व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवासोबत जवळचा नातेसंबंध निश्‍चितच शक्य आहे

देवासोबत जवळचा नातेसंबंध निश्‍चितच शक्य आहे

देवासोबत जवळचा नातेसंबंध निश्‍चितच शक्य आहे

याकोब ४:८ मध्ये म्हटले आहे: “देवाजवळ या म्हणजे तो तुम्हांजवळ येईल.” होय, देवाची खरोखरच अशी इच्छा आहे, की आपण त्याच्या जवळ यावे. त्यामुळे तर त्याने आपल्यासाठी त्याच्या पुत्राचे बलिदान दिले.

देवाने मनुष्यावर केलेल्या या प्रेमाबद्दल कदर दाखवत योहानाने लिहिले: “पहिल्याने त्याने [देवाने] आपणावर प्रीति केली, म्हणून आपण प्रीति करितो.” (१ योहान ४:१९) पण, देवासोबत एक घनिष्ठ नातेसंबंध जोडण्यासाठी काही महत्त्वाची पावले उचलणे आवश्‍यक आहे. आधीच्या लेखात ज्या चार गोष्टींचा उल्लेख केला होता त्याच चार गोष्टी या बाबतीतही लागू होतात. त्यांची सविस्तर चर्चा आता आपण करू या.

देवाचे प्रशंसनीय गुण जाणून घ्या

देवाचे अनेक प्रशंसनीय गुण आहेत. त्यांपैकी काही गुण विशेष उल्लेखनीय आहेत. उदाहरणार्थ, प्रेम, बुद्धी, न्याय आणि शक्‍ती. देवाच्या बुद्धीचे आणि शक्‍तीचे प्रमाण दूरच्या अंतरिक्षात आणि सभोवतालच्या जगात भव्यदिव्य आकाशगंगेपासून ते इवल्याशा परमाणूमध्ये पाहायला मिळते. त्यामुळेच एका स्तोत्रकर्त्याने म्हटले आहे: “आकाश देवाचा महिमा वर्णिते; अंतरिक्ष त्याची हस्तकृति दर्शविते.”—स्तोत्र १९:१; रोमकर १:२०.

देवाने निर्माण केलेल्या प्रत्येक वस्तुतून त्याचे प्रेम झळकते. उदाहरणार्थ, त्याने आपल्या शरीराची रचना अशाप्रकारे केली आहे, की आपण जीवनाचा आनंद लुटू शकतो. तसेच, अशा काही क्षमता त्याने आपल्याला दिल्या आहेत, की आपण रंगीबेरंगी वस्तू पाहू शकतो; स्वाद आणि सुगंधाचा तसेच संगिताचा आस्वाद घेऊ शकतो; हसून खेळून राहू शकतो आणि नयनरम्य दृश्‍ये आपल्या डोळ्यांत बंदिस्त करू शकतो. यांशिवाय, आपल्याला अशाही काही क्षमता आणि विशिष्ट गुणधर्मे त्याने दिली आहेत ज्यांमुळे जीवन अगदी सुखमय बनते. या सर्व गोष्टी नसत्या तरीसुद्धा जीवन जगणे शक्य झाले असते; पण, मानवाला या गोष्टी देऊन देवाने आपले औदार्य दाखवले आहे; तसेच मानवाप्रती त्याने असीम प्रेम आणि दया देखील दाखवली आहे. याच गुणांमुळे त्याला ‘धन्य’ म्हणजे आनंदी देव म्हटले आहे.—१ तीमथ्य १:११; प्रेषितांची कृत्ये २०:३५.

तेव्हा, स्वर्गदूत असो अथवा मनुष्य; तो यहोवा देवाचे प्रेम पाहून त्याच्याशी जवळीक साधतो आणि त्याचे शासन मान्य करतो तेव्हा यहोवाला अत्यंत आनंद होतो. (१ योहान ४:८) देव या विश्‍वाचा सत्ताधारी आणि सम्राट असूनही तो आपल्यासारख्या मनुष्यांवर, आणि खासकरून आपल्या विश्‍वासू सेवकांवर अशाप्रकारे प्रेम करतो जणू तो एक पिता आहे आणि आपण त्याची मुले आहोत. (मत्तय ५:४५) आणि त्यामुळे या जगातली चांगल्यातली चांगली वस्तू देखील त्याने आपल्यापासून लपून ठेवली नाही. (रोमकर ८:३८, ३९) हे सर्व कमी म्हणून की काय, त्याने आपल्या काळजाचा तुकडा म्हणजे आपला एकुलता एक पुत्र देखील आपल्यासाठी बलिदान केला. होय, यहोवाने आपल्यावर केलेल्या अपार प्रेमामुळेच आपण आज जिवंत आहोत आणि अनंतकाळ जीवन जगण्याची आशा बाळगतो.—योहान ३:१६.

आपण येशू ख्रिस्तामार्फत देखील यहोवा देवाला जवळून ओळखू शकतो. कारण येशूने हुबेहूब आपल्या पित्याचे गुण प्रकट केले. (योहान १४:९-११) येशूमध्ये किंचितही स्वार्थ नव्हता. उलट, तो विचारशील आणि समजूतदार होता. एकदा, लोकांनी अशा एका मनुष्याला येशूकडे आणले जो बहिरा होता आणि त्याच्यात वाचा दोष होता. अशा लोकांना चार लोकांत असताना सहसा संकोच वाटतो. पण, येशू लगेच त्या मनुष्याची समस्या ओळखतो. त्याला एकांतात घेऊन जातो आणि त्याला बरे करतो. (मार्क ७:३२-३५) तुम्हाला असे लोक आवडतात का जे तुमच्या भावना समजू शकतात आणि तुमचा आदर करतात? तसे असेल तर तुम्ही जितके अधिक यहोवा आणि येशूविषयी जाणून घ्याल तितके अधिक तुम्ही त्यांच्या समीप जाल.

देवाच्या गुणांचा विचार करा

एका व्यक्‍तीमध्ये अनेक चांगले गुण असतील; पण आपण जोपर्यंत त्या गुणांचा विचार करत नाही तोपर्यंत आपण त्या व्यक्‍तीशी जवळचा नातेसंबंध जोडू शकणार नाही. यहोवाच्या बाबतीतही हे खरे आहे. आपल्याला त्याच्याशी जवळचा नातेसंबंध बांधायचा असेल तर दुसरे एक महत्त्वाचे पाऊल म्हणजे त्याच्या गुणांचा सतत विचार करणे. ज्याने देवावर मनापासून प्रेम केले आणि जो स्वतः देखील “[यहोवाच्या] मनासारखा” होता त्या दावीद राजाने म्हटले: “मी प्राचीन काळचे दिवस मनात आणितो; तुझ्या सर्व कृत्यांचे मनन करितो; तुझ्या हातच्या कृतींचे चिंतन करितो.”—प्रेषितांची कृत्ये १३:२२; स्तोत्र १४३:५.

तुम्ही देवाच्या अप्रतिम सृष्टीवर एक नजर टाकता किंवा मग त्याचे वचन, बायबल याचे वाचन करता तेव्हा पाहिलेल्या आणि वाचलेल्या गोष्टींवर तुम्ही दाविदाप्रमाणे मनन करता का? असा विचार करा की आपल्या वडिलांवर मनापासून प्रेम करणाऱ्‍या एका मुलाला नुकतेच आपल्या वडिलांकडून एक पत्र मिळाले आहे. तो ते पत्र कशाप्रकारे वाचेल? केवळ एक ओझरती नजर टाकून ते ड्रॉवरमध्ये टाकून देईल का? मुळीच नाही. तो अतिशय लक्षपूर्वक ते पत्र वाचेल आणि त्यात लिहिलेल्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करेल. देवाचे वचन, बायबल हे देखील आपल्याला देवाकडून मिळालेल्या एका पत्राप्रमाणे आहे. तेव्हा, आपणही ते अतिशय अनमोल समजले पाहिजे. स्तोत्रकर्त्यासाठी सुद्धा ते अतिशय अनमोल होते; म्हणूनच त्याने म्हटले: “अहाहा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे! दिवसभर मी त्याचे मनन करितो.”—स्तोत्र ११९:९७.

चांगले दळणवळण राखा

चांगले दळणवळण एका अतूट नातेसंबंधाचा पाया आहे असे म्हटले जाते. चांगल्या दळणवळणात बोलणे आणि ऐकणे या दोन्ही गोष्टी सामील आहेत. पण, त्या वरवर नव्हे तर मनापासून केल्या पाहिजेत. प्रार्थना हे आपल्या सृष्टीकर्त्याशी नित्य बोलण्याचे एक माध्यम असून आपल्या उपासनेचा प्रमुख भाग आहे. जे लोक यहोवावर प्रेम करतात, त्याची सेवा करतात आणि येशूला देवाचा खास दूत मानतात अशा लोकांच्या प्रार्थना ऐकण्यास देवाला फार आवडते.—स्तोत्र ६५:२; योहान १४:६, १४.

प्राचीन काळी देव निरनिराळ्या माध्यमांतून मानवांशी बोलत असे. जसे की, दृष्टान्त, स्वप्ने अथवा स्वर्गदूत यांमार्फत तो बोलत असे. परंतु, आज तो त्याच्या लिखित वचनातून अर्थात बायबलच्या माध्यमातून आपल्याशी बोलतो. (२ तीमथ्य ३:१६) या लिखित वचनाचे अनेक फायदे आहेत. उदाहरणार्थ, आपण वाटेल तेव्हा त्याचे वाचन करू शकतो. एखादे पत्र वारंवार वाचून जसा आपल्याला आनंद मिळतो त्याप्रमाणे बायबलचे आपण जितके वाचन करू तितका अधिक आनंद आपल्याला मिळेल. याशिवाय, बायबलचे वाचन करण्याचा आणखीन एक फायदा म्हणजे त्यात फेरबदल होण्याची कोणतीही शक्यता नाही. तेव्हा, बायबल हे स्वर्गात राहणाऱ्‍या आपल्या प्रिय पित्याकडून आपल्याला मिळालेल्या पत्रांचा एक संग्रह आहे अशी कल्पना करा आणि या पत्रांद्वारे दररोज आपला पिता यहोवा याला तुमच्याशी बोलण्याची संधी द्या.—मत्तय ४:४.

बायबलच्या माध्यमातून यहोवा आपल्याला हेच सांगत असतो, की कोणते काम योग्य आहे आणि कोणते अयोग्य. त्यात त्याने मानव आणि पृथ्वी यांसंबंधीचा आपला उद्देश सांगितला आहे. निरनिराळ्या लोकांशी आणि राष्ट्रांशी तो कसा व्यवहार करतो तसेच आपल्या विश्‍वासू सेवकांशी आणि कट्टर विरोधकांशी तो कसा व्यवहार करतो हेसुद्धा बायबलमध्ये सांगितले आहे. अशाप्रकारे, मानवांसोबतच्या त्याच्या व्यवहारांची माहिती बायबलमध्ये नमूद करून देवाने आपल्या व्यक्‍तिमत्त्वाचे, आपल्या गुणांचे अचूक चित्र रेखाटले आहे. त्यात त्याने आपले विचार तसेच प्रेम, आनंद, क्रोध, दुःख, निराशा, दया आणि चिंता या भावना देखील जाहीर केल्या आहेत. शिवाय, त्याच्या व्यक्‍तिमत्त्वाची अचूक समज आपल्याला प्राप्त व्हावी म्हणून त्याचे विचार आणि भावना यांमागील कारणेसुद्धा त्याने बायबलमध्ये नमूद करून ठेवली आहेत.—स्तोत्र ७८:३-७.

त्यामुळे तुम्ही देवाचे वचन, बायबल यातील एखादा भाग वाचता तेव्हा त्यातून तुम्हाला फायदा कसा मिळवता येईल? आणि खासकरून देवाशी जवळीक साधण्याकरता तुम्ही काय करू शकता? सर्वात प्रथम, तुम्ही काय वाचले आणि त्यातून देवाच्या गुणांविषयी काय शिकलात याचा विचार करा; असे केल्याने, वाचनातले खास मुद्दे तुमच्या मनावर बिंबवले जातील. त्यानंतर, शिकलेल्या गोष्टींविषयी तुमचा काय विचार आहे, तुम्हाला काय वाटते आणि त्या गोष्टी तुम्ही आपल्या जीवनात लागू कशा करू शकता याविषयी प्रार्थनेत यहोवाशी बोला. अशाप्रकारे, बायबलचे वाचन आणि देवाला प्रार्थना करणे यालाच दळणवळण म्हणतात. यांशिवाय, तुमच्या मनात आणखीनही काही गोष्टी असतील यात शंका नाही; त्या गोष्टींविषयी देखील तुम्ही देवाशी बोलू शकता.

देवासोबत काम करा

बायबलमध्ये अशा काही विश्‍वासू लोकांविषयी सांगितले आहे जे खऱ्‍या देवाच्या सन्मुख किंवा देवाबरोबर चालत असत. (उत्पत्ति ६:९; १ राजा ८:२५) देवाबरोबर चालण्याचा अर्थ काय होतो? हे विश्‍वासू सेवक जीवनाचा प्रत्येक दिवस अशा प्रकारे जगले जणू देव अक्षरशः त्यांच्यासोबत होता. हे खरे आहे, की ते पापी होते. पण, देवाच्या नियमांचे व सिद्धान्तांचे त्यांनी मनापासून पालन केले आणि त्याच्या उद्देशानुसार त्यांनी आपले जीवन व्यतीत केले. देव अशाच प्रकारच्या लोकांना पसंत करतो आणि त्यांची काळजी वाहतो. स्तोत्र ३२:८ मध्ये लिहिले आहे: “मी तुला बोध करीन; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन; मी आपली दृष्टि तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन.”

तुम्ही देखील यहोवाला आपला सगळ्यात जिवलग मित्र बनवू शकता. किंबहुना, एक असा मित्र जो तुमच्यासोबत चालेल, तुमची काळजी वाहील आणि वडिलाप्रमाणे तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. यशया संदेष्ट्याने यहोवाविषयी म्हटले, की तो, ‘आपल्याला जे हितकारक ते शिकवतो; ज्या मार्गाने आपणास गेले पाहिजे त्याने आपल्याला नेतो.’ (यशया ४८:१७) यहोवाने दाखवलेल्या मार्गावरून आपण वाटचाल करतो तेव्हा आपल्यालाही दाविदाप्रमाणे वाटेल ज्याने म्हटले, की यहोवा “[आमच्या] उजवीकडे आहे.”—स्तोत्र १६:८.

देवाचे नाव—त्याच्या गुणांकडे आपल्याला आकृष्ट करते

जगातल्या अनेक धर्मांमध्ये देवाच्या नावाचा उपयोग केला जात नाही आणि बायबलच्या काही भाषांतरांमधून तर देवाचे नाव गाळण्यात आले आहे. (स्तोत्र ८३:१८) पण, मूळ इब्री शास्त्रवचनांत देवाचे “यहोवा” हे नाव जवळजवळ ७००० वेळा आढळते! (बायबलच्या बऱ्‍याच अनुवादकांनी देवाचे नाव काढून टाकले आहे; पण, बआल, बेल, मरोदक इतकेच नाही तर सैतान यांसारख्या खोट्या दैवतांची नावे काढली नाहीत!)

काही लोकांना वाटते, की बायबलमध्ये देवाचे नाव असले-नसले तरी काही फरक पडत नाही. पण, जरा विचार करा: ज्याला नावच नाही अशा व्यक्‍तीला जवळून जाणणे आणि तिला आपल्या जिवाभावाचा मित्र बनवणे शक्य आहे का? ईश्‍वर आणि प्रभू या केवळ पदव्या आहेत आणि त्या खोट्या दैवतांसाठीही वापरल्या जाऊ शकतात. या पदव्या आपल्याला यहोवाची शक्‍ती, त्याचा अधिकार किंवा त्याचे पद यांविषयी सांगत असले तरी त्याचे ‘यहोवा’ हे नाव आपल्याला त्याची एक वेगळी ओळख करून देते. (निर्गम ३:१५; १ करिंथकर ८:५, ६) त्याचे गुण आणि वैशिष्ट्ये तर त्याच्या नावाशी जुळलेली आहेत. वॉल्टर लाउरी या धर्मवेत्त्याने अगदी बरोबर म्हटले आहे: “ज्याला देवाचे नावच माहीत नाही त्याला त्याचे गुण काय माहीत असणार.”

आता ऑस्ट्रेलियात राहणाऱ्‍या मारियाचेच उदाहरण घ्या. कॅथलिक धर्मात तिला फार आस्था होती. यहोवाचे साक्षीदार पहिल्यांदा तिला भेटले तेव्हा त्यांनी तिला बायबलमधून देवाचे नाव दाखवले. देवाचे नाव जाणून तिला कसे वाटले? ती म्हणते: “बायबलमध्ये पहिल्यांदाच देवाचे नाव स्वतःच्या डोळ्यांनी मी पाहिले तेव्हा माझ्या डोळ्यांत पाणी तरळले. मला आनंद झाला की आता देवाचे नाव घेऊन मला प्रार्थना करता येईल.” मारिया बायबलचा अभ्यास करत राहिली आणि त्यामुळे तिला देवाचे गुण माहीत झाले. तसेच त्याच्यासोबत एक जवळचा नातेसंबंध बांधणे देखील तिला शक्य झाले.

होय, आपण देवाला पाहू शकत नसलो तरी ‘देवाच्या जवळ येऊ’ शकतो. आपल्या मनाच्या आणि हृदयाच्या चक्षुंनी आपण त्याचे गुण “पाहू” शकतो. त्यामुळे त्याच्यावरील आपले प्रेम वृद्धिंगत होईल. हे प्रेम वास्तवात “पूर्णता करणारे बंधन” आहे.—कलस्सैकर ३:१४.

[६ पानांवरील चौकट/चित्र]

देव प्रेमाच्या बदल्यात प्रेम देतो

नातेसंबंध नेहमी दुहेरी असतात. तुम्ही देवाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला तर तो देखील तुमच्या जवळ येतो. बायबलमध्ये उल्लेखिलेल्या वृद्ध शिमोन आणि हन्‍ना यांच्याबद्दल देवाला कसे वाटले ते आपण पाहू या. बायबलमध्ये या दोघांचाही खास उल्लेख केला आहे. शुभवर्तमानाच्या एका पुस्तकात लेखक लूक म्हणतो, की शिमोन “नीतिमान व भक्‍तिमान” होता. आणि तो मशिहाच्या येण्याची वाट पाहत होता. आपल्या या वृद्ध भक्‍ताचे हे चांगले गुण यहोवा देवाने पाहिले तेव्हा त्याने त्याच्याबद्दल प्रेम कसे व्यक्‍त केले? यहोवाने त्याला वचन दिले होते की, “ख्रिस्ताला पाहण्याअगोदर तुला मरण येणार नाही.” यहोवाने आपले हे वचन पूर्ण करून दाखवले. येशूच्या जन्मानंतर त्याचे आईवडील येरुशलेमेतील मंदिरात येशूला घेऊन आले तेव्हा यहोवाने शिमोनाला येशूकडे मार्गदर्शित केले. येशूला पाहून शिमोनाला धन्य वाटले! त्याने बाळ येशूला हातात घेऊन देवाचा धन्यवाद करीत म्हटले: “हे प्रभू, आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ देत आहेस; कारण माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे.”—लूक २:२५-३५.

“त्याच वेळी” यहोवाने ८४ वर्षांच्या वयोवृद्ध हन्‍नावरही आपले प्रेम दाखवले. बायबल म्हणते, की ही विधवा स्त्री देवाची खरी उपासक होती. ती मंदिरात “उपास व प्रार्थना करून रात्रंदिवस सेवा करीत असे.” देवाने तिला देखील येशूकडे निर्देशित केले. हन्‍नाने येशूला पाहिले तेव्हा शिमोनाप्रमाणे तिनेसुद्धा मनापासून देवाचे आभार मानले कारण यहोवाने तिला मशिहाचे दर्शन देऊन तिच्यावर खूप उपकार केले होते. त्यानंतर “जे यरुशलेमेच्या मुक्‍ततेची वाट पाहत होते त्या सर्वांस” ती त्या बाळाविषयी सांगू लागली.—लूक २:३६-३८.

होय, आपल्याविषयी शिमोन आणि हन्‍नाला किती प्रेम आणि आदरयुक्‍त भय आहे हे यहोवाच्या नजरेतून सुटले नव्हते. शिवाय, त्याचा उद्देश पूर्ण होण्याची ते किती आतूरतेने वाट पाहात होते हे देखील यहोवाने पाहिले. प्रेमाच्या बदल्यात यहोवाने त्यांना आपले प्रेम दिले. तर मग, बायबलमध्ये लिहिलेले असे वृत्तान्त वाचून तुमच्या मनातही यहोवाविषयी प्रेम उन्मळून येत नाही का?

आपल्या पित्याप्रमाणे येशूने देखील मनुष्यांच्या बाह्‍य स्वरूपाकडे नव्हे तर त्यांच्या आंतरिक व्यक्‍तिमत्त्वाकडे पाहिले. उदाहरणार्थ, मंदिरात एकदा शिक्षण देत असताना त्याने “एका दरिद्री विधवेलाहि” दान पेटीत “दोन टोल्या” टाकताना पाहिले. इतरांच्या नजरेत हे दान अगदी कवडी मोलाचे असले तरी येशूला त्या दानाची किंमत होती. कारण त्या स्त्रीने आपल्या कमताईतून आपली सर्व उपजीविका टाकली होती. (लूक २१:१-४) यावरून आपल्याला हा दिलासा मिळतो, की आज आपणही आपल्या परिस्थितीनुसार यहोवाला आपले सगळ्यात उत्तम दिले तर यहोवा आणि येशू जरूर त्याची कदर करतील; मग, ते दान लहान का असेना.

मानव आपल्यावर किती प्रेम करतो हे पाहून ज्याप्रमाणे देव आनंदित होतो; त्याप्रमाणेच, मानव आपल्यापासून दूर होऊन दुष्टाईचा मार्ग पत्करतो तेव्हा त्याला दुःखही होते उत्पत्ति ६:६ मध्ये सांगितले आहे, की जलप्रलयाआधीच्या काळात मनुष्याची दुष्टाई पाहून “त्याच्या चित्ताला खेद झाला.” स्तोत्र ७८:४१ मध्ये म्हटले आहे, की इस्त्राएल लोकांनी देवाच्या आज्ञा मोडून “देवाची परीक्षा पाहिली व इस्राएलाच्या पवित्र प्रभूस चिडविले.” होय, देव निर्गुण नव्हे तर भावना असलेली एक व्यक्‍ती आहे. पण, आपल्यात आणि त्याच्यात फरक हा आहे, की अपूर्ण मानवांप्रमाणे त्याच्या भावना अनियंत्रित नाहीत; तर तो अंतर्बाह्‍य परिपूर्ण असून त्याच्या भावना सर्वस्वी त्याच्या काबूत आहेत.

[७ पानांवरील चित्रे]

यहोवाच्या जवळ येण्याचा एक मार्ग म्हणजे त्याने निर्माण केलेल्या सृष्टीचा विचार करणे