बायबल वाचन फायदेकारक व आनंददायक
बायबल वाचन फायदेकारक व आनंददायक
“रात्रंदिवस त्याचे मनन [वाचन, NW] कर.”—यहोशवा १:८.
१. वाचनाचे कोणते फायदे आहेत आणि खासकरून बायबलच्या वाचनाने कोणते लाभ मिळतात?
चांगले साहित्य वाचणे अत्यंत हितकारक आहे यात वाद नाही. फ्रेंच तत्त्वज्ञानी मॉन्टेस्की (चार्ल्स-लूई दी सेकन्डॅट) यांनी असे लिहिले: “जीवनातल्या ताणतणावांवर माझे आवडते औषध म्हणजे अभ्यास. एक तास निवांत वाचन केले की माझी सगळी दुःखे आपोआप नाहीशी होतात.” इतर कोणत्याही पुस्तकाच्या वाचनापेक्षा बायबल वाचनाच्या बाबतीत ही गोष्ट अगदी खरी आहे. म्हणूनच देवाच्या प्रेरणेने स्तोत्रकर्ता म्हणतो: “परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ते मनाचे पुनरुज्जीवन करिते; परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे. तो भोळ्यांस समंजस करितो. परमेश्वराचे विधि सरळ आहेत, ते हृदयाला आनंदित करितात.”—स्तोत्र १९:७, ८.
२. यहोवाने आजपर्यंत बायबलचे रक्षण का केले आहे आणि आपल्या लोकांकडून यहोवाची काय अपेक्षा आहे?
२ गत शतकांत, धार्मिक व धर्मेतर विरोधकांनी व शत्रूंनी बायबलचे नामोनिशाण मिटवण्याचे अनेक प्रयत्न केले; पण बायबलचा रचयिता स्वतः यहोवा देव असल्यामुळे, त्याने आजपर्यंत या पवित्र ग्रंथाचे रक्षण केले आहे. “सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहंचावे” अशी त्याची इच्छा असल्यामुळे जगातल्या सर्व लोकांना बायबल वाचता येईल अशी त्याने व्यवस्था केली आहे. (१ तीमथ्य २:४) एका अंदाजाप्रमाणे जगातल्या ८० टक्के लोकसंख्येला वाचता येतील अशा एकूण १०० भाषा आहेत. पण संपूर्ण बायबल आज ३७० भाषांत उपलब्ध आहे आणि यांव्यतिरिक्त १,८६० भाषांत व पोटभाषांत त्याचे काही भाग उपलब्ध आहेत. आपल्या लोकांनी आपले वचन वाचावे अशी यहोवाची इच्छा आहे. त्याचे सेवक त्याच्या वचनाकडे लक्ष देतात, म्हणजेच त्याचे दररोज वाचन करतात तेव्हा तो त्यांना अनेक आशीर्वाद देतो.—स्तोत्र १:१, २.
मंडळीत नेतृत्व करणाऱ्यांनी बायबल वाचलेच पाहिजे
३, ४. इस्राएलच्या राजांकरता यहोवाने कोणती आज्ञा दिली होती आणि आज ख्रिस्ती वडिलांनी देखील ही आज्ञा पाळणे का महत्त्वाचे आहे?
३ इस्राएल राष्ट्राला नियमशास्त्र देण्यात आले तेव्हा या राष्ट्रावर अद्याप मानवी राजे नियुक्त करण्यात आलेले नव्हते; पण भविष्यात जे राजे इस्राएलवर नियुक्त केले जाणार होते, त्यांविषयी यहोवाने म्हटले: “तो आपल्या राजासनावर आरूढ होईल तेव्हा लेवीय याजकांपाशी असलेल्या नियमशास्त्राची एक नक्कल त्याने एका वहीत स्वतःसाठी उतरून घ्यावी; ती त्याच्यापाशी असावी, आणि त्याने तिचे जन्मभर अध्ययन करावे, म्हणजे त्या नियमशास्त्रातल्या सगळ्या आज्ञा व हे विधि पाळून व त्याप्रमाणे आचरून तो आपला देव परमेश्वर ह्याचे भय बाळगावयाला शिकेल. असे केल्याने त्याचे हृदय आपल्या भाऊबंदांच्याबाबतीत उन्मत्त होणार नाही आणि तो ह्या आज्ञेपासून बहकून उजवीडावीकडे वळणार नाही; तसेच तो व त्याचे वंशज इस्राएल लोकांमध्ये चिरकाल राज्य करतील.”—अनुवाद १७:१८-२०.
४ इस्राएलच्या सर्व राजांनी देवाच्या नियमशास्त्राचे दररोज वाचन करावे अशी आज्ञा यहोवाने का दिली होती याकडे लक्ष द्या. (१) “नियमशास्त्रातल्या सगळ्या आज्ञा व हे विधि पाळून व त्याप्रमाणे आचरून तो आपला देव परमेश्वर ह्याचे भय बाळगावयाला शिकेल.” (२) “त्याचे हृदय आपल्या भाऊबंदांच्याबाबतीत उन्मत्त होणार नाही,” आणि (३) “तो ह्या आज्ञेपासून बहकून उजवीडावीकडे वळणार नाही.” आज ख्रिस्ती मंडळीची देखरेख करणाऱ्यांनाही यहोवाचे भय बाळगण्याची
गरज आहे; त्याच्या सर्व आज्ञा पाळण्याची, आपल्या भावांशी उन्मत्त मनोवृत्तीने न वागण्याची व यहोवाच्या नियमांपासून उजवीडावीकडे बहकू नये म्हणून सतत काळजी घेण्याची गरज आहे. नाही का? मग निश्चितच बायबलचे वाचन जसे इस्राएल राष्ट्राच्या राजांकरता अगत्याचे होते त्याचप्रमाणे मंडळीत जबाबदारीच्या पदांवर असलेल्या बांधवांकरता देखील ते तितकेच महत्त्वाचे आहे.५. बायबल वाचनासंबंधाने अलीकडेच नियमन मंडळाने ब्रांच कमिटीच्या सदस्यांना कोणते मार्गदर्शन केले आणि त्यांच्या या सल्ल्याचे सर्व ख्रिस्ती वडिलांनी पालन करणे का आवश्यक आहे?
५ ख्रिस्ती वडिलांवर अनेक जबाबदाऱ्या असतात, या सर्व पूर्ण करायला, खरे तर त्यांना वेळ कमी पडतो. उदाहरणार्थ, यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाचे सदस्य व जगभरातील शाखा दफ्तरांतील ब्रांच कमिटीचे सदस्य अतिशय व्यस्त असतात. साहजिकच दररोज बायबल वाचन करणे या सर्वांकरता एक आव्हानच आहे. पण नियमन मंडळाने सर्व ब्रांच कमिटीच्या सदस्यांना लिहिलेल्या एका पत्रात त्यांनी दररोज बायबल वाचणे व नियमित अभ्यास करणे यावर जोर दिला. या पत्रात सांगितल्याप्रमाणे नियमित बायबल वाचन व अभ्यास केल्यामुळे यहोवाबद्दलचे व सत्याबद्दलचे आपले प्रेम वाढत जाईल आणि “यहोवाच्या उद्देशांची वैभवी पूर्णता होईपर्यंत आपला विश्वास, आनंद आणि धीर कायम राखण्यासाठी आपल्याला मदत होईल.” यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळ्यांतील सर्व वडिलांना देखील बायबल वाचनाच्या आवश्यकतेची जाणीव आहे. असे केल्यामुळेच ‘सूज्ञतेने वागणे’ (पं.र.भा.) शक्य होईल याची त्यांना जाणीव आहे. (यहोशवा १:७, ८) खासकरून वडिलांकरता बायबलचे वाचन “सद्बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्यांकरिता उपयोगी आहे.”—२ तीमथ्य ३:१६.
सर्व वयांच्या लोकांनी बायबल वाचणे अगत्याचे
६. यहोशवाने यहोवाच्या नियमशास्त्राचे शब्द इस्राएलच्या गोत्रांपुढे व उपरी रहिवाशांपुढे का वाचून दाखवले?
६ प्राचीन काळात व्यक्तिगत उपयोगाकरता शास्त्रवचनांच्या प्रती उपलब्ध नव्हत्या. बायबलचे वाचन सबंध मंडळीपुढे केले जायचे. यहोवाने इस्राएलांना आय नगरावर विजय मिळवून दिल्यानंतर, यहोशवाने इस्राएलच्या सर्व गोत्रांना एबाल व गेरिझिम पर्वतासमोर एकत्रित केले. या घटनेच्या अहवालात असे म्हटले आहे: “त्यानंतर नियमशास्त्राच्या ग्रथांत लिहिलेली आशीर्वादाची व शापाची सर्व वचने त्याने वाचून दाखविली. इस्राएलांच्या सबंध मंडळीसमोर व त्यांच्या स्त्रिया, मुलेबाळे व त्यांच्यामध्ये राहणारे उपरी ह्यांच्यासमोर मोशेने दिलेल्या सगळ्या आज्ञा यहोशवाने वाचून दाखविल्या; त्यांतला एकहि शब्द त्याने गाळला नाही.” (यहोशवा ८:३४, ३५) मुलेबाळे व वृद्ध, रहिवाशी व उपरी या सर्वांना हे जाणून घेणे आवश्यक होते की त्यांना यहोवाचा आशीर्वाद मिळेल व कोणत्या प्रकारच्या वर्तनाने यहोवाचे शाप त्यांच्यावर येतील. बायबलचे नियमित वाचन केल्यामुळे आपल्यालाही हे जाणून घेता येईल.
७, ८. (अ) आज कोण ‘उपऱ्यांसारखे’ आहेत आणि त्यांनी रोज बायबलचे वाचन करणे का आवश्यक आहे? (ब) यहोवाच्या लोकांमध्ये असणारी ‘बालके’ येशूच्या उदाहरणाचे कशाप्रकारे अनुकरण करू शकतात?
७ आध्यात्मिक दृष्टिकोनातून, यहोवाचे लाखो सेवक त्या ‘उपऱ्यांसारखे’ आहेत. एकेकाळी ते या जगाच्या रितीभातींप्रमाणे चालत होते; पण त्यांनी आपल्या जीवनशैलीत बदल केला. (इफिसकर ४:२२-२४; कलस्सैकर ३:७, ८) पण, चांगले व वाईट याविषयीच्या यहोवाच्या दृष्टिकोनाबद्दल आजही त्यांनी वारंवार स्वतःला आठवण करून देणे आवश्यक आहे. (आमोस ५:१४, १५) हे करण्यासाठी देवाच्या वचनाचे दररोज वाचन केल्यामुळे मदत मिळते.—इब्री लोकांस ४:१२; याकोब १:२५.
८ यहोवाच्या लोकांमध्ये कित्येक “बालके” आहेत. त्यांच्या आईवडिलांनी त्यांना यहोवाचे नीतिनियम शिकवले आहेत. पण त्यांनी स्वतः देवाची इच्छा समजून ती स्वीकारली पाहिजे. (रोमकर १२:१, २) असे त्यांना कसे करता येईल? इस्राएल राष्ट्रात याजकांना व वडीलधाऱ्यांना अशी आज्ञा करण्यात आली होती: “हे नियमशास्त्र सर्व इस्राएलांना ऐकू येईल असे वाचून दाखीव. सर्व लोकांना म्हणजे पुरुष, स्त्रिया, बालके आणि तुझ्या नगरातला उपरी ह्यांना जमव म्हणजे ते ऐकून शिकतील आणि तुमचा देव परमेश्वर ह्याचे भय धरतील आणि ह्या नियमशास्त्रातली सर्व वचने काळजीपूर्वक पाळतील; त्यांच्या ज्या पुत्रपौत्रांना ही वचने माहीत नाहीत, तीहि ऐकतील आणि . . . तुमचा देव परमेश्वर ह्याचे भय धरावयाला ती शिकतील.” (अनुवाद ३१:११-१३) येशू १२ वर्षांचा होता, तेव्हा इस्राएल लोक अद्यापही नियमशास्त्राधीन होते; त्या कोवळ्या वयातही येशूने आपल्या स्वर्गीय पित्याचे नियम समजून घेण्याकरता विलक्षण उत्सुकता दाखवली. (लूक २:४१-४९) नंतरही, सभास्थानांत जाऊन शास्त्रवचनांचे वाचन होत असताना ते ऐकण्याची व त्यात स्वतः सहभाग घेण्याची येशूची सवय बनली. (लूक ४:१६; प्रेषितांची कृत्ये १५:२१) आज सर्व तरुणांना येशूच्या पावलावर पाऊल ठेवून, दररोज देवाच्या वचनाचे वाचन करण्याचे व सर्व सभांना नियमित उपस्थित राहण्याचे प्रोत्साहन दिले जाते; कारण तेथे बायबलचे वाचन केले जाते व अभ्यास घेतला जातो.
बायबल वाचन—सर्वात महत्त्वाचे
९. (अ) वाचण्याकरता पुस्तके निवडताना आपण ती विचारपूर्वक का निवडली पाहिजे? (ब) या नियतकालिकाच्या पहिल्या संपादकांनी बायबल अभ्यास साधनांसंबंधी काय म्हटले होते?
९ शलमोन राजाने असे लिहिले: “ग्रंथरचनेला काही अंत नाही; बहुत ग्रंथपठण देहास शिणविते.” (उपदेशक १२:१२) आणि आज प्रसिद्ध होणारी अधिकांश पुस्तके तर केवळ शिणवणारीच नाहीत, तर धोकेदायक देखील आहेत. म्हणूनच, जगिक पुस्तकांच्या बाबतीत निवडक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे तसेच संस्थेने प्रकाशित केलेली बायबल अभ्यासाची प्रकाशने वाचणे पुरेसे नाही; त्यासोबत आपण बायबलचे वाचन देखील केले पाहिजे. या नियतकालिकाच्या पहिल्या संपादकांनी वाचकांना उद्देशून असे म्हटले होते: “बायबल आधारित प्रकाशने देखील देवाने पुरवलेलीच साधने आहेत यात शंका नाही पण ही केवळ ‘साधने’ आहेत; आपला प्रमुख आधारग्रंथ बायबलच आहे हे कधीही विसरू नये.” * बायबल आधारित प्रकाशनांच्या वाचनाकडे तर आपण दुर्लक्ष करूच नये पण बायबल वाचणे देखील महत्त्वाचे आहे.
१०. ‘विश्वासू व बुद्धिमान दासाने’ बायबल वाचनाच्या महत्त्वावर कशाप्रकारे जोर दिला आहे?
मत्तय २४:४५) सध्याच्या बायबल वाचन आराखड्यानुसार जवळजवळ सात वर्षांत सबंध बायबलचे वाचन करणे शक्य आहे. हा आराखडा सर्वांकरताच फायदेशीर आहे पण खासकरून ज्यांनी कधीही संपूर्ण बायबल वाचलेले नाही अशा नवीन लोकांकरता तर अतिशय लाभदायक आहे. मिशनऱ्यांकरता असलेली वॉचटावर बायबल स्कूल ऑफ गिलियड, मिनिस्ट्रियल ट्रेनिंग स्कूल आणि बेथेल कुटुंबाच्या नवीन सदस्यांना देखील एका वर्षात सबंध बायबल वाचणे आवश्यक असते. वैयक्तिकरित्या किंवा कुटुंबासोबत बायबल वाचन करताना तुम्ही स्वतःचा आराखडा तयार करू शकता; पण कोणत्याही आराखड्यानुसार नियमित वाचन करण्याकरता बायबल वाचनाला इतर सर्व कामांपेक्षा जास्त महत्त्व देणे आवश्यक आहे.
१० ही गरज ओळखून कित्येक वर्षांपासून ‘विश्वासू व बुद्धिमान दासाने’ ईश्वरशासित सेवा प्रशालेच्या कार्यक्रमात बायबल वाचनाचा समावेश केला आहे. (तुम्ही किती नियमितपणे वाचन करता?
११. यहोवाची वचने आपण दररोज कशाप्रकारे आत्मसात करू शकतो आणि असे करणे का महत्त्वाचे आहे?
११ तुम्हाला नियमित बायबल वाचनाच्या आराखड्यानुसार वाचन करणे शक्य होत नसल्यास, स्वतःला विचारा: ‘इतर पुस्तके वाचण्यामुळे किंवा टीव्ही पाहण्यामुळे यहोवाचे वचन वाचायला मला वेळ मिळत नाही का?’ मोशेने लिहिलेल्या व येशूने पुनरुक्ती केलेल्या शब्दांची आठवण करा: “मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल.” (मत्तय ४:४; अनुवाद ८:३) शारीरिक आरोग्याकरता जसा दररोजचा आहार आवश्यक आहे त्याचप्रकारे आध्यात्मिक आरोग्य टिकवून ठेवण्याकरता नियमितपणे यहोवाचे विचार आत्मसात करणे आवश्यक आहे. आणि यहोवाचे विचार आपल्याला त्याच्या शास्त्रवचनांचे वाचन केल्यानेच समजू शकतात.
१२, १३. (अ) देवाच्या वचनाची इच्छा बाळगणे आवश्यक आहे हे समजावण्यासाठी प्रेषित पेत्राने कोणते उदाहरण दिले? (ब) पौलाने दूध पिण्याविषयी जे सांगितले ते पेत्राने दिलेल्या उदाहरणापेक्षा कसे वेगळे आहे?
१२ बायबल हे ‘माणसांचे नव्हे तर देवाचे वचन’ आहे हे जर आपण ओळखले असेल तर तान्हे मूल ज्याप्रमाणे आईच्या दुधासाठी अधीर होते त्याप्रमाणेच आपणही देवाच्या वचनाकडे आकर्षित होऊ. (१ थेस्सलनीकाकर २:१३) प्रेषित पेत्राने ही तुलना केली होती: “प्रभु कृपाळू आहे ह्याचा तुम्ही अनुभव घेतला आहे, तर तारणासाठी तुमची आध्यात्मिक वृद्धि व्हावी म्हणून नूतन जन्मलेल्या बालकांसारखे निऱ्या दुधाची इच्छा धरा.” (१ पेत्र २:२, ३) “प्रभू कृपाळू आहे” हे जर आपण खरोखर वैयक्तिकरित्या अनुभवले असेल तर आपोआपच आपल्याला बायबल वाचण्याची उत्सुकता वाटेल.
१३ पेत्राने या उताऱ्यात दुधाची इच्छा धरण्याची जी तुलना केली आहे, ती प्रेषित पौलाने केलेल्या तुलनेपेक्षा वेगळी आहे हे लक्षात घ्या. नवजात बालकाकरता दूध हेच पूर्णान्न असते. त्याच प्रकारे “तारणाकरता आपली आध्यात्मिक वृद्धी व्हावी” म्हणून आपल्याला आवश्यक असणारे पूर्ण आध्यात्मिक पोषण देवाच्या वचनात सामावलेले आहे हे पेत्राने दिलेल्या उदाहरणावरून स्पष्ट होते. पण पौलाने मात्र दुधाचे उदाहरण वेगळ्याप्रकारे उपयोगात आणले आहे. काहीजण आध्यात्मिकरित्या स्वतःला प्रौढ म्हणवत असले तरीसुद्धा ते प्रौढांना शोभणारा आध्यात्मिक आहार घेत नाहीत. अशांविषयी पौलाने हिब्रू ख्रिश्चनांना लिहिले: “वास्तविक इतक्या काळात तुम्ही शिक्षक व्हावयास पाहिजे होता पण तुम्हाला देवाच्या वचनाची मुळाक्षरे पुन्हा कोणीतरी शिकविण्याची जरूरी आहे, आणि तुम्हाला दुधाची गरज आहे, जड अन्न चालत नाही, असे तुम्ही झाला आहा. कारण दुधावर राहणारा नीतिमत्वाच्या वचनाशी अपरिचित असतो; कारण तो बाळक आहे; पण ज्यांच्या ज्ञानेंद्रियांना वहिवाटीने चांगले आणि वाईट समजण्याचा सराव झाला आहे अशा प्रौढांसाठी जड अन्न आहे.” (इब्री लोकांस ५:१२-१४) आपल्या ज्ञानेंद्रियांना चांगले आणि वाईट समजण्याचा सराव होण्याकरता आणि आपली आध्यात्मिक भूक वाढण्याकरता लक्षपूर्वक बायबल वाचन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
बायबलचे वाचन कसे करावे
१४, १५. (अ) बायबलचा लेखक आपल्याला कोणता बहुमान देतो? (ब) देवाकडून येणाऱ्या बुद्धीचा आपल्याला कोणता फायदा होतो? (उदाहरणे द्या.)
१४ बायबल वाचनाचा जास्तीत जास्त फायदा होण्याकरता वाचन सुरू करण्याआधी प्रार्थना करणे आवश्यक आहे. प्रार्थना करणे हा खरोखर आपल्याला लाभलेला बहुमान आहे. कल्पना करा, एखाद्या गहन विषयावरील ग्रंथाचे वाचन करण्याआधी त्यातील माहिती समजून घेण्याकरता खुद्द त्या ग्रंथाच्या लेखकाला तुम्हाला भेटता आले तर! बायबलचा मूळ लेखक यहोवा देव स्वतः तुम्हाला ही अद्भुत सुसंधी देतो. पहिल्या शतकातील नियमन मंडळाच्या एका सदस्याने आपल्या ख्रिस्ती बांधवांना असे लिहिले: “जर तुम्हांपैकी कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे म्हणजे ते त्याला मिळेल; कारण याकोब १:५, ६) आज देखील नियमन मंडळ सतत आपल्याला प्रार्थनापूर्वक बायबल वाचन करण्याचे प्रोत्साहन देत आहे.
तो कोणास दोष न लावता सर्वांस उदारपणे देणग्या देतो; पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे.” (१५ बुद्धी म्हणजे ज्ञानाचा योग्य वापर. बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्यांचा वैयक्तिक जीवनात योग्य वापर करता येईल हे ओळखण्यासाठी, बायबल उघडण्याआधी यहोवाला प्रार्थना करा. नवीन मुद्दे आढळल्यास त्यांची तुमच्या पूर्वीच्या ज्ञानाशी सांगड घाला. ‘सुवचनांच्या नमुन्यातील’ इतर सत्यांशी या मुद्द्यांचा कसा संबंध आहे हे समजण्याचा प्रयत्न करा. (२ तीमथ्य १:१३) प्राचीन काळातील यहोवाच्या सेवकांच्या जीवनातील घटनांवर विचार करा. त्या विशिष्ट परिस्थितीत आपण असतो तर आपण काय केले असते असा विचार करा.—उत्पत्ति ३९:७-९; दानीएल ३:३-६, १६-१८; प्रेषितांची कृत्ये ४:१८-२०.
१६. बायबल वाचन अधिक फायदेकारक व्हावे यासाठी कोणत्या सूचना देण्यात आल्या आहेत?
१६ बरीच पाने वाचून काढण्याचा प्रयत्न करण्यात काही अर्थ नाही. सावकाश वाचन करा आणि वाचलेल्या माहितीवर पुरेसा विचार करा. एखादा नवीन मुद्दा आढळला, किंवा समजायला कठीण वाटला तर त्या वचनासोबत तुमच्या बायबलमध्ये संदर्भ दिले असल्यास ते पडताळून पाहा. तरीसुद्धा तो मुद्दा स्पष्ट न झाल्यास, त्यावर नंतर आणखी संशोधन करण्याकरता खूण करून ठेवा. जी वचने तुम्हाला आठवणीत ठेवण्याची इच्छा आहे ती रेखांकित करा किंवा एखाद्या वहीत उतरवून घ्या. समासांत तुम्ही वैयक्तिक टिपण्या किंवा संबंधित वचने देखील लिहून ठेवू शकता. जी वचने प्रचार कार्यात किंवा अभ्यास घेताना उपयोगी पडतील असे तुम्हाला वाटते त्या वचनांतील एखादा खास शब्द नोट करून ठेवा. म्हणजे बायबलच्या मागे शब्दांची यादी असल्यास, तुम्हाला ते वचन शोधता येईल. *
बायबल वाचन आनंददायक बनवा
१७. बायबल वाचन आनंदाने का केले पाहिजे?
१७ जो मनुष्य “परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करितो” त्याला स्तोत्रकर्त्याने धन्य म्हटले. (स्तोत्र १:२) दररोजचे बायबल वाचन हे केवळ कर्तव्य म्हणून आपण करू नये; आपल्याला त्यात आनंद वाटला पाहिजे. आणि आनंद वाटण्यासाठी शिकलेल्या गोष्टींचे मोल आपल्याला कळले पाहिजे. बुद्धिमान राजा शलमोन याने असे लिहिले: “ज्याला ज्ञान प्राप्त होते, जो सुज्ञता संपादन करितो, तो मनुष्य धन्य होय. त्याचे मार्ग आनंदाचे आहेत; त्याच्या सर्व वाटा शांतिमय आहेत. जे त्याला धरून राहतात त्यांस ते जीवनवृक्षरूप आहे; जो कोणी ते राखून ठेवितो तो धन्य होय.” (नीतिसूत्रे ३:१३, १७, १८) ज्ञान व सुज्ञता मिळवण्याकरता मेहनत घ्यावी लागते हे खरे आहे, पण या सर्व प्रयत्नांचे फळ म्हणजे आनंद, शांती आणि शेवटी सार्वकालिक जीवन हे आहे.
१८. बायबल वाचण्यासोबतच आणखी काय आवश्यक आहे आणि पुढील लेखात आपण काय पाहणार आहोत?
१८ होय, बायबल वाचन निश्चितच फायदेकारक व आनंददायक आहे. पण केवळ बायबल वाचणे पुरेसे आहे का? ख्रिस्ती धर्मजगतातील चर्चचे लोक देखील बायबल वाचतात; किंबहुना कित्येक शतकांपासून ते असे करत आले आहेत. परंतु, “सदा शिकत असूनहि सत्याच्या ज्ञानाला कधी न पोहंचणाऱ्या” लोकांपैकी ते आहेत. (२ तीमथ्य ३:७) बायबलचे वाचन खरोखर फायदेकारक व्हावे असे वाटत असल्यास, त्यातून प्राप्त होणाऱ्या ज्ञानाचा दैनंदिन जीवनात वापर करण्याचा व क्षेत्र सेवेत त्याचा उपयोग करण्याचा आपण निर्धार केला पाहिजे. हाच आपला उद्देश असला पाहिजे. (मत्तय २४:१४; २८:१९, २०) यासाठी बायबल वाचण्यासोबतच योग्य पद्धतीने अभ्यास करणे देखील आवश्यक आहे. हा अभ्यास देखील अतिशय आनंददायक व फायदेकारक आहे. पुढील लेखात आपण याविषयीच पाहणार आहोत.
[तळटीपा]
^ परि. 9 वॉचटावर बायबल ॲन्ड ट्रॅक्ट सोसायटी यांच्याद्वारे प्रकाशित जेहोवाज विट्नेसेस—प्रोक्लेमर्स ऑफ गॉड्स किंग्डम, पृष्ठ २४१.
^ परि. 16 टेहळणी बुरूज, मे १, १९९५ अंकात पृष्ठ १६-१७ वर “तुमचे बायबल वाचन वाढवण्यासाठी सूचना” या शीर्षकाखालील माहिती पाहा.
उजळणीचे प्रश्न
• इस्राएलातील राजांना दिलेली कोणती आज्ञा आज मंडळीत देखरेख करणाऱ्यांनी देखील पाळणे आवश्यक आहे आणि का?
• आजच्या काळात कोणाला “उपरी” व “बालके” म्हणता येईल आणि त्यांनी रोज बायबल वाचणे का महत्त्वाचे आहे?
• आपण नियमित बायबल वाचावे म्हणून ‘विश्वासू व बुद्धिमान दासाने’ कोणती व्यावहारिक मदत पुरवली आहे?
• बायबल वाचनातून आपण पुरेपूर फायदा कसा करून घेऊ शकतो?
[अभ्यासाचे प्रश्न]
[९ पानांवरील चित्र]
खासकरून मंडळीच्या वडिलांनी दररोज बायबल वाचणे अत्यावश्यक आहे
[१० पानांवरील चित्र]
सभास्थानांत होणाऱ्या शास्त्रवचनांच्या वाचनात येशू नियमितपणे सहभागी होत असे