मदतीची अगतिक याचना
मदतीची अगतिक याचना
“देव मला विसरला हो!” पतीच्या आकस्मिक मृत्यूनंतर अतिशय शोकाकूल झालेल्या एका ब्राझिलियन स्त्रीने असे म्हटले. ती इतकी दुःखित झाली होती की तिला जगण्याची इच्छाच उरली नव्हती. दुःखाने बेजार होऊन अगतिकपणे मदतीची याचना करणाऱ्या अशा व्यक्तीला कधी तुम्ही दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे का?
दुःख असह्य झाल्यामुळे, काहीजण आपल्या जीवनाचाच शेवट करतात. यात अगदी तरुण मुलामुलींचाही समावेश आहे. फोल्या दी साँऊ पाउलू या दैनिकानुसार, ब्राझिल देशात घेण्यात आलेल्या अभ्यासातून असे दिसून आले की “आत्महत्या करणाऱ्या तरुणांची संख्या २६ टक्क्यांनी वाढली आहे.” साँऊ पाउलू येथे राहणाऱ्या वॉल्टर * नावाच्या एका तरुणाचे उदाहरण घ्या. तो अनाथ होता. घरदार नाही, कोणी भरवशाचे मित्र नाहीत. त्याच्या जीवनात फक्त दुःखच होते. शेवटी, वॉल्टरने एका पुलावरून उडी घेऊन आपल्या दुःखी जीवनाचा अंत केला.
एडना नावाची एक स्त्री एकटीच आपल्या दोन मुलांचे संगोपन करत होती. मग तिची एका माणसाशी भेट झाली. एक महिन्यानंतर ते दोघे त्याच्या आईच्या घरात एकत्र राहू लागले. त्याची आई जादूटोणा तर करतच होती पण तिला पिण्याचेही व्यसन होते. एडनाला आणखी एक मूल झाले. तीसुद्धा खूप पिऊ लागली. ती इतकी निराश झाली होती की तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. शेवटी तिच्या मुलांची कस्टडी तिच्याकडून काढून घेण्यात आली.
वयस्करांविषयी काय म्हणता येईल? मारिया नावाच्या एक स्त्रीचे उदाहरण पाहा. ती अतिशय खेळकर व मनमिळाऊ स्वभावाची स्त्री होती. पण जसजसे तिचे वय वाढू लागले तसतशी ती चिंताग्रस्त होऊ लागली. ती नर्स होती. काम करताना आपल्या हातून चुका होतील याची ती अवास्तव चिंता करू लागली. हळू हळू तिला डिप्रेशन येऊ लागले. सुरवातीला तिने आपल्याच मनाने काही औषधे घेतली, आणि मग डॉक्टरांकडूनही औषधोपचार घेतला. त्यामुळे थोडा फरक पडला. पण ५७ वर्षांच्या वयात तिला नोकरी गमवावी लागली तेव्हा ती अगदीच हताश झाली. आता जगण्यात काही अर्थ नाही असे तिला वाटू लागले. तिच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ लागले.
साँऊ पाउलू विद्यापीठाचे प्राध्यापक जूझे ॲल्बर्टू डेल पोर्तू यांच्या मते “डिप्रेशनने ग्रस्त असणाऱ्यांपैकी जवळजवळ १० टक्के लोक आत्महत्येचा प्रयत्न करतात.”
अमेरिकेच्या जन आरोग्य सेवेचे प्रमुख डॉ. डेव्हिड सॅट्चर यांच्या मते, “हत्येपेक्षाही, आत्महत्येमुळे जास्त लोक दगावले आहेत. विश्वास करायला कठीण वाटते, पण हे खरे आहे.”
आत्महत्येचा प्रयत्न म्हणजे एका अर्थाने मदतीसाठी केलेली अगतिक याचना असते. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्याचे कुटुंबीय व जवळचे लोक साहजिकच त्याला मदत करण्याचा प्रयत्न करतात. पण ज्याला जीवनातच काही रस उरला नाही अशा व्यक्तीला, “कशाला एवढं मनावर घेतोस” किंवा “लोकांना तर यापेक्षाही खडतर परिस्थितीतून जावं लागतं”
किंवा “जीवनात उतारचढाव येतच असतात” असे म्हणण्याचा काही उपयोग होणार नाही. त्यापेक्षा, अशा व्यक्तीला खरी सहानुभूती दाखवून तिला तुमच्याजवळ मन मोकळे करू देणे जास्त चांगले ठरणार नाही का? जीवनात अजून बरंच काही पाहण्यासारखं, करण्यासारखं, अनुभवण्यासारखं आहे याची त्या व्यक्तीला जाणीव करून देण्याचा प्रयत्न करा.फ्रेंच लेखक वॉल्टेअर याने असे लिहिले होते: “दुःखाच्या भरात स्वतःचा जीव घेणारा, आणखी एक आठवडा थांबला असता तर कदाचित त्याच्या मनात जगण्याची इच्छा निर्माण झाली असती.” पण दुःखाने बेजार झालेल्या लोकांच्या मनात जगण्याची इच्छा खरच निर्माण होऊ शकते का?
[तळटीप]
^ परि. 3 काही नावे बदलण्यात आली आहेत.
[३ पानांवरील चित्र]
आत्महत्या करणाऱ्या तरुणांची व वयस्करांची संख्या वाढत चालली आहे
[४ पानांवरील चित्र]
ज्यांना जगण्यात रस उरला नाही अशांना तुम्ही कशी मदत करू शकता?