कापणी होण्याआधी “शेतात” काम करणे
कापणी होण्याआधी “शेतात” काम करणे
थोर शिक्षकाचे अर्थात येशूचे शिष्य गोंधळात पडले होते. त्याने नुकतीच लोकसमुदायाला गहू आणि निदणाची एक लहानशी गोष्ट सांगितली होती. त्या दिवशी त्याने अनेक दाखले दिले होते; त्यातलाच तो एक होता. येशूचे बोलणे संपल्यानंतर सगळेजण निघून गेले, पण त्याचे शिष्य मात्र तेथेच राहिले. त्यांनी ओळखले होते की, त्या दाखल्यांचा काही विशिष्ट अर्थ असावा—विशेषकरून गहू आणि निदणाच्या दाखल्याचा. येशूचे दाखले फक्त मनोरंजनाखातर नाहीत हेसुद्धा त्यांना चांगलेच ठाऊक होते.
मत्तयाच्या अहवालात सांगितल्याप्रमाणे ते त्याला म्हणाले: “शेतातल्या निदणाच्या दाखल्याची आम्हास फोड करून सांगा.” तेव्हा येशूने दाखल्याची फोड करून असे भाकीत केले की त्याचे शिष्य असल्याचा दावा करणाऱ्यांमध्ये धर्मत्याग पसरेल. (मत्तय १३:२४-३०, ३६-३८, ४३) येशूने सांगितल्याप्रमाणेच घडले आणि प्रेषित योहानाच्या मृत्यूनंतर लागलीच धर्मत्याग पसरला. (प्रेषितांची कृत्ये २०:२९, ३०; २ थेस्सलनीकाकर २:६-१२) त्याचा परिणाम दूरपर्यंत पसरला. म्हणून लूक १८:८ मध्ये येशूने विचारलेला प्रश्न अगदी बरोबर होता: “मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय?”
येशूचे येणे, गव्हासमान ख्रिश्चनांची “कापणी” सुरू झाल्याचे सूचक होते. ते ‘युगाच्या समाप्तीचे’ चिन्ह होते ज्याची सुरवात १९१४ मध्ये झाली. त्यामुळे कापणीच्या सुरवातीच्या काळात बायबलमधील सत्य जाणून घेण्याची काहींना उत्सुकता वाटू लागली यात नवल करण्यासारखे काहीच नव्हते.—मत्तय १३:३९.
ऐतिहासिक अहवाल पाहिल्यावर हे स्पष्ट होते की, १५ व्या शतकापासून खासकरून लोक बायबलमधील सत्याबद्दल आवड दाखवू लागले. अगदी ‘निदणासारख्या’ किंवा नामधारी ख्रिश्चनांप्रमाणे असलेल्या ख्रिस्ती धर्मजगतातील लोकांमध्ये देखील अशी आस्था दिसून येत होती. बायबल सर्वांच्या हाती सहज मिळू लागले आणि बायबलची सूची तयार करण्यात आली तसे सत्याची खरी आस असलेल्या व्यक्ती शास्त्रवचनांचा शोध घेऊ लागल्या.
निरंतर प्रकाश
शास्त्रवचनांचा शोध घेणाऱ्या अशाच काही लोकांमध्ये इंग्लंडच्या बर्मिंगहम येथील हेन्री ग्रू (१७८१-१८६२) नावाचे १९ व्या शतकातील एक गृहस्थ होते. वयाच्या १३ व्या वर्षी, ते आपल्या कुटुंबासमवेत अटलांटिक महासागर पार करून जुलै ८, १७९५ रोजी अमेरिकेला पोहंचले. अमेरिकेत ते ऱ्होड आयलंडच्या प्रॉव्हिडेन्स येथे स्थायिक झाले. त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्या मनात बायबलविषयी प्रेम निर्माण केले होते. १८०७ साली, वयाच्या २५ व्या वर्षी, ग्रू यांना कनेक्टिकटच्या हार्टफोर्ड येथील एका बॅप्टिस्ट चर्चमध्ये पाळक बनण्यासाठी बोलावण्यात आले.
शिकवण्याच्या जबाबदारीला ते खूप महत्त्व द्यायचे आणि त्यांच्या चर्चमधील लोकांना शास्त्रवचनांनुसार जीवन जगण्यासाठी त्यांनी खूप मदत केली. परंतु, त्यांना असे वाटायचे की, मुद्दामहून पाप आचरत राहणाऱ्या कोणाही व्यक्तीला मंडळीत राहू देऊ नये. त्यांनी आणि चर्चमधील इतर जबाबदार पुरुषांनी मिळून व्यभिचार करणाऱ्या किंवा अशुद्ध सवयी असणाऱ्या लोकांना आपल्या मंडळीतून काढूनही टाकले होते.
परंतु, चर्चमधल्या इतरही काही गोष्टी त्यांना पटत नव्हत्या. चर्चचे सदस्य नसलेले काही पुरुष चर्चचे व्यवहार २ करिंथकर ६:१४-१८; याकोब १:२७) त्यांच्या मते, विश्वास न ठेवणारे लोक देवाची स्तुतीगीते गातात म्हणजे ती एकप्रकारची निंदा आहे. त्यांच्या या विचारांमुळे, १८११ साली हेन्री ग्रू यांना चर्चमधून काढून टाकण्यात आले. ग्रू यांच्यासारखाच विचार करणाऱ्या इतरही काही सदस्यांनी त्या वेळी चर्च सोडून दिले.
हाताळत होते आणि तिथल्या गायनाची व्यवस्था पाहत होते. मंडळीतल्या काही महत्त्वाच्या गोष्टींमध्ये आपले मत व्यक्त करण्याचा हक्क देखील या पुरुषांना होता आणि अशातऱ्हेने चर्चच्या व्यवहारांमध्ये तेसुद्धा दखल देऊ शकत होते. परंतु, ख्रिश्चनांनी जगापासून वेगळे राहावे या तत्त्वाच्या आधारे ग्रू यांना असे ठामपणे वाटत होते की, फक्त विश्वासू पुरुषांनीच या सगळ्या गोष्टी हाताळाव्यात. (ख्रिस्ती धर्मजगतापासून वेगळे होणे
चर्च सोडून दिलेल्या या सगळ्यांनी (हेन्री ग्रू देखील) मिळून बायबलचे परीक्षण करायला सुरवात केली; बायबलमध्ये सांगितलेल्या नियमांनुसार जीवन जगण्याचे त्यांचे ध्येय होते. त्यांच्या परीक्षणामुळे बायबलमधील सत्याबद्दलची त्यांची समज वाढली आणि मग ते ख्रिस्ती धर्मजगतातील चुका उघड करू लागले. उदाहरणार्थ, १८२४ मध्ये, ग्रू यांनी त्रैक्य या शिकवणीचे खंडन करणारा एक तर्कसंगत लेख लिहिला. त्यांच्या लेखातल्या या उताऱ्यात त्यांनी कसा तर्क केला आहे तो पाहा: “‘त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी [कोणा मनुष्याला] ठाऊक नाही, स्वर्गातील देवदूतासहि नाही, पुत्रालाहि नाही, केवळ पित्याला ठाऊक आहे.’ [मार्क १३:३२] येथे व्यक्तींमधील श्रेष्ठता कशी दाखवली आहे ते पाहा. मनुष्य, देवदूत, पुत्र, पिता. . . . आपला प्रभू आपल्याला शिकवतो की, त्या दिवसाविषयी फक्त पित्याला ठाऊक आहे. पण काहीजण समजतात तसे पिता, शब्द आणि पवित्र आत्मा हे तिन्ही मिळून एकच देव असतील तर हे [वचन] खोटे ठरेल; कारण [त्रैक्याच्या या शिकवणीनुसार] . . . पुत्रालाही पित्याएवढेच ठाऊक होते.”
ग्रू यांनी ख्रिस्ताची सेवा करण्याचा आव आणत असलेल्या पाळकवर्गाचे आणि लष्करी अधिकाऱ्यांचे फसवे रूप उघडे केले. १८२८ मध्ये ते म्हणाले: “एकीकडे एक ख्रिस्ती आपल्या खोलीत शत्रूंसाठी प्रार्थना करतो. नंतर तोच ख्रिस्ती त्याच शत्रूंवर घातक शस्त्रांनी सैतानी प्रहार करायला आज्ञा देतो. यापेक्षा मोठी तफावत कोठे दिसते का? पहिल्यांदा तर तो मृत्यू सहन करणाऱ्या धन्यासारखाच (येशूसारखा) वाटतो; मग दुसरीकडे या लोकांना ठार मारण्याची आज्ञा देतो तेव्हा कोणासारखा वाटतो? येशूने त्याचा खून करणाऱ्यांसाठी प्रार्थना केली. आणि ख्रिस्ती तर, ज्यांच्यासाठी प्रार्थना करतात त्यांचाच खून करतात.”
याहून जोरदार शब्दांमध्ये ग्रू यांनी लिहिले: “‘देवाची थट्टा होत नाही’ असे म्हणणाऱ्या निर्माणकर्त्यावर आपण कधी विश्वास ठेवणार? दुष्कृत्य तर दूर, ‘दुष्कृत्याच्या सावलीपासूनही’ दूर राहायला सांगणाऱ्या त्या पवित्र धर्माचे स्वरूप, त्याचे वैशिष्ट्य आपल्याला कधी समजणार? . . . एकीकडे या देवपुत्राचा धर्म देवदूतासारखे वागायला लावतो तर दुसरीकडे सैतानासारखे वागायला लावतो असे समजणे म्हणजे देवपुत्राची बदनामीच नव्हे काय?”
अनंतकाळचे जीवन वारशाने मिळत नाही
रेडियो आणि टीव्हीचा शोध लागण्यापूर्वी, लेखनाद्वारे लोक आपले मत व्यक्त करत असत. १८३५ च्या सुमारास, ग्रू यांनी एक पत्रिका लिहिली आणि त्यामध्ये आत्म्याचे अमरत्व व नरकाग्नी या शिकवणी शास्त्रानुसार नाहीत असे स्पष्ट केले. या शिकवणींमुळे देवाची निंदा होते असे त्यांचे मत होते.
या पत्रिकेचा दूरदूरपर्यंत प्रभाव पडला. १८३७ मध्ये, ४० वर्षांच्या जॉर्ज स्टॉर्स यांना ही पत्रिका एकदा ट्रेनमध्ये मिळाली. स्टॉर्स हे मूळचे न्यू हॅम्पशायरच्या लेबनन येथील होते परंतु त्या वेळी ते न्यूयॉर्कमधील युटिका येथे राहत होते.
मेथडिस्ट-एपिस्कोपल चर्चमध्ये ते सन्मानीय पाळक होते. स्टॉर्स यांनी ही पत्रिका वाचली आणि ते चाटच पडले. ख्रिस्ती धर्मजगताच्या या मूलभूत शिकवणींविरुद्ध (त्यांना देखील या शिकवणींबद्दल कधीच शंका वाटली नव्हती) जबरदस्त पुरावा देण्यात आला होता असे त्यांना वाटले. पण ती पत्रिका कोणी लिहिली हे त्यांना तेव्हा कळाले नाही. काही वर्षांनंतर म्हणजे १८४४ मध्ये त्यांची भेट हेन्री ग्रू यांच्याशी झाली कारण ते दोघेही पेन्सिल्व्हानियाच्या फिलाडेल्फिया येथे राहत होते. परंतु, स्टॉर्स यांनी तीन वर्षांपर्यंत स्वतःहून याचा अभ्यास केला. ते फक्त इतर पाळकांशी याविषयी बोलायचे.
स्टॉर्स ज्याचा अभ्यास करत होते त्याला कोणी खोटे ठरवूच शकत नव्हते; त्यामुळे त्यांना वाटले की, मेथडिस्ट चर्चमध्ये राहून आपण देवाला कधीच विश्वासू राहू शकत नाही. म्हणून १८४० मध्ये त्यांनी चर्चला राजीनामा दिला आणि न्यूयॉर्कमधील अल्बेनी येथे ते राहायला गेले.
सन १८४२ च्या वसंत ऋतूच्या सुरवातीला, “दुष्ट लोक अमर आहेत का?—एक तपासणी” या विषयावर स्टॉर्स यांनी
सहा आठवड्यांमध्ये सहा भाषणे दिली. याला लोकांचा इतका चांगला प्रतिसाद मिळाला की, स्टॉर्स यांनी त्या भाषणात काही सुधार करून ते छापले. त्या नंतरच्या ४० वर्षांपर्यंत अमेरिका तसेच ग्रेट ब्रिटनमध्ये त्याच्या २,००,००० प्रतींचे वितरण करण्यात आले. स्टॉर्स आणि ग्रू यांनी मिळून आत्म्याच्या अमरत्वाच्या शिकवणीविरुद्ध चर्चासत्रे घेतली. ऑगस्ट ८, १८६२ रोजी आपला मृत्यू होईपर्यंत ग्रू यांनी फिलाडेल्फिया येथे फार आवेशाने सुवार्तेची घोषणा केली.स्टॉर्स यांनी, वर सांगितल्याप्रमाणे, सहा भाषणे दिल्यानंतर त्यांना विल्यम मिलर यांची प्रवचने आवडू लागली. मिलर यांच्या मते १८४३ मध्ये ख्रिस्ताचे येणे दृश्य रूपात होणार होते. जवळजवळ दोन वर्षांपर्यंत स्टॉर्स या संदेशाची घोषणा ईशान्य अमेरिकेत अगदी आवेशाने करत होते. १८४४ नंतर मात्र ख्रिस्ताच्या येण्याची निश्चित तारीख ठरवण्यामध्ये ते सामील होत नव्हते. पण कालगणनेचा तपास करणाऱ्या इतरांचा त्यांनी कधीच विरोध केला नाही. ख्रिस्ताचे येणे फार जवळ असल्यामुळे ख्रिश्चनांनी जागृत आणि आध्यात्मिकरित्या दक्ष असून परीक्षेच्या दिवसासाठी तयार असणे महत्त्वाचे होते असा स्टॉर्स यांचा विश्वास होता. मात्र त्यांनी मिलर यांचा गट सोडून दिला कारण आत्म्याचे अमरत्व, जगाचा अग्नीने नाश, अज्ञानात मरण पावणाऱ्यांना सार्वकालिक जीवनाची काहीच आशा नाही अशा अशास्त्रीय शिकवणी मिलर यांनी स्वीकारल्या होत्या.
देवाच्या प्रीतीमुळे काय घडेल?
मेलेल्या दुष्ट लोकांना उठवून त्यांना पुन्हा मरणदंड दिला जाईल या ॲडव्हेन्टिस्ट मताबद्दल स्टॉर्स यांना घृणा वाटत होती. देव फक्त बदला घेण्यासाठी असले निरर्थक कृत्य करील यासाठी त्यांना शास्त्रवचनांमध्ये काहीच पुरावा दिसत नव्हता. म्हणून स्टॉर्स आणि त्यांच्या साथीदारांनी दुसरी एक टोकाची भूमिका घेतली. दुष्टांचे पुनरुत्थानच होणार नाही असे ते म्हणू लागले. अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल असे म्हणणाऱ्या काही शास्त्रवचनांचे स्पष्टीकरण त्यांना नीट देता येत नव्हते तरीही प्रेमळ देवाच्या कल्पनेशी त्यांचा विश्वास अधिक जुळतो असे त्यांना वाटत होते. देवाच्या उद्देशाबद्दल अधिक समज अद्याप मिळायची होती.
स्टॉर्स १८७० मध्ये फार आजारी पडले आणि त्यामुळे कित्येक महिने त्यांना काही काम करता आले नाही. त्या वेळी, ७४ वर्षांदरम्यान शिकलेल्या गोष्टींना पुन्हा एकदा तपासण्याची संधी त्यांना मिळाली. अब्राहामासोबत केलेल्या करारात दाखवल्यानुसार, ‘अब्राहामाने देवाचा शब्द ऐकला म्हणून पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे त्याच्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील’ या मानवजातीसाठी असलेल्या देवाच्या उद्देशातील एका महत्त्वाच्या भागाकडे त्यांनी पूर्णतः दुर्लक्ष केले होते असे ते म्हणाले.—उत्पत्ति २२:१८; प्रेषितांची कृत्ये ३:२५.
यामुळे त्यांच्या डोक्यात आणखी एक नवीन विचार आला. “पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे” जर आशीर्वादित व्हायची असतील तर मग सर्वांना सुवार्ता ऐकवली पाहिजे. पण ते कसे ऐकतील? कित्येक लाखो लोक तर असेच मरण पावले. त्यानंतर, शास्त्रवचनांचा आणखी शोध केल्यावर, त्यांनी असा निष्कर्ष
काढला की, “दुष्ट” व्यक्तींचे दोन गट आहेत: जाणतेपणाने देवाची प्रीती नाकारणारे आणि अज्ञानातच मरण पावलेले.मग स्टॉर्स म्हणाले की, अज्ञानात मरण पावलेल्या लोकांना ख्रिस्त येशूच्या खंडणी बलिदानाचा लाभ करून घेण्याची संधी मिळावी म्हणून त्यांना मृतातून उठवावे लागेल. मग जे खंडणी बलिदान स्वीकारतील त्यांना सार्वकालिक जीवन मिळेल आणि नाकारतील त्यांचा कायमचा नाश होईल. होय, स्टॉर्स यांचा असा विश्वास होता की, फक्त आशा असलेल्या लोकांचेच देव पुनरुत्थान करील. आणि अशाप्रकारे, आदामाला वगळता त्याने केलेल्या पापामुळे कोणीही मरणार नाही! परंतु, प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याच्या काळादरम्यान जे जगत आहेत त्यांच्याबद्दल काय? नंतर स्टॉर्सना कळाले की, या लोकांपर्यंत पोहंचायला विश्वव्यापी प्रमाणावर सुवार्तेची घोषणा करावी लागेल. हे नेमके कसे घडेल याची त्यांना कल्पनाही नव्हती. तरीही ठाम विश्वासासह त्यांनी असे लिहिले: “पुष्कळांना हे पटत नाही कारण त्यांना हे काम कसे पार पडेल याची कल्पना करता येत नाही. ज्याची ते कल्पना करू शकत नाहीत ती गोष्ट देवालाही अशक्य आहे असे त्यांना वाटते.”
जॉर्ज स्टॉर्स यांचे डिसेंबर १८७९ मध्ये न्यूयॉर्कमधील ब्रुकलिन येथील घरात निधन झाले. त्यांच्या घरापासून दोन-तीन ब्लॉक्सच्या अंतरावरच, स्टॉर्स यांना ज्याची फार उत्सुकता लागून होती त्या सुवार्तेच्या घोषणेच्या विश्वव्यापी कार्याचे केंद्रस्थान स्थापन झाले.
आणखी प्रकाशाची गरज होती
हेन्री ग्रू, जॉर्ज स्टॉर्स यांसारख्या लोकांना आज आपल्याला आहे तशी बायबलबद्दल स्पष्ट समज प्राप्त झाली होती का? नाही. त्यांना फार संघर्ष करावा लागला आणि याची कल्पना स्टॉर्स यांना होती कारण १८४७ मध्ये ते म्हणाले होते: “आपण हे लक्षात ठेवायला हवे की, अलीकडेच आपण चर्चच्या काळोख्या युगामधून बाहेर आलो आहोत; आणि अजूनही काही ‘बॅबिलोनी पोशाख’ आपण सत्य समजून परिधान केले असतील तर त्यात काही नवल करण्यासारखे नाही.” उदाहरणार्थ, येशूने खंडणी बलिदान दिले हे ग्रू यांना समजले होते परंतु ती “[समांतर मूल्याची] खंडणी” आहे म्हणजेच, आदामाने गमावलेल्या परिपूर्ण जीवनाच्या बदल्यात येशूने परिपूर्ण मानवी जीवन दिले होते हे त्यांना समजले नव्हते. (१ तीमथ्य २:६) शिवाय, येशूचे येणे झाल्यावर पृथ्वीवरील त्याचे राज्य दृश्य रूपात असेल अशी देखील ग्रू यांची चुकीची समजूत होती. आणि ग्रू यांना यहोवाच्या नावाचे पवित्रीकरण याचे विशेष महत्त्व वाटत नव्हते. तसे पाहिले तर, सा.यु. दुसऱ्या शतकापासून फार कमी लोकांना याचे महत्त्व वाटत होते.
त्याचप्रमाणे, काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दलही जॉर्ज स्टॉर्स यांची समज योग्य नव्हती. पाळकांच्या चुकीच्या शिकवणी ते ओळखत होते म्हणून त्याच्या विरोधात ते कधी कधी एकदम टोकाची भूमिका घ्यायचे. उदाहरणार्थ, सैतानाविषयी कर्मठ चर्चेसची शिकवण स्टॉर्स यांना मुळीच आवडली नाही आणि म्हणून त्यांनी दियाबल एक खरी व्यक्ती आहे यालाच नकार दिला. त्यांनी त्रैक्य नाकारले खरे, परंतु त्यांच्या मृत्यूच्या काही वेळाआधीपर्यंत पवित्र आत्मा व्यक्ती आहे की नाही याबद्दल त्यांना पक्की खात्री नव्हती. सुरवातीला ख्रिस्ताचे येणे अदृश्य रूपात होईल अशी जॉर्ज स्टॉर्स यांची अपेक्षा होती परंतु नंतर
तो सर्वांना दिसेल असे त्यांना वाटत होते. असे असले तरीही, हे दोन्ही गृहस्थ प्रामाणिक आणि नम्र अंतःकरणाचे होते. इतर पुष्कळांच्या तुलनेत ते सत्याच्या फार जवळ आले होते.गहू आणि निदणाच्या दाखल्यात येशूने ज्या ‘शेताविषयी’ सांगितले ते कापणीसाठी पूर्णपणे तयार नव्हते. (मत्तय १३:३८) ग्रू, स्टॉर्स आणि इतरही काहीजण कापणीची तयारी करण्यासाठी ‘शेतात’ काम करत होते.
या पत्रिकेचे १८७९ मध्ये प्रकाशन सुरू करणाऱ्या चार्ल्स टेझ रस्सल यांनी आपल्या आधीच्या काही वर्षांबद्दल असे लिहिले: “देवाच्या वचनाचा अभ्यास करतेवेळी त्याने आम्हाला पुष्कळ मदत उपलब्ध करून दिली; आमचे प्रिय आणि वृद्ध बंधू जॉर्ज स्टॉर्स यांनी आम्हाला मदत देण्यात पुष्कळ हातभार लावला; त्यांच्या चर्चा आणि त्यांची लिखाणे या दोन्हींचा आम्हाला फायदा झाला; पण हे लोक कितीही चांगले आणि बुद्धिमान असले तरीही आम्ही मनुष्यांचे नव्हे तर ‘प्रिय मुले या नात्याने देवाचे अनुयायी’ बनण्याचा नेहमी प्रयत्न केला.” होय, ग्रू आणि स्टॉर्स यांसारख्या लोकांच्या प्रयत्नांमुळे प्रामाणिक बायबल विद्यार्थ्यांना बरीच मदत लाभली तरीही सत्याचे मूळ उगम असलेल्या देवाच्या वचनाचे अर्थात बायबलचे परीक्षण करणे महत्त्वाचे होते.—योहान १७:१७.
[२६ पानांवरील चौकट/चित्र]
हेन्री ग्रू यांचा विश्वास
यहोवाच्या नावावर कलंक लागला आहे आणि त्याचे पवित्रीकरण करण्याची गरज आहे.
त्रैक्यवाद, आत्म्याचे अमरत्व आणि नरकाग्नी या शिकवणी खोट्या आहेत.
ख्रिस्ती मंडळी जगापासून वेगळी असायला पाहिजे.
ख्रिश्चनांनी राष्ट्रांच्या युद्धांमध्ये भाग घेऊ नये.
ख्रिस्ती लोकांवर शनिवार किंवा रविवारचा शब्बाथ पाळण्याचे बंधन नाही.
ख्रिश्चनांनी फ्रीमेसन्ससारख्या गुप्त संघटनांचे भाग असू नये.
ख्रिश्चनांमध्ये पाळकवर्ग आणि सामान्य लोक असा भेद नसावा.
धार्मिक पदव्या ख्रिस्तविरोधी लोकांकडून आहेत.
सर्व मंडळ्यांमध्ये वडिलांचा एक गट असावा.
वडिलांचे शुद्ध वर्तन असावे, त्यांच्यावर कसलाही कलंक लागता कामा नये.
सर्व ख्रिश्चनांनी सुवार्तेचा प्रचार करावा.
पृथ्वीवरील परादीसमध्ये (बागेसमान परिस्थितीत) लोक सर्वकाळासाठी जगतील.
ख्रिस्ती गीते ही यहोवा आणि ख्रिस्तासाठी स्तुतीगीते असावीत.
[चित्राचे श्रेय]
फोटो: Collection of The New-York Historical Society/६९२८८
[२८ पानांवरील चौकट/चित्र]
जॉर्ज स्टॉर्स यांचा विश्वास
येशूने मानवजातीसाठी स्वतःचे जीवन हे खंडणी मूल्य म्हणून अर्पण केले.
सुवार्तेची घोषणा अद्याप (१८७१ मध्ये) पूर्ण झाली नाही.
त्यामुळे, त्या काळात (१८७१ मध्ये) अंत जवळ नव्हता. सुवार्तेची घोषणा होण्यासाठी एक भावी युग असावयाचे होते.
पृथ्वीवर काही लोकांना सार्वकालिक जीवन मिळेल.
अज्ञानात मरण पावलेल्यांना हमखास पुनरुत्थित केले जाईल. ख्रिस्ताचे खंडणी बलिदान स्वीकारलेल्यांना या पृथ्वीवर अनंत जीवन लाभेल. आणि नाकारणाऱ्यांचा नाश होईल.
आत्म्याचे अमरत्व आणि नरकाग्नी या देवाचा अनादर करणाऱ्या खोट्या शिकवणी आहेत.
प्रभूचे सांज भोजन हा निसान १४ ला होणारा वार्षिक सण आहे.
[चित्राचे श्रेय]
फोटो: SIX SERMONS, by George Storrs (१८५५)
[२९ पानांवरील चित्रे]
सन १९०९ मध्ये, “झायन्स वॉचटावर” याचे संपादक सी. टी. रस्सल यांनी अमेरिकेच्या ब्रुकलिन, न्यूयॉर्क येथे स्थानांतर केले