व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अनुदान केल्याने आनंद मिळतो

अनुदान केल्याने आनंद मिळतो

अनुदान केल्याने आनंद मिळतो

एक ख्रिस्ती ओव्हरसियर या नात्याने पौलाला आपल्या बंधूभगिनींवर प्रेम होते आणि त्याने नेहमीच त्यांचे हित चिंतिले. (२ करिंथकर ११:२८) त्यामुळेच सा.यु. ५० च्या जवळपास यहुदियातील गरजवंत ख्रिश्‍चनांची मदत करण्यासाठी त्याने इतर बांधवांकडून दान गोळा केले तेव्हा ती संधी साधून त्याने बांधवांना उदारतेविषयी बऱ्‍याच चांगल्या गोष्टी शिकवल्या. त्याने या गोष्टीवर जोर दिला, की स्वखुशीने दिलेले दान यहोवाच्या नजरेत अनमोल ठरते. पौलाने म्हटले: “प्रत्येकाने आपआपल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे; दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये; कारण ‘संतोषाने देणारा देवाला’ प्रिय असतो.”—२ करिंथकर ९:७.

कंगाल तरीही उदार

पहिल्या शतकातील बहुतेक ख्रिस्ती, समाजात फारसे प्रतिष्ठित नव्हते. पौलाने म्हटले त्याप्रमाणे ते “समर्थ” नव्हे; तर ‘जगातील हीनदीन’ होते. (१ करिंथकर १:२६-२८) उदाहरणार्थ, मासेदोनियातील ख्रिश्‍चन “संकटाच्या बिकट परीक्षेत” आणि ‘कमालीच्या दारिद्र्‌यात” होते. तरीसुद्धा त्या नम्र बांधवांनी पौलाला आग्रहपूर्वक म्हटले, की ते आर्थिक रूपाने मदत करून “पवित्र जनांची सेवा” करू इच्छित होते. त्यांनी जे काही दान केले होते ते पाहून पौलाने म्हटले: “त्यांनी आपल्या शक्‍तीप्रमाणे व शक्‍तीपलीकडेहि आपण होऊन दान दिले” होते!—२ करिंथकर ८:१-४.

पण, त्यांच्या उदारतेचे मूल्यांकन त्यांनी किती दान दिले त्यांवरून केले नव्हते; तर दान करण्यामागे कोणती भावना होती हे पाहिले गेले. म्हणजे, त्यांच्याकडे जे काही होते ते इतरांमध्ये वाटण्याची इच्छा त्यांच्यात होती का? आणि त्यांनी मनापासून दान दिले होते का? हे पाहिले गेले. आपण जे काही दान देतो ते मनापासून दिले पाहिजे असे पौल करिंथच्या ख्रिश्‍चनांना सूचित करत होता. त्याने त्यांना म्हटले: “मला तुमची उत्सुकता ठाऊक आहे; तिच्यावरून मासेदोनियातील लोकांजवळ मी तुम्हाविषयी अभिमानाने [सांगत] आहे . . . आणि ह्‍या तुमच्या आस्थेने त्यांतील बहुतेकांना उत्तेजन मिळाले आहे.” होय, करिंथच्या ख्रिश्‍चनांनी औदार्याने दान करण्याचे ‘मनात ठरवले’ होते.—२ करिंथकर ९:२, ७.

‘त्यांच्या आत्म्याने त्यांना उत्सुक केले’

उदारतेविषयी शिकवताना, १५ शतकांपूर्वी घडलेली एक घटना प्रेषित पौलाच्या मनात असावी. ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा इस्राएलचे १२ वंश मिसरच्या दास्यत्वातून मुक्‍त झाले होते. आणि आता सीनाय पर्वताच्या पायथ्यापाशी जमले होते. येथे यहोवाने त्यांना उपासनेसाठी निवासमंडप बनवण्याची आणि त्यात उपासनेकरता लागणाऱ्‍या सर्व सामानसुमानाची व्यवस्था करण्यास सांगितले होते. या कामासाठी बऱ्‍याच साधनांची गरज होती यात शंका नाही. त्यामुळे इस्राएल लोकांना अनुदान देण्यास सांगितले होते.

इस्राएल लोकांनी कसा प्रतिसाद दाखवला? “ज्या कोणाच्या हृदयाने त्याला स्फूर्ति दिली तो प्रत्येक, आणि ज्या कोणाच्या आत्म्याने त्याला उत्सुक केले तो प्रत्येक असे ते आले, आणि त्यांनी निवासमंडपाच्या कामासाठी व त्याच्या सर्व सेवेसाठी व पवित्र वस्त्रांसाठी यहोवाचे अर्पण आणले.” (निर्गम ३५:२१, पं.र.भा.) त्यांनी हे सर्व उदार मनाने दिले का? यात कोणतीही शंका नाही! कारण मोशेला सांगण्यात आले, की “परमेश्‍वराने जे काम करण्याची आज्ञा दिली आहे ते करावयाला जी सामग्री लागते तिच्यापेक्षा लोक पुष्कळच अधिक आणीत आहेत.”—निर्गम ३६:५.

त्यावेळी इस्राएल लोकांची आर्थिक स्थिती कशी होती? इस्राएल लोक नुकतेच मिसरच्या दास्यत्वातून मुक्‍त झाले होते. मिसर देशात ते अतिशय बिकट आणि हालाखीच्या परिस्थितीत जीवन कंठत होते. ‘त्यांच्यावर कामाचा बोजा लादून त्यांना जेरीस आणले जायचे’ त्यामुळे त्यांचे जीवन ‘क्लेशदायक’ झाले आणि ‘त्यांना जीव नकोसा झाला’ होता. (निर्गम १:११, १४; ३:७; ५:१०-१८) यावरून समजते, की मिसर देशातून बाहेर पडल्यानंतर त्यांची आर्थिक स्थिती इतकी काही चांगली नव्हती. त्या देशातून बाहेर पडताना ते आपल्यासोबत गुरेढोरे घेऊन गेले होते हे खरे आहे. (निर्गम १२:३२) पण, तेही फार जास्त नव्हते. त्यामुळेच तर काही समयानंतर ते लगेच कुरकूर करू लागले, की त्यांच्याकडे खाण्यासाठी मांस नाही.—निर्गम १६:३.

मग प्रश्‍न आहे, की निवासमंडप बनवण्यासाठी इस्राएलांकडे इतके धन कोठून आले असेल? खरे म्हणजे मिसर देशातून निघत असताना त्यांच्या धन्यांनी त्यांना खूप धन दिले होते. बायबल म्हणते: “इस्राएल लोकांनी . . . मिसरी लोकांपासून सोन्याचांदीचे दागिने व वस्त्रेप्रावरणे मागून घेतली, . . . त्यांनी जे जे मागितले ते ते [मिसरच्या लोकांनी] त्यांना दिले.” मिसरी लोकांनी हा जो मनाचा मोठेपणा दाखवला होता त्यामागे फारोचा नव्हे, यहोवाचा हात होता. त्याविषयी बायबल म्हणते: “मिसरी लोकांची कृपादृष्टि इस्राएल लोकांवर होईल असे परमेश्‍वराने केले, म्हणून त्यांनी जे जे मागितले ते ते त्यांनी त्यांना दिले.”—निर्गम १२:३५, ३६.

इस्राएल लोक कित्येक शतके मिसरच्या दास्यत्वात जखडले होते. तेव्हा, या काळादरम्यान त्यांना किती दुःख सोसावे लागले असतील आणि किती कष्ट करावे लागले असतील याचा विचार करा. पण, आता मात्र ते मुक्‍त झाले होते; शिवाय, त्यांना पुष्कळ धनसुद्धा मिळाले होते. पण आता हेच धन त्यांना दान करण्यास सांगितले तेव्हा त्यांना कसे वाटले असेल? ते असे म्हणू शकले असते, की ‘ही आमच्या कष्टाची कमाई आहे. तेव्हा यावर केवळ आमचा हक्क आहे,’ पण, असा विचार करून त्यांनी दान देण्यास नाकारले का? मुळीच नाही. उलट, न कचरता, उदार मनाने त्यांनी दान दिले. या सर्व गोष्टी यहोवामुळेच तर आपल्याला मिळाल्या आहेत हे ते विसरले नाहीत. आणि मोठ्या औदार्याने त्यांनी सोनेचांदी आणि गुरेढोरे दान केले. दान करण्याची ‘मनस्वी इच्छा’ त्यांच्यात होती. असे करण्याची त्यांच्या “अंतःकरणात स्फूर्ति झाली.” आणि ‘त्यांच्या आत्म्याने त्यांना उत्सुक केले’ (पं.र.भा). होय, त्यांनी खरोखरच “स्वच्छेने” यहोवासाठी अर्पणे आणली.—निर्गम २५:१-९; ३५:४-९, २०-२९; ३६:३-७.

देण्याची उत्सुकता

एखाद्या व्यक्‍तीने किती मोठी रक्कम दान केली आहे यावरून त्याच्या उदारतेचे मूल्यांकन केले जात नाही. एकदा येशूने लोकांना मंदिरातील दान पेटीत दान टाकताना पाहिले. बरेच श्रीमंत लोक दान पेटीत भली मोठी रक्कम टाकत असल्याचे त्याने पाहिले. पण, एका गरीब विधवेने टाकलेल्या दानामुळे येशू विलक्षण प्रभावित झाला. तिने फक्‍त दोन टोल्या दान पेटीत टाकल्या होत्या आणि वास्तवात या दोन टोल्या अगदी कवडीमोलाच्या होत्या. पण, ही तिची पूर्ण कमाई होती. म्हणूनच येशूने म्हटले: “ह्‍या दरिद्री विधवेने सर्वांपेक्षा अधिक टाकले आहे. . . . हिने तर आपल्या कमताईतून आपली सर्व उपजीविका टाकली आहे.”—लूक २१:१-४; मार्क १२:४१-४४.

पौलाचासुद्धा येशूसारखाच दृष्टिकोन होता. गरजवंत बांधवांची मदत करणाऱ्‍या बंधूभगिनींविषयी पौलाने म्हटले: “उत्सुकता असली म्हणजे ज्याच्या त्याच्याजवळ असेल तसे ते मान्य होते; नसेल तसे नाही.” (२ करिंथकर ८:१२) होय, बांधवासाठी दान करण्याचा प्रश्‍न येतो तेव्हा कोण कोणापेक्षा जास्त देतो याकडे पाहिले जात नाही. आपण आपल्या परिस्थितीनुसार आणि मनापासून जे काही देतो त्यामुळे यहोवा प्रसन्‍न होतो.

हे खरे आहे, की आपल्यापैकी कोणीही दान देऊन यहोवाला श्रीमंत बनवू शकत नाही. कारण आपण जे काही त्याला दान करतो ते सर्व त्यानेच तर आपल्याला दिले आहे. पण, त्याला दान देऊन त्याच्यावर आपण प्रेम करतो हे दाखवण्याची संधी आपल्याला मिळते ही किती आनंदाची गोष्ट आहे! (१ इतिहास २९:१४-१७) दान हे आपल्या स्वार्थापोटी किंवा इतरांना दाखवण्यासाठी नव्हे; तर योग्य मनोवृत्तीने आणि सत्याला बढावा देण्याच्या उद्देशाने दिले जावे. असे केल्यास देवाचे आशीर्वाद तर आपल्याला लाभतीलच; शिवाय, देवाच्या सेवेत आनंदही मिळेल. (मत्तय ६:१-४) येशूने म्हटले त्याप्रमाणे: “घेण्यापेक्षा देणे ह्‍यात जास्त धन्यता आहे.” (प्रेषितांची कृत्ये २०:३५) दुसऱ्‍यांना देऊन आनंद मिळवण्याची आपली इच्छा असल्यास आपली संपूर्ण शक्‍ती यहोवाच्या सेवेत आपण खर्च करू शकतो; तसेच, त्याच्या कार्याला बढावा देण्यासाठी आणि गरजवंतांची मदत करण्यासाठी आपण अनुदान देऊ शकतो.—१ करिंथकर १६:१, २.

उदारतेची आधुनिक कामे

आज यहोवाचे साक्षीदार मोठ्या आवेशाने जगभरात ‘राज्याची सुवार्ता’ गाजवत आहेत. (मत्तय २४:१४) यामुळे विसाव्या शतकाच्या शेवटच्या दहा वर्षांत ३०,००,००० हून अधिक लोकांनी बाप्तिस्मा घेऊन यहोवाला आपले जीवन समर्पित केले. आणि जवळजवळ ३०,००० नव्या मंडळ्यांची स्थापना झाली. होय, जगभरात यहोवाच्या साक्षीदारांच्या जितक्या मंडळ्या आहेत त्यांपैकी जवळजवळ एक-तृतियांश मंडळ्या गेल्या दहा वर्षांत स्थापित झाल्या आहेत! लोकांना यहोवा देवाच्या उद्देशांविषयी सांगण्यासाठी ज्या बंधूभगिनींनी आपला बहुमोल वेळ आणि शक्‍ती यहोवाच्या सेवेत खर्च केली आहे त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे हे सर्व साध्य झाले. देवाच्या कार्याला बढावा देण्यात मिशनऱ्‍यांनी देखील योगदान दिले आहे. आपले घरदार सोडून इतर देशांत राज्याचा प्रचार करण्यासाठी त्यांनी स्वतःला वाहून दिले. या वाढत्या प्रगतीमुळे नवीन सर्किट बनवावे लागले आणि नवीन सर्किट ओव्हरसियरची नियुक्‍ती करावी लागली. शिवाय, बायबल अभ्यास करण्यासाठी आणि प्रचार कार्यात उपयोग करण्यासाठी अधिक बायबल आणि बायबलवर आधारित साहित्यसुद्धा छापावे लागले. अनेक देशांमध्ये शाखा दफ्तरांच्या इमारती वाढवण्याची किंवा त्या जागी मोठे शाखा दफ्तर बनवण्याची गरज निर्माण झाली. हे सर्व यहोवाच्या लोकांनी स्वेच्छेने दिलेल्या अनुदानांमुळे शक्य झाले.

राज्य सभागृहांची गरज

ही अखंड वाढ लक्षात घेऊन यहोवाच्या साक्षीदारांना अधिकाधिक राज्य सभागृहे बांधण्याची गरज भासली आहे. वर्ष २००० च्या सुरवातीला घेतलेल्या एका सर्वेक्षणावरून लक्षात येते, की विकसनशील देशांत ११,००० हून अधिक राज्य सभागृहांची गरज आहे; पण, आर्थिक अडचणीमुळे ही गरज पूर्ण करणे शक्य नाही. आफ्रिकेतील अंगोला या देशाचे उदाहरण घ्या. तिथे अनेक वर्षांपासून मुलकी युद्ध चालू असूनही प्रचारकांच्या संख्येत दर वर्षी १० टक्के वाढ होत आली आहे. या देशात ६७५ मंडळ्या आहेत. पण, यांपैकी बहुतेक मंडळ्यांचे आपले स्वतःचे राज्य सभागृह नसल्यामुळे त्यांना त्यांच्या सभा उघड्यावरच चालवाव्या लागतात. तिथे केवळ २२ राज्य सभागृह आहेत आणि त्यांपैकी केवळ १२ राज्य सभागृहांना छप्पर आहे.

काँगोच्या लोकशाही प्रजासत्ताकची स्थिती यापेक्षा काही वेगळी नाही. काँगोच्या किन्शासा या राजधानी शहरात जवळजवळ ३०० मंडळ्या असल्या तरी तिथे केवळ १० राज्य सभागृह आहेत. तसे पाहिले तर संपूर्ण काँगो देशात १,५०० राज्य सभागृहांची तातडीची गरज आहे. आणि पूर्व युरोपीय देशांनी म्हणजे रशिया आणि युक्रेन येथे देखील साक्षीदारांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे त्या देशांत शेकडो राज्य सभागृहांची गरज आहे. लॅटिन अमेरिकेतील ब्राझीलची स्थितीही अशीच आहे. ब्राझीलमध्ये ५ लाखांहून अधिक साक्षीदार असून तिथे अनेक राज्य सभागृहांची निकड आहे.

अशा देशांच्या गरजा भागवण्यासाठी यहोवाच्या साक्षीदारांनी अशी एक व्यवस्था केली आहे ज्यामुळे लवकरात लवकर अधिकाधिक राज्य सभागृह बांधले जाऊ शकतात. गरीब देशांतील मंडळ्यांनासुद्धा उपासनेसाठी एक योग्य असे स्थान मिळावे म्हणून आपले बंधूभगिनी उदार मनाने दान देऊन या व्यवस्थेला आर्थिक पाठबळ देतात.

प्राचीन इस्राएलच्या काळाप्रमाणे आजसुद्धा खरे ख्रिस्ती ‘आपल्या द्रव्याने परमेश्‍वराचा सन्मान करतात’ तेव्हा बरेच काही साध्य होते. (नीतिसूत्रे ३:९, १०) यहोवाच्या साक्षीदारांची गव्हर्निंग बॉडी (नियमन मंडळ) अशा सर्व लोकांचे मनःपूर्वक आभार मानते ज्यांनी स्वेच्छेने दान दिले आहे. आणि देव राज्याच्या या प्रगतिशील कार्याच्या गरजा तृप्त करण्यासाठी लोकांनी मदत करावी म्हणून यहोवाचा आत्मा लोकांना उत्सुक करील याची पूर्ण खात्री आपण बाळगू शकतो.

भविष्यातही राज्याच्या या कार्याला विलक्षण गती मिळेल. तेव्हा, एकही संधी न हुकवता आपण स्वखुशीने आपली शक्‍ती, वेळ आणि साधने या कार्यात खर्च करू आणि अनुदान देऊन मिळणाऱ्‍या आनंदाचा अनुभव घेत राहू.

[२९ पानांवरील चौकट]

‘डोळसपणे उपयोग करा!’

“मी दहा वर्षांचा आहे. पुस्तके तयार करण्यासाठी लागणारा कागद किंवा इतर साहित्य विकत घेण्यासाठी मी हे पैसे तुम्हाला पाठवत आहे.”—सिंडी

“तुम्हाला हे पैसे पाठवण्यात मला फार आनंद होतो. आमच्यासाठी आणखी पुस्तके तयार करण्यासाठी तुम्ही या पैशाचा वापर करा. वडिलांना कामात मदत केल्यामुळे त्यांनी मला दिलेल्या पैशातून मी हे पैसे बाजूला ठेवले होते. तेव्हा या पैशाचा चांगला उपयोग करा!”—पॅम, वय सात.

“तुमच्या इथे आलेल्या वादळाची बातमी ऐकून मला फार वाईट वाटले. तुम्ही सुरक्षित असाल अशी आशा करते. माझ्या गल्ल्यात केवळ दोन डॉलर आहेत. तेच मी तुम्हाला पाठवत आहे.”—ॲलीसन, वय चार.

“माझे नाव रुडी आहे आणि मी ११ वर्षांचा आहे. माझा भाऊ रॅल्फ ६ वर्षांचा आणि माझी बहीण जूडिथ अडीच वर्षांची आहे. [युद्धग्रस्त भागात राहणाऱ्‍या] आमच्या बांधवांची मदत करण्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून आम्ही आमचे खाऊचे पैसे जमा करून ठेवले होते. जमा केलेले २० डॉलर आम्ही तुम्हाला पाठवत आहोत.”

“त्या [वादळग्रस्त] क्षेत्रांत राहणाऱ्‍या बांधवाविषयी ऐकून मला फार वाईट वाटले. वडिलांसोबत काम करून मी १७ डॉलर जमा केले आहेत; ते मी तुम्हाला पाठवत आहे. कोणत्याही एका विशिष्ट कामासाठी मी हे पैसे तुम्हाला पाठवत नाही. तुमची इच्छा असेल त्या कारणासाठी तुम्ही या पैशांचा उपयोग करू शकता.”—मॅक्लिन, वय आठ.

[३१ पानांवरील चौकट]

जगभरात चाललेल्या कार्यासाठी काहीजण अशाप्रकारे अनुदान देतात

बरेच लोक, “जगभरात होणाऱ्‍या संस्थेच्या कामासाठी अनुदान—मत्तय २४:१४.” असे लिहिलेल्या दान पेटीत एक ठराविक रक्कम टाकतात.—. मंडळ्या दर महिन्याला ही रक्कम शाखा दफ्तराला पाठतात.

पैसे दान करण्याची इच्छा असल्यास तुम्ही ते सरळ या पत्त्यावर देखील पाठवू शकता: The Watch Tower Bible and Tract Society of India, H-५८ Old Khandala Road, Lonavla ४१० ४०१, Maharashtra. याशिवाय, दागदागिने किंवा इतर किंमती वस्तूसुद्धा दान केल्या जाऊ शकतात. पण, ‘आम्ही या वस्तू देणगीच्या रुपात देत आहोत’ असे म्हणणारे एक संक्षिप्त पत्रही त्यासोबत पाठवावे.

अनुदान करता यावे म्हणून योजना

पैशाची भेट देण्याव्यतिरिक्‍त आणखीनही काही मार्ग आहेत ज्याद्वारे जगभरात चाललेल्या कार्यास मदत केली जाऊ शकते:

विमा: वॉच टावर सोसायटीला जीवन विमा पॉलिसी किंवा रिटायर्मेन्ट/पेन्शन योजनेचे बेनेफिशियरी बनवले जाऊ शकते.

बँक खाते: बँक खाते, जमा प्रमाण-पत्र किंवा तुमचे रिटायर्मेन्ट खाते बँकेच्या नियमांनुसार वॉच टावर सोसायटीला ट्रस्ट म्हणून तुम्ही देऊ शकता किंवा मग मृत्यूनंतर ते संस्थेला मिळेल अशी व्यवस्था करू शकता.

स्टॉक्स आणि बाँड्‌स: स्टॉक्स आणि बाँड्‌स देखील वॉच टावर सोसायटीला थेट दान केले जाऊ शकतात.

जमीन-जुमला: विकाऊ जमीन-जुमला सरळ वॉच टावर सोसायटीला भेटीच्या स्वरूपात दिला जाऊ शकतो; किंवा तो संस्थेच्या नावावर करून जिवंत आहात तोपर्यंत त्याचा वापर केला जाऊ शकतो. पण, आपला जमीन-जुमला संस्थेच्या नावावर करण्याआधी संस्थेशी संपर्क साधला पाहिजे.

इच्छा-पत्र आणि ट्रस्ट: इच्छा-पत्रामार्फत तुम्ही तुमची संपत्ती किंवा पैसा कायद्याने वॉच टावर सोसायटीच्या नावावर करू शकता किंवा संस्थेला ट्रस्ट ॲग्रीमेंटचे बेनेफिशियरी बनवून इंडियन सक्सेशन ॲक्ट, १९२५ च्या सेक्शन (कलम) ११८ नुसार आपले इच्छा-पत्र तयार करू शकता. तिथे असे म्हटले आहे: “ज्या कोणा व्यक्‍तीला नातेवाईक आहेत तिला इच्छा-पत्र तयार न करता आपली संपत्ती किंवा पैसा कोणत्याही धार्मिक अथवा धर्मदाय संस्थेला देण्याचा अधिकार नाही. पण, हे इच्छा-पत्र त्या व्यक्‍तीच्या मृत्यूच्या एका वर्षांआधी तयार केले पाहिजे. आणि इच्छा-पत्र तयार करण्याच्या सहा महिन्यांच्या आत त्याच्या सुरक्षित ताब्यासाठी (सेफ कस्टडीसाठी) कायद्याने सांगितलेल्या ठिकाणी ते दिले पाहिजे.”