व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

चिरस्थायी आनंद स्वर्गात की पृथ्वीवर?

चिरस्थायी आनंद स्वर्गात की पृथ्वीवर?

चिरस्थायी आनंद स्वर्गात की पृथ्वीवर?

तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्यावरच खासकरून तुमचा आनंद अवलंबून असतो का? पुष्कळजणांना असे वाटते, की चांगले स्वास्थ्य, इतरांबरोबर चांगले नातेसंबंध आणि जीवनातला उद्देश यांवरच बहुधा खरा आनंद अवलंबून असतो. बायबलसुद्धा याच्याशी सहमत आहे; ते म्हणते: “पोसलेल्या बैलाची मेजवानी देऊन मनांत द्वेष वागविणे, यापेक्षा प्रेमाची भाजीभाकरी बरी.”—नीतिसूत्रे १५:१७.

परंतु, दुःखाची गोष्ट म्हणजे मानवजातीचा आसरा असलेली ही पृथ्वी अनेक शतकांपासून द्वेष, लढाया आणि दुष्टाईचे माहेरघर बनली आहे. पण, ज्या ठिकाणी आत्मिक व्यक्‍ती राहतात आणि जिथे बहुतेकजण मेल्यानंतर जाऊ इच्छितात त्या स्वर्गाविषयी काय? सर्वसामान्यपणे मानले जाते त्याप्रमाणे स्वर्ग असे एक ठिकाण आहे का की जिथे दुष्टाई किंवा वाईट काम कधी झालेच नाही आणि जिथे केवळ आनंदी आनंद आहे?

बायबल म्हणते, की देव स्वर्गात राहतो आणि त्याच्यासोबत कोट्यवधी देवदूत राहतात. हे देवदूत म्हणजे आत्मिक प्राणी आहेत. (मत्तय १८:१०; प्रकटीकरण ५:११) बायबलमध्ये देवदूतांना ‘देवकुमार’ म्हटले आहे. (ईयोब ३८:४, ७) पण, हे देवदूत काही चालते-फिरते रोबोट नाहीत; तर मानवांप्रमाणे देवाने त्यांना देखील निवड करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. त्याचा अर्थ, ते चांगले काम करण्याची अथवा वाईट काम करण्याची निवड करू शकतात. मग प्रश्‍न आहे की, स्वर्गदूत कधी वाईट काम करण्याची निवड करतात का? हजारो वर्षांपूर्वी बऱ्‍याच देवदूतांनी वाईट काम करण्याची निवड केली होती हे जाणून अनेकांना आश्‍चर्याचा धक्का बसेल. देवाविरुद्ध पाप करून त्यांनी बंड केले!—यहूदा ६.

स्वर्गात बंड

दियाबल (निंदक) आणि सैतान (विरोधक) म्हटलेल्या एका देवदूताने देवाविरुद्ध बंड केले आणि तेव्हापासून स्वर्गात पापाचा जन्म झाला. सुरवातीला तो देवाच्या आज्ञाधारक देवदूतांपैकी एक होता. पण, नंतर त्याने स्वतःच वाईट कृत्य करण्याची निवड केली आणि इतर देवदूतांना देखील मार्गभ्रष्ट करून आपल्या पक्षात घेतले. अशाप्रकारे नोहाच्या दिवसांपर्यंत मोठ्या संख्येत स्वर्गदूतांनी सैतानाशी हातमिळवणी करून देवाविरुद्ध बंड पुकारले होते.—उत्पत्ति ६:२ (तळटीप: स्वर्गदूत, NW); २ पेत्र २:४.

या दुष्ट देवदूतांना देवाने लगेच स्वर्गातून घालवून दिले नाही. हजारो वर्षांपर्यंत देवाने त्यांना स्वर्गात येण्या-जाण्याची अनुमती दिली होती. * पण, देवाचा समय आला तेव्हा या दुष्ट देवदूतांना स्वर्गातून “खाली टाकण्यात” आले. सरतेशेवटी त्यांचा नाश केला जाणार होता. त्या वेळी स्वर्गात ही वाणी ऐकू आली: “स्वर्गांनो व त्यात राहणाऱ्‍यांनो, उल्लास करा.” (प्रकटीकरण १२:७-१२) समस्या निर्माण करणाऱ्‍या दुष्ट देवदूतांना स्वर्गातून बाहेर टाकण्यात आले तेव्हा बाकीच्या सर्व विश्‍वासू देवदूतांना अत्यंत आनंद झाला असेल यात शंका नाही!

वर दिलेल्या खास माहितीचा विचार केल्यावर लक्षात येते की जेव्हा जेव्हा मनुष्यांनी किंवा स्वर्गदूतांनी देवाच्या नियमांचे आणि सिद्धान्तांचे उल्लंघन केले तेव्हा तेव्हा खरी सुख-शांती त्यांच्यापासून दूर राहिली. (यशया ५७:२०, २१; यिर्मया १४:१९, २०) दुसऱ्‍या बाजूला पाहता लोक जेव्हा देवाच्या आज्ञांचे पालन करतात तेव्हा ते सुख-शांती अनुभवतात. (स्तोत्र ११९:१६५; यशया ४८:१७, १८) त्यामुळे प्रत्येक व्यक्‍तीने देवाच्या आज्ञांचे पालन केले, देवावर आणि एकमेकांवर मनापासून प्रेम केले तर पृथ्वीवर सुख-शांती नांदणार नाही का? बायबल म्हणते जरूर नांदेल!

पण, आपल्या स्वार्थासाठी वाईट मार्ग सोडून द्यायला तयार नसलेल्या लोकांविषयी काय? असे लोक नेहमी या पृथ्वीवर राहतील का? आणि देवाच्या इच्छेनुसार जीवन जगू इच्छिणाऱ्‍या लोकांचे जगणे मुश्‍कील करून टाकतील का? नाही, मुळीच नाही. देवाने ज्याप्रकारे दुष्ट स्वर्गदूतांविरुद्ध निर्णायक पाऊल उचलले आहे त्याचप्रमाणे तो दुष्ट लोकांचा देखील न्याय करील.

पृथ्वी साफ करणे

देवाने म्हटले: “आकाश माझे सिंहासन व पृथ्वी माझे पादासन आहे.” (यशया ६६:१) देव पवित्रतेचा सर्वोत्तम आदर्श असल्यामुळे तो आपले “पादासन” कायम दुष्टाईत राहू देणार नाही. (यशया ६:१-३; प्रकटीकरण ४:८) ज्याप्रकारे त्याने स्वर्गातून दुष्टाईचे समूळ उच्चाटन केले त्याप्रमाणे पृथ्वीवरूनही तो दुष्टाईचे नामोनिशाण मिटवून टाकील. बायबलच्या पुढील वचनांतून हे दिसून येते:

“दुष्कर्म करणाऱ्‍यांचा उच्छेद होईल; पण परमेश्‍वराची प्रतीक्षा करणारे पृथ्वीचे वतन पावतील.”—स्तोत्र ३७:९.

“कारण सरळ जनच देशांत वस्ती करितील; सात्विक जन त्यांत राहतील. दुर्जनांचा देशांतून उच्छेद होईल, अनाचाऱ्‍यांचे त्यांतून निर्मूलन होईल.”—नीतिसूत्रे २:२१, २२.

“तुम्हावर संकट आणणाऱ्‍या लोकांची परत संकटाने फेड करणे आणि संकट सोसणाऱ्‍या तुम्हास आम्हाबरोबर विश्रांति देणे, हे देवाच्या दृष्टीने न्याय आहे, म्हणून प्रभु येशू प्रगट होण्याच्या समयी ते होईल: तो आपल्या सामर्थ्यवान दूतांसह स्वर्गातून अग्निज्वालेसहित प्रगट होईल. तेव्हा जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभु येशूची सुवार्ता मानीत नाहीत त्यांचा तो सूड उगवील.”—२ थेस्सलनीकाकर १:६-९.

“[दुष्ट लोकांचे] जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत; पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.”—१ योहान २:१७.

पृथ्वीवर शांती कायम नांदेल?

बायबल अगदी स्पष्ट शब्दांत सांगते, की देव कायम दुष्टाई सहन करणार नाही. पण, दुष्टाईचे उच्चाटन केल्यानंतर पुन्हा कधीच दुष्टाई डोके वर काढणार नाही अशी पक्की खात्री आपण कशी बाळगू शकतो? कारण नोहाच्या काळातील जलप्रलयानंतर असेच घडले होते. त्यावेळी दुष्टाई इतक्या झपाट्याने पसरली की लोकांच्या दुष्ट योजना निष्फळ ठरवण्यासाठी देवाला त्यांच्या भाषांत गोंधळ घडवून आणावा लागला.—उत्पत्ति ११:१-८.

पृथ्वीवरील दुष्टाईचे उच्चाटन केल्यानंतर पुन्हा कधीच दुष्टाईचा जन्म होणार नाही यावर विश्‍वास ठेवण्यासाठी एक खास कारण आहे. ते म्हणजे यावेळी दुष्टाईचा अंत केल्यानंतर नोहाच्या जलप्रलयानंतर झाले त्याप्रमाणे मनुष्य पुन्हा कधीच पृथ्वीवर राज्य करणार नाही. त्याऐवजी देवाचे राज्य स्वर्गातून पृथ्वीवर राज्य करील. आणि पृथ्वीवर केवळ याच राज्याचे सरकार राहील. (दानीएल २:४४; ७:१३, १४) त्या राज्यात जो कोणी पुन्हा एकदा दुष्टाई सुरू करण्याचा प्रयत्न करील त्याचा त्याच क्षणी नाश केला जाईल. (यशया ६५:२०, पं.र.भा.) किंबहुना, त्या राज्यात सरतेशेवटी दुष्टाईचे मूळ कारण अर्थात सैतान याचा त्याच्या सर्व दुरात्म्यांसह कायम नाश केला जाईल.—रोमकर १६:२०.

त्याऐवजी लोकांना आज सोसाव्या लागणाऱ्‍या समस्या, जसे अन्‍न, वस्त्र, निवारा न मिळणे, तसेच नोकरी-धंद्याची टंचाई व त्यामुळे वाढणारी गुन्हेगारी देवाच्या राज्यात मुळीच नसेल. संपूर्ण पृथ्वी एका नयनरम्य बगीच्यासारखी होईल. ते जग केवळ सुंदरच नाही तर सुपीक देखील असेल आणि कुणालाही कशाचीच उणीव भासणार नाही.—यशया ६५:२१-२३; लूक २३:४३.

आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवाच्या राज्यात सर्वांना शांतीने राहण्याचे शिक्षण दिले जाईल आणि सर्व लोकांना परिपूर्ण देखील बनवले जाईल. (योहान १७:३; रोमकर ८:२१) त्यानंतर लोकांना कधीच आपल्या कमतरतांशी आणि पापमय इच्छा-आकाक्षांशी संघर्ष करावा लागणार नाही. आणि येशू ख्रिस्ताप्रमाणे ते आनंदाने देवाच्या आज्ञांचे पालन करू शकतील. (यशया ११:३) येशू ख्रिस्तासमोर मोठ-मोठी प्रलोभने आणि समस्या आल्या तरी देखील त्याने देवाप्रती निष्ठा दाखवली. पण, नव्या जगात वाईट परिस्थितीच नसेल. त्यामुळे विश्‍वासूपणे देवाची सेवा करणे अधिक सोपे होईल.—इब्री लोकांस ७:२६.

काही मोजके लोक स्वर्गात का जातील

बायबलचे वाचन करणारे बरेचजण येशूच्या या शब्दांशी चांगले परिचित आहेत: “माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत; . . . मी तुम्हासाठी जागा तयार करावयास जातो.” (योहान १४:२, ३) एका बाजूला बायबल म्हणते की मानवांना कायम या पृथ्वीवर राहण्यासाठी बनवले आहे; मग, स्वर्गात जाण्याविषयी येशू का बोलला?

ही काही परस्परविरोधी शिकवण नाही. किंबहुना, एकमेकांस आधारभूत आहेत. पहिली गोष्ट तर ही आहे, की बायबलनुसार केवळ काही मोजके विश्‍वासू ख्रिस्ती—ज्यांना आत्मिक प्राणी या नात्याने जिवंत केले जाईल—तेच केवळ स्वर्गात जातील. त्यांची संख्या १,४४,००० इतकी आहे. ही संख्या एका ‘लहान कळपाप्रमाणे आहे’ कारण त्यांच्या तुलनेत पृथ्वीवर जीवन जगण्याची आशा राखणाऱ्‍या लोकांची संख्या अगणित आहे. (लूक १२:३२) पण, स्वर्गात जीवन जगण्याचा सुहक्क केवळ काही मोजक्यांनाच का मिळतो? कारण योहानाच्या एका दृष्टांतानुसार ‘[१,४४,०००] जिवंत होतील आणि ख्रिस्ताबरोबर एक हजार वर्षे राज्य’ करतील. (प्रकटीकरण १४:१, ३; २०:४-६) तसेच, ते मानवजातीला आणि पृथ्वीला सुधारण्याच्या कामास लागतील तेव्हा येशूप्रमाणे तेसुद्धा ‘आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी सहानुभूती’ दाखवतील. कारण प्रत्येक मनुष्याला तोंड द्याव्या लागतात त्या सर्व समस्यांचा सामना त्यांनी देखील केला आहे.—इब्री लोकांस ४:१५.

पृथ्वी—लोकांचे कायमचे निवासस्थान

आपला पुत्र, येशू ख्रिस्त याचे बलिदान देऊन जवळजवळ दोन हजार वर्षांपूर्वी देवाने १,४४,००० अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना एकत्र करण्यास सुरू केले आणि पुराव्यांवरून समजते, की ही संख्या आता पूर्ण झाली आहे. (प्रेषितांची कृत्ये २:१-४; गलतीकर ४:४-७) पण, येशूचे बलिदान केवळ १,४४,००० अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या पापांसाठी नाही, “तर सर्व जगाच्याहि पापांबद्दल आहे.” (१ योहान २:२) त्यामुळे जो कोणी येशूवर विश्‍वास ठेवतो तो सार्वकालिक जीवनाची आशा बाळगू शकतो. (योहान ३:१६) देवाच्या स्मृतीत असलेल्या मृत लोकांना पुन्हा एकदा जिवंत केले जाईल; पण, स्वर्गात नव्हे तर एका अन्यायमुक्‍त पृथ्वीवर. (उपदेशक ९:५; योहान ११:११-१३, २५; प्रेषितांची कृत्ये २४:१५) मग, नव्या जगात त्यांना कोणते आशीर्वाद मिळतील?

प्रकटीकरण २१:१-४ म्हणते: “पाहा, देवाचा मंडप मनुष्यांजवळ आहे, . . . तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्‍यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.” कल्पना करा की कोणताही मनुष्य कधीच मरणार नाही; त्यामुळे साहजिकच कोणी दुःखी होणार नाही किंवा कोणी शोकही करणार नाही. सुरवातीला मनुष्यासंबंधी आणि पृथ्वीसंबंधी यहोवाचा जो उद्देश होता तो शेवटी पूर्ण होणारच.—उत्पत्ति १:२७, २८.

जीवन की मृत्यू—निवड तुमची आहे

आदाम आणि हव्वेला केव्हाही स्वर्गात जाण्याची निवड देण्यात आली नव्हती. त्यांच्यासमोर फक्‍त दोन गोष्टी ठेवण्यात आल्या होत्या आणि त्यातून त्यांना निवड करायची होती. एक तर देवाच्या आज्ञांचे पालन करून जीवनाची निवड करणे अथवा देवाच्या आज्ञांचे उल्लंघन करून मृत्यूची निवड करणे. दुःखाची गोष्ट अशी की त्यांनी देवाच्या आज्ञांचे उल्लंघन करण्याची निवड केली. याचा परिणाम असा झाला की ते पुन्हा “मातीला” जाऊन मिळाले. (उत्पत्ति २:१६, १७; ३:२-५, १९) मनुष्याने मेल्यानंतर स्वर्गात जावे असा देवाचा कधीच उद्देश नव्हता. स्वर्गात राहण्यासाठी देवाने अगणित स्वर्गदूत बनवले होते. हे स्वर्गदूत म्हणजे स्वर्गात जिवंत करण्यात आलेले मृत मानव नाहीत.—स्तोत्र १०४:१, ४; दानीएल ७:१०.

तर नव्या जगात सार्वकालिक जीवनाचा आनंद घेण्याची आपली इच्छा असल्यास काय करणे जरूरीचे आहे? प्रथम, देवाचे पवित्र वचन, बायबलचा अभ्यास करणे जरूरीचे आहे. येशूने आपल्या प्रार्थनेत म्हटले: “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.”—योहान १७:३.

त्यानंतर बायबलचे ज्ञान आपल्या जीवनात लागू करणे जरूरीचे आहे. (याकोब १:२२-२४) जे लोक बायबलनुसार जीवन जगतात त्यांना अनेक उद्‌भुत भविष्यवाणींची पूर्णता पाहायला मिळेल. उदाहरणार्थ, यशया ११:९ मध्ये दिलेली भविष्यवाणी. तिथे म्हटले आहे: “माझ्या सगळ्या पवित्र डोंगरावर ती [मानवजात] उपद्रव देणार नाहीत व नासधूस करणार नाहीत; कारण सागर जसा जलपूर्ण आहे तशी परमेश्‍वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल.” (तिरपे वळण आमचे.)

[तळटीप]

^ परि. 7 देवाने स्वर्गातून आणि पृथ्वीवरून दुष्टाईचे लगेच उच्चाटन का केले नाही हे जाणण्यासाठी सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान या पुस्तकातील पृष्ठ ७०-७९ पाहा. हे पुस्तक वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रक्ट सोसायटी ऑफ इंडियाने प्रकाशित केले आहे.

[७ पानांवरील चित्रे]

“नीतिमान्‌ पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करितील.” —स्तोत्र ३७:२९.