व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मला मिळालेला अनमोल वारसा

मला मिळालेला अनमोल वारसा

जीवन कथा

मला मिळालेला अनमोल वारसा

कॅरल ॲलन यांच्याद्वारे कथित

मी सात वर्षांची असताना एकदा हरवले होते. नुकतंच मिळालेलं माझं नवीन पुस्तक हातात घट्ट धरून मी एकटीच उभी होते. माझ्या आसपास इतके लोक होते, पण मी कोणालाच ओळखत नव्हते! मी घाबरून रडू लागले.

साठ वर्षांआधीची ही घटना मला एकदम आठवली. मी माझे पती पॉल यांच्याबरोबर न्यूयॉर्क, पॅटरसन येथील वॉचटावर एज्युकेशनल सेंटरला गेले होते. यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रवासी पर्यवेक्षकांसाठी असलेल्या एका प्रशालेला उपस्थित राहण्याकरता पॉलला आमंत्रण मिळाले होते. त्या निमित्ताने मीही त्यांच्याबरोबर गेले होते.

इमारतीत आत गेल्या गेल्या एक लॉबी आहे. तेथे एका भिंतीवर मला एक फलक दिसला. त्यावर “अधिवेशने” असं मोठ्या ठळक अक्षरांमध्ये लिहिलं होतं. आणि त्या फलकाच्या मधोमध, हातात पुस्तकं घेऊन उभे असलेल्या लहान मुलांचा एक ब्लॅक ॲण्ड व्हाईट फोटो होता. (मी हरवले होते तेव्हा माझ्या हातात हेच पुस्तक होतं.) फोटोच्या खाली लिहिलं होतं: “१९४१—सेंट लुई, मिसूरी येथे अधिवेशनाचा सकाळचा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा ५ ते १८ वयोगटातील १५,००० मुलं स्टेजच्या समोरील भागात जमली होती. . . . बंधू रदरफोर्ड यांनी चिल्ड्रन नावाच्या नवीन पुस्तकाचं तेव्हा अनावरण केलं.”

प्रत्येक मुलाला या पुस्तकाची एक एक प्रत देण्यात आली होती. आणि मग सर्व मुलं आपापल्या आईबाबांजवळ जाऊन बसली. पण मी कशी जाणार? आईबाबा कुठे बसले होते ते तर मी विसरून गेले होते. मग एका बांधवानं मला वर उचललं आणि जवळच ठेवलेल्या एका उंच दानपेटीवर उभं करून म्हटलं, की तुझ्या ओळखीचं कोणी दिसतंय का ते पाहा. पायऱ्‍यांवरून खाली येणाऱ्‍या घोळक्यात माझ्या ओळखीचा चेहरा मी शोधू लागले. तेवढ्यात मला अंकल बॉब दिसले. मी जोरजोराने ओरडू लागले, “अंकल बॉब! अंकल बॉब!” मग अंकल बॉब आले आणि त्यांनी मला आईबाबांजवळ नेलं. ते माझीच वाट पाहात होते.

माझ्या जीवनाला आकार देणाऱ्‍या घटना

लॉबीतला तो फलक पाहून मला अशाच अनेक घटना आठवल्या. या घटनांनी माझ्या जीवनाला आकार दिला होता व त्यामुळेच मला पॅटरसन पाहण्याचा सुहक्क लाभला. मला, आजीआजोबांनी व माझ्या आईबाबांनी सांगितलेल्या जवळजवळ शंभर वर्षांपूर्वी घडलेल्या घटना आठवू लागल्या.

डिसेंबर १८९४ मध्ये, एक बायबल विद्यार्थी माझ्या आजोबांकडे म्हणजे क्लेटन जे. वुडवर्थ यांच्या अमेरिकेतल्या पेनस्लिव्हेनिया, स्क्रॅन्टन येथील घरी आले. आजोबांचं तेव्हा नवीनच लग्न झालं होतं. त्यांनी वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीचे तेव्हाचे अध्यक्ष, बंधू चार्ल्स टेझ रस्सल यांना एक पत्र लिहिलं होतं. हे पत्र टेहळणी बुरूज जून १५, १८९५ च्या अंकात छापून आलं होतं. आजोबांनी असं लिहिलं होतं:

“आमचं आताच नवीन लग्न झालं आहे. सुमारे दहा वर्षांपासून आम्ही मेथडिस्ट चर्चचे सदस्य होतो. पण आता आम्ही अंधारातून निघून, सर्वोच्च परमेश्‍वराच्या पवित्र मुलांसाठी जो नवीन दिवस उदयास आला आहे त्या दिवसाच्या प्रकाशात प्रवेश करत आहोत. . . . आमचं लग्न व्हायच्या आधीपासूनच आम्हा दोघांचीही प्रभूची सेवा करायची, त्याची इच्छा असल्यास, परदेशात जाऊन मिशनरी म्हणून सेवा करायची उत्कट इच्छा आहे.”

माझ्या आईचे आजोबा आणि आजी, सबॅस्टिन व कॅथरिन क्रेश्‍ग पेन्सिल्व्हानियाच्या नयनरम्य पोकोनो डोंगरांजवळच्या एका मोठ्या फार्मवर राहत होते. १९०३ साली वॉच टावर संस्थेचे दोन प्रतिनिधी त्यांच्याकडे आले तेव्हा त्यांनी त्यांचा बायबलमधला संदेश आनंदाने ऐकला. त्यांच्या मुली, कोरा आणि मेरी या देखील आपापल्या नवऱ्‍यांबरोबर, म्हणजे वॉश्‍गिंटन आणि एडमन्ड हॉवल यांच्याबरोबर तेथेच राहायच्या. कार्ल हॅमरले आणि रे रॅटक्लिफ हे वॉच टावर संस्थेचे प्रतिनिधी एक आठवडा त्यांच्याकडे राहिले. त्यांनी त्यांना पुष्कळ गोष्टी शिकवल्या. त्यांच्या कुटुंबातील सहा सदस्यांनी बायबलमधील संदेश ऐकला, बायबलचा अभ्यास केला आणि तेही आवेशी बायबल विद्यार्थी बनले.

त्याच वर्षी म्हणजे १९०३ मध्ये कोरा आणि वॉश्‍गिंटन हॉवल यांना कॅथरीन नावाची मुलगी झाली. हीच कॅथरीन माझी आई आहे. तिने क्लेटन जे. वुडवर्थ जुनियर यांच्याबरोबर म्हणजे माझ्या बाबांबरोबर लग्न केलं. त्यांची कहाणी अतिशय रोचक, नव्हे मला तर वाटतं अतिशय अर्थपूर्ण कहाणी आहे. आजोबा क्लेटन जे. वुडवर्थ सिनियर, यांनी त्यांना किती प्रेमळपणे मार्गदर्शन दिले, त्यांची किती काळजी घेतली हेच यावरून दिसून येते.

बाबांना प्रेमळ मदत देण्यात आली

बाबांचा जन्म सन १९०६ मध्ये हॉवल फार्मपासून ५० मैलांवर असलेल्या स्क्रॅन्टन येथे झाला होता. वुडवर्थ आजोबांची हॉवल कुटुंबाबरोबर चांगलीच ओळख झाली. हॉवल कुटुंब आदरातिथ्यासाठी नावाजलेले होते. आजोबांनाही त्याचा प्रत्यय आला. त्या क्षेत्रातील बायबल विद्यार्थ्यांच्या मंडळीतील सर्वांना आजोबांची खूप मदत व्हायची. हॉवल कुटुंबातील तीन मुलांची लग्नं आजोबांनीच लावून दिली. प्रत्येक लग्नाला आजोबा बाबांनाही सोबत न्यायचे. आपल्या मुलाचंही जमेल, असं त्यांना मनोमन वाटत होतं.

बाबा तेव्हा सत्यात इतके आवेशी नव्हते. ते आजोबांना त्यांच्या अभ्यासांना किंवा पुनर्भेटींना कारमधून घेऊन जायचे खरे, पण त्यांनी स्वतः मात्र, आजोबांनी उत्तेजन देऊनही, या कार्यात सक्रियपणे भाग घेतला नाही. त्या वेळी, बाबांना संगीताचं वेड होतं, म्हणून ते त्या दिशेने प्रगती करत होते.

कोरा आणि वॉशिंग्टन हॉवल यांची मुलगी कॅथरीन ही देखील एक निष्णात संगीतकार झाली होती. ती पियानो वाजवायची आणि शिकवायची देखील. या क्षेत्रात तिचे नाव गाजत असतानाच तिने हे क्षेत्र सोडले आणि ती पूर्ण वेळेच्या सेवेत उतरली. आपल्या मुलासाठी हीच मुलगी आजोबांच्या मनात बसली असावी असे मला तरी वाटते! बाबांचा बाप्तिस्मा झाला आणि सहा महिन्यांनंतर म्हणजे जून १९३१ मध्ये त्यांनी आईबरोबर विवाह केला.

बाबा संगीत क्षेत्रात निष्णात होते म्हणून आजोबांना त्यांचा खूप अभिमान वाटायचा. ओहायो, क्लिव्हलँड येथील १९४६ साली झालेल्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनात, बाबांना जेव्हा अधिवेशनातील ऑर्केस्ट्राला प्रशिक्षण देण्याचे सांगण्यात आले तेव्हा तर त्यांना खूप आनंद झाला. पुढील वर्षांमध्ये बाबांनी यहोवाच्या साक्षीदारांच्या अनेक अधिवेशनांमध्ये ऑर्केस्ट्रांचे संचालन केले.

आजोबांची चौकशी आणि तुरुंगवास

पॅटरसनच्या लॉबीत पॉल आणि मला आणखी एक ओळखीचा फोटो दिसला. तो पुढच्या पानावर दिलेला आहे. मी तो फोटो लगेच ओळखला, कारण आजोबांनी मला ५० वर्षांआधी त्या फोटोची एक प्रत पाठवली होती. फोटोत आजोबा उजवीकडून पहिले उभे आहेत.

पहिल्या महायुद्धाच्या वेळी सगळीकडे राष्ट्रीयत्वाचे वातावरण होतं. त्याच दरम्यान, आठ बायबल विद्यार्थ्यांवर खोटा आरोप लावून त्यांना अटक करण्यात आली. बंधू जोसफ एफ. रदरफोर्ड (मध्ये बसलेले) यांनाही अटक करण्यात आली होती. ते तेव्हा वॉच टावर संस्थेचे अध्यक्ष होते. अटक केलेल्या कोणालाही जामीन मंजूर करण्यात आला नाही. स्टडीज इन द स्क्रिपचर्स याच्या द फिनिश्‍ड मिस्ट्री या सातव्या खंडातील काही वाक्ये घेऊन त्यांच्यावर आरोप दाखल करण्यात आला होता. अमेरिकेने पहिल्या महायुद्धात भाग घेऊ नये असा त्या वाक्यांचा अर्थ होतो असा चुकीचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला.

चार्ल्स टेझ रस्सल यांनी अनेक वर्षांदरम्यान स्टडीज इन द स्क्रिपचर्स याचे सहा खंड लिहून काढले होते पण सातवा खंड लिहून पूर्ण करायच्या आतच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे मग त्यांनी लिहिलेल्या नोट्‌स आजोबांना आणि आणखी एका बायबल विद्यार्थ्याला देण्यात आल्या. त्या दोघांनी मिळून सातवा खंड पूर्ण केला. सन १९१७ मध्ये महायुद्ध संपायच्या आतच तो प्रकाशित करण्यात आला. आजोबा आणि इतर आठ लोकांना प्रत्येकी २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली.

पॅटरसन लॉबीमधील चित्राखाली असे लिहिले आहे: “रदरफोर्ड आणि त्यांच्या सहकाऱ्‍यांना शिक्षा दिल्याच्या नऊ महिन्यांनंतर, महायुद्ध संपल्यावर मार्च २१, १९१९ रोजी अपील कोर्टाने आठही जणांसाठी जामीन मंजूर केला आणि ब्रुकलिन येथे मार्च २६ रोजी त्यांना प्रत्येकी १०,००० डॉलर जामीनावर सोडण्यात आले. मे ५, १९२० रोजी जे. एफ. रदरफोर्ड आणि इतरांना सर्व आरोपांतून मुक्‍त करण्यात आले.”

शिक्षा ठोठावल्यानंतर, जॉर्जिया, अटलांटा येथील सरकारी कारागृहात पाठवण्याआधी, या आठही जणांना काही दिवसांसाठी न्यूयॉर्क ब्रुकलिन येथील रेमण्ड स्ट्रीट जेलमध्ये राहावे लागले. या जेलमध्ये असताना आजोबांनी आम्हाला एक पत्र लिहिलं. त्यात त्यांनी जेलमधील खोलीचे वर्णन केले होते. सहा बाय आठ फुटांची ही खोली इतकी “गलिच्छ आणि अव्यवस्थित आहे की मला तिचं वर्णन करता येणार नाही” असे त्यांनी म्हटले होते. त्यांनी पुढे लिहिले: “या खोलीत आम्हाला बातमीपत्रकांचा एक ढीग दिलाय. सुरवातीला आम्हाला वाटलं, ही बातमीपत्रं उगाच कशाला दिलीत. पण नंतर मात्र आमच्या लक्षात आलं की, आमची स्वच्छता आणि आमचा स्वाभिमान याच बातमीपत्रकांवर, एका साबणावर आणि एका फडक्यावर टिकून आहे. स्वच्छतेसाठी आमच्याकडे दुसरं काहीच नव्हतं.”

इतक्या खडतर परिस्थितीतही आजोबांची विनोदबुद्धी कायम होती. त्यांनी या जेलला “होटेल दे रेमॉण्डी” असे नाव दिले होते. आणि पुढे म्हणाले, “माझं काम संपलं की मी लगेच येईन.” तुरुंगातील अंगणात ते फिरायला जात असत, त्याच्याबद्दलही त्यांनी आम्हाला एक गंमत लिहिली होती. एकदा केस विंचरायला ते थांबले तेव्हा, एका खिसेकापूने त्यांचे पॉकेट वॉच हिसकावले. पण, ते म्हणाले, “पॉकेट वॉचची चेनच तुटली आणि वॉच खिशातच राहिलं.” आजोबांचं ते वॉच अजूनही मी जपून ठेवलं आहे. १९५८ मध्ये मी ब्रुकलिन बेथेलला गेले होते तेव्हा, वॉच टावर संस्थेचे तेव्हाचे सचिव आणि खजिनदार बंधू ग्रॅन्ट सूटर यांनी मला त्यांच्या कार्यालयात बोलवून ते वॉच दिलं होतं.

बाबांवर पडलेला प्रभाव

काहीही चूक नसताना आजोबांना १९१८ मध्ये तुरुंगात टाकण्यात आले तेव्हा बाबा फक्‍त १२ वर्षांचे होते. तेव्हा आजीने म्हणे घराला ताळे लावले आणि बाबांना घेऊन ती आपली आई आणि तीन बहिणी यांच्यासोबत राहायला गेली. आजीचं माहेरचं आडनाव आर्थर होतं. त्यांचं कुटुंब फार अभिमानानं असा दावा करत होतं की चेस्टर ॲलन आर्थर नावाचे त्यांचे एक नातेवाईक हे अमेरिकेचे २१ वे राष्ट्रपती होते.

अमेरिकेविरुद्ध गुन्हे केल्याचा आरोप असल्यामुळे आजोबांना अनेक वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा मिळाली तेव्हा आर्थर कुटुंबाला वाटले, की आजोबांनी त्यांच्या कुटुंबाचे नाव धुळीस मिळवले. तो काळ माझ्या बाबांसाठी अतिशय कठीण काळ होता. या वागणुकीमुळेच कदाचित सुरवातीला ते क्षेत्रसेवेत इतके सक्रियपणे भाग घेत नव्हते.

तुरुंगातून सुटका झाल्यावर आजोबा आपल्या कुटुंबाला घेऊन स्क्रॅन्टन येथील क्वीन्सी स्ट्रीटवरील एका मोठ्या घरात राहायला गेले. मी तेव्हा लहान होते, पण मला ते घर अजूनही आठवतं. आजीची काचेची भांडी पण चांगली आठवतात. आम्ही त्या भांड्यांना पवित्र भांडी म्हणायचो. कारण, आम्हाला कोणालाही ती भांडी धुवायची परवानगी नव्हती, फक्‍त आजी ती भांडी धुवायची. १९४३ मध्ये आजी गेल्यावर आईला ती सुंदर भांडी मिळाली आणि तिनंही त्यांचा सांभाळून वापर केला.

राज्य सेवेत मग्न

पॅटरसनमध्ये असताना आणखी एका दिवशी मी बंधू रदरफोर्ड यांचा १९१९ च्या सिडर पॉईंट ओहायो येथील एका अधिवेशनात भाषण देत असतानाचा फोटो पाहिला. या अधिवेशनात त्यांनी सर्वांना देवाच्या राज्याची घोषणा आवेशाने करण्यास व त्या अधिवेशनात नव्याने प्रकाशित झालेले द गोल्डन एज नावाचे मासिक देण्याचे उत्तेजन दिले. आजोबांना त्या मासिकाचे संपादक म्हणून नियुक्‍त करण्यात आले. १९४० मध्ये त्यांचा मृत्यू होण्याच्या काही दिवसांआधीपर्यंत ते या मासिकासाठी लेख लिहायचे. १९३७ मध्ये या मासिकाचे नाव बदलून कॉन्सोलेशन करण्यात आले आणि मग १९४६ मध्ये पुन्हा बदलून अवेक! करण्यात आले.

आजोबा, स्क्रॅन्टन येथील आपल्या घरात आणि ब्रुकलिनमध्ये सुमारे २४० किलोमीटर दूर असलेल्या वॉच टावर संस्थेच्या मुख्यालयातही लिखाणाचे काम करायचे. ते दोन आठवडे घरी तर दोन आठवडे मुख्यालयात राहायचे. बाबा सांगतात, की आजोबा घरी असताना पुष्कळ वेळा पहाटे पाच वाजल्यापासूनच त्यांच्या टाईपरायटरचा आवाज यायला सुरू व्हायचा. पण आजोबांनी क्षेत्र सेवेकडे कधी दुर्लक्ष केले नाही. त्यांनी पुरुषांसाठी बंडी शिवली. त्या बंडीला आतून खिसे होते, ज्यात बायबल साहित्य ठेवता येत होते. माझ्या ९४ वर्षांच्या मामीनं, नओमी हॉवलनं अजूनपर्यंत ती बंडी जपून ठेवली आहे. याशिवाय आजोबांनी खास स्त्रियांसाठी एक बुकबॅग देखील बनवली होती.

एकदा, क्षेत्र सेवेत एका माणसाशी बराच वेळ छान चर्चा करून झाल्यानंतर आजोबांबरोबर गेलेले बांधव त्यांना म्हणाले, “सी.जे., तुम्ही एक चूक केलीत.”

आजोबांनी विचारलं, “कोणती चूक?” आणि त्यांनी आपल्या बंडीचे दोन्ही खिसे तपासून पाहिले. दोन्ही खिसे रिकामे होते.

“तुम्ही त्या व्यक्‍तीला द गोल्डन एजची वर्गणी द्यायला विसरलात!” मासिकाचा संपादकच मासिक द्यायला विसरला यावर ते दोघंही खूप हसले.

लहानपणीच्या आठवणी

मी लहान असताना मला आठवतं आजोबा मला त्यांच्या मांडीत बसवून, माझा चिमुकला हात त्यांच्या हातात धरून एक “फिंगर स्टोरी” सांगायचे. अंगठ्यापासून करंगळीपर्यंत प्रत्येक बोटाच्या महत्त्वाबद्दल ते सांगायचे. आणि मग सर्व बोटांची मूठ बांधून म्हणायचे: “एकी हेच बळ.”

आईबाबांचं लग्न झाल्यावर ते ओहायोत क्लिव्हलँड येथे राहायला गेले. तेथे राहणाऱ्‍या एड आणि मेरी हूपर यांच्याशी त्यांचा खूप घरोबा वाढला. ते सतत एकमेकांसोबत असायचे. एड आणि मेरी हूपर यांच्या कुटुंबांतील सदस्य १९०० शतकापासून बायबल विद्यार्थी होते. मी त्यांना एड अंकल आणि मेरी अंटी म्हणायचे. हूपर अंकल-अंटींची एकुलती एक मुलगी लहानपणीच मरण पावली होती. त्यामुळे मग १९३४ मध्ये माझा जन्म झाला तेव्हा मीच त्यांची लाडकी “मुलगी” बनले. आईबाबा आणि हूपर अंकल-अंटींमुळे माझ्यावर अत्यंत चांगले आध्यात्मिक संस्कार झाले; त्यामुळे आठ वर्षांची होण्याआधीच मी देवाला माझं जीवन समर्पित करून बाप्तिस्मा घेतला.

लहानपणापासूनच मी बायबल वाचू लागले होते. यशया ११:६-९ ही देवाच्या राज्यातील जीवनाचं वर्णन करणारी वचनं माझी आवडती वचनं होती. सन १९४४ साली न्यूयॉर्कच्या बफेल्लो येथील अधिवेशनात अमेरिकन स्टॅन्डर्ड बायबल हे बायबल एका खास आवृत्तीत प्रकाशित करण्यात आले. या बायबलची मलाही एक प्रत मिळाली तेव्हा मी पहिल्यांदा संपूर्ण बायबल वाचून काढले. मला हे बायबल खूप आवडायचे कारण त्यात देवाचे नाव यहोवा, ‘जुन्या करारात’ जिथं जिथं असलं पाहिजे तिथं तिथं म्हणजे जवळजवळ ७,००० ठिकाणी होतं.

सहसा शनिवारी-रविवारी आम्ही खूप मजा करायचो. मला आईबाबा आणि हुपर अंकल-अंटी दूरच्या गावांमध्ये साक्षीसाठी घेऊन जायचे. आम्ही दुपारचं जेवण सोबत घ्यायचो आणि मग दुपारी एखाद्या ओढ्याच्या शेजारी बसून जेवायचो. कधीकधी कुणाच्या तरी शेतावर भाषणाची व्यवस्था करून आसपासच्या सर्व लोकांना भाषण ऐकायला बोलवायचो. आमचं जीवन अतिशय साधंसुधं होतं. एकमेकांच्या सहवासातच आम्ही अनेक आनंदी क्षण घालवले. आमच्या कुटुंबाशी घरोबा असलेले बरेच जुने मित्र पुढे प्रवासी पर्यवेक्षक बनले. जसे की एड हूपर, बॉब रेनर आणि त्यांची दोन मुलं. रिचर्ड रेनर अजूनही आपली पत्नी लिंडा हिच्याबरोबर प्रवासी पर्यवेक्षक म्हणून कार्य करतात.

उन्हाळ्यांत आणखीनच मजा यायची. मी हॉवल फार्मवर माझ्या मावस भाऊबहिणींबरोबर राहायला जायचे. १९४९ मध्ये माझ्या मावस बहिणीचं, ग्रेसचं, माल्कम ॲलन बरोबर लग्न झालं. तेव्हा मला वाटलंही नव्हतं, की माल्कमच्याच धाकट्या भावाबरोबर पुढे माझं लग्न होईल. माझ्या मामाची मुलगी मारियोन उरुग्वेमध्ये मिशनरी होती. १९६६ मध्ये हॉवर्ड हिलबर्न यांच्याशी तिचं लग्न झालं. ग्रेस आणि मारियोन या माझ्या दोघा बहिणींनी, ब्रुकलिन मुख्यालयात अनेक वर्षं आपापल्या पतींबरोबर सेवा केली.

आजोबा आणि माझं ग्रॅज्युएशन

मी कॉलेजात असताना आजोबा मला नियमानं पत्रं पाठवायचे. त्यांच्या पत्राच्या पाकिटात नेहमी जुने फॅमिली फोटो असायचे. फोटोंच्या मागच्या बाजूला, हा फोटो केव्हा काढला होता, त्यावेळेस काय झालं होतं अशी सगळी सविस्तर माहिती ते लिहायचे. आजोबांच्या आणि त्यांच्याबरोबर तुरुंगात पाठवलेल्या ब्रदर्सचा फोटो देखील त्यांनी अशाच एका पत्रासोबत मला पाठवला होता.

सन १९५१ च्या शेवटी शेवटी आजोबांना स्वरयंत्राचा कॅन्सर झाला. त्यामुळे त्यांची वाचा गेली. पण त्यांची विनोदबुद्धी मात्र पहिल्यासारखीच होती. फरक फक्‍त इतकाच की ते सगळं काही लिहून दाखवायचेत. त्यासाठी त्यांच्यापाशी सतत एक नोटपॅड होतं. माझे सहामाही ग्रॅज्युएशन जानेवारी १९५२ मध्ये होणार होते. ग्रॅज्युएशन कार्यक्रमात सर्वांना भाषण द्यावे लागणार होते. त्यामुळे डिसेंबर महिन्याच्या सुरवातीला मी एक लहानसे भाषण तयार करून आजोबांना पाठवले. त्यांनी त्यात काही बदल केले आणि मग शेवटच्या पानावर दोन शब्द लिहिले जे माझ्या मनाला स्पर्शून गेले: “आजोबा खूष.” डिसेंबर १८, १९५१ रोजी वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांचे पार्थिव जीवन संपले. * आजोबांचे ते दोन शब्द लिहिलेल्या भाषणाची प्रत मी अजूनही जपून ठेवली आहे. अर्थात, तो कागद आता खूप जुना झाला आहे.

ग्रॅज्युएशननंतर मी लगेच पायनियरींग (पूर्ण वेळेच्या प्रचारकार्याला यहोवाचे साक्षीदार पायनियरींग म्हणतात) सुरू केली. न्यूयॉर्क शहरात १९५८ साली झालेल्या सर्वात मोठ्या अधिवेशनाला मी उपस्थित राहिले. यांकी स्टेडियम आणि पोलो ग्राउण्ड्‌स खचून भरले होते. १२३ देशांतून २,५३,९२२ प्रतिनिधी या अधिवेशनासाठी आले होते. तेथे मी आफ्रिकाहून आलेल्या एका प्रतिनिधीला भेटले. त्याने लावलेल्या बॅजकार्डवर त्याचं नाव “वुडवर्थ मिल्स” असं लिहिलं होतं. ३० वर्षांपूर्वी म्हणे, आजोबांचं त्याला नाव देण्यात आलं होतं!

माझा अनमोल वारसा

मी १४ वर्षांची होते तेव्हा आईनं पुन्हा पायनियरींग सुरू केली. त्यानंतर ४० वर्षांनंतर म्हणजे १९८८ साली ती मरण पावली. तिच्या मृत्यूपर्यंत ती पायनियर होती. बाबांना जसं जमेल तसं ते पायनियरींग करायचे. आईच्या नऊ महिन्यांआधी त्यांचा मृत्यू झाला. आम्ही ज्यांच्या ज्यांच्याबरोबर बायबलचा अभ्यास केला ते सर्व लोक आमचे जवळचे झाले. त्यांतील काहींची मुले ब्रुकलिनमधील मुख्यालयात सेवा करायला गेली तर काही पायनियरींग करू लागली.

सन १९५९ माझ्यासाठी खास होते. त्यावर्षी मी पॉल ॲलनला भेटले होते. यहोवाच्या साक्षीदारांमध्ये मिशनऱ्‍यांना ट्रेनिंग दिले जाते त्या गिलियड प्रशालेच्या सातव्या वर्गातून ग्रॅज्युएशन झाल्यावर १९४६ मध्ये त्याला प्रवासी पर्यवेक्षक म्हणून नियुक्‍त करण्यात आले. आम्ही एकमेकांना भेटलो तेव्हा, त्याला किंवा मलाही माहीत नव्हते की त्याची पुढची नेमणुक मी जिथं पायनियरींग करत होते म्हणजे ओहायोच्या क्लिवलँड येथेच असणार होती. बाबांना आणि आईला पॉल खूप आवडायचा. १९६३ सालच्या जुलै महिन्यात हॉवल फार्मवर सर्व कुटुंबियांच्या साक्षीनं आमचं लग्न झालं. बंधू एड हूपर यांनी आमच्या लग्नाचं भाषण दिलं. आमचं स्वप्न पूर्ण झालं होतं.

पॉलकडे कार नव्हती. माझी १९६१ वोल्क्सवॅगन बग कार होती. क्लिवलँडहून आम्ही आमच्या दुसऱ्‍या नेमणुकीसाठी निघालो तेव्हा आमचं सर्व सामान माझ्या या कारमध्ये मावलं. एका मंडळीत कार्य करून झाल्यावर दुसऱ्‍या मंडळीत जाण्यासाठी आम्ही सहसा सोमवारच्या दिवशी निघायचो. तेव्हा आम्हाला निरोप द्यायला आमचे सर्व मित्र यायचे. आमच्या सूटकेसेस, ब्रिफकेसेस, फाईल बॉक्स, टाईपरायटर आणि इतर बरंच सामानसुमान आमच्या या छोट्याशा कारमध्ये छानपैकी बसायचं.

पॉल आणि मी मैलोगणिक प्रवास केला आहे. आम्ही दोघांनी मिळून जीवनातील सुखांचा आनंद लुटला आणि दुःखही सहन केलं—अर्थात यहोवाच्या शक्‍तिनंच! आतापर्यंतचे आमचे बहुतेक दिवस आनंदात गेले. यहोवाबद्दल, एकमेकांबद्दल आणि सर्व नवीन-जुन्या मित्रांबद्दल आमचं प्रेम वाढत गेलं आहे. पॉलला ट्रेनिंग मिळत असताना पॅटरसन येथे राहायला मिळालेले दोन महिने आतापर्यंतच्या आमच्या आयुष्यातील सर्वात खास दिवस होते. यहोवाची पार्थिव संघटना जवळून पाहण्याचा आम्हाला सुयोग मिळाला. हे पाहून, माझ्या अनमोल आध्यात्मिक वारशासोबतच मला वाटत असलेली खात्रीसुद्धा अधिकच पक्की झाली की, ही खरोखरच देवाची संघटना आहे. या संघटनेत आपला लहानसा का होईना पण भाग असणे एक सुहक्कच आहे!

[तळटीप]

^ परि. 44 टेहळणी बुरूज (इंग्रजी) फेब्रुवारी १५, १९५२ पृष्ठ १२८ पाहा.

[२५ पानांवरील चित्र]

सन १९४१ मध्ये झालेल्या सेंट लुई अधिवेशनाच्या आधी एड हूपर यांच्याबरोबर. याच अधिवेशनात मला “चिल्ड्रन” हे पुस्तक मिळालं होतं

[२६ पानांवरील चित्र]

आजोबा, सन १९४८

[२६ पानांवरील चित्र]

आईबाबांचं (वर्तुळात) लग्न झालं त्यावेळी हॉवल फार्मवर घेतलेला फोटो

[२७ पानांवरील चित्र]

सन १९१८ मध्ये खोट्या आरोपाखाली अटक केलेले आठ बायबल विद्यार्थी (आजोबा अगदी उजवीकडे)

[२९ पानांवरील चित्र]

आमचं सर्व सामान वोल्क्सवॅगनमध्ये मावत होतं

[२९ पानांवरील चित्र]

माझे पती पॉल यांच्याबरोबर