३३) त्याच्या कारकीर्दीच्या १८ व्या वर्षात घडलेली एक घटना योशीया खासकरून कधीच विसरत नाही.
राजा सर्व लोकांना आज्ञा देतो: “[अलीकडेच सापडलेल्या] या कराराच्या ग्रंथात लिहिले आहे त्याप्रमाणे तुम्ही आपला देव परमेश्वर याच्याप्रीत्यर्थ वल्हांडण सण पाळा.” (२ राजे २३:२१) लोकांचा प्रतिसाद पाहून योशीयाला फार आनंद होतो. या सणासाठी तो स्वतः ३०,००० वल्हांडणाचे प्राणी आणि ३,००० गुरेढोरे देऊ करतो. केवढा भव्य वल्हांडण सण! शमुवेल संदेष्ट्याच्या दिवसापासून तेव्हापर्यंत कोणत्याही वल्हांडण सणात इतकी अर्पणे केली नव्हती, इतका पद्धतशीरपणा नव्हता आणि इतके उपासक देखील आले नव्हते.—२ राजे २३:२२, २३; २ इतिहास ३५:१-१९.
राजासाठी बराच शोक
आपल्या उर्वरित ३१ वर्षांच्या कारकीर्दीत (सा.यु.पू. ६५९-६२९) योशीया एक गुणी राजा म्हणून राज्य करतो. एकदा त्याला कळते की, ईजिप्तचा राजा नखो यहुदातून जाऊन बॅबिलोनच्या सैन्याला अडवणार आहे आणि अशातऱ्हेने फरात नदीजवळील कर्कमीश नगरावर स्वारी करून अश्शुरी राजाला मदत करणार आहे. तेव्हा योशीया ईजिप्तच्या राजाविरुद्ध लढायला जातो. पण त्याने असे का केले याचे कारण अद्याप कळालेले नाही. नखो आपले वकील राजा योशीयाकडे पाठवून त्याला म्हणतो: “माझ्याबरोबर देव आहे, त्याच्याशी विरोध करू नको; त्याने तुझा नाश करावा असे न होवो.” पण योशीया माघार घेत नाही; तो वेशांतर करून ईजिप्तच्या सैन्याला मागे फिरवण्यासाठी मगिद्दो येथे त्यांच्याशी युद्ध करायला जातो.—२ इतिहास ३५:२०-२२.
पण यहुदाच्या राजाचे हे दुर्दैव ठरते! शत्रूचे तिरंदाज बरोबर नेम धरून त्याच्यावर बाण सोडतात. तो जखमी झाल्यावर आपल्या सेवकांना म्हणतो: “मी घायाळ झालो आहे, मला येथून घेऊन चला.” तेव्हा त्याचे सेवक त्याला रथावरून उतरवून दुसऱ्या रथावर बसवतात व जेरूसलेमला नेतात. जेरूसलेमला गेल्यावर किंवा वाटेतच त्याने आपला प्राण गमावला. अशाप्रकारे, “तो मृत्यू पावला व त्यांनी त्यास त्याच्या पूर्वजांच्या कबरस्तानात मूठमाती दिली; तेव्हा सर्व यहूदा व यरुशलेम यांनी योशीयासाठी शोक केला,” असे प्रेरित अहवालात म्हटले आहे. यिर्मयाने योशीयाप्रीत्यर्थ विलापगीत रचले आणि त्यानंतर खास प्रसंगांमध्ये राजाची विलापगीते गायिली जात होती.—२ इतिहास ३५:२३-२५.
योशीयाने ईजिप्तच्या सैन्याचा सामना करून फार मोठी चूक केली. (स्तोत्र १३०:३) परंतु, त्याची नम्रता आणि खऱ्या उपासनेबद्दलचा खंबीरपणा यांमुळे त्याला देवाची कृपा प्राप्त झाली. नम्र अंतःकरणाच्या सेवकांवर यहोवा कृपा करतो हे योशीयाच्या उदाहरणावरून आपल्याला दिसून येते.—नीतिसूत्रे ३:३४; याकोब ४:६.
[२९ पानांवरील चित्र]
तरुण असतानाच योशीया राजाने यहोवाचा शोध केला
[३१ पानांवरील चित्र]
योशीयाने उच्च स्थाने नष्ट करून खऱ्या उपासनेला बढावा दिला