व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचन व अभ्यासाकरता वेळ काढणे

वाचन व अभ्यासाकरता वेळ काढणे

वाचन व अभ्यासाकरता वेळ काढणे

“वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहेत.”—इफिसकर ५:१६.

१. वेळेचे नियोजन करणे का शहाणपणाचे आहे आणि आपण आपल्या वेळेचा ज्याप्रकारे उपयोग करतो त्यावरून काय दिसून येते?

“वेळेचे नियोजन म्हणजेच वेळेची बचत.” जी व्यक्‍ती प्रत्येक कामाकरता निश्‍चित वेळ ठरवते तिला सहसा वेळेची समस्या भासत नाही. बुद्धिमान राजा शलमोन याने म्हटले: “सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो; भूतलावरील प्रत्येक कार्याला समय असतो.” (उपदेशक ३:१) आपल्या सर्वांच्या हातात तितकाच वेळ असतो; या वेळेचा आपण कसा उपयोग करतो हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे. आपण ज्या गोष्टींना महत्त्व देतो किंवा ज्या गोष्टींना जास्त वेळ देतो त्या गोष्टी आपल्याला प्रिय असतात.—मत्तय ६:२१.

२. (अ) डोंगरावरील प्रवचनात येशूने आध्यात्मिक गरजांविषयी काय म्हटले? (ब) आपण कशाविषयी आत्मपरीक्षण केले पाहिजे?

जेवणे व झोपणे यासाठी आपण वेळ देतोच कारण या आपल्या शारीरिक गरजा आहेत. पण आपल्या आध्यात्मिक गरजांविषयी काय? या देखील पूर्ण केल्याच पाहिजेत. डोंगरावरील प्रवचनात येशूने असे म्हटले: “आपल्या आध्यात्मिक गरजेची जाणीव असलेले धन्य.” (मत्तय ५:३, NW) म्हणूनच ‘विश्‍वासू व बुद्धिमान दास’ आपल्याला बायबल वाचन व अभ्यासाकरता वेळ देण्याच्या महत्त्वाविषयी वारंवार आठवण करून देतात. (मत्तय २४:४५) या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, याची कदाचित तुम्हाला जाणीव असेलही; पण कदाचित तुम्हाला असे वाटत असेल की आपल्याकडे वाचन व अभ्यास करण्याकरता खरोखर वेळ नाही. आपल्या व्यस्त जीवनातून देवाचे वचन वाचण्याकरता, वैयक्‍तिक अभ्यास करण्याकरता व मनन करण्याकरता वेळ कसा काढता येईल याविषयी आता आपण पाहू या.

बायबल वाचन व अभ्यासाकरता वेळ काढणे

३, ४. (अ) वेळेसंबंधी प्रेषित पौलाने काय सल्ला दिला आणि हा सल्ला कोणकोणत्या बाबतीत लागू होतो? (ब) पौलाने ‘वेळेचा सदुपयोग करा’ असा सल्ला कोणत्या अर्थाने दिला?

आज आपण कोणत्या काळात जगत आहोत हे लक्षात घेता, पौलाच्या पुढील शब्दांकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे: “अज्ञान्यासारखे नव्हे तर ज्ञान्यासारखे सभोवार नजर ठेवून जपून चाला. वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहेत. म्हणून तुम्ही मुर्खासारखे होऊ नका तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजुन घ्या.” (इफिसकर ५:१५-१७) अर्थात हा सल्ला, समर्पित ख्रिस्ती या नात्याने आपल्या सर्व जबाबदाऱ्‍यांच्या बाबतीत खरा आहे; म्हणजेच प्रार्थना, अभ्यास, सभा, व ‘राज्याच्या सुवार्तेच्या’ प्रचारात पुरेपूर सहभाग घेणे याबाबतीत पौलाचे शब्द लागू होतात.—मत्तय २४:१४; २८:१९, २०.

यहोवाच्या सेवकांपैकी अनेकांना बायबल वाचन व गहन अभ्यास करायला वेळ काढणे फार कठीण वाटते. अर्थात, दिवसाच्या २४ तासांत आणखी एका तासाची भर घालणे तर आपल्या हातात नाही, तेव्हा पौलाच्या सल्ल्याचा काहीतरी वेगळा अर्थ असला पाहिजे. ग्रीक भाषेत, “वेळेचा सदुपयोग करणे” या वाक्यांशाचा शब्दशः अर्थ काहीतरी मोबदला देऊन दुसरे काहीतरी विकत घेणे असा होतो. डब्ल्यु. ई. वाइन यांच्या एक्सपॉसिटरी डिक्शनरीत या वाक्यांशाचा असा अर्थ पुढीलप्रमाणे आहे: “कोणतीही संधी, एकदा हातातून गेल्यावर पुन्हा कधीच येत नसते हे लक्षात घेऊन प्रत्येक संधीचा पुरेपूर फायदा करून घेणे.” पण वाचनाकरता व बायबल अभ्यासाकरता आपण वेळ कसा विकत घेऊ शकतो?

कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे ठरवणे

५. ‘जे श्रेष्ठ ते आपण कशाप्रकारे पसंत’ करू शकतो?

आपल्या सांसारिक जबाबदाऱ्‍यांव्यतिरिक्‍त आपल्याला बऱ्‍याच आध्यात्मिक स्वरूपाच्या जबाबदाऱ्‍या देखील पार पाडाव्या लागतात. आपण यहोवाचे समर्पित सेवक आहोत, त्यामुळे आपल्याला “प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक” करत राहायचे आहे. (१ करिंथकर १५:५८) म्हणूनच पौलाने फिलिप्पैकर ख्रिश्‍चनांना “जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे” असा सल्ला दिला. (फिलिप्पैकर १:१०) पण कोणत्या गोष्टी श्रेष्ठ आहेत किंवा अधिक महत्त्वाच्या आहेत हे ठरवणे गरजेचे आहे. शारीरिक गरजांपेक्षा आपण कधीही आध्यात्मिक गोष्टींनाच पहिले महत्त्व दिले पाहिजे. (मत्तय ६:३१-३३) पण आध्यात्मिक जबाबदाऱ्‍या पूर्ण करतानाही संतुलन राखणे महत्त्वाचे आहे. ख्रिस्ती जीवनाच्या सर्व जबाबदाऱ्‍या पूर्ण करण्याकरता आपण आपल्या वेळेचे कशाप्रकारे नियोजन करत आहोत? प्रवासी पर्यवेक्षकांच्या हे पाहण्यात आले आहे की ख्रिस्ती जीवनातील “श्रेष्ठ” गोष्टींपैकी सहसा वैयक्‍तिक अभ्यास व बायबल वाचनाकडे दुर्लक्ष केले जाते.

६. सांसारिक जबाबदाऱ्‍या किंवा घरकाम सांभाळताना आपण वेळेचा सदुपयोग कसा करू शकतो?

वेळेचा सदुपयोग करणे म्हणजे “प्रत्येक संधीचा पुरेपूर फायदा करून घेणे” हे आपण आधीच पाहिले आहे. तेव्हा, आपण जर नियमितपणे बायबल वाचन व अभ्यास करत नसू, तर मग आपला वेळ कोठे जातो हे आपण तपासून पाहिले पाहिजे. जर नोकरी किंवा व्यवसायात आपला बहुतेक वेळ व शक्‍ती खर्च होत असेल, तर मग ही बाब आपण प्रार्थनेत यहोवापुढे ठेवली पाहिजे. (स्तोत्र ५५:२२) थोडेफार फेरबदल केल्यास कदाचित यहोवाच्या उपासनेशी संबंधित असणाऱ्‍या अभ्यासाकरता व बायबल वाचनाकरता वेळ काढणे आपल्याला शक्य होईल. ‘बायकांची कामे कधीच पूर्ण होत नाहीत,’ असे म्हणतात; आणि हे अगदी खरे आहे. तेव्हा ख्रिस्ती बहिणींनी देखील कोणती कामे अधिक महत्त्वाची आहेत हे ठरवून बायबल वाचन व गंभीरतेने अभ्यास करण्याकरता ठराविक वेळ बाजूला ठेवला पाहिजे.

७, ८. (अ) वाचन व अभ्यासाकरता कोणत्या कामांतून आपण वेळ काढू शकतो? (ब) मनोरंजनाचा उद्देश काय आहे आणि हे आठवणीत ठेवल्यामुळे योग्य गोष्टींना महत्त्व देण्यास आपल्याला कशाप्रकारे मदत मिळते?

खरेतर, आपण सगळेच अनावश्‍यक कामांतून अभ्यासाकरता वेळ काढू शकतो. आपण स्वतःला विचारू शकतो, ‘जगिक मासिकं, पेपर वाचण्यात किंवा टीव्ही पाहण्यात, संगीत ऐकण्यात किंवा व्हिडियो गेम्स खेळण्यात मी किती वेळ घालवतो? बायबल वाचण्याऐवजी मी कंप्युटरसमोर जास्त वेळ बसतो का?’ पौलाने म्हटले: “म्हणून तुम्ही मुर्खासारखे होऊ नका तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजुन घ्या.” (इफिसकर ५:१७) बहुतेक ख्रिस्ती बांधवांना वैयक्‍तिक अभ्यास व बायबल वाचनाकरता पुरेसा वेळ न मिळण्याचे प्रमुख कारण टीव्ही आहे असे दिसून येते.—स्तोत्रसंहिता १०१:३; ११९:३७, ४७, ४८.

काहीजण कदाचित म्हणतील, सतत अभ्यास कसा करता येईल, मनोरंजन नको का? त्यांचे म्हणणे खरे आहे, मनोरंजन आवश्‍यक आहे. पण करमणुकीकरता आपण किती वेळ घालवतो आणि त्याच्या तुलनेत अभ्यास करण्यात किंवा बायबल वाचण्यात किती वेळ घालवतो हे तपासून पाहिल्यास तुम्हाला आश्‍चर्य वाटेल. मनोरंजन, विरंगुळा आवश्‍यक असला तरीही या गोष्टींना कितपत महत्त्व द्यावे हे लक्षात घेतले पाहिजे. मनोरंजनामुळे आपल्याला पुन्हा एकदा आध्यात्मिक कार्यांत गुंतून जाण्याकरता उत्साह आला पाहिजे. पण खरे पाहता, बरेच टीव्ही कार्यक्रम व व्हिडियो गेम असे असतात की ते पाहून माणूस उत्साहित होण्याऐवजी थकून जातो. उलट देवाचे वचन वाचल्यास आपल्यामध्ये एक नवा उत्साह व चैतन्य निर्माण होते.—स्तोत्र १९:७, ८.

अभ्यासाकरता वेळ काढणाऱ्‍यांचे अनुभव

९. शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करणे या पुस्तिकेच्या १९९९ च्या आवृत्तीतील प्रस्तावनेत दिलेला सल्ला पाळल्यामुळे कोणता फायदा होतो?

शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करणे या पुस्तिकेच्या १९९९ च्या आवृत्तीतील प्रस्तावनेत असे म्हटले आहे: “सकाळीच या पुस्तिकेमधून दैनिक वचन आणि स्पष्टीकरणाचा विचार करणे अधिक लाभदायक ठरेल. आपला महान शिक्षक, यहोवा त्याच्या मार्गदर्शनांकरवी जागे करत असल्याचे तुम्हाला वाटेल. दर सकाळी यहोवाच्या सूचनांचा लाभ घेतलेल्या येशू ख्रिस्ताविषयी भविष्यसूचकपणे शास्त्रवचनात संबोधले आहे: ‘तो [यहोवा] रोजरोज सकाळी मला जागे करतो; शिष्याप्रमाणे ऐकावे म्हणून माझे कान उघडितो.’ अशा सूचनांमुळे येशूला ‘सुशिक्षितांची जिव्हा’ मिळाली, जेणेकडून ‘शिणलेल्यास बोलून धीर कसा द्यावा ते त्याला समजले.’ (यश. ३०:२०; ५०:४; मत्त. ११:२८-३०) दररोज सकाळी मिळणाऱ्‍या देवाच्या वचनातील समयोचित सल्ल्यांप्रती जागृत असल्यामुळे तुम्ही स्वतःच्या समस्यांवर मात करू शकाल, शिवाय इतरांना मदत करण्यासाठी ‘सुशिक्षितांची जिव्हा’ देखील तुम्हाला मिळू शकेल.” *

१०. काहीजण बायबल वाचन व अभ्यासाकरता कशाप्रकारे वेळ काढतात आणि यामुळे त्यांना कोणता फायदा होतो?

१० बरेच ख्रिस्ती बांधव या सल्ल्याचे पालन करून सकाळीच दररोजचे शास्त्रवचन वाचतात तसेच बायबलचे वाचन आणि अभ्यास करण्याकरता देखील ते सकाळीच वेळ काढतात. फ्रांसमध्ये राहणारी एक विश्‍वासू पायनियर बहीण दररोज सकाळी लवकर उठून अर्धा तास बायबल वाचन करते. अनेक वर्षांपासून हा नित्यक्रम पाळण्यास तिला कशामुळे मदत मिळाली आहे? ती म्हणते: “मी अगदी मनस्वी निर्धार केला आहे, त्यामुळे काही झाले तरीही मी माझे वाचन करतेच!” दिवसातली कोणती वेळ आपण निवडली हे महत्त्वाचे नाही, तर ठरवलेल्या वेळेवर आपण वाचन व अभ्यास करतो किंवा नाही हे जास्त महत्त्वाचे आहे. रने मीका यांनी ४० वर्षे युरोप व उत्तर आफ्रिकेत पायनियर सेवा केली आहे. ते म्हणतात: “१९५० सालापासून दर वर्षी मी पूर्ण बायबल वाचून काढण्याचे ध्येय ठेवले. आतापर्यंत मी ४९ वेळा बायबल वाचले आहे. निर्माणकर्त्या यहोवासोबत जवळचा नातेसंबंध राखण्याकरता हे अत्यावश्‍यक आहे असे मला वाटते. देवाच्या वचनावर मनन केल्यामुळे यहोवाचा न्याय व त्याच्या इतर गुणांविषयी अधिक चांगल्याप्रकारे समजून घेण्यास मला मदत झाली आहे आणि यामुळे मला अद्‌भुत प्रमाणात शक्‍ती देखील मिळाली आहे.” *

“योग्य वेळी शिधासामुग्री”

११, १२. (अ) ‘विश्‍वासू कारभाऱ्‍याने’ कशाच्या माध्यमाने आध्यात्मिक ‘शिधासामुग्री’ पुरवली आहे? (ब) ही “शिधासामुग्री” योग्य वेळी कशाप्रकारे पुरवण्यात आली?

११ चांगला आहार घेतल्यामुळे ज्याप्रमाणे आपले शारीरिक आरोग्य सुधारते त्याचप्रमाणे अभ्यासाकरता व बायबल वाचनाकरता नियमित वेळ काढल्यामुळे आपल्याला उत्तम आध्यात्मिक आरोग्य लाभते. लूकच्या शुभवर्तमानात आपण येशूचे हे शब्द वाचतो: “आपल्या परिवाराला योग्य वेळी शिधासामुग्री द्यावयास धनी ज्याला नेमील असा विश्‍वासू व विचारशील कारभारी कोण?” (लूक १२:४२) जवळजवळ १२० वर्षांपासून टेहळणी बुरूज व इतर बायबल आधारित पुस्तकांच्या व प्रकाशनांच्या माध्यमाने आपल्याला “योग्य वेळी” आध्यात्मिक “शिधासामुग्री” पुरवली जात आहे.

१२ “योग्य वेळी” या शब्दांकडे लक्ष द्या. आपल्या ‘महान शिक्षकाने’ अर्थात यहोवाने त्याच्या पुत्राच्या व दास वर्गाच्या माध्यमाने अगदी योग्य वेळी बायबल सिद्धान्तांच्या बाबतीत व वर्तणुकीच्या बाबतीत मार्गदर्शन पुरवल्याचे आपण कित्येकदा अनुभवले आहे. जणू आपल्या सर्वांना एकाच वेळी अशी वाणी ऐकू आली की “हाच मार्ग आहे; याने चला, . . . मग तुम्हाला उजवीकडे जावयाचे असो किवा डावीकडे जावयाचे असो.” (यशया ३०:२०, २१) तसेच, व्यक्‍तिगतरित्या, बांधव जेव्हा बायबल व सर्व बायबल आधारित प्रकाशने लक्षपूर्वक वाचतात तेव्हा कित्येकदा त्यांना अशी जाणीव होते की जणू ते वाचत असलेली माहिती खास त्यांच्याचकरता लिहिण्यात आली आहे. मोह टाळण्याकरता किंवा योग्य निर्णय घेण्याकरता जेव्हा आपल्याला मदतीची गरज असते तेव्हा आपण याची खातरी बाळगू शकतो की अगदी योग्य वेळी देवाकडून आपल्याला मार्गदर्शन मिळेल.

नियमित उत्तम आध्यात्मिक आहार घ्या

१३. आध्यात्मिक आहारासंबंधी काही वाईट सवयी कोणत्या असू शकतात?

१३ पण योग्यवेळी पुरवल्या जाणाऱ्‍या ‘शिधासामुग्रीचा’ फायदा करून घेण्याकरता आपण स्वतःला चांगल्या सवयी लावल्या पाहिजेत. नियमित बायबल वाचनाकरता व वैयक्‍तिक अभ्यासाकरता निश्‍चित वेळ ठरवून त्या वेळेचे पालन करणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला नियमित आध्यात्मिक आहार घेण्याची व गांभिर्याने वैयक्‍तिक अभ्यास करण्याची सवय आहे का? की इतक्या काळजीपूर्वक तयार केलेल्या साहित्याचे तुम्ही केवळ वरवर वाचन करता? काही लोक ज्याप्रमाणे घाईगडबडीत, काम करता करता उभ्याउभ्याच काहीतरी खातात किंवा कधीकधी जेवायचे टाळतात त्याचप्रमाणे आपल्याकडून आध्यात्मिक आहाराकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. आध्यात्मिक आहार नियमित घेण्याची सवय नसल्यामुळे बरेचजण विश्‍वासात कमकुवत झाले आणि काहींनी तर विश्‍वासाचा त्याग केला.—१ तीमथ्य १:१९; ४:१५, १६.

१४. पूर्वी वाचलेल्या साहित्याचाही काळजीपूर्वक अभ्यास करणे का फायद्याचे आहे?

१४ काहींना कदाचित असे वाटत असेल की आपल्याला तर बायबलचे मूलभूत सिद्धान्त माहीत आहेत आणि प्रत्येक लेखात काही नवीन माहिती दिलेली नसते. तेव्हा इतक्या पद्धतशीरपणे अभ्यास करण्याची किंवा सभांना नियमित जाण्याची काही गरज नाही. पण बायबलमधून आपल्याला दिसून येते की आधी शिकलेल्या गोष्टींची देखील पुन्हा आठवण करून देणे महत्त्वाचे आहे. (स्तोत्र ११९:९५, ९९; २ पेत्र ३:१; यहुदा ५) उत्तम स्वयंपाकी ज्याप्रमाणे एकाचप्रकारच्या वस्तूंपासून बऱ्‍याच वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार करतो त्याचप्रमाणे विश्‍वासू व बुद्धिमान दास देखील कित्येक वेगवेगळ्या पद्धतींनी आपल्याकरता पौष्टिक आध्यात्मिक अन्‍न पुरवतो. म्हणूनच ज्या विषयांवर आधी बऱ्‍याचदा माहिती प्रकाशित करण्यात आली आहे, अशा लेखांचाही आपण लक्ष देऊन अभ्यास केला पाहिजे जेणेकरून त्यातील बारीकसारीक मुद्दे आपल्या नजरेतून सुटणार नाहीत. कोणत्याही साहित्याच्या अभ्यासाकरता आपण किती वेळ देतो आणि किती मेहनत घेतो त्यानुसारच आपल्याला त्या साहित्याचा फायदा होतो.

वाचन व अभ्यासाचे आध्यात्मिक लाभ

१५. बायबलचे वाचन व अभ्यास केल्यामुळे आपण देवाच्या वचनाचे अधिक चांगले सेवक कसे बनू शकतो?

१५ बायबलचे वाचन व अभ्यास केल्यामुळे आपल्याला कित्येक लाभ मिळतात. आपल्या प्रमुख ख्रिस्ती जबाबदाऱ्‍या पार पाडण्याकरता, म्हणजेच, “सत्याचे वचन नीट सांगणारा, लाज वाटण्यास कसलेहि कारण नसलेला . . . कामकरी” होण्याकरता आपल्याला मदत मिळते. (२ तीमथ्य २:१५) आपण बायबलचे जितके जास्त वाचन व अभ्यास करू तितकेच आपले मन देवाच्या विचारांनी भरत जाईल. मग पौलाप्रमाणे, आपणही ‘शास्त्रावरून वादविवाद करण्यास व शास्त्राचा उलगडा करून’ यहोवाच्या अद्‌भुत उद्देशांच्या सत्याविषयी लोकांना सांगण्यास समर्थ होऊ. (प्रेषितांची कृत्ये १७:२, ३) तसेच शिकवण्याच्या कलेत आपण निपुण होऊ व आपले संभाषण, मंडळीत आपण दिलेली भाषणे व इतरांना आपण दिलेला सल्ला देखील सर्वांच्या आध्यात्मिक उन्‍नतीला कारणीभूत ठरेल.—नीतिसूत्रे १:५.

१६. देवाच्या वचनाचे वाचन व अभ्यास केल्यामुळे व्यक्‍तीगत जीवनात आपल्याला कोणता फायदा होतो?

१६ या सर्व लाभांव्यतिरिक्‍त देवाच्या वचनाचा अभ्यास केल्यामुळे आपल्याला दिवसेंदिवस यहोवाच्या मार्गांचे आणखी जवळून पालन करता येईल. (स्तोत्र २५:४; ११९:९, १०; नीतिसूत्रे ६:२०-२३) तसेच, नम्रता, विश्‍वासूपणा व आनंद यांसारखे ख्रिस्ती गुण देखील आपल्या व्यक्‍तिमत्त्वात उतरतील. (अनुवाद १७:१९, २०; प्रकटीकरण १:३) बायबल वाचनातून व अभ्यासातून मिळालेल्या ज्ञानानुसार वागण्याचा आपण प्रयत्न करतो तेव्हा देवाचा आत्मा आपल्या जीवनात कार्य करत असल्याचे आपण अनुभवतो. साहजिकच यामुळे आपल्या सर्व व्यवहारांत आपण आत्म्याची फळे अधिकाधिक प्रदर्शित करतो.—गलतीकर ५:२२, २३.

१७. वैयक्‍तिक बायबल वाचन व अभ्यासाकरता आपण किती वेळ काढतो आणि तो किती मनापासून करतो याचा यहोवासोबतच्या आपल्या नातेसंबंधावर काय परिणाम होतो?

१७ सर्वात महत्त्वाचे म्हणजे, इतर कामांतून वेळ काढून आपण देवाच्या वचनाचा अभ्यास करतो तेव्हा देवासोबतचा आपला नातेसंबंध दिवसेंदिवस बळकट होत जातो. पौलाने आपल्या ख्रिस्ती बांधवांच्या बाबतीत अशी प्रार्थना केली की ते ‘सर्व आध्यात्मिक ज्ञान व बुद्धी ह्‍यांच्याद्वारे त्याच्या इच्छेसंबंधीच्या पूर्ण ज्ञानाने भरले जावे; अशा हेतूने की, त्यांनी सर्व प्रकारे प्रभूला संतोषविण्याकरिता त्याला शोभेल असे वागावे.’ (कलस्सैकर १:९, १०) त्याचप्रकारे, ‘यहोवाला शोभेल असे वागण्यासाठी’ आपणही ‘सर्व आध्यात्मिक ज्ञान व बुद्धी ह्‍यांच्याद्वारे त्याच्या इच्छेसंबंधीच्या पूर्ण ज्ञानाने’ भरले गेलो पाहिजे. आपल्यावर यहोवाचा आशीर्वाद असावा, आपल्याला त्याची स्वीकृती मिळावी अशी आपली सर्वांची इच्छा आहे. पण, आपण बायबल वाचनाकरता व अभ्यासाकरता किती वेळ काढतो आणि किती मनापासून तो करतो यावर हे अवलंबून आहे.

१८. योहान १७:३ येथे दिलेल्या येशूच्या शब्दांचे पालन केल्यास आपल्याला कोणते आशीर्वाद मिळतील?

१८ “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे [“ज्ञान घ्यावे,” NW].” (योहान १७:३) देवाच्या वचनाचा अभ्यास करणे किती महत्त्वाचे आहे हे लोकांना समजावून सांगण्यासाठी सहसा यहोवाचे साक्षीदार याच वचनाचा उपयोग करतात. पण हे वचन निश्‍चितच आपल्या प्रत्येकाच्या बाबतीतही तितकेच खरे आहे. यहोवा व त्याचा पुत्र अर्थात येशू ख्रिस्त यांच्याविषयीच्या ज्ञानात वाढत जाण्यावरच आपली सार्वकालिक जीवनाची आशा अवलंबून आहे. विचार करा, यहोवाबद्दलचे ज्ञान कधीही संपणार नाही आणि आपण सदासर्वकाळपर्यंत त्याच्याबद्दल अधिकाधिक ज्ञान घेतच राहू!—उपदेशक ३:११; रोमकर ११:३३.

[तळटीपा]

^ परि. 9 वॉचटावर बायबल व ट्रॅक्ट सोसायटी यांच्याद्वारे प्रकाशित.

^ परि. 10 टेहळणी बुरूज मे १, १९९५ अंकात पृष्ठे २०-१ वर, “ते केव्हा वाचतात आणि त्यांना त्याचा लाभ कसा होतो” हा लेख पाहा.

उजळणीचे प्रश्‍न

• आपण ज्याप्रकारे आपल्या वेळेचा उपयोग करतो त्यावरून काय दिसून येते?

• बायबल वाचनाकरता व अभ्यासाकरता कोणत्या कामांतून आपण वेळ विकत घेऊ शकतो?

• आध्यात्मिक आहारासंबंधी आपल्या सवयी कशा आहेत याकडे लक्ष देणे का महत्त्वाचे आहे?

• बायबलचे वाचन व अभ्यास केल्यामुळे आपल्याला कोणकोणते लाभ मिळतात?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२०, २१ पानांवरील चित्रे]

बायबलचे नियमित वाचन व अभ्यास केल्यामुळे आपण इतरांना ‘सत्याचे वचन नीट सांगू शकू’

[२३ पानांवरील चित्रे]

आपल्या व्यस्त जीवनात इतर कार्यांसोबत आध्यात्मिक कार्यांचे संतुलन राखल्यास आपल्याला अनेक आशीर्वाद प्राप्त होतात